Monday 8 April 2019

•मताधिकाराचा 'अनसंग हिरो' सुकुमार सेन• *अशी झाली पहिली निवडणूक!*


"२५ ऑक्टोबर १९५१ रोजी जे पहिलं मत टाकलं गेलं ते हिमाचल प्रदेशच्या चिनी या तहसीलमध्ये. पहिले मतदार आजही हयात आहेत. ती भारताच्या नव्या युगाची सुरुवात ठरली! स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्तानं लोकांच्या मनांत काँग्रेस पक्षाचं गारुड होतं. त्यामुळं काँग्रेसनं ३६४ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं. त्या खालोखाल कम्युनिस्ट पक्षाला १६ जागा मिळाल्या होत्या. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया यांच्या सोशालिस्ट पार्टीला १२, आचार्य जे.बी.कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील किसान मजदूर प्रजा पार्टीला ९, हिंदू महासभेला ४, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाला ३, रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टीला ३, आणि शेड्युल कास्ट फेडरेशनला २ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला ४कोटी ७६ लाख ६५ हजार ९५१ म्हणजेच ४४.९९ टक्के मतं मिळाली. त्यावेळी एका मतदारसंघात एकाहून अधिक जागा असत. म्हणून ४८९ जागांसाठी ४०१ मतदारसंघात निवडणूक झाली. ही व्यवस्था १९६० मध्ये संपुष्टात आली. एक सदस्यीय ३१४ मतदारसंघ होते. ८६ मतदारसंघ द्विसदस्यीय तर १ मतदारसंघ ३ सदस्यांचा होता. दोन सदस्य अँग्लो इंडियनमधून नियुक्त केले गेले होते."
--------------------------------------------------
*सु* कुमार सेन....!
नांव तसं तुम्हाला ओळखीचं वाटेल, एखाद्या बंगाली चित्रपटातील अभिनेत्याचं वा राजकीय नेत्याचं आहे वाटेल. मी त्यांची काही माहिती तुम्हाला देतोय असं वाटलं ना! पण नाही...! स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी आपल्या प्रतिभेनं देशसेवा केली. अनेकांसाठी ती प्रेरणास्थानं होती! पण त्यांची अशी काही खास दखल घेतली गेली नाही, याची खंत वाटते. अशाच अनेक दिग्गजांमध्ये एक नांव आहे..….सुकुमार सेन! स्वातंत्र्यानंतरच्या काळात सार्वभौम देशातली पहिली निवडणूक घडविण्याचं शिवधनुष्य पेललं ते भारताचे पहिले निवडणूक आयुक्त 'अनसंग हिरो' सुकुमार सेन यांनी! सध्या देशभरात सार्वत्रिक निवडणुकांचा माहोल आहे. साहजिकच आपल्या मनांत प्रश्न उभा राहील की, पहिली निवडणूक कशी झाली असेल? त्याचं आयोजन, नियोजन, अंमलबजावणी कशी पार पडली असेल? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे...सुकुमार सेन यांच्या दूरदृष्टीचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपार मेहनतीचं !

*नेहरूंचं लक्ष सुकुमार सेन यांच्याकडं होतं*
सुविख्यात इतिहासतज्ज्ञ आणि राज्यशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुहा यांनी स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक कशी झाली याविषयी एक संशोधकात्मक लेख लिहिलाय; त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भारताच्या इतिहासात कुण्या अधिकाऱ्यानं सुकुमार सेन इतकं परिश्रमपूर्वक यशस्वी कार्य सफलतापूर्वक सरकारी सेवा पार पाडली नसेल. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे देशभरात लोकसभेच्या निवडणुका घेऊन प्रधानमंत्री बनण्यासाठी आतुर होते. आणि ते स्वाभाविकही होतं. त्यावेळी त्यांचं लक्ष सुकुमार सेन यांच्याकडं आकर्षिलं गेलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. स्वातंत्र्यापूर्वी १९४७ मध्येच ब्रिटिशांनी सुकुमार सेन यांची पश्चिम बंगालच्या चीफ सेक्रेटरीपदी नियुक्ती केली होती. इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधील ते एकमात्र असे अधिकारी होते जे अशा अत्युच्च पदावर नेमले गेले होते. प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन इथं शिक्षण घेतलेल्या सुकुमार सेन यांच्याकडे नेहरूंनी ही जबाबदारी सोपविली की, तुमच्याच नजरेखाली देशाच्या पहिल्या  लोकसभेच्या निवडणुका होतील यासाठी कामाला सुरुवात करा! नेहरूंनी हा जो विश्वास सेन यांच्याविषयी व्यक्त केला होता तो पुढं जाऊन त्यांनी सार्थ ठरवला. पाकिस्तानशी युद्ध करताना फिल्डमार्शल माणेकशा यांना तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जसा विश्वास व्यक्त केला होता अगदी तस्साच विश्वास नेहरूंनी सेन यांच्या कार्यकर्तृत्वावर दाखवला होता.

