Sunday 24 September 2017

भगवानगड: भाषण आणि भांडण




*भगवानगड*
*भाषण आणि भांडण*

"सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक श्रद्धा-प्रेरणास्थानं ही राजकारण्यांच्या शह-काटशहांच्या खेळीचे अड्डे बनले आहेत. भगवानगड इथंही हा त्याच प्रकारचा फड गाजतो आहे. गोपीनाथरावांनंतर त्यांच्या कन्या-पुतण्याने आपल्या राजकारणासाठी 'वंजारी तितुका मेळवावा' असा जातीचा गडसुद्धा भगवानगडाच्या आडून बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. आणि  त्यावर आपलंच वर्चस्व असावं यासाठीचा हा झगडा आरंभलाय. माणसाला अध्यात्म कळलं, तर हे जग काय? त्यात आपलं स्थान काय? या सर्वांची जाणीव होईल असं हरिचिंतन सांगतं. या अध्यात्माचा सोयीचा अर्थ लावत त्यात आपलं जातीतील आणि राजकारणातलं स्थान पक्क करण्याचा हा दुबळा प्रयत्न म्हणायला हवं!"
-------------------------------------------

 *द*सरा, विजयादशमीचं समाजजीवनात अन्यन्यसाधारण असं आध्यात्मिक, पौराणिक महत्व आहे. ह्या निमित्तानं सामाजिक आणि राजकीय पातळीवर अनेक सोहळे होतात. रावणदहनाबरोबरच नागपूरला दीक्षाभूमीवर होणारा धम्मपरिवर्तनदिन, मुंबईत शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा मेळावा हे विशेष महत्वाचे होते, पण गेल्या काही वर्षांपासून भगवानगडावर होणारा सोहळा देखील चर्चेत राहिला आहे. भगवानगड हे आध्यात्मिक स्थळ! पण अध्यात्माचा सोयीचा अर्थ लावत भगवानगडाच्या माध्यमातून आपलं जातीतलं आणि राजकारणातलं स्थान पक्क करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आरंभला होता. त्यांच्या निधनानंतर आता त्यांची कन्या पंकजाताई मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे हे दोघे आपलं जातीतलं आणि राजकारणातलं स्थान पक्कं करण्यासाठी भगवानगडाच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करताहेत. या दोघांच्या वादात भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी उडी घेतलीय.

*महंतांची ऑडिओ व्हायरल*
भगवानगड फक्त भाषणांपुरता आणि भांडणापुरता मर्यादित राहायला नको. त्याच एक स्वतंत्र अस्तित्व असून, तिथं फक्त भगवानबाबांचं नाव असावं. भगवानगड सुरक्षित रहायला हवा, यासाठी गडावरून कोणाचं राजकारण नको, असं मत भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी नुकतंच व्यक्त केलं आहे. राजकारणाचे जुने अनुभव वाईट आहेत. त्याचं दुःख मनात असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं शास्त्री म्हणतात. या संदर्भात "भगवान गडाची ३५० एकर जमीन आहे. त्याला धोका पोहोचू शकतो," असं वक्तव्य नामदेवशास्त्री करत असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालीय, त्या जमिनीचा काय मुद्दा आहे समजून सांगताना ते म्हणतात. 'औरंगाबादमध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था लोकशिक्षणासाठी भगवानबाबांनी उभारली होती. मिल कॉर्नर इथं संस्थेची जागा होती. अजब नगर इथं आजही दहा गुंठे जागा आहे. जिथं अनेक जणांनी शिक्षण घेतलं. त्या संस्थेची जागा भीमसिंग महाराज गादीवर असताना बळकविण्यात आली. आता भगवानगड सुरक्षित राहायला हवा, यासाठी म्हणून कोणत्याही राजकीय नेत्याला गडावर भाषणबाजी नको, अशी भूमिका आम्ही घेतलीय.'

*बाबांचं अस्तित्व राहायला हवं*
गोपीनाथ मुंडेंना गडावर भाषणं होत होती, मग इतरांची का नकोत?  याबाबत त्यांचं म्हणणं 'इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गोपीनाथ मुंडे यांची भाषणं जर आपण ऐकली तर लक्षात येईल की, ते स्वतःला भगवान बाबांचा भक्त मानत होते. मात्र इतरांची तशी भाषा नाही. गडावर वारसा सांगितला जातो आहे. ही बाब योग्य नाही. मी गडाचा पहारेकरी आहे. त्यामुळे गडाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला. त्याचा फायदा देखील गडाला होतो आहे.' वर्षभरात गडाचे भक्त वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ४० टक्के मराठा समाज गडाचा शिष्य आहे. ८२ पैकी ४० सप्ताह मराठा समाज बहुसंख्य असलेल्या गावात झाले. त्यामुळे एक धार्मिक भावना जपत गडाची वाटचाल झाली पाहिजे. भगवानबाबाच्या गादीचा विसर पडत कामा नये. आळंदी, पैठण या सारख्या इतर धार्मिक स्थळांप्रमाणे भगवान गडाचे अस्तित्व असलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. भगवानगडाचा बहुसंख्य भक्त ऊसतोड कामगार आहे. हा वर्ग कागदोपत्री घोडे नाचवत नाही. त्यांना जर निर्णय आवडला नसता, तर त्यांनी ‘शो’ दाखवला असता. एक वर्ष झालं गड शांत आहे. निर्णय मान्य नसता तर ती शांतता राहिली नसती. भक्त संख्या वर्षभरात चाळीस टक्क्याने वाढलीय. बहुसंख्याने मराठा समाज असलेल्या अनेक गावांत सप्ताह झाले. गडावर येणाऱ्या पायी दिंड्या ज्या मध्यंतरी बंद झाल्या होत्या. त्या पुन्हा सुरु झाल्यात. भगवानगड भाषणापुरता आणि भांडणापुरता मर्यादित राहायला नको. त्याच एक स्वतंत्र अस्तित्व असून, तिथं फक्त भगवान बाबांचं नाव असावं. म्हणून तो निर्णय घेतला.

