Saturday 7 September 2024

घाशीराम कोतवाल चावडीचा दीड तासात चुराडा झाला


"२२७ वर्षाची ही पेशवेकालीन ऐतिहासिक वास्तू तब्बल २९ वर्षे न्यायालयीन खटल्यात आपल्या जीवन-मरणाचा झोका घेत होती. अखेर न्यायालयाच्या संमतीने महापालिकेनं तिचा पाडाव झाला!"

  *पे*शवाईत घाशीराम कोतवालानं आपल्या उन्मत्त वागण्यानं पुणेकरांना त्राही त्राही करून सोडलं होतं. काही वर्षापूर्वी पुन्हा एकदा 'घाशीराम कोतवाल' या नाटकावरून वादळ उठलं होतं आणि या घाशीराम कोतवालाची चावडी उद्ध्वस्त केल्यानं त्याचा उरलासुरला धुरळा पुणेकरांवर उडाला. २२७ वर्षाची ही जुनी वास्तू. पुण्याचं रूप दिसामाजी बदलतंय. अनेक स्थित्यंतरं होत आहेत. पण 'कोतवाल चावडी' हे नाव मिळवणारी ही इमारत मध्यवस्तीत दिमाखानं उभी होती. पुणे महापालिकेनं वर्षापूर्वी ती इमारत भुईसपाट केली.
    पेशव्यांच्या कारकीर्दीत विषेशतः सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत 'कोतवाल' या शब्दालाच अधिक किंमत होती असं नाही; तर कोतवाल या शब्दातच भीती होती, आदर होता, तशीच जरबही होती. पेशव्यांनी पुण्याची सारी भिस्त या कोतवालावर सोपविली होती.
    सवाई माधवरावांनी पानीपतच्या पराभवानंतर मराठी राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा सावरली आणि पुण्याला मूळचं वैभव प्राप्त करून दिलं. पानीपतच्या लढाईनंतर पुण्याचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला. लोकसंख्येतही तिपटीनं वाढ झाली. लोकसंख्येच्या वाढीबरोबरच व्यापार- उदीमाच्या निमित्तानं वर्दळ वाढली आणि पुणे शहराची गुंतागुंत वाढली. विस्तारलेल्या आणि गुंतागुंत वाढलेल्या शहराची व्यवस्था बघण्यासाठी पेशव्यांनी १७६४ साली 'कोतवाल' हे स्वतंत्रपद निर्माण केलं. त्यासाठी १७६८ साली ही नामशेष केलेल्या चावडीतून कोतवालीचे काम चालण्यासाठी उभारलेली होती.
    'कोतवाल' या हिंदी शब्दाला आज पोलिसांचे काम करणारी व्यक्ती म्हणून जो अर्थ प्राप्त आहे तो त्या काळात अभिप्रेत नव्हता. कोतवालाचं पद पेशव्यांच्या खालोखालच्या रूबाबाचं होतं. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि सत्र न्यायाधीश यांना जे अधिकार आज आहेत ते अधिकार १७६४ मध्ये कोतवालांना होते. साहजिकच या सर्व प्रशासकीय यंत्रणांचे ठिकाण म्हणून 'कोतवाल चावडी' समाजात अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.
    सवाई माधवराव पेशव्यांनी कोतवालपद निर्माण केल्यानंतर त्यांनी बाळाजी नारायण केतकर यांना कोतवाल म्हणून नेमलं. त्यांच्या हाताखाली मोठ्या संख्येनं नोकरचाकर होते. वाढत्या वस्तीबरोबर गुन्हेगारीही वाढली. त्याचे नियंत्रण करण्यासाठी शहरात निरनिराळ्या ठिकाणी चौक्या बसविल्या. कोतवाल चावडीवरून रात्री अकरा वाजता तोफ उडविली जाई. त्यानंतर शहरात कुणालाही फिरता येत नसे. जणू संचारबंदीच. रस्त्यावर कुणी दिसला तर त्याला अटक होत असे. पहाटे चार वाजता दुसरी तोफ उडल्यानंतर शहरातला संचार आणि व्यवहार पूर्ववत सुरू होत असे. गुन्हेगारांवर वचक बसवित असतानाच रस्ते-दुरुस्ती, दिवाबत्ती, देखभाल, पाणीपुरवठा, स्वच्छता अशी प्रशासकीय कामंही कोतवाल करीत असे. राज्यासंबंधी चालणाऱ्या खलबतांचा शोध घेऊन गुप्त बातम्या पुरविण्याचे कामही कोतवाल करीत. या सर्व कामांबरोबरच छोट्या अपराधांबद्दल गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारीदेखील ते पार पाडीत होते.
