Saturday 30 September 2017

समाज सुसंस्कारित व्हावा

*समाज सुसंस्कारित व्हावा...!*

" आजच्या जाहिराती आणि चित्रपट युगात प्रत्येकजण स्त्रीला आपल्या आवडत्या चौकटीत बसवायला बघतो. मुलांना आई कशी हवी असते तर ती पावभाजी, डोसा, न्यूडल्स करणारी!, नवऱ्याला हवी असते जाहिरातीत दिसते तशी सुडौल बांधा, बॉबकटवाली!, सासऱ्यांना हवी असते सर्व विषयांवर बोलणारी, चर्चा करणारी,येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणारी सुसंस्कृत, स्मार्ट सून हवी असते!, सासूला हवी असते मसाले भाजणारी, पुरण-पोळ्या करणारी सुगरण!. नोकरीवर गेली की, बॉसला हवी असते घरातल्या अडचणी विसरून ऑफिसच्या कामात मग्न होणारी कर्मचारी. सगळ्यांना सांभाळता सांभाळता त्या स्त्रीला स्वतःचे कसे व्हायचे आहे हा विचारही मनी डोकवायला जागा उरत नाही. दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांतून आई कशी हवी, बायको कशी हवी, सून कशी हवी म्हणून कुणी जाहिरात करत नाही हे नशीब म्हणायचं!"
---------------------------------------------

*न*वरात्रीचा जागर हा स्त्रीशक्तीचा जागर! खरंच तसा तो असतो का? या काळात स्त्रीशक्तीचं खूप गुणगान गायलं जातं. पण प्रत्यक्षात स्त्री कशी उपभोग वस्तू आहे याचं चित्र जाहिरातीतून, दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांतून, चित्रपटातून रंगविलं जात असल्याचं आपण पाहतो. याबाबत कुणीच गांभीर्यानं घेताना दिसत नाही. समाज संवेदनाहीन बनला आहे.

*जाहिरातींचा अतिरेक*
दूरचित्रवाणी ही आता समाजाचा एक अविभाज्य अंग बनलं आहे.जगभरात घडलेल्या घडामोडी क्षणार्धात आपल्यासमोर मांडणारा हा 'ईडीयट बॉक्स' लोकांचा प्यारा बनला आहे; पण या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून समाजजीवनावर कोणता परिणाम होतो आहे. याचा खरा तर समाजशास्त्रज्ञानी विचार करायला हवाय. त्यावरून कोणते कार्यक्रम सादर होतात आणि कोणत्या दाखविल्या जातात. ही सध्या चिंतेची बाब आहे. या जाहिरातींचा एवढा प्रचंड मारा आहे की, या सर्व जाहिरातींच्या अनुषंगानं कार्यक्रम असावा असा भ्रम निर्माण होतोय. या उधाण आलेल्या जाहिरातीतून अनेक जाहिराती खरंच संस्कारक्षम असतात का हा संशोधनाचा विषय आहे. केवळ अंतरवस्त्रांच्याच जाहिरातींच नव्हे तर मासिक पाळीच्या अन कंडोमच्या जाहिरातींचा रतीब दररोज टाकला जातोय!

*जाहिरातीत बाई हवीच का?*
जाहिरात म्हटलं की, त्या जाहिरातीत बाई ही हवीच! मग त्या जाहिरातीत तिची गरज असो वा नसो! तेल अशी साबण असो की, आणखी काही त्यात सुंदर छबीकडी हवीच हवी. जणू काही बाई जितकी सुंदर तितकी मालाला मागणी मोठी! असं जाहिरात करणाऱ्याला वाटत असावं. जर जाहिरातील सुंदर बाया या गेल्या, तर त्या कुठं गेल्या अशी पुरुषांची आणि सगळ्या बघ्यांची अवस्था होईल. स्त्रीचं विकृत दर्शन... अंगप्रदर्शन घडविणाऱ्या जाहिरातींकडे महिला संघटनांनी लक्ष का देऊ नये? मध्यंतरी अशीच एक जाहिरात सुरू होती, गर्भप्रतिबंधक गोळ्यांची स्त्रीत्वाची विटंबना करणाऱ्या जाहिरातींकडे कसे लक्ष जात नाही? 'तू कधी किती वाजता संभोग केलास?' असा प्रश्न ती विचारतेय हे कशाचं लक्षण आहे? या बरोबरच जी गोष्ट स्त्रिया शक्यतो कुणाच्या लक्षात येऊ देत नाहीत. तिचं साग्रसंगीत प्रदर्शन जाहिरातीतून सध्या दिसतं. कोरडेपणा पटवून देण्यासाठी प्रात्यक्षिक दाखविण्याचा हा प्रकार कुणाला शहाणं करण्यासाठी? उद्या थेरडेपणा जाऊन जवानी कशी येते हे पटविण्यासाठी आणखी कसलं प्रात्यक्षिक हे जाहिरातवाले दाखवतील.

