Friday 1 March 2019

सत्तेच्या गरजेसाठी बेरजेचे राजकारण!

"काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या 'महागठबंधना'वर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या निवडणुका जवळ येताच देशातल्या छोट्या छोट्या पक्षांना एकत्र करीत  आघाडी बनविण्याचा प्रयत्न चालवलाय. काँग्रेसचादेखील असाच प्रयत्न सुरू आहे. भाजपनं शिवसेना पाठोपाठ तामिळनाडूतल्या जयललिता यांच्या अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयडीएमके) पक्षांशी युती केलीय तर काँग्रेसनं करुणानिधी यांच्या द्रविड मुनेत्र कळघमशी (डीएमके) नातं जोडलंय. राजकीय पक्षाचं हे अपेक्षित आणि अनपेक्षित जवळ येणं हे युती-आघाडीचं राजकारण जसं बेरजेचं आहे तसंच ते त्यांच्या सत्तेसाठी गरजेचं देखील आहे."
------------------------------------------------------
*रा* जकारण गरजेचं असतं हे राजकारण्यांचं म्हणणं फार महत्वाचं असतं, हे सहज लक्षांत येईल. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीनं बाजी मारणं! असं राजकारणाचं स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीप्रमाणे पालटत राहतं. 'गरजेचं राजकारण' हे एकदा मान्य केलं म्हणजे ते सदैव बेरजेचेच असेल, असं सांगवत नाही. ते जेवढं बेरजेचं तेवढेच वजाबाकीचं; जेवढं गुणाकाराचे तेवढंच भागाकाराचं! राजकारण किंबहुना कोणतेही काम, कार्य एकंदरीत बेरजेनं, लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचं झाल्यास 'लोकसंग्रहा'नं साध्य होतं हे खरं; पण कधी कधी वजाबाकीनंही कार्यभाग उत्तमपणे साधतो. बारा भिन्नभिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकी ही कधीकधी वाजवी वाटते, वाजवी ठरते! 'राखावी बहुतांशी अंतरे...' हा समर्थ संदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणं देखील राजकारणात काहीवेळा क्रमप्राप्त ठरतं. समर्थ रामदासांनी राखावी बहुतांशी अंतरे या आशयाचा उपदेश अनेकदा केला असला तरी, 'दासबोधा'तील 'राजकारण' नामक आणि निरुपण नामक समासात ह्याच उपदेशाला पुस्ती जोडली आहे.
'जो बहुतांचे सोसेना।
त्यास बहुत लोक मिळेना।।' एवढं सांगून ते थांबले नाहीत तर,
'अवघेचि सोसिता उरेना।
महत्व आपुले।।' अशी जोडही दिली आहे. पुष्कळांना आपलंस करावं हे सांगतानाच
'हिरवटाशी दूरी धरावे। युद्ध कार्यास ढकलावे।
नष्टासी नष्ट योजावे। राजकारणामध्ये।।' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