    कोतवालाच्या श्रेयनामावलीत घाशीराम कोतवालाचे नाव इतिहासात विषेश नोंदवलं गेलं. तो मूळचा औरंगाबादचा ब्राह्मण ! नशीब अजमावण्यासाठी तो पुण्याला आला होता. पुण्यात आल्यावर त्याचा नानासाहेब फडणविसांशी परिचय झाला. पुढे परिचयाचे गाढ मैत्रीत रूपांतर झालं. घाशीरामनं आपल्या कारकीर्दीत गुन्हेगारांवर जरब बसवून महसुलात बऱ्यापैकी वाढ केली होती. तेलंगी ब्राह्मणाच्या मृत्यू प्रकरणात पेशव्यांनी त्याला पाठीशी घातलं नाही. त्यामुळं ३१ ऑगस्ट १७९१ ला घाशीरामला गुलटेकडीवर आमजनतेनं दगडांनी ठेचून मारलं.
    आज महाराष्ट्रात जकात वसुलीचे ठेके देण्याचे पेव फुटलं आहे; परंतु १७९६ मध्ये पुण्याची कोतवाली ठेका पद्धतीनं देण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजीरावांनी केला. दुसरे बाजीराव सतत आर्थिक विवंचनेत असायचे. नक्की आणि भरपूर पैसा मिळविण्याचे माध्यम साधन म्हणून त्यांनी कोतवालीचा लिलाव करण्याला सुरुवात केली. ठेकेदारी पद्धतीच्या कोतवालीनं पेशव्यांच्या कोतवालामधली जरब एकाएकी नाहीशी झाली. केवळ धंदा म्हणून ठेकेदार या पदाकडे पाहू लागले. १८०० ते १८१७ या काळात पुण्यात ठेकेदारी पद्धतीची कोतवाली अस्तित्वात होती. विठोजी नाईक गायकवाड हा पहिला ठेकेदार म्हणून ओळखला जातो. पेशव्याच्या आज्ञेनुसार, 'कोतवाल चावडी' हे मुख्य कार्यालय होतं. या चावडीनं पुण्याच्या इतिहासातल्या प्रशासकीय घटना पाहिल्या होत्या. चावडी हे मुख्य कार्यालय, तर नारायण, शनवार, सोमवार, वेताळ, बुधवार आणि रविवार अशा सहा पेठात सहा चौक्या सुरू करण्यात आल्या होत्या.
    १७६४ ते १८१७ या ५३ वर्षे पेशव्यांच्या काळात कोतवाल चावडी कमी-अधिक प्रमाणात महत्त्वाच्या स्थानावर राहिली. मूळ वास्तूत अनेक बदल झाले. मातीच्या इमारतीवर सिंमेटचे प्लास्टर चढले, अशी ही २२७ वर्षांची जुनी 'कोतवाल चावडी' २९ वर्षाच्या न्यायालयीन झगड्यानंतर सर्वोच न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार जमीनदोस्त करण्यात आली. ९ फेब्रुवारीच्या सकाळी साडेआठ वाजता महानगरपालिकेचे नगर अभियंता माधव हरिहर, सहाय्यक आयुक्त वसंत पोरेड्डीवार आणि विषेश नगर उपअभियंता का. द. मराठे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या ४० सेवकांनी ही कारवाई केली. यासाठी तीन अजस्त्र जे. सी. बी, एक क्रेन, तीन गॅसकटर, २ मोटारव्हॅन, मॅटडोर, दहा डम्पर ट्रक वापरण्यात आले.
