Thursday 24 January 2019

बाळासाहेब एक अग्निबाण!


"लाखो-करोडो मनावर अधिराज्य गाजवणारा हा महाराष्ट्रातील हिटलर म्हणूनच प्रत्येकाला तहहयात हवाहवासा वाटला. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पकड मनावर पहिल्या इतकीच घट्ट आहे. किंबहुना काळ जाईल तशी त्याची पाळेमुळे आणखी खोलवर जाताना दिसतील. महाराष्ट्रात पिढ्या येतील आणि जातीलही, मात्र बाळासाहेब ठाकरे आपल्या आचार-विचार, संघटन कौशल्य, आपले वक्तृत्व-लेखनशैली, बेधडकपणा, कलासक्तपणामुळे अजरामर राहतील."
--------------------------------------------------------

केवळ मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे तर देशात दबदबा निर्माण केलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल. कुठलेही संवैधानिक पद नसताना त्यांनी व्यक्ती आणि व्यवस्था दोहोंवरही आपला वचक निर्माण केला. राजकारणापासून उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत सर्वदूर अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा धाक होता. सत्ता अथवा आतंकवाद यालाच लोक बधतात, पण बाळासाहेब त्याला अपवाद होते. त्यांना निसर्गाने लेखणी आणि वाणी ही दोन अदभुत आणि विलक्षण अस्त्रे बहाल केली होती. त्या बळावरच त्यांनी दरारा निर्माण केला होता...

*आधार आणि विश्वास...!*
१९९४-९५ दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा माहोल होता. प्रचार शिगेला पोहोचला होता. काँग्रेसविरुद्ध शिवसेना-भाजपा युतीचा आक्रमकपणे प्रचार सुरू होता. अयोध्येतील बाबरी मशीदचे पतन, त्यानंतर देशभर उसळलेल्या हिंदू-मुस्लिम दंगली आणि मुंबईत दाऊद इब्राहिमने घडवलेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या कटू आठवणी अद्याप ताज्या होत्या. या घटनांना अवघी दीड-दोन वर्षेच झाली होती. आता सर्वकाही पूर्वपदावर होते, पण या घटनांची मुंबईने खूप मोठी किंमत मोजली होती. १९९२ चा डिसेंबर आणि १९९३ चा जानेवारी असे दोन महिने हे शहर जळत होते. कायदा आणि सुव्यवस्था पार कोलमडून पडली होती. मुंबईला जणू युद्धभूमीचे स्वरूप आले होते. हिंदूवस्त्या आणि मुस्लिम मोहल्ले एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. देव आणि धर्मापायी दोन्ही समाजातील लोक प्राण हातात घेऊन फिरत होते. त्यात बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक हिंदूरक्षक म्हणून सर्वात पुढे होते. मुंबई-महाराष्ट्रातील तमाम हिंदूंना बाळासाहेब आधार आणि विश्वास वाटत होते!

*बॉम्बस्फोटाच्या आठवणी कायम*
अखेर शहरात लष्कर घुसवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली होती. तोपर्यंत यात ९०० माणसे मारली गेली होती. हा सरकारी आकडा होता. कदाचित ही संख्या त्याहून अधिक असावी. जायबंदी झालेल्यांचा आकडा अगणित होता. तोच ‪१२ मार्च‬ १९९३ रोजी १२ बॉम्बस्फोटांनी मुंबई पुन्हा हादरली होती. त्यात २५७ निष्पाप लोकांचा जीव गेला होता. हजारच्या आसपास माणसे जखमी झाली होती. या घटनेनंतर प्रथमच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत होत्या. या निवडणुकांना या साऱ्या घटनांची झालर होती.

*बाबरीपतनाची जबाबदारी स्वीकारली*
' बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे,’ अशी जाहीर कबुली देत ‘हिंदूंचे मसिहा’ अशी बाळासाहेब ठाकरेंनी स्वत:ची नवी ओळख प्रस्थापित केली होती. निवडणुकीच्या माहोलमध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली होती. लाखोंच्या सभा होत होत्या. दैनिक सामनाचा वार्ताहर म्हणून मी काम करीत होतो. ऐन तारुण्यातला उमेदीचा काळ होता. अपार मेहनत घेण्याची तयारी होती. बाळासाहेबांच्या त्यावेळच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व प्रचार सभांचे वृत्तांकन करण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. वृत्तांकनापेक्षाही बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण होते. त्यांची सडपातळ शरीरयष्टी, अत्यंत शांत पण भेदक डोळे, टोकदार नाक अन् शब्द नव्हे, धनुष्यातून अचूक बाण सुटावेत अशी जहाल वाणी हे सर्वकाही जवळून पाहण्याची अन् त्यांची ती धारदार भाषणे ऐकण्याची संधी ही एक पर्वणी वाटायची.

तासाभराच्या भाषणात बाळासाहेबांचे विविधांगी पैलू अनुभवायला मिळायचे. सर्वच मुद्द्यांना स्पर्श करीत त्यावरील सडेतोड भाष्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संदर्भ, प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांचा कुठलाही मुलाहिजा न ठेवता त्यांना शब्दांनी घायाळ करण्याचे वाक्कौशल्य अन् मित्रपक्षातील नेतेमंडळींना चिमटे काढण्याचे कसब सर्वकाही विलक्षण भासायचे. १५-१६ वर्षांचे असल्यापासून एक श्रोता म्हणून गर्दीत बसून बाळासाहेबांची भाषणे ऐकत आलो होतो, पण बाळासाहेबांना जवळून पाहण्याची संधी मिळत नव्हती. पत्रकारितेने ती संधी उपलब्ध करून दिली होती.

*पत्रकारितेमुळे अनुभवता आलं*
तब्बल तीन दशकांच्या संघर्षानंतर शिवसेनेने भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने १९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्ता मिळवली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा ऐतिहासिक सत्ताबदल होता. लाखोंच्या सभा गाजवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्दीचे मतांमध्ये रूपांतर करण्याची किमया केली होती. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ८० जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेचे ७३, तर भाजपाचे ६५ आमदार निवडून आले होते. त्या वेळी जनता दलाचा काही अंशी प्रभाव होता. त्यांनी अकरा जागांवर विजय मिळवला होता. शेतकरी कामगार पक्षानेही सहा जागा जिंकल्या होत्या. कम्युनिस्ट तीन जागांवर विजयी झाले होते. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ४५ अपक्ष आमदार निवडून आले होते. सत्तास्थापनेसाठी १४५ जागांची आवश्यकता होती. काँग्रेसला ही जुळवाजुळव करण्यात अपयश आले.

*सत्ता आणि युतीचे शिल्पकार*
शिवसेना-भाजपाने अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या युती सरकारचे शिल्पकार होते. सहजपणे मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतु ते सत्तेच्या मोहात अडकले नाहीत. सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाणारी माणसे, उद्ध्वस्त झालेली कुटुंबे पाहिली आहेत, पण बाळासाहेब त्याला अपवाद ठरल्याचे अनुभवायला मिळाले. बाळासाहेब स्वत: मुख्यमंत्री झाले नाहीतच, पण कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला अथवा नातेवाईकाला त्यांनी या पदावर बसवले नाही. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी बसवणे पसंत केले. ‪१४ मार्च‬ १९९५ चा तो दिवस आजही डोळ्यासमोर जशास तसा उभा आहे. मंत्रिमंडळ शपथविधीसाठी राज्यपाल भवनाऐवजी मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेले शिवाजी पार्क म्हणजेच   शिवतीर्थाची निवड करण्यात आली होती. हो तेच शिवाजी पार्क बाळासाहेब ठाकरे नामक वादळाचा केंद्रबिंदू! जेथून १९६६ साली एक झंझावात सुरू झाला होता.

*शिवाजी पार्क यशापयशाचा साक्षीदार*
 ते शिवाजी पार्क आज शिवसेनेच्या आणखी एका स्थित्यंतराचे साक्षीदार होणार होते. शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला साक्षी ठेवत महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अस्तित्वात येणार होते. एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सोहळा या शिवतीर्थावर पार पडणार होता. अगदी अभूतपूर्व असे या सोहळ्याचे वर्णन करता येईल, असे दृश्य होते. शिवसैनिकांच्या झुंडीच्या झुंडी हातात भगवे झेंडे घेऊन शिवाजी पार्ककडे कूच करत होत्या. त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी मुंबईचा आसमंत दणाणून सोडला होता. सर्वत्र जल्लोष सुरू होता. ढोलताशे, झांज पथक गुलालांची उधळण, सर्वकाही नेत्रदीपक होते. विशाल समुद्रातील लाटांशी स्पर्धा करणाऱ्या भगव्या लाटा मुंबईतील रस्त्यांवर उसळल्याचा भास होत होता.

*सत्तेचा शिरपेच दुसऱ्याच्या माथी!*
तब्बल पांच दशकाहून अधिक काळ शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा अंगार अनुभवणारे शिवाजी पार्क आज एका मंगल सोहळ्याचे साक्षीदार होणार होते. मागील २९ वर्षांत येथे प्रथमच एक आगळी घटना घडली होती. शिवाजी पार्क गाजवणारे अनभिषिक्तसम्राट अर्थात बाळासाहेब ठाकरे आज व्यासपीठावर नव्हते. व्यासपीठासमोरील पहिल्या रांगेत ते बसले होते. ते आज श्रोत्याच्या भूमिकेत होते. याचसाठी केला होता अट्टहास! शेवटचा दिवस गोड व्हावा!! संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे अपार मेहनतीने मिळवलेल्या यशाचा मुकुट दुसऱ्याच्या मस्तकावर ठेवून बाळासाहेब शांत निश्चल मनाने शिवसैनिक बनून हा आनंद सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव लपून राहिले नव्हते. हे सर्व काही अद्भुत भासत होते, पण सत्य होते. स्वतंत्र भारतात महाराष्ट्राने असा सोहळा प्रथमच अनुभवला होता. बाळासाहेबांविषयी असलेल्या आकर्षणामुळे त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे मला भाग्य लाभले.

