"दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूला जवळजवळ ५३ वर्षे झाली! ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचा मृत्यू ताशकंद (रशिया) येथे झाला. पण इतका काळ लोटल्यानंतर देखील त्यांचा मृत्यू नक्की कसा झाला यावर अनेक तर्क लावले जातात… त्याचं प्रमुख कारण म्हणजे मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव जेव्हा भारतात आणले गेले तेव्हा त्यांच्या मृत शरीराची कुठलीही फोरेन्सिक चाचणी करण्यात आली नाही. प्रधानमंत्री अचानक परदेशात मरण पावतात आणि त्यांच्या पार्थिवाचे साधे पोस्टमॉर्टम देखील होऊ नये? कुणाच्याही मनात शंकेची पाल चुकचुकणं साहजिक आहे. ह्या घटनेचा अत्यंत सखोल अभ्यास करून लेखक, संशोधक अनुज धर यांनी “Your Prime Minister is Dead” नावाचं पुस्तक लिहिलंय, जे नुकतचं प्रकाशित करण्यात आलं. ह्या पुस्तकात त्यांना विषबाधा करण्यात आली असावी असं सूचित करण्यात आलं आहे. पार्थिवाचे रशियात काढलेले फोटो आणि भारतात आणल्यानंतर दिल्लीत काढलेले फोटो आणि रशियाच्या डॉक्टर्सनी त्यांच्या पार्थिवाचे Emblaming याचे रिपोर्ट्स वगळता कुठलाही पुरावा आजच्या घडीला उपलब्ध नाही. शास्त्रीजींचा मृत्यू हा नैसर्गिक होता की, त्यांची हत्या करण्यात आली? अशी शंका व्यक्त करण्यात येते. नव्या पिढीला ही बाबच माहिती नाही त्यासाठी केलेला हा उजाळा!"
------------------------------ -----------------------
*ला* लबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ ला त्यांच्या मृत्यूपर्यंत जवळपास १८ महिने ते भारताचे पंतप्रधान होते. या पदावरील त्यांचा कार्यकाळ अद्वितीय होता. शास्त्रीजी आझादीची लढाई लढणारे गांधीवादी नेते होते. जवाहरलाल नेहरूजींचे त्यांच्या कार्यकाळात २७ मे १९६४ ला निधन झाल्यानंतर स्वछ प्रतिमेमुळे लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान बनवण्यात आले. निष्कलंक चारित्र्याच्या शास्त्रीजींची लोकप्रियता १९६५ मधल्या युद्धात पाकिस्तान वर विजय मिळवल्यामुळे प्रचंड वाढली होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं वर्णन पाश्चात्य देशांनी केलं होतं. १९६२ च्या युद्धात चीनकडून भारताचा पराभव झाला होता. भारताची काही भूमी चीनने बळकावली होती. देशाची जगभरात मानहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे तेव्हाचे फिल्ड मार्शल आयुबखान यांनी युद्धाच्या मार्गानं काश्मीर जिंकण्यासाठी १९६५ मध्ये भारताविरुद्ध युद्ध सुरू केलं. अवघ्या आठ दिवसाच्या आत जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरवर पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी झेंडा फडकवेल अशी स्वप्नं आयुबखान आणि त्यांचे तेव्हाचे सहकारी परराष्ट्र मंत्री झुल्फीकार अली भुट्टो पहात होते. प्रत्यक्षात मात्र उलटंच घडलं. शास्त्रीजींनी भारतीय भूमीवर आक्रमण करणार्या पाकिस्तानी लष्कराचा मुकाबला तर करावाच, पण पाकिस्तानी भूमीतही प्रतिआक्रमण करायचा आदेश लष्कराला दिला होता. भारतीय लष्करानं अवघ्या २१ दिवसांच्या त्या युद्धात पाकिस्तानी लष्कराचं कंबरडं मोडलं.
