Saturday 14 September 2024

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच यशस्वी होण्याच्या खुब्या गवसलेली सुमार कुवतीची माणसं कटीवर स्थानापन्न झालीत. ती गाजताहेत, वाजताहेत! याचा अनुभव येतोय. असंच काहीस प्रकरण गाजतेय. त्याचे पडसाद कसे उमटतात याची त्यांना पर्वाच नसते. नुकतंच संविधानातली तत्त्वं, संकेत, परंपरा दूर सारून गेल्या दहा वर्षात कधीही गणेशोत्सवात गणपती आरतीला न गेलेले प्रधानमंत्री जसे बंगालच्या निवडणुकीत रवींद्रनाथ टागोरांसारखी दाढी वाढवून गेले होते तसे महाराष्ट्रातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन धोतर, टोपी घालून सरन्यायाधिशांच्या घरी गेले. त्यानं सोशल मीडियावर गदारोळ उठलाय. एका टोपीनं महाभारत घडवलंय!"
--------------------------------------------------
*म*राठी माणसाच्या टोपीनं इतिहास घडवलाय. तिनं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात फार मोठी जबाबदारी पार पाडलीय. आज या टोपीचीच प्रसिद्धिमाध्यमातून, सोशल मीडियातून चर्चा होतेय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रीय पेहराव धोती, सदरा, टोपी परिधान करून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती करण्यासाठी गेले. त्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. साहजिकच यामुळं चंद्रचूड सोशल मीडियावर ट्रोल झालेत. वास्तविक त्यात त्यांची बदनामी अधिक झालीय असंच दिसतं. प्रधानमंत्री मोदींना जे काही साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलंय. जो काही संदेश लोकांना, प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला द्यायचाय तो त्यांनी व्यवस्थित दिलाय. पण खरी गोची झालीय ती चंद्रचूड यांची. लक्ष्य झालेत ते चंद्रचूड! भारतीय संविधानाने एक मर्यादा घालून दिलीय की, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांनी समान अंतरावर राहायला हवं. एकमेकांवर प्रभावित होतील असं वर्तन त्यांच्याकडून घडायला नको. पण इथं ते घडल्याची चर्चा आहे. कार्यपालिकेचे प्रमुख प्रधानमंत्री मोदी आहेत आणि न्यायपालिकाप्रमुख सरन्यायाधिश चंद्रचूड आहेत. सर्वोच्च न्यायालयात जाणारे बहुसंख्य खटले हे केंद्र आणि राज्य सरकारांशी संबधित असतात. मागे नेहरूं काळात पतंजली शास्त्री हे सरन्यायाधिश होते. एका समारंभात ते दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हा नेहरूंनी म्हटलं होतं की, 'कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात सौहार्दाचे वातावरण असलं पाहिजे. तणाव असायला नको...!' त्यावर शास्त्री यांनी लगेचच नेहरूंना सुनावलं की, 'दोघांमध्ये सौहार्दाचे संबंध अजिबात नकोत तर ते एकमेकांचे प्रबळ विरोधक असायला हवेत. सौहार्दाचे संबंध असतील तर मग न्याय होणार नाही...!' असं शास्त्रींनी सुनावून ते व्यासपीठावरून निघून गेले. इथं चंद्रचूड यांच्या घरी स्वतः प्रधानमंत्री पोहोचले की, चंद्रचूड यांनी त्यांना निमंत्रण पाठवलं? यावर चर्चा होतेय. यात काहीही घडलं असेल तरी चंद्रचूड किमान हे सांगू शकत होते की, या आरतीचे चित्रण होऊ नये. फोटो काढले जाऊ नयेत. पण त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे त्यांची त्याला मूकसंमती होती. एवढंच नाही की, त्यांनी तसं जाणूनबुजून होऊ दिलं, असंच म्हणावं लागेल. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत याची त्यांना कल्पना नव्हती असं म्हणता येणार नाही. प्रधानमंत्री मोदी हे मुख्यन्यायधिश चंद्रचूड यांच्या घरी गेले यात हरकत असण्याचे कारण काय? असं भक्तांचे म्हणणं आहे. उगाच त्याचं भांडवल केलं जातंय. मनमोहनसिंग प्रधानमंत्री असताना इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याचे फोटो वितरीत केले गेले. पण इथं लक्षांत येत नाही की, तो सामाजिक आणि सामूहिक कार्यक्रम होता. पण इथं ते केवळ चंद्रचूड यांचं घर नसतं, तिथं त्यांचं छोटंसं कार्यालयदेखील असतं. तिथं त्यांचा स्टाफ असतो. अनेकवेळा रात्री उशिरा न्यायालय म्हणून त्याचं घर उघडलं जातं तेव्हा न्यायालय उघडलं गेलं असं आपण वाचतो. ते हे असं घरातल्या एका खोलीतलं न्यायालय असतं तिथं त्याचं कामकाज चालतं. हे समजून घ्यायला हवं. मोदी केवळ आताच नाही तर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ प्रधानमंत्री आहेत. आजवर ते गणेशोत्सवात अशाप्रकारे कुण्या एकाही मराठी नेत्यांच्या घरी आरतीला गेलेले नाहीत. दिल्लीत जवळपास अडीचशेहून अधिक गणेशोत्सव मंडळ आहेत. तिथल्या महाराष्ट्र मंडळात गणेशोत्सव होतो. अगदी गडकरींच्या घरी देखील गणपती असतो तिथं ते जाऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलेलं नाही. शिवाय मराठी माणसाचा पेहराव करून टोपी घालून ते तिथं गेले, जसे बंगालच्या निवडणुक काळात रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी दाढी वाढवून बंगालच्या मतदारांवर प्रभाव पाडला होता. आता तसाच महाराष्ट्रावर प्रभाव पाडण्याचा त्यांचा इरादा असेल अशी टीका सोशल मीडियावर होतेय.! 
