Saturday 13 February 2021

शिवसेनेला संपवणारेच संपले!

"'...तर शिवसेनेचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं.' असा हल्लाबोल अमित शहा यांनी मालवण इथं केला. त्यावर 'शिवसेनेचं अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली त्यांच्या गोवर्‍या महाराष्ट्रानं स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्ध घातलीत असं महाराष्ट्राचा इतिहास सांगतो,' असा पलटवार शिवसेनेनं केलाय. यापूर्वी कम्युनिस्ट, काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे नेते रजनी पटेल, मुरली देवरा, पृथ्वीराज चव्हाण, सुरेश कलमाडी या नेत्यांनी शिवसेना संपवण्याची वलग्ना केली होती. आज राज्यात कम्युनिस्ट, काँग्रेसची काय अवस्था आहे. तथाकथित नेत्यांचं अस्तित्व तरी शिल्लक राहिलंय का? अमित शहाच नाही तर आजवर अनेकांनी 'शिवसेना संपेल' असं भविष्य वर्तवलं होतं, पण शिवसेना संपली नाही तर ती प्रत्येकवेळी अधिक जोमानं उसळून उभी ठाकली हा इतिहास आहे. हे लक्षांत घ्यायला हवंय! शिवसेनेला डिवचल्यावर नेत्यांपेक्षा शिवसैनिक अधिक त्वेषानं उठून कामाला लागतो आणि समोरच्याची दणाणून सोडतो. त्यामुळं गृहमंत्री अमित शहा यांच्या, 'तर शिवसेना दिसली नसती…' या वक्तव्यावर शाखाशाखात, चौकाचौकात प्रतिक्रिया उमटत असून, काहीही झालं तरी आम्ही काय आहोत हे दाखवण्याची वेळ आल्याची भावना शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांत निर्माण झालीय!"
-----------------------------------------


*सं* सदेत भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या आणि कृषिबिलाच्या विरोधात सत्तेतून बाहेर पडलेल्या अकाली दलाच्या सिमरतकौर यांनी प्रधानमंत्री आणि भाजप सरकारवर घणाघाती प्रहार केला. त्यानंतर भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी 'सहकारी पक्षावर टीका करताना असा संयम बाळगायला हवा की, आगामी काळात पुन्हा मैत्री करताना शरमिंदे व्हायला लागू नये...!' असं म्हटलं. खरंतर हे अमित शहांना कुणीतरी सांगायला हवं. अमित शहाच नाही तर आजवर अनेकांनी 'शिवसेना संपेल' असं भविष्य वर्तवलं होतं, पण शिवसेना संपली नाही तर ती प्रत्येकवेळी अधिक जोमानं उभी ठाकली हा इतिहास आहे. हे लक्षांत घ्यायला हवंय! 'शिवसेनेला आपण मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला नव्हता आणि बंद दाराआड आपण काही करत नाही; जे काही करतो ते उघडपणे,' असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. त्यांनी हे स्पष्ट विधान भाजपाची सत्ता गेल्यानंतर प्रथमच तब्बल १४ महिने १४ दिवसांनंतर केलंय आणि ते ही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपाचे खासदार असलेले नारायण राणे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात! विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सत्ता येणारच आहे असं गृहित धरून पुढची संपूर्ण तयारी करणाऱ्या भाजपाला शिवसेनेनं जबर झटका दिल्यानंतरही जो खुलासा किंवा उलगडा आजवर झाला नव्हता तो शहा यांच्याकडून आता झालाय. शहा यांनी या खुलाशाला एवढा वेळ का लावला असावा हा प्रश्न तर देवेंद्र फडणवीस यांनाही पडला असेलच. कारण, काही झाले तरी सेनेची सत्ता येऊ द्यायची नाही या जिद्दीनं त्यांनी भल्या पहाटे शपथविधीची योजना केली. पण तो प्रयोग फसल्यामुळं त्यांना जी टीका सहन करावी लागली आणि प्रतिमेचे जे काही बारा वाजले ते निस्तरता निस्तरता आणखी खूप दिवस निघून जातील. पक्षाच्या वरिष्ठांकडून ज्या खुलाशाची त्यांना त्यावेळी आवश्यकता होती तो खुलासा आत्ता आला. आणि तोही आला थेट नारायण राणेंच्या कार्यक्रमात! अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा कसा 'गेम वाजवला' हे याच सदरात लिहिलं होतं हे वाचकांना आठवत असेल. शिवसेना दोन गोष्टी कधीच सहन करत नाही. एक म्हणजे मुंबई महापालिकेतल्या सत्तेला दिलं जाणारं आव्हान आणि शिवसेनेपासून दुरावताना अन त्यानंतर सेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडलेले नारायण राणे आणि त्यांच्या मुलांकडून होणारी शेरेबाजी. भाजपनं या दोन्ही गोष्टी केल्या आणि ज्या दिवशी भाजपनं राणे यांना पक्षात स्वीकारलं त्यादिवशी युतीचा अघोषित काडीमोड झाला होता. सेनेसाठी निर्वाणीचा क्षण आला तो नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र यांचे भाजपाशी जुळवून घेण्याचं ठरविल्यानंतर. भाजपनंही सेनेला प्रचंड डिवचलं. २०१४ ते २०१९ या काळात कोकणात पनवेलनंतर गोव्याच्या हद्दीपर्यंत भाजपचा आमदारच नव्हता. सेना दिवसेंदिवस दूर जातेय आणि आपल्याला जुळवाजुळव करावी लागणारच आहे तेव्हा राणे यांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही असे मनोमन ठरवून भाजपनं अत्यंत धाडसी निर्णय घेतला. राणे आणि भाजपा यांचे सूर जुळले तेव्हा सेनेचा अंतिम निर्णय झाला असणार हे सांगण्यासाठी तज्ज्ञाची गरज नव्हती. लोकांना त्याचं दृष्य स्वरूप काहीसं उद्धव ठाकरे यांच्या ‘२५ वर्षे युतीत सडली’ यासारख्या विधानातून आणि विधानसभा निवडणुकीत “हिच ती वेळ” या सेनेच्या होर्डींग्जमधून दिसलं.

