Saturday 30 March 2019

'कार्यकर्ता' हरवलाय...!

"पूर्वी मी कम्युनिस्ट, मी पुरोगामी, मी नवमतवादी, आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही अहिंसावादी, आम्ही अमुक विचारांचे असं सांगताना सांगणाऱ्याच्या मनांतही कोणत्याही प्रकारचा किंतु नसे; की ऐकणाऱ्याच्याही! त्याला आपली विचारसरणी सांगताना अभिमान वाटत असे! उलट त्या त्या विचारांचा, चळवळीचा आदर ते करत असत. विचारसरणीत फारकत असली तरी परस्परांच्या कार्यकर्तावृत्तीबद्धल आदरभावच होता. मी या विचारसरणीचा असल्यानं माझं जे काही नुकसान होईल, ती माझ्या विचारांची मला मोजावी लागणारी किंमत आहे. असाच त्यामागे अभिमानी विचार असायचा. मात्र या किंमतीची मोजणी ज्या काळापासून राजकीय मंडळींनी, राजकारण्यांनी अर्थकारणात, पैशात केली, त्या क्षणापासून कार्यकर्तावृत्तीचा ऱ्हास होत गेला. वैचारिक अधिष्ठान, आदरभाव, मूल्याधिष्ठित राजकारण संपलं. याला जबाबदार नेतेच कारणीभूत आहेत! त्यामुळं कार्यकर्तावृत्तीचा ऱ्हास झालाय अन कार्यकर्ता हरवलाय!"
-----------------------------------------------------

*का* हीं वर्षांपूर्वी रंगभूमीवर 'सूर्याची पिल्ले' नावाचं एक सर्वांगसुंदर नाटक आलं होतं. नाटककार जयवंत दळवी यांनी 'राजकीय सूर्या'ची पिल्लं, मुलं नातवंडं कशी वागतात, आपल्या आजोबांचा, वडिलांचा वारसा कसा चालवतात याची वास्तववादी मांडणी त्यात केली होती. स्वतः कर्तबगारी न दाखवता केवळ वडिलांच्या पुण्याईवर आपला हक्क गाजवणारी पुढची पिढी आपल्याही अवतीभवती दिसते. या नाटकानं अशांच्या समोर आरसा धरला होता. ती कुण्या राजकीय नेत्यांवर बेतलेली कथा नव्हती; पण राजकारणातल्या प्रत्येक नेत्याला हे आपलंच कथानक असावं अशी शंका त्याकाळी येत होती. आज याची आठवण झाली ती सध्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नातवांनी उमेदवारीसाठी जो गोंधळ घातला तेव्हा! विखे पाटलांच्या नातवाला उमेदवारी हवी होती. 'मी माझ्या नातवाचं लाड करू शकतो, दुसऱ्याच्या नातवाचं कसा करू?' असं ऐकून घ्यावं लागलं. शेवटी आपली डाळ शिजत नाही हे लक्षांत येताच आपल्या पणजोबा, आजोबा, वडिलांनी जोपासलेला वारसा टाकून देऊन पक्षांतर केलं. मोहिते पाटलांच्या नातवाचं पण असंच झालं. वसंतदादा पाटलांच्या नातवानंही आजोबांच्या पक्षाचा त्याग केला! ही अशी अनेक उदाहरणं देता येईल. पण निष्ठेनं पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय? त्यानं आयुष्यभर या नेत्यांची घराणीच सांभाळायची का? सुशीलकुमार शिंदे आपल्या लेकीसाठीच आग्रही असतात, तिथं अनेक तोलामोलाची कार्यकर्ते मंडळी आहेत, पण त्यांनी केवळ यांच्याच पालखीचे भोई व्हायचं का? याला नेत्यांकडे उत्तर नसतं. पण आजच्या या कार्यकर्त्याला हे राजकीय घराण्यांचं ओझं सांभाळणं अवघड झालंय. असे सच्छिल,निष्ठावंत कार्यकर्ते राजकारणापासून दूर होताहेत. मुलाबाळांचा, नातवांचा हा खेळ थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. कार्यकर्ते पक्षासाठी असावेत, त्यांच्या कामाची कदर केली जावी, त्यांना केवळ सतरंज्याच उचलायला लागू नयेत, त्याच्या क्षमतेनुसार संधी मिळायला हवी! अशी दृष्टी असलेला नेता सध्यातरी दिसत नाही. त्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांत कार्यकर्त्यांचा दुष्काळ जाणवतोय. त्यामुळं नेत्यांची गरज भागवायला 'इव्हेंट मॅनेजमेंट' कंपन्या सरसावल्या आहेत. कार्यकर्ते मात्र ओझ्याचं '........' बनलेत!