*राजकारणासाठी विशिष्ठ पिंडप्रकृती हवी*
सारांश, जीवनाप्रमाणेच राजकारणाचं ध्येय निश्चित ठरविता येईल; पण त्या ध्येयाच्या गरजेनुसार उपाय योजावं लागतील. वेगवेगळ्याप्रकारे गणित मांडावं लागेल. पुष्कळदा बेरजेचं, गुणाकाराचं पण वेळप्रसंगी वजाबाकीचं आणि भागाकाराचं देखील! राजकारण धुरंधर इंदिरा गांधीची कारकीर्द डोळ्यासमोर आणली तरी हे सहजच पटेल की, ज्यांनी बेरजेप्रमाणेच वजाबाकीचं पाठही अनेकदा गिरवले आहेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात निरपवाद बेरीज आणि निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणनीती, कधी माघत्तर तर कधी पुढाकार, कधी तह कधी तलवार, कधी संधी कधी विग्रह, कधी बेराजेचं सामर्थ्य तर कधी वजाबाकीचं चातुर्य अशी विविधपरींची वळणे घेत  त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतीपथावरून ध्येय मंदिराकडे गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणे...वळणेच ती! तेव्हा ती वक्रीच असणार. राजकारणाची मुशाफिरी सरळसोट धोपट मार्गानं सहसा होतच नाही. 'राजकारण म्हणजे एक वक्री शनी!' त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणं फार मुष्कीलच. पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणं सोपे नाही. राजकारणाचं गणित कळायला आणि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट प्रकारचा पिंड, प्रकृतीची गरज असते. तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत ह्यांच्या पिंडप्रकृतीला सहसा ते मानवत नाही. म्हणूनच या वर्गातील शहाणी माणसं राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत. इतकंच काय त्यावर भाष्य करणंच टाळतात. लोकशाहीच्या दृष्टीने आणि राष्ट्राचाही दृष्टीने हे कितपत योग्य आहे. याचा विचार शहाणी मंडळी कधी करणार? सत्ताकांक्षी, सत्तापिपासू राजकारण्यांचा भूलथापांना का ते बळी पडताहेत.असो!

*सत्तासाथीदारांच्या दाराशी भाजप पक्षाध्यक्ष*
सत्तेवर असताना मदमस्त बनलेल्या आणि सहकारी पक्षांना फारसं महत्व न देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निवडणूक येताच वास्तवाचं भान आल्यानं त्याचं आकाशात उडणारं विमान जमिनीवर आलंय. आकाशात झेपावणाऱ्या विमानाला ठाऊक असतं की, आपल्याला जेव्हा पुन्हा जमिनीवर यायचं असतं तेव्हा ज्या धावपट्टीवरून धावताना जी चाकं वापरली गेली, त्या चाकांना विमान आपल्या पोटाशी घेतं अन आकाशात झेपावतं. जर ही चाक उतरताना जवळ नसतील तर आपला कपाळमोक्ष हा ठरलेला! भाजपेयींनी सत्तेवर येताच मित्रपक्षांशी फटकून वागायचं ठरवलं. त्यांना फारशी किंमतच दिली नाही. आता पुन्हा सार्वत्रिक निवडणुका आल्यात, वास्तवाची जाणीव झालीय, सत्तेच्या आकाशात गवसणी घालताना सहकारी पक्षांचा विसर पडला होता, त्यामुळं नामुष्की ओढवलीय. नाक घासत पक्षाध्यक्षांना सहकाऱ्यांच्या दारी जात सत्तेसाठी युती करण्याची विनवणी करावी लागलीय

*प्रसंगी कमीपणा घेत युतीसाठी आग्रही*
महाराष्ट्रात २०१५ च्या विधानसभा निवडणुकांपासून शिवसेना-भाजप मध्ये वाद निर्माण झालाय. तो वाद अटी-शर्तीसह मिटवून भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी युती केलीय. उत्तरप्रदेशचे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या ओमप्रकाश राजभर यांचीही त्यांनी भेट घेतलीय. तामिळनाडूत भाजपनं अण्णाडीएमकेशी युती केलीय. तशीच काँग्रेसनंदेखील तामिळनाडूतील डीएमकेशी आघाडी केलीय. शिवाय उत्तरप्रदेशातील लहान अशाच महान दल यांनाही भाजपेयींनी  आपल्यासोबत घेतलंय! बिहारमध्ये नितीशकुमार आणि रामविलास पासवान, महाराष्ट्रात शिवसेनेशी शरणागती पत्करून भाजपला आपल्या जागा त्यांना द्याव्या लागल्यात. त्याचप्रमाणे तामिळनाडूत भाजपेयींनी एआयडीएमकेशी युती केली तिथं भाजपेयींना केवळ पाच जागा मिळाल्यात. एआयडीएमकेशी तिथल्या पीएमके पक्षानं आधीच युती केलेली आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयु १७-१७ जागा लढविणार आहेत. तर रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी ६ जागा लढविणार आहे. इथं विशेष असं की, भाजपनं २०१४ मध्ये ३० जागा लढवून तिथं २२ जागा जिंकल्या होत्या. ते आता फक्त १७ जागा लढवताहेत. त्यावेळी उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीनं ३ जागी तर पासवान यांनी ६ ठिकाणी विजय मिळवला होता. जेडीयुनं स्वतंत्ररित्या ४० जागा लढविल्या होत्या पण केवळ २ जागा त्यांना जिंकता आल्या. यावेळी भाजपनं त्यांच्यासाठी १३ जागांचा त्याग केलाय. ज्यात त्यांच्या जिंकलेल्या ५ जागाही आहेत हे इथं विशेष! महाराष्ट्रात शिवसेना २३ ठिकाणी तर भाजप २५ ठिकाणी उमेदवार उभे करतील. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारात सहभागी असताना देखील ओमप्रकाश राजभर हे शिवसेनेप्रमाणेच भाजपवर सतत टीका करीत असतात. आता अमित शहा त्यांची मनधरणी करताहेत.