*गडाच्याआडून राजकारण*
पंकजाताई मुंडे यांना गडावर भाषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे यांना कसं भाषण करू दिले जाईल? आरोप प्रत्यारोप राजकारणाचा भाग आहे. माझे एवढंच सांगणं आहे, भाविकांच्या मतांसाठीचं हे राजकारण आहे. असं स्पष्ट मत नामदेवशास्त्री व्यक्त करतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल.

*भगवानबाबांचा गड!*
अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सीमेरेषेवरील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी तालुक्याच्या परिसरातील 'भगवानगड' हे एक आध्यात्मिक स्थान म्हणून ओळखलं जातं. भगवानबाबांनी हा गड विकसित केला म्हणून हा भगवानगड! भगवानबाबा हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील 'सुपे सावरगाव'चे! त्यांचं लहानपणीचं नांव आबाजी. लहानपणीच हा घरच्यांना कुणालाच न सांगता पंढरीच्या वारीत गेलास आणि वारकरी झाला. पुढे तो बीड जिल्ह्यातील नारायणगडावरील माणिकबाबांचे शिष्य बनले. माणिकबाबांसमवेत ते या गडावरच राहू लागले. एकदा बंकटस्वामी या गडावर आले असता भगवानबाबांना ते आळंदीला वारकरी सांप्रदायाच्या शिक्षणासाठी घेऊन गेले. आळंदीत बारा वर्षे अभ्यास करून आल्यानंतर भगवानबाबांनी पुन्हा आपलं आध्यात्मिक काम सुरु केलं. जत्रांमध्ये होणाऱ्या प्राणी हत्येविरोधात जागृती करण्याचं काम त्यांनी सुरु केलं. असा उल्लेख 'राजयोगी महंत भगवानबाबा' ह्या राजकुमार घुले यांनी लिहिलेल्या पुस्तकात केला आहे. कालांतरानं भगवानबाबा यांना त्रास सुरु झाला. मग त्यांना नारायणगड सोडावा लागला. त्यावेळी त्यांच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. असं सांगितलं जातं की, नारायणगडावर त्यांच्या अंथरुणात महिलेची चोळी दडवून ठेऊन त्यांच्या चारित्र्यहनांनाचाही प्रयत्न झाला. या घटनेनं भगवानबाबा इतके व्यथित झाले की, त्यांनी स्वतःच लिंग कापून स्वतःला सिद्ध केलं.

*भक्तीचा गड: भगवानगड*
भगवानबाबा हे पुढे पंढरी व सध्याच्या भगवानगडावर आले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते तिथंच राहिले. या गडाचा विकास त्यांनी केला. हा गड पांडवांचे गुरु धौम्यऋषी यांच्या नावानं ओळखला जात होता. भगवानबाबांना हे स्थान आवडलं. त्यामुळं त्यांनी इथं भक्तीचा गड उभारला असं या गडाचं माहात्म्य सांगितलं जातं. हा गड विकसित केल्यानंतर १ मे १९५८ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन झालं. गड म्हणजे तिथं विठ्ठलाचं मंदिर आणि दगडी संरक्षण भिंत आहे. या गडाचं उद्घाटन करताना यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, 'आपल्याला वाटलं की हा गड म्हणजे सिंहगड, प्रतापगड, रायगड यासारखा गड असेल, परंतु हा भक्तीचा, श्रद्धेचा गड आहे. चव्हाण यांनीच सर्वप्रथम 'भगवानगड' हे नांव उच्चारलं आणि पंढरीगडाचं भगवानगड असं नामकरण झालं.

*भीमसिंह उत्तराधिकारी*
१८ जानेवारी १९६५ ला पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये भगवानबाबांचं निधन झालं.त्यानंतर त्यांची समाधी भगवानगडावर बांधण्यात आली.उत्तराधिकारी नेमल्याशिवाय महात्म्याचा पुढील विधी करता येत नाही, अशी प्रथा असल्यानं या गडावर त्यांचे शिष्य भीमसिंह यांना उत्तराधिकारी नेमण्यात आले. भगवानबाबा हे वंजारी समाजाचे पण त्यांच्या डोक्यात 'जात' नव्हती. त्यांचे उत्तराधिकारी भीमसिंह हे रजपूत समाजाचे होते. भीमसिंह महाराजांच्या निधनानंतर सध्या नामदेवशास्त्री हे या गडाचे महंत आहेत. ते बाबांचे नातलगच आहेत.

