*सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे जनक*
*प्रबोधनकार ठाकरे*
"प्रबोधनकारांना ही गोष्ट फार लागली. लोकांनी एकत्र यावं, समाजाच्या भल्याचा विचार करावा, त्यासाठी जमेल तसा, जमेल तेवढा आचारही करावा, आधी तीव्र तळमळ असल्यानं प्रबोधनकारांनी या उत्सवाला पर्याय शोधला. जिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तद्वार आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्यदेवतेचा.... मायभवानीचा नवरात्र उत्सव सार्वजनिक स्वरूपात का होऊ नये? शिवकाली घराघरात, गडागडावर होणारं मायभवानीचं नवरात्र बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी वापरायचा संकल्प केला. त्यासाठी 'लोकहितवादी संघ' स्थापला गेला आणि श्रीशिवभवानी नवरात्र महोत्सव दादरमध्ये सुरू झाला. मुंबईत वा महाराष्ट्रात तोपर्यंत कुठेही असा नवरात्र महोत्सव झाला नव्हता. मऱ्हाठी जनतेनं हा उत्सव उचलून धरला. या पहिल्या नवरात्र उत्सवाचं प्रबोधनकारांनीच जे शब्दचित्र उभं केलं आहे ते त्यांच्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्रात प्रत्यक्ष वाचल्यावर त्यांची कल्पकता आणि कार्यशक्ती केवढी विलक्षण होती याची साक्ष मिळेल. जे समाजघटक आपण हिंदू आहोत असं कधी अभिमानानं म्हणू शकत नव्हते, आपली पायरी सोडू नका असा संभावित उपदेशच ज्यांना सदैव ऐकावा लागत होता त्या समाजघटकांना स्वाभिमान आणि सन्मान देण्याचं, त्यांचं हिंदुत्वाशी असलेलं जन्मसिद्ध नातं ठोकून ठाकून सोवळेवाद्यांना पटवून देण्याचं काम प्रबोधनकारांनी या नवरात्र उत्सवाद्वारे केलं."
----------------------------------------
*कों*बडा जसा डोक्यावर तुरा मिरवतो तसं हिंदुत्व मिरवणारी काही मंडळी सध्या दिसत आहेत. हिंदुत्व हे खरं तर धमन्यातून वाहणाऱ्या रक्तांसारखं हवं. ते असायला हवंय, दिसायला मात्र हवंच असं मात्र नाही. अंगात रक्त आहे हे दाखविण्याचे मार्ग वेगळे आहेत. कडकड कडे वाजवत फडफड फडाड आसूड स्वतःवरच उडवत, दाभणानं दंडाला भोसकून रक्ताच्या चिळकांड्या उडवणाऱ्या कडकलक्षम्या रस्त्याने कधी मधी फिरतात. भाबड्या बायाबापड्या त्यांना नमस्कार करतात. चार पैसेही देतात. हिंदुत्वाच्या अशा कडकलक्षम्या असाव्यात असं कुणालाच वाटणार नाही. पण सध्या हिंदुत्वाचं प्रदर्शन करण्याची क्रेज आहे, हे नाकारता येणार नाही. देशाचे सर्वच ठिकाणी भगवं राज्य आल्यानंतर तर याला उभारीच आलीय. ज्यांनी कधी आपण कोण आहोत याचा विचारसुद्धा केला नव्हता अशी पैसा हाच देव, पैसा हाच धर्म मानणारी धंदेवाईक माणसंही आज हिंदुत्वाचा प्रदर्शनपूर्वक कैवार घेत आहेत. हिंदुत्वाचा भाव वधारला आहे ह्याचंच हे लक्षण! हिंदुत्वाचा शेअर अंबानीच्या शेअरसारखा तेजीत आहे. रात्रभर दांडिया-गरबा खेळला जाण्यात हिंदुत्व आहे. ध्वनिक्षेपक रात्री लवकर बंद करा असं सांगणं हा हिंदुत्वावर अन्याय आहे. असे नको तिथं हिंदुत्व दाखवून हिंदुत्वाला सवंग बनवत आपलं स्वतःचा भाव वाढवून घेणारे गल्लीगल्लीत उगवत आहेत.
