Saturday 6 October 2018

नासकी लोकशाही...!

"जगामध्ये सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून गौरविल्या जाणाऱ्या भारतीय लोकसभेची गेल्या काही वर्षांत 'महाभारतीय राजसभा' झालीय. इथल्या लोकशाहीची अवस्था तर महाभारतातल्या द्रौपदीसारखी झालीय. द्रौपदीचा ताबा पांडवांकडे असताना तिला जुगारात लावण्यात आलं, तर कौरवांच्या ताब्यात जाताच तिचं वस्त्रहरण झालं. द्रौपदीच्या अब्रू रक्षणार्थ श्रीकृष्ण तरी धावून आला. भारतीय लोकशाही द्रौपदी एवढीशी भाग्यवान नाही. तिचं पदोपदी आणि पुन्हा पुन्हा वस्त्रहरण होत आहे. ते रोखण्यासाठी, लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपणच श्रीकृष्ण होण्याची गरज निर्माण झालीय!"
------------------------------–------------
'हम सब भारतीय बननेके पहले भारत बने...!' २६/११ च्या हल्ल्यात जखमी झालेला नेव्हीतील, मरणाच्या दाढेतून परतलेला, अपंग झालेला सैनिक ही अपेक्षा भारतीयांकडून व्यक्त करत होता त्यावेळी केवळ तिथं उपस्थित असलेलेच नव्हे तर दूरचित्रवाणीवर तो कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याची ती अपेक्षा अस्वस्थ करून गेली...!"
शुक्रवारी रात्री प्रसारित झालेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात संवादक असलेल्या अमिताभ बच्चन यांनी या सैनिकाला बोलत केलं, मग त्यानं जे काही सांगितलं ते अंगावर शहारे आणणारं होतं. त्यांनी अतिरेक्यांशी दिलेला लढा, प्राणावर बेतलेला प्रसंग आणि जीवन-मरणाचा रुग्णालयातला झगडा याचं वर्णन ऐकून सारेच व्यथित झाले तसेच भावुकही बनले. त्या सैनिकानं भारतीय मानसिकतेचं केलेलं मूल्यमापन सर्वांना आत्मचिंतन करायला भाग पाडलं! पण खरंच आपण असं आत्मचिंतन करणार आहोत काय? देशाच्या आत्मगौरवाचे निघत असलेले धिंडवडे आपण दररोजच सहन करत आलो आहोत. राजव्यवस्थेचं, लोकशाहीचं होत असलेलं अवमूल्यन, राजकारणाचा घसरलेला स्तर, हे सारं सुधारावं, योग्य दिशेनं चालावं, सर्वसामान्यांना हे माझं नाही तर आपलं राष्ट्र आहे असं वाटावं, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत असं म्हणता येईल का? देशाच्या राजव्यवस्थेचा होणारा सत्यानाश, लोकशाहीचं होणारं वस्त्रहरण आपण रोखणार आहोत का? लोकशाही रक्षणासाठी आपण सक्षम, सशक्त होण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय.

*महानालायकपणा करण्याची गरज होती का?*
भ्रष्टाचारात बरबटलेल्या आणि जनतेनं सत्तेवरून फेकून दिलेल्यांना भाजपेयींनी सत्ता संपादनासाठी अवास्तव, अनावश्यक महत्व दिलं मोठं केलं. असंगाशी संग केल्यानं कमावलेल्या तत्वांचाही शक्तिपात होतो याचा अनुभव सध्या भारतीय जनता घेतेय. यामुळं अशा आयाराम पुढाऱ्यांना लायकीपेक्षा अधिक मोठेपणा मिळाला. परंतु ही मंडळी आपल्या लायकीनुसारच वागताहेत. आपल्या स्वार्थासाठी सत्तासाथीदाराला वेठीला धरून लोकशाहीची विटंबना करीत सुटले आहेत. त्यांच्यात हे कुकर्माचं बळ कुणी पेरलं? स्वातंत्र्यानंतर अधिकाधिक सत्तालाभ काँग्रेसनेच उपभोगलाय, आपला सत्ता स्वार्थ साधण्यासाठी काँग्रेसनं लोकशाहीला वेळोवेळी जुगाराला लावलं. तथापि काँग्रेसचा हा नालायकपणा खतम करण्यासाठी महानालायकपणा करण्याची काही गरज नव्हती. हे टाळता येणं शक्य होतं. पण तसं घडत नाही. ही वस्तुस्थिती आहे!