    अत्यंत गजबजलेल्या बुधवार पेठ घ. क. २४० इथं ही चावडी होती. मंडईच्याजवळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा गणेशोत्सव या चावडीच्या समोर साजरा केला जात असे. ही दुमजली इमारत रस्ता रुंदी रेषेमध्ये येत असल्यानं महापालिकेनं ३० मार्च ७१ रोजी ३५० चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असलेली ही चावडी नंदलाल हिरालाल नाईक या मूळ मालकाकडून १ लाख ५६ हजार ६५ रुपयाला घेतली. या चावडीच्या इमारतीत २६ भाडेकरू होते. तळमजल्यावर २२ दुकानदार, तर पहिल्या मजल्यावर एक दुकान आणि तीन राहणारे भाडेकरू होते. महापालिकेनं सहानुभूतीपोटी ३० सप्टेंबर ७१ पर्यंत दैनंदिन भाड्यावर त्या भाडेकऱ्यांबरोबर करारनामा केला होता. महापालिकेने १४ जानेवारी ७२ रोजी जागा रिकामी करावी, अशा नोटिशा भाडेकऱ्यांना बजावल्या. त्याला भाडेकरूंनी जिल्हा न्यायालयात अर्ज करून स्थगिती मिळविली. पण पुढे ती फेटाळल्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका फेटाळल्यानंतर भाडेकरूंनी पुन्हा सह दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये २९ ऑगस्ट ७३ रोजी जागेचा ताबा घेण्यासाठी महापालिकेला स्थगन आदेश दिला. 
    या आदेशानंतर महापालिकेनं उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्यात भाडेकरूंच्या विरोधात निकाल गेल्यानं भाडेकरूंनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं. ते अपील २४ जानेवारी ९५ रोजी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानं १४ जानेवारी ७२ रोजी महापालिका आयुक्तांनी जागा खाली करण्याबाबतचा हुकूमनामा कायम केला. त्यानंतरही महापालिका आयुक्तांनी सहानुभूती दाखवून आणखी मुदत दिली होती. पेशवाईतली ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रसिद्ध असलेली ही 'कोतवाल चावडी' हटविण्याचे काम २९ वर्षे रेंगाळले तरी आधुनिक अजस्त्र साधनांनी तिचा अवघ्या दीड तासात चुराडा केला!

घाशीराम कोतवाल.
पेशव्यांनी राज्यकारभारात जम बसवल्यावर पुणे शहराला राजधानीसारखं महत्त्व प्राप्त झालं.   कोकणासह वेगवेगळ्या प्रदेशांतून लोक या शहरात राहायला येऊ लागले. गावपण जाऊ त्याला शहराचं  रूप प्राप्त होऊ लागलं, नवे व्यावसायिक इथं स्थायिक झाले, व्यापार उदिम वाढला. १७८० च्या आसपास पुण्याची लोकसंख्या अंदाजे १ लाख ५७ हजार इतकी होती, पुढच्या २० वर्षांत ती ६ लाखांवर गेली असावी अशा नोंदी सापडतात. एकूणच या काळात पुणं गजबजलेलं होतं. घाशीराम कोतवाल प्रकरण १७९१ साली घडलं म्हणजे तो तर या गजबजाटातला अगदी सर्वोच्च बिंदू आहे! रियासतकारांनी दुसऱ्या खंडात पेशवाईत पुण्याचं महत्त्व कसं वाढत गेलं आहे याबद्दल लिहिलंय. ते लिहितात, 'निरोगी हवा, पाचक पाणी, रुचकर अन्न, सुगंधी फुले, स्वादिष्ट फळं यांच्या समवायांत राजकीय ऐश्वर्य, कौटुंबिक स्वास्थ आणि राष्ट्रीय उमेद या पुण्यनगरांत एकवटल्या होत्या...!' या वर्णनावरुन पुण्याचं महत्त्व लोकसंख्या, व्यापार, राजकारण आदी गोष्टींसाठी कशाप्रकारे वाढत गेल्या याचा अंदाज येतो. पुण्यात कसबा पेठ ही सर्वात जुनी पेठ होती. त्याबरोबरच शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, सदाशिव पेठ, गंज, गणेश, मुझफरगंज, नागेश-नारायण या पेठाही त्यावेळेला होत्या. वेगवेगळ्या सरदारांचे वाडे, सामान्य नागरिकांची घरं, व्यापार-उदीम या पेठांमधून चालत असे, त्याचप्रमाणे विविध देवळंही या पेठांमध्ये होती.  
