Thursday, 19 December 2019

सावरकर : एक शापित राजहंस

"निवडणुकीच्या आश्वासनात भाजपेयींनी महात्मा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणार असल्याचं जाहीर केलंय. महात्मा फुले हे वादातीत आहेत. मात्र सावरकर यांच्याबद्धल आक्षेप आहेत. काँग्रेस आणि डाव्यांनी विरोध दर्शविलाय. भाजपेयींना सावरकरांचा सन्मान करायचा आहे की बदनामी हेच कळत नाही. भारतरत्न पुरस्काराच्या निमित्तानं सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हे, तर माफीवीर होते. असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपेयींची याबाबतची भूमिका, सावरकर जीवनाचे अभ्यासक शेषराव मोरे व इतर शिवाय 'द वीक' या साप्ताहिकाच्या निरंजन टकले यांनी आणि श्रीकांत शेट्ये यांनी लिहिलेल्या पुस्तकातून सावरकरांबाबत घेतलेला धांडोळा. सावरकरांना भारतरत्न कशासाठी द्यायचं आहे. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत, त्यांच्या साहित्यसेवेबाबत की, सामाजिक सेवेबाबत? हे स्पष्ट झालेलं नाही. पण आपल्या राजकीय सोयीसाठी भाजपेयींकडून सावरकरांचा वापर केला जातोय का? त्यांना अधिकच विरोध झाला तर त्यांच्यासोबत महात्मा फुले यांचाही प्रस्ताव रद्द करण्याचा मानस तर नसावा! ह्या सगळ्या बाबींचा केलेला हा पंचनामा!"
--------------------------------------------------------

*निवडणूक काळात भारतरत्नची मागणी गैरच*
निवडणुकांच्या हंगामात मतांसाठी म्हणून भारतरत्नचा मुद्दा आणणं योग्य नव्हे. केवळ राजकीय हेतूंसाठी यापूर्वीच्या काळात तामिळ नट एम.जी.रामचंद्रन यांच्यासारख्या तद्दन फिल्मी गृहस्थाला भारतरत्न देऊन तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी त्या पुरस्काराची इभ्रत कधीच मातीत मिळवली. याच काँग्रेसनं मराठी मतांकडे आशाळभूतपणे पाहात निवडणुकीच्या तोंडावर सचिन तेंडुलकर याला भारतरत्न जाहीर केलं होतं. या सर्वापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले हे कर्तृत्व आणि समाजोपयोग या दोहोंत कितीतरी श्रेष्ठ. त्यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा हा निवडणुकीच्या तोंडावर काढण्याची भाजपेयींना काही गरज नव्हती. त्यामुळं याबाबतच्या उद्देशाला राजकीय हेतू चिकटतो. हे भान केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षानं दाखविलं नाही. अलीकडं हिंदुत्वाच्या नावानं आणाभाका घेणाऱ्या कोणीही उठावं आणि सावरकरांवर मालकी सांगावी असं सुरू असताना भारतरत्नसाठी नक्की कोणते सावरकर अभिप्रेत आहेत, हे आता विचारायला हवंय! ‘‘हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक रेणू कुमुहूर्तावर जरी एकत्र आलं तरी पाणी तयार होतं. मुहूर्त वगैरे पाहणं म्हणजे निव्वळ अंधश्रद्धाच!’’ असं मानणारे सावरकर या मंडळींना पचतील काय? बहुधा नसावेत. कारण विज्ञानातील उच्च संकल्पनांवर आधारित विमानाचं स्वागत करताना मीठमिरची, लिंबू आदी ओवाळण्याची गरज ज्यांना वाटते त्यांचा आणि सावरकरांचा संबंध काय? ‘‘सध्याचं युग हे यंत्रांचं आहे आणि त्या आघाडीवर भारत हा युरोपपेक्षा तब्बल २०० वर्षे मागं आहे,’’ असं मानणारे आणि तसं ठामपणे लिहिणारे सावरकर पुराणातल्या वानग्यांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना माहीत आहेत काय? नवसपूर्तीसाठी पोटावर सरपटत जाणाऱ्याची सावरकरांनी केलेली संभावना आजच्या धर्ममार्तंडांना झेपेल काय? नाशिक इथल्या कुणा लहरीमहाराज या इसमानं रामनाम लिहिलेल्या ११ लाख चिठ्ठ्या सुगंधी पिठाच्या गोळ्यांत घालून गंगार्पण करण्याचं व्रत अंगीकारलं. ते पूर्णत्वासाठी जाईपर्यंत मौन धारण करण्याची घोषणा केली. हे सर्व कशासाठी? तर मानवजातीच्या भल्यासाठी, असं त्याचं उत्तर होतं. त्याचा समाचार घेताना सावरकर त्यांच्या ‘क्ष किरणे’ यांत लिहितात ‘‘या लहरीमहाराजाच्या व्रतानं मानवजातीचा कोणताही लाभ होणार नसून झालाच तर तो पाण्यातील मासे आणि बेडकांचा होईल.’’ अशावेळी आज कोणत्याही सोम्यागोम्या बाबा, बापू वा तत्समांसमोर माथे टेकणाऱ्या, त्यांना शपथविधीच्या वेळी व्यासपीठावरच बसविणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांस हे सावरकर आदरणीय वाटतात काय?

