Sunday, 2 September 2018

हिंदुत्ववादी तालिबानीच्या दिशेने...!

अखेर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. त्यांचं नेटवर्क महाराष्ट्रभर होतं हे आता उघड झालंय. या साऱ्या घटनांमध्ये साधक असल्याचं स्पष्ट झालंय. याला आपण काय म्हणणार? हा हिंदू आतंकवाद आहे, हे हिंदू तालिबानी आहेत.... अशी काँग्रेसीजनांनी टीका केली होती त्यावर गदारोळ माजला. पण आताच्या या घटना त्याला पुष्टी देणाऱ्या ठरताहेत. मध्यंतरी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिमांच्या नावानं होणारी दहशतवादावरील चर्चा जोरात होती. तेव्हा एक एसएमएस बिगर मुस्लिम लोकांना  भावत होता. तो असा _हर मुस्लिम आतंकवादी नहीं होता. लेकीन पकडे जानेवाला हर आतंकवादी मुस्लिमही क्यो होता हैं।_ हा संदेश अनेकांनी अनेकांना फॉरवर्ड केला आहे. तो एसएमएस काहीं तथ्यांवर व तत्कालीन परिस्थितीवर आधारित होता. मात्र त्यातला संपूर्ण तपशील खरा नव्हता. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन मध्ये स्फोट घडवून हिंदू म्हणविणाऱ्यांनी तो एसएमएस खोटा ठरवला आहे. ते जयंत आठवलेंच्या 'सनातन' या स्वतःला कडव्या हिंदू म्हणवणाऱ्या संस्थेशी संबंधित होते, आणि आजही दाभोलकर प्रकरणात अटकेत असलेले सारे सनातनचे साधक आहेत. खरं वास्तव हे आहे की, अतिरेकी हिंदू नसतात ना इस्लामी, ज्यू नसतात ना शीख! तो ऱ्यांच्या विकृतीपोटीचा धंदा असतो. या साऱ्या प्रकरणात तेच दाखवून दिलं आहे. जे तथाकथित ब्राह्मणी आजी-माजी क्रांतीकारकांना करायचं असतं!

*लांच्छनास्पद कृत्यानं मान खाली*
भारतात अतिरेकी व आतंकवादी हा शब्द शिखांच्या प्रश्नापासून प्रचलित झाला. जगात या शब्दाला प्रसिद्धी कडव्या ज्यूंनी मिळवून दिली. मात्र जगाच्या वा भारताच्या इतिहासात जेवढं हिंसक हे कृत्य जुनं आहे. तेवढाच दहशतवाद जुना आहे. जिथं शब्द संपतात. शब्दांच्या मर्यादा संपतात. मौखिक, लिखित संवाद संपतो. तिथं जे काही प्रकट होतं. ते सर्व दहशतवाद म्हणायच्या लायकीचं असतं. महात्मा गांधी म्हणायचे 'जर डोळ्यांसाठी डोळाच घ्यायचा, तर सर्व जगच आंधळं होईल!' त्यांचाही अंत असाच बदल्याच्या भावनेनं आणि अतिरेकी मानसिकतेतून झाला. जेव्हा सर्व मर्यादा संपतात, तेव्हा नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी बळाचा वापर आवश्यक असतो. असं कायद्याच्या तत्वात सांगितलं आहे. मात्र दहशतवादाच्या तंत्रात बळाशिवाय काहीच चालत नाही. नथुराम गोडसेची हिंसाही त्याच दर्जाची होती. आज नथुराम नाटकातून जिवंत आहे. तसाच तो कार्यरत आज. त्याला कार्यरत ठेवण्याचं काम पूर्वी गोळवलकर आदींनी केलं. आता हे काम तोगडिया- आठवले करीत आहेत. _हिंदू धर्माला लांच्छणास्पद आणि हिंदूंचं तालिबानीकरण करण्याच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट आज अचानकपणे समोर आली असली, तरी ती अचानकपणे घडलेंली नाही._  तिची पाळंमुळं इतिहास व वर्तमानाच्या जमिनीत आहेत.