आताच्या लष्कर भागात तत्कालीन भवानी पेठेत घाशीराम कोतवालाचं घर होतं. ती पेठ १७६७ साली महादेव विश्वनाथ लिमये यांनी माधवराव पेशव्यांच्या आदेशानं ती वसवली. तसंच या घटनेशी संबंधित असलेले नाना फडणवीस यांनी हनुमंत पेठ म्हणजे नाना पेठ तर सवाई माधवरावांनी शिवपुरी म्हणजे रास्ता पेठ विकसित केली. सवाई माधवरावांच्या काळात इचलकरंजीकर घोरपड्यांनी घोरपडे पेठ वसवली होती. शहरांच्या रखवालीसाठी शिपाई नेमलेले असत. या शिपायांच्या प्रमुखाला कोतवाल म्हणत. शहरातली कायदा-सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवण्याची जबाबदारी कोतवाल आणि त्याचं कार्यालय म्हणजे कोतवालीकडे असे.
कोतवालाच्या कार्यकक्षेत जे महत्त्वाचे तंटे उपस्थित होतील ते सोडवणं, बाजारभाव निश्चित करणं, सरकारी कामांसाठी मजूर पुरवणं, जमिनीच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारांवर नजर ठेवणं, शहरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची माहिती ठेवणं इत्यादी कामं होती! मोगलांच्या काळात १७१८ साली हसनखान हा पुण्याचा कोतवाल होता. थोरल्या माधवरावांच्या काळात बाळाजी नारायण केतकर नंतर सवाई माधवरावांच्या काळात घाशीराम हा कोतवाली सांभाळत होता. एकूणच कोतवालीला या वेगानं आकार घेत असलेल्या शहरात मोठं महत्त्व आल्याचं दिसतं. शहरांत येऊन राहणारे, त्यांची चौकशी पेठांपेठांमधून कोतवालचे कारकून बारकाईनं करत. शहरात रात्रीची गस्त कोतवालीकडचे फिरत्ये त्याच बरोबर कारकून प्यादे चौकशी करत. चोरांचा तपास लावून चोर धरून आणून सरकारांत देत जाणे इ.!' असा आदेश दिला जाई.
पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे फार काळ जगले नाहीत. सहा महिन्यांतच त्यांचा २३ जून १७६१ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर थोरले माधवराव यांनी पेशव्यांची वस्त्रं स्वीकारली. नाना फडणवीस आता माधवरावांबरोबर काम करू लागले. थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांचे धाकटे पुत्र नारायणराव पेशवेपदावर आले. नारायणरावांची हत्या झाल्यानंतर अल्पकाळ राघोबादादा आणि नंतर सवाई माधवरावांना पेशवाईची वस्त्रं मिळाली. सवाई माधवरावांच्या कारकीर्दीतच घाशीरामाचं प्रकरण घडलं. पेशवे मोहिमेवर जाताना कारभाराची जबाबदारी, नानांच्या भरवशावर टाकून जात. माधवरावांच्या कार्यकाळात नाना फडणवीसांकडे फडणीशीबरोबर अनेक जबाबदाऱ्या आल्या. फडणीशी म्हणजे बजेटची आखणी, हिशेब ठेवणं, ऑडिट आणि पेशव्यांच्या राजधानी जबाबदारी पाहणं हे काम नानांकडे आलं.
घाशीराम कोतवाल याचं पूर्ण नाव घाशीराम सावळादास असं होतं. तो मूळचा औरंगाबादचा होता. घाशीरामची कोतवालपदी नियुक्ती करताना त्याच्याशी वीस कलमी करार केला गेला. या कलमांत घाशीरामच्या कामाचा उल्लेख केला आहे. कोतवालीचा अंमल ठरलेल्या रिवाजाप्रमाणे करावं, इमानेइतबारे वर्तन करून लोकांना सुरक्षित ठेवावं. नारायण आणि शनिवार पेठेत कोतवाल चावडी नसल्यानं तिथले हालचाल समजत नाही. त्यामुळे तिथं चावड्या घालून तिथल्या बातम्या कळवणं. शहरातले रस्ते चांगले करावेत. नवीन पडवी, ओटे परवानगी शिवाय झाले असतील, तर ते अतिक्रमण काढून टाकणं आणि पुढे होऊ न देणं यासाठी खबरदारी घेणं. शहरात रात्री फिरून गस्त घालणं आणि शहराचा बंदोबस्त राखणं, तसंच बारकाईनं चोरांचा शोध घेऊन चोर धरून आणून सरकारात देणं. कोतवालीचा दरमहा हिशोब सरकारात जमा करणं. 
