Sunday, 2 September 2018

संघ स्वयंसेवकाचं समर्पण...!


"सत्तांतराचा विषय हा व्यापक ध्येयवादाचा विषय होऊ शकत नाही. असं संघमित्र म्हणतात. कारण सत्तांतर होऊन खरोखरच नैतिकतेचा मापदंड मानणाऱ्यांच्या हातात सत्ता आली तर सर्वात मोठं नुकसान  भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात सहभागी होणाऱ्या, त्यांचा पुरेपूर फायदा उठवणाऱ्या संघ विचाराच्या मंडळींचे होणार आहे. भ्रष्ट काँग्रेसचे खरेखुरे आधार हे विविध क्षेत्रात विविध अधिकारपदे भूषवणारे संघमित्रच आहेत. मला काँग्रेसकडून काही घ्यायचे नाही, संघ परिवाराकडूनही काही घ्यायचं नाही. तेव्हा जे बुद्धीला पटेल ते मी लिहिणार. मला फोन करून व्हॉट्सअप करून माझ्या लिखाणाबद्धल आपलं मत कळवणाऱ्या सर्वांचाच मी ऋणी आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे मला मी चुकलो तर नाही हे पुन्हा तपासून बघण्याची बुद्धी होते. मी भाजपला भगवी काँग्रेस म्हटलं म्हणून काही मित्र नाराज झाले. काँग्रेसवाल्यांवर ताण करणारे भाजपचे राजकारणी मला ठाऊक आहेत. त्यांची संख्याही थोडीथोडकी नाही. पत्रकारांतही बरेच संघमित्र आहेत. नाकाने कांदे सोलण्याची सोज्वळता कुणी न दाखवलेली बरी!"
-------------------------------------------------------------


*मा* झे एक मित्र आहेत. 'मी संघाचा निर्लज्ज प्रचारक आहे' असं ते सांगतात. आणि ते खरोखरच संघाचे निष्ठावान कार्यकर्ते-प्रचारक आहेत. 'संघ कार्य' म्हणूनच ते काही जनसेवाही करतात. ही जनसेवा संघप्रचारासाठीच असल्याचे ते दडवत नाहीत. सकल हिंदूंत बंधुत्वाची भावना असावी असंही ते म्हणतात. तसं ते वागतात असं मात्र नाही! सामाजिक जीवनात उदारता दाखवावी लागते म्हणूनच ते काही उदार वर्तन करताना दिसतात. पण वैयक्तिक जीवनात ते चक्क कर्मठच आहेत. स्त्रियांना कुठलं शिक्षण द्यावं, किती स्वातंत्र्य द्यावं, नोकरी करू द्यावी का याबद्धलचा त्यांचे विचार चक्क बुरसटलेले आहेत. तरी ते माझे मित्र आहेत. माझ्या भवितव्याची त्यांना चिंता वगैरे वाटते असं ते म्हणतात. मी संघपरिवार-भाजप आदींबद्धल जे लिहितो हा माझ्या बुद्धीचा अपव्यय आहे असं त्यांचं मत असून मला सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न गेली काही वर्षे सुरू आहे.

*त्यांचेच दात घशात गेले!*
खरं तर त्यांच्या म्हणण्यानुसार चाळीस वर्षांपूर्वी भारतात संघ परिवाराचं राज्य यायचं होतं. त्यावेळी अडवाणीजी, मुरली मनोहरजी, सिंघलजी ही मंडळी तितकी जोशात नव्हती, पण अटलजी पंतप्रधानपदासाठी जवळजवळ नक्की होते आणि सुब्रह्मण्यम स्वामींकडे अर्थ व परराष्ट्र खातं जाण्याची शक्यता होती. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मुंबईतल्या निवडणूक काळात हे माझे मित्र सुब्रह्मण्यम स्वामींची एवढी तारीफ करायचे की, एवढा शिस्तीचा, एवढा निष्ठेचा, एवढा विद्वत्तेचा अन्य कुणी नाहीच. ही गोष्ट आपल्याला मान्य करायला लागायचं. माझं त्यावेळी म्हणणं होतं की, सुब्रह्मण्यम स्वामी आणि राम जेठमलानी हे दोन कली आहेत त्यांचा पराभव करायला हवाय.  या दोघांचे परराष्ट्राशी संबंध आहेत. त्यांची राष्ट्रनिष्ठा संशयास्पद आहे, असंही मी त्यावेळी म्हणत होतो. दुर्दैवानं त्यावेळी त्या दोघांचा विजय झाला. महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून ते लोकसभेत गेले आणि भारतीय राजकारणात त्यांनी कसा धिंगाणा घातला हे सगळं मराठी माणसाला सांगायला हवं असं नाही. मी स्वामी या स्वच्छ, सरळ, निष्ठावंत राष्ट्रभक्ताला निष्कारण नावं ठेवतोय असं माझ्या या 'संघ'मित्राचं म्हणणं होतं. मी नव्हे, सुब्रह्मण्यम स्वामींनीच ते त्यांच्या घशात घातले. मी संघ परिवाराबद्धल  जे काही लिहितो आहे, बोलतो आहे त्याबद्धल माझे मित्र नाराज आहेत. मी हे सगळं काँग्रेसची चमचेगिरी करण्यासाठी करतोय आणि ते स्पष्ट म्हणत नसले तरी, त्यात माझा काही स्वार्थ आहे असंच त्याचं मत होतं.