*हा खेळ नातवांचा...!*
सध्या निवडणुकांच्या वातावरणात उमेदवारी आणि आयाराम-गयाराम यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेत्यांनी आपल्या मुलांना, नातवांना उमेदवारी मिळवून देण्यात धन्यता मानलीय. अशावेळी कार्यकर्त्यांचा त्यांना  सोयीस्कररित्या विसर पडलाय. पण आज सर्वच पक्षात कार्यकर्ते हे अभावानेच कार्यरत असल्याचं दिसून येतंय. नेत्यांना ही परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे का? हाच सवाल आहे.  पण कोणताच राजकीय पक्ष व त्यापक्षाचे नेते 'कार्यकर्ता' जिवंत राहावा यासाठी प्रयत्नशील दिसत नाहीत. केवळ आपल्या सग्यासोयऱ्यांचीच सोय लावली जावि यासाठीच प्रयत्नशील दिसताहेत. त्यामुळं सर्वच पक्षात कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसतेय. उपलब्ध कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी मग पक्षांत वेगवेगळे सेल-विभाग काढून त्याचे पदाधिकारी त्यांना केले जाताहेत. त्यामुळं सगळ्याच पक्षात पदाधिकाऱ्यांचा सुकाळ झालाय. मात्र कार्यकर्त्यांचा दुष्काळच जाणवतोय!

*कार्यकर्त्यापुढे आदर्श घ्यावा असं नेतृत्वच नाही*
आज तरुणांचा कोणत्याच राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही; आजचा तरुण हा राजकीयदृष्ट्या भांबावल्यासारखा, दिशाहीन झालाय.  तरुणांना तर कुणाचातरी आदर्श आपल्या जीवनात घ्यावा असं नेतृत्वही त्यांना दिसत नाही. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या आंदोलनात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते, त्यांना अण्णांसारखा साधासुधा माणूस आकर्षित करू शकला. इतका स्वच्छ निस्वार्थी माणूस असू शकतो याचं आश्चर्य आणि कुतूहल त्यांना वाटलं होतं. पण कधीकाळी आपल्याकडं अशी माणसं शेकड्यांनीच नव्हे तर हजारोंनी होती; त्यावेळी त्यांनाच कार्यकर्ते संबोधले जाई. त्यांच्याकडे कोणी त्यागी, निस्वार्थी म्हणून आदरार्थी बघत असला तरी त्यांना कोणी साधुसंत समजत नव्हते. आपण प्रामाणिक असावं ही भावना समाजात सर्वत्रच रूढ होती. यावेळी अशी निस्वार्थी माणसं ही 'कार्यकर्ते' म्हटली जायची. आज अशी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. तसे आदर्श आमच्या पिढीसमोर नाहीत व त्यांना कार्यकर्ता म्हणजे काय कसे समजावं असा प्रयत्न होताना राजकीय पक्षांकडून व नेत्यांकडून होताना दिसत नाही. 