*शिवशाही सरकारचे अनेक महत्वपूर्ण निर्णय*
आपल्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीत युती सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते. बाळासाहेबच त्याचे प्रणेते होते. एक पत्रकार म्हणून ते अभ्यासता आले. अर्थात त्यातील काही व्यावहारिक तर काही अव्यावहारिक होते. त्यापैकी एक रुपयात झुणका भाकर, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, टँकरमुक्त महाराष्ट्र, झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे, कृष्णा खोरे, मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल यासारख्या काही योजना जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या ठरल्या होत्या. अर्थात त्यातील काही पूर्णत्वाला गेल्या काही वेळेअभावी पूर्णत्वास नेता आल्या नाहीत.

*हो, माझा रिमोट कंट्रोल चालणारच!*
बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेतील कोणतेही पद धारण केले नव्हते तरीही युती सरकारवर त्यांचे नियंत्रण होते. युती सरकारमधील निर्णयाच्या बैठका मंत्रालयाऐवजी ‘मातोश्री’ या बाळासाहेबांच्या निवासस्थानी झडू लागल्या होत्या. त्यावरून बरेच काहूर माजले होते. सत्ताबाह्य हस्तक्षेपावरून बाळासाहेबांवर विरोधक टीका करू लागले, पण बाळासाहेबांनी त्याची पर्वा केली नाही. कुठलीही सारवासारव केली नाही. त्यांनी जाहीर सभांमधून मी रिमोट कंट्रोल असल्याचे बेधडक सांगितले. माझ्या रिमोट कंट्रोलविषयी तुम्ही चोमाड्यासारखी चौकशी करता तशी हाय कमांडविषयी का नाही? असा परखड सवाल करीत विरोधकांची बोलती बंद केली होती.

*बाळासाहेबांच्या वाणीनं प्रश्न सुटलेत*
सत्ता असो वा नसो बाळासाहेबांनी कधीच कोणाचा मुलाहिजा ठेवला नाही. जे वाटले ते बेधडक बोलून दाखवले. परिणामांची कधीच पर्वा केली नाही. देशाभिमानी मुस्लिमांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा करताना कधीही हातचे राखून ठेवले नाही. मात्र देशद्रोह करणाऱ्या मुस्लिमांचा आपल्या भाषणांमध्ये ठाकरे शैलीत समाचार घेतला. अमरनाथ यात्रा रोखून धरणाऱ्या अतिरेक्यांना त्यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले होते. हिंदूंची अमरनाथ यात्रा रोखाल तर हज यात्रेची विमाने मुंबईतून जातात हे विसरू नका, असा सज्जड दम भरला होता. त्यावेळी विनाअडथळा अमरनाथ यात्रा पार पडली होती. सरकार, सशस्त्र दले जे करू शकले नाहीत, तो चमत्कार एका क्षणात त्यांनी घडवून आणला होता. ही बाळासाहेबांच्या वाणीची ताकद होती. अशी अनेक उदाहरणे देता येतील. खरे तर संपूर्ण जग हिटलरचा तिरस्कार करते, बाळासाहेब मात्र हिटलरचे कमालीचे चाहते होते. त्यांनी अनेकदा हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाची सभांमधून प्रशंसा केली होती. बाळासाहेबांमध्ये काही अंशी हुकूमशाहीचा पुरस्कार करणारे गुण पाहायला मिळायचे, पण बाळासाहेब नावाचा हुकूमशहा हिटलरसारखा क्रूर नव्हता. त्यांनी अनेकांवर लेखणीचे वार केले. अनेकांमध्ये शब्दांचे बाण घुसवले, पण त्यांनी कुणाला रक्तबंबाळ केले नाही. लेखणी आणि वाणी या नैसर्गिक अस्त्रांचा मोठ्या खुबीने वापर करीत अनेक सभा-संमेलने जिंकली.

*मराठी मनांवर पक्की पकड ठेवणारा नेता!*
लाखो-करोडो मनावर अधिराज्य गाजवणारा हा महाराष्ट्रातील हिटलर म्हणूनच प्रत्येकाला तहहयात हवाहवासा वाटला. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पकड मनावर पहिल्या इतकीच घट्ट आहे. किंबहुना काळ जाईल तशी त्याची पाळेमुळे आणखी खोलवर जाताना दिसतील. महाराष्ट्रात पिढ्या येतील आणि जातीलही, मात्र बाळासाहेब ठाकरे आपल्या आचार-विचार, संघटन कौशल्य, आपले वक्तृत्व-लेखनशैली, बेधडकपणा, कलासक्तपणामुळे अजरामर राहतील.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...