*लोकांची सहनशीलता*
दहा दिवस गणपती झाले. विजेचा लखलखाट आणि ध्वनिक्षेपकावर बडविल्या जाणाऱ्या बडवेबाज गाण्यांनी लोकांची टाळकी पिकवली. आता अंबामातेचे तरुण भक्त, शक्तीपूजक सिनेमांच्या गाण्यावर थिरकतील. रात्र जागवतील. सहामाही परीक्षा सुरू आहेत....परीक्षा गेल्या खड्डयात! दिवसभर दमल्यानंतर रात्री जरा शांतता....बसा बोंबलत! आमच्या घरात आजारी आहेत.... आई जगदंबा काळजी घेईल! पोलिसात तक्रार द्यावी लागेल....लई शाना होऊ नकोस, पोलीस आपल्याला हात लावू शकत नाहीत! हे सगळे वाद संवाद सगळीकडेच होत आहेत. अवघ्या नऊ रात्रीचा प्रश्न! हिंदुत्वासाठी एवढंही तुम्ही सहन करू शकत नाही? असंही बोलणारे आहेत.
*भगवे आणि केशरी*
'भगव्यां'नी गणपती यंदा लई पॉवरमध्ये केले. नवरात्री सुपरपॉवरमध्ये व्हायलाच हव्यात अशी ईर्षाही 'केशरी'वाल्यांमध्ये दिसते आहे. देशभरातील राजकीय वातावरण 'केशरी' असल्यानं महाराष्ट्रातले छगन-मगनसुद्धा डोक्याला केशरी पट्टया आवळायला लागलेत. श्रीगणेश आणि अंबामाता ह्यांच्या कृपेनं शहरात, गावात सगळीकडं हिंदुत्वाचा झेंडा फडफडतोय. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही आणि कानात बोळे कोंबूनही ध्वनिक्षेपकावरून येणारा ठणठणाट थांबत नाही म्हणून मराठी माणूस तडफडतोय. गणपती आणि नवरात्रौत्सव हे दोन्ही उत्सव आज अशा थराला आलेत की, त्यांच्याबद्धल समाजाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या उत्सवापासून होणारा उपद्रव कमी करता येणार नाही? तरुणांना मोकळेपणानं एकत्र येता यावं, त्यांच्यामध्ये निरोगी अशी जवळीक साधावी. देवाधर्माच्या साक्षीनं हे घडलं तर गैर गोष्टी घडण्याची शक्यताच कमी, हे सगळं मान्य. पण आज ह्या भावनेचं या उत्सवात दर्शन होतं का? समाजकंटक म्हणून ज्यांचा उल्लेख जनता येईल अशा मंडळींचा या उत्सवांवर वरचष्मा आहे हे अमान्य करता येईल? चाळीतून, वाड्यावस्तीतून, सोसायट्यातुन गृहस्थी मंडळी एकत्र येऊन मर्यादीतपणे जो उत्सव साजरा करतात त्याच्याबद्दल कुणीच वाईट बोलणार नाही. पण हा उत्सवसुद्धा 'धंदो छे' म्हणून वागणाऱ्यांचं काय? समाजकार्याची सफेदी फासून लक्षावधी रुपयांचा मन मानेल तसा चुराडा करणारे, परिसरातल्या सरळमार्गी नागरिकाला ओलीस धरून उपद्रव देणारे किती काळ हा धिंगाणा घालणार आहेत आणि हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर मिरवणारे किती काळ हे असंच चालू देणार आहेत?
*बेलभंडार उचलायला हवा*
देवधर्म असा सवंग होऊन समाजातल्या अपप्रवृत्तीच समर्थ करणार असेल तर ह्या उत्सवाच्या मूळ हेतूच धुळीला मिळेल. उनाडटप्पू लोकांना हवा तो धिंगाणा घालायला संधी प्राप्त व्हावी म्हणून हे उत्सव सुरू झाले नव्हते. ते सुरू करणाऱ्यांनी काही आदर्श डोळ्यासमोर ठेवले होते. ते आदर्श कचऱ्याच्या पेटीत टाकून या उत्सवाचे धिंगाणे जिथे होतात तिथे ताठ मानेने उभे होऊन हा धिंगाणा थांबविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव यांना आलेलं स्वरूप बदलण्यासाठी सत्तेचं चाटण मिळालेल्या आणि हिंदुत्व विसरलेल्यांकडून कुणी अपेक्षा करणार नाही. पण बंडखोरी आणि अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभे होण्याची ईर्षा ज्यांच्या आहे अशा मऱ्हाठी बाण्याच्या मंडळींकडून मऱ्हाठी समाजाच्या निश्चित अपेक्षा आहेत. त्यांनी तरी नवरात्र उत्सवाला वळण लावण्यासाठी बेलभंडार उचलून हर हर महादेव करायला हवा. कारण मायभवानीचा हा नवरात्रौत्सव मुंबईसह महाराष्ट्रात सामाजिक एकता साधण्यासाठी सार्वजनिकरित्या सुरू करण्यात पुढाकार होता 'ज्याची लंगोटी स्वच्छ तो कुणाला भिणार आणि कुणाची पर्वा करणार?' असं ठणकवणारे बेडर समाजसुधारक, संघटक आदरणीय प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा!
