Saturday, 16 September 2017

पाकिस्तानात तक्षशिला चाणक्याची उपेक्षा


*पाकिस्तानात तक्षशिला, चाणक्याची उपेक्षा!*

"भारतीय राजकारणात राज्यकारभारासाठीच नव्हे तर राष्ट्रधर्माच्या आचरणासाठीही चाणक्याच्या मार्गदर्शक तत्वांचा नेहमीच अवलंब केला जातो, त्याचा उल्लेख आपण नेहमीच वाचत आलो आहोत. चाणक्याचे तत्वज्ञान आणि त्यांचे जगविख्यात कौटिल्यीयशास्त्र, या साऱ्या ज्ञानाची पाळमुळ जिथं रुजली त्या तक्षशिला विद्यापीठाची अवस्था आज अत्यंत दयनीय झालीय. भग्नावस्थेतील या विद्यापीठाकडं दुर्लक्ष केलं गेलंय आजही त्याची दखल घेतली जात नाही, याचं कारण ते आहे पाकिस्तानात ! चाणक्यांना पाकिस्ताननं अस्पृश्य मानलंय, पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी या भारतीय उपखंडातील तक्षशिला विद्यापीठ, मोहोंजोदडो, हडप्पा, सिंधू संस्कृती ही मानचिन्हे पाकिस्तानात गेली. पण ही सारी हिंदूंची भारतीयांची मानचिन्हे आहेत म्हणून त्यांची सतत उपेक्षा पाकिस्तानात केली जातेय. तक्षशिला विद्यापीठाच्या भग्नावशेषांतल्या वास्तु युनेस्को जतन करतेय. ही समाधानाची बाब असली तरी, युनेस्कोच्या त्या समितीवर भारताचा प्रतिनिधी असणं गरजेचं झालं आहे"
--------------------------------------------
या जगविख्यात 'तक्षशिला विद्यापीठा'ची जी दूरवस्था झालीय याबाबत पाकिस्तानातल्या काही विद्वानांनी खंत व्यक्त केलीय. तिथले ज्येष्ठ पत्रकार सैफ ताहीर यांनी रावळपिंडीपासून केवळ ३५ किलोमीटर दूर असलेल्या तक्षशिला विद्यापीठाच्या भग्नावशेषांचे विस्तृत चित्र तिथल्या ख्यातनाम दैनिक 'डॉन' मध्ये एका विस्तृत लेखाद्वारे मांडलेय. त्याचे शीर्षक होतं, "व्हाय इज ग्रेट फिलॉसॉफर कौटिल्य नॉट पार्ट ऑफ पाकिस्तान हिस्टोरीकल कॉन्सीयसनेस?" साध्या सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर 'पाकिस्तानातील इतिहासकार कौटिल्यासारख्या प्रखर तत्वज्ञानीची उपेक्षा का करताहेत?'

*तक्षशिलाची दखलच नाही*
सैफ ताहीर यांनी पाकिस्तान सरकार, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ आणि तिथल्या संवेदनशील नागरिकांना सवाल केला आहे की, तक्षशिला सारख्या प्राचीन विद्यापीठाचे अवशेष फाळणीनंतर पाकिस्तानात आढळून आले. त्यात मोठ्याप्रमाणात हिंदू, बौद्ध धर्म आणि संस्कृतीच्या अस्तित्वाचा, ताकदीचा प्रभाव दिसत होता. या विद्यापीठातून वेगवेगळ्या विषयातील जगविख्यात विद्वान निर्माण झाले होते. ते सारे प्रामुख्यानं हिंदू, वा बौद्ध होते. याच कारणानं पाकिस्तानला तक्षशिला विद्यापीठ, आणि तिथल्या विद्वानांचा, त्यांच्या पुरातत्व वास्तूंचा अभ्यास वा नोंदी इतिहासात करणं पसंत नसावं.