*सावरकरांना भिडण्याची वैचारिक क्षमता आपल्यात आहे का?
सावरकरांच्या मते, ‘‘वृषपूजा ही लिंगपूजेचीच एक आनुषंगिक पद्धती आहे,’’ हे पुराणकाळात ठीक होतं. पण ज्ञानविज्ञानाचे शोध जसजसे लागत गेले तसतसे यात बदल होणं गरजेचं होतं, असं सावरकर नमूद करतात. कारण ‘‘मनुष्यानं देव म्हणून ज्याची पूजा करावयाची ते तत्त्व, प्रतीक हे गुणांत मानवाहून श्रेष्ठ हवं. मनुष्याचा देव हा मनुष्याहूनही हीन असेल तर त्या देवानंच भक्ताची पूजा करणं उचित ठरेल,’’ असं सावरकर गाईला माता म्हणणाऱ्यांना बजावतात. इतकंच नाही तर पशुपूजेला सावरकर ‘हिणकस वेड’ ठरवतात. ‘‘ब्रह्मसृष्टीत गाय आणि गाढव समानच आहेत,’’ असे सावरकर मानतात. आणि गाईचं ‘मूत नि गोमय ओंजळ ओंजळ पितात वा शिंपडतात’ पण ‘‘डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या एखाद्या शुद्ध नि त्यांच्याहूनही सुप्रज्ञ पूर्वास्पृश्याच्या हातचं स्वच्छ गंगोदकही विटाळ मानतात,’’ अशा हिंदूंची सावरकर यथेच्छ निर्भर्त्सना करतात. ‘‘गाईत देव आहेत असं पोथ्या सांगतात आणि वराहावतारी देव डुक्कर झाले होते असेही पोथ्या सांगतात. मग गोरक्षणच का करावं? ’’ या सावरकरांच्या प्रश्नास भिडण्याची वैचारिक क्षमता आपल्यात आहे का? या प्रश्नाचं उत्तर भारतरत्नाआधी मिळायला हवं. सावरकर म्हणजे हिंदुत्ववाद इतकंच नाही. त्यांना अनेक विषयांत रुची होती आणि त्यासंबंधानं त्यांनी विस्तृत मतप्रदर्शन करून ठेवलंय. असे अनेक मुद्दे सांगता येतील. पण याबाबत अत्यंत अप्रचलित विषय म्हणजे चित्रपट. ‘‘चित्रपट ही २०व्या शतकानं मानवाला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे,’’ असं ते मानत. पण त्याचबरोबर या माध्यमाच्या अभिव्यक्तीवर येणारे निर्बंध सावरकरांना अमान्य होते, हे त्यांना भारतरत्न देऊ  पाहणाऱ्यांना माहीत आहे का? ‘‘आधुनिक संस्कृती आणि आधुनिक विचार हा शोधांतून, नावीन्याच्या हव्यासातून विकसित झालेला आहे. या सर्वाचे प्रतिबिंब चित्रपटांत पडते,’’ असं मानणाऱ्या सावरकरांनी इंग्लंडमधल्या आपल्या वास्तव्यात आपण कसा विविध विषयांवरील सिनेमाचा मुक्तपणे आस्वाद घेतला हेदेखील नमूद करून ठेवलंय. तेव्हा आपल्या विचारांच्या नसलेल्या चित्रपटांवर बंदी घालण्याची सर्रास मागणी करणाऱ्यांच्या गळी हे सावरकर उतरतील काय?

*मुसलमानांनी आधुनिकतेची कास धरायला हवी*
या सावरकरांनी १९३९ साली केलेल्या एका भाषणात हिंदू आणि मुसलमान कसे सुखासमाधानाने राहू शकतील यावर विवेचन केलंय. ‘सर्व नागरिकांना समान अधिकार असायला हवेत’, ‘मुक्त विचारस्वातंत्र्य, पूजाअर्चेचं स्वातंत्र्य सर्वांनाच असायला हवं’, ‘अल्पसंख्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था आदींचं स्वातंत्र्य असायला हवं’, ‘त्यांच्यासाठी सरकार स्वतंत्र काही खर्च करू शकते परंतु त्या रकमेचं प्रमाण त्या समाजाकडून दिल्या जाणाऱ्या कर रकमेशी निगडित ठेवावं’, अशी सावरकरांची सूचना होती. ती ‘हिंदूंनाही लागू करावी’ असं त्यांचं म्हणणं होतं हे समान नागरी कायद्याची एकतर्फी आणि अज्ञानी भुणभुण लावणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. याचं कारण आजही ‘हिंदू अविभक्त कुटुंब’ असं कारण पुढं करीत कर कमी करण्याची मुभा हिंदूंनाच आहे. ती अर्थातच अहिंदूंना नाही. याचा अर्थ समान नागरी कायदा झालाच तर हिंदूंना अन्य धर्मियांच्याप्रमाणे कर भरावे लागतील. समान नागरी कायद्याचा सोयीस्कर वापर करणाऱ्यांना ही बाब ठाऊक आहे काय? इतकंच नव्हे तर हिंदूंप्रमाणे मुसलमानांनीही आधुनिकतेची कास धरायला हवी, असा सावरकरांचा आग्रह होता. त्यासाठी मुसलमानांनी तुर्कस्थानच्या केमाल पाशा याचा आदर्श ठेवावा, अशी त्यांची मसलत होती. हे सर्व मुसलमानांनी त्यांच्या भल्यासाठी करायला हवं, हे त्यांचं म्हणणं आज इस्लामी विश्वातच केमाल पाशा नकोसा झालेला असताना किती महत्त्वाचं आहे ते कळतं. या दोघांनीही.. म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांनी.. प्रगतीशील युरोपचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवं, हा त्यांचा आग्रह होता. का? तर ‘आमच्या यज्ञ, याग, वेद, धर्मग्रंथ, त्यातील शाप उ:शाप यामुळं युरोपचं काहीही वाकडं झालं नाही त्याप्रमाणे तुमच्या तावीज, नमाज, कुर्बानी.. हेही त्यांना रोखू शकत नाहीत,’ हे सावरकरांचं मत भारताला विश्वगुरू वगैरे करू पाहणाऱ्यांना आजही पेलणारं नाही.स्वातंत्र्यपूर्वकाळात बिहारमध्ये झालेला भूकंप हा जातीप्रथा न पाळल्यामुळं निसर्गाचा झालेला कोप आहे, असं विधान महात्मा गांधी यांनी केलं होतं. त्याचा सुयोग्य समाचार घेणारे सावरकर, केवळ गांधींवर टीका केली म्हणून हिंदुत्ववाद्यांना प्रिय असतील तर या मंडळींनी केरळातील पूर हा महिलांवरील शबरीमला मंदिर प्रवेशबंदी उठवल्यामुळं आला असं म्हणणाऱ्यांची वासलात सावरकरांनी कशी लावली असती, याचाही विचार भाजपेयींनी करावा. तेव्हा सद्य:स्थितीत आजच्या नवहिंदुत्ववाद्यांना सावरकरांना भारतरत्न दिलं जावं या मागणीनं आनंद वाटेल, ते सुखावतीलही. पण हे सुख अज्ञानातलं आहे. या अज्ञानाचाच धिक्कार सावरकरांनी आयुष्यभर केला. म्हणून नक्की कोणते सावरकर आपल्याला हवेत याचा विचार ज्ञानेच्छूंनी करावा. या ज्ञानापेक्षा भारतरत्न मोठे नाही.

