Saturday 7 September 2024

राजं....आम्हाला माफ करा....!

"साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आरमार उभं केलं. जलदुर्ग बांधले. त्या शिवप्रभुंचा पुतळा महाराष्ट्राची अस्मिता मालवण राजकोटमध्ये कोसळल्यानंतर अवघा महाराष्ट्र पेटला. त्याची धग लागल्यानं प्रधानमंत्री मोदींनी माफी मागितली. पण महाराष्ट्रातले नेते गुर्मीतच वावरत मराठी माणसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताहेत. पुतळ्याची अवहेलना होत असताना ते सुरतची लूट झाली नाही यावर वितंडवाद घालताहेत. गुजराथी मालकांची तळी उचलण्यासाठी शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान करताहेत. मराठी मन, अस्मिता, स्वाभिमान दुखावतोय याचं भान त्यांना नाही. पण मराठी माणसं हे सारं ओळखतात. ते त्यांची जागा दाखवतील हे निश्चित!"
____________________________________
*को*कणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही. त्यांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला...!’ असं  तिरपागडी वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शिवाजी महाराज जणू काही सर्वसामान्य माणसांची लूट करायला सूरतला गेले होते, अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसनं आम्हाला इतके वर्षे शिकवलाय...!' असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू असून त्यामुळं शिवरायांच्या सुरत लुटीच्या इतिहासाची उजळणी होऊ लागलीय. महाराजांनी दोनदा गुजरातमधलं सुरत शहर लुटलं, असे दाखले इतिहासात मिळतात. इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या शिवचरित्रात, कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावानं १९०६ मध्ये लिहिलेल्या शिवचरित्रात, तसंच जदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या१९१८ ते १९५२ या काळात लिहिलेल्या शिवचरित्रांमध्ये सुरत लुटीविषयी सविस्तर माहिती आहे. त्यातला सारांश असा 'जानेवारी १६६४ मध्ये शिवरायांनी सुरत लुटली, त्याला पार्श्वभूमी शाहिस्तेखानानं पुण्यात केलेल्या लूट, अत्याचारांची होती. मोगल सरदार आणि औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्तेखान महाराष्ट्रात तीन वर्षे तळ ठोकून होता. त्याच्यामुळं मराठा साम्राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. शिवरायांनी स्वत: लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं छाटून त्याला पुण्यातून हुसकावून लावलं. त्यानंतर राज्याची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी शिवरायांनी तातडीनं पावलं उचलली. राजगडापासून सव्वातीनशे किलोमीटरवर दक्षिण गुजरातमधलं सुरत हे मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होतं. ते लुटण्याचं महाराजांनी ठरविलं'. जदुनाथ सरकार ‘छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व’ या शिवचरित्रात लिहितात, ‘सुरतेत पोहोचल्यावर महाराजांनी असं जाहीर केलं, की ते तिथं कोणत्याही इंग्रजाला किंवा इतर व्यापाऱ्यांना इजा करायला आले नव्हते. औरंगजेबानं त्यांचा देश लुटून त्यांच्या काही नातेवाईकांना ठार मारल्याबद्दल त्याच्यावर सूड उगविण्यासाठीच ते तिथं आले होते. परंतु पैसा मिळवणं हाही त्यांचा एक हेतू होता. त्यांना त्या चार दिवसांच्या कालावधीत शक्य तितकी लूट गोळा करायची होती. लूट घेऊन त्यांना शक्य तितक्या लवकर तिथून निघून जायचं होतं!' त्याकाळी सुरतेचा व्यापार केवळ भारताशीच नव्हे तर युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतल्या देशांशी होत असे. व्यापार करातून मुघलांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. सुरतेला तटबंदीसह पाच हजार सैनिकांचं संरक्षण होतं.