*अतिदुर्गम, रानोमाळ भटकून यादी तयार केली*
खऱ्या अर्थानं भारतासारख्या खंडप्राय देशातल्या निवडणुका या जगाला आदर्शवत आणि मार्गदर्शक ठरतील अशा व्हायला हव्यात अशी नेहरूंची अपेक्षा होती. त्यांना त्यातून जगभरातून कौतुक व्हावं अशी अपेक्षा नव्हती. पण या निवडणूका लोकशाहीचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्हायला हव्यात, असं त्यांचं म्हणणं होतं. नेहरूंनी सुकुमार सेन यांना बोलावून घेऊन देशातल्या या पहिल्या निवडणुकीबाबतचं गांभीर्य आणि महत्व स्पष्ट करून सूचना दिल्या. तुम्ही या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरीत्या पार पडतील यावर लक्ष केंद्रित करा. त्याकडं आम्हाला लक्ष घालायला लागू नये. म्हणजेच आम्ही देशाची राज्यघटना तयार करण्याच्या कामात झोकून देऊन त्याच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहू. त्यानंतर सुकुमार सेन यांनी या कामातलं गांभीर्य लक्षांत घेऊन दोन प्रादेशिक निवडणूक आयुक्त आणि प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करून एक स्वतंत्र टीम उभी केली. तब्बल तीन वर्षे स्वतः भारतभर फिरून प्रत्येक राज्यातील माहिती त्यांनी संकलित केली. या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एवढ्या मोठ्या देशातील लोकसंख्याप्रमाणे नोंदी करायचं महत्वपुर्ण आणि जोखमीचं काम आरंभलं. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या १७.६ कोटी मतदारांची यादी त्यांनी तयार केली. इथं ही बाब लक्षांत घ्यायला हवी की त्यापूर्वी किती मतदार असतील याची संख्या, नावं की यादी अशी काहीच माहिती उपलब्ध नव्हती. लोकशाहीचा अश्वमेघ यज्ञ आरंभलेल्या निवडणूक आयोगानं भारतातल्या अगदी दुर्गम, अतिदुर्गम भागाचा शोध घेऊन तिथं जाऊन तिथल्या मतदारांची नोंद करून त्यांच्या याद्या बनवल्या. जिथल्या लोकांना आपलं नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ना तेव्हा टेलिफोनची सुविधा होती ना डिजिटल सिस्टिमची. गावोगाव, रानोमाळी फिरून हे अशक्यप्राय गोष्ट त्यावेळी त्यांनी यशस्वी करून दाखवली.