*शास्त्रीजींनी पाकिस्तानला नमवलं होतं*
अमेरिकेच्या सेबरजेट या विमानांचा आणि पॅटन रणगाड्यांचा दबदबा संपवला. भारतीय सेना लाहोरच्या दिशेनं कूच करायला लागली.लाहोर च्या वेशीवरचं बर्की हे गावही भारतीय लष्करानं काबीज केलं. त्या युद्धात भारतानं पाकिस्तानचा ७५० चौरस मैलाचा प्रदेश जिंकला होता तर पाकिस्ताननं भारताचा २२५चौ. किलो मीटर प्रदेश मिळवला होता. भारतीय लष्कराने हाजीपीर खिंडही जिंकलेली होती. त्या विजयानं शास्त्रीजींच्या खंबीर नेतृत्वाची देशात आणि जगभर प्रशंसा झाली होती. पण, रशियाचे तेव्हाचे अध्यक्ष अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीनं शास्त्रीजी आयुबखान यांची रशियातल्या ताश्कंदमध्ये जानेवारी ६६ मध्ये चर्चा झाली. रशियाच्या दबावानं शास्त्रीजींनी पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत द्यायच्या करारावर सह्या केल्या. ताश्कंद करार या नावानं तो समझोता जाहीर झाला.ताश्कंद मध्ये पाकिस्तान चे राष्ट्रपती आयुब खान यांच्या सोबत युद्ध समाप्त करार केल्यानंतर ११ जानेवारी १९६६ ला रात्री त्यांचा गूढरित्या मृत्यू झाला. लाल बहादूर शास्त्री यांच्या गूढ मृत्युबाबतच्या गुप्त फाईली केंद्र सरकारने खुल्या कराव्यात अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबतची चर्चा देशभर सुरू राहिली.
*शास्त्रींना विष देण्यात आलं का?*
मृत्यूनंतर त्यांचा चेहरा निळा झालेला होता. त्यांच्या कपाळावर पण पांढरे डाग होतें. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अटॅक ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अशा प्रकारचे डाग शक्यतो नसतात. त्यामुळे आजही त्यांच्या मृत्यूबद्दल साशंकता आहे. काय घडले होते नेमके त्या रात्री? कुलदीप नय्यर यांनी याबद्दल सर्व माहिती 'Beyond the time' या आपल्या पुस्तकात लिहिली आहे. कुलदीप लिहितात, त्या रात्री शास्त्री रात्री दहा वाजता आपल्या खोलीमध्ये आले होते. नंतर त्यांनी आपले सेवेकरी रामनाथ यांना जेवण आणण्यास सांगितले. त्यांचं जेवण राजदूत टी. एन. कौल यांच्या घरून येत असे, जे की खानसामा जान मोहम्मद बनवत असत. त्यादिवशी त्यांनी आलू पालक आणि अजून एक भाजी खाल्ली होती. त्यानंतर त्यांनी रोजच्याप्रमाणे एक ग्लास दूध प्याले. सकाळी काबुल जाण्यासाठी उठायचं असल्यामुळे त्यांनी जेवणानंतर रामनाथ यांना जाण्यास सांगितले. नंतर त्या रात्री घडले ते सर्व धक्कादायक होते. लाल बहादूर शास्त्री अचानक आपले खाजगी सचिव जगन्नाथ साहाय्य यांच्या खोलीजवळ पोहचले. त्यांनी विचारले ‘डॉक्टर साब कहा है’, त्यानंतर त्यांच्या सोबतच्या लोकांनी त्यांना पाणी पाजले व खोलीमध्ये घेऊन गेले. शास्त्रीजी आपल्या बेडवर झोपले. जगन्नाथ यांनी त्यांना पाण्याचा ग्लास दिला व बोलले ‘बाबूजी अब आप पुरी तरह ठीक है’. यानंतर शास्त्रीजींनी आपल्या छातीवर हाथ फिरवला व ते बेशुद्ध झाले व त्यानंतर ते उठू शकले नाही. रशियानं शास्त्रीजींच्या पार्थिव देहाची उत्तरीय तपासणी केली नव्हती. भारताच्या केंद्र सरकारने ती केली का नाही हे शेवटपर्यंत समजले नाही. १९७७ मध्ये चुग यांचं ट्रकने धडकल्याने निधन झालं तर पुढे रामनाथचाही अपघात झाला. त्यात त्याचे लय गेली आणि त्याची स्मृतीही गेली! त्यामुळे शास्त्रीजींच्या मृत्यूचे गुढ त्रेपन्न वर्षानीही कायम राहिले आहे. केंद्र सरकारने त्यांच्या निधनाबद्दल गुप्त फाईली उघड केल्यास ते गुड उलगडेल असं शास्त्रीजींच्या नातेवाईकांना वाटते.
*डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया*
डॉक्टर्सनी केलेल्या प्रक्रियेनंतर त्यांनी पार्थिवाचे जे वर्णन केले आहे आणि शास्त्रींच्या कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव बघितल्यानंतर जे वर्णन केलेय त्यात साधर्म्य आहे काय? असा प्रश्न अनुज धर यांनी त्यांच्या पुस्तकात विचारलाय. शास्त्रींच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाही अशी शंका त्यावेळी उपस्थित केली होती. emblaming हे विषबाधा करण्यात आलीये हे लपवून ठेवण्यासाठी करण्यात आलं असाही आरोप त्यांनी केला होता.