*समर्पण फक्त संघासाठीच का?*
आजवर मी कुणा काँग्रेसवाल्याकडून, संघ-भाजप-शिवसेना विरोधात लिहिण्यासाठी दमडा घेतलेला नाही. जेव्हा मी दमडे घेऊन लिहीन तेव्हा माझ्या लिखाणाला दमडीचीही किंमत उरणार नाही, एवढा समज मला आहे. आणि तेवढे पत्रकारितेशी माझं इमानही आहे. पण या स्वार्थानं बुजबुजलेल्या, द्रोहाने डबडबलेल्या समाजात इमानाने, शिस्तीने विशिष्ट समर्पणाच्या भावनेनं काम करणारे फक्त आम्हीच असा अहंगंड बाळगणारे संघ परिवाराचे लोक सातत्यानं इतरांना हिणवत आणि स्वतःचा खोटा बडेजाव मिरवत आले आहेत.  केवळ संघाजवळच समर्पणवृत्तीनं काम करणाऱ्या नि:स्वार्थी कार्यकर्त्यांचं संच आहे आणि इतरांकडे काय स्वार्थ साधणाऱ्या चोरांच्या टोळ्या आहेत? प्रत्येक संघटनेतच चांगले-वाईट कार्यकर्ते असतात. त्यांचे भलेबुरे परिणाम त्या संघटनांना भोगावेच लागतात. संघजवळ समर्पणबुद्धीने काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असतीलही, पण हे समर्पण कशासाठी? फक्त संघ करण्यासाठीच!

*स्वयंसेवक त्यावेळी गप्प का?*
आज साठ वर्षे संघ हिंदू समाजात चारित्र्यवान, नीतिवान, समाजहितदक्ष, देशहिताचाच करणारी कार्यकर्त्यांनी संघटित शक्ती उभी करण्याचं काम करतो आहे. ह्या शक्तीचं संघटित दर्शन कुठल्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वशिलेबाजी, संघटित स्वार्थासाठी केली जाणारी आम जनतेची पिळवणूक, फसवणूक या नेहमीच समोर येणाऱ्या सामाजिक प्रश्नात घडले आहे? बँकांमध्ये मोठ्याप्रमाणात संघाचे कार्यकते आहेत. बँकांमध्ये जो महाभयंकर असा भ्रष्टाचार घडला, या भ्रष्टाचाराला थांबविण्यासाठी संघातून तयार झालेले चारित्र्यवान, नीतीवान, समाजहितदक्ष, देशप्रेमी का पुढं आले नाहीत? ठीक आहे, हा भ्रष्टाचार उघड झाला नव्हता तेव्हा तो उघड होईल की नाही याचे भय वाटून हे लोक गप्प बसले असतील. पण तो भ्रष्टाचार हुडकण्यासाठी आज प्रयत्न होत आहस्त. बँकेतल्या ह्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यासाठी बँकातून काम करणाऱ्या सर्व संघ-स्वयंसेवकांनी संघटितपणे कसे प्रयत्न करावे याचा विचार संघ का करू शकला नाही? ह्या वेगवेगळ्या औद्योगिक, शैक्षणिक, सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दलही उपस्थित होईल. कुठल्या क्षेत्रात भ्रष्टाचार, अन्याय, लाचखोरी, वशिलेबाजीला विरोध करण्याचा संघानं संघटितपणे प्रयत्न केलाय?