*धर्मसत्ता आणि राजसत्तेत गल्लत*
जगात अन्यत्र कदाचित वेगळी स्थिती असेल. भारतात धर्मसत्ता आणि राज्यसत्ता या एकाच नाण्याच्या फोन बाजू आहेत. धर्मावर नियंत्रण असेल, तरच राजसत्तेवर नियंत्रण राहतं. हे या देशातले सनातनी केव्हापासूनच ओळखून आहेत. बहुदा त्यामुळं जयंत बाळाजींच्या संघटनेच्या नावात सनातन आहे. त्यांचं शेकडोवर्षं धर्मावर राज्य होतं. त्यामुळेच राजसत्ताही त्यांच्याच नियंत्रणाखाली होती. त्यांचं धर्मावरचं राज्य वर्षानुवर्षं उगाच राहत नाही. त्यासाठीची काही तंत्र व साधनं त्यांनी विकसित केली आहेत. म्हणजे, आपलाच धर्म जिथं बहुसंख्य आहे तिथं ते आपसातील भेदाभेदांचा आधार घेतात आणि जिथं दुसरा धर्म आहे, त्याला प्रतिस्पर्धी म्हणवून त्याची भीती घालतात. मुस्लिमांची कथित दहशतवादाची भीती त्यामुळंच लोकांना खरी वाटते. एकदा ही भीती खरी वाटली की, मग लोकांच्या मनांत आत्मरक्षेचा भाव तयार होतो. ' तुमचा दाऊद तर आमचा गवळी' हे अत्यंत असह्य असं वाक्यही मग टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट करतं.

*सुप्तावस्थेतील कट्टरतेचा व्हायरस*
जगातला आणि भारतातला दहशतवाद मुस्लिमांचाच आहे, असं तत्व जर प्रस्थापितच झालं; की मग हिंदूंना त्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज केलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटना या हिंसेला म्हणजेच दहशतवादाला अधिष्ठान देणारे मोठे स्रोत आहेत. सावरकरांच्या हिंदू महासभेचा नारा शांततेचं राज्य स्थापन करण्याचा कधीच नव्हता. जयंत बाळाजीचंही तसंच आहे. त्यांना ईश्वरी राज्य स्थापन करायचं आहे. ईश्वराच्या या राज्यात सर्व काही आबादीआबाद असणार आहे. ते राज्य स्थापन करण्यात अडथळा कोणाचा? त्यांची मतं न पटणाऱ्या हिंदूंचा आणि अर्थातच मुस्लिम अन ख्रिश्चनांचा! मग त्यांच्या मनात दहशत निर्माण होईल, अशी कृत्य करा आणि त्यानंही भागलं नाही, तर दहशतीच्या अन्य मार्गाचा अवलंब करा. संघ परिवाराच्या अनेक पोटसंघटना आणि जयंत बाळाजी यांनी हे पद्धतशीरपणे बिंबवत आणलं आहे. अरेबिक भाषेतील काहीबाही वाचून ज्याप्रकारे तालिबान तयार झाले, तसंच त्यांनी हिंदू धर्मातही केलं आहे. त्यांचे जिहाद अल्लातालाच्या नावानं, यांचं सर्व काही ईश्वराचं नाव घेऊन. महात्मा गांधीजींची हत्या केल्यानंतर त्याची समाजतून जबरदस्त प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर हिंदूंचा दहशतवाद अनेक वर्षे सुप्तावस्थेत होता. तो मग कधी कधी मुंडकं वर काढायचा. मात्र एखाद्या व्हायरससारखा तो सर्वव्यापी दिसून येत नव्हता. बाबरी मशीद पडल्यानंतर मात्र त्याचा सर्वत्र संसर्ग झालाय. त्यापूर्वी त्यानं श्रीलंकेत थैमान घातलं होतंच. मात्र संघ परिवाराला व त्यांच्या पिलावळींला मुस्लिम दहशतवादाचा दर्जा दिला नव्हता. त्यांच्या लेखी तोही स्वातंत्र्यलढाच होता.

*काठी-लाठीचं दर्शन हिंसेसाठीच!*
ख्रिश्चन असो वा मुस्लिम बौद्ध असो वा जैन. या धर्मांनी हिंसेच्या आधारे काही साध्य करण्याचा धर्मादेश दिलेला नाही. त्यांच्या धार्मिक कार्यक्रमात शस्त्राला काही स्थान नाही. ते त्यांचं साधन नाही. मात्र त्यातल्या काही धर्माच्या नावानं फोफावलेल्या संघटना मात्र शस्त्राचं प्रदर्शन ज्या पद्धतीनं करतात, त्यातूनच दहशतवादी मानसिकता तयार होते. रा.स्व.संघाच्या संचलनात काठी असते. ही काठी काही टेकत टेकत चालण्यासाठी नसते. हिंसेसाठीच योजलेली असते. त्यांच्या बजरंग दल या पोटसंघटनेनं मध्यंतरी मोठ्याप्रमाणावर 'त्रिशूलां'चं वाटप केलं. हे कोणत्या संस्कृतीचं-मानसिकतेचं निदर्शक आहे? गुजरातसाठी आवश्यक ती मानसिकता अशा कार्यक्रम साधनांद्वारेच करण्यात आली. ओरिसात दारासिंहने ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहम स्टेंस आणि त्यांच्या दोन मुलांना त्या अतिरेकी मानसिकतेतून जिवंत जाळलं. असे लहानमोठे प्रकार देशभर होत आहेत. महाराष्ट्रात ही विषारी झुडूपं कशी उगवली ते पाहू.

