Saturday, 20 July 2019

तालिबानींची कथा-व्यथा...!

भारताच्या वायव्येकडे हिंदूकुश पर्वताच्या पलीकडे असलेल्या छोट्याशा देशाला खर तर अस्थिरतेचा, यादवीचा जुना शापच आहे. प्राचीन काळापासून इथं अनेक टोळ्यांचं आक्रमण झालं. तिथं सतत लढाया होत राहिल्या. अफगणिस्तानचा इतिहास तपासल्यास त्याची रंजक माहिती मिळते.

इसवी सनापूर्वी १५०० वर्षांपूर्वी आर्यानी अफगणिस्तानावर आक्रमण केलं. त्यांनी अनेक स्थानिक रहिवाशांची कत्तल करून किंवा त्यांच्याशी विवाह करून तिथे आपली सत्ता जमविली. इसवी सनापूर्वी ५००वर्षांपूर्वी पर्शियन लोकांनी अफगाणिस्तानातील बाक्ट्रिया प्रदेश ताब्यात घेऊन इसवी सनापूर्वी ३३० वर्षापर्यंत राज्य केलं. नंतर ग्रीक आणि मेसोडियनांनी अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली या प्रदेशावर आक्रमण करून दीडशे वर्ष सत्ता सांभाळली. त्यानंतर आलेल्या कुशाणानी त्यांचा पराभव करून त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. परंतु इसवी सन ४०० च्या सुमारास पर्शियन आणि हुणांनी त्यांना पराभूत केलं. इसवी सन ६०० मध्ये अरब आक्रमक अफगाणिस्तान आले. इसवी सन ८०० पर्यंत अरबांनी या प्रदेशात इस्लामचा व्यवस्थित प्रचार केल्याने इस्लाम हा अफगणिस्तानचा मुख्य धर्म बनला. तुर्की लोकांनी इसवी सन ९०० ते १२०० पर्यंत अफगणिस्तानवर राज्य केलं. चेंगीज खानच्या नेतृत्वाखालील मंगोलियन लोकांनी त्यांना धूळ चारून इसवी सन १२०० मध्ये सत्ता हस्तगत केली. इसवी सन १५०० ते १७०० या काळात मोगलांनी अफगणिस्तानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. १७४७ च्या सुमारास पहिल्यांदाच सर्व अफगाणी आदिवासी जाती एकत्र आल्या आणि त्यांनी अहमदशहा दुराणी च्या नेतृत्वाखाली सत्तेची सूत्र हाती घेतली. १८०० च्या सुमारास रशियनांनी अफगाणिस्तानात घुसखोरी केली तर त्यांना शह देण्यासाठी ब्रिटिश फौजांनी १८३९ मध्ये अफगणिस्तानावर हल्ला केला. ब्रिटिशांनी अफगाण राजाविरुद्ध तीन लढाया केल्या. या तिन्ही लढायांत ब्रिटिशांचा पराभव झाला. त्यामुळे अफगाणिस्तानात ब्रिटिश राजवट कधीच स्थापन झाली नाही. १९३१ मध्ये अफगाणिस्तानात घटनात्मक राजसत्ता स्थापन झाली. मोहम्मद नादीर शहा हा पहिला राजा बनला ही राजसत्ता १९७३ पर्यंत यथास्थित होती. १९७३ मध्ये बादशहा झाहिर शहा याच्या पुतण्याने मोहम्मद दाऊदने सत्ता उलथवून टाकली. सरतेशेवटी १९७९ मध्ये रशियाने अफगाणिस्तानात फौजा घुसवून कर्माल बारबाकला सत्तेवर आणलं. तेव्हापासून अमेरिकेलाही अफगाणिस्तानच्या राजकारणात रस वाटू लागला. अफगाण घुसखोरींविरुद्ध चीन, अमेरिका, पाकिस्तान सगळे लढले शेवटी १९९२ मध्ये रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली.
[
 सततच्या आक्रमणामुळे अफगाणिस्तानात अनेक लहान मोठ्या टोळ्या लहानलहान प्रांतावर कब्जा करू लागल्या. त्यामुळे अफगाणिस्तान असं एकसंघ राष्ट्रचं नव्हतं. ज्याच्याकडे काबूल त्याच्याकडे अफगाणिस्तानची सूत्रं असं समजलं जायचं. या टोळ्यांना रशिया, अमेरिकेने शस्त्रास्त्र दिली. दरम्यानच्या काळात बनीहुद्दीन रब्बानी यांनी काबूलचं सरकार काही सेनाधिकाऱ्यांकडे संपवलं. तेही स्थिर नव्हतंच कारण पाकिस्ताननं हिकमतीयार या सेनापतीला पाठींबा दिला होता. काबूलवर आपलाच हक्क असल्याचा त्यांचा दावा होता. रब्बानी आणि हिकमतीयार यांच्यात आधी लढाई झाली. मग समझौता झाला. रब्बानी राष्ट्रपती तर हिकमतीयार पंतप्रधान झाले.राजकीय अस्थिरतेचा शाप मात्र सरला नाहीच.

