Sunday 16 September 2018

मूल्याधिष्ठित की, 'मूल्य'अधिष्ठित...!

भाजप आता आंतरबाह्य बदलला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसपक्ष जे काही करायचा ते सारं काही भाजपेयींनी अंगीकारलं आहे. आपण स्वीकारलेला 'केशरी' रंग त्यांनी कधीच टाकून दिला. शिवसेनेच्या संगतीनं केशरीचा रंग 'भगवा' करून टाकला हा बाह्यरंग शिवसेनेचा घेतला तसा अंतरंग काँग्रेसकडून घेतलाय. त्यामुळं भाजप आता 'भगवी काँग्रेस' बनलीय. जे जे काँग्रेस करीत होती ते ते भाजपेयी करताहेत. आपली मूल्याधिष्ठतेची भरजरी वस्त्र, कवचकुंडल भाजपेयींनी  उतरवली आहेत आणि बलाधिष्ठतेची वस्त्र परिधान केली आहेत. याचा अनुभव देशात सर्वत्र होतोय. देशाला दिशादर्शन करणारे राजकीय धुरंधर जनसंघी नेत्यांकडून पूर्वी_'मूल्याधिष्ठित राजकारणा'_ ची आस धरली जात होती. पण तेव्हाच्या मूल्याधिष्ठित राजकारणाची जागा आता _'मूल्य'अधिष्ठित_ समाजसेवेनं घेतलीय, त्याच्या सोबतीला 'बाहुबली' देखील सज्ज झाले आहेत. त्यामुळं आजच्या राजकारणाची दिशाच बदलून गेलीय. वैचारिक तत्व, निष्ठा, जीवनमूल्य याला कोणतीच किंमत राहिलेली नाही. केवळ 'निवडून येण्याची क्षमता' एवढाच काय तो निकष उरलाय. त्यामुळं धनदांडगे, बाहुबली यांचीच चलती भाजपत निर्माण झालीय. हे सारं रोखायला हवंय. हिरवा देठ अद्यापी आहे म्हणणाऱ्या मंत्र्याला, प्रेमाला नकार देणाऱ्या मुलींना पळवून आणणारा आमदार, लिंग सरकलेला खासदार, शिवरायांचा उपमर्द करणारा नगरसेवक अशांना आवरायला हवंय, सावरायला हवंय...!"
------------------------------------------------
*दे* शात सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सर्व राजकीय पक्षांनी भारतीयांना आपल्याकडं वळविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय राजकारणात समरसतेनं वावरणारे अटलबिहारी वाजपेयी यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांचा वापर आता भाजपेयी निवडणुकीसाठी करताहेत. 'अटल विश्वास' अशी घोषणा झालीय. संघ-जनसंघ-भाजप या माध्यमातून मूल्याधिष्ठित राजकारण करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भाजपचं _भगव्या काँग्रेस_ मध्ये झालेलं आजचं रूपांतर सुदैवानं पाहावं लागलं नाही. कारण त्याआधीच त्यांचा स्मृतिभ्रंश झाला! दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन सत्तेचा सोपान गाठण्याचा सत्ताकांक्षी भाजपेयींचं आजचं रूप त्यांना पाहावं लागलं नाही! मात्र त्यांचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांची जी अवस्था आताच्या भाजपेयींनी केलीय ती  समजलं नाही हे एका अर्थानं बरंच झालं म्हणावं लागेल. असं असलं तरी प्राप्त परिस्थितीत एकसंघ भाजपेयींशिवाय मतदारांकडे पर्याय नाही. सुदृढ, सशक्त आणि सक्षम विरोधीपक्षच उरलेला नाही. हे देशातल्या लोकांचं दुर्दैव म्हणावं लागेल! आज भारताला समर्थ-स्थिर अशा केंद्रीय सत्तेची आवश्यकता आहे. गलितगात्र, कुणाच्यातरी आधारानं, कसंबसं चालणारं सरकार केंद्रात आलं तर भारताला उध्वस्त करण्यासाठी टपून बसलेल्या पाकिस्तान-चीनला आणखी उन्माद चढेल!

