"भाषावार प्रांतरचना होऊन अनेक वर्षं लोटलीत. सीमप्रांतात नव्या पिढीची संमिश्र मतं आहेत. काही काळापूर्वी 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रश्नावर व्यावहारिक भूमिका घ्यावी असं मत मांडलं होतं. दोन्ही बाजूंनी होणारं अस्मितेचं राजकारण हाही एक मुद्दा आहे. मी किमान ५० वर्षं हे बघतो आहे, पण नेमकं सोल्युशन मिळालं आहे किंवा मिळेल असं वाटत नाही. आता अर्थात न्यायालयात आहे. पूर्वी कायम सर्वपक्षीय शिष्टमंडळं पंतप्रधानांना भेटायला जायची, सभागृहांमध्ये ठराव व्हायचे, पण त्याचं पुढे काही झालं नाही. पंतप्रधानांनी काही केलं नाही आणि आताही काही करतील असं मला वाटत नाही. इथल्या पक्षांना मात्र याचा राजकीय फायदा झाला. बेळगावच्या नव्या पिढीचा यात पूर्वीसारखा भावनिक सहभाग राहिलाय असं वाटत नाही!"
....................................................
'बेळगाव' वाद कसा सुरु झाला?! किंवा शुद्ध मराठी म्हणजे काय? किंवा स्वातंत्र्य मिळायच्या काही महिने आधी मराठी मनांत काय चालू होते? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आचार्य अत्रे यांच्या राजाराम हायस्कूल, कोल्हापूर इथल्या ह्या गाजलेल्या भाषणात..आणि त्यांच्याच शब्दांत..
१९४६ ला बेळगाव इथं 'तिसावं' मराठी साहित्य संमेलन झालं. त्यात स्वातंत्र्यानंतर होणाऱ्या भाषावार राज्य रचनेत 'मराठी' भाषिकांचं 'महाराष्ट्र' पाहिजे हा ठराव होऊन 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली! पण... ह्याचीच कानडी भाषिकांना भिती वाटल्यानं त्यांनी तेव्हाच्या बेळगाव आणि कारवार ह्या मराठी भाषिक जिल्ह्यांत कानडी भाषा बंधनकारक केली. भाषणात इतर सार्वजनिक ठिकाणी कानडीची सक्ती सुरू केली! ह्याला उपाय म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा ठराव ज्यांच्या हस्ते झाला. त्या आचार्य अत्रे यांची ठिकठिकाणी भाषणे मराठी मायबोली जनता परिषदेनं ठेवली. त्यातली फेब्रुवारी १९४७ मधली निपाणीचे नगराध्यक्ष देवचंद शहा ह्यांच्या सोबतचे आणि विशेष म्हणजे राजाराम हायस्कूल ,कोल्हापूर इथली भाषणं खूप गाजली. त्यातलंच हे भाषण! महाराष्ट्रातलं भांडखोर राजकारण पाहता अगदीच कोणाही सामान्य माणसाला आवडेल आणि सोबतच विचार करायला लावेल असं हे भाषण...
"तुम्ही कोल्हापूरचे विद्यार्थी आहांत. तुमच्या गांवाच्या आणि ह्या शाळेच्या परंपरा फार थोर आहेत. कोल्हापूरला 'करवीर' म्हणतात, जे माणसांना 'वीर' करतें, तें 'करवीर'! (प्रचंड टाळ्या) जो वीरासारखं कांहीतरी करतो तो करवीर (टाळ्या). जगामध्ये 'करवीरा'पेक्षा..'कृतिवीरा 'पेक्षा 'वाचिवीर'च जास्त असतात. (हंशा) करवीरांत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ही फार मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला करवीर बनावयाचंय. कृतिवीर बनावयाचंय. वाचिवीर नाहीं. राजर्षि शाहूमहाराज आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले या दोन महान कृतिवीरांची परंपरा तुम्हांला पुढें चालवावयाची आहे.(टाळ्या) आज तुम्ही फार भाग्यशाली काळांत जन्माला आलेले आहांत. दीडशें वर्षे ज्या स्वातंत्र्यासाठीं आपण तळमळत होतों, तो स्वातंत्र्याचा प्रश्न लौकरच आतां सुटणार आहे. पारतंत्र्याशी रात्र संपून स्वातंत्र्याची सुप्रभात लौकरच उगवणार आहे आणि स्वराज्याचा सूर्य भारताच्या क्षितिजावर उगवलेला तुमच्या डोळ्यांना पहावयाला मिळणार आहे! (प्रचंड टाळ्या). भारतवर्षाच्या इतिहासांत आजचा काळ अद्वितीय म्हणून पुढें समजला जाईल. रामायणाच्या आणि महाभारताच्या काळीं जसें प्रचंड वीर होऊन गेले, तसे मोठमोठे वीर तुमच्याआमच्या भाग्यानें आज आपल्या हिंदुस्थानांत आपल्याला पहावयाला मिळत आहेत!"