आज अमेरिकेला डोईजड झालेल्या तालिबानचा जन्मही अमेरिकेच्याच कृपेने झाला. अफगाणिस्तानामधील रशियन फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने अफगाण टोळ्यांना आधुनिक शस्त्रास्त्र दिली. रशियन सैन्य मागे घेतलं गेल्यावरही ही शस्त्रास्त्र त्यांच्याच हाती राहिली. साहजिकच या शस्त्रास्त्रांच्या जोरावर टोळ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. या यादवीने उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानला शिस्त लावण्यासाठी तालिबान चळवळ सुरू झाली. 'तालिबान' या शब्दाचा अर्थ विद्यार्थी असा असला तरी त्यात अनेक प्रौढ माणसं आहेत. अमेरिकेच्याच एकेकाळच्या म्हणण्यानुसार तालिबान म्हणजे अफगाणिस्तान-पाकिस्तानात शिकलेले आणि देशाला यादवीतून बाहेर काढणारे बंडखोर तरुण. त्यांना लष्करी शिक्षण, शस्त्र, पैसा, कोण पुरवतं यावर मात्र अमेरिकेने काहीच भाष्य केलं नाही.

 तालिबानला अमेरिकेबरोबर पाकिस्तानची पुरेपूर मदत मिळाली. तालिबान चळवळीची सुरुवातही पाकिस्तानकडील दक्षिण अफगाणिस्तानच्या बाजूने झाली. आधी कंधार मग हेरत शहरं जिंकत त्यांनी काबूलवर हल्ला चढवला. अध्यक्ष रब्बानी आणि पंतप्रधान हिकमतीयार पळाले. फारशी लढाई न करता काबूल तालिबानच्या हाती आलं.

तालिबान ही संपूर्ण लष्करी प्रशिक्षण लाभलेली संघटना आहे. कंदहारचा मोहम्मद ओमर हा तिचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानमधील रशियन फौजविरुद्ध तो मुजाहिद्दीन-स्वातंत्र्यसैनिक म्हणून लढला या लढाईत त्याला एक डोळा गमवावा लागला. पाकिस्तान आणि अमेरिकेने त्याला भरपूर पाठींबा दिल्याने तो तालिबानचा नेता बनला.
तालिबान ही अतिशय पुनरुज्जीवनवादी संघटना आहे. त्यामुळे ती सत्तेवर येताच अफगाणिस्तानच्या दुर्दशेला सुरुवात झालीय.तालिबानचा उदय होण्यापूर्वी सगळं काही आलबेल होतं असं नव्हे. मुळात दक्षिण-पूर्व आशिया खंडातील हा देश पूर्वीपासून अत्यंत अविकसित आहे. आधुनिक सुधारणांचा गेली कित्येक वर्षे त्याला स्पर्श झालेला नाही. तिथं खनिज संपत्ती, वनसंपदा फारशी नाही. साहजिकच कारखानदारी नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान तर अफगाणिस्तानातील नागरिकांना कधी पाहायलाच मिळालं नाही. अनेक बाबतीत तिथे अजून जुनं, अविकसित तंत्रज्ञानच वापरलं जातं.