*भारताला स्थिर-समर्थ-स्वाभिमानी सरकारची गरज*
आता सारं लक्ष २०१९ च्या निवडणुकांकडे लागलेलं आहे. प्रसिद्धीमाध्यमांची सर्व आयुधं वापरण्याच्या प्रयत्नांना प्रारंभ झालाय. भाजपेयींच्या हातात पुन्हा सत्ता जाणार नाही यासाठी विखुरलेल्या विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न चालवलाय. पण त्यांचे ते प्रयत्न राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उघडे पडले. त्यामुळं भाजपेयींनी पुन्हा दिल्ली जिंकण्यासाठी कंबर कसलीय. आजतरी भाजप व्यतिरिक्त इतर कुठल्या पक्षाला एकहाती देशाची सत्ता मिळेल अशी स्थिती नाही. पण केंद्रात कुठल्याही एका पक्षाला सरकार बनविण्याएवढं यश मिळालं तर भारताच्या आणि भारतीयांच्या दृष्टीनं तो भाग्ययोगच म्हणायला हवा. भाजपनं बहुमत मिळवून केंद्रात सरकार बनवलं तर मी ती आनंदाची गोष्ट मानेन. कारण आज भारताला समर्थ-स्थिर अशा केंद्रीय सत्तेची आवश्यकता आहे. गलितगात्र, कुणाच्यातरी आधारानं, कसंबस चालणारं सरकार केंद्रात आलं तर भारताला उध्वस्त करण्यासाठी टपून बसलेल्या पाकिस्तान-चीनला आणखी उन्माद चढेल. अमेरिकेतल्या भारतद्वेष्ट्यांना भारताची अवहेलना करण्याचं आणखी अवसान चढलं. खतरनाक अतिरेकी चहुकडून उठाव करून भारतात हैदोस घालतील आणि भारताची एकात्मताचं नव्हे, स्वातंत्र्यही धोक्यात येईल. भारताला स्थिर-समर्थ-स्वाभिमानी सरकार हवं आहे. कडबोळी सरकार असं नेतृत्व देऊ शकेल असा विश्वास धरावा अशी परिस्थिती नाही.

*राष्ट्रधर्माच्या काही तत्वांचा पाठपुरावा आवश्यक*
भारतीय जनता पक्षाला असं सरकार देता येईल, जर सर्व भारतीयांना हा पक्ष आपली धोरणं पटवू शकेल. हा विश्वास धरावा अशी स्थिती नाही. दुर्दैवानं भाजप सत्तेच्या आकांक्षेपायी, या धांदल-गडबडीत लोकांपासून दूर जातो आहे. आपल्या विश्वासार्हतेला आपल्याच हातानं तोडुनफोडून फेकतो आहे. ज्यांना वर्गवादाच्या नावाखाली इथं धंगेधोपे पेटवून समाजाला कायमचं पंगू बनवायचं आहे, त्यांच्या हातात सत्तेचं शस्त्र देण्याचं पाप भाजपनं केलं आहे. भारताच्या अनेक राज्यात भाजपेयींनी सत्ता मिळवलीय. यातली अनेक मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मुरलेली, व्यक्तीपेक्षा संघटना मानणारी, जातीजमातीच्या कोंडाळ्यात न गुंतता हिंदुत्व-बंधुत्व मानणारी, समरसतेनं रसरसलेली असावीत अशी भारतीयांची अपेक्षा आहे. पण काँग्रेसवाल्यांपेक्षाही घाणेरडा लोभ या मंडळींनी अगदी चव्हाट्यावर येऊन मांडला. इथं पैसे उदंड प्रभावी ठरला.  'शिस्तबद्ध'त्वाची नांगी द्वेषाचा विखार नाचवत आजही दिमाखानं मिरवते आहे. महाराष्ट्रात शिवसेनेशी केलेली युती हाही एक सत्तेचा सौदा आहे. आज भाजप हा एक राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि शिवसेना ह्या राष्ट्रव्यापी पक्षाला अनेक प्रश्नावर आपल्यामागे फरफटत यायला लावलं आहे. शिवसेनेच्यासाथीनं मतं मिळतात म्हणून त्यांनी मारलेले कोरडेही सहन करण्याची सहनशीलता कांहींजणात दिसली तरी राष्ट्रीय प्रतिमा असणाऱ्या नेत्यांना आणि राष्ट्रधर्म म्हणून काही तत्वांचा आग्रह धरणाऱ्या स्वयंसेवकांना ही गोष्ट शोभादायक वाटत नाही. आज तरी महाराष्ट्रातली ही युती लोढण्यासारखीच त्रासदायक ठरली आहे. 'सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही' अशी स्थिती झालीय.