प्रोफेसर सौम्या चक्रबर्ती (MS Anatomy, FAIMER, US) ESI PGIMSR, कोलकाता येथे Anatomy डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार
“चेहरा आणि धड यांचा रंग जर गर्द निळा झाला असेल तर विषबाधा झालीये असं समजावे किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेय आणि मृत्यू जीव गुदमरून झालाय असं समजावे. शास्त्रींच्या बाबतीत विषबाधेची शक्यता आपण फेटाळू शकत नाही. पण माहिती अभावी ठाम निष्कर्ष आपण काढू शकत नाही.”
डॉ. सयन बिस्वास (MD Forensic Medicine Toxicology) NR Sircar मेडिकल कॉलेज येथे फॅकल्टी मेंबर आहेत. ते म्हणतात की,
“अचानक मृत्यू झाला तर ऑटोप्सी करणे बंधनकारक असते. गरज पडली तर दोनदा ऑटोप्सी करावी लागते. शास्त्रींच्या बाबतीत emblaming करताना वापरण्यात आलेली औषधे खूप कमी प्रमाणात आढळली.”
डॉ. अजय कुमार (माजी Head of Department of Forensic Medicine, Calcutta Medical College and Calcutta National Medical College) यांच्या मते देखील शास्त्रींना विषबाधा करण्यात आली असावी. शास्त्रींच्या कुटुंबीयांनी रीतसर पोलिस कंप्लेंट का केली नाही याचंच आश्चर्य मला वाटत राहतं असं ते म्हणतात. शास्त्रींच्या पत्नींच्या म्हणण्यानुसार त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर निळ्या रंगाची गर्द छटा उमटलेली होती. त्यांना जाऊन खूप कमी वेळ लोटला होता. चेहऱ्यावर काही ठिकाणी पांढरे डाग देखील होते. घटनेला चार वर्षे लोटल्यानंतर शास्त्रींच्या पोटावर असलेल्या जखमेसंबंधी स्पष्टीकरण देण्यात आले. Emblaming करण्यासाठी पोट उघडण्यात आले होते असं म्हटलं होतं.
*राज्यसभेत मृत्यूच्या चौकशीची मागणी*
शास्त्रीजींचं पार्थिव जेव्हा भारतात आणलं होता तेव्हा त्यांचा चेहरा काळा-निळा झालेला होता. त्यांची पत्नी ललितादेवी यांनी शास्त्रीजींचं मृतदेह पाहून म्हटलं होतं की, 'माझ्या नवऱ्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाही. त्यांच्यावर विषप्रयोग झाला असला पाहिजे अशी शंका व्यक्त केली होती. या संशयास्पद मृत्यूनंतर निरनिराळे कारणं दिली जात होतं. हृदयविकाराच्या झटक्यानं शास्त्रीजींचा मृत्यू झाला असं सरकारच्यावतीनं सांगण्यात आलं होतं. दुसरीकडं रशियाची गुप्तचर संस्था 'केबीजी'नं त्यांची हत्या केली, की अमेरिकन गुप्तहेर संस्था 'सीआयए'नं हत्या केली की, भारतातल्या कुणीतरी हत्या घडवून आणली असेल. अशी चर्चा त्याकाळी होत होत्या. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुत्र डाह्याभाई पटेल यांनी शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली होती. एवढंच नाही तर त्यांनी 'वॉज शास्त्री मर्डड?' - काय शास्त्रीजींची हत्या करण्यात आलीय? या नावानं एक ५० पानी पुस्तिका १९७० मध्ये लिहून प्रकाशित केली होती. राज्यसभेचे अनेकवर्षे खासदार राहिलेले डाह्याभाई यांनी कधी आपण सरदार वल्लभभाई पटेलांचे पुत्र आहोत अशी ओळख सांगितली नव्हती. आजीवन एक सक्षम आणि अभ्यासू खासदार म्हणून सर्वज्ञात होते. त्यांच्याप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयीं, मधु लिमये यासारख्या दिग्गजांनी राज्यसभेत चौकशीची मागणी केली होती.त्याकाळात आजच्यासारखं 'इंटरनेट' 'गुगल' यांच्या माहितीचा मायाजाल, ज्ञानगंगा अस्तित्वात आलेली नव्हती. नाहीतर त्यांची माहिती नव्या पिढीला सहज प्राप्त झाली असती. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांचं पार्थिव भारतात आणलं होतं. तेवढ्या काळात त्यांचा मृतदेह एवढा फुगला होता की त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून काढावं लागलं होतं. सरकारकडे त्यांच्या मृत्यूबाबतची कागदपत्रे आहेत पण ती दाखवली जात नाहीत की, प्रसिद्ध केली जात नाहीत.शास्त्रीजींचे पुत्र अनिल शास्त्री यांनी वारंवार मृत्यूबाबतचे दस्तऐवज प्रसिद्ध करण्याबाबत आणि गरज वाटली तर त्याचा तपास पुन्हा नव्यानं करण्यात यावा अशी मागणी केलीय. आपल्या घरापासून दीडहजार किलोमीटरवर लांब शास्त्रीजींच्या जीवनातील अखेरचे क्षण कसे गेले असतील हे घरच्यांनादेखील माहिती नव्हतं. देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या प्रधानमंत्र्यांच्या मृत्यूबाबत काय घडलं हे जाणून घेण्यात निश्चितच लोकांना इच्छा असेल!
