-----------------------------------------------
*स* हा-सात वर्षापुर्वी लोकसभा निवडणूका ऐन भरात आल्या असताना नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा नितीश आणि त्यांच्या निकटवर्तियांनी केलेला युक्तीवाद आज कोणालाही आठवत नाही, याचे नवल वाटतं. दोन दशकापुर्वी म्हणजे १९९६ च्या सुमारास मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन भरलेलं होतं. तेव्हा समता पार्टी म्हणून नितीशकुमार आणि जॉर्ज फ़र्नांडीस यांनी जनता दलाबाहेर पडून लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात वेगळी चुल मांडलेली होती. फ़र्नांडीस गंभीर आजारी होते आणि त्यांना मुंबईला येणं शक्य नव्हतं. तेव्हा त्यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपाच्या या अधिवेशनाला जया जेटली आणि नितीशकुमार यांनी हजेरी लावलेली होती. तिथून मग भाजपानं कॉग्रेसला पर्याय म्हणून आघाडीचं खरं राजकारण सुरू केलं. तेव्हा फ़क्त जागावाटप झालं होतं आणि १९९८ च्या निवडणूक निकालानंतर सुशासनाचा अजेंडा बनवून एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. त्यात भाजपानं इतर पक्षांच्या तीन अटी मान्य केल्या होत्या. अयोध्येतील राममंदिर, समान नागरी कायदा आणि काश्मिरला खास दर्जा देणारे ३७० कलम घटनेतून रद्द करण्याचा आग्रह, भाजपेयींचे हे तीन कळीचे मुद्दे भाजपनं बाजूला ठेवलं. म्हणून अन्य पक्ष त्यांच्या सोबत आले. त्यातून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालचं पहिले संयुक्त सरकार स्थापन होऊ शकलं. थोडक्यात भाजपनं आपला हिंदूत्वाचा अजेंडा गुंडाळून ठेवण्यावरच ही आघाडी घेऊ शकलेली होती. पुढे कारसेवकांवरील गोध्रातील हल्ला आणि त्यानंतर उसळलेली गुजरातची दंगल, यामुळं वाजपेयी सरकारवर ठपका आला. तरी हिंदूत्वाचा मुद्दा भाजपाने कधी पुढे आणला नव्हता. पण नितीशकुमार यांनी मोदींना विरोध करण्यासाठी तोच मुद्दा उकरून काढला आणि भाजपची दीर्घकालीन सोबत सोडून दिलेली होती. कारण मोदी हे हिंदूत्वाचे प्रतिक असल्याचा नितीश यांचा आरोप होता.
*भाजपेयींच्या मुद्द्यावर मोदी यांचं मौन!*
नितीशकुमार आणि त्यांच्या सहकार्यांनी तेव्हा सतत एनडीएचा पाया हा या तीन अटीवर असल्याचं ठासून सांगितलं होतं आणि नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्रीपदाचे भाजपचे उमेदवार झाल्यानं भाजप पुन्हा तेच तीन मुद्दे आणि हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घेत मार्गक्रमण करीत असल्याचा आरोप चालविला होता. त्यात तथ्य असले तरी त्याचा कुठलाही पुरावा त्यांना कधीच समोर आणता आला नाही. मात्र त्या आरोपाचा आधार घेऊन तथाकथित पुरोगामी पक्ष आणि प्रसिद्धीमाध्यमांनी 'मोदी म्हणजेच हिंदूत्व' असे काहूर माजवलेलं होतं. त्या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून अमित शहांनी सुत्रे हाती घेतली आणि उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून शहा तिकडे दाखल झाले. पहिल्याच दिवशी त्यांनी अयोध्येत जाऊन तिथं असलेल्या तात्पुरत्या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतलं. त्याचा अर्थच भाजपाने मंदिराचा छुपा अजेंडा हाती घेतल्याचाही गदारोळ झालेला होता. पण मोदी किंवा शहा यांनी चुकूनही अशा विषयांना कधी हात घातला नाही, की त्यावरून कधी रान उठवलं नाही. साहजिकच पुढल्या सहा महिन्यात अनेक लहानसहान पुरोगामी पक्षही नव्यानं उभ्या होणार्या एनडीएमध्ये येत गेले आणि मोदींचे हात बळकट करत गेले. मोदींनी आपल्या प्रचारात विकासाचं सूत्रं घेतलं होतं आणि भ्रष्टाचारमुक्त भारताची भूमिका ठासून मांडण्याला प्राधान्य दिलेलं होतं. साहजिकच कुठेही त्या मुळच्या तीन वादग्रस्त विषयांचा उल्लेख व्हायचं जणू बंद होऊन गेलं. लोकसभेत भाजपाला मोदींनी स्पष्ट बहूमत मिळवून दिले, अधिक मित्र पक्षांच्या सहकार्यामुळे संसदेत भक्कम पाठबळावर मोदी सरकार काम करू लागले. गेल्या पांच वर्षात कोणालाही त्या तीन वादग्रस्त विषयांची आठवणही राहिली नाही. अधूनमधून योगी आदित्यनाथ वा अन्य भाजपाचे काही आक्रमक नेते साधूसंत मंदिर वा तत्सम हे या विषयावर बोलत राहिले. पण मोदींनी त्याबाबत आपल्या तोंडातून चकार शब्द उच्चारला नाही, की पक्षाच्या कुणा पदाधिकार्याला त्याविषयी बोलू दिले नाही.