वीरजी व्होरा, शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचं सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातला सर्वात श्रीमंत माणूस होता तेंव्हाचा बिल गेट्स किंवा आत्ताचा गौतम आदाणी अथवा मुकेश अंबानी म्हणा हवं तर. डच रेकॉर्ड्स प्रमाणे वीरजी व्होरा तत्कालीन काळात जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता.याची तत्कालीन काळातली वैयक्तिक संपत्ती ८० लक्ष रुपये होती. तर तत्कालीन काळात वीरजी व्होराची एकुण व्यापारी उलाढाल कांही कोटींमध्ये होती. तेंव्हाचे एक कोटी म्हणजे आताचे सुमारे साडेसात हजार कोटी. मराठा साम्राज्याचं तत्कालीन उत्पन्न जेमतेम १५ - २० लाखांच्या आसपास होतं. यावरूनच वीरजी व्होराच्या प्रचंड संपत्तीचा अंदाज येतो. भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाण्यार्‍या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी व्होरा एकटा भरत असे. सुमारे ७ देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या. इस्ट इंडिया कंपनीला वीरजी व्होरा जवळपास १० लाख रुपये व्यापारासाठी कर्ज दिलं होतं. तसेच मोगल, पर्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापाऱ्यांना यानं सावकारी कर्ज दिलं होतं. संपूर्ण भारत ४ वर्ष वापरू शकेल इतकी अफाट चांदी वीरजी व्होराच्या गोदामात पडून होती असं वीरजी व्होरा बद्दल बोललं जाई. छत्रपती शिवरायांनी सुरतेतल्या वीरजी व्होरा आणि अन्य ४ व्यापाऱ्यांना खलिता पाठवून सुचित केलं की, तुम्हीं मुघल साम्राज्याला करत असलेला अर्थ पुरवठा बंद करा. मुघलांपासून तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची तसेच आम्ही देखील सुरतेवर हल्ला करणार नाही याची हमी दिली. परंतु वीरजी व्होरानं ही मागणी मग्रुरीनं धुडकावली वीरजी व्होराला वाटलं इतके बलाढ्य मुघल आणि इंग्रज असतेवेळी मराठ्यांच्या संरक्षणाची गरजच काय आणि हया गोड गैरसमजाचे परिणाम वीरजी व्होराला भोगावं लागलं. सुरत लुटीच्यावेळी मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्यादिवशी सोनं, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे तीनशे ते पाचशे हशम हातात प्रत्येकी दोन पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून हजारो किलो सोनं, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणकं, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज, ऐवज कसला साक्षात कुबेराचा खजिनाच जणू प्राप्त झाला होता. सुरतच्या लुटीमध्ये सर्वात मोठं नुकसान वीरजी व्होराचंच झालं यातून सावरायला काही वर्ष गेली तोच शिवरायांनी सुरतेवर दुसरयांदा हल्ला केला यातून मग वीरजी व्होरा सावरलाच नाही आणि अंथरुणाला खिळला. मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यात १६७५ साली मृत्यू पावला. 'छत्रपती शिवराय व सुरतेची लूट' संदर्भ - इस्ट इंडिया कंपनी आणि डच रेकॉर्ड्स.
शिवाजी महाराजांनी आपले हेरप्रमुख बहिर्जी नाईक यांच्यामार्फत पहिल्यांदा सुरतेवर नजर ठेवली. तीन महिने पाळत ठेवून बहिर्जीच्या राघोजी नावाच्या गुप्तहेरानं सुरतेची बित्तंबातमी काढली. सुरतेत मोगलांच्या पाच हजारांपैकी केवळ एकच हजार सैन्य लढाऊ आहे. त्यांना अधिक कुमक मिळण्यापूर्वी आपण मोहीम फत्ते करायला हवी, असं बहिर्जींनी सुचविलं. त्यानुसार अत्यंत वेगवान हालचाली करून मराठ्यांचे ८ हजारांचे घोडदळ २० दिवसांत ५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेजवळच्या गणदेवी गावात पोहोचलं. तिथून त्यांनी मोगलांच्या सुरतेतले सुभेदार इनायतखान याच्याकडे वकील पाठवला. त्याच्यामार्फत 'इनायतखान आणि सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतेची 'बदसुरत' झाल्यास आमची जबाबदारी नाही...!' असा संदेश पाठवला. इनायतखान घाबरून सुरतेच्या किल्ल्यात लपला. त्याच्या सैन्याचा प्रतिकार मराठ्यांनी सहज मो़डून काढला. शहरात घुसून त्यांनी जागोजागी चौक्या बसविल्या. मुघल आरमारानं समुद्रातून येऊन प्रतिकार करू नये म्हणून सुरतेच्या बंदरावर हल्ला चढवून तिथल्या मालधक्क्याला आग लावली. तिथल्या युरोपीय वकिलाती, किल्ले किंवा आरमारांना मात्र मराठ्यांनी धक्का लावला नाही. मुख्य हेतू सुरत लुटीचा असल्यानं अकारण त्यांच्याशी लढाई करण्याचं मराठ्यांना काही कारण नव्हतं. त्याही मंडळींनी मराठ्यांची कुरापत काढली नाही. कडेकोट बंदोबस्तात मराठ्यांनी शहरात वसुली सुरू केली. मोगल ठाणेदार आणि महसूल दप्तरांचे खजिने रिकामे केले. पोर्तुगीजांकडे बचावासाठी पुरेसं सैन्य नाही, हे पाहून त्यांच्याकडूनही खजिना मिळवला. सतत तीन दिवस मराठा सैनिकांनी सुरतेतले व्यापारी, सावकार यांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली. यात वीरजी वोरा, हाजी झहीद बेग, हाजी कासम यांसारख्या मातब्बर व्यापाऱ्यांचा समावेश होता. सुरतेत त्यावैळी मोहनदास पारेख हा इस्ट इंडिया कंपनीचा हस्तक राहात होता. तो दानधर्म करणारा आणि लोकांना मदत करणारा होता. त्यामुळं त्याच्या वाड्याला मराठ्यांनी धक्का लावला नाही. तसंच इतर धर्मीय मिशनऱ्यांच्या मालमत्तेलाही अपाय केला नाही.
'रेव्हरंड फादर अँब्रोझच्या ऑर्डर ऑफ फ्रायर्स मायनोर कॅपुचिनच्या इमारतींचा मराठ्यांनी आदर केला. फ्रँकिश पादरी चांगले लोक आहेत त्यांच्यावर हल्ला करू नये, असे आदेश शिवरायांनीच दिले होते', असं फ्रेंच प्रवासी फ्रांस्वा बर्निये यानं आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय. दरम्यान, इनायतखानानं मराठ्यांकडे वाटाघाटींसाठी वकील पाठवला. भेटीसाठी आलेल्या या वकिलानं थेट शिवाजी महाराजांवरच हल्ला केला. शिवरायांच्या अंगरक्षकांनी त्या वकिलाला ठार मारलं. मग संतप्त मराठ्यांनी चार कैदी मारले आणि २४ कैद्यांचे हात छाटून टाकलं. त्यानंतर सर्व खजिना घेऊन मोगलांची अधिक कुमक येण्यापूर्वी सुरतेतून निघून मराठे राजगडावर पोहोचले. सुरतेच्या या खजिन्याचा वापर महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी केला, असा उल्लेख वा. सी. बेंद्रे यांच्या पुस्तकात आहे. पहिल्या सुरत लुटीच्या सहाच वर्षांनी म्हणजे ३ ऑक्टोबर १६७० रोजी शिवरायांनी सुरतेची दुसरी लूट केली. स्वराज्याची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सुरतेतून मोठी संपत्ती आणली. यावेळची पार्श्वभूमी होती, शिवरायांची आग्र्याहून मुघलांच्या कैदेतून झालेली सुटका. पहिल्या लुटीनंतर औरंगजेब खवळला होता. त्यानं मिर्झाराजे जयसिंह यांना मराठ्यांच्या स्वराज्यावर आक्रमणासाठी पाठवलं. प्रचंड सेनेसह आलेल्या जयसिंहासोबत परिस्थितीनुरूप शिवाजी महाराजांना तह करावा लागला होता. त्या प्रसिद्ध पुरंदरच्या तहात महाराजांना आपले २३ किल्ले आणि खंडणी म्हणून चार लाख रुपये द्यावे लागले होते. तसंच त्यानंतर आग्रा इथं औरंगजेबाच्या भेटीला जावं लागलं होतं. दरबारात अपमान झाल्यावर नजरकैदेतही राहावं लागलं होतं. त्या कैदेतून महाराजांनी करून घेतलेली सुटका इतिहासात प्रसिद्ध आहे. दरम्यान, स्वराज्याचं मोठं नुकसान झालेलं होतं. ते भरून काढण्यासाठी त्यांनी पुन्हा सुरत लुटण्याचं ठरवलं. रयतेवर झालेल्या अन्यायाचा बदला  आणि राज्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी त्यांनी पुरेशी तयारी करून दुसऱ्यांदा सुरत शहरावर हल्ला चढविला. खरे तर या हल्ल्याची खबर आधीच सुरतच्या सुभेदाराला लागली होती. पण कमजोर झालेले मराठे दुसऱ्यांदा हल्ला करतील, असं त्याला वाटलं नाही.
तिथला इंग्रज प्रेसिडेंट जिरॉल्ड अँजियर यानं मात्र आपली वखार नदीपलीकडच्या स्वाली बंदरावर हलवली. मुघल सुभेदार मात्र तीनशे सैनिकांच्या बळावर निर्धास्त बसला होता. २ ऑक्टोबर १६७० रोजी मराठ्यांचे १५ हजार सैन्य सुरतेच्या सीमेवर येऊन धडकलं. महाराजांनी मोगल सुभेदाराला खलिता पाठविला. ‘तुमच्या राज्यकर्त्यांच्या वागण्यानंच मला मोठं सैन्य बाळगायला भाग पाडलंय. या सैन्याला पोसण्यासाठी पैसा लागतो. त्यामुळं मोगलांनी आपल्या साऱ्याचा चौथा हिस्सा मला द्यावा...!’ त्या काळात जो भूप्रदेश स्वराज्यात नाही पण त्या राजापासून आक्रमणाचं संरक्षण मिळावं म्हणून चौथा हिस्सा दिला जात असे. त्याला चौथाई म्हणत. शिवाजी महाराजांनी तीच मागणी केली होती. पण, खलित्याचं उत्तर मिळालं नाही आणि मराठे ३ ऑक्टोबरला सुरतमध्ये घुसले. तीन दिवस मराठा सैन्य सुरतेची लूट करत होते. सामान्य प्रजेला अजिबातही त्रास न देता, मोठे व्यापारी, धनिक, श्रीमंत यांच्याकडून पैसा, सोनं, हिरे, जड-जवाहीर लुटलं. धार्मिक, चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांनाही या लुटीतून वगळलं. पहिल्या लुटीत मराठ्यांना सुरतेतून ८० लाख तर दुसर्‍या लुटीत ६६ लाखाचा खजिना हाती लागला. या हेरगिरीवरच इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी ‘राघोजी आणि लूट सुरतेची’ ही साडेसहाशे पानांची कादंबरी लिहिलीय. त्यातही हा चित्तथरारक घटनाक्रम आलाय. ऐतिहासिक तथ्यांवरच आधारित कादंबरी असल्यानं इतिहासाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतल्याचं सोनवणी सांगतात. 'लूट हा शब्द काँग्रेसनं प्रचलित केला...!’ असं फडणवीस म्हणतात. पण 'लूट हाच शब्द सर्व तत्कालीन पत्रव्यवहारांमध्ये, शिवकालीन दरबारी कागदपत्रांमध्ये आहे. परदेशी इतिहासकारांनीही या घटनेला ‘लूट’च म्हटलंय. 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राच्या दोन्हीही खंडांत सुरतेच्या लुटीचं सविस्तर वर्णन आलंय. त्यात पहिल्या लुटीनंतर शिवाजी महाराज म्हणतात, ‘कोणाशीही आमचे व्यक्तिगत वैर नव्हते आणि नाही. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबानं आमच्या मुलुखाची सतत तीन वर्षे बर्बादी केली, कत्तली केल्या. त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बऱ्याच दिवसांची आमची मसलत आज पार पडली...!’ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यामते, ‘सुरतच्या लुटीनंतर तिथल्या इंग्रजांच्या वखारीतून इंग्लंडला पत्रव्यवहार झाला. त्यात स्पष्टपणे Plunder अर्थात ‘लूट’ हा शब्द वापरण्यात आलाय. एस्कलेट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याननं छत्रपती शिवरायांच्या तंबूत त्यांच्यासमोर लावलेल्या अगणित संपत्तीच्या ढिगाचं वर्णन केलंय. सभासद बखर, इतिहासकार जदुनाथ सरकार, गजानन मेहेंदळे, बाबासाहेब पुरंदरे आदि अभ्यासकांनी या घटनेबद्दल सविस्तर लिहिलंय. अर्थात त्या काळात शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण करून लुटालूट करणं, खंडण्या गोळा करणं ही सर्वसामान्य बाब होती. सर्वच राजे एकमेकांच्या प्रदेशात तसं करत असत. अर्थात शिवाजी महाराजांनी याबाबतही काही नैतिक पथ्ये पाळली होती. उदाहरणार्थ सुरतेच्या लुटीत महिलांना धक्का लागू द्यायचा नाही, गरिबांना लुटायचं नाही, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैन्याला दिल्या होत्या. विशेष म्हणजे या लुटीच्या धामधुमीत त्यांनी एका ब्रिटीश महिलेच्या घराला संरक्षण दिलं होतं. शिवाय लुटीनंतर बरीच संपत्ती त्यांनी तिथल्या गोरगरिबांमध्ये वाटली. स्वराज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच मोगलांचं बलस्थान बनलेल्या सुरत बंदराला धक्का देणं ही शिवरायांची धोरणात्मक चाल होती. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरच्या व्यापाऱ्यांना त्यांनी संरक्षण दिलं. सुरतमध्ये शिवरायांचा जो पुतळा उभारला गेलाय, तो अलिकडच्या काळातला आहे. मधल्या काळात मराठ्यांची सत्ता गुजरातवर होती. सरदार दमाजी गायकवाड, दमाजी थोरात आदींनी गुजरातवर वर्चस्व ठेवलं होतं. त्यांच्या माध्यमातून शिवरायांचा दरारा गुजरातमध्ये कायम राहिला. शिवरायांच्या हालचालींवर ब्रिटीश बारकाईनं लक्ष ठेवून होते. म्हणूनच तर सुरतेच्या दुसऱ्या लुटीची बातमी ‘लंडन गॅझेट’ या ब्रिटिशांच्या सरकारी वृत्तपत्रात छापून आली होती. त्यामध्ये या घटनेनंतर मुघलांसह इंग्रजही घाबरले असल्याचा उल्लेख आहे. ‘क्रांतिकारी छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ देशाचे स्वामी झाले आहेत’, असा ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या पत्रांमधला उल्लेख या बातमीत केलाय. 'सुरतेच्या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिसामर्थ्याचा लौकिक दूरवर पसरला आणि त्यांना दोन मोठ्या शाह्यांस सतत तीन-चार वर्षे तोंड देण्यात जी द्रव्यहानी सोसावी लागली होती, ती भरून निघाली. हिंदवी स्वराज्या'च्या प्रयत्नात नंतर ढिलाई करण्याचं कारण पडलं नाही. उलट, ही घटना स्वराज्याच्या विस्ताराला पोषक अशीच झाली. शिवाय, मोगली लष्कराला दूरवर स्वारीला जाण्यापूर्वी स्वदेश संरक्षणार्थ ठिकठिकाणी बरंच लष्कर राखून ठेवावं लागल्यानं या स्वाऱ्यांचं शक्तिसामर्थ्य बरंच घटलं.' सुरत लुटीचा मोठा फायदा शिवरायांना स्वराज्य उभारणीसाठी आणि मराठ्यांचा दरारा देशभरात निर्माण होण्यासाठी झाला, असं मत बहुतेक इतिहासकारांनी नोंदवलेलंय.
हरीश केंची
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...