*राजकीय मुत्सद्दीपणा दिसून आला*
पंजाबातील स्वतंत्र खलिस्तान चळवळीचे अध्वर्यू म्हणून भिन्द्रानवाले यांचं नाव घेतलं जातं. तथापि या चळवळीच्या कित्येकवर्ष आधी, पं. नेहरूंच्या हयातीत, पंजाबातील त्या वेळचे नेते मास्टर तारासिंग यांनी भिन्द्रानवाले यांच्याच धर्तीवर ‘स्वतंत्र पंजाबी सुभा’च्या निर्मितीसाठी मोठं आंदोलन छेडलं होतं. भिन्द्रानवाले यांच्या चळवळीप्रमाणे ते फारसं रक्तलांछित नव्हतं हे खरं, पण त्यात राष्ट्रापासून फुटण्याचीच बीजं होती. मास्टर तारासिंग हे शीख समाजातील एक बऱ्यापैकी लोकप्रिय नेतृत्व होतं आणि त्यांना स्वतंत्र पंजाबी सुभ्याच्या मागणीच्या समर्थनार्थ शीख समुदायातील काहींचा उघड तर काहींचा छुपा पाठिंबा होता. अशा परिस्थितीत मास्टर तारासिंग यांनी आमरण उपोषण आरंभिलं आणि ते दीर्घकाळ चालू राहिलं. त्यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून प्रयत्न झाले, पण ते अधिकच ताठर बनले. त्यामुळे चिंताक्रांत परिस्थिती उद्भवली. तथापि त्या वेळी गृहमंत्री असलेल्या शास्त्रीजींनी अतिशय कणखर भूमिका घेऊन ‘स्वतंत्र पंजाबी सुभा’च्या आंदोलनाला मुळीच भीक घातली नाही. हळूहळू हे आंदोलन अस्तंगत पावलं.
*द्राविडीस्थानची मागणी रुजू दिली नाही*
अशाच प्रकारची स्वतंत्र ‘द्रविडस्थान’ची मागणी दक्षिणेतील द्रुमक पक्षाने करून त्यासाठी चळवळही सुरू केली होती. काही काळाने तर ही चळवळ चांगलीच फोफावली होती. तथापि शास्त्रीजींनी ही देशद्रोही मागणीही फेटाळून लावली. अण्णादुराईंसारख्या नेत्यांना तर त्यांनी बजावलं की, या देशापासून फुटून निघण्याचे कोणाचेही मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत!
शास्त्रीजींच्या स्वभावात जसा कणखरपणा होता तसाच कमालीचा मुत्सद्दीपणाही होता. काँग्रेस पक्षात त्या वेळी अनेक अव्वल दर्जाचे ज्येष्ठ राजकारणी आणि महत्त्वाकांक्षी नेते होते. आणि त्यातील काही जण नेहरूंनाही डोईजड होत असत. तेव्हा काँग्रेस संघटना बळकट करण्याची आवश्यकता आहे, असे कारण देऊन त्यासाठी मंत्रिमंडळातील सदस्यांनी राजीनामे द्यावेत आणि स्वत:ला पक्षकार्याला वाहून घ्यावं असा ठराव काँग्रेस कार्यकारिणीने संमत केला. ‘कामराज योजना’ म्हणून त्या वेळी ओळखल्या गेलेल्या या खेळीमुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेही! त्यामुळे सत्ताकरणात नेहरूंना होणारा अंतर्गत विरोध बऱ्याच प्रमाणात मावळला. आश्चर्य वाटेल, पण या योजनेचे पडद्यामागचे खरे शिल्पकार होते स्वत: शास्त्रीजी! योजनेनुसार त्या वेळी शास्त्रीजींनीही राजीनामा दिला होता. पण त्यानंतर थोडय़ाच काळाने पं. नेहरूंनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं! दक्षिणेकडील राज्यांत हिंदी भाषेचा वापर करण्याच्या विरोधात चाललेली प्रचंड मोठी चळवळ शास्त्रीजींनी थंड डोक्याने शमविली. दक्षिणेकडील राज्यांना राज्य कारभारात, इतर व्यवहारांत हिंदी भाषेचा वापर नको होता, त्यांना इंग्रजीच हवी होती. शास्त्रीजींनी त्यावर असा तोडगा काढला की, हिंदीचा पुरेसा परिचय जोपर्यंत तेथील लोकांना होत नाही तोपर्यंत या दोन्ही भाषांचा वापर केला जाईल. तशा आशयाचा ठरावही त्यांनी संसदेत मंजूर करून घेतला. त्यामुळे एक मोठंच भाषिक संकट टळलं!