*महिला संघटना गप्प का?*
चित्रपटातल्या नटींनी जे नको ते दाखवलं म्हणून बोंब मारणाऱ्यांना सॅनेटरी नेपकिन्स-टॉवेल्सची कोरडी प्रात्यक्षिक खटकत नाहीत? दुरचित्रवणीपुढं लहान मुलं-मुली एकत्र बसलेली असतात. हे शहाण्यांना कळू नये? स्त्रियांना बेशरम बनविण्याचा वारसा आपल्याकडं आलाय असा अट्टाहास करून वावरणाऱ्या अतिशहाण्यांना आवरण्याची काही योजना महिला संघटनांकडे आहे का? हे वेळीच आवरलं नाही, तर उद्या दूरचित्रवाणीवरील कसल्या कसल्या जाहिरातीत काय काय दाखविलं जाईल हे सांगता येणार नाही. नंतर पाऊलखुणा शोधण्याऐवजी आधीच वाट निश्चित केलेली बरी!

*प्रत्येकाला स्त्री अशी हवीय*
आजच्या जाहिराती आणि चित्रपट युगात प्रत्येकजण स्त्रीला आपल्या आवडत्या चौकटीत बसवायला बघतो. मुलांना आई कशी हवी असते तर ती पावभाजी, डोसा, न्यूडल्स करणारी!, नवऱ्याला हवी असते जाहिरातीत दिसते तशी सुडौल बांधा, बॉबकटवाली!, सासऱ्यांना हवी असते सर्व विषयांवर बोलणारी, चर्चा करणारी,येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणारी सुसंस्कृत, स्मार्ट सून हवी असते!, सासूला हवी असते मसाले भाजणारी, पुरण-पोळ्या करणारी सुगरण!. नोकरीवर गेली की, बॉसला हवी असते घरातल्या अडचणी विसरून ऑफिसच्या कामात मग्न होणारी कर्मचारी. सगळ्यांना सांभाळता सांभाळता त्या स्त्रीला स्वतःचे कसे व्हायचे आहे हा विचारही मनी डोकवायला जागा उरत नाही. दूरचित्रवाणीच्या आई कशी हवी, बायको कशी हवी, सून कशी हवी म्हणून कुणी जाहिरात करत नाही हे नशीब म्हणायचं!

*मालिकांचा धुडगूस*
दूरचित्रवाणीवरील जाहिरातीशिवाय देशीविदेशी मालिकांनी जो धुडगूस घातलाय त्याचे परिणाम आपल्यावर कसे होणार आहेत. याचा विचार कुणी करतोय? हिंदी, मराठी चित्रपटात हे हवंय, ते नकोय म्हणणाऱ्यांनी या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घरात काय शिरतयं याचा विचार करू नये? आता रामरक्षा, मनाचे श्लोक, शांताकारम.... म्हणणाऱ्या मुलांचे आवाज दिवेलागणीला ऐकूच येत नाहीत. हातात पुस्तक घेऊन एखादा मुलगा तल्लीन होऊन वाचतोय असं दिसतंच नाही. आमच्या एका मित्राच्या नातवाला ब्रेकडान्स आणि फॅन्सीड्रेस स्पर्धेत गणेशोत्सवात बक्षीस मिळालं; मोठ्या उत्साहानं त्यानं ते बक्षिसाचं पुडकं फोडलं आणि रडवा चेहरा करून तसंच पुडकं त्यानं आईच्या हातात दिलं. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. आणि त्याला बक्षीस मिळाली होती मराठी पुस्तकं, चांगल्या देवाच्या गोष्टी होत्या!