*१८ मठाचं शिक्षण संकुल*
२हजार७०० वर्षांपूर्वी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या ज्या विद्यापीठाचा लौकिक होता , जिथं प्रवेश मिळणं मग ती विद्यार्थी म्हणून असो वा शिक्षक म्हणून असो ती एक प्रकारची सिद्धी समजली जात होती. अशा तक्षशिला विद्यापीठ संकुलाचे जे कांहीं अवशेष शिल्लक आहेत त्याची 'झलक' युनेस्कोने संवर्धित अवशेष पाकिस्तान आणि जगासमोर मांडली आहे.तक्षशिला विद्यापीठ जिथं होतं वा तिचे अवशेष आज जिथं आढळतात ते आणि त्याचा परिसर हा ' मोहरा मोराडू' या नावानं ओळखला जातो. तक्षशिला विद्यापीठ हे १८ मठाचं एक मोठं शैक्षणिक संकुल होतं. जेलियन, धर्मराजिका, सकर्प, पीपलान, अशा प्रकारची नावं या मठाची होती. तक्षशिलामध्ये वेद, ज्योतिष, अवकाश विज्ञान, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राजनीती, वाणिज्य, हिसाब, युद्धकला, अगम-निगम, संगीत, नृत्य, चित्रकला, वैद्यकीय, सर्जरी, अशाप्रकारचे ६८ विषय शिकवले जात. १६ वर्षांहून अधिक वयाचे १० हजार ५०० विद्यार्थी इथे वास्तव्य करून शिक्षण घेत होते. आपल्याकडे गुरुकुल शिक्षणपद्धती जी आहे ती इथूनच आलीय. केवळ भारतातीलच नव्हे तर बेबीलॉन, ग्रीस, सीरिया, अरेबिया, फोनसिया, आणि चीन या देशातून इथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये मोठी स्पर्धा होत असे.

*राज्यकारभाराचा अभ्यास*
अर्थशास्त्रातील सिद्धांताचा सर्जक आणि कुशाग्रबुद्धीचा मालक, राजनितिज्ञ, सल्लागार, 'कौटिल्य,-चाणक्य', संस्कृत भाषेतील व्याकरण, शब्दांचे अर्थ आणि त्याच्या शब्दकोशाची निर्मिती करणारा 'पाणिनी', वैद्यकीय ज्ञानापासून भौतिक ज्ञानाचा प्रणेता 'जीवाक', आयुर्वेदाचा प्रखर ज्ञाता 'चरक', त्याचबरोबर पंचकर्मातील गोष्टींचा निर्माता 'विष्णूवर्मा' यासारख्या वेगवेगळ्या विषयातील अत्यंत बुद्धिमान असा शिक्षकगण इथं कार्यरत होता. देशविदेशातील राजकुमार तक्षशिलामध्ये अभ्यास करून,  शिक्षण घेऊन आपलं राज्य कारभार सांभाळत वा राजकीय सल्लागार म्हणून ते काम करीत.

*अलेक्झांडरला मोह*
अलेक्झांडर जेव्हा पंजाबात आला होता, तेव्हा गुणग्राहक असलेल्या त्याने आपली राजकीय इच्छा आणि सत्तेची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या देशाचा बहुमुखी विकास करण्यासाठी तक्षशिलातील निवडक विद्यार्थ्याना ग्रीसला परतताना आपल्याबरोबर घेऊन गेला होता.

*खंडहर बनले विद्यापीठ*
तत्कालीन भारताच्या उत्तर-पश्चिमेला तक्षशिला विद्यापीठ होतं. त्यामुळे त्यावर चढाई करणाऱ्यांना ते सोपं जातं असे. त्यामुळेच पर्शियन, शक, कुशाण, आणि शेवटी हुण-ज्यांनी रोमन साम्राज्याचा विध्वंस केला होता. अशा साऱ्यांनी हे विद्याज्ञानाचं हे तीर्थस्थळ उध्वस्त केलं होतं. चीनचा प्रवासी हुएन त्संग याने सहाव्या शतकात तक्षशिलाच्या या स्थानाचं वर्णन केलंय त्यात तो म्हणतो की, हे विद्यापीठाची अवस्था एक खंडहरासारखी झालीय. महाभारताची विस्तृत कथा ही तक्षशिलाच्या अभ्यासक्रमात होती. बौद्धांच्या जातककथेतही तक्षशिलाची महती वर्णिली आहे. तत्कालीन गांधार- कंदाहार आणि तक्षशिला यांचा विकास हा एकमेकांना पूरक असाच होता.