*नेहरूंची निवड सार्थ ठरवली!*
पं. नेहरूंनी आपला वारस म्हणून शास्त्रीजींची केलेली निवड अनेकांना संभ्रमात टाकणारी होती. मोरारजी देसाईंसारखे अनेक ज्येष्ठ, कार्यक्षम आणि प्रभावशाली नेते पक्षात असताना नेहरूंनी शास्त्रीजींना कशी काय पसंती दिली, याचं तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. पण नेहरूंनी हे पाऊल विचारपूर्वक, दूरदृष्टीने उचललं होतं हे नंतरच्या घटनांनी स्पष्ट केलं. शास्त्रीजींचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्याग, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील विविध खात्यांच्या मंत्रिपदांची त्यांची यशस्वी कारकीर्द, त्यांच्या स्वभावातील संयमित कणखरता अन् लवचीकता, साधी जीवनशैली, प्रामाणिकपणा आणि निरपवाद चारित्र्य, इत्यादी गुण हेरूनच शास्त्रीजींची निवड नेहरूंनी केली असली पाहिजे. नेहरूंच्या मृत्यूनंतर कामराज यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधानपद स्वीकारण्याची विनंती केली होती, पण त्यांनी त्याला नकार देऊन त्याऐवजी शास्त्रीजींची निवड करण्याची इच्छा व्यक्त केली.
अवघ्या ५ फूट उंचीच्या आणि किरकोळ शरीरयष्टीच्या शास्त्रीजींनी जेव्हा पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतली तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांना त्यात मोठीच संधी दिसली. या ‘खुज्या’ माणसाच्या कार्यकाळात आपल्याला काश्मीरवर कब्जा मिळविता येईल असा दु:साहसी विचार करून त्यांनी भारतावर युद्ध लादलं. तथापि आंतरराष्ट्रीय राजकारणात काय किंवा देशांतर्गत घडामोडीत काय, ज्यांनी ज्यांनी शास्त्रीजींना कमी लेखलं त्यांचा त्यांचा भ्रमनिरास झाल्याचं दिसलं. १९६५ सालच्या युद्धात मानहानीकारक पराभव करून पाकिस्तानच्या साहसवादाला शास्त्रीजींनी सडेतोड उत्तर दिलं. तथापि भारत हे युद्धखोर, साम्राज्यवादी राष्ट्र नसून शांततापूर्ण सहजीवनाचं तत्त्व अंगीकारणारा देश असल्याचा संदेश, ताश्कंद करारावर सही करून शास्त्रीजींनी साऱ्या जगाला दिला. हा करार होण्यापूर्वी शास्त्रीजी आणि आयुब खान यांच्यात जवळजवळ आठवडाभर वाटाघाटी चालू होत्या. करारात काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचं कलम अंतर्भूत करावं असा धोशा आयुब खान यांनी लावून धरला होता. तथापि शास्त्रीजींनी त्याला ठामपणे नकार दिला आणि आपल्या अटींवर आयुब खान यांना करारावर सही करण्यास भाग पाडलं.
सर्वोच्च नेते काही वेळा ‘गरिबी हटाव’सारख्या घोषणा देतात. काही काळ त्यांना लोकप्रियताही मिळते. तथापि ‘जय जवान जय किसान’ हे शास्त्रीजींचं घोषवाक्य भारतीय जनतेच्या हृदयसिंहासनावर कायमचं कोरलं गेलं आहे. शास्त्रीजींच्या वैभवशाली देशकार्याचा गौरव देशाने त्यांना ‘भारतरत्न’ किताब देऊन केला. पण त्यामुळे त्या किताबाचंच वैभव वाढलं!
हरीश केंची
९४२२३१०६०९
छान लिहिले, शुभेच्छा 💐💐💐
ReplyDeleteसुंदर आणि अभ्यासपूर्ण लिहिलंय सर...!👍👍👍
ReplyDelete