"शिवरायांच्या काळांतला जर एखादा माणूस आज जिवंत असता तर आपण त्या जख्खड म्हाताऱ्याला असंच विचारललं असतं ना कीं "कायहो, खापर- खापर पणजोबा, छत्रपति शिवाजीमहाराजांनी महाराष्ट्रांत जेव्हां स्वराज्याची स्थापना केली, तेव्हां तुम्ही होतां ना? औरंगजेबाच्या कैदेमधून जेव्हां शिवाजीमहाराज मोठ्या शिताफीनं निसटून रायगडावर आले तेव्हां तुम्ही होतां ना? रायगडावर शिवरायांना जेव्हां अभिषेक झाला तेव्हां डोळे भरून तुम्ही त्यांना पाहिलं होतं ना? असं विचारल्यानंतर त्या म्हाताऱ्याच्या सुरकुतलेल्या गालावरून आनंदाची आसवं ओघळू लागतील आणि आपली थरथरती मान आणखी जोरजोराननं हलवीत सद्गदित कंठाननं तो आपणाला सांगेल कीं, 'होय बाळ, मी त्या वेळीं होतो. शिवाजीमहाराजांना, त्यांच्या त्या तानाजीला, त्यांच्या त्या येसाजीला मी डोळे भरून पाहिलेलंय!' (टाळ्या)
"त्याप्रमाणें इथं जमलेलीं तुमच्यापैकीं मुलं जेव्हां आजोबा होतील (हशा) आणि (मुलींकडे बघून) तुम्ही चिमुरड्या मुली जेव्हा आजीबाई व्हाल (हशा) त्यावेळीं तुमच्या मांडीवर बसून तुमचीं नातवंडं आणि पतवंडं (हंशा) तुम्हांला असंच विचारतील कीं, 'काय हो आजोबा, काय ग आजी, बेचाळीसच्या ऑगस्टमध्यें ब्रिटिशांना 'चले जाव' म्हणून महात्माजींनी सांगितलं त्यावेळी तुम्ही होतात ना? (टाळ्या), सातासमुद्राखालून जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी 'आझाद हिंद' सरकारचं निशाण जेव्हां उभं केलं तेव्हां तुम्ही होतात ना? (टाळ्या). सातारा जिल्ह्यांत चव्वेचाळीस महिने ज्यांनी ब्रिटिश सरकारची सत्ता औषधाला सुद्धा ऊरू दिली नाहीं, त्या प्रतिसरकारच्या क्रांतिवीर नाना पाटलांना डोळे भरून तुम्हीं पाहिलंय ना? (टाळ्या) 'त्या वेळीं तुम्ही पाझरत्या डोळ्यांनीं आणि भरलेल्या गळ्यांनीं मोठ्या अभिमानानं सांगू शकाल कीं, 'होय बाळांनो, आम्ही त्या वेळीं होतों. आम्ही त्या वीरांना पाहिलंय. त्यांच्या पराक्रमाचीं वर्णनं त्या वेळच्या वृत्तपत्रांतून वाचलीं आहेत.'