*नांदेडमध्ये बॉम्ब बनवायला सुरुवात झाली होती*
'दोन धर्मात तेढ असेल, तरच लोकांना धर्माच्या नावानं संघटित करता येतं. ते संघटित झाले, की त्यांच्याकरवी राजसत्ता हस्तगत करता येते. बाबरीच्या पतनानंतर दंगली होतात आणि मगच बाबरी पाडणाऱ्यांचं राज्य येत असतं. विहिंप, सनातन वाल्यांचं तेच लक्ष्य आहे.' गेल्या चार-पांच वर्षात महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यासंबंधीचे छोटे प्रयोग केले होते.त्यातूनच हिंसेचं तत्वज्ञान सर्वत्र पसरलं आहे. त्यामुळं नांदेडच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला वाराणसीच्या मंदिरात झालेल्या मंदिरात बॉम्बस्फोटाचा राग आला. काश्मिरात होणाऱ्या हत्यांमुळे तो आणि त्यांच्यासारखे काहीजण संतप्त झाले. त्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी त्याच धर्तीचं आक्रमण आवश्यक आहे असं म्हणून त्याने बॉम्ब बनविण्याची कला आत्मसात केली. गोव्यात आणि विदर्भातल्या काही जंगलात भगवे लोक या कामाचं ट्रेनिंग देत असतात. सरवाअंती त्यांनी परभणी, पूर्णा, जालना इथं या बॉम्बचे प्रयोग झाले. हे बॉम्बस्फोट घडविल्यानंतर ते नांदेडात मोठ्या तयारीला लागले. पण तिथंच बॉम्ब बनवत असताना अपघात झाला तो फुटला आणि हे सारं कारस्थान बाहेर आलं. त्यात दोघे ठार झाले. त्यानंतर दोनवर्षानी तिथंच नांदेडात असाच प्रकार घडला त्या स्फोटात दोन जण ठार झाले. रत्नागिरीत ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या दारात बॉम्ब फेकून पळताना दोघे पकडले गेले ते सनातनचे साधक होते . त्यातले दोघे हे ठाण्यातल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत.

*साऱ्यांचा दहशतवाद सारखाच असतो*
इतर धर्माच्या नावाच्या म्हटल्या जाणाऱ्या अतिरेकी संघटनांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं म्हणून हे बॉम्ब जन्माला आले होते. ज्याप्रमाणे पाकिस्तानात काही मुसलमान अन्य मुसलमानांना बॉम्ब फेकून मारतात तसंच इथल्या हिंदू म्हणवणाऱ्यांनी करायचं ठरवलं आहे की काय अशी शंका येते. नक्षलवादी जे करतात आणि श्रीलंकेत तामिळ लोक जे काही करत होते तो ही दहशतवादच आहे. मुस्लिमांच्या दहशतवादाबद्धल बोलणारे लोक या कृत्याबद्धल  तशी विशेषणं, दूषणं, देत नाहीत. उल्फा, गोरखा परिषद जे काही करतं तेही याच धाटणीचं आहे. मात्र त्याबद्धल त्या संघटना त्यांच्या कृतीला हिंदूंचे ते तथाकथित पुरस्कर्ते दहशतवादी म्हणत नाहीत. ते त्यांच्यासाठी वापरलाच तर 'राष्ट्रद्रोही' हा शब्द वापरतात. गुजरातमध्ये गोध्राकांडानंतर जे काही घडलं, ही त्यांच्या लेखी 'प्रतिक्रिया' असते. अमेरिका जे काही करते हा सुपर दहशतवाद आहे. आखाती देशात मोसाद ही संघटना जी काही करते, ती अमेरिकन संस्कृतीच आहे. संघ परिवाराने कधीही त्यांच्या या कृत्यांना दहशतवाद म्हटलेलं नाही. ते त्यांच्यावर टीकाच करायची तर, त्यांना पोलीस म्हणतात. अफझल गुरुसारख्या गुन्हेगाराला फाशी द्यायलाच हवी. अस म्हणताना कृत्य एकच असेल तर त्यांचा न्याय व्यक्तिनिहाय असतो. अनेक बाबतीत मुस्लिमांना दोष दिला जातो. ,'त्यांची' आणि 'आपली' या भाषेत सतत तुलना केली जाते. मात्र ती करताना वास्तवाकडे डोळेझाक केली जाते. इस्लाममध्ये दहशतवादाला थारा नसल्याचं पुन्हा पुनः सांगितलं जातं. हिंदू म्हणवून घेणारे बुवा, बाबा, महंत,महाराज आता या ही बाबतीत त्यांच्याशी तुलना करणार काय?

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...