*पक्षीय राजकारण लोकांच्या जीवनाशी निगडित नाही*
पूर्वी सर्वच पक्षात असे निष्ठावान कार्यकर्ते होते गांधी टोपी डोक्यावर घालण्यापूर्वी त्यावर कपाळ टेकवून वंदन करणारे काँग्रेस कार्यकर्ते होते, नेहरू सदर्‍याला ठिगळ लावून खांद्यावर शबनम बॅग लटकवून या देशात समाजवाद आणण्याच्या निश्चयानं वठलेले साथी समाजवादी होते. उच्चविद्याविभूषित पदवीधर द्विपदवीधर झालेले अनेक जण राष्ट्रवादाच्या विचाराने भरून देशाच्या कानाकोपर्‍यात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार पोचवणारे स्वयंसेवक होते. शिवसेनाप्रमुखांचा आदेश येताच जीवाचीही पर्वा न करता बेधडक बेधडक देणारे शिवसैनिक होते. आता अशा कार्यकर्त्यांची सर्वत्र वानवाच दिसून येते. सगळ्याच पक्षनेतृत्वाला हे जाणवतं; याचं कारण हे की, आजचं पक्षीय राजकारण लोकांच्या सुखदुःखाची निगडीत राहीलेले नाही. कोणत्याही विचारांची वाहिलेलं नाही. केवळ आणि केवळ सत्तेसाठी, खुर्ची साठीच आणि निवडणुकीसाठीच! असं ह्या पक्षांचं स्वरूप राहिलेले आहे. सार्‍यांच्या निष्ठा या सत्तेला आणि त्याच्या खुर्चीला वाहिलेल्या असल्याने सारे नेते हे सत्ताधारी पुढारी होण्यासाठीच सज्ज झाले आहेत. कार्यकर्ता व्हायला कोणीच तयार नाही. याचं कारण राजकारण हा व्यवसाय बनला आहे आहे आणि नेते, कार्यकर्ते हे व्यावसायिक झाले आहेत. पूर्वीचा तो निरलस, निरपेक्ष, निस्वार्थी कार्यकर्ता आज गायब झालाय, हरवलाय!

*'इव्हेंट मॅनेजमेंट' ही जात अस्तित्वात आली*
कार्यकर्ता समर्पणवृत्तीचा हा संस्कार आता हरवलाय. भरपूर कार्यकर्ते जिथं, तिथं कामाचा उरक झपाट्याने, हा मंत्र खोटा ठरू लागलाय. गणेशोत्सव, नवरात्र, या उत्सवांशिवाय नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, यांच्या मिरवणुकीत नाचणार्‍यांची संख्या काही कमी झालेली नाही, तर ती अफाट बनली आहे. आरतीला, महाप्रसादालाही रांगाच्या रांगा फुललेल्या दिसतात, परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी सतरंज्या घालायला कार्यकर्ते मिळण्याचे दिवस संपुष्टात आल्याचं दिसतं. अंग मोडून काम करणारी कार्यकर्त्यांची पिढी आता हायटेक झालीय. उंटावरून शेळ्या हाकणे यासाठी अधिकाधिक सोयी मिळाव्यात म्हणून 'इव्हेंट मॅनेजमेंट' नावाची एक नवी जमात अस्तित्वात आलीय. त्यांच्या आयोजनामुळे कार्यक्रम देखणा, आखीव-रेखीव आणि वेळेच्या व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण ठरतं, हे मान्य, परंतु अशा व्यावसायिक रूपानं कार्यकर्ता हरवतोय हे कुणी राजकीय नेते लक्षात घेत नाहीत. 

*आर्थिक बाबीमुळं कार्यकर्तावृत्तीचा ऱ्हास झाला*
पूर्वी मी कम्युनिस्ट, मी पुरोगामी, मी नवमतवादी, आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही अहिंसावादी, आम्ही अमुक विचारांचे असं सांगताना सांगणाऱ्याच्या मनात काही किंतू नसेल मी ऐकणार नाही उलट दोन्ही बाजूंना त्यांच्या त्यांच्या परीनं त्या त्या विचारांचा आणि चळवळीचा आदर असे फारतर विरुद्ध मतवादी विचारसरणी डावी-उजवी करीत कार्यपद्धतीबाबत फारकत मानत परंतु परस्परांच्या कार्यकर्ता वृत्तीबाबत आदरभाव होता मी या विचारसरणीचा असल्याने माझं नुकसान होईल ते माझ्या विचारांची मला मोजावी लागणारी किंमत आहे असाच त्यामागे अभिमानी विचार असेल मात्र या किमतीची मोजणी ज्या काळापासून राजकारण्यांनी अर्थकारणात पैशात केली त्या क्षणापासून कार्यकर्ता वृत्तीला ऱ्हास होत गेला.