*भाजपच्या युत्या आणि युक्त्या राष्ट्रीय ऐक्यासाठी नव्हत्या*
सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी दाखविल्यानेच भाजपला लाभ झालाय. पण केंद्रीय सत्ता प्राप्त करून घेण्याच्या मार्गात त्यामुळं अडथळे वाढले आहेत. देश जोडण्याच्या, एक राष्ट्रीयत्वाची भावना जनमानसात समर्थ करण्याच्या, अखंड भारत घडवण्याच्या कामापेक्षा सत्ता, साऱ्या देशाबरोबरच काही राज्यांची सत्ता, भाजपेयींना अधिक मोलाची वाटतेय असे जाणवण्याइतपत भाजपतल्या काहींना सत्तेचा लोभ सुटलाय. घड्याळाचे काटेही त्यासाठी फिरवण्याचा प्रकार केला जातोय. भाजपनं केलेल्या युत्या आणि युक्त्या राष्ट्रीय ऐक्य वाढवणाऱ्या-राष्ट्रीयतेचे सामर्थ्य वाढवणाऱ्या नव्हत्या, फक्त कांहीं लोकांचे साधणाऱ्याच होत्या, असं भाजपमधल्याच अनेकांचं मत झालं आहे. त्यांनी उघड बंडाळी केलेली नाही, पण जे बोलू पाहताहेत त्यांना सहानुभती दाखवण्याचे, त्यांचा आवाज नेत्यांनी दुर्लक्षून चालणार नाही, असं बजावण्याचं काम त्यांनी निश्चित केलं आहे.

*धर्मसंघर्षाचं वातावरण निर्माण केलं जातंय*
अतिउत्साही, उद्धट अशा भाजपेयींनी देशांत गोहत्या, लवजिहाद या धर्तीवर पुढं जाऊन आणखी काही ज्या गर्जना होत आहेत, त्या भाजपला राष्ट्रीय पातळीवरून हटवणाऱ्या, भाजप हा सर्व भारतीयांना न्याय देऊ शकेल हा विश्वास संपवणाऱ्या आहेत. अखंड हिंदुस्थान करण्याचा मानस असणाऱ्यांना मुसलमानांशी या ना त्या कारणाने अखंड भांडण करून चालणार नाही. त्यांना मुसलमान नेत्यांनी जो विश्वास दिला त्याहून अधिक देण्याएवढे दिलदार, उदार व्हावं लागेल. याचा अर्थ लांगुलचालन करावं लागेल असा नाही. धर्म राजकारणात न आणण्याचे, धर्मसंघर्षाचे वातावरण निर्माण होईल असा हट्टाग्रह न धरण्याचे आणि वादाचे जे काही प्रश्न असतील त्यावर विवेकाने, विचाराने राष्ट्रीय हिताची दृष्टी ठेऊन तोडगा काढण्याचं काम अखंड हिंदुस्थान करू बघणाऱ्यांनाच करावं लागेल.

*भारतीय एकतेच्या घोषणा व्हायला हव्यात*
एकीकडं जागतिक राजकारणाच्या पटावर भारताला एकाकी पाडण्याचा आणि हतबल करण्याचा डाव मांडून धूर्त शेजारी राष्ट्र भारतीय नेतृत्वाला खेळवत आहे. सारी इस्लामी राष्ट्रे भारताच्या विरोधात जावीत आणि पश्चिमी राष्ट्रांनी भारताला आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करावं असेही डावपेच आखले जाताहेत. अशावेळी अंतर्गत ऐक्याची, परस्पर विश्वासाची आणि सामंजस्याची भावना प्रबळ करणारे धोरण राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाने निर्धारानं राबवलं पाहिजे. घोषणा केवळ हिंदू एकतेच्या नकोत. त्या भारतीय एकतेच्या हव्यात. केवळ संघर्ष करीत बसलो तर हा समाज एकत्र कसा येणार? सरकारनं सर्वांना बोलावून, समजावून सामंजस्याने रस्ता काढला पाहिजे. दररोज भांडणं, दंगे करून सामंजस्य वाढणार आहे का? आज ज्या तऱ्हेनं काही भाजपेयींची वाटचाल सुरू आहे, ती तऱ्हा आणखी विघटन करण्यास फूस देणारी आहे. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणारी आहे.

*संघ राजकारणात नको तेवढा शिरल्याने प्रदूषण*
आज काही जुन्या जाणत्या संघीय, भाजपेयी नेत्यांना बाजूला केलं जातंय. भाजपची स्थापना होण्यापूर्वी नानाजी देशमुख यांनी राजकारण्यांनी ६० व्या वर्षीच राजकारणातून अंग काढून घ्यावं असं म्हटलं होतं. 'मरते दम तक संघका रहुंगा' अशी निष्ठा असलेल्या पण संघाच्या कार्यपद्धतीशी न पटल्यानं दूर झालेली, पण संघानं जो राष्ट्रवाद रुजवला तो राष्ट्रवाद साकारावा म्हणून निष्ठेनं व निर्धारानं स्वतःला एखाद्या राष्ट्रकार्यात अखंड गुंतवून घेणारी माणसं मी बघितली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नको एवढा राजकारणात आल्यानं संघातही अनेक प्रकारचे प्रदूषण शिरलं आहे. म्हणूनच संघाचं नाव घेत राजकीय स्वार्थ उपटण्याचा प्रकार घडतो आहे.