*राजकीय पंढरीला सुरुवात*
अंधश्रद्धा, शिक्षण, भक्तिमार्ग, स्वातंत्र्यसंग्राम, अनिष्ट रूढी-परंपरा अशा अनेक विषयांवर काम करताना भगवानबाबांनी 'पंढरी: या गडाचा विकास केला. परंतु त्यांचे भक्त म्हणविणाऱ्यांनी हा गड राजकीय 'पंढरी' बनवण्यास सुरुवात केली. भगवानबाबांना वंजारी समाजासह सर्व जातीपाती मानतात; परंतु त्यांना वंजारी समाजापुरतं मर्यादित करुन आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे सतत करीत होते.

*राजकीय भाषणे*
भगवानगडावर दसऱ्याच्या सणाला भाविकांची पूर्वीपासून गर्दी होते. मुंडेंनी चलाखीनं ही गर्दी 'दसरा मेळाव्या'त परिवर्तित केली. या पट्टयात ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येनं आहेत. यात बहुसंख्य वंजारी समाज आहे. या सगळ्या भाविकांच्या भावनांचा फायदा उठवत 'दसरा मेळाव्या'त गर्दी जमवून मुंडेंनी शक्तीप्रदर्शनाचा उद्योग आरंभला. 'आपण या गडावर भक्तीपोटी येतो.' असं ते म्हणत. मात्र भाषण मुख्यमंत्री बनण्याचं ठोकत आणि विरोधकांवर टीका करीत. 'मला या गडावरुन मुंबईत दिसते.' असं त्यांनी एकदा भाषणात सांगितलं होतं. त्यापूर्वी एकदा 'दिल्ली दिसते' असंही ते म्हणाले होते. त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांची कन्या पंकजाताई आणि धनंजय मुंडे करताहेत पंकजाताईंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ 'गोपीनाथ गडा'ची निर्मिती केली, तरी देखील त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे भगवानगडावर भाषण ठोकायचं आहे. त्याला नामदेवशास्त्री यांनी विरोध करताहेत. धनंजय मुंडे आज नामदेवशास्त्रीच्या भूमिकेचं स्वागत करताहेत ते राजकीय हेतू ठेवूनच. पण त्यांनाही गडावर यायचं आहे, भाषण ठोकायचं आहे.

*सर्वपक्षीय राजकीय फड*
काही वर्षांपूर्वी गोपीनाथरावांनी एक सर्व पक्षीय मेळावा भरवला होता. मुंडे यांच्यासह छगन भुजबळ, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, अशी राजकीय पलटणचं गडावर जमली होती. विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांप्रमाणेच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी गोविंद कुलकर्णी असे 'जातीय' मंडळी हजर होती. त्या सर्वांनी मुंडे यांचे गोडवे गात  त्यांच्या मोठेपणासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पण पतंगरावांनी मात्र गोपीनाथराव यांना आपल्या भाषणातून चिमटे काढत मुंडेंना भगवानगडावर वारसा सांगू नका असं बजावलं होतं.

*मुख्यमंत्र्यांना साकडं*
भगवानबाबांवर आध्यात्मिक संस्कार करणारे माणिकबाबा आणि बंकटस्वामी हे वंजारी नव्हे तर मराठा समाजाचे होते. त्यामुळे नामदेवशास्त्री म्हणतात तसं त्यांना हा गड सर्वजातीय भक्तांचा असावा; त्याच भूमिकेतून त्यांनी मुंडे बहीण-भावाला गडावर यायचं आमंत्रण दिलंय मात्र इथं भाषणबाजी होऊ नये अशी अपेक्षा करतात. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भाषणबंदीसाठी साकडं घातलंय. मुख्यमंत्र्यानी त्यादृष्टीनं हालचाली सुरू केल्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी.

*सोयीचा अर्थ लावला*
सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक श्रद्धा-प्रेरणास्थानं ही राजकारण्यांच्या शह-काटशहांच्या खेळीचे अड्डे बनले आहेत. भगवानगड इथंही हा त्याच प्रकारचा फड गाजतो आहे. गोपीनाथरावांनंतर त्यांच्या कन्या-पुतण्याने आपल्या राजकारणासाठी 'वंजारी तितुका मेळवावा' असा जातीचा गडसुद्धा भगवानगडाच्या आडून बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. आणि  त्यावर आपलंच वर्चस्व असावं यासाठीचा हा झगडा आरंभलाय. माणसाला अध्यात्म कळलं, तर हे जग काय? त्यात आपलं स्थान काय? या सर्वांची जाणीव होईल असं हरिचिंतन सांगतं. या अध्यात्माचा सोयीचा अर्थ लावत त्यात आपलं जातीतील आणि राजकारणातलं स्थान पक्क करण्याचा हा दुबळा प्रयत्न म्हणायला हवं!

-हरीश केंची,
८७८८२११६८९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...