*कथा मार्कंडेयाच्या मंदिराची*
सुपरमॅन, स्पाईडरमॅन आणि कसले कसले मॅन आवडीनं वाचणाऱ्या मुलांना देवाच्या कथा वाचायला आवडत नाहीत. या गोष्टीची दखल देवळं बांधायचा ध्यास घेतलेल्यांनासुद्धा दिसत नाही. आपल्या तीर्थस्थळांच्याही रम्य अशा कथा आहेत. कुंभकोणम पासून तीन मैलावर मार्कंडेयाचं मंदिर आहे. या मार्कंडेयानं तपश्चर्येनं विष्णूला प्रसन्न करून घेतलं. विष्णूनं विचारलं,
'भक्ता, काय हवं ते माग'  मार्कंडेय म्हणाला
'मला तुझा सासरा व्हायचंय; तेव्हा लक्ष्मीला माझी मुलगी होण्याची आज्ञा कर'
विष्णूनं म्हटलं
'बाबा रे, लक्ष्मीला मी सांगू शकत नाही, त्यासाठी तुलाच तिला प्रसन्न करून घ्यावं लागेल, ती तुझी मुलगी व्हायला तयार झाली, तर मी ही तुझा जावई व्हायला तयार आहे.'
लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्कंडेयानं तप सुरू केले. आणि एके दिवशी त्याला तुळशीच्या रोपाजवळ एक इवलीशी, तरतरीत गोरीपान मुलगी बसलेली दिसली. मार्कंडेयानं विचारलं,
'तू कोण?'
मुलीनं उत्तर दिलं,
'मला माहित नाही, मला आई-वडील नाहीत'
मुलीनं सांगून टाकलं.
'तुला कोण हवंय?, मार्कंडेयानं विचारलं.
'तुम्हीच....'
असं म्हणून त्या मुलीनं मार्कंडेयांच्या पायाला मिठी मारली. मार्कंडेयानं ओळखलं लक्ष्मी आलीय. तो तिचं पालन पोषण करू लागला. मुलगी हळूहळू वाढू लागली, मोठी झाली. विष्णू येईल आणि मुलीला मागणी घालील, या विश्वासानं मार्कंडेय स्वस्थ होता; पण एक दिवस एक जख्ख म्हातारा ब्राह्मण त्याच्या पुढ्यात उभा राहिला आणि म्हणाला,
'तुझी मुलगी बायको म्हणून मला दे नाही तर, जीभ हाडसून इथंच प्राण देईन'.
मुलीनं म्हाताऱ्याची मागणी ऐकली, तिनं तिथूनच सांगितलं,
 'मला या म्हाताऱ्याला दिलीत, तर मीही जीभ हाडसून प्राण देईन'.
मार्कंडेयाला काय करावं सुचेना. त्यानं विष्णूची करुणा भाकली, साक्षात विष्णू उभे ठाकले, मार्कंडेयानं विष्णूला म्हाताऱ्याची मागणी आणि मुलीचं म्हणणं ऐकवलं,. विष्णू म्हणाले
'चल, बघू कोण आहे तो?'
 बघतात तर तो म्हातारा आहे कुठं? मग विष्णूनं हसून सांगितलं,
'अरे, तो मीच होतो'
विष्णूचं पुन्हा लक्ष्मीशी लग्न झालं. मार्कंडेयानं कन्यादान केलं. आपल्या एकेका देवळाची अशी भन्नाट कथा आहे. पण सांगणारे नाहीत आणि असले तरी त्यांना ऐकणारे नाहीत. अशी स्थिती व्हायची काही वर्षांत...!

*चौकट*

*आपली सामाजिक जबाबदारी*
भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची. स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रध्दावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरूषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते. स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप. आपल्या प्राचीन लोकांनी याला मान्यता दिली म्हणून वैदिक काळात स्त्रियांना उच्च आदर दिला जात होता. स्त्रीच्या रूपाने आशीर्वाद म्हणून लाभलेल्या या शक्तीला मोठय़ा कल्याणासाठी हितकर मार्गाने दिशा देणे, एक समाज म्हणून आपली जबाबदारी आहे.


-हरीश केंची ९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...