*नैतिकतेचे सोवळं नेसून वावर*
हा प्रश्न संघालाच विचारायचा, कारण संघ हिंदू समाजाचे एका आदर्श समर्थ संघटित समाजात परिवर्तन करण्याचं व्रत घेऊन उभा आहे. संघाला अन्य संघटनांसारखे सत्ताकारण करायचे नाही. संघ तत्वचर्चेपेक्षा आचरणावर अधिक भर देतो असं संघ प्रचारक सतत सांगतात. नैतिकतेचा टेंभाही ते सतत मिरवतात. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस आणि सध्याचे सरसंघचालक मोहनराव भागवत या सर्वांनी नैतिकतेचा मापदंड समाजापुढे ठेवला आहे. 'समाज जीवनात कितीही भ्रष्टाचार असला तरीही सर्वसामान्यपणे संघ स्वयंसेवक, संघ संचालित संस्था भ्रष्टाचारापासून दूरच आहेत' असेही संघ प्रचारक, संघ पुरस्कर्ते म्हणतात. ज्याप्रमाणे राममंदिराच्या प्रश्नावर संघाचे स्वयंसेवक जिथं जिथं असतील तिथं तिथं प्रत्यक्ष कार्यासाठी उभे झाले तर समाजाची आंतरिक शक्ती जागविण्यासाठी, सर्वसामान्य माणसांमध्ये नैतिक बळ वाढविण्यासाठी, देशाला पोखरणारा भ्रष्टाचार संपविण्यासाठी, निदान तो उघड्यावर आणण्यासाठी जिथं जिथं संघ स्वयंसेवक आहे तिथं तिथं तो कार्यक्षम का झाला नाही? सरकारी नोकरातही संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने आहेत. सरकारी कचेऱ्यातली उदंड दप्तरदिरंगाई, भ्रष्टाचार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी शक्य नसेल, पण उघड्यावर आणण्यासाठी संघ स्वयंसेवक संघटितपणे काही करू शकले नसते?

*मापदंड फाट्यावर मारला*
आजही परस्पर सहकार्याने परस्पर स्वार्थाचा गोष्टी बिनबोभाटपणे करण्याचा उद्योग यातले अनेक करतात. सरकारी योजनांचे फायदे लाटण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा असतो. हे स्वार्थ साधताना सामाजिक हिताची आणि नैतिकतेची चाड ही मंडळी दाखवतात असं मात्र  दिसत नाही.  संघ स्वयंसेवकांनी नैतिकतेचा संघ चालकांचा मापदंड फाट्यावर मारून स्वार्थ साधण्याचा, भ्रष्टाचारात सहभागी होण्याचा, भ्रष्टाचार पोसण्याचा, भ्रष्टाचाराने प्राप्त होणाऱ्या पैशाचा स्वतःच्या सुखासाठी कुठलाही संकोच न ठेवता वापर करण्याचा उद्योग चालविला आहे. ही गोष्ट नैतिकतेच्या गप्पा दुसऱ्यांना ऐकवणारे-शिकवणारे संघमित्र अमान्य करतील? 'राजकारण करण्यासाठी संघ नाही, संघाला समाजाची आंतरिक शक्ती जागी करायची आहे. सत्तांतरणाचा विषय हा व्यापक ध्येयवादाचा विषय बनू शकत नाही. व्यक्ती ही समाजाची सेवक आहे. समाजच्या हितासाठी धडपडणारा समाजाचा एक घटक अशा स्वरूपात व्यक्ती समाजाशी संबंधित असावी. राष्ट्राला संजीवन देणारे, वैभवसंपन्न करणारे नाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जोडू शकतो', असंही संघमित्र सांगतात. संघ परिवारात असणाऱ्या कामगार संघटनांनी तरी कधी संघटितपणे भ्रष्टाचार विरोधात काही केलंय? संघ तत्वज्ञान मानणाऱ्यांच्या समर्थ संघटना बँकांत आहेत. आयुर्विमा आणि अन्य महामंडळातही आहेत. तिथं भ्रष्टाचार नाही?

*नाकाने कांदे सोलू नयेत*
माझं म्हणणं असं आहे की, सत्तांतराचा विषय हा व्यापक ध्येयवादाचा विषय होऊ शकत नाही. असं संघमित्र म्हणतात. कारण सत्तांतर होऊन खरोखरच नैतिकतेचा मापदंड मानणाऱ्यांच्या हातात सत्ता आली तर सर्वात मोठं नुकसान  भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात सहभागी होणाऱ्या, त्यांचा पुरेपूर फायदा उठवणाऱ्या संघ विचाराच्या मंडळींचे होणार आहे. भ्रष्ट काँग्रेसचे खरेखुरे आधार हे विविध क्षेत्रात विविध अधिकारपदे भूषवणारे संघमित्रच आहेत. मला काँग्रेसकडून काही घ्यायचे नाही, संघ परिवाराकडूनही काही घ्यायचं नाही. तेव्हा जे बुद्धीला पटेल ते मी लिहिणार. मला फोन करून व्हॉट्सअप करून माझ्या लिखाणाबद्धल आपलं मत कळवणाऱ्या सर्वांचाच मी ऋणी आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे मला मी चुकलो तर नाही हे पुन्हा तपासून बघण्याची बुद्धी होते. मी भाजपला भगवी काँग्रेस म्हटलं म्हणून काही मित्र नाराज झाले. काँग्रेसवाल्यांवर ताण करणारे भाजपचे राजकारणी मला ठाऊक आहेत. त्यांची संख्याही थोडीथोडकी नाही. पत्रकारांतही बरेच संघमित्र आहेत. नाकाने कांदे सोलण्याची सोज्वळता कुणी न दाखवलेली बरी!

-हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...