न्यायालयात जाणं हे सामान्यांची विश्वासदर्शक कृती असते. काहीही घडलं की, सरकारी अन्न्याय झाला तर तो न्यायालयात जाण्याची तो भाषा करतो. कारण त्याचा न्यायालयावर विश्वास असतो म्हणून. अशावेळी न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचं संगनमत झालं तर मग त्याला न्याय मिळेल का? अशी शंका येते. आपण पाहिलं असेल की, चंद्रचूड यांनी आजवर न्याय दिलाय असं वाटत असलं तरी त्यांनी त्यांची पूर्तता केलेली नाही. जस्टिस लोया यांची केस यांच्याकडे होती. ती अद्याप वर आलेली नाही. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादात त्या पाच जणांच्या बेंचमध्येही हेही होते. त्या निकालाचे सर्व ड्राफ्टींग यांनीच केलं होतं असं म्हटलं जातं. इलेक्टोरल बाँड संदर्भात त्यांनी सरकारला जबाबदार धरलं होतं. त्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवला. हे सारं असंवैधानिक असल्याचं म्हटलं ते मग त्यासाठी त्यांनी कोणाला जबाबदार धरलं? त्यांना काय सजा दिली? त्यात सगळेच लाभार्थी सर्व राजकीय पक्ष सहभागी होते. कोणत्या पक्षाला कुणाकडून किती निधी मिळाला हे उघड झाल्यानंतरही त्यांनी तो निधी संबंधितांना परत करण्याचे आदेश त्यांनी दिलेले नाहीत. एखाद्या चोरीच्या केसमध्ये मुद्देमाल पकडला तर तो संबंधितांना परत केला जातो. मग या साऱ्या राजकीय पक्षांना मिळालेला निधी संबंधित उद्योजकांना परत देण्याचा आदेश का दिला नाही? चंद्रचूड महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षात कसा निकाल दिला हे आपण सारेच जाणतो. राज्यपालांपासून सारं काही चुकीचं घडलंय असं म्हणत त्यांनी सत्ता ही फुटिरांकडेच दिली. जी आज तागायत आहे. या आरतीनंतर त्यांनी त्या केसची तारीख आणखी वाढवलीय. राज्यपाल जर असा गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर राष्ट्रपतींनी कारवाई करावी किंवा त्यांना असं संवैधानिकपद यापुढे देऊ नये असं देखील चंद्रचूड यांनी म्हटलेलं नाहीये. सरकारच्या चुकीच्या कारभाराला रोखणं हे त्यांच्याकडून होताना दिसत नाही. हिंडनबर्ग रिपोर्टवर काय झालं हे आपण जाणतो. शनिवार रविवार सुटीच्या दिवशी ते जे कार्यक्रम स्वीकारतात आणि भाषणे देतात त्यावेळी जे मतप्रदर्शन करतात तसं त्यांचं कार्यालयीन कामकाज नसतं असे सर्वोच्च न्यायालयातील वकील म्हणतात. 