पण भाजपनं मात्र सेनेसोबत शक्यतो जुळवून घेण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या होत्या. त्याचं कारण होतं २०१९ मधील लोकसभा निवडणुका आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घडामोडी. भाजपाला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशात एकामेकांचे कट्टर विरोधक असलेले समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि इतर पक्ष एकत्र येत आहेत म्हटल्यावर या पक्षाचा विचार बदलला. तिथं एकत्रित विरोधकांमुळं भाजपाच्या जागा कमी झाल्या तर तो खड्डा कुठं भरून काढायचा याचा विचार सुरू झाला आणि समोर ४८ जागा असलेला महाराष्ट्र आला. काहीही करून सेनेला सोबत ठेवायचं, चौकीदार चोर है किंवा २५ वर्षे सडली यासारखी टीका सहन करायची, जागावाटपात विरोध करायचा नाही, असं ठरलं. त्यामुळंच पालघरची जागा पदराला खार लावून महतप्रयासानं जिंकलेली असतानाही भाजपनं ती जिंकलेल्या उमेदवारासकट शिवसेनेच्या पदरात घातली. असं निर्णय घेण्याला प्रचंड धाडस तर लागतंच शिवाय याची गणना दुर्मिळातले दुर्मिळ उदाहरण म्हणून होते. लोकसभेची गणिते जुळविताना अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात शेवटी झालेल्या चर्चेत राज्यातले नेते हजर नव्हते. काही मिनिटे झालेल्या या चर्चेत नेमके काय झाले हे या दोघांनाच माहिती होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेसाठीच्या युतीची घोषणा करताना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर चित्रफितीतच पाहणे आवश्यक आहे. कारण त्यांचा चेहरा बरेच काही सांगून जातो. नोव्हेंबर २०१९ मधील नाट्यमय घडामोडींना अमित शहा यांच्याकडून पुन्हा उजाळा मिळालाय. त्यांनी केलेल्या विधानांना सेनेकडून संजय राऊत आणि अरविंद सावंत या खासदारद्वयांकडून उत्तर दिलं गेलं असलं तरी उद्धव ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता वाढलीय. कारण भाजपातले इतर नेते जेव्हा म्हणत की मुख्यमंत्रीपदाबाबत काही शब्द दिला नव्हता किंवा चर्चा झाली नव्हती, तेव्हा हा मला खोटं ठरविण्याचा प्रयत्न आहे, अशी ठाकरे यांची भावना झाली होती.

सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मागील १५ महिने ते राज्याचा गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही, ...तर शिवसेना दिसली नसती, अशी भाषा करण्याची वेळ भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आली. वास्तविक कोकणात येऊन शिवसेनेला आव्हान दिल्यानं वरवर शांत असलेली शिवसेना आणि भाजपमधला वाद पुन्हा डोकं वर काढणार यात शंकाच नाही. पण ज्या ज्या वेळी कुणीही शिवसेना संपवण्याची भाषा केली त्यानंतर शिवसेना अधिक जोमानं उसळून वर आली हा इतिहास भाजपला, अमित शहांना पुन्हा एकदा नव्यानं आठवावा लागेल. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करा, अशी विनंती करण्यासाठी हेच अमित शहा मातोश्रीवर गेले होते. महाराष्ट्र आणि शिवसेना… म्हटलं तर या चार साडेचार शब्दांचं एक अतूट नातं आहे. गुजरातपासून वेगळा होऊन महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णकलश मुख्यमंत्री या नात्यानं यशवंतराव चव्हाण यांनी मुंबईत आणला आणि त्यानंतर खर्‍या अर्थानं महाराष्ट्र नावारुपाला आला. बरोबर सहा वर्षानंतर १९ जून १९६६ रोजी मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी एक संघटना नावारुपाला येते. बाळ केशव ठाकरे मुंबईच्या शिवाजी पार्कवर एका जाहीर सभेत मराठी माणसांसाठी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या तोंडातून शिवसेना असं पुढं येतं. बाळ केशव ठाकरे यांनी उभारलेल्या या संघटनेच्या जोरावर बाळचे बाळासाहेब आणि शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते या इतिहासालाही ५५ वर्षे होतील. एकीकडं आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हीरकमहोत्सवी वर्ष साजरं केलं तर दुसरीकडं आगामी पाच वर्षातही शिवसेनाही ६० वर्षांची झालेली असेल. त्यामुळेच महाराष्ट्र आणि शिवसेनेचे एक नातं आहे आणि ते महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकारलं आहे हे नाकारता येणार नाही.

यापूर्वीही अनेकदा शिवसेना संपवण्याची भाषा काँग्रेस, कम्युनिस्टांनी महाराष्ट्रात केली त्या दोन्ही पक्षांची राज्यात आज काय अवस्था आहे हे बघितल्यास कळेल की शिवसेनेला डिवचल्यावर नेत्यांपेक्षा शिवसैनिक अधिक त्वेषानं उठून कामाला लागतो आणि समोरच्याची दणाणून सोडतो. त्यामुळं गृहमंत्री अमित शहा यांच्या, 'तर शिवसेना दिसली नसती…' या वक्तव्यावर शाखाशाखात, चौकाचौकात प्रतिक्रिया उमटत असून, काहीही झालं तरी आम्ही काय आहोत हे दाखवण्याची वेळ आल्याची भावना शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांत निर्माण झालीय. सध्याची शिवसेना कॉर्पोरेट, मतांसाठी गुजराती, जैन बांधवांच्या वळचणीला जाणारी दिसत असली तरी शिवसेनेचा भक्कम पाया असलेल्या ग्रामीण भागात मात्र आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यामुळं त्यांच्याच जोरावर बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेचे २०१४ साली ६३ आणि २०१९ च्या निवडणुकीत ५६ आमदार निवडून कसे येतात हेच गमक अजून विरोधकांना कळलेलं दिसत नाही. १९७५ मध्ये काँग्रेसचे नेते रजनी पटेल आणि ९० च्या दशकात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा म्हणाले होते की, शिवसेना संपेल. तसंच पुण्यात काँग्रेसचे मोठं नाव असलेले सुरेश कलमाडीही असेच बरळले होते की, खंडाळा घाटाच्यावर शिवसेना दिसणार नाही. त्यांचीच री ओढत पुन्हा २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पुढील काही वर्षात शिवसेना संपलेली असेल असंच म्हटलं होतं. मात्र प्रत्येकवेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनिशी जोमानं पुढं आली आणि शिवसेनेच्या विरोधात बोलणारे कुठे गायब झाले, असं म्हणण्याची वेळ आली. आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या रजनी पटेल यांनी काही संघटनांवर बंदी घालण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एक यादी दिली. त्यात शिवसेनेचंही नाव होतं. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांच्या मुंबईतील भेटीनंतर शिवसेनेचं नाव वगळण्यात आलं, हा इतिहास भाजपवाल्यांना ठाऊक असायलाच हवा. त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेल्या मुरली देवरा यांनीही अशीच बडबड केली होती. मात्र त्यानंतर मुंबई महापालिकेवर असलेला काँग्रेसचा 'हात' जाऊन तिथं शिवसेनेचा भगवा फडकायला लागला. आज अडीच दशकं शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आहे आणि महापौरही शिवसेनेचाच आहे.