"जर तुमच्यापैकीं एखादा करंटा आजोबा असं म्हणेल कीं, 'आम्ही त्या वेळी होतों खरं पण. "जर तुमच्यापैकीं एखादा करंटा आजोबा असं म्हणेल कीं, 'आम्ही त्यावेळी होतों खरं पण आम्ही त्या वीरांना पाहिलं नाहीं, किंवा देशांत त्यावेळीं काय घडत होतं ते आमच्या कानावर कधीं आलंच नाहीं. तर तीं तुमचीं नातवंडं तुमच्या पिकलेल्या मिशांचं नि वेण्यांचं केस संतापानं ओढून तुम्हांला म्हणतील कीं, 'धिक्कार-धिक्कार असो आजोबा निं आजीबाई तुमचा...!' (प्रचंड टाळ्या) "आपण मराठे लोक आहोत. आपल्या देशाचं नांव महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ह्या नांवाला अर्थ आहे. पोकळ नांव नाहीं तें. त्याच्या नांवाप्रमाणेंच हें राष्ट्र महान आहे. फार मोठी माणसं होऊन गेलीं आहेत या महाराष्ट्रांत म्हणूनच ह्या राष्ट्राला 'महाराष्ट्र' असं नांव पडलेलं आहे. या महाराष्ट्रांत कोणीही लहान नाहीं. ज्या छत्रपति शिवाजीमहाराजांनीं हा महाराष्ट्र तयार केला आहे, ज्या महाराष्ट्राचे शिवप्रभू जनक आहेत, त्या महाराष्ट्रामधली आम्ही त्यांचीं संतानं लहान कशीं असूं? (टाळ्या), मला जर कोणी विचारलं कीं काय हो तुमचं गोत्र काय? तर मी त्यांना सांगतो माझं गोत्र शिवाजी...! (टाळ्या), माझं प्रवर तीन, तानाजी, येसाजी आणि बाजी. महाराष्ट्रांत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं हेच एक गोत्र आणि हेच तीन प्रवर! (प्रचंड टाळ्या).
"गडकरी म्हणतात त्याप्रमाणें खरोखरच हा आपला महाराष्ट्र देश मंगल आहे. हा महाराष्ट्र देश पवित्र आहे. हा फुलांचा देश आहे, तसा दगडाचाही देश आहे. आपली छाती जितकी कठोर तितकी ती कोमलही आहे. रावणाचं चौदा चौकड्यांचं साम्राज्य माकडांच्या मदतीनं रामानं धुळीला मिळविलं आणि सीतादेवीची सुटका केली. त्याचप्रमाणें मोंगलाचं बलाढ्य साम्राज्य मावळ्यांच्या मदतीनं शिवरायांनी नेस्तनाबूद केलं आणि स्वातंत्र्याची सीता महाराष्ट्राला मिळवून दिली. (टाळ्या) महाराष्ट्र हा डोंगराळ देश आहे. इथली माणसं देखील डोंगरासारखी आहेत. शिवाजी महाराजापासून तों नाना पाटलांपर्यंत मोठमोठ्या कड्यासारखी आणि सुळक्यासारखी प्रचंड माणसं या महाराष्ट्रांत होऊन गेली आहेत. मग महाराष्ट्रातल्या लोकांना भिण्याचं काय कारण आहे?
"मराठी स्वातंत्र्याचे संस्थापक जसे शिवाजीमहाराज, तसे मराठी भाषेचे संस्थापक श्री ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानोबासारखा बंडखोर लेखक मराठी भाषेत दुसरा झाला नाही. मुक्तीचं आणि भक्तीचं तत्त्वज्ञान संस्कृत भाषेच्या बंदिवासात लांबलांब समासाच्या कड्याकुलपांत आणि अडसरांत अडकून पडलेलं होतं. तें ज्ञानेश्वरांनीं सोडवून बाहेर काढलं आणि महाराष्ट्रांतल्या बहुजन समाजाच्या घराघरापर्यंत नि झोपड्याझोपड्यापर्यंत पोहोचवलं. मराठी भाषा ज्ञानेश्वरांनीं स्वतंत्र केली. त्यानंतर मराठी भाषेच्या वृक्षाला असा कांहीं सुंदर मोहर आला म्हणता! तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई या संतकवींनीं मराठी भाषा अधिक सुंदर आणि सामर्थ्यवान करण्याचा प्रयत्न केला. खरोखरच ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे अमृतांशी पैजा जिंकण्याचं सामर्थ्य ह्या संतकवीनी आपल्या मराठी भाषेत निर्माण केलं. म्हणून त्यांच्या त्या अमृतमधुर साहित्याचा आपण अभ्यास करून शुद्ध आणि सुंदर मराठी बोलावयाला शिकलं पाहिजे. "संस्कृत भाषा ही विद्वानांची भाषा आहे, म्हणून मराठी बोलतांना किंवा लिहितांना मधूनमधून संस्कृत शब्द घुसडणं हे विद्वत्तेचं लक्षण आहे अशी पुष्कळांची जी समजूत आहे ती भ्रामक आहे. माझ्या माहितीच्या एका माणसाला वेळी अवेळीं संस्कृत शब्दांचं अवडंबर माजवायची अशीच वाईट खोड होती. त्यांनी आपल्या बायकोला पत्र लिहिलं, 'वज्रचूडेमंडित सौभाग्यवती कौटुंबिनी हीस... (हंशा) परवा माझ्या प्रयाणकाळीं संभ्रमानं माझे पायमोजे शयनगृहांत पलंगाखालीं पतन पावले आहेत ते उत्तरपत्री कथन करण्याची मेहेरबानी व्हावी...!' (हंशा) पुष्कळसे मराठी लेखक शुद्ध मराठी नामाच्या मागे 'सु' आणि 'सत्' या संस्कृत उपाधि लावीत असतात. 'वरा'ला 'सु-वर' करण्याचा आणि 'सरी 'ला 'सु-सरी' बनवण्याचा हा नाद काही फारसा चांगला नाही.(हशा)
बहुजन समाज जी भाषा बोलतो आणि बहुजन समाजाला जी भाषा समजते तीच खरी शुद्ध मराठी भाषा! (टाळ्या) राजर्षि शाहूमहाराज हे पुष्कळ वेळा मुद्दाम शेतकऱ्याची भाषा वापरीत आणि शेतकऱ्यासारखे उच्चार करीत. ते त्यांचं बोलणं कानाला फार गोड लागे. शेतकऱ्यांच्या भाषेला कुणबाऊ भाषा असं म्हणून हिणवणं बरं नाहीं. 'लई' म्हणण्यांत कांहीं एक 'वंगाळ' नाहीं...! (हंशा नि टाळ्या)
"नाना पाटील कोणताही अवघड विषय शेतकऱ्यांच्या सभेंत त्यांना महज समजेल अशा सोप्या आणि शुद्ध मराठी भाषेमध्यें समजावून सांगतात. परवाच ते एका सभेत म्हणाले, 'बरं का शेतकऱ्यांनो, शेतामध्यें 'विचका' असतो. तुम्ही त्याला म्हणता 'वेणा' म्हणजे 'हरळी', हा वेणा लई खराब असतो. शेताचा तो नास करतो. हा वेणा हतनं काढला तर तो तथं उगवतो. तथनं काढला तर तो पल्याड उगवतो. त्याला जमीन खोल खाडून तळापासून काढूनशान टाकला पाहिजे. तवा तो नाहींसा होतों. आपल्या देशांतलं साहेबाचं सरकार हे असंच बेण्यासारखं आहे. त्याला थोडंथोडं काढून भागायचं नाहीं. त्याला भुईत खोल शिरून म्हंजी भूमिगत होऊनच उखडून टाकलं पाहिजे...!' (प्रचंड टाळ्या)
याला मी म्हणतो शुद्ध मराठी भाषा."गेल्या दीडशे वर्षांत अनेक इंग्रजी शब्द आपल्या मराठी भाषेत येऊन घुसलेले आहेत. जे शब्द आता आपल्या जीवनांत कायमचे स्थायिक होऊन बसले आहेत. ते आता शुद्धीकरणाच्या नावावर बदलण्यांत काही अर्थ नाही. मला तिकीट शब्द चालेल, स्टेशन चालेल, पण 'अग्ग्रिरथ विश्रामधाम' चालणार नाहीं. "राजशासनपत्रापेक्षां मनिऑर्डरच बरी ! ( हंशा) प्रत्येक सुशिक्षिताला इंग्रजी भाषा उत्तम आली पाहिजे, अशा मताचा मी आहे. इंग्रजांचं राज्य आम्हांला नको. पण त्यांची भाषा आणि साहित्य आम्हांला हवीं आहेत. मराठी बोलताना आपण मराठी बोलावं. आणि इंग्रजी बोलताना इंग्रजी बोलावं. मराठी बोलताना इंग्रजी बोलूं नये आणि इंग्रजी बोलताना मराठी बोलू नये.(हंशा) इंग्रजी शिकलेले पुष्कळसे मराठी लोक अशी भाषा बोलताना आढळतात 'या Question चा कितीही deeply विचार केला तरी त्यातली कल्पना clear होत नाही.' (प्रचंड हंशा) त्याचप्रमाणें इंग्रजी बोलतांना मराठी शब्द घुसण्याची सवयही वाईट."