*सावरकरांबाबत सुरस व चमत्कारिक कहाण्या* 
आयुष्यभर हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. तेव्हापासून आजतागायत अनेक जण सावरकरांचं नाव अनेकप्रकारे गांधीहत्येशी कायम जोडत आले आहेत. त्यानं सावरकरांचं कार्यकर्तृत्व डागाळत आलं. त्याच्या विराधात सावरकरांच्या जीवनाचे अभ्यासक शेषराव मोरे यांनी डिसेंबर २०१५ मध्ये अंदमान इथं झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात आवाज उठवला होता. संमेलनाध्यक्ष म्हणून शेषरावांनी केलेलं संपूर्ण भाषण हे सावरकरांविषयीचं होतं. त्यात त्यांनी सावरकरांचे विचार, त्यांचं लेखन, साहित्य, अभ्यास करण्यासाठी मिळालेली प्रेरणा यावर ते प्रामुख्यानं बोलले. "सावरकरांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी 'कपूर समिती' तेव्हाच्या काँग्रेस सरकारनं नेमली होती. या समितीनं सावरकरांना अकारण गोवून बदनाम केलं. आता केंद्रात आणि राज्यात सावरकरांना मानणारं सरकार असल्यानं त्यांनी सावरकरांवरील हा कलंक पुसला गेला पाहिजे." अशी अपेक्षा तेव्हा शेषरावांनी व्यक्त केली होती मात्र ते झालं नाही. सावरकरांचा विचार आणि त्यांचा कार्यकर्तृत्वभाव याचा अनेकांनी आपल्या लेखनातून आजवर मांडला आहे. सावरकरांच्या विचारांबद्धल कुणाचं कितीही मतभेद असलं, तरी त्यांच्या विचारातली स्पष्टता दखलपात्र ठरली. हिंदुधर्मातल्या जातिभेदांचा उच्छेद व्हावा यासाठी सावरकर आग्रही होते. देव-धर्माच्या खुळचट कल्पनांना-विधी-रूढींना त्यांनी कठोर शब्दात झिडकारलं होतं. आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांनी लेखनाचे विविधप्रकार प्रभावीपणे वापरले होते. लेखणीप्रमाणेच त्यांच्या वाणीतही सौष्ठव होतं. तथापि सावरकर भक्त त्यांना 'फ्रान्सच्या मार्सेलीस खाडीत बोटीतून मारलेल्या उडीत'च बुडवत राहिले. रा.म.आठवले, भा.कृ.केळकर, मो.शि.गोखले, सदाशिव रानडे, रघुनाथ भोपे, गोविंदस्वामी आफळे, शि.ल. करंदीकर अशा अनेकांनी सावरकरांच्या हयातीत त्यांच्यावर लेखन केलं. पण ते सुरस आणि चमत्कारिक कहाण्यांच्या पलीकडे गेलं नाही. सावरकरांच्या पश्चात द.न.गोखले यांनी अत्यंत प्रभावीपणे सावरकरांच्या जीवनाचं आणि विचारांचं रहस्य उलगडलं. हे सारं आजवरचं लेखन हे सोवळी पाशात अडकलेलं होतं. ते सोडविण्याचं काम शेषराव मोरे यांनी केलं. 'सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद', 'सावरकरांचे समाजकारण', 'सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग', 'विचारकलह', या त्यांच्या ग्रंथातून शेषरावांच्या सावरकर यांच्या विषयीच्या अभ्यासाची साक्ष मिळते. त्यातून ते सावरकरभक्त नाहीत हे स्पष्टपणे, ठळकपणेे दिसतं. त्यांचं 'अप्रिय पण...!' या नावाचं सदर दैनिक सामनामधून बरीच वर्षे प्रकाशित होत होतं. त्याचं पुढं ग्रंथात रुपांतरही झालं. त्यातही त्यांच्या तटस्थतेचं दर्शन घडतं.

*खरे 'सावरकर' मांडण्याचं काम अनुयायांनी केलंच नाही!*
सावरकरांबाबत वस्तुनिष्ठ लेखन करणारे शेषराव हे जांब- नांदेडसारख्या भागात राहून त्यांनी सावरकरवादाचा अभ्यास केला. या अभ्यासाची प्रेरणा त्यांना त्यांचे शिक्षक उप्पे गुरुजी या लिंगायत समाजातील व्यक्तीनं दिली. तथापि, मूळचे रा.स्व.संघाचे पण मतभेदांमुळे 'सावरकरवादी' झालेल्या धों.वि.देशपांडे, दि.वि.गोखले, स.ह.देशपांडे, ग.वा.बेहेरे यांनी शेषरावांना वेळीच समीक्षकी प्रशस्ती, प्रसिद्धी देऊन 'सावरकरवादी' करून टाकलं. परंतु शेषरावांनी आपला बुद्धिवाद आणि तार्किकता केवळ सावरकरांना शुद्ध करून घेण्यासाठीच वापरलेली नाही. त्यांच्या 'विचारकलह' या ग्रंथातील खरा 'सावरकर' मांडण्याचं काम अनुयायांनी केलंच नाही! 'शाहू महाराज : ब्राह्मणशाहीला शह देणारा हिंदू सुधारक : मराठा समाजाची स्थिती व भवितव्य' हे लेख आवर्जून वाचावं असे आहेत. इतिहास, समाजशास्त्र, राजकारण, आणि विचारपद्धती याचा सुरेख संगम त्यांच्या लेखनातून दिसतो. त्यांना वैचारिक तटस्थतेचे फटके नक्कीच बसले असतील. दावा-उजवा-मध्यम, हिंदू-हिंदुत्ववादी, समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, फुलेवादी, सावरकरवादी, अशा नाना प्रकारचे वैचारिकवाद, समीक्षापद्धती देशात आहेत. त्या माध्यमातून साहित्य, विचार आणि समीक्षा क्षेत्रात राजकारण खेळणारेही आहेत. या खेळापासून शेषराव तसे दूर आहेत. पुरोगामी-प्रतिगामी, उजवा-डावा असे शिक्के मारून वर्गवारी करण्याची पद्धत महाराष्ट्रात पुरोगाम्यांनीच आणली. 'सावरकर यांच्याविषयी मी लिहिल्यानं मला प्रतिगामी ठरवलं गेलं!' अशी खंत शेषराव मोरे व्यक्त करतात. त्यात तथ्यच नाही, तर वस्तुस्थती आहे