*मनातले साध्य करायचं पण डंका पिटायचा नाही*
आता पांच वर्षानंतर भाजपेयींच्या सत्तेची काय स्थिती आहे? त्याच तीन विषयांचे राजकीय भांडवल करून आपले पुरोगामीत्व जपायला एनडीए सोडणार्या नितीशकुमार यांची घरवापसी झालेली आहे. पण त्याच मुहूर्तावर तेच तिन्ही वादग्रस्त विषय आज ऐरणीवर आलेले आहेत. नितीशकुमार मात्र गप्प आहेत. भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सत्ता उपभोगताहेत. राम मंदिराचा खटला आता सुप्रिम कोर्ट सलग सुनावणीतून ऐकणार आहे. नजिकच्या काळात त्याचे कायदेशीर उत्तर शोधले जाणार आहे. त्यातही मुस्लिम विरोधकांची एकजूट संपलेली असून, शिया पंथीय संघटनेनं मंदिर पाडूनच मशिद उभारल्याचा दावा पेश केलेला आहे. दुसरा वादग्रस्त मुद्दा समान नागरी कायद्याचा होता. त्यात मुस्लिमांचा तिहेरी तलाक हा सर्वात मोठा अडथळा होता आणि त्यालाही मुस्लिम महिलांनी पुढाकार घेऊन वाचा फ़ोडलेली आहे. त्यामुळे संपुर्ण देशात धर्माचा भेदभाव न करता समान नागरी कायदा बनवला जाण्याचाही विषय सुप्रिम कोर्टात विचारार्थ येऊन पोहोचला आहे. तिसरा विषय काश्मिरला खास दर्जा देऊन भारतापासून अलिप्त राखणारे राज्यघटनेतील ३७० कलम होय. ते आणि काश्मिरचा खास दर्जा रद्द करावा किंवा नाही, असाही विषय आता सुप्रिम कोर्टात विचारार्थ सादर झालेला आहे. थोडक्यात दोन दशकापुर्वी नव्याने पक्षाची उभारणी करताना भाजपाने जे तीन मुद्दे घेऊन आघाडी उघडली होती, ते मुद्दे आज सुप्रिम कोर्टात अन्य मार्गानं पोहोचले आहेत. जे मुद्दे सत्ता संपादनासाठी तडजोड करताना भाजपला गुंडाळून ठेवावे लागले होते, तेच तीन विषय मोदींच्या कारकिर्दीत भाजपेयींकडून उठवले गेलेले नाहीत, तरी आज ते ऐरणीवर आलेले आहेत. याला राजकारण म्हणतात! मनातले साध्य करायचे, पण त्याचा डंका पिटायचा नाही, ही खास मोदीशैली आहे. सबका साथ सबका विकास असा झेंडा आहे आणि त्या झेंड्याखाली भाजपाचा अजेंडा पूर्ण करून घेण्याची हालचाल चालू राहिली आहे. पण त्याचा ठपका भाजपावर येऊ शकत नाही, की कोणी पुरोगामी शहाणा त्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरू शकत नाही.