*वैश्विक विद्वान*
कौटिल्याचा उल्लेख 'सर्वोपरी वैश्विक विद्वान' असा उल्लेख सैफ ताहीर यांनी केला आहे. इटलीचे प्रख्यात तत्वज्ञानी मेडीआवेली यांच्या 'प्रिन्स' या ग्रंथात आणि चाणक्यच्या अर्थशास्त्रात ज्या गोष्टी मांडल्या आहेत हे पाहता हे दोन्ही जागतिक स्तरावरील महनीय ग्रंथ आहेत. असं अमेरिकेचे राजनीतिज्ञ हेन्री किसिंजर यांनी जाहीररीत्या म्हटलं आहे. चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याचा व्याप, यश कीर्ती आणि समृद्धी या साऱ्या मागे चाणक्याची बुद्धिमत्ता स्पष्ट दिसते. त्याच्याच सल्ल्यानुसार राज्यकारभार चालत असे. मौर्य साम्राज्य त्याकाळी संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेलं होतं. भौगोलिक दृष्ट्या ते मोगल साम्राज्यापेक्षा मोठं होतं. भारतीय इतिहासात मौर्य आणि त्याच्या वंशजांनी दीडशे वर्षांहून अधिक काळ चाणक्याच्या सिद्धांताला अनुसरून सत्ता राबविली. हा एक विक्रमच म्हणायला हवा. चाणक्य हे तक्षशिलाचे विद्यार्थी होते आणि पुढे ते इथले प्राचार्यही बनले.

*सर्वांगीण अभ्यासक्रम*
चाणक्याच्या ग्रंथात, 'अर्थशास्त्रा'त शासकाचं कर्तव्य, निर्णयशक्तीची क्षमता, साम-दाम दंड-भेदाची कुटनीती, युद्धकला, वाटाघाटीची कला, नगरशासन, वाणिज्य, कायदा, कृषी, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रासाठीचे, त्याचबरोबर सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. या त्यांच्या सर्व विषयांची धोरणं आणि नीती यांच्या केंद्रस्थानी नागरिकांचा उत्कर्ष, विकास, आणि देशाची सुरक्षा हेच राहिलेलं आहे.

*पुरातत्व खातेही अनभिज्ञ*
'अर्थशास्त्र' या ग्रंथात मौर्य साम्राज्यातील विशाल संख्यने असलेल्या संख्याबाबत आणि त्याच्या अस्तित्वाबाबत चाणक्य म्हणतात, "केवळ संख्या हीच महत्वाची नसते शिस्त आणि योग्य नेतृत्व नसेल तर उलट संख्याबळ हे ओझंच ठरतं.
चाणक्य यांच्यासारखे महाज्ञानी, विद्वान आणि तक्षशिला सारख्या महान विद्यापीठाबाबत पाकिस्तान सरकार जशी उपेक्षा करते आहे तशीच उपेक्षा इथले इतिहासकार, इथले पुरातत्व विभाग हेही करताहेत. पाकिस्तान पुरातत्व विभागाच्या वेबसाईटवर याची साधी दखल घेतली गेलेली नाही मग विस्तृत माहिती तर लांबच! याची खंत या लेखात सैफ ताहीर यांनी व्यक्त केलीय. शासन आणि तज्ञांच्या पातळीवर असे असेल तर तिथल्या सामान्य नागरिकांना काय कळणार? ते याबाबत अजाण आहेत.  तिथल्या 'पाकिस्तान हिंदू कौन्सिल' या संस्थेचे आधारस्तंभ असलेले डॉ. रमेशकुमार वाकवाणी यांनी तक्षशिला विद्यापीठाची पुन्हा नव्याने निर्मिती करावी अशी मागणी पाकिस्तान सरकारकडे केलीय. ते शक्य नसेल तर इथल्या एखाद्या विद्यापीठाला 'तक्षशिला' चे नाव द्यावं असे सुचविले आहे. पण पाकिस्तानातील विद्वान, बुद्धिजीवी, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ यापैकी कुणीही याला पाठींबा दर्शविला नाही.पाकिस्तानच्या कोणत्याच अभ्यासक्रमात ना तक्षशिला आहे ना चाणक्य!

