Saturday, 20 April 2019

निवडणुकीत सोशल मीडिया....!

"वीस वर्षांपूर्वी निवडणुकांच्यावेळी छापलेल्या पत्रिका, पोस्टर्स, लाऊडस्पीकर आणि सभा हीच प्रचाराची साधनं होती. झेंडा आणि पोस्टर्स लावलेली रिक्षा-मोटार फिरायच्या आणि मतं देण्याबाबत आवाहन करीत. जोरदार घोषणाबाजी होत असे. अगदी लहान मुलांच्या फेऱ्याही निघत. सध्या ही दृश्य बदलली आहेत. या सगळ्यांच्या ठिकाणी ६ इंचाचा मोबाईल सक्रिय झालाय! प्रामुख्यानं गेल्या दशकापासून 'सोशल मीडिया' हा निवडणूक प्रचाराचं रक सशक्त माध्यम बनलं आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे ज्यात सोशल मीडियाचं जाळं असतं. शहरी असो वा ग्रामीण सगळीकडं सोशल मीडियाचं सगळ्यात साधं, सोपं, शक्तिशाली  आणि परिणामकारक माध्यम राहिलं आहे. कोणताही नेता आणि पक्षाला प्रत्येक मतदारांशी संपर्क साधणं हे अवघड आणि अशक्य आहे, पण हे काम सोशल मीडियानं सरळ, सोपं करून टाकलय. आताच्या या लोकसभा निवडणुकीत हेच साधन महत्वाचं ठरतंय!"
-----------------------------------------------

येऊन, येऊन येणार कोण......!
कौन आवे भाई कौन आवे......!
या आणि अशा घोषणा या आता जवळपास कालबाह्य झाल्यात, भिंती रंगवून, रिक्षा-टांगा फिरवून,लहान मुलांच्या फेऱ्या काढून करला जाणारा प्रचार आजकाल दिसेनासा झालाय. मतदारांच्या हातात असलेल्या मोबाईलमधून थेट त्याच्याशी संपर्क साधला जातोय. या मोबाईलमध्ये असलेल्या 'सोशल मीडिया' हा मतदारांच्या मनापर्यंत जाणारा साधा, सोपा, सहज आणि सरळ मार्ग बनलाय. गेल्या दशकापासून 'सायबर वॉर' नांवाचा शब्द निवडणुकांच्या काळात ऐकायला येतोय. सायबर वॉर म्हणजे उमेदवाराच्या प्रचारासाठी आरंभलेलं ऑनलाईन युद्ध! भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील होणाऱ्या निवडणूकीतील सायबर वॉर सध्या चरमसीमेवर पोहोचलाय. नेत्यांच्या सभा आणि प्रचार यंत्रणेबरोबरच त्याला समांतर असा सोशल मीडियावर निवडणूक प्रचार सुरू झालाय. आरोप, प्रत्यारोप, एकमेकांवर प्रहार करणारे आडियो-व्हिडिओ, खऱ्या-खोट्या बातम्या, या सगळ्याचा मारा सोशल मीडियावर निवडणुकांच्या काळात सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या सायबर वॉरसाठी 'आय टी सेल'ची स्थापना करून स्वतःची वॉर रुम उभी केलीय. ज्यात आयटी क्षेत्रातील तज्ञांच्या टीमसोबतच इतरही काहीजण सहभागी झालेत. ते पक्ष आसनी उमेदवारांचे फोटो, कार्टून्स, ग्राफिक्सच्या माध्यमातून पक्ष आणि संबंधित नेत्याचा राजकीय माहोल मतदारांनी मतदान करावं यासाठी उभं करण्याचा प्रयत्न करीत असतात.