*नेत्यांची सुरक्षा यंत्रणा काढून घ्यायला हवीय*
देशातल्या आजच्या स्थितीला सत्ता राबवण्याची कुवत नसणाऱ्या नेतेच जबाबदार आहेत. त्यांनी लोकांच्या नको त्या भावना नको तशा चाळवल्या आणि आपली सातत्यानं फसवणूक, अडवणूक होत आहे हे बघून अतिरेकी मार्ग पत्करण्याची लोकांवर वेळ आली. स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहून उन्माद वाढवणारी वक्तव्य करायची, लोकांचा प्रक्षोभ वाढवायचा, भयाची लाट उठवायची हा प्रकार देशात वाढतो आहे. सर्वसामान्य माणूस नानाप्रकारच्या अत्याचारांनी भरडला जातोय. स्त्रियांवर बलात्कार होताहेत. छोट्या बाल्कनाही विकृत वासनांना बळी पडावं लागत आहे. ज्याचा व्यापारधंदा आहे, ज्याच्याजवळ अब्रू आणि प्रतिष्ठा आहे, ज्याच्याजवळ थोडाफार पैसा आहे अशांना नाडून-धमकावून-दहशतीनं दडपून आपलं साधणाऱ्यांच्या टोळ्या समाजात वाढल्या आहेत. त्याचा वापर सत्ता राबवू बघणारे आणि मिळवू बघणारे दोघेही करत आहेत. लोकांना लांडग्यांच्या पुढ्यात टाकून स्वतः कडेकोट सुरक्षेत राहणाऱ्या नेत्यांना-राजकारण्यांना-लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्यांना खरं तर शरम वाटायला हवी. आज जेवढी मोठी सुरक्षा यंत्रणा तेवढी नेत्यांची प्रतिष्ठा असं समीकरण बनलंय. ही सुरक्षायंत्रणा पूर्णपणे काढून घेतली पाहिजे.

*भाजपेयींची बलाब्धिष्ठतेकडे वाटचाल!*
भाजप आता आंतरबाह्य बदलला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसपक्ष जे काही करायचा ते सारं काही भाजपेयींनी अंगीकारलं आहे. आपण स्वीकारलेला 'केशरी' रंग त्यांनी कधीच टाकून दिला. शिवसेनेच्या संगतीनं केशरीचा रंग 'भगवा' करून टाकला हा बाह्यरंग शिवसेनेचा घेतला तसा अंतरंग काँग्रेसकडून घेतलाय. त्यामुळं भाजप आता 'भगवी काँग्रेस' बनलीय. जे जे काँग्रेस करीत होती ते ते भाजपेयी करताहेत. आपली मूल्याधिष्ठतेची भरजरी वस्त्र, कवचकुंडल भाजपेयींनी  उतरवली आहेत आणि बलाधिष्ठतेची वस्त्र परिधान केली आहेत. याचा अनुभव देशात सर्वत्र होतोय. देशाला दिशादर्शन करणारे राजकीय धुरंधर जनसंघी नेत्यांकडून पूर्वी_'मूल्याधिष्ठित राजकारणा'_ ची आस धरली जात होती. पण तेव्हाच्या मूल्याधिष्ठित राजकारणाची जागा आता _'मूल्य'अधिष्ठित_ समाजसेवेनं घेतलीय, त्याच्या सोबतीला 'बाहुबली' देखील सज्ज झाले आहेत. त्यामुळं आजच्या राजकारणाची दिशाच बदलून गेलीय. वैचारिक तत्व, निष्ठा, जीवनमूल्य याला कोणतीच किंमत राहिलेली नाही. केवळ 'निवडून येण्याची क्षमता' एवढाच काय तो निकष उरलाय. त्यामुळं धनदांडगे, बाहुबली यांचीच चलती भाजपत निर्माण झालीय. हे सारं रोखायला हवंय. हिरवा देठ अद्यापी आहे म्हणणाऱ्या मंत्र्याला, प्रेमाला नकार देणाऱ्या मुलींना पळवून आणणारा आमदार, लिंग सरकलेला खासदार, शिवरायांचा उपमर्द करणारा नगरसेवक अशांना आवरायला हवंय, सावरायला हवंय...!

-हरीश केंची
९४२२३१०६०९।

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...