मराठी भाषा बोलणारांचे उच्चार इतर देशी भाषा बोलणाऱ्यापेक्षां अधिक चांगले असतात ही गोष्ट सुप्रसिद्धच आहे. हिंदी लोकांना आपल्याप्रमाणें जोडाक्षरांचे उच्चार करता येत नाहीत. 'स्कूल' ते इस्कूल म्हणतील. स्टेशनाला ते 'इस्टेशन' किंवा 'सटेशन' म्हणतील. 'ज्ञाना' चं त्यांनी 'अग्यान' करून टाकलंय.आणि 'स्त्री'ची त्यांनीं 'इस्त्री' बनवलेली आहे.(हंशा) बाकी पुरुषांच्या संसाराची विस्कटलेली घडी सफाईदारपणे बसवणारी स्त्री एक 'इस्त्री'च आहे, नव्हे तर काय?(प्रचंड हंशा). बंगाली लोकांना 'अ'चा अन् 'व'चा उच्चार करतां येत नाहीं. 'कमलवदन'चा उच्चार ते 'कोमोलोबोदन' असा करतात. शब्दांचा उच्चार करतांना बंगाली लोक त्याचा जो हास्यास्पद विपर्यास करतात.तो पाहिल्यानंतर अशा उच्चाराच्या भयाण चुका मराठी भाषिकांच्या तोंडून होत नाहीत याबद्दल आपणाला अभिमान वाटला पाहिजे. "हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आपला सध्याचा महाराष्ट्र आहे यापेक्षा मोठा होणार आहे. मराठी भाषा बोलणाऱ्या चार कोटी लोकांचे एकजिनसी राष्ट्र स्थापन होणार आहे. मराठी भाषेच स्वतंत्र विद्यापीठही आता लौकरच स्थापन होणार आहे. त्यामुळं मराठी भाषेच्या अभ्यासाला आणि अभिमानाला आता विलक्षण भरती घेणार आहे. म्हणून आपली भाषा अधिकाधिक शुद्ध करण्याचा तुम्ही मुलांनी आता जागरूकपणे प्रयत्न केला पाहिजे. आजकाल शुद्ध मराठी भाषा फक्त बायकांमध्ये आणि बहुजनांमध्यें बोललेली तुम्हांला आढळून येईल, सुशिक्षित आणि पुढारलेल्या वर्गाच्या लोकांनी इंग्रजांच्या संगतीनं आपली मराठी भाषा बिघडवून घेतलेलीय.
"मुलांनो, तुमच्या घरांत तुमची आजी किंवा आई जी मराठी भाषा बोलते, त्यांच्या तोंडी मराठी भाषेमधल्या ज्या ज्या सुंदर म्हणी नि वेचक वाक्प्रचार येतात ते तुम्ही ध्यानात ठेवा. तसंच मराठी भाषेतल धंदेवाचक असे शेकड़ों शब्द आज नाहीसे झालेत. ते हरवलेले आणि विसरलेले शब्दभांडार तुम्ही शोधून आणा आणि आपल्या मराठी भाषेला अधिक श्रीमंत आणि संपन्न बनवा. कोष्ट्याचा 'ताणा आणि बाणा' किंवा चांभाराची 'रापी, इंगा आणि आरी' आज किती लोकांना माहीत आहे? "मुलांनो, जन्मल्याबरोबर आकाशाला सूर्य गिळण्याचा प्रयत्न करणाऱ्या हनुमानाचा आदर्श तुम्ही आपल्या डोळ्यापुढे ठेवला पाहिजे.(टाळ्या) ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य एकसारखा तळपत असतो असा इंग्रजांचा दावा आहे. तो सूर्य कदाचित मनात म्हणत असेल की मी ह्यांच्या साम्राज्यावर तळपत असताना हे इंग्रज लोक एवढ्या भानगडी करतात मग मी मावळल्यावर अंधारांत हे काय करतील कोणास ठाऊक? म्हणून मला ह्यांच्या साम्राज्यावर एकसारखा पहारा ठेवावा लागतो! (प्रचंड हंशा नि टाळ्या) ब्रिटिश साम्राज्यावर प्रकाशणाऱ्या या सूर्याला गिळण्याचा प्रत्येक हिंदी तरुणानं प्रयत्न केला पाहिजे.(टाळ्या)