*...तर गणेशमूर्ती फोडीन !*
१९२६ मधली ही घटना आहे. दादरला टिळक पुलाच्या पायथ्याजवळ सार्वजनिक गणेशोत्सव व्हायचा. या उत्सवात स्पृशांबरोबरच अस्पृश्यानाही गणेशमूर्तीची पूजा करता यावी यासाठी काही तरुणांनी प्रयत्न चालविले. हिंदुत्वाचं सोवळं सांभाळण्यासाठीच आपला जन्म आहे असा अहंकार बाळगणाऱ्यांनीं या गोष्टीला विरोध दर्शविला. त्यातल्या काही तरुणांनी प्रबोधनकारांची भेट घेतली. त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रबोधनकार ठाकरे पुढे आले. त्यांनी उत्सवातील काही मंडळींची भेट घेतली, उत्सवासाठी वर्गणी देणाऱ्या साऱ्यांचा पूजेवर हक्क आहे असं त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण उपयोग होत नाही असं लक्षात येताच ठाकरे कडाडले. 'अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेश पूजनाचा हक्क मिळणार नसेल तर मी स्वतः गणपतीची मूर्ती फोडून टाकीन अशी गर्जना केली. मातीच्या मूर्तीपेक्षा जिता जागता माणूस मोठा आहे असं मानणाऱ्या प्रबोधनकारांच्या या बंडखोरीने सोवळी सांभाळणारे गडबडले! डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रावबहादूर बोले यांना बोलावून काही मार्ग काढण्यासाठी धावपळ झाली. आणि मग एका अस्पृश्याने स्नान करून ओलेत्याने एक पुष्पगुच्छ ब्राह्मण पुजाऱ्याला शिवून त्याच्या हातात द्यावा व पुजाऱ्याने तो विनातक्रार गणपतीला वाहावा अशी तडजोड निघाली.
*उत्सवच बंद करून टाकला*
मडकेबुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलिताने आंघोळ करून पुजाऱ्याच्या हातात गुच्छ दिला. तो गणपतीला वाहण्यात आला. ही फार मोठी सामाजिक क्रान्ती होती.हिंदुत्वाला ग्रासणाऱ्या शतकानुशतकांच्या रूढी-परंपरेच्या बेड्या धडक मरून तोडणारी प्रबोधनकारांसारखी आणखी हजारभर माणसं जर महाराष्ट्रात होती तर आजही ऐतखाऊ बुरसटलेल्या मंडळींच्या कफनीच्या कफनात घुसमटत पडलेले हिंदुत्व कधीच मुक्त झालं असतं. कोट्यवधी दलितांना आपण दुरावला नसतो. पण देवापुढे, सारे समान हा प्रबोधनकारांनी घालून दिलेला धडा सोवळं सांभाळणाऱ्यांना मान्य झाला नाही. आता दरवर्षीच अस्पृश्य पूजा करणार, देव बाटणार, धर्म बुडणार असा कांगावा करून त्यांनी गणेश उत्सवच बंद करून टाकला.