*२८लाख महिला मतदानापासून वंचित राहिल्या*
यातून एक गोष्ट बाहेर आली की, देशातील ८५ टक्के लोक निरक्षर होते.  त्यांना ना लिहायला येत होतं ना वाचायला. मोलमजुरी करण्याशिवाय महिला त्याकाळी बाहेरच पडत नव्हत्या. त्यामुळं २८ लाख महिला मतदारांनी मतदान करणं टाळलं होतं. त्याकाळी ग्रामीण भागात महिला तिचं स्वतःचं नाव सांगण्याऐवजी मुलाचं नाव सांगत त्याची आई वा पतीचं नाव सांगत त्यांची पत्नी असं सांगून आपली ओळख देत होती. पुरुषांनी आपल्या पत्नीला अशी कडक सूचना दिल्या होत्या की, निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आपलं स्वतःचं नाव सांगायचं नाही. मग भले तुम्हाला मताधिकार मिळो वा न मिळो. सुकुमार सेन यांनी अशा परिस्थितीत त्यावेळी या विवादास्पद बाबीवर निर्णय घेऊन २८ लाख महिला मतदारांना मताधिकारापासून वंचित ठेवलं होतं. असा निर्णय घेण्यामागे सुकुमार सेन यांचा क्रांतिकारक दृष्टिकोन होता. त्यांनी सरकारसमोर आपली भूमिका स्पष्ट केली होती की, महिलांना मताधिकारापासून वंचित ठेवल्यानं देशात आणि समाजात याविरोधात चर्चा होईल, टीकाटिपण्णी होईल, आंदोलने होतील. महिलांमध्ये आपल्या मताधिकाराबाबत जागरूकता निर्माण होईल. मग महिलाच आपल्या मताधिकाराबाबत मागणी करतील, त्या मागण्या या त्यांच्या कर्तव्यासमान ठरतील. सुकुमार सेन यांचा हा दृष्टिकोन खरा ठरला. १९५७ च्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातल्या महिला संघटनांनी हाच मुद्दा हाती घेतला, आंदोलन झालं. त्यानंतर देशातल्या दुर्गम, अतिदुर्गम भागातील, मागासवर्गीय, आदिवासी महिलांमध्ये मताधिकाराची जागृती झाली. त्यांनी निवडणूक कार्यालयासमोर रांगा लावून आपली नावं स्वतः उच्चारून ती नोंदवून घेतली. तो काळ असा होता की, जगातल्या अनेक सुशिक्षित, सुधारित देशांमधल्या महिलांना मताधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. पण भारतात तो अधिकार महिलांना सेन यांनी मिळवून दिला होता. सामाजिक क्रांती करणाऱ्या नेत्यांमध्ये सेन यांचं नाव घ्यावं अशी ती कामगिरी सुकुमार सेन यांची आहे.

*जगातल्या मोठ्या लोकशाही राष्ट्राची निवडणूक*
आज हा भारताचा लोकशाहीचा उत्सव हा जगात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरलेला आहे, असं काही नाही तर १९५२ मध्ये झालेली १७.६ मतदारांची ती निवडणूक देखील जगासाठी अनोखी होती. जगातली ती सर्वात मोठी निवडणूक होती. अमेरिका आणि युरोपीय देशाची लोकसंख्या, मतदारसंख्या ही भारताच्या एक तृतीयांश होती. ते भारतापेक्षा शिक्षित आणि आर्थिक साधन-संपत्तीने परिपूर्ण होते. तर भारतातली ८५ टक्के लोक निरक्षर, अशिक्षित होते. त्यामुळं निवडणुकीसाठी शिक्षित कर्मचारी उपलब्ध होणं, त्यांना प्रशिक्षित करणं हे एक मोठं दिव्य होतं. ते भारतानं पार पाडलं. निवडणुकीसाठीचं त्याकाळी कोणतीही टेक्नॉलॉजी नव्हती. निवडणूक चिन्हे, जागृती साहित्य या साऱ्या बाबी हातानेच रेखाटाव्या लागत होत्या.

*लष्कराच्या मदतीनं मतदान घडवलं गेलं*
१७.६ कोटी मतदारांची नावं, वय आणि मतदान केंद्र याबाबतची स्लीप सुरुवातीला हातानेच लिहायला लागत.  त्यानंतर टाईपरायटरने त्या तयार केल्या जात. त्या स्लीपा मग १७.६ कोटी मतदारांना वितरित केल्या. मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं यासाठी सेन आग्रही होते. भारतात अशी काही गावं होती की जिथं दळणवळणाची साधनं नव्हती. अशी अनेक गावं होती की, जी नदीच्या पलीकडे वसलेली होती, नाहीतर दोन डोंगराच्या मध्ये वसलेली गावं होती. या गावात जाण्यासाठी पूल नव्हते. अशाप्रकारची दहा लाख चौरस मैल विस्तारलेली भागात लष्कराच्या मदतीनं कामचलाऊ पूल बांधण्यात आली, तर काही ठिकाणी झुलता पूल बांधले. नदीचा प्रवाह मध्ये येत असेल तर नौसेना आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीनं तराफा, होडी आणि बोटमध्ये बसवून आणून मतदान करायला लावलं होतं. ज्यांना दररोज नदी पोहून पार करावी लागत असे, त्यांना मगच इतरांशी त्यांचा संबंध येई. व्यवहार करता येई. अशी हजारो मतदार मतदानाच्या दिवशी अशाप्रकारे जाता येतं याचा अनुभव प्रथमच घेत होती. जरा डोळे बंद करून ते चित्र डोळ्यासमोर आणा.... रोमांच अनुभवाल!