"मुलं म्हणजे फुलं नाहीत. मुलं नि मुली म्हणजे ठिणग्या आहेत; ते जळते निखारे आहेत. ती पेट्रोलची डबडी आहेत. देशांत कोठेहि काही प्रक्षोभ झाला तर तरुणांनी भड़कलंच पाहिजे, जो भडकतो तो तरुण, जो पेटतो तो तरुण आणि जो आपल्या विद्यार्थ्यांना पेटवतो तो शिक्षक! (प्रचंड टाळ्या) मुलांना केवळ ज्ञान देणं एवढंच शिक्षकांचं कार्य नाहीं. पण मुलांमध्ये मूळची असलेली ठिणगी फुंकून तिची जो ज्वाला करतो तो खरा शिक्षक! (टाळ्या) बेचाळीसच्या आंदोलनापासून देशातले तरुण विद्यार्थी आता जागृत झाले आहेत. त्यांना लिमलेटच्या गोळ्यांची आतां जरूरी नाहीं! ( हशा नि टाळ्या ), बंदुकीच्या गोळ्या खाण्याची आता त्याच्या मनाची तयारी झालीय! (टाळ्या) म्हणून मला विद्यार्थ्यांना सांगावयाचं आहे कीं त्यानी आपल्यामधला अंगार काय वाटेल ते झालं तरी विझून देतां कामा नये. राष्ट्रासाठी आता त्यांचा उपयोग करण्याची वेळ आलीय. स्वातंत्र्याचा झगडा आता पुन्हा लौकरच सुरू होणार आहे. त्यावेळी कलकत्त्यापासून कराचीपर्यंत आणि काश्मीरपासून तो कन्याकुमारीपर्यंत साऱ्या हिंदुस्थानांत आपल्याला आगीचा भडका उडवून द्यावयाचाय. खेड्याखेड्यांतून, शेताशेतांतून आणि शहरांशहरांतून या आगीचे वणवे आपणाला पेटवून द्यावयाचे आहेत म्हणून या शेवटच्या अग्निदिव्यासाठी तुम्ही आपल्यामधला हा अंगार ज्वलंत ठेवण्याचा प्रयत्न कराच!" जय हिंद ! जय महाराष्ट्र !! (काहीं काळ प्रचंड टाळ्या).
................
भारत स्वतंत्र होताना.. संयुक्त महाराष्ट्र तयार होताना..लोकांचे काय भारी विचार होते.. काय भारी प्रेरणेनं ती लोक काम, त्याग करत होती. आणि आज आपण काय करतोय. कसल्या भंगार राजकारणात अडकलाय आपला महाराष्ट्र....! गेल्या साठसत्तर वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न चिघळलेला आहे. सध्याचं कर्नाटक राज्य म्हणजे पूर्वीचं म्हैसूर हे राज्य. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ साली भारतातलं पहिलं राज्य म्हैसूर हे बनलं. १ नोव्हेंबर १९७३ साली म्हैसूरचं नाव बदलून कर्नाटक करण्यात आलं. त्यामुळे कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस हा १ नोव्हेंबर आहे. त्याआधी १९५६ साली तत्कालीन म्हैसूर राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बीदर यासह बेळगाव जिल्हा म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. यावेळी भाषावार प्रांतरचना लक्षात न घेता प्रशासकीय कामांमध्ये बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर करत बेळगावचा समावेश म्हैसूर राज्यात करण्यात आला. या राज्याची राज्यभाषा कन्नड असल्यानं सध्या बेळगावसह सीमाभागामध्ये कन्नड भाषेची सक्ती केली जाते. त्यामध्ये कारवार, निपाणी ,बिदर, बेळगाव या शहरासह ८६५ खेड्यांचा समावेश या राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. तेव्हापासून मराठी भाषिक जनतेचा सीमाप्रश्नाचा हा लढा सुरू आहे. केंद्र सरकारनं त्या काळात पाटसकर तत्वानुसार सर्व राज्यांच्या सीमाप्रश्नावर तोडगा काढला त्यानुसार भाषिक बहुसंख्य, भौगोलिक सलगता, खेडे हा घटक आणि लोकांची इच्छा या चार मुद्यांच्या आधारे सीमाप्रश्न सोडवण्यात आले होते. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा विचारातच घेण्यात आला नाही, असं आजही म्हटलं जातं. त्यातून सीमावादाचा लढा उभा राहिला.