*भाजपेयींनी सत्ता व्यवहार आत्मसात केला*
लोकशाहीला हा मार प्रादेशिक पक्ष देत होते, अस्मितेच्या नावाखाली फुटीरतेला बढावा देत होते. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. काँग्रेसच्या हातून अनेक राज्ये गेली. त्यातून प्रतिकूल परिणाम देश पातळीवर,  संसदीय लोकशाहीवर आणि आपल्या राजकारणावर झाला. काँग्रेसनं अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांशी सोयीनुसार दोस्ती-युती केली. या दोस्तीत विधानसभांच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना बढावा द्यायचा आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्याची वसुली करायची असं धोरण काँग्रेसनं ठेवलं होतं. त्यामुळंच पंजाबात अकाली दल, तामिळनाडूत द्रमुक-अण्णा द्रमुक, काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्स यासारख्या पक्षांना बढावा मिळाला. सत्तेसाठी काँग्रेसच्याच चालीनं चालणाऱ्या भाजपनं हा सत्ता व्यवहार आत्मसात केला. भाजपेयींनी सत्ताबळ कमविण्यासाठी जमेल त्या प्रादेशिक पक्षांशी दोस्ती केलीय. त्यामुळं भाजप कार्यकर्त्यात, मतदारात आणि लोकप्रतिनिधीत लक्षणीय वाढ झालीय.

*नासक्या लोकशाहीचं हे फळ*
काही राज्यात सत्ताधारी झाला परंतु प्रादेशिक पक्षांशी दोस्ताना जमविताना काँग्रेससारखा 'राज्य तुमचं, केंद्र सत्ता आमची' असा रोखीचा व्यवहार न केल्यानं भाजप जसा या प्रादेशिक पक्षांच्या आधारे वेगवेगळ्या राज्यात पसरला तसे प्रादेशिक पक्ष लोकसभेद्वारे राष्ट्रीय राजकारणात घुसले. ही भाजपेयी परिवाराची अगतिकता आहे. या सरकारच्या जागी दुसरं कोणतंही सरकार आलं तरी त्यात बदल होणार नाही. कारण सरकार आणणाऱ्याला आपलं सत्व, तत्व विकल्याशिवाय सत्ता मिळणार नाही आणि मिळाली तरी टिकवता येणार नाही. हे आपल्या नासक्या लोकशाहीचं फळ आहे.

*राजकीय अडाणीपणा आणि भावनिक भुलभुलैया*
भ्रष्ट झुंडशाहीलाही संख्याबळावर सत्ता देणारी ही लोकशाही ही एक भिकार व्यवस्था आहे. तथापि तिला पर्याय असणारी अन्य चांगली राजव्यवस्था नाही. प्रत्येक व्यवस्थेत दोष असतातच, परंतु त्यातील दोष दूर करण्याचा प्रामाणिकपणा त्या व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्यात असायला पाहिजे. यासाठी सत्तेसाठी जनमत लाथाडून भ्रष्ट डावपेंच खेळणाऱ्या राजकारण्यांप्रमाणेच, त्यांच्या खेळाकडे हताशपणे पाहणाऱ्या जनतेनेही लोकशाही निर्दोष करण्याची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. परंतु भारतीय जनतेचा राजकीय अडाणीपणा आणि भावनिक भुलभुलैयात फसण्याची वृत्ती पाहता भारतीय जनता लोकशाही निर्दोष करण्यास नालायक ठरते. अशा समाजाला लायक सत्ताधीश कसा मिळू शकेल? जनतेच्या बेजबाबदारपणातूनच त्यांना लोकशाहीतला मोठेपणा मिळाला आहे. फाटक्या दुधाला विरजण लावण्यानं दही होत नाही. तिथं लोण्याची अपेक्षा धरण्यात काहीही अर्थ नाही.

*जनतेनं आता आतून हाललं पाहिजे*
जनतेनंच स्वार्थ त्यागल्याशिवाय आणि राजकीय भान आपल्यात बाणवल्याशिवाय लोकशाहीची विटंबना थांबणार नाही. तिथं राष्ट्रीय प्रश्नांची, निर्णयांची चर्चा होते, अशा लोकसभेत जाणाऱ्या उमेदवारास आपण गावापर्यंत एस.टी. पाणी संडास व्यवस्था, चिठ्ठ्यांवर मिळालेल्या नोकऱ्या, खोटी कागदपत्रे बनवून दिलेली कर्जे, यासारख्या कर्तृत्वाचा अथवा आमिषाने हिशेब करून आपण मतं देतो आणि पुढच्या निवडणुकीतले क्षणाचे मतदार राजेपद मिळेपर्यंत लोकशाहीच्या बोंबा मारत बसतो. सामान्यातल्या सामन्याला सर्वोच्च पदापर्यंत नेणाऱ्या लोकशाहीची विटंबना टाळण्यासाठी तरी आता आतून हालले पाहिजे. तशी आपण मतांसारखी पावलं टाकीत असतो. पण आता निश्चयानं पावलं टाकायची वेळ आली आहे.

*लोकशाही रक्षणासाठी कृष्ण बनू या!*
सत्ताकारणासाठी सारा घोडेबाजार बनलाय. शासन म्हणून कुणाची प्रशासनावर जरब राहिलेली नाही की, जनतेच्या मनांत कुणाबद्धल आस्था नाही. भारतानं आकाशात अग्निबाण उडवले आणि पाताळात अणुबॉम्ब फोडले तरी भारतीय समाजात क्रांतिकारी चैतन्य उसळलेलं नाही. सरकार ठप्प जनता गप्प तरी भारताकडं वाकडा डोळा करून कुणी पाहत नाही. भारताचा जणू गोळा झालाय. सत्ता स्वार्थात सरकारे पडली, तरली तरी राष्ट्र जगलं पाहिजे. कुणाला जिंकावंस वाटावं असं राष्ट्र उभं असलं पाहिजे. भारत भूमीची ही हाक आपल्या कानी-मनी घुमतेय का? देशाचा होणारा हा सत्यानाश टाळण्यासाठी जागे होऊ या, कृष्ण बनून लोकशाहीचं रक्षण करू या...!

चौकट
*चारित्र्यहीनता हा देखील भ्रष्टाचारच!*
पूर्वी श्रद्धेची ठिकाणं होती, ती आता धूसर बनली आहेत. राजकारणात चारित्र्यवान माणसं अभावानेच आढळू लागली अन भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झालाय. त्यामुळं चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावू लागली अन ती संख्या नष्ट होते की काय, अशी शंका निर्माण होऊ लागलीय. यातच काही काळ देशात संमिश्र सरकारांनी आपलं जाळं फेकलं, त्यात सर्वच राजकीय पक्ष अडकले. विचारसरणीनं भिन्न असलेली ही मंडळी एकाच पातळीवर आल्यानं लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली आणि त्या साशंकतेतूनच नेतृत्वावरचा विश्वास उडाला. धेय्य-धोरणं, विचार-आचार साफ बुडाले, उरली फक्त खुर्चीची लालसा, महत्वाकांक्षा, त्यासाठी तडजोड, लांगूनचालन, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याची प्रवृत्ती सार्वजनिक जीवनातला हा व्यभिचार चारित्र्यहीनतेचेच प्रतीक बनू लागली. चारित्र्यहीनता हा देखील भ्रष्टाचार आहे याचा सोयीस्कर विसर पडू लागलाय. सार्वजनिक जीवनातला हा व्यभिचार थांबायला हवाय. असं झालं तर देशाच्या दृष्टीनं ते एक आशादायक चित्र असेल. त्याच्या प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे...!
- हरीश केंची
९४२२३१०६०९

4 comments:

  1. हरिश केंची साहेब..तुम्ही "नासकी शासनपद्धती"शब्द वापरा...
    लोकशाही बद्दल' नासकी" शब्द वापरण्याची कोणाची वैचारिक लायकी नाही.काहीही वायफळ बडबडू नये..

    ReplyDelete
  2. सर आपला लेख वैचारिक आहे..छान विचार पण Title अयोग्य आहे.कृपया याची नोंद घ्यावी.

    ReplyDelete

  3. Lokashahiche bharatatil naske rup. Tumchya matashi sahamat.

    ReplyDelete

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...