*१५ एप्रिल १९५२ ला नेहरूंचा शपथविधी*
या पहिल्या मतदानावर देखरेख करण्यासाठी ५६ हजार प्रिसाईडिंग ऑफिसर्स आणि २ लाख ८० हजार कर्मचारी ड्युटीवर होते. एवढ्याच संख्येनं देशभरात पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा होता. अमेरिकेहून खास या मतदान प्रक्रियेचं निरीक्षण करण्यासाठी आलेल्या टीनकर आणि वॉकर सारखे प्रवासी इतिहासकार देखील सुकुमार सेन यांच्या या कामगिरीनं आश्चर्यचकित झाले. सुकुमार सेन यांच्या टीमने यासाठी ब्रिटिश सिस्टीमचा आधार घेतला होता. भारतातील पहिली लोकसभेची निवडणूक २५ ऑक्टोबर १९५१ पासून २१ फेब्रुवारी १९५२ पर्यंत चालली होती. त्यावेळी भारताची लोकसंख्या ३६ कोटी होती. तर १७ कोटी ६० लाख मतदारांपैकी ४५.७ टक्के मतदान झालं होतं. नेहरूंना प्रथमच प्रधानमंत्री म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी शपथ दिली होती. जेव्हा स्वतंत्र भारतातील पहिल्या निवडणुका झाल्या त्यानंतर पंडित नेहरूंनी १५ एप्रिल १९५२ रोजी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद द्वारा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली.

*सेन यांचा पद्मभूषण पुरस्कारानं गौरव*
सुकुमार सेन यांनीच १९५७ साली दुसऱ्या लोकसभेच्या निवडणूक आयुक्त म्हणून काम केलं. २ जानेवारी १८९८ मध्ये जन्मलेल्या सुकुमार सेन वयाच्या ६३व्या वर्षी १९६१ मध्ये त्यांचं  निधन झालं. १९५६ मध्ये सुदान स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्यानंतर नेहरूंच्या विनंतीवरून सेन यांनी तिथं जाऊन तिथल्या निवडणुका पार पाडल्या. भारत सरकारनं जेव्हा पद्म पुरस्कार द्यायला सुरुवात केली त्यावेळी पहिल्या यादीत सेन यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर या सार्वभौम राष्ट्रातील निवडणुका कशा घेतली जातील? त्याची रचना कशी असेल? हे एक मोठं आव्हान होतं. ते स्वीकारलं भारतीय नागरी सेवेतील अधिकारी सुकुमार सेन यांनी! त्यांच्या प्रयत्नानं भारतात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. ते भारताचे पहिल्या निवडणूक आयोगाने आयुक्त होते. ज्यांच्यामुळे २५ ऑक्टोबर१९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या दरम्यान तब्बल चार महिने ही निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेनं भारताला एका वेगळ्या वळणावर आणून उभं केलं. भारत हा इंग्रजांकडून लुटला गेलेला पिचला गेलेला आणि अशिक्षित असा देश होता. पण निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःला जगातल्या लोकशाही राष्ट्राच्या सोबत सन्मानानं उभं केलं होतं.