२२ मे १९६६ रोजी सेनापती बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आमरण उपोषण केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. नाथ पै यांनी सीमावादाचा हा प्रश्न इंदिरा गांधींपर्यत पोहचवला. बापट यांच्या उपोषण आंदोलनाची दखल घेत तत्कालीन केंद्र सरकारनं माजी न्यायमूर्ती महाजन यांच्या एकसदस्य आयोगाची नेमणूक केली. १९६७ साली महाजन आयोगाचा अहवाल आला. त्यानुसार प्रशासनाच्या सोयीसाठी बेळगाव कर्नाटकमध्ये ठेवणं उचित असेल असा अहवाल दिला. त्यावर सीमाभागात तीव्र संतापाची लाट उसळली. ती आजवर धगघत आहे. गेली ६५-७० वर्षं कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस सीमाभागात काळा दिन म्हणून साजरा केला जातो.
१९८६ साली कोल्हापूरमध्ये सीमापरिषद झाली. या परिषदेला एस. एम. जोशी, शरद पवार, माधवराव गायकवाड गोविंद पानसरे असे दिग्गज सहभागी झाले होते. त्यावेळी विरोधी पक्ष नेते असलेले शरद पवार सत्याग्रह करण्यासाठी गनिमी काव्याने बेळगावात दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुन्हा कोल्हापूरमध्ये सोडले. सीमाप्रश्नाच्या या लढ्यात छगन भुजबळ यांचा लढा लक्षवेधी ठरला. ५ जून रोजी छगन भुजबळ हे सत्याग्रहासाठी बेळगावात येणार होते. पण त्यांना अडवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने मोठी तयारी केली होती. पण भूजबळ यांनी गनिमी काव्याने वेषांतर करत बेळगावमध्ये प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी आधी मुंबईवरून गोवा गाठलं त्यानंतर ते पोलिसांना चकवा देत बेळगावात पोहोचले. पण त्यांचा सत्याग्रह पोलिसांनी हाणून पाडत त्यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी अटकेत असलेल्या भुजबळांना एक महिन्यानंतर जामीन मंजूर झाला. 'महाराष्ट्र एकीकरण समिती' ही सीमाप्रश्नात या भागातल्या मराठी भाषिकांचं प्रतिनिधित्व करत आलीय. ती लढ्याचेही प्रतिनिधित्व करते आणि राजकीयही. या भाषिक लढ्याचं स्वरुप संसदीयही रहावं म्हणून 'समिती'नं निवडणुकाही लढवल्या आणि या भागातून कर्नाटकच्या विधानसभेत आमदारही निवडून पाठवले. बराच काळ मराठी भाषकांनी बेळगाव महानगरपालिकाही त्यांच्या ताब्यात ठेवली. 'समिती'ची राजकीय ताकद काळानुसार कमी जास्त होत राहिली आणि तिच्यातही गट पडले
दुसरीकडे कर्नाटक प्रशासनाकडून इथल्या मराठी भाषिक जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचं इथल्या मराठी जनतेचं म्हणणं आहे. कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असतानाही इथं सरकारी कार्यालय, स्थानिक संस्थामध्ये कन्नड भाषा वापरली जाते. महापालिकेचं कामकाज करताना देखील कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे. सीमालढा जरी रस्त्यावरच्या आंदोलनांमधून आणि निवडणुकांतून अनेक वर्षं चालत राहिला, तरीही नंतर हा वाद न्यायालयीनही झाला. २९ मार्च २००४ रोजी विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नावर दावा दाखल करण्यात आला. त्यावर २००६ साली पहिली सुनावणी झाली. तेव्हापासून धिम्या गतीनं ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सध्या मार्च महिन्यात शेवटची सुनावणी झाली असून अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. हे सुरू असताना कर्नाटक सरकारने काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार राज्य कमी करणे, सीमा वाढवणे, नावात बदल करणे असे अधिकार हे संसदेला असतात त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. त्यामुळं हा प्रश्न केंद्र सरकारने सोडवावा असं या अर्जात नमूद करण्यात आलं आहे. यावर अजूनही सुनावणी झालेली नाही. दरम्यानच्या काळात या भागात कर्नाटक सरकारनं आक्रमक पावलं उचलली. बेळगांवचं नाव 'बेळगावी' असं करण्यापासून ते इथं कर्नाटकची दुसरी विधानसभा बांधून तिथं दरवर्षी अधिवेशन भरवण्यापर्यंत अनेक निर्णय कर्नाटककडून त्या राज्याचा दावा बळकट करण्यासाठी घेतलं गेलं. कर्नाटक सरकारची काही कार्यालयंही इथं सुरू केली गेली. इथं आता मराठी भाषिकांपेक्षा कन्नड भाषिकांची संख्या आता जास्त असल्याचा दावाही या राज्याकडून केला जातो.