*भक्तिभावानं झोकून देणं दूरच राहीलं!*
स्वातंत्र्यपूर्व काळात साने गुरुजींच्या एका आवाहनाने प्रभातफेरीसाठीची  पहाटेची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी आताशी नवे कार्यकर्ते कार्यक्रमानंतर मिळणाऱ्या पाकिटांबरोबरच मटणासह ओल्या पार्टीची वाट पाहू लागलेत. विविध चळवळीत भक्तिभावाने झोकून देणं आता दूर झालंय. आणीबाणी सोसत प्रसंगी भूमिगत राहून ध्येयासाठी लढताना लढणाऱ्यांना तुरुंगवासाची भीती नव्हती की, पोटापाण्याची चिंता नव्हती. समाजरचनेसाठी आवश्यक त्या यज्ञात अशा कार्यकर्त्यांच्या हजारो समिधा होऊन लढल्या. आजही विविध मोर्चे, सभा, संमेलन, मेळाव्याला गर्दी होते. पण तळहातावर ठेवलेल्या नोटांच्या हिशोबाने! टाळ्या वाजतात त्याही त्याच हिशेबाने! कार्यक्रमानंतर पाण्याचा पाऊच, पोळीची पाकीट हजारोंनी अंगावर फेकली जातात. ठरलेल्या वेळात आलेल्या माणसाच्या लोंढी पुन्हा ट्रकमध्ये चढविल्या जातात. आजच्या एखाद्या पक्षाची सभा संपल्यानंतर उद्या कोणत्या पक्षाच्या सभेला माणसं न्यायची, यावर चर्चा झडतात. हा हंगाम व्यावसायिक कार्यकर्ता कोणत्या झेंड्याच्या झुंडीत किती फायदा आहे यावर सर्रास चर्चा करताना दिसतो. 

*भावनिक कार्यकर्त्यांचा गैरवापर झाला*
कोणत्यातरी विषयावर भाळून संपूर्ण जीवन कारणी लावण्याचा वेड गेल्या दोन दशकापर्यंतच्या पिढीत होतं. परंतु या दरम्यान घडलेल्या नेत्यांनी अशा भावनिक कार्यकर्त्यांचा गैरवापर करून घेतला. हा कार्यकर्ता वर्ग चपला सांभाळणारा ठरला. चळवळीच्या ताई, भाऊ, दादा, अण्णा यांना स्टेशनवर उतरून घेतल्यापासून त्यांच्या बॅगा उचलण्यापर्यंत आणि स्टेजवर चढताना त्यांनी काढलेल्या चपला सांभाळण्यापर्यंतची सारी जबाबदारी या कार्यकर्त्याकडे बहाल करण्यात आली. कार्यकर्त्याला सुरवातीला अत्यंत सन्मानाचं वाटणारे हे काम थोड्या काळानंतर रामागड्याचं होऊन जातं आणि त्याच्यातली ती कार्यकर्ता वृत्ती हरवून जाते.

*नैराश्याने कार्यकर्ता अधिकच खचून जातो*
सुरुवातीला आग्रहानं सामाजिक, राजकीय कार्यात गेलेल्यांची फरफट कधी होते हे त्याचं त्यालाच कळत नाही. मग कालांतरानं त्याला प्रचंड मनस्ताप होतो. खाण्याचे, पिण्याचे, राहण्याचे वांदे होतात. एक एक आदर्श ढासळताना त्याच्या कार्यकर्ता वृत्तीला दिसतात आणि त्यावेळी त्याला जे नैराश्य येतं, त्यानं त्याचं जीवनच बदलून जातं. यातून बाहेर पडावं आणि कुटुंबात रमावं तर, आजवरच्या आपल्या राजकारणापायी कुटुंबाची हेळसांड झालेली असते. त्यामुळे घरदार ही त्रासलेलं असतं. अशावेळी नाराजी व्यक्त करण्याची एकही संधी कुटुंबीय सोडत नाहीत. राजकारणाच्या भुताटकीतून भानावर आलेल्यांना त्यांना ही सजा मिळालेली असते! पोटच्या पोराच्या तोंडाचा घास ओढून घेऊन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भरवलेला असल्यानं  कुटुंबप्रमुख याविषयी खदखदणारा त्याचा राग बायको-पोरांवर काढतात. कार्यकर्ता म्हणून साहेबांच्या मागे फिरावं तर फिरताना, मिरवताना, त्यांच्या चपला सांभाळताना घरात आलेलं उघडेपण यानं तो आतल्या आत खचत असतो. अशावेळी परिस्थितीनं नैराश्य आलेला कार्यकर्ता पार खचून जातो. आदर्श म्हणून ज्या नेत्याकडे तो पाहत असतो, त्यांच्याशी बोलावं तर ही व्यक्तिगत बाब आहे नंतर बोलू असं म्हणून त्याला गप्पगार बसवलं जातं!