*तरुणांची मानसिकता निर्णायक ठरतेय!*
या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या खूप मोठी आहे आणि या तरुण मतदारांच्या संख्येपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या माहितीचा प्राथमिक स्रोत असतो. भारतीय जनता पार्टीनं खासकरून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना लक्ष्य बनवलेलं आहे. अशा तरुण मतदारांची संख्या जवळपास ८ कोटी आहे तर काँग्रेसपक्षाने दुसऱ्यांना मतदान करणाऱ्या सक्षम आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनलेल्या युवकांना लक्ष बनवलेलं आहे, अशांची संख्या ११.६ कोटी एवढी आहे. या तरुणांना टीव्ही पाहण्यात फारसा रस नसतो पण ते मोबाईलवर व्हिडिओ पाहतात, युट्युब चॅनेलवर जातात. ते वृत्तपत्र वाचत नाहीत पण ऑनलाइन बातम्या आणि जी काही माहिती मिळते ना तीच माहिती त्याच्यासाठी बातम्या असते. सध्या या तरुणांनी बातम्या मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केलाय. ऑनलाईन वृत्तपत्रे वाचली जाताहेत.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ मोहन पै यांनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया या निवडणुकीत चार ते पाच टक्के मतं बदलू शकतात आणि याचा परिणाम निवडणुकीचा निकाल फिरवण्यात सक्षम, परिणामकारक ठरू शकतो. तर निवृत्त टेलिकॉम सेक्रेटरी चंद्रशेखर यांच्या म्हणण्याप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत संपूर्णपणे नवी टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे आणि ती या प्रचारामध्ये केंद्रित बनली आहे. ज्याचा प्रचारापासून निवडणुकीतील मतदानापर्यंत ह्या साऱ्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेले आहेत. या बदललेल्या परिस्थितीत तरुणांची मते ही निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

*स्मार्टफोन आणि इंटरनेटचा व्याप*
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुक काळात देशात सर्वप्रथम स्मार्टफोन वापरण्यात आले. अशाप्रकारचे स्मार्टफोनची असलेल्यांची संख्या जवळपास १२.३ कोटी होती आणि २५.२ टक्के लोक इंटरनेटचा वापर करत होती. आता २०१९ च्या निवडणूक काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून ती जवळपास २७.९ कोटीवर गेली आहे तर ५६ कोटी लोक इंटरनेटसोबत जोडले गेले आहेत. ज्यांच्याजवळ स्मार्टफोन आहे असे ९५ टक्के लोक इंटरनेट आणि सोशल मीडिया याचा सहजपणे वापर करत आहेत, असं एका पाहणीत आढळून आलं आहे. देशात आज ९० कोटी मतदार आहेत. यातील ५९ टक्क्यांहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करताहेत. तेव्हा राजकीय पक्षांसाठी सोशल मीडिया हा एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांकडे पोहोचणं आवश्यक ठरला आहे. यामुळे यावेळी सोशल मीडियाचा भरपूर वापर केला जातो आहे. खासकरून तरुणांना सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालविला जातो आहे, हे लक्षांत घेऊन राजकीय पक्षांनी त्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलंय. त्यातही पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या फार मोठी आहे. त्यांना भाजपेयींनी लक्ष्य केलं आहे. पण हे सांगणं कठीण आहे की सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या किती लोकांवर या प्रचाराचा नेमका हवा तो परिणाम होतो आहे की, नाही. पण यात शंका नाही की त्यापैकी अमुक एक टक्के मत ही नक्कीच फिरू शकतात, हे निश्चित!

*फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर*
भारत हा सोशल मीडिया कंपन्यांसाठी एक सर्वात मोठी बाजारपेठ, व्यासपीठ आणि प्रचारासाठीच एक मोठा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. देशातील जवळपास ३० कोटीहून अधिक लोक सोशल मीडिया म्हणून फेसबुकचा वापर करतात. म्हणजे ९० कोटी मतदारांपैकी जवळपास तीस टक्क्यांहून अधिक मतदार फेसबुकचा वापर करतात. ही लक्षणीय संख्या पाहता, हे माध्यम राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, सहाय्यकारी आणि आवश्यक सिद्ध झालं आहे. हे ते राजकीय पक्ष जाणून आहेत. गेल्या काही दिवसांपासून फेसबूक हेच प्रचाराचे माध्यम म्हणून समोर आलं आहे. फेसबुकवर दिली जाणारी थेट प्रक्षेपणाची सुविधा ही नेत्यांच्या सभा आणि मुलाखतीसाठी अत्यंत श्रेयस्कर ठरतेय. राजकीय पक्षांना ते थेट लोकांपर्यंत प्रसारण करून पोचवता येणं सहजशक्य बनलं आहे. तर दुसरीकडं असं म्हटलं गेलं आहे की, २०१९ ची ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने 'व्हाट्सअप इलेक्शन' बनलीय! त्यामुळे व्हाट्सअप वापरणाऱ्या भारतीयांची संख्या जगात सर्वाधिक बनली आहे.भारतातील २० कोटीहून अधिक लोक केवळ व्हाट्सअप चा वापर करताहेत. ब्राझीलची निवडणूक झाल्यानंतर थोड्या दिवसातच तिथली विधानसभेचीही निवडणूक झाली त्यावेळीही व्हाट्सअपनं तिथं महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलीय. त्याचा सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की व्हाट्सअपवर खूप सहजपणे हवी ती खरी, खोटी माहिती वा अफवा पसरवून मोठ्या प्रमाणात लोकांना दिशाभूल करण्यासाठी वापरू येऊ शकतं हे सिद्ध झालंय. गेल्यावर्षी भारतात ज्या 'मोब लिंचींग' च्या घटना घडल्या त्यात फेसबुकचा वापर हे एक मोठं उदाहरण आहे. देशात अनेक ठिकाणी ज्या दंगली झाल्यात त्या भडकण्यात याच सोशल मीडियाचा वापर झालाय. हे स्पष्ट झाल्यानं अशावेळी इंटरनेटची सेवा बंद केली जाते. सोशल मीडियावरील फेसबुक व्यतिरिक्त ट्विटर संदर्भात बोलावं तर भारतात केवळ ३ कोटी लोकच ट्विटरचा वापर करतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांची पक्ष कार्यालये ही ट्विटर वर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहेत.  २०१४ मध्ये भाजपेयींना आणि नरेंद्र मोदी यांना सोशल मीडिया कशाप्रकारे फायदेशीर ठरलं आहे हे त्यांनी भारतातल्या इतर राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना दाखवून दिलंय. हे पाहून २०१५ मध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधींही ट्विटर वर दाखल झालेत. त्यानंतर सगळ्याच नेत्यांनी आणि पक्षांनी ट्विटरवर सक्रिय होऊन यात सहभागी होण्यात धन्यता मानलीय. नव्यानं राजकारणात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी फेब्रुवारीत ट्विटर जॉईन केलं. मात्र २४ तासाच्या आत १ लाख ६० हजार फॉलोवर्स त्यांनी मिळवलेत. पण केवळ नेते व पक्ष नाही ही तर आता सरकारचे सगळीच खाती आणि त्याचे खातेप्रमुख आणि विभागप्रमुख हे ट्विटरवर येऊन दाखल झालेले आहेत. ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत सहजपणे ते जोडले जाऊ शकतात. आणि लोकांनाही स्वतःची स्वतःचं म्हणणं वा तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतात.

*८७ हजार व्हॉट्सअप ग्रुपवर प्रचार होतोय*

सध्या देशामध्ये ८७ हजाराहून अधिक व्हाट्सअप ग्रुप आहेत. त्यातून प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे निवडणुकीचा प्रचार केला जातो आहे. या ग्रुप मधून कोट्यावधी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधीपासूनच सुनियोजितरित्या विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेली सामग्रीही म्हणजेच पोस्ट लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. नेते, पक्ष प्रत्येक मतदारांचा त्यांचा पूर्वीचं राजकीय मत आणि कल बदलण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. व्हाट्सअप हे एक असे माध्यम आहे यातून खोटी माहिती आणि खोट्या बातम्या सहजपणे सर्वत्र पसरविल्या जाऊ शकतात. लोक कोणत्याही राजकीय पक्षाशी, मतांशी संबंधित असतील तर त्यांच्याकडे अशा प्रकारचा कोणताही मेसेज आला तर ते ताबडतोब इतरत्र फॉरवर्ड करतात. जी माहिती आपल्याला आलेली आहे फेसबुकवरून पोस्ट आपल्याकडे पोहोचली आहे, त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली जात नाही चौकशी केली जात नाही की, त्याचा शहानिशा केला जात नाही. त्यामुळे अशा लोकांच्यामध्ये खोट्या माहितीच्या आधारे आपली विचारधारा उभी करण्याचा राजकीय पक्षांचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. काही प्रमाणात तो सफल ही झालेला दिसून येतोय.