*तत्वांशी तडजोड केल्यानेच भाजपेयीं सत्तेवर*
दोन दशकापुर्वी सत्तस्थापनेसाठी प्रयत्नशील असलेला भाजप, आपल्या राजकीय भूमिकेशी तडजोड करीत वाटचाल करीत गेला होता. म्हणून त्यातून एनडीए अस्तित्वात आलेली होती. आज एनडीए नव्यानं अशी उभी राहिलेली आहे की तिच्यासमोरही विकासाचाच अजेंडा आहे. पण भाजपला अलिप्त ठेवून मोदी यांनी पक्षाच्या गाभ्यातले विषय अलगद ऐरणीवर आणून ठेवलेले आहेत. त्यांचे कडवे विरोधकही कुठले आक्षेप घेण्याच्या स्थितीत सध्या राहिलेले नाहीत. समान नागरी कायद्याचा मुद्दा तर मुस्लिम महिलांनीच उचलून धरला आहे. त्यामुळे त्यावरून भाजपाला हिंदूत्ववादी ठरवण्याची मुभा कोणाला राहिलेली नाही. अयोध्येतील राममंदिराचा विषय मुस्लिम पंथीय मतभेदांमुळे सोपा झाला आहे. तर काश्मिरी पक्षाशी हातमिळवणी करून तिथल्या प्रशासनात चंचूप्रवेश केल्यानंतर तिथून बाहेर पडून ३७० कलमाचा विषय परिस्थितीनेच ऐरणीवर आणला आहे. याला मोदीशैली म्हणतात. करायचे आपल्याला हवे तेच! पण बोलायचे मात्र भलत्याच विषयावर. शत्रूला गाफ़ील ठेवून पादाक्रांत करण्याची ही रणनिती जोवर विरोधी पक्षांच्या लक्षातही येत नाही, तोवर या संघ स्वयंसेवकाला रोखणे कोणाला शक्य नाही. पराभूत करणे दूरची गोष्ट झाली. यातली मजेची गोष्ट अशी, की जे मुद्दे वादाचे ठरवून नितीशकुमार यांनी एनडीएची साथ सोडलेली होती, तेच मुद्दे प्रभावीपणे समोर आले असताना नितीशकुमारांना एनडीएत परतावे लागलेले आहे. एवढंच नाही तर निवडणुकांनाही सामोरं जाताना भाजपेयींना सोबत घेऊन जावं लागलं आहे. २०१३-१४ सालात हे मुद्दे अगदीच अडगळीत पडलेले होते, तरीही त्याचं अशा लोकांनी भांडवल केलेलं होतं. त्यावरून कांगावा केलेला होता. आज तेच लोक हताश आणि निष्प्रभ होऊन त्याच विषयांना साथ द्यायला उभे रहात आहेत. त्याच्या अप्रत्यक्ष समर्थनाला पुढे येत आहेत. दुनिया झुकती है, सिर्फ़ झुकानेवाला चाहिये, म्हणतात त्याचीच इथं प्रचिती येते!
चौकट........
*स्टार वॉर मधील 'वेडर' अन आजचे 'मोदी'!*
'स्टार वॉर' चित्रपटाच्या मूळ ट्रॅयोलॉजीत आजही स्मरणात राहणारं एक पात्र होतं 'डार्थ वेडर' ... द इनव्हिजिबल अपराजेय! याला पराजित करणाराच नव्हे, तर त्याचं नाव उच्चारताच भले भले योद्धे देखील थर थर कापत. संपूर्ण ब्रह्माडात त्याचं एकचक्री वर्चस्व होतं! त्याचा मुकाबला चित्रपटातील नाटकीय प्रवेशातील कथेत त्याचाच मुलगा ल्युक स्क्रायवेडर करतो. पौराणिक ऋषीसारखा गुरू योद्धा त्याला सांगतो "वेडरने एक अजब, अलौकिक जादुई सिद्धी प्राप्त केलीय. जो त्याच्यासमोर लढायला जाई तेव्हा त्याच्या मनांत त्याच्याबद्धल भरपूर द्वेष, क्रोध आणि तुच्छता निर्माण झालेली असायची. जेवढी तुच्छता त्याच्याबद्दल तुमच्या मनांत वाढेल, क्रोध वाढेल, द्वेष वाढेल तेवढीच त्याची ताकद वाढत जाई. जेवढ्या तीव्रतेनं आणि जोशानं तुम्ही तुटून पडाल, प्रहार कराल, तेवढीच त्यांच्यातली शक्ती वाढत जाई. त्यामुळं प्रतिस्पर्ध्यमध्ये निराशा, हताशा वाढते मग तो आणखी जोरानं प्रहार करील, आक्रोश करील. वेडर तेवढीच ताकद मिळवी!" हे चक्र कधी थांबत नाही आणि वेडर कधीच पराभूत होत नाही! त्या कथेतील वेडर डार्क साईडला होता तर वास्तवात नरेंद्र मोदी ब्राईट साईडला आहेत. हे फिक्शन आणि फक्ट मधला फरक आहे. पण कथा तर तशीच आहे. विल्यम इनगे यांचं एक प्रख्यात विधान आहे, "जगात दोन प्रकारचे मूर्ख आहेत. एक असे आहेत की, जे जुनं आहे ते सगळंच चांगलं आहे; दुसरे असे आहेत की, जे नवं आलंय ते सगळंच चांगलं आहे!" हे सत्यवचन! या बाबी लक्षांत घेता चांगलं-वाईट याचं संतुलित आकलन करण्याऐवजी लोक आपलंच खरं म्हणत एका बाजूला ओढले जातात. अशाच या विधानाप्रमाणे आताच्या या वातावरणात ट्विट करून सांगता येईल की, आजही दोन प्रकारचे मूर्ख आहेत. ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचे अंध भक्त आणि अंध विरोधक...! यात ऑपरेटिव्ह शब्द अंध आहे. डोळे झाकून भक्ती करणारा, अगदी मोदींनाही मागे सारेल अशी खूषमस्करी करतील. तथ्य आणि तटस्थता याचा काही संबंधच नसतो. असंच मोदी विरोधक पण असतात. त्यांच्या त्या आदर्शवादी विचारसरणीच्या भ्रमातून बाहेरच येत नाहीत. आणि जाणता अजाणता आपल्याच बौध्दिकतेचं प्रदर्शन करीत स्वतःच धन्यता मानतात.
- हरीश केंची.
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment