Sunday, 2 September 2018

शिवसैनिक हा 'आधार' वाटायला हवा...!

 *शिवसैनिक आधार वाटायला हवा!*
"आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या एकत्रितरित्या एकाचवेळी त्याही डिसेंबर महिन्यात होतील अशी शक्यता निर्माण झालीय. निवडणूक आयोगानं तसं सूतोवाच केलं आहे. ह्या साऱ्या घडामोडी लक्षांत घेऊन सारे राजकीय पक्ष तयारीला लागलेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख चार पक्षांबरोबर इतर पक्षदेखील सज्ज झाले आहेत. २०१४ च्या निवडणुकांचा अनुभव पाहता आणि भाजपेयींनी केलेली गोची लक्षांत घेता शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. पक्ष संघटनेत साफसफाई सुरू केलीय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी बैठका, दौरे सुरू केलेत. जुन्या-नव्यांचा मेळ साधत जुळवाजुळव केली जातेय. हे सारं करताना पक्षसंघटनेला विळखा घालून बसलेल्यांना कसे आवरणार? कधीकाळी सत्तेची ऊब आपल्याला मिळेल, निष्ठेचा, कामाचा, श्रमाचा मोबदला मिळेल, असं स्वप्नातही वाटत नव्हतं त्यावेळी रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांप्रमाणे बाहेर पडायला हवंय. शिवसेनेला चैतन्य द्यायचं की केवळ खुर्च्या उबवत बसायचं याचा निर्णय ज्येष्ठांनी घ्यायला हवाय. तरच अंतिम ध्येय गाठता येईल! सोलापुरात पदाधिकाऱ्यांमध्ये केलेला बदल हा त्यासाठीच आहे. हे लक्षात घ्यायला हवंय! "
----------------–----------------------------
 *शिवसैनिक हा आधार वाटायला हवा*
शिवसेनेच्या वेगवेगळ्या शिबिराने शिवसैनिक पुन्हा पूर्वीच्या जिद्दीनं आणि ईर्षेनं उभा होतोय हे दाखवून दिलंय. गटप्रमुख हा प्रचाराचा महत्वाचा घटक आहे. एक हजार मतदारांशी तो संपर्क ठेवतो. मतदार म्हणून नोंद झालेल्यांपैकी प्रत्यक्षात आज किती आहेत, कोण इतरत्र राहायला गेले आहेत. किती जणांची मतदार म्हणून नोंद झालेली नाही या सगळ्याची माहिती गटप्रमुख घेतो. मतदारांकडे फक्त मत मागण्यापुरताच तो जात नाही. त्यांच्याशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध असतात. त्यांच्या अडीअडचणींची तो दखल घेतो. हे सगळं शिवसेनेतर्फे अनेकवर्षे व्यवस्थित होत होतं. शाखा या सेवा केंद्रासारख्या होत्या. आणि शिवसैनिक हा वर्दी नसलेल्या पोलिसांसारखा होता. त्याचा लोकांना आधार होता, धाकही होता. सत्ता आल्यावर हेच चित्र कायम राहायला हवं होतं. काही ठिकाणी ते तसं आहेही. मात्र काही ठिकाणी ढिलाई आली, काही ठिकाणी मस्तीमिजास आली, असं लोकांचं मत झालं आहे. कदाचित हे मत बरोबरही नसेल, पण असं वाटणारे लोक आहेत हे ओळखून शिवसैनिकांनी, नेते होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला हरकत नसावी. 'शिवसैनिक हा आधार आहे असं लोकांना वाटलं पाहिजे' हे शिवसेनाप्रमुख प्रथमपासून सांगत होते. आज पुन्हा हे सांगायला लागावं ह्याचा अर्थ काय?

*नव्या दमाच्यांना संधी द्या*
बाळासाहेब स्वतःवर झालेले दुर्दैवी आघात आणि खुनशी मंडळींकडून होणाऱ्या घाणेरड्या अपप्रचाराचे दुःख पचवून शिवशाहीला यश देण्यासाठी सरसावले होते. तानाजी मालुसरे लढता लढता पडला म्हणून वृद्ध शेलारमामांना तलवार परजत रणांगणावर उतरावं लागलं. हा इतिहास झाला. वर्तमानात उद्धव ठाकरे हेच लढताहेत असं दिसतंय. जुन्या जाणत्या नेत्यांनी आता थांबावं. त्यांनी रणांगणावर उतरू नये, आम्ही विजयश्री खेचून आणायला, लोकशत्रूंचे निर्दालन करायला समर्थ आहोत, अशी ललकार तरुण मंडळींनी का देऊ नये? उद्धव-आदित्य लढाऊ वारसा घेऊन पुढे झाले आहेत.  येती निवडणूक ही नव्या पिढीची, तरुण रक्ताची, नव्या दमाची व्हायला हवी. थकल्याभागल्यांनी मध्ये लुडबुड न करता आशीर्वाद देण्याची दानत दाखवायला हवी.
शिवसेनेला सामर्थ्य देण्यासाठी लोकांत जाऊन, येत्या निवडणुकीत विजयश्री मिळविण्यासाठी स्वतःहून पक्षकार्य करण्याचा निर्णय मंत्रीपद सांभाळणाऱ्यांनी, विधानपरिषद, राज्यसभेत गेलेल्या अशा ज्येष्ठांनी का घेऊ नये? आम्ही सत्तास्थानावर चिकटून बसणारे नाही हे दाखविण्याची हिम्मत यांनी करायला काय हरकत आहे? असपन होऊन पक्षकार्यासाठी ही ज्येष्ठ मंडळी पद सोडून आम कार्यकर्त्यांबरोबर विभागवार फिरू लागली तर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येईल. कर्तृत्व दाखविण्याची संधी नव्या लोकांना मिळेल. आणि लोकमानसांवर त्याचा चांगला परिणाम होईल. मंत्रिपद गेल्यामुळे रुसून वेगळी शक्ती उभारु बघणाऱ्यांनासुद्धा स्वेच्छा मंत्रिपद त्यागून पक्षकार्य करण्यासाठी सज्ज झालेल्या या निष्ठावंत ज्येष्ठांमुळे काही उपरती होईल.

*मंत्र्यांनी आग्रह धरायला हवा*
:शिवसेना पक्षप्रमुख सांगतील तर तत्काळ पद सोडून पक्षकार्य करू!' असं यावर म्हटलं जाईल. पण पक्षप्रमुखांकडे याच लोकांनी आम्हाला पक्षकार्यासाठी मोकळं करा, असा आग्रह धरायला हवा. शिवसेनेचे मंत्री महाराष्ट्रभर पक्षकार्यासाठी हिंडत नाहीत अशा तक्रारी होत्या. मंत्री मंडळी शिवसेनेच्या भल्यासाठी सरकारमध्ये रात्रंदिवस राबत होती असं समजू या! आता स्वतःच पक्ष कार्यासाठी विभाग वाटून हे नेते वर्षभर कार्यमग्न राहीले तर कार्यकर्त्यांच्या मनातले संशयाचे जाळे निश्चितच दूर होईल. शिवसैनिकांनी आपल्या निष्ठेचा, कामाचा, श्रमाचा कधी मोबदला मागितलेल्या नाही. भगवा नाचवत तो सदैव आपल्या मस्तीत राहिला. शिवसेनेला पुन्हा विजयी करण्यासाठी बाळासाहेबांच्या इच्छेनुसार तो निश्चितपणे जिवाचे रान करणार. मंत्रिपदे सोडून पक्षकार्य करणारे ज्येष्ठ बघून तर तो उत्साहाने अशा जोमात लोकांत शिरेल की शिवसेनेला धूळ चारण्याची स्वप्न बघणाऱ्यांना घराबाहेर पडणं मुश्किल होईल. शिवसेनेला चैतन्य द्यायचे का आणखी वर्षभर खुर्च्या उबवत बसायचे याचा निर्णय त्या खुर्चीवर बसणाऱ्या ज्येष्ठांनीच घ्यावा. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव-आदित्य सारे धोके विसरून रान उठवायला सर्वत्र जातातच ना! मंत्रालयावर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांनी खुर्ची त्याग करून महाराष्ट्र जागवायला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर प्रयत्न करायला हवेत.