घाशीरामानं कारभार हातात घेण्याआधी पुण्यात चार पोलीस चौक्या होत्या. त्यानं नारायण आणि शनिवार पेठेत दोन नवीन चौक्या बसवल्या. त्याच्या हाताखाली तीन अधिकारी होते आणि त्यांच्याकडे कोतवालीतली तीन खाती सोपविली होती. मुजुमदाराकडे दस्तऐवज, अर्ज वगैरे लिहिण्याचे काम असे. दुसऱ्याकडे कागदपत्रे सांभाळण्याचं काम आणि तिसरा जमाबंदीचा अधिकारी असे. तिघांचा मिळून पगार वर्षाला ६४० रुपये होता. नवीन चौक्या आणि वाढलेला कारभार यामुळे या पोलीस चौक्यांचं सुद्धा उत्पन्न वाढलं. १७९० च्या आसपास या पोलीस ठाण्यांचं उत्पन्न जवळपास सुमारे २७ हजार रुपयांवर गेलं. १७९१ साली पुण्यात दंडाला पात्र असे फक्त २३४ गुन्हे होते. यावरून घाशीरामचा कारभार किती चोख होता, याची कल्पना येते. या गुन्ह्यात सरकारच्या परवानगीशिवाय वेश्या व्यवसाय करणं, परवानगीशिवाय कत्तलखाना, बकरी मारणं, बेवारसी प्रेतांची विल्हेवाट लावणं, स्वतःची जात चोरणं, कुंटणखाना चालवणं, वेश्या व्यवसायासाठी मुली विकत घेणं, एक नवरा जिवंत असताना दुसरा करणं, बायकोला काडी मोड दिल्यानंतरही तिला घेऊन राहणं, कोळ्यांना कामावर ठेवणं अशा गुन्ह्यांचा त्याकाळी प्रामुख्यानं समावेश होता. 
घाशीरामानं हातात कारभार घेतल्यावर शनिवार आणि नारायण पेठेत चौक्या उभ्या केल्या. इ. स. १७८२ मध्ये घाशीरामाच्या ताब्यात मुख्य चावडी आणि सोमवार रविवार, कसबा, वेताळ, गणेश अश्या ५ चावड्या होत्या आणि हाताखाली ९० शिपाई नेमून दिलेले होते. घाशीरामाच्या विनंतीवरून नारायण आणि शनिवार या पेठांतून आणखी दोन चावड्या बसवून जादा २५ लोक नेमून देण्यात आले. मुख्य कोतवाल चावडी आणि या इतर सात चावड्यांवर दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी कोतवालाच्या हाताखाली सरअमिन, अमिन, दिवाण, दप्तरदार असे अधिकारी होते आणि ते  कोतवालाच्याच हुकमतीखाली होते. या सर्वांचा मिळून पगार वर्षाला २ हजार ९५० रु. होता! याशिवाय कारकून, प्यादे, स्वार, जासूद, नजरबाज गुप्तहेर अशा १२४ जणांचा स्वतंत्र ताफा त्याच्या दिमतीला होता. १७९८ मध्ये त्यात १०० गारदी, २ दिवटे, १० नजरबाज, १०० स्वार अशा २१२ जणांची वाढ करण्यात आली! सरकारी प्रशासन यंत्रणेचा एकूण विचार केला तर कोतवाल तसा छोटा अधिकारी होता. पण त्याच्या हाती दिवाणी-फौजदारी अधिकार एकवटले होते. त्याला भरपूर स्वातंत्र्य मिळाल्यानं तो बडा अंमलदार मानला जाऊ लागला. गावातली भांडणं, मारामाऱ्या यांचे निकाल देणं, दंड आकारणं, बाजारभावावर नियंत्रण ठेवणं, वजन मापांची तपासणी करणं, खरेदी विक्रीचे दस्तऐवज तयार करणं, सरकारला गरजेप्रमाणे मजूर पुरवणं, लोकसंख्येची नोंद ठेवणं, अधिकृत अनधिकृत घरे किती, जप्ती किती, सरकार-वाटणीची किती याचा तपशील तयार ठेवणं, शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं. जकात गोळा करणं, रात्रीची गस्त, पहारे ठेवून तोफ झाल्यावर शहरात हिंडणाऱ्या माणसाला चौकीत ठेवणं, सार्वजनिक सण, समारंभात बंदोबस्त, श्रावणमास दक्षणेत सुकरता आणणं, सरकारी पाहुण्यांची बडदास्त, सरकारविरुद्धच्य़ा कटकारस्थानाची आली तर ती लगेचच सरकारला देणं, नवा हुकूम जारी करताना, जुना रद्द करताना दवंडी देणं, चावड्यांवरचा हिशोब दरमहा सरकारला दाखवणं, सरकारी कायदे मोडणाऱ्यांपासून दंड वसुल करणं, बेवारस मालमत्ता सरकारजमा करणं, वाहतुकीसाठी रस्ते दुरुस्ती, अनधिकृत बांधकामं पाडून टाकणं, बाजारातल्या वस्तूंवर सरकारी शिक्के मारणं, पेठा वसवून व्यापार उदीम वाढवणं, शहरातल्या अनैतिक गुन्ह्यांचा छडा लावून दंड वसुली, पांथस्थ, बैरागी, यांच्या राहण्या-जेवणाची सोय, सरकारी कैद्यांची देखभाल, निसर्गात होणारे बदल वेळोवेळी सरकारला कळवणं ही कोतवालाची प्रमुख कामं होती, यावरून कोतवालाचा आणि मुख्य कारभाऱ्याशी किती जवळचा संबंध होता हे स्पष्ट होतं.
घाशीरामच्या कार्यकाळात रात्रीच्या वेळी रस्त्यांवर गस्त, जागता पहारा, शहरात येणार्‍या-जाणार्‍यांची कसून तपासणी, शहराची सुरक्षा, शहरातली फंदफितुरी शोधणं, चोर्‍या-जुगार रोखणं, शहराची स्वच्छता इत्यादी कामं बिनाकसूर केली जात होती. याबाबत पेशव्यांचा बखरकार म्हणतो, 'ऐसी कोतवाली मागे कोणी केली नाही आणि पुढेही करणार नाही...!' नाना फडणवीसांच्या मर्जीतला मानला जाणारा हा कोतवाल एका प्रकरणामुळे मात्र पुण्यातल्या लोकांच्या संतापाचं मुख्य कारण बनला. हे प्रकरण वादळासारखं तयार झालं आणि घाशीरामाचा जीव गेल्यावरच शांत झालं. रविवारी रात्री सुरू झालेलं प्रकरण बुधवारी दुपारी संपलं आणि पुण्याच्या इतिहासात ते कायमचं जाऊन बसलं. पुण्यामध्ये सर्व जातीच्या लोकांची वस्ती वाढत होती तशी ब्राह्मणांची संख्याही होती. यातल्या अनेक ब्राह्मणांचं अर्थाजनाचं साधन म्हणजे दक्षणा होतं. दक्षणा मिळवण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातल्या ब्राह्मणांची पुण्यात गर्दी होत असे. पहिल्या बाजीरावाच्या काळात शनवारवाड्यात दक्षणा वाटप सुरू झालं, त्यानंतर ते शहरात विविध ठिकाणी होत असे. नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याजवळ मोकळ्या जागेत दक्षणा वाटप सुरू केले. थोरल्या माधवरावांनी १७६५ मध्ये दक्षणा वाटपासाठी पर्वतीच्या पायथ्याच्या दक्षिणेस एक वास्तूच बांधली. त्याला पर्वतीचा रमणा असं नाव पडलं. तिथं गणपतीचं मंदिर आहे. सवाई माधवरावांच्या काळात आणि दुसऱ्या बाजीरावांच्या काळात याला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. घाशीराम कोतवालाचं प्रकरण सवाई माधवरावांच्या काळातच घडलेलंय. दक्षणेचा मूळ उद्देश ज्ञानाला उत्तेजन देणं असं होतं. श्रावण महिन्यात दक्षणा स्वीकारण्यासाठी शृंगेरी, कांची, श्रीरंगपट्टण, कुंभकोण, तंजावर, रामेश्वर, काशी, कनौज, ग्वाल्हेर, मथुरा इथून ब्राह्मण येत असत. या सर्व ब्राह्मणांची रमण्यात राहाण्याची एकत्र व्यवस्था होत असे. त्याला ‘ब्राह्मण कोंढणं’ असं म्हणत. 