*फुकाच्या फुसक्या युक्तिवादानं सावरकरांची अधिक बदनामी*
शेषरावांनी संमेलनाध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात पुरोगाम्यांच्या या व्यवहाराला 'दहशतवाद' म्हणणं तितकंसं खरं नाही, तो अतिरेक झाला. दहशतवाद हा माणसाच्या बुद्धीला गुलाम करणारा असतो. तसा जीवघेणाही असतो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतचा आग्रह सावरकरांनी अत्यंत कठोरपणे धरला होता. देव-धर्माच्या खुळांची त्यांनी चिरफाड केली आहे. 'एकवेळ गायीची थोडी हत्या झाली, तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राच्या बुद्धीची हत्या होऊ नये.' असं सावरकर म्हणत. संघवाद्यांनी विचार साम्य असूनही सावरकरवाद्यांपासून आपलं वेगळंपण जपलं आहे. सावरकरांवरचा गांधी हत्येचा कटाचा कलंक पुसणं, हे आता सहजसोपं आहे, असं शेषरावांना वाटलं असेल; तर ते सावरकर अभ्यासकाचं लक्षण नाही. अशाप्रकारे उचापती सावरकरभक्त करतात. भक्त मंडळी नेहमी सत्याला बगल देण्याचा प्रयत्न करतात. 'गांधीहत्या कटाचा साथीदार' या सावरकरांच्या कलंकाची चर्चा कुणी करत नाही. १८५७ मध्ये ब्रिटिश सरकार विरोधात हिंदुस्थानात उठाव झाला होता. त्यावर सावरकरांनी 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहिला. त्यावर १८५७ च्या शताब्दी निमित्तानं इतिहास संशोधक न.र.फाटक यांनी 'हे स्वातंत्र्यसमर नव्हतं तर ते शिपायांचं बंड होतं.' हे स्पष्ट करणारा  ग्रंथ लिहिला होता. अशीच समीक्षा करणारं प्रबोधनकार ठाकरे यांचं भाषणही आहे. सावरकरांनी लिहिलेला हा ग्रंथ प्रकाशित केला म्हणून ब्रिटिश सरकारनं सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली याला गोळ्या घालून मारलं. तर नाशकात कलेक्टर जॅक्सनला अनंत कान्हेरेनं पिस्तूलानं उडवलं. १९१० मध्ये नाशिकच्या प्रकरणातील ही पिस्तुलं सावरकरांनी पाठवली म्हणून त्यांना अटक झाली. तिथून सावरकरांना आणतानाच त्यांनी मार्सेलीस खाडीत उडी मारली. पण सावरकरांना तिथून पळ काढता आला नाही. ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना पकडलं. भारतात आणलं. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून ब्रिटिश सरकारनं त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानच्या काळ कोठडीत डांबलं. तिथं त्यांना मणामणाच्या बेड्यांत अडकवलं होतं. तेलाच्या घाण्याला कसं जुंपलं होतं; याच्या दर्दभऱ्या कहाण्या आहेत. तथापि सावरकरांनी शिक्षेची ११ वर्षे झाल्यानंतर 'ब्रिटिश सरकार विरोधात कोणतंही काम करणार नाही,' असा माफीनामा देऊन स्वतःची काळकोठडीतून सुटका करून घेतली. अर्थात, अंदमानातली ११ वर्षे ही शिक्षा काही कमी नाही. हा इतिहास आहे. त्याचं समर्थन सावरकरांनी कधी केलं नाही. किंबहुना सावरकरभक्तांच्या फुकाच्या फुसक्या युक्तिवादानं सावरकरांची अधिक बदनामी झाली. सावरकर कठोर बुद्धिनिष्ठ होते, पण ते विज्ञाननिष्ठ होते. हा शुद्ध भ्रम आहे. ते विज्ञाननिष्ठ असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा निर्णय जाहीर करताच, आंबेडकरांची उडी हिंदुधर्मातच! 'बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे' अशी शेंडीला गाठ मारणारी भाषा सावरकरांनी वापरली नसती. अवतार ही कल्पना विज्ञाननिष्ठेतेत बसत नाही. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तर सावरकरांची कठोर बुद्धिनिष्ठताही पातळ झाली. म्हणूनच त्यांनी पत्थरी देवदेवतांच्या आरत्या लिहितात तशी शिवरायांवर आरती लिहिली.... 'जय देव जय देव जय श्री शिवराया....'. दलित-दलितेतर एकत्र यावेत, यासाठी सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत तिथं 'पतित पावन मंदिर' स्थापन केलं. म्हणजे सोवळ्याची; दलित-मागासांना प्रवेश नसलेली मंदिरं तशीच ठेवली; आणि पतितपावन हे तिसरंच मंदिर निर्माण केलं.  तथापि कुणाला पतित म्हणणं हे चूक; त्याच्यापेक्षा पतितपावन करून घेणं , महाचुकच! असो!