*नवरात्रौत्सवाची सुरुवात*
प्रबोधनकारांना ही गोष्ट फार लागली. लोकांनी एकत्र यावं, समाजाच्या भल्याचा विचार करावा, त्यासाठी जमेल तसा, जमेल तेवढा आचारही करावा, आधी तीव्र तळमळ असल्यानं प्रबोधनकारांनी या उत्सवाला पर्याय शोधला. जिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तद्वार आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्यदेवतेचा.... मायभवानीचा नवरात्र उत्सव सार्वजनिक स्वरूपात का होऊ नये? शिवकाली घराघरात, गडागडावर होणारं मायभवानीचं नवरात्र बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी वापरायचा संकल्प केला. त्यासाठी 'लोकहितवादी संघ' स्थापला गेला आणि श्रीशिवभवानी नवरात्र महोत्सव दादरमध्ये सुरू झाला. मुंबईत वा महाराष्ट्रात तोपर्यंत कुठेही असा नवरात्र महोत्सव झाला नव्हता. कुलाबा ते कल्याण आणि पालघरपर्यंतच्या मऱ्हाठी जनतेनं हा उत्सव उचलून धरला. या पहिल्या नवरात्र उत्सवाचं प्रबोधनकारांनीच जे शब्दचित्र उभं केलं आहे ते त्यांच्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्रात प्रत्यक्ष वाचल्यावर त्यांची कल्पकता आणि कार्यशक्ती केवढी विलक्षण होती याची साक्ष मिळेल.
*उत्सवात सुधारणा हवी*
जे समाजघटक आपण हिंदू आहोत असं कधी अभिमानानं म्हणू शकत नव्हते, आपली पायरी सोडू नका असा संभावित उपदेशच ज्यांना सदैव ऐकावा लागत होता त्या समाजघटकांना स्वाभिमान आणि सन्मान देण्याचं, त्यांचं हिंदुत्वाशी असलेलं जन्मसिद्ध नातं ठोकून ठाकून सोवळेवाद्यांना पटवून देण्याचं काम प्रबोधनकारांनी या नवरात्र उत्सवाद्वारे केलं. म्हणूनच निदानपक्षी महाराष्ट्रात होणारा हा नवरात्र उत्सव बाजारू धिंगाणा न होईल याची दक्षता शिवसेनेनं घ्यावी असं मला वाटतं. 'फुकटचे सल्ले देऊ नका' हे ऐकण्याची तयारी ठेवूनच हे अत्यंत नम्रपणे मी सुचवितो आहे. कारण एकलव्याचा निष्ठेनं प्रबोधनकारांच्या विचारांचे, निर्भीड पत्रकारितेचे धडे मी घेतलेत.
*नवनिर्माणाची खात्री*
कोट्यवधी दलित हे भारताचं एक शक्तीस्थान आहे. त्यांना धिक्कारून, डावलून अथवा दडपून ठेऊन भारताचं, हिंदुत्वाचं, समाजाचं भलं होणार नाही. बुद्ध, आंबेडकरच नव्हेत, त्यांना मानणारे सारे दलित आमचेच आहेत. मंदिराचीच नव्हे, आमच्या हृदयाची दारंही त्यांच्यासाठी सदैव खुली आहेत. त्यांना सन्मान लाभावा, समृद्धी लाभावी, यासाठी आम्ही प्रसंगी अपमानही सोसू. आम्ही त्यांना अव्हेरणार नाही अशी उदारता जाणीवपूर्वक हिंदूंनी दाखवावी म्हणून फुले, गांधी, सावरकर, माटे मास्तर, साने गुरुजी व इतरेजन जीवनभर झटले. पण त्याचं महत्व अद्याप पटलेलं नाही. दलितांच्या नावावर जगणाऱ्या काही नेत्यांचं सोडा, ज्यांना आडवाटेनेच जायचं आहे त्यांना खुशाल त्या वाटेनं जाऊन घ्यायचा तो अनुभव घेऊ दे. पण ज्यांना आजही जगायचं कसं एवढी एकच चिंता सदासर्वदा पोखरते आहे त्यांच्या मनात आपण विश्वास जागवणार आहोत की नाही? गणेशोत्सव, नवरात्रौत्सव करणारे यासाठी काही करू शकणार नाहीत काय? ते नक्कीच करू शकतात. लक्षावधीची रोषणाई, अर्थशून्य गाण्यांचा ध्वनिक्षेपकावरून अविरत मारा आणि जल्लोष, हैदोस हे आजच्या उत्सवाचं स्वरूप हे समाजाला लागलेल्या किडीचं लक्षण आहे. हिंदुत्वाचा अभिमान धरणाऱ्यांना तरी उत्सवाचं हे स्वरूप बदलण्याची आवश्यकता जाणवायला हवी. ते बदलणं हे तरुणांच्याच हाती आहे. ते नवं काही घडवतील, नवनिर्माण करतील अशी खात्री वाटते.
-हरीश केंची
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment