Sunday 13 August 2017

वंदे मातरम...! वंदे मातरम!!

*वंदे मातरम..! वंदे मातरम...!!*

"'जन-गण-मन'चा जन्म १९११ च्या डिसेंबरात झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अखेरीस खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सादर केलं. त्यानंतर  'वंदे मातरम'च्या जोडीने 'जन-गण-मन'ही गायले जाऊ लागले. त्याचाही बोलबाला झाला. बंगाली भाषेतील हे गीत सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारने नवभारताचे राष्ट्रगीत म्हणून स्विकारले होते. सर्व धर्म आणि प्रांतीय अस्मितेच्या उल्लेखांतून राष्ट्रीय एकात्मतेचा जयजयकार, हे या गीताचं मुख्य सूत्र होतं; म्हणूनच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि घटना समितीतील विविध विचारांच्या नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा करून, जाहीर वाद टाळून 'राष्ट्रीय ऐक्यमत्य' (नॅशनल कॉन्सेसस) निर्माण केले आणि 'जन-गण-मन'ला स्वतंत्र भारताच्या अधिकृत राष्ट्रगीताचा (नॅशनल अंथेम) मान देण्यात आला. त्याचवेळी या गीताच्या सामूहिक गायन वादनाचे नियमही करण्यात आले. तसेच  'वंदे मातरम'ची स्वातंत्र्य संग्रामातील थोर परंपरा लक्षात घेऊन त्याच्या केवळ पहिल्या कडव्याला 'राष्ट्रीय गीत' (नॅशनल सॉंग) म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच हे गीत निश्चित स्वर तालात गंभीरपणे गाण्याचे आणि त्याचा योग्य आदर राखण्याचे आदेशही देण्यात आले"

--–-----------------------------------------
*इ*स देशमें रहना होगा तो 'वंदे मातरम' कहना होगा......! अशा घोषणा एका बाजूने सुरू असतानाच...
'गळ्यावर सूरी ठेवली तरी म्हणणार नाही.....!' अशी दरपोक्ती करणारे आपले प्रतिनिधी आपण पाहिले तेव्हा आम्हालाच आमची लाज वाटली...! स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्षात आजही  'वंदे मातरम'ला विरोध केला जातोय. शाळेतून ते म्हणावं, त्यातून देशप्रेमाची शिकवण विद्यार्थ्याना मिळावी म्हणून आग्रह धरला जातोय. उत्तरप्रदेशात मदारसातून ते म्हटलं जावं असं फर्मान काढलं गेलंय. महाराष्ट्रातल्या विधिमंडळातील सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून जाताना आपण पाहतो आहोत.  'वंदे मातरम'ची सक्ती केली तरी आम्ही ते म्हणणार नाही असे बेमुर्वतपणे आमदार म्हणतात तेव्हा त्यांच्या अल्पबुद्धीची कीव येते.  'वंदे मातरम' चा इतिहास आणि परंपरा याची माहिती त्यांना नसावी, गळ्याभोवती फास घेताना  'वंदे मातरम'चा जयघोष करणारी ती क्रान्तीकारी पिढी कुठे अन त्या राष्ट्रीय गीताचा उपमर्द करणारे आजचे हे उपटसुंभ नेते कुठे..! संपूर्ण  'वंदे मातरम' म्हणण्याचा आग्रह धरणारे आणि राष्ट्रगीत म्हणून केवळ पहिलं कडवं म्हणण्यासही विरोध करणारे हे दोघेही राष्ट्रधर्माचा अवमान करणारे आहेत.

'वंदे मातरम' या गीताच्या वादाचं भूत पुन्हा उठवलं जातंय.एमएमआयएम या मुस्लिमांच्या हिताचा ठेका घेतलेल्या पक्षानं शाळांमधून वंदे मातरम म्हणण्याची सक्ती करणे घटनाबाह्य आहे. घटनेच्या कलम २५ नुसार आम्हाला पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलं असल्यानं आमच्यावर 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती करता कामा नये. 'वंदे मातरम' विरोध करणाऱ्यांच्या या दाव्यात तथ्य असले तरी तो तद्दन पाजीपणा आहे.  'वंदे मातरम' म्हणजे मातृभूमीला वंदन! 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी' या समर्पक शब्दात श्री रामचंद्रांनी माता आणि मातृभूमीच्या समभावाचं वर्णन केलंय. पालन-पोषण करणं, धारण करणं, सर्वकाही सहन करणं, क्षमाशील असणं, अशा अनेक गुणांतून माता आणि भूमी यांच्यातील साम्य स्पष्ट होतं. म्हणूनच भूमीला भू माता असं म्हणतात. अथर्ववेदातील भक्तीसूक्तात 'माता भूमी: पुत्रो अहं पृथीव्या:' असा भूमातेचा गौरव केल्यानंतर तिच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली आहे. हे सारं हिंदूंच्या धर्मग्रंथात आहे म्हणून झटकायची गरज नाही. राष्ट्रभक्ती दाखविणाऱ्या या नोंदी आहेत. मातेसमान असणाऱ्या मातृभूमीला वंदन केल्याने मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा कसा काय खातमा होतो? जो देश तुम्हाला जगण्याचं बळ देतो, ज्या देशाच्या भूमीवर तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा मिळतो, त्याभूमीला भक्तिभावे वंदन करणं हे मुस्लिमांच्या ठेकेदारांना सक्तीचं का वाटतं? मातृभूमीला वंदन करणं, राष्ट्रध्वजाचा-राष्ट्रगीताचा मान राखणं, राष्ट्रवीर-वीरांगणांबद्धल आणि राष्ट्रीय स्थलांबद्धल आदर राखणं हा राष्ट्रधर्म आहे. त्याचं पालन भारतातल्या सर्वधर्मीयांनी आपल्या देव-धर्म-जातीबद्धलच्या भावभावनांना दुय्यम लेखून केलेच पाहिजे. कारण कुठल्याही देव-धर्मापेक्षा राष्ट्रधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे! परंतु  'वंदे मातरम' म्हटल्याने 'अल्ला हो अकबर' म्हणजे परमेश्वर महान आहे या घोषणेचा अपमान होतो, अशी भूमिका  'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्यांकडून मांडली जाते.

ही भूमिका प्रथम मौलाना महंमदअली जीना यांनी मांडली. डिसेंबर १९२३ मध्ये आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथे काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन होतं. खुद्द जीनाच त्याचे अध्यक्ष होते. अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे  'वंदे मातरम'ने व्हायची होती. कारण  'वंदे मातरम' हे काँग्रेसच्या झेंड्याखाली स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्त्रोत होते. फासावर जाणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे ते अखेरचे शब्द होते. १८७६ मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या लेखणीतून  'वंदे मातरम' गीताचा जन्म झाला. पण त्याचा १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'आनंदमठ' कादंबरीत समावेश झाल्यानंतरच ते लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. बंकिमचंद्रांनी 'वंगभूमी'साठी बंगालीत लिहिलेलं हे गीत स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणागीत होण्यासाठी त्यात अनेक बदल करण्यात आले.  'वंदे मातरम' गीतातील 'सप्त कोटी कंठ' चा 'कोटी कोटी कंठ निनाद कराले' हा झालेला बदल ही याची साक्ष आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या 'जन-गण-मन' या गीताच्या पुढे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करण्यात आला त्या रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात  'वंदे मातरम'चे रवींद्रसंगीतासह गायन केले.  'वंदे मातरम'ला सर्वमुखी केलं. परंतु खिलाफत चळवळीने  'वंदे मातरम'ला वादात टाकले.

 महंमद अली आणि शौकत अली हे अलीबंधु चळवळीचे नेते होते. १९२० च्या दरम्यान सुरू झालेली ही चळवळ कालबाह्य धर्मवेडाने पछाडलेली होती. खिलाफत म्हणजे खलिफाची राजवट, खलिफा म्हणजे मुसलमानांचा धर्मगुरु. त्यांची सत्ता जीनांना आणायची होती. या खिलाफत चळवळीला असहकार आणि कायदेभंगाची चळवळ चालविणाऱ्या महात्मा गांधींचा पूर्ण पाठींबा होता. वर्षभरात स्वराज्य मिळविण्यासाठी सुरू होणाऱ्या आंदोलनात गांधीजींच्या दृष्टीनं खिलाफत चळवळीला अव्वल दर्जाचं महत्व होतं. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि खिलाफत या दोन्ही चळवळी एकच होत्या. त्यामुळेच हिंदू-मुस्लिम एकजूट होणार होती . गांधीजींच्या आतल्या आवाजातून निर्माण झालेला हा अजब दोस्ताना गांधीजींप्रमाणेच हिंदुस्तानलाही नडला. खिलाफत चळवळीतून हिंदू-मुस्लिम जातीयवाद निर्माण झाला आणि त्याची परिणती शेवटी पाकिस्तान निर्मितीत झाली.

खिलाफत चळवळीमुळेच गांधीजींचे 'रामराज्य' मानवेनासे झाले. आतल्या आत धुसफूसणाऱ्या तणावाचे जाहीर प्रदर्शन होऊ लागले. त्यात काही उत्साही मंडळींचा संपूर्ण  'वंदे मातरम' म्हणण्याचा आग्रह असायचा. त्याला मुसलमान आक्षेप घेऊ लागले. कारण त्यातले दुर्गा, कमला, लक्ष्मी, विद्या, सरस्वती या हिंदू देवतांचे आणि धर्मकल्पनांचे उल्लेख त्यांना खटकू लागले. या सार्याचा स्फोट जीना यांनी काकींनाडा अधिवेशनात पंडित दिगंबर विष्णू पलुस्कर यांनी  'वंदे मातरम' गायनाने प्रारंभ करताच त्यांना रोखून केला. त्यावर पंडितजींनी त्यांना कारण विचारताच 'संगीताला आणि मूर्तिपूजेला इस्लामचा विरोध आहे' असं ते रागात म्हणाले. त्याला पंडित पलुस्कारांनी चोख उत्तर देत ' हे इस्लामचे व्यासपीठ नाही, हे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन आहे' असे म्हटले नि रितीप्रमाणे  'वंदे मातरम' पूर्ण केले.

जीनांनी घेतलेला आक्षेप चुकीचा नव्हता. शिवाय 'आनंदमठ'मध्ये  'वंदे मातरम' ज्या संदर्भात आले होते, त्यामुळे ते गीत केवळ हिंदुगीतच ठरत नव्हते तर ते इस्लाम-मुस्लिमविरोधी गीतही ठरत होतं. परंतु हा साधार आक्षेप घेण्यासाठी जीनांसारख्या बुद्धिवाद्याला पंचवीस वर्षे खर्चाव लागली. कारण फाळणीची बीज त्यांच्या डोक्यात रुजायला तेवढी वर्षे जावी लागली.

'वंदे मातरम' गीतासंदर्भातली माहिती देणारी कॉम्रेड प्रभाकर वैद्य, हिंदुत्ववादी अमरेंद्र गाडगीळ, आणि विक्रम सावरकर यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यातला लेखकांचा वैचारिक अभिनिवेश वजा करून ती पुस्तकं आवर्जून वाचावीत.  'वंदे मातरम'बाबतचे आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. भारतात राहायचे तर राष्ट्रधर्माचे पालन सर्वांनी केलेच पाहिजे. मुंबई महापालिकेच्या इमारतींमध्ये विविध भाषिकांच्या शाळा भरतात. त्यात उर्दू शाळाही असते. इतर शाळांतील मुलं सामुदायिकरित्या  'वंदे मातरम' म्हणत असताना उर्दू शाळेतली मुलं वर्गात उंडारत असतात. स्वतंत्र उर्दू शाळेत  'वंदे मातरम' म्हणत नसल्याने त्याचा अपमान तरी टळतो. परंतु घटमात्मक धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली माजलेली ही वृत्ती राष्ट्रधर्म पाळणाऱ्या मुस्लिमेतर भारतीयांनी का सहन करायची? पंडित पलुस्करांच्या केलेल्या कृतीतून हिंमत घेऊन 'शाळा म्हणजे मशिदी नाहीत. इतर शाळांप्रमाणे उर्दू शाळातही  'वंदे मातरम' म्हटलेच पाहिजे.' असं ठणकावून बोलायला राजकारण्यांना मुहूर्ताची गरज लागू नये. कारण ज्यावर मुस्लिमांचा आक्षेप आहे, ती सारी कडवी घटनेनुसारच बाद करण्यात आली आहेत.  'वंदे मातरम'चं पहिलं कडवं मातृभूमीबद्धलचा कृतज्ञताभाव व्यक्त करण्यास पुरेसे आहे. तेवढं बोललेच पाहिजे हा आग्रह शासनानं धरलाच पाहिजे. त्यासाठी जनतेनेही केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करायला हवा.