काँग्रेसचे पुण्यातील बडे नेते, ऑलिम्पिकवर दबदबा असलेले सुरेश कलमाडी यांनीही 'शिवसेना खंडाळा घाटाच्यावर दिसणार नाही...' असं वक्तव्य केल्याची आठवण नुकतीच शिवसेनेचे खासदार माजी केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांनी करून दिलीय. शिवसेना हा केवळ मुंबई, ठाणे परिघातील पक्ष असल्यानं खंडाळा घाटाच्या वर ती दिसणार नाही, असा पुणेरी टोला लगावला होता. मात्र आता कलमाडी यांचं अस्तित्व काँग्रेसमध्ये काय, पुण्यात तरी आहे का, असा प्रश्न आहे. सगळ्यात अलीकडं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना संपलेली असेल असं वक्तव्य करीत आपल्याच पायावर धोंडा मारला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना साधं विरोधी पक्षनेतेपदही मिळालं नव्हतं आणि त्यांच्या मागे नावाला चार आमदारही उभे नसायचे हे याच महाराष्ट्रानं पाहिलंय. शिवसेनेतून बडतर्फ केल्यानंतर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते राहिलेल्या नारायण राणे यांना मागील १५ वर्षांत शिवसेनेनंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये नाइलाजास्तव जावं लागलं. मात्र अजूनही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांच्यापासून चार हात लांबच आहे. दुसर्‍या बाजूला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, मात्र आता १५ वर्षानंतरही मनसेला राज्याच्या राजकारणात अजून स्वतःची खेळपट्टी सापडलेली नाही. शिवसेनेला प्रमुख प्रतिस्पर्धी मानणारे नारायण राणे असूदे किंवा राज ठाकरे यांची मागील १५ वर्षात झालेली राजकीय पिछेहाट बघता आता भाजपनंही शिवसेनेलाच दुश्मन क्रमांक एक मानल्यानं आता शिवसेना आणि भाजपात खरी लढाई सुरू झालीय.

'भाजप बंद दाराआड काही करत नाही, जे करते ते खुलेआम, डंका वाजवून करते...' असं म्हणत शिवसेनेवर तोफ डागणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेनं फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतो, असा सवाल करत यापुढील रणनीती स्पष्ट केलीय. भाजपच्या वागण्या-बोलण्यातून वैफल्य स्पष्टपणे दिसतेय. महाराष्ट्रातून भाजपची सत्ता उलथवून टाकल्याचा शिवसेनेचा बाण काळजात घुसल्यानंच, आम्ही शिवसेनेच्या वाटेनं गेलो असतो तर शिवसेनेचं अस्तित्वच उरलं नसतं, असा दावा शहा यांनी नुकताच कुडाळमध्ये नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी केल्यानं दोन्ही पक्ष आमने सामने ठाकले आहेत. अमित शहा यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत शिवसेनेनं सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना तापी नदीत सोडलं असा आरोप केला. मी शिवसेनेला बंद दाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं म्हणत आम्ही तुमच्या मार्गानं चाललो असतो, तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला. त्यावर शिवसेनेचं अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवर्‍या महाराष्ट्रानं स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्ध घातलीत असं महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, असा पलटवार शिवसेनेनं केल्यानं आगामी काळात होणार्‍या महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमने सामने असेल यात वाद नाही.

भाजपच्या वैफल्यग्रस्त होण्यामागे एकमेव कारण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याची सल काही त्यांच्या मनातून जात नाही. भाजपाच्या वागण्या-बोलण्यातून आता वैफल्य स्पष्टपणे दिसतेय. याचं कारण म्हणजे सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप विरोधी पक्षात आणि तीन चाकांची ऑटोरिक्षा असलेलं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळेच १०५ भाजप आमदारांचे १५० आमदार कधी होतील हे कळणार नाही, असा युक्तीवाद विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला. अगोदर महाविकास आघाडी सरकार एका महिन्यात, मग सहा महिन्यात नंतर एका वर्षात पडेल, अशा पोकळ घोषणा आणि तारखा देणारे भाजप नेते तोंडावर पडले आहेत. त्यानंतर बिहारच्या निवडणुकीचा मुहुर्त, आता पश्चिम बंगालच्या एप्रिल महिन्यात होणार्‍या निवडणुकीनंतर मे महिन्यात सरकार पडेल, अशा नवीन तारखा भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहेत. भाजपकडून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी हरएक प्रयत्न झाले आणि सुरूच आहेत. आता तर शिवसेना संपवण्याची भाषा भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शहा यांनी केल्यानं आता खर्‍या अर्थानं राज्याच्या राजकारणात शिवसेनेला त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चालून आलेली ही संधी आहे. कारण जेव्हा जेव्हा शिवसेनेला डिवचलं जातं तेव्हा तेव्हा शिवसैनिक उसळून उठतो आणि इतिहास घडवतो. बेताल राज्यकर्त्यांना आणि शिवसेनेच्या मुळावर उठलेल्यांना वेसण घालण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते.
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...