'द वीक'नं सावरकरांच्या माफीनाम्याचे पुरावे दिले*
विनायक दामोदर सावरकर यांना 'वीर' हे विशेषण १९२० मध्ये भालाकार भोपटकर यांनी पहिल्यांदा वापरलं आणि ते रूढ झालं. पुढं 'वीर सावरकर' यांचं त्यांच्या भक्तांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' असं केलं. परंतू सावरकरांच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हे तर माफीवीर असल्याचं 'द वीक' या इंग्रजी साप्ताहिकाच्या कव्हर स्टोरीत २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंकात हे मांडण्यात आलं होतं. सावरकरांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात यावं अशी मागणी होत असताना त्यावेळी ही माहिती पुढं आल्यानं सावरकर भक्तांची पंचाईत झाली ही माहिती जर राजकीय स्वरूपाची वा डाव्यांनी अथवा काँग्रेसजनांनी केलेल्या आरोपाची असती, तर ती उडवून लावता आले असती. पण 'द वीक' सारख्या देशातील एका जबाबदार नियतकालिकेनं ती पुढं आणली होती. ते ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडल्यानं ती खोडून काढता येणार आजवर शक्य झालेले नाही. सावरकर भक्त त्यामागच्या कारणांचा विश्लेषण करताना त्यातूनही ही सावरकरांचं उदात्तीकरण करू शकतील. मात्र त्यानं वस्तुस्थिती काही लपणार नाही केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार असताना २००३ मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचं पहिलं तैलचित्र महात्मा गांधीच्या तसबिरीच्या अगदी समोर लावण्यात आलं. त्यावेळी झालेल्या समारंभावर काँग्रेस आणि इतर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. असा प्रकार संसदेच्या इतिहासात तो एकमेव असा आहे त्यावेळचा हा विरोध केवळ राजकीय स्वरूपाचा नव्हता तर स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणाऱ्या सावरकरांना विरोध करण्याची भूमिका त्यामागं होती हे स्पष्ट झालं.

*संघ परिवार हरप्रकारे सावरकरांना चर्चेत आणून बदनाम करतो*
काही वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या वेबसाईटचे अनावरण केलं होतं. तेव्हा त्यांनी आपला पहिला ब्लॉग सावरकर यांना अर्पण केला होता. यावरून आजच्या भाजपेयीं राज्यकर्त्यांना सावरकर किती प्रिय आहेत हे लक्षात येतं. भाजपला सावरकर हिंदूवादी म्हणून प्रिय आहेतच. परंतु कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचं आणि अभ्यासावर आधारित वस्तुनिष्ठ माहितीचं वावडं असलेल्या त्यांच्या परिवारातल्या इतरांनाही तेवढेच प्रिय आहेत. त्यामुळं शिवसेनेनेही मोदी सरकार आल्यापासून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी नव्वदच्या दशकात लाखो सह्यांची मोहीम चालविली होती. ज्येष्ठ साहित्यिक आणि शिवसेना खासदार स्व. नारायण आठवले यांनी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडं महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावं अशी मागणी केली होती. सावरकरांच्या अनुषंगानं अलीकडच्या काळात घडलेल्या या काही महत्त्वाच्या घटना घडामोडी आहेत या सगळ्या गोष्टी सावरकरांचा गौरव व्हावा यासाठी केल्या जातात की त्यांच्या बदनामीत वाढ व्हावी, यासाठी केलं जातं, असा प्रश्न काही सावरकर भक्तांनाही पडतो. हिंदुत्वाच्या राजकारणाचे जनक म्हणून सावरकरांची ओळख आहे. त्यांचे हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपपेक्षा वेगळा आहे. सावरकर आणि त्यांच्या हिंदू माणसाला संपवण्यासाठी संघाची स्थापना झाली आणि संघ परिवार हरप्रकारे सावरकरांना चर्चेत आणून बदनाम करतो असं लिहिणारे बोलणारे सावरकरवादी देखील आहेत. या पार्श्वभूमीवर 'द वीक'नं मात्र अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकरांच्या 'वीर' विशेषणाचा पंचनामा केला. या साप्ताहिकाचे प्रतिनिधी निरंजन टकले यांनी हा स्पेशल रिपोर्ट लिहिलाय. त्यातील महत्त्वाचं तसंच काही सांगण्यापूर्वी टकले यांची पार्श्वभूमी ही विचार घेतली पाहिजे. निरंजन टकले हे मूळचे नाशिकचे. नाशिक जिल्ह्यातील भगूर हे सावरकर यांचे जन्मगाव. स्वाभाविकपणे निरंजन टकले यांना सावरकरांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी होती. त्यापोटीच ते सावरकरांच्या संदर्भात माहिती घेत कागदपत्र तपासत राहिले. म्हणजे एका स्वातंत्र्यवीराच्या भूतकाळातील आयुष्याचा प्रेमापोटी शोध घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. मात्र त्या प्रयत्नांमध्ये त्यांना जी माहिती मिळत गेली ती पाहिल्यावर त्यांचा या स्वातंत्र्यवीरांच्या कथित पराक्रमाच्या गोष्टींबद्दल पुरता भ्रमनिरास झाला आणि त्यातूनच त्यांच्या 'द वीक' मधील स्पेशल रिपोर्टचं शीर्षक 'शेळीचं सिंह म्हणून उदात्तीकरण' असं होतं. म्हणजे सावरकरांना सिंह वगैरे जे म्हटलं जातं ते खरं नाही. उलट ते अतिशय घाबरट होते. ब्रिटिशसत्तेविरूद्ध त्यांनी संघर्ष केला नाही, तर शिक्षेतून माफी मिळण्यासाठी वारंवार केलेल्या दया याचिकेबाबत सावरकरांच्या संदर्भातील शोधातून हे असत्य आढळलं. त्यावरूनच लेखाचं शीर्षक दिलं असल्याचं टकले यांचं म्हणणं होतं.