 खरं तर अफगाणिस्तानचं भौगोलिक स्थान खूप मोक्याचं आहे. पश्चिमेला चीन, पाकिस्तान, दक्षिणेला कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमनिस्तान आणि पश्चिमेला इराणशी त्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्या महत्वाच्या स्थानामुळे जुन्या काळी भारत आणि मध्य-पूर्व आशिया यांच्यातील तो सिल्क रूट म्हणजे सोनेरी मार्ग समजला जायचा भारत आणि मध्य-पूर्व देशातील सगळा व्यापार इथूनच व्हायचा. त्यामुळे या प्रदेशातील कब्जातील इतिहासात अनेक लढाया झाल्या.
अफगाणिस्तानचा बहुतेक सगळा प्रदेश डोंगराळ असल्याने तिथे शेती कमीच होते. तरीही नव्वद टक्के अफगाणी जनता शेतीवर जगते. गहू, कापूस, फळभाज्या, ऊस, सुकामेवा, हे इथलं प्रमुख उत्पादन. मात्र शेतीसाठी केवळ परंपरागत पद्धतच वापरली जात असल्यानं फारसं उत्पादन घेता येत नाही. उत्पादन वाढविणाऱ्या  विविध खतांचा वापर अफगणिस्तानात अजूनही होत नाही.

अफगाणिस्तान अफूच्या शेतीसाठीही बदनाम आहे. अफूच्या मादक द्रव्याची अफगाणिस्तानामधून पाकिस्तान-भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हाच पैसा अफगाण बंडखोरांनी रशियनविरुद्ध लढण्यासाठी वापरला असं म्हणतात. पशुपालन हा अफगाणी लोकांचा आणखी एक व्यवसाय. इथे भटक्या जातींची संख्या भरपूर आहे. ते हा व्यवसाय करतात तसंच दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादनही करतात.

अफगणिस्तानची लोकसंख्या जवळजवळ तीन कोटींचा घरात आहे. अफगणिस्तानचे मूळ रहिवासी असलेले जवळपास वीस वांशिक समूह आहेत. यातील बहुतेक आदिवासी जाती जमातीचे आहेत. ते सगळे एकमेकांशी बरंच साम्य असलेल्या भिन्न भाषा बोलतात. पश्तून हा यातील सगळ्यात मोठा वांशिक गट. इसवी सनच्या पहिल्या शतकापासून तो अफगणिस्तान आहे, असं म्हटलं जातं. पन्नास टक्के अफगाणी या वांशिक गटाचे आहेत. ताजीक हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा गट असून ते मूळचे इराणचे समजले जातात. तसंच इराणी भाषेशी साम्य असलेली भाषा बोलतात. काबूलच्या आसपास आणि इराणच्या सरहद्दीनजीकच्या भागात त्यांची वस्ती आहे. तिस्ता मोठा गट हजारा हा आहे. मूळचा मंगोलियन असलेला हा गट तेराव्या ते पंधराव्या शतकात अफगणिस्तानात आला. हे लोक पर्शियन बोलीभाषा बोलतात. ते शिया मुस्लिम आहेत. हजरत नावाच्या भागात ते राहतात. तुर्क आणि तुर्को-मंगोल यांचा तुर्कोमनस हा मेंढपाळ गट आहे. उझबेक हा मूळ तुर्की असलेला गट आहे. शेती व्यवसायात असलेला हा गट तुर्की भाषा बोलतो. किरगिझ हा आणखी एक वांशिक गट चीनकडील सरहद्दीनजीक वाखत भागात राहतो.

पश्चिम अफगणिस्तानात राहणाऱ्या 'चाहार ऐमार' या प्रत्यक्षात फिसझुकही, तैमानी, जमशिदी, तैमुरी आणि पश्चिम हजारा अशा पाच आदिवासी जमाती आहेत. दक्षिण भागात बलुची ही भाकी जात आढळते.  ते बलुची ही इराणीयन भाषा बोलतात.
सर्वसाधारण अफगाणिस्तानी रहिवाशांना अफगाणी वा पठाणी म्हटलं जातं. दारी किंवा पुश्तू या अफगणिस्तानच्या राष्ट्रीय भाषा आहेत. सर्व सरकारी व्यवहार याच भाषेतून होतात. इस्लाम हा इथला प्रमुख धर्म आहे. यातील ८० टक्के अफगाणी शिया मुसलमान तर वीस टक्के सुन्नी आहेत.
हरीश केंची
९४२२३१०६०९



.

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...