*तक्षशिला : मोहरा मुराडू*
तक्षशिला विद्यापीठ जिथं होतं ते 'मोहरा मुराडू' हे निसर्गरम्य गाव आहे. चहूबाजूला हिरवंगार डोंगर, निसर्गाचं वरदान असलेल्या या गावात भग्नावस्थेतील काही इमारती आहेत. हे गाव हेरिटेज गाव म्हणून ओळखलं जातं, तक्षशिला विद्यापीठाच्या इथल्या काही मठावर, बौद्ध स्तुपावर 'युनेस्को'नं संरक्षित म्हणून लेबल लावले आहेत. तालिबान प्रभावित कट्टरपंथीयांनी अफगणिस्तानमधील बौद्ध गुफा जशा बॉम्बने उध्वस्त केल्या होत्या त्याप्रमाणेच या तक्षशिलाच्या अवशेषांना भय आहे. जिथे सरकारला आणि पाकिस्तानी जनतेला या गोष्टी जाणून घेण्यात रस नाही मग त्याचे संरक्षण करण्याची बुद्धी त्यांना कुठून येणार?

*पाकिस्तानी खूपच कमनशिबी*
सैफ ताहीर यांनी अत्यंत निर्भिडपणे लिहिलंय की, चाणक्याना पाकिस्ताननं अगदी अस्पृश्य मानलंय. याचं कारण असं ही असू शकेल की, चाणक्यची मनोभूमिका ब्राह्मणवादी आणि हिंदू संस्कृतीचं प्रतिनिधित्व करीत होतं. 'द इनसेस सागा' या ग्रंथात पाकिस्तानी इतिहासकार ऐताज अहेसान अत्यंत कष्टी होऊन लिहतात की, पाकिस्तान सरकार आणि लोक हे स्वतंत्र ओळखीची आणि मानचिन्हाची सतत उपेक्षा करीत आले आहेत. हे पाकिस्तानसाठी खूपच कमनशिबी म्हणावं लागेल. खोटा प्रचार आणि मनघडत दंतकथांना इतिहास म्हणून खपवून आपल्याच हाती आपणच बेड्या घालून घेतल्या आहेत. आता जे आपण पाकिस्तानात पाहतो आहोत ते पाकिस्तान निर्माण करणाऱ्यांच्या स्वप्नातील पाकिस्तान नाही. पाकिस्तानातल्या सगळ्या समस्यांचं मूळ हे त्यांची उभी केलेली खोटी प्रतिमाच आहे.'

*भारत सरकारनं लक्ष द्यावं*
पाकिस्तानची जगभरातील प्रतिमा बदलून उज्ज्वल करायची असेल तर त्याच्या भूमीवर एका जमान्यात विस्तारलेल्या बिगर मुस्लिम इतिहासाला स्वीकारायला हवाय. चाणक्य सारखा विद्वान पाकिस्तानच्या भूमीवर होता. हे इथल्या नव्या पिढीला ज्ञात करून द्यायला हवीय. नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू करायला काय हरकत आहे? असं त्या लेखात सैफ ताहीर यांनी म्हटलंय. ते त्यात म्हणतात, हडप्पा, मोहोन्जोदडो, तक्षशिला, सिंधू संस्कृती अशांचे अवशेष पाकिस्तानात आहेत. ज्यात भारत, हिंदू संस्कृती, हिंदुधर्मातील दुर्लभ स्थापत्यकार, सिद्धी, कर्तृत्व दिसून येतंय. हे सारे अवशेष पाकिस्तानात आहेत. त्याची उपेक्षाच नव्हे ते संरक्षणाबाबतचाही धोका आहे..... आपल्या वर्तमान भाजप सरकारनं भारतासाठीचा हा अमूल्य आणि दुर्लभ ठेवा सन्मानपूर्वक राखण्यासाठी युनेस्कोच्या या प्रकल्पावर भारताचा प्रतिनिधी ठेऊन करता येईल.

-हरीश केंची

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...