* सन्मान देणं ही मोदींची प्रतीकात्मक कृती होती*
'द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट' या पुस्तकाचे लेखक नीलंजन मुखोपाध्याय यांनी सांगितलं, की २६ मे २०१४ ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोनच दिवसांनी सावरकरांचा १३१ वा जन्मदिवस होता. त्याचं औचित्य साधून मोदींनी संसद भवनातील सावरकरांच्या फोटोला अभिवादन केलं होतं. असं असलं तरी सावरकर हे विवादास्पद व्यक्तिमत्त्व होतं हेही आपल्याला मान्य करायलाच हवं. "गांधी हत्येप्रकरणी सावरकरांवर खटला दाखल करण्यात आला होता. ते सुटले असले तरी त्यांच्या हयातीतच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग नेमण्यात आला होता आणि या आयोगाच्या अहवालात सावकरांवर कायमच संशयाची सुई होती. अशा नेत्याला सार्वजनिक आयुष्यात इतका सन्मान देणं ही मोदींची प्रतीकात्मक कृती होती," असंही मुखोपाध्याय यांनी म्हटलं. नाशकात कलेक्टर जॅक्सनला अनंत कान्हेरेनं पिस्तूलानं उडवलं. १९१० मध्ये नाशिकच्या प्रकरणातील ही पिस्तुलं सावरकरांनी पाठवली म्हणून त्यांना अटक झाली. तिथून सावरकरांना आणतानाच त्यांनी मार्सेलीस खाडीत उडी मारली. पण सावरकरांना तिथून पळ काढता आला नाही. ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना पकडलं. भारतात आणलं. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून ब्रिटिश सरकारनं त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानच्या काळ कोठडीत डांबलं.

*त्या 'प्रसिद्ध' उडीनंतर…
*यापुढची गोष्ट 'ब्रेव्हहार्ट' नावानं सावरकरांचं चरित्र लिहिणारे आशुतोष देशमुख सांगतात. "सावरकरांनी जाणूनबुजून आपला नाइट गाउनचा घातला होता. शौचालयाच्या दरवाजाला काच होती, जेणेकरून कैद्यांवर नजर ठेवता येईल. सावरकरांनी आपला गाउन काढून दरवाजावरील काचेवर टाकला." "त्यांनी आधीच शौचालयाच्या पोर्ट होलचं माप घेतलं होतं आणि त्यांना अंदाज होता, की आपण यातून बाहेर जाऊ शकतो. आपल्या काटकुळ्या शरीराला त्यांनी पोर्ट होलमधून समुद्रात झोकून दिलं." सुभाषचंद्र आणि सावरकर या वैचारिक विरोधकांमध्ये समान दुवा होता का? अलीगढ विद्यापीठ वाद : 'जिन्नांच्या फोटोला विरोध मग सावरकरांचा फोटो कसा चालतो' "नाशिकमध्ये घेतलेलं पोहोण्याचं प्रशिक्षण त्यांच्या कामी आलं आणि ते वेगानं किनाऱ्याच्या दिशेनं जायला लागले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, मात्र ते बचावले," असं आशुतोष देशमुख यांनी सांगितलं. देशमुख पुढे लिहितात, की सावरकरांच्या पाठोपाठ सुरक्षारक्षकांनीही समुद्रात उडी मारली आणि त्यांचा पाठलाग करायला लागले. "सावरकर जवळपास १५ मिनिटं पोहून किनाऱ्यावर पोहोचले. वेगानं धावत त्यांनी किमान अर्धा किलोमीटरचं अंतर पार केलं. त्यांच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. तेव्हा त्यांना एक पोलीस अधिकारी दिसला. त्याच्याजवळ जाऊन सावरकरांनी विनंती केली, की त्यांना राजकीय आश्रयासाठी मॅजिस्ट्रेटकडे नेलं जावं. मात्र त्यांच्या मागावर असलेले सुरक्षारक्षकही तोवर किनाऱ्यावर पोहोचले होते आणि 'चोर, चोर' असं ओरडत होते. सावरकरांनी खूप विरोध केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांना पकडण्यात आलं.

*अंदमानच्या सेल्युलर जेलमधले दिवस*
पकडले गेल्यानंतर सावरकरांना भारतात पाठवलं गेलं आणि पुढची २५ वर्षें ते इंग्रजांचे कैदी बनून राहिले. त्यांना २५-२५ वर्षांच्या कारवासाच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या आणि शिक्षा भोगण्यासाठी भारतातील अंदमान इथं पाठविण्यात आलं. या शिक्षेला 'काळ्या पाण्या'ची शिक्षाही म्हणायचे. त्यांना ६९८ खोल्यांमधील सेल्युलर जेलमध्ये १३.५ बाय ७.५ आकाराच्या खोली क्रमांक ५२ मध्ये ठेवण्यात आलं होतं. जेलमधील जीवनक्रमाबद्दल आशुतोष देशमुख यांनी लिहिलं आहे, की अंदमानमध्ये सरकारी अधिकारी बग्गीमधून जायचे आणि राजकीय कैद्यांना या बग्ग्या ओढाव्या लागायच्या. "तिथले रस्तेही धड नव्हते आणि बराचसा भाग हा डोंगराळ होता. जेव्हा कैदी बग्गी ओढू शकायचे नाहीत, तेव्हा त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली जायची. त्रास देणाऱ्या कैद्यांना जेवण्यासाठी केवळ पाणचट सूप दिलं जायचं." अनेकदा कैद्यांना हातकड्या आणि बेड्या घालून उभं रहायची शिक्षाही दिली जायची. या सेल्युलर जेलमध्येच सावरकरांच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू झाला होता. या तुरूंगात त्यांनी घालविलेल्या ९ वर्षें आणि १० महिन्यांनी त्यांचा इंग्रजांना असलेला विरोध पूर्णपणे मावळला. निरंजन टकले सांगतात, "मी सावरकरांच्या आयुष्याकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाहतो. त्यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा हा रोमँटिक क्रांतिकारी विचारांनी भारलेला होता. याच काळात त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावर पुस्तकही लिहिलं होतं. त्यात त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला होता." "अटक झाल्यानंतर सावरकरांना वास्तवाची जाणीव झाली. ११ जुलै १९११ ला सावरकर अंदमानमध्ये दाखल झाले आणि २९ ऑगस्टला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. म्हणजेच तिथे पोहोचल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात. त्यानंतर ९ वर्षांच्या काळात त्यांनी सहा वेळा इंग्रजांना माफीनामा लिहून दिला. "जेलमधील नोंदींनुसार तिथं तीन-चार महिन्यांमध्ये कैद्यांना फाशी दिली जायची. फाशी देण्याचं ठिकाण हे सावरकरांच्या खोलीच्या बरोबर खाली होतं. कदाचित या गोष्टीचाही सावरकरांवर परिणाम झाला असावा. जेलर बॅरीनं सावरकरांना काही सवलती दिल्याचीही कुजबूज होती," असं निरंजन टकले सांगतात.