*सोशल मीडियासाठी मोठा खर्च केला जातोय*

,नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार निवडणूक लढविणारे राजकीय पक्ष सोशल मीडियासाठी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत २०१८ साठी १५० टक्क्याहून अधिक खर्च करताना दिसताहेत. कित्येक जाहिरात तज्ञांच्या दृष्टिकोनातून असे दिसून आले आहे की फक्त सोशल मीडियावर जवळपास १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत यात सर्वाधिक भागीदारी फेसबुकची आहे. १० हजार कोटी रुपये फेसबूक तर  केवळ २ हजार कोटी अन्य सोशल मीडियासाठी वापरले गेले आहेत. दुसऱ्या एका संशोधन अहवालानुसार भाजप फेसबुकवर असलेल्या त्यांच्या प्रत्येक पेजमागे दोन आठवड्यात २.५ कोटी रुपये खर्च करते. फेसबुकवर सर्वाधिक पेज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालवण्यात येतात. भाजपच्या जवळपास २० हून अधिक अधिकृत फेसबुक पेजेस सुरू आहेत. भाजपनं प्रत्येक बुथनिहाय 'सोशल कॉर्डिनेटर' ची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे असे लक्षात येईल येईल की ही मंडळी मोठ्या प्रमाणात केवळ सोशल मीडियाचा वापर पक्षाचा प्रचार करण्यासाठीच करताना दिसतात.

*इतर देशातही सोशल मीडियाची डोकेदुखी*
२०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेतील निवडणुकीनंतर सोशल मीडियावर सतत निवडणुकीसंदर्भात स्वतःच्या भूमिका व्यक्त केल्या गेल्या. त्याबाबत संबंधितांना तपास आणि त्यावरील आक्षेप याला सामोरे जावे लागलं आहे. खासकरून फेसबुकवर डेटा चोरीचा गंभीर आरोप लावलेला आहे. रशियन अकाउंट्‍स फेसबुकवर मदतीच्या नावाखाली म्हणून खूप मोठ्याप्रमाणात मतदारांवर नजर ठेवून त्यांचा डेटा आणि माहिती मिळवली गेली आहे. आता असं समोर आलं आहे की, गेल्या वर्षी मेक्सिको आणि ब्राझील तर यावर्षी नायजेरियातील निवडणुकांमध्ये पण असाच डेटा चोरीचा आक्षेप नोंदवला गेला आहे. या सगळ्या निवडणकामध्ये सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. या देशात राहणाऱ्या भारतीयांच्या संख्या स्पष्टता तर हा सगळा प्रकार भारतीयांच्या दृष्टिकोन अत्यंत गंभीर ठरलेला आहे

चौकट......
 *असे आहेत सोशल मीडिया स्टार*
२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे सोशल मीडियाचं यश आहे. हे लक्षात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्याचा आधार सध्या घेतलेला दिसतो आहे. त्यासाठी खास माणसं नेमली आहेत. राजकीय नेत्यांचे किती फालोअर आहेत हे जरा पाहू या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक अकौंटवर ४.३५ कोटी, तर ट्विटरवर ४.६६ कोटी फालोअर आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या फेसबुकवर १.४३ कोटी तर ट्विटरवर १.३० कोटी, आपचे अरविंद केजरीवाल यांच्या फेसबुकवर ७१ लाख तर ट्विटरवर १.४७ कोटी, भाजपचे  राजनाथ सिंग यांच्या फेसबुकवर ६८ लाख तर ट्विटरवर १.२६ कोटी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या फेसबुकवर ६८ लाख तर ट्विटरवर ९३ लाख, भाजपचे योगी आदित्यनाथ ५६ लाख तर ट्विटरवर ३७ लाख, भाजपच्या स्मृती इराणी फेसबुकवर ५१ लाख तर ट्विटरवर ८९ लाख, भाजपच्या सुषमा स्वराज फेसबुकवर २९ लाख ट्विटरवर १.२४ कोटी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी फेसबुकवर २९ लाख ट्विटरवर ३२ लाख, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी फेसबुकवर २५ लाख ट्विटरवर ४९ लाख, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी फेसबुकवर २४ लाख ट्विटरवर ९० लाख, तेलुगु देशम चंद्रबाबू नायडू फेसबुकवर १८ लाख ट्विटरवर ४१ लाख, भाजपच्या नितीन गडकरी फेसबुकवर १२ लाख ट्विटरवर ४७ लाख, काँग्रेसच्या शशी थरूर फेसबुकवर ११ लाख ट्विटरवर ६८ लाख, काँग्रेसच्या प्रियांका गांधी फेसबुकवर ४.८ लाख ट्विटरवर ३.२१ लाख अशी या नेत्यांच्या फॉलोअर्सची संख्या आहे इतर राजकीय नेत्यांनी मात्र विशेष दखलपात्र असे जाणवत नाहीत.

*हरीश केंची*
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...