*मग सुरू होतो हिशेबी कार्यकर्त्यांचा खेळ*
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं तिळातिळानं होणारं मरण मात्र नवी पिढी हेरते. त्यांच्यासारखं निष्काम काम करून काही साधणार नाही, हे तो ओळखतो, मग चळवळीतून स्वतःला घडवायचं एक नवं चक्र तयार होतं. पद, अधिकार याचा गैरवापर सर्रास होतो. निधीची अफरातफर, बॅच, बिल्ला, जेवण, पाणी यातून आर्थिक आवक-जावक मोठ्या थाटात होते. जुन्या कार्यकर्त्यांना अलगद बाजूला सारलं जातंआणि सुरू होतो नव्या पिढीच्या हिशोबी कार्यकर्त्यांचा खेळ! यात तत्त्व, विचार, निष्ठा, आदर्श, ध्येयं याला थारा नसतो की तत्त्वासाठी, निष्ठेसाठी, सत्यासाठी, प्राणांची आहुती देण्याची भूकही नसते. अशा व्यावसायिक कार्यकर्त्यांच्या मनोवृत्तीचा आताशी शिरकाव झाला आहे तो 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा! त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांचा, एनजीओ म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा! समाजसेवेच्या नावाखाली देशी, परदेशी निधी घेऊन विविध उपक्रम चालवण्याचा! 

*राजकीय नेत्यांची मुलं थेट नेतेच बनतात*
हे एका बाजूला सुरू असताना 'व्हाईट कॉलर' जनतेची मुलं कधी कार्यकर्ता होतच नाही. एक तर ती होतात पदाधिकारी वा एकदम मंत्री म्हणूनच ! हे जमणे शक्य नसेल तर राजकारणात त्याला रस नाही असे मोठ्या दिमाखानं त्याचे मायबाप सांगतात. अशावेळी आपल्या पूर्वजांनी जपलेला कार्यकर्तावृत्तीचा संस्कारी ठेवा नव्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची वेळ आली आहे! जनता पक्षाच्या उदय आणि अस्तानंतर हळूहळू क्षीण झालेल्या आणि होऊ लागलेल्या कार्यकर्त्यावृत्तीनं आताशी माणूसकी राखली आहे. ही अशी स्थिती का झाली? याचा विचार करण्याची सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी अशा सर्वच पक्षांची जबाबदारी आहे. गरज आहे ती पूर्वीप्रमाणे कार्यकर्तावृत्ती जोपासण्याची, तसं वातावरण निर्माण करण्याची. पण हे होईल का? आज सारे राजकीय पक्ष व्यक्तिसाक्षेप बनले आहेत. पूर्वी पक्षाचे नेते असत, आता नेत्यांचे पक्ष बनले आहेत! ध्येय, धोरण, विचार-आचार, तत्व-निष्ठा, लोकांप्रती बांधिलकी ह्यासारखे मुद्दे टांगले गेले आहेत! नेत्यांप्रमाणेच आता पक्षांचे कार्यकर्तेही उरले नाहीत तर ते नेत्यांचे कार्यकर्ते बनले आहेत! मूल्याधिष्ठित राजकारणाला तिलांजली दिली गेली, त्यामुळे कार्यकर्ता धुळीला मिळालाय. तो पुन्हा उभा राहणे ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे तर समाजाचीही गरज आहे!

- हरीश केंची
९४२२३१०६०९.

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...