*...तर बळ संचारेल!*
पक्षप्रमुख शिवसैनिकांना कंबर कसायला सांगतात आपल्याला नाही, असा सोयीस्कर समज मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक आणि अन्य विविध पदावरच्या महाभागांनी करून घेऊ नये. मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, अन्य महाभाग आपल्या बरोबरच कंबर कसून शिवसेनेला विजयी करण्यासाठी झटताहेत हे दिसलं की, शिवसैनिकांच्या अंगात दहा जणांचं बळ संचारेल. शिवसेनाप्रमुखांच्या शब्दासाठी शिवसैनिक सर्वस्वपणाला लावतो ही गोष्ट खरी आहे. येणाऱ्या निवडणुकीतही पक्षप्रमुखाच्या शब्दासाठी निवडणुकीत शिवसैनिक शर्थीने काम करील. नेमकं काय करायचं याबद्धल शिवसेनाप्रमुख यांनी मार्गदर्शन केलंय....' जागतेपणे काम करा, नम्र वर्तन ठेवा, शाबासकीसाठी थांबू नका, स्वाभिमान कमवा, मंत्रालयावर पुन्हा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घेऊनच बाहेर पडा.' शिवसैनिकांनी एकदा नाहीतर दोनदा हे करून दाखवलंय.

*सावधगिरी बाळगावी*
मतदार शिवसैनिकचा हात धरूनच मतदानकेंद्रावर यायचा. गेल्या निवडणुकीत मात्र मतदाराने भाजपेयीचा हात धरला. युतीचं शासन असताना शिवसेनेच्या विरोधात सुविहित अपप्रचाराने मतदारांमध्ये चलबिचल झाली. बहुतेक वृत्तपत्रांनी शिवसेना विरोधात भूमिका घेतली. भाजपच्या मायाजालात पत्रकार अडकले. अल्पसंख्याकांना पद्धतशीरपणे बिथरवण्यात आले. सर्वधर्मसमभावाचा गजर करीत जातीय भावना चेतविल्या गेल्या. केवलं राजकीय विचारप्रणाली वा विकास, आर्थिक धोरण याबद्धल खोडसाळ प्रचार झाला नाही तर अत्यंत घाणेरडे, खुनशी आरोप करून भाजपेयींनी ठाकरे कुटुंबियांना आयुष्यातून उठवून लावण्याचे प्रयत्नही काहींनी वृत्तपत्रातून केले गेले. त्याला पोषक वृत्ते देण्याची, मल्लिनाथी करण्याची साथ देऊन लोकमानसात संशय पेरण्याचे काम काहींनी केले. वडाची साल पिंपळाला लावण्याचे हे कौशल्य यावेळीही दाखवले जाईल. त्याविरोधात शिवसैनिक पिसाळून उठले तर आविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला झाल्याचे मातम करून लोकांची मन कलुषित केले जातील म्हणून अपप्रचाराला विचारपूर्वक, मुद्देसूद तत्काळ उत्तर देण्याची तयारी शिवसैनिकांना ठेवावीच लागेल. उत्तर देण्याचे अनेक मार्ग आहेत. अपप्रचार करणारे अज्ञानाने अपप्रचार करत नसून जाणूनबुजून, हेतुपूर्वक प्रत्येकबाब त्यांना हवी तशी फिरवून अपप्रचार करत आहेत. त्यांच्याशी वाद घालण्याने काही साधणार नाही. त्यांना शक्ती दाखविली तर त्यांना जे हवे आहे तेच घडेल. आविष्कार स्वातंत्र्याचे बोंबले असे काही घडावं याचीच वाट बघत आहेत. शिवसेना, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख यांची कुठलीच गोष्ट चांगली म्हणायची नाही, अशीच ज्यांची हट्टाग्रही भूमिका आहे. त्यांना सुधारण्यासाठी वेळ घालविण्यात काही अर्थ नाही.