*टकले यांचा लेख आणि श्रीकांत*
मोदी सरकार गेल्या काही वर्षात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील कागदपत्रांवरून राजकारण करीत असल्याचं जाणवतं. यामागं नेताजींबद्धल प्रेम कमी आणि नेहरुंचा द्वेष अधिक! हे सूत्र लपून राहिलेलं नाही. नेताजींच्या मृत्यूचं गूढ असो किंवा त्यांच्यावर तत्कालीन भारत सरकारनं केलेला कथित अन्याय असो त्याला जवाहरलाल नेहरू जबाबदार असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे. नेहरु विरुद्ध बोस असा संघर्ष उभा करून नेहरूंना भारताच्या राजकारणातील खलनायक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेताजींच्या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र खुली करण्यामागं तेच राजकारण आहे; शिवाय नजीकच्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यात फायदा मिळवण्याच्या उद्देशही आहे. सरकारच्या या राजकीय प्रयत्नांना नेताजींचे नातू चंद्र बोस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रतिसादही दिला आहे. तर हे सगळं एक नेताजींच्या कागदपत्रांचे प्रकरण सुरू असतानाच सावरकरांबद्धलच्या आकर्षणातून टकले यांनी सावरकरांच्या पत्राचा धांडोळा घेतला. आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत गेल्या. अर्थात सावरकरांच्या माफी संदर्भातील काही गोष्टी यापूर्वी श्रीकांत शेट्ये यांनी 'माफीवीर सावरकर' या पुस्तकातून प्रसिद्ध केले आहेत. त्यात त्यांनी सावरकरांचे माफीनामे दिले आहेत ते असे आहेत.... ते म्हणतात, "मी घराबाहेर पडून बिघडलेला, उधळ्या, खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित राहण्यासाठी माझी अंदमानच्या तुरूंगातून सुटका करावी. मी १९११ मध्ये दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी विचार करणे माझी सुटका केली तर, इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही तुरुंगात आहोत, तोपर्यंत इंग्लंडच्या राजसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसे लागेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणाऱ्या सरकारचा जयजयकार करील." "एकदा मी स्वतः सरकारच्या बाजून झालो, की मला गुरुस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे, भारतातील आणि परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजून येतील. माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल. त्या पद्धतीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईलं. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पिता रुपी ही सरकारच्या दरबारातच नाही येणार तर कुठे जाणार? अशा प्रकारच्या माफीनामा सावरकरांनी ब्रिटिश सरकारला गुंगारा देण्यासाठी लिहिला होता, असं सावरकरवादी म्हणतात. अशांनी सावरकर यांचा १४ नोव्हेंबर १९१३ चा हा माफीनामा भारत सरकारच्या पुरातत्व विभागात पहावा असं श्रीकांत शेट्ये यांनी पुस्तकात नमूद केले आहे. श्रीकांत शेट्ये यांनी सावरकरांचे दोनच माफीनामे पुढे आणले. पण निरंजन टकले यांच्या शोधानुसार सावरकरांनी इंग्रज सरकारकडं एखाद-दुसरं माफीपत्र दिलं नाही, तर एकूण सात माफीपत्रं दिली आहेत. सावरकरांचा अतोनात छळ झाला म्हणून त्यांनी माफी मागितली, हेही खोटं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांनी काही तारखांचे पुरावे दिले आहेत. सावरकर ४ जुलै १९११ रोजी तुरुंगात दाखल झाले आणि माफी मागणारे पहिले पत्र ३० जुलै १९११ रोजी लिहिलेलं आहे. पहिले सहा महिने सावरकरांना एकट्याला एका सेलमध्ये ठेवले होतं. त्या काळात त्यांना कोणतेही काम सोपवलं नव्हतं. म्हणजे त्यांचा छळ वगैरे काही होत नव्हता. फक्त त्यांना कुणालाच भेटता येत नव्हतं. सावरकरांना पन्नास वर्षे तुरुंगात राहण्याची शिक्षा झाली होती. पण प्रत्यक्षात ते ९ वर्षे १० महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी स्वतः ७ माफीपत्र लिहिली आणि त्यांच्या पत्नीनं त्यांच्यातर्फे मुंबई सरकारकडून तीन माफीपत्र दिली. सावरकर यांच्या पत्रांची भाषा पाहिली तर, ते किती आर्जवी आणि ब्रिटिश सरकारची भलामण करणारी आहे हे लक्षात येते. आणि ती वाचून आश्‍चर्यही वाटतं. यातील महत्त्वाची बाब म्हणजे टकले यांच्या या लेखनात कुठेही मुद्दामहून सावरकरांना अनादर दाखवण्यासाठी प्रयत्न केलेला नाही की आरोपांचे टक्के नाहीत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले असते त्यांनी पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे पुढे आणलं होतं. यातील काही गोष्टी जुनी असल्या तरी, काही नव्याने पुढे आले आहेत. त्यासाठी २१ हजार कागदपत्रांचा अभ्यास त्यांनी अनेक महिने केला, असे टकले यांनी म्हटले आहे. या शोधातील काही दर्शन सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.येणाऱ्या काळात ब्रिटिश साम्राज्याला हिंदूंच्या मदतीनेच समान ध्येय ठरवावे लागेल. हिंदुमहासभा आणि ब्रिटिशांनी समान उद्देश ठेवून काम केले पाहिजे. सावरकरांच्या या पत्रातून काय स्पष्ट होतं ते पहा, काँग्रेस ही त्या काळात राष्ट्रीय चळवळ करणारी होती. रोडवर उतरणारा तो राजकीय पक्ष होता. म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिमांना विरोध करणे हा समान उद्देश सावरकरांनी ब्रिटिश सरकारला सूचित केला होता. 