*सत्तेसाठी भाजपेयी अगतिक बनलेत*
गेल्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी भाजपनं अपना दल या पक्षाशी युती केली होती. परंतु सुहेलदेव भारतीय समाज पार्टीशी केलेली नव्हती. पण २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओमप्रकाश राजभर यांना युतीत सामावून घेतलं होतं. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यासाठी ओमप्रकाश राजभर यांना युतीत सामावून घेण्यासाठी शहा आतूर बनलेत. म्हणून राजभर यांनी त्यांच्यासमोर काही अटी-शर्ती ठेवल्यात. राजभर यांच्या पांच सदस्यांना सामावून घेतलं जाणार आहे. त्यासाठी शहा, राजभर आणि आदित्यनाथ अशा तिघांच्या बैठका झाल्यात. राजभर यांची आता नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा होणार आहे. यावरून भाजप उत्तरप्रदेशात किती अगतिक झालीय हे जाणवतं!

*भाजपेयीं दक्षिणायनासाठी सज्ज झालेत*
महाराष्ट्र आणि तामिळनाडू नंतर आता  भाजपेयींनी आंध्रप्रदेश, तेलंगणा, आणि केरळमध्ये साथीदारांचा शोध चालवलाय. आंध्रप्रदेश आणि तेलंगणात अभिनेता पवनकल्याण यांच्या जनसेनेशी युती करण्याची शक्यता आहे. अभिनेत्यातून राजकीय नेता बनलेल्या पवनकल्याण यांनी जनसेनेशी स्थापना केलीय. जनसेनेनं अद्यापि कुणाशी युती करणार याबाबतीत कुठेच स्पष्टता केलेली नाही. पण वरिष्ठ भाजपेयींना अशी आशा आहे की पवनकल्याण लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करतील. सध्या त्यासाठी त्रिपुरात सत्ताबदल घडवून आणणाऱ्या संघाच्या सुनील देवधर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलीय. अशाचप्रकारे केरळमध्ये भारतीय धर्म जनसेना यांच्याशी युती करण्यासाठी भाजपेयीं प्रयत्नशील आहेत. त्यांनी ५-६ जागा मागितल्या आहेत. त्यावर विचारविनिमय सुरू आहे. डाव्यांचा प्रभाव असलेल्या केरळमध्ये भाजपेयींची फारशी डाळ शिजत नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं इथल्या २० पैकी १८ जागी आपले उमेदवार उभे केले होते पण त्यांना एकही जागा तिथं मिळाली नाही. त्यामुळं भाजपनं आता नव्यानं ही रणनीती आखलीय.