'वंदे मातरम' हे स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारं गीत आहे. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गेली ७०वर्षे  'वंदे मातरम'चा मुसलमानांप्रमाणे हिंदुधर्मवाद्यांनीही हत्यारासारखा वापर केला आहे. संपूर्ण  'वंदे मातरम'मधील केवळ हिंदुधर्म संकल्पनाच्या उल्लेखामुळे ते स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होऊ शकले नाही.राष्ट्रगीताचा मान रवींद्रनाथ टागोरांच्या 'जन-गण-मन'ला मिळाला. हा निर्णय घटना समितीनं सर्व विचारांच्या पक्षीय आणि सर्वमान्य नेत्यांशी चर्चा करून घेतला.

'जन-गण-मन'चा जन्म १९११ च्या डिसेंबरात झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अखेरीस खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सादर केलं. त्यानंतर  'वंदे मातरम'च्या जोडीने 'जन-गण-मन'ही गायले जाऊ लागले. त्याचाही बोलबाला झाला. बंगाली भाषेतील हे गीत सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारने नवभारताचे राष्ट्रगीत म्हणून स्विकारले होते. सर्व धर्म आणि प्रांतीय अस्मितेच्या उल्लेखांतून राष्ट्रीय एकात्मतेचा जयजयकार, हे या गीताचं मुख्य सूत्र होतं; म्हणूनच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि घटना समितीतील विविध विचारांच्या नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा करून, जाहीर वाद टाळून 'राष्ट्रीय ऐक्यमत्य' (नॅशनल कॉन्सेसस) निर्माण केले आणि 'जन-गण-मन'ला स्वतंत्र भारताच्या अधिकृत राष्ट्रगीताचा (नॅशनल अंथेम) मान देण्यात आला. त्याचवेळी या गीताच्या सामूहिक गायन वादनाचे नियमही करण्यात आले. तसेच  'वंदे मातरम'ची स्वातंत्र्य संग्रामातील थोर परंपरा लक्षात घेऊन त्याच्या केवळ पहिल्या कडव्याला 'राष्ट्रीय गीत' (नॅशनल सॉंग) म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच हे गीत निश्चित स्वर तालात गंभीरपणे गाण्याचे आणि त्याचा योग्य आदर राखण्याचे आदेशही देण्यात आला

तथापी, राष्ट्रीय एकोपा राखण्यासाठी राष्ट्रगीतासाठी आखलेल्या या सीमारेषा
आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरीती स्मृत: ।।
असा अखंड हिंदुस्तान निर्माणाच्या शपथा घेत हिंदुजागरण करणाऱ्यांना मान्य नाहीत. यासाठी संधी मिळेल तिथे रडक्या, चिरक्या सुरात संपूर्ण  'वंदे मातरम' एखाद्या गवयामार्फत समुदायाला ऐकविल जातं.  'वंदे मातरम' चा राष्ट्रीय मान राखायचा असेल तर ते सामुदायिकरित्याच म्हणायला हवं.  'वंदे मातरम' चा घोर अपमान करणारा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोय, त्याला वेळीच आळा घातला पाहिजे.

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...