महाराष्ट्र सरकारतर्फे हरिश साळवे, राजू रामचंद्रन, अरविंद दातार, राकेश द्विवेदी असे विधिज्ञ सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आहेत. आता पर्यंत १० ते १५ वेळेस सुनावणी झाली आहे. गेल्या सहा महिन्यात चार तारखा मिळाल्या, पण आता सरकारतर्फे ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष सुनावणीची मागणी केली गेली आहे. 'इंच इंच लढवू' या दोन्ही बाजूंच्या वक्तव्यांनंतर सीमाप्रश्नाची आणि न्यायालयीन खटल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात जाण्याअगोदरही महाराष्ट्रानं प्रचंड प्रयत्न केले आणि आपला दावा योग्यच आहे. २००० साली जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांची समिती सरकारने सल्ल्यासाठी नेमली होती, तेव्हा त्यांनीही सांगितलं की सर्वोच्च न्यायालयात गेलो तर महाराष्ट्राची बाजू भक्कम आहे. त्यामुळे या भागातल्या मराठी भाषिक नागरिकांच्या समानतेच्या हक्कांसाठी आपण लढतो आहोत. "महाजन आयोग आपण नाकारला कारण त्यात अनेक अंतर्विरोध होते. याशिवाय अनेक ऐतिहासिक पुरावेही आपल्याकडे आहेत. त्यामुळेच या लढ्यात विजयाची खात्री आहे. महाराष्ट्र हा लढा तीन पातळ्यांवर लढतो आहे. अस्मितेनं जोडलं जाणं तर आहेच, पण केवळ त्यानं भागणार नाही. या भागातल्या युवकांचे शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्नही सोडवायचा प्रयत्न करतो आहे. त्याशिवाय न्यायालयीन लढाई सुरू आहे.
बेळगाव प्रश्न हा महाराष्ट्रातही कायम, विशेषत: दक्षिण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणात, महत्वाचा ठरलेला आहे. मूळ मुद्दा हा एका भूभागावरच्या प्रशासकीय नियंत्रणाचा असला तरीही तो अधिक भावनिकही आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्रातले राजकीय पक्ष मराठी भाषिकांच्या लढ्याच्या बाजूनं असतात. बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेनं या आंदोलनाला आणि 'एकीकरण समिती'ला राजकीय पाठिंबाही दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळताच या विषयावर बैठका घेणं आणि वक्तव्य करणं हे या पक्षाच्या भूमिकेला धरून आहे. बेळगावच्या पट्ट्यात शिवसेनेला मानणारा वर्गही आहे. शरद पवार आणि 'राष्ट्रवादी कॉंग्रेस' यांनीही या लढ्याच्या बाजूनं भूमिका घेतली आहे. कॉंग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष असल्यानं आणि कर्नाटकातल्या सत्तेचे दावेदार असल्यानं त्यांना कायम कसरत करावी लागली आहे. पण स्थानिक नेतृत्वानं कायम त्यांच्या राज्यांची बाजू घेतली आहे. पण तरीही या लढ्याचा व्यावहारिक तोडगा काय असावा हे तपासण्याचा सूरही आता अनेक वर्षांनंतर उमटत असतो.
हरीश केंची
९४२२३१०६०९