ज्या घटनेमुळे घाशीरामाचा मृत्यू झाला त्याबद्दल अनेक वर्षे चर्चा सुरू राहिली. नाना फडणवीसांचं चरित्र लिहिणारे वासुदेव वामनशास्त्री खरे यांनी याबद्दल लिहिलंय. ते लिहितात, 'पुण्याहून द्रविड ब्राह्मण आपल्या देशास जाण्याकरिता निघोन असामी पसतीस श्रावण वद्य १४ रविवारी प्रहर दिवसास सायंकाळी घाशीराम कोतवाल यांचे बागात जाऊन उतरले. तेथे ब्राह्मणांनी कणसे मळ्यातील मक्याची दहा कणसे तोडली. त्यावरुन माण्याचा व त्यांचा कजिया जाहला. माळ्याने शिवीगाळ केली. त्यावरुन ब्राह्मणांनी त्यास मारिले. त्याजवरुन माळी फिर्याद घेऊन कोतवाल यांजकडे आला आणि सांगितले की, फितवेकरी चोर कोमटी वगैरे आहेत, मळ्यात दंगा करतात, मला मारिले, त्यांचे पारिपत्य केले पाहिजे...!' 
घाशीरामाकडे तक्रार आल्यानंतर त्यानं २५ लोक पाठवून ब्राह्मणांना मारहाण करुन भवानी पेठेतल्या आपल्या वाड्याच्या तळघरात कोंडलं. रविवारी रात्री ब्राह्मणांना कोंडल्यावर त्यानंतर सोमवारचा अख्खा दिवस गेला. ही गोष्ट मंगळवारी सकाळी मानाजी फाकडे यांना समजली. त्यांनी तिथं जाऊन जबरदस्तीनं कुलुपं उघडायला लावली तेव्हा १८ ब्राह्मण घुसमटून मेल्याचं दिसलं. ९ लोक जिवंत होते. त्यातल्या तिघांचा जीव त्याच दिवशी संध्याकाळी गेला आणि ६ लोक मात्र वाचले. हे सगळं पेशव्यांच्या कानावर घातलं गेलं. नाना फडणवीसांनी घाशीरामाला बोलावून यामागचं कारण विचारलं तेव्हा हे कोमटी वगैरे जातीचे चोर होते आणि ते अफू वगैरे खाऊन मेले असं त्यानं सांगितलं. त्यानंतर घाशीरामानं मृतदेह जाळण्यासाठी निरोप पाठवला मात्र मानाजी फाकड्यांनी याला विरोध केला. पेशव्यांनी सांगितल्याशिवाय मृतदेह नेऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे नाना फडणवीसांनी घाशीरामाला पुन्हा काय झालं हे विचारलं तेव्हा त्यानं जुनंच उत्तर दिलं. त्याला चौकीत आणल्यावर ब्राह्मणांनी आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली. शेवटी रात्र झाल्यावर नाना फडणवीसांनी न्यायाधीश अय्याशास्त्री यांना बोलावणं पाठवलं. त्यांनी या प्रकाराला देहांत प्रायश्चित्त असल्याचं सांगितलं. 
संतप्त लोकांनी घाशीरामाला हत्तीवर उलटा बसवून पेठांमध्ये फिरवलं आणि रात्री रमण्यामध्ये ठेवलं. त्याच्या राखणीसाठी दोनशे ब्राह्मण बसले. बुधवारी घाशीरामाला चावडीवर आणलं. त्याला उंटावर बसवून शहरभर फिरवलं त्यानंतर भवानी पेठेच्या पलिकडे नेऊन टाकलं त्यानंतर त्याच्यावर दगडं मारुन त्याला ठार मारण्यात आलं. घाशीरामानं केलेल्या कामाबद्दल आणि त्याला मिळालेल्या शिक्षेबद्दल बोलताना इतिहास अभ्यासक लिहितात, 'घाशीराम कार्यक्षम अधिकारी होता. कोतवाली आणि पोलीस खाते सुधारण्यासाठी त्यानं परिश्रम घेतलं. नजरबाज गुप्त पोलीस लोक ठेवून त्यानं फितुरांना आळा घातला. तसंच नवापुरा नावाची एक नवी पेठ वसविली, राज्याचा महसूल वाढवला; तथापि कर्तव्यदक्षता आणि क्रौर्य यातला फरक त्याला समजला नाही आणि हीच गोष्ट त्याच्या देहदंडाच्या शिक्षेला कारणीभूत ठरली...!' 
घाशीराम प्रकरणाचं खापर अनेक इतिहासकारांनी नाना फडणवीसांवरही फोडलंय. देशोदेशीच्या, प्रत्येक प्रांतातली खडानखडा माहिती बाळगणाऱ्या नानांना ही घटना कशी कळली नव्हती? नानांच्या संमतीशिवाय ही घटना पुण्यात झालीच कशी असे प्रश्न विचारले गेले. जर अशी घटना घडली तर त्यांचा कारभार सैल होता असं अनुमानही काढण्यात आलं. 'नानांना काही अतींद्रियदृष्टी नव्हती. त्यामुळे हाताखालच्या लोकांची दुष्कृत्ये त्यांना एखादे वेळी ओळखता आली नाहीत तर तो त्यांचा दोष मानता येत नाही. शिवाय अशा एक-दोन उदाहरणांवरुन त्यांचा सर्वच कारभार जुलमी होता असे अनुमान काढणं हा धडधडीत सत्यविपर्यास होय! हल्लीसुद्धा इतका कडेकोट बंदोबस्त असताना सरकारनं नेमलेल्या कारभाऱ्यानं संस्थानात मन मानेल तसा धुमाकूळ घालावा किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं शिस्तीच्या नावाखाली वाटेल तितके खून पाडावेत असेही प्रकार क्वचित होऊ शकतात!
थोडक्यात इतिहासात घडलेल्या घटनांना, इतिहासातल्या व्यक्तिमत्वांना आजच्या काळातल्या फुटपट्ट्या लावणं अन्यायकारक ठरू शकतं. आजही पुण्यातल्या लष्करभागात घाशीराम कोतवालांच्या घराचे काही भाग उभे आहेत. 'काही दशकांपर्यंत पुण्यात १८ व्या आणि १९ व्या शतकातले वाडे शाबूत होते. मात्र आता त्यातले फारच कमी वाडे शिल्लक राहिलेत. त्यांचं संवर्धन करावं अशी इच्छा रास्त वाटत असली तरी वाड्याच्या मालकांच्या दृष्टिनं ते एक आव्हान असतं. एकीकडे जमिनीचे भाव गगनाला भिडलेत आणि दुसरीकडे वाड्यांची देखरेख दुरुस्तीही आवाक्यापलीकडे गेलेलीय. त्यामुळे वाड्याच्या मालकांचा याबाबतीत फार कमी उत्साह असतो. अर्थात या परिस्थितीला एक रुपेरी कडा आहेच ती म्हणजे पुणे महानगरपालिकेनं विश्रामबागवाडा, नानावाडा सारख्या वास्तूंचं संवर्धन केलंय. त्याचप्रमाणे भाऊ रंगारींचा वाडाही ट्रस्टद्वारे संवर्धित केला गेलाय! कॅन्टोन्मेंट परिसरात असलेला घाशीराम याचा वाडा मात्र विपन्नावस्थेत उभा आहे. सध्या तो लष्कराच्या ताब्यात आहे.
हरीश केंची 
९४२२३१०६०९




No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...