*तीन वर्षे तयारी, चार महिने मतदान!*
२५ ऑक्टोबर १९५१ रोजी जे पहिलं मत टाकलं गेलं ते हिमाचल प्रदेशच्या चिनी या तहसीलमध्ये. पहिले मतदार आजही हयात आहेत. ती भारताच्या नव्या युगाची सुरुवात ठरली! स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्तानं लोकांच्या मनांत काँग्रेस पक्षाचं गारुड होतं. त्यामुळं काँग्रेसनं ३६४ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळालं. त्या खालोखाल कम्युनिस्ट पक्षाला १६ जागा मिळाल्या होत्या. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया यांच्या सोशालिस्ट पार्टीला १२, आचार्य जे.बी.कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील किसान मजदूर प्रजा पार्टीला ९, हिंदू महासभेला ४, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाला ३, रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टीला ३, आणि शेड्युल कास्ट फेडरेशनला २ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला ४कोटी ७६ लाख ६५ हजार ९५१ म्हणजेच ४४.९९ टक्के मतं मिळाली. त्यावेळी एका मतदारसंघात एकाहून अधिक जागा असत. म्हणून ४८९ जागांसाठी ४०१ मतदारसंघात निवडणूक झाली. ही व्यवस्था १९६० मध्ये संपुष्टात आली. एक सदस्यीय ३१४ मतदारसंघ होते. ८६ मतदारसंघ द्विसदस्यीय तर १ मतदारसंघ ३ सदस्यांचा होता. दोन सदस्य अँग्लो इंडियनमधून नियुक्त केले गेले होते.

*प्रत्येक पक्षाची स्वतंत्र मतपेटी*
आज पहिल्या मतदानाची कल्पना केली तर ते कसे दिव्य होतं हे लक्षात येईल. निरक्षर मतदारांची संख्या पाहता पक्ष आणि उमेदवाराच्या निवडीसाठी चिन्हांची सोय करण्यात आली होती. पण तेव्हा मतपत्रिकेवर नांव, चिन्ह नव्हतं तर प्रत्येक राजकीय पक्षासाठी अलग अलग मतपेटी ठेवण्यात आली होती. त्यावर चिन्हं रेखांकित करण्यात आलं होतं. यासाठी लोखंडच्या२ कोटी १२ लाख मतपेट्या तयार केल्या होत्या आणि ६२ कोटी मतपत्रिका छापल्या होत्या. सुकुमार सेन यांच्या नियंत्रणामुळे १९५७ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी साडेचार कोटी रुपयांहून कमी खर्च झाला होता, हे इथं महत्वाचं! पहिली निवडणूक ४९७ लोकसभेच्या तर राज्य विधानसभेच्या ३ हजार २८३ जागांसाठी झाली.


चौकट.....
*शंभरी पार केलेला देशातला पहिला मतदार!*
देशातील १७व्या लोकसभा निवडणुक होते आहे. त्याचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. यंदा लोकशाहीचा उत्सवामध्ये ९० कोटी लोक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परंतु १९५२ साली पहिल्या निवडणुकीत देशाच्या इतिहासामध्ये नोंद झालेल्या पहिल्या मतदाराचे नाव आहे 'श्याम शरण नेगी!' देशाच्या इतर भागांमध्ये फेब्रुवारी १९५२ ला मतदान झाले, परंतु हिमाचलमध्ये ऑक्टोबर १९५१ ला मतदान प्रक्रिया पार पडली होती. बर्फवृष्टी आणि खराब वातावरणामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये येथे पोहोचणे शक्य नव्हते म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा पहिलाच उत्सव असल्याने मतदानासाठी गर्दी झाली होती. मदतानाच्या दिवशी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी किन्नौर जिल्ह्यातील आल्पा गावामध्ये पहिल्या मताची नोंद झाली. त्यावेळी ३३ वर्ष वयाचे श्याम शरण नेगी यांनी सकाळी सजूनधजून येत पहिले मत टाकले आणि त्यांची इतिहासामध्ये स्वतंत्र हिंदुस्थानातील ‘पहिला मतदार’ म्हणून नोंद झाली. आता श्याम शरम नेगी यांनी वयाची शंभरी पार केली आहे. १९१७ ला जन्मलेल्या नेगी यांनी नुकताच २ मार्चला त्यांनी आपला १०१ वा वाढदिवस साजरा केला. नेगी यांच्या नावावर सर्वात पहिले मतदार शिवाय सर्वात वयस्कर मतदार म्हणूनही नोंद झाली आहे. शंभरी पार केलेल्या नेगी यांनी आतापर्यंत १६ लोकसभा आणि १४ विधानसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अशाप्रकारे त्यांनी एकूण ३० वेळा मतदान केले आहे. आता १०१ वय झालेले नेगी १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्येही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या वेळेस हिमाचलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी नेगी यांच्या स्वागतासाठी निवडणूक प्रशासनाने खास तयारी केली होती. यंदाही येथे काहीतरी वेगळे होण्याची शक्यताआहे.

- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...