*तमिळनाडूत अस्तित्वासाठीचा झगडा*
दुसरीकडे काँग्रेसनंही प्रत्येक राज्यातील स्थानिक पक्षाशी आघाडी करायचे प्रयत्न सुरु केलेत. त्यानुसार तामिळनाडूत डीएमकेशी आघाडी केलीय तिथं असलेल्या ३९ पैकी ९ जागा काँग्रेस लढविणार आहे. तामिळनाडूतल्या डीएमके आणि अण्णाडीएमके या दोन्ही पक्षांनी आपले वरिष्ठ नेते करुणानिधी आणि जयललिता यांना गमावलंय. तेव्हा या दोन्ही पक्षाच्या नव्या नेतृत्वाच्या कसोटीचा हा क्षण आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इथं कुणी मोठा साथीदार मिळालेला नव्हता. त्यावेळी पीएमके, डीएमडीकेसह सहा लहानलहान पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविली होती पण एकही जागा भाजपला मिळाली नव्हती. याउलट आता भाजपबरोबर आलेल्या अण्णाडीएमकेनं राज्यातल्या सर्वच्यासर्व म्हणजे ३९ जागा लढविल्या होत्या त्यापैकी ३८ जागा जिंकल्या होत्या. इतर सर्व राजकीय पक्षांचा त्यांनी धुव्वा उडविला होता.

*लोकांचा नेता कोण होणार हाच सवाल*
पण आताची तिथली परिस्थिती वेगळी आहे. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा एम.के.स्टॅलिन हे एक मजबूत नेतृत्व देणारे नेते ठरले आहेत.   याउलट अण्णाडीएमकेच्या जयललिता यांच्या निधनानंतर पक्ष नेतृत्वहीन बनलाय. मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम मिळून तिथलं सरकार चालवताहेत. अशा वातावरणात भाजप अण्णाडीएमकेच्या मदतीनं तिथं आपले पाय रोवण्यासाठी प्रयत्न करतेय. तामिळनाडूत जातीची समीकरणे व इतर बाबींपेक्षा  प्रभावशाली नेतृत्व, व्यक्तिसाक्षेप प्रभाव परिणामकारक ठरत आलेला आहे. रामचंद्रन यांच्यानंतर जयललिता आणि करुणानिधी यांचा काळ होता. त्यांचा प्रभाव इथल्या मतदारांवर होता. आता तिथं त्यांच्या गैरहजेरीत कोण प्रभावशाली ठरेल हे आगामी काळच ठरवील, मात्र त्याकडे साऱ्या राजकीय विश्लेषकांच लक्ष लागलेलं आहे.

*शत प्रतिशत विसरून युतीसाठी तयार*
गेल्यावर्षीच्या अखेरीस तीन राज्यात झालेल्या पराभवानं प्रधानमंत्री मोदींचा करिश्मा आणि आमित शहा यांच्या निवडणूक मॅनेजमेंटवर आता विसंबून, अवलंबून राहून चालणार नाही. काँग्रेस ज्याप्रमाणे लहानलहान पक्षांना महत्व देऊन सामावून घेत आहे त्यानं भाजप सजग झालीय, अधिक जागा जिंकून पराभूत होण्यापेक्षा ज्या त्या राज्यात शक्तिशाली पक्षाशी युती करून जागावाटप केलं गेलं तर विजयाची शक्यता मोठी असते. त्यामुळं भाजपला आताप्रमाणे स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर एनडीएच्या साथीनं सरकार बनवता येईल. हे लक्षांत घेऊनच भाजपनं महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये नमतं घेतलंय. काही काळापूर्वी मोदींनी या महागठबंधनची टिंगल करत टीका केली होती. हे जरी खरं असलं तरी आताचं हे सरकारही भाजपचं नाही तर एनडीएचं हे सोयीस्कररित्या विसरलं गेलंय. पण भाजप आता वास्तवतेची जाणीव झाल्यानं 'शत प्रतिशत भाजप' चा नारा सोडून युतीचे राजकारण करण्यासाठी तयार झालीय.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...