*टकले यांचा लेख आणि श्रीकांत शेट्ये यांचं पुस्तक*
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये १९४२ च्या चलेजाव चळवळ याला विशेष महत्त्व आहे. या चळवळीला सावरकर यांनी जाहीरपणे पत्रक काढून विरोध केला होता. एवढेच नाही तर त्या काळात सावरकरांचे कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीच्या विरोधात पोलिसांना म्हणजे ब्रिटिश सरकारला माहिती पुरवत होते. म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात ब्रिटिशांचे खबरे म्हणून सावरकरांचे अनुयायी काम करत होते. स्वातंत्र्य चळवळीशी गद्दारी करत होते. रिस्पॉन्स को-ऑपरेशन अंतर्गत सरकारला मदत करायची, असं त्यांचं धोरण होतं. असं धरून असलेल्या सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं हे एक आश्चर्यच म्हणायला हवं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना पाठिंबा व साथ देणाऱ्या सैन्यात लष्कर भरतीसाठी हिंदू महासभेने रिक्रुटमेंट बोर्ड तयार केली होती. त्यासाठी जपान भारतावर आक्रमण करणार असा प्रचार केला जात होता. विशेष म्हणजे जपान त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मदत करत होता. आणि नेताजी जपानच्या मदतीने ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी भारतात आझाद हिंद फौज घेऊन घुसणार होते. म्हणजे तिथे पुन्हा एक गोष्ट लक्षात येते की, आज केंद्रातील मोदी सरकार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू संबंधित पासाची कागदपत्र खुली करून त्याच्या प्रदर्शनाचा प्रत्येक कार्यक्रम करते. त्याच नेताजींच्या विरोधात सावरकर उभे ठाकले होते; म्हणून प्रश्‍न निर्माण होतो. मोदी सरकार नेमकं कोणाच्या बाजूला आहे? नेताजींच्या की सावरकरांच्या? सगळ्या परिस्थितीचे अवलोकन केलं तर सरकार केवळ राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होते. तुरुंगातून सुटल्यानंतर कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे आम्ही सावरकर यांनी दिली असली तरी सामाजिक सुधारणेच्या नावाखाली तर राजकीय कार्य कार्य सुरू होतं. हिंदू महासभा अनेक राजकीय कार्यक्रम होत होते आणि ब्रिटिशांना सोयीचा असतील अशा कार्यक्रमांना परवानगी मिळत होती. हिंदू महासभेच्या धर्मांतराच्या किंवा शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळत असे. सावरकरांच्या अटकेसंदर्भातही विविध प्रवाद आहेत. या नव्या माहितीनुसार, त्यांना १३ मार्च १९१० रोजी लंडनमध्ये अटक झाली. नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येसाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. हत्या करणाऱ्या अनंत कान्हेरेने ज्या पिस्तुलाने जॅक्सनची हत्या केली, ते पिस्तूल सावरकरांनी लंडनहून पाठवलं होतं. म्हणूनच सावरकरांवर दोन आरोप होते, खून आणि खुनाचा कट करणे त्यासाठी प्रत्येकी पंचवीस वर्षाच्या अशा दोन जन्मठेपेच्या म्हणजे पन्नास वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. टकले यांना जेल डायरीत एक तपशील सापडला. तो आता काळ्यापाण्याची शिक्षा झालेल्या प्रत्येक कायद्याचं जेल हिस्टरी की टाकायचं. त्यामध्ये त्यांचा गुन्हा शिक्षा आणि त्याला दिलेल्या कामाचा उल्लेख असायचा. सावरकरांच्या या तिकिटावर कैदी नंबर ३२७७८ सेल ५२ तीन असा उल्लेख होता. त्यांचा भाऊ गणेश आणि बाबाराव हेसुद्धा त्यांच्यासोबत तुरुंगात होते. स्वातंत्र्यसैनिक राहिलो कचेना चक्रवर्ती यांनी लिहिला आहे की जेलमधील राजकीय कैदी दोन गटांमध्ये विभागले होते. नेमस्त म्हणजे मॉडरेट आणि जहाल किंवा अतिरेकी एक्स्ट्रीमीस्ट. सावरकर बंधू ,बंगाली क्रांतिकारक रवींद्र घोष आणि इतर काही कैदी हे आधी आले होते. ते स्थळ चुकीने त्रासले होते ते आमच्या संभाव्य चळवळीत सहभागी झाले नाहीत. सावरकर बंधू आम्हाला खासगीत प्रोत्साहन देत होते, परंतु उघडपणे आमच्या सोबत येण्यास तयार नव्हते. अंदमानमध्ये आलेल्या राजकीय कैदी आणि पैकी फक्त सावरकर बंधू आणि बरेंद्र घोष यांनी इंग्रजांकडे देयेचीयाचना केली. वि. दा. सावरकर यांनी केलेला दया च्या पत्राच्या सहा तारीख उपलब्ध आहेत. त्याच्या ३० ऑगस्ट १९११, १४ नोव्हेंबर १०१३, १४ सप्टेंबर १९१४, २ ऑक्टोबर १९१७ च्या २० जानेवारी १९२० आणि ३० मार्च १९२० याशिवाय सावरकरांच्या पत्नीनेही जुलै १९१५ ऑक्टोबर १९१५ आणि जानेवारी १९१९ मध्ये मुंबई सरकारकडे तीन माफीपत्र सादर केली होती. हे एवढे पुरावे कागदोपत्री उपलब्ध झाल्यानंतर सावरकरांना भारतरत्न द्यायचं की नाही याचा निर्णय सरकारने घेतला आहे. द्यायचं झालं तर ते त्यांना स्वातंत्र्य मिळते योगदानासाठी द्यायचं, भाषाशुद्धीच्या चळवळीसाठी द्यायचं की काव्य लेखनासाठी द्यायचं हे निश्चित ठरवावे लागेल

-हरीश केंची९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...