*बिळात बसू नका, बाहेर पडा*
गटप्रमुख त्यांचे प्रत्येकाचे किमान दहा कार्यकर्ते असे लाखो प्रचारक घरोघर जाऊन व्यक्तिव्यक्तीशी संपर्क साधून त्यांना शिवसेनेचं कार्य-अडचणी व सत्ताभ्रष्ट काँग्रेसी आणि सत्ताकांक्षी भाजपेयी नेत्यांचा अपप्रचार याबाबत समजावू शकले तर लोकमतावर वृत्तपत्री अपप्रचाराचा परिणाम होणार नाही. राजनीती, अर्थनीती, यांचे ज्ञान यासाठी मुळीच नको. परस्परातल्या जिव्हाळ्याने, आपुलकीनेही लोकांना जिंकता येतं. शिवसैनिकांना हे अशक्य नाही. अगदी सामान्य कार्यकर्ते के करू शकतात याकडे मी लक्ष वेधलं आहे. आपल्या चातुर्याने वेगवेगळी पदे मिळवणारे आणि सत्तेचा लाभ घेऊन मोठेपण प्राप्त झालेले यापेक्षा अधिक काम करू शकतील. मंत्र्यानी खुर्ची सोडून प्रचार संघटन कार्य करावे असं मी म्हणतोय ते सर्वसामान्यांपासून मंत्र्यांपर्यंत एका ईर्षेनं शिवसेना उभी ठाकलीय हे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचावे यासाठीच! शिवसेनेचा घराघरात पोहचवण्याचे काम आता प्रत्यक्ष संपर्काने करण्याचा निर्धार व्हायला हवा. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगत ' बिळात बसू नका, बाहेर पडा, आत्मविश्वासाने लोकांमध्ये जा!' हाच विजयाचा मार्ग आहे. बाष्कळ आरोप करून जातिजातीत तेढ पेटविण्याचा आणि सतत शिवसेनेवर शेणगोळा ओतण्याचा पराक्रम काही नेत्यांनी चालवलाय. त्यांना प्रसिद्धीही भरपूर मिळते. पण लोक त्यांना किती किंमत द्यायची हे जाणतात. त्यांच्या हातात कोलीत देण्यासारखं काही न करण्याची काळजी तेवढी शिवसैनिकांनी घ्यायला हवी. मंत्रालयावर भगवा फडकविण्याचं संदेश महाराष्ट्रात घराघरापर्यंत पोहचायला हवा. मंत्रालयात खुर्च्या उबवत बसण्यापेक्षा हे काम करण्यासाठी साऱ्या शिवसैनिकांबरोबर जायची कुणाकुणाची तयारी आहे? असा सवाल प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे. 'आम्ही दुसऱ्या कामात होतो., काही ऐकलंच नाही' अशी बतावणी तरी निदान कुणी करू नये!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

चौकट.....

 *राष्ट्रीय ताणा मराठी बाणा!*

भारताचा स्वातंत्र्यलढा गतिमान होण्यापूर्वीच १८५७ च्या बंडाच्या काळात राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष यांची स्वतंत्र अशी ओळख आहे, आणि अस्मिता आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षानं ही बहुविधता ओळखूनच भारतीय राजकारणाची सूत्रं जन्माला घातली. त्याच पायावर आजही भारताचं राजकारण उभं आहे. प्रादेशिकता आणि राष्ट्रीयता याचा उत्तम समन्वय असतानाच काँग्रेसपक्षाला या देशात चांगले दिवस होते. आजचं वास्तव सर्वांसमोर आहे. केंद्रात मोठं बहुमत मिळालेला भाजप जी मस्ती दाखवत आहे, ती काँग्रेसकडून खुर्चीवरच्या वहिवाटीनं मिळाली असावी. त्यामुळं प्रादेशिक पक्षांचा संकोच करण्याचं काम या पक्षाकडून ठिकठिकाणी होत आहे. त्यांना आपल्या शिडीचे पाय लक्षात राहिलेलं दिसत नाहीत. त्यामुळेच शिवसेनेला कधी एकदा कायमचं धाकटा भाऊ करतो, अशी घाई या पक्षाला लागली आहे. आज भाजपचा महाराष्ट्रात आणि देशात जो विस्तार झाला आहे तो शिवसेनेमुळेच! भाजपच्या पूर्वावतारी जनसंघाने १९७५-७७ च्या आणीबाणीच्या काळात जनता पक्षाच्या पोटात जाऊन पण मूळचे संघाचे सदस्यत्व कायम ठेवून केलेल्या दगलबाजीमुळे त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवत नव्हतं. एवढंच कशाला मुंबईत १९८६ मध्ये झालेल्या विलेपार्ले विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आडवं करण्यासाठी भाजपेयींनी जमेल तेवढं कष्ट घेतलं होतं. तरीही १९८९ मध्ये शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. ही युती कांहीं किरकोळ अपवाद वगळता कायम राहिली.
शिवसेना १९९० पासून राज्य विधानसभेच्या १७१ जागा लढवीत आली आहे. भाजप ११७ जागा लढवत असे. २०१४ मध्ये शिवसेना १५३ पर्यंत खाली आली. भाजपला निम्म्या जागा हव्या होत्या. प्रत्यक्षात साऱ्याच जागा हव्या होत्या. भाजपची नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात बहुमताने सत्ता आल्याने भाजपला शिवसेनेबरोबरची युती मोडायचीच होती. तसंच झालं. २५ वर्षाची युती मोडली. या खेळीत भाजपला बहुमत मिळालं नाही, तरी विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकता आल्या.

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...