न्यायधिशांसाठी एक आचारसंहिता ७ मे१९९७ मध्ये तयार केली गेली. त्याला प्रोटोकॉल म्हणतात. त्याच्या पहिल्या मुद्द्यातल्या दुसऱ्या परिच्छेदात म्हटलंय की, 'सर्व सामान्य माणसाचा विश्वास राहावं म्हणून मग ते कार्यालयीन असू दे किंवा व्यक्तिगत असू दे, ते तुमच्याकडून घडू नये ज्यामुळे तुमच्या विश्वसनीयता वर प्रश्न उपस्थित होतील...!' यातला ६ वा मुद्दा आणखी गांभीर्य दर्शवतो. त्यात म्हटलंय की, 'न्यायधिशानं आपल्या मर्यादेचे पालन करायला हवंय...!' याशिवाय 'न्यायाधीशांनी भारतीय न्यायव्यवस्थेची अखंडता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवलं पाहिजे...!' 'न्यायाधीशांनी अयोग्यता आणि अयोग्यतेचे स्वरूप टाळलं पाहिजे...!' 'न्यायाधीशांनी त्यांच्या न्यायिक कार्यालयासाठी अयोग्य असलेल्या राजकीय क्रियाकलापांपासून परावृत्त केलं पाहिजे...!' 'न्यायाधीशांनी भारताच्या राज्यघटनेवर खरी श्रद्धा आणि निष्ठा असली पाहिजे...!' असे अनेक मुद्दे इथं नोंदवलेल्या आहेत. या आरती प्रकरणात जे काही घडलं ते आपल्यासमोर आहे. अशाप्रकारे आभास निर्माण होण्याचा प्रसंगही टाळला पाहिजे. पण इथं आभासच नाही तर प्रत्यक्ष घडतंय. आरती करताना दिसतंय. कोणत्याही राजकीय गोष्टींपासून अलिप्त राहायला हवं. इथं राजकीय हेतू असल्याचं दिसून येतंय. थेट प्रधानमंत्री त्यांच्या साऱ्या लवाजम्यासह घरी येतात. यानं सामान्य माणसांच्या मनात काही शंका उपस्थित झाल्या तर त्या रोखणार कशा? हीच परंपरा पुढे सुरू राहील. मग उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीशांच्या घरी मुख्यमंत्री जाऊ शकतील. जसे विधानसभा अध्यक्षांच्या घरी मुख्यमंत्री गेले होते. चंद्रचूड यांच्या निवृत्तीला ५५-५६ दिवस शिल्लक आहेत. तेव्हा एवढं सगळं घडल्यानंतर साहजिकच त्यांच्याकडून अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय की, त्यांच्याकडे जी काही प्रकरणे प्रलंबित आहेत ती निकाली काढताना त्यावर निष्पक्षपणे न्याय व्हायला हवा तरच त्यांच्याबाबत निर्माण झालेला संशयाचं मळभ दूर होऊ शकेल. या सगळ्यातून हे स्पष्ट होतं की, साऱ्या संवैधानिक संस्था ह्या माझ्याच ताब्यात आहेत हे मोदींना दाखवायचं आहे की काय?. का मोदींनी चंद्रचुडांच्या कोणत्यातरी निकालाचा बदला घेतलाय. की रंजन गोगाई किंवा इतर न्यायाधिशांना जे काही मोदींनी दिलंय तसं ते देण्यासाठी तर ही आरतीची भेट नसेल ना! 
न्यायपालिकेनं सरकारपासून योग्य त्या अंतरावर राहून काम करावं, वैयक्तिक भेटीगाठी शक्यतो टाळाव्यात असा संकेत आहे. पण सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तो बाजूला ठेवलाय असं दिसून आलंय. याआधी रंजन गोगोई सरन्यायाधीश असतानाही असाच प्रकार घडला होता, त्यानंतर गोगोईंचा प्रवास कसा झालाय हे जगजाहीर आहे. याक्षणी शिवसेना-राष्ट्रवादी या महाराष्ट्रातल्या दोन्ही पक्षांमधली फूट यासह इतर अनेक संवेदनशील केसेस चंद्रचूड यांच्यासमोर आहेत. मोदी चंद्रचूड यांच्या या भेटीतून त्याबद्दल काय संदेश जातोय हे दिसतंय. शिवसेनेनं तर पक्षफूटीच्या खटल्यात सरन्यायाधीशांनी “नॅाट बिफोर मी” म्हणत दूर झालं पाहिजे असं अनेकांनी म्हटलयं. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांआधी घडतंय. असो… नागरिक म्हणून आपण महाराष्ट्राचे लोक अतिशय  हतबल आहोत. चंद्रचूड यांनीच ठरवलेलं बेकायदा सरकार सत्ताधारी भाजप, ईडी, सीबीआय, फुटीर सेना यांच्या धश्चोटपणातून थोपवलं गेलंय. चौदा कोटी लोकांचं राज्य सर्वोच्च न्यायालयाला अजिबात प्राधान्याचा विषय वाटत नाही हे फारच खेदजनक आहे. आता विधानसभा निवडणुकीआधी शिंदे-फडणवीस सरकार अवैध ठरण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही. महाराष्ट्राचा एवढा मोठा उपहास इतिहासात कधीही झाला नसेल. न्यायालय हीच आशा ही भावना असलेल्यांना धक्का बसलाय. 
मोदींच्या या आरती प्रकरणाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंध लावला जातोय. हे जरी खरं असलं तरी इथं एक जाणवतंय की, सर्वत्र सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताहेत. महाराष्ट्रानं कुणाला येत्या पाच वर्षासाठी आपले भाग्यविधाते म्हणून निवडायचंय हे ठरवलेलं असेल. पण खरोखर महाराष्ट्राचं भाग्य या विधानसभेवर निवडून येणाऱ्या २८८ लोकांच्याच हातात आहे का? ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेत खरोखर महाराष्ट्राच्या कल्याणाच्या प्रश्नावरच लक्ष दिलं जातं? निवडून गेलेले विधानसभेत कितीवेळ असतात, काय बोलतात, कसं बोलतात याकडे कधी मराठी माणूस लक्ष देतो? आमदार म्हणून जे निवडून येतात ते करतात काय, याचा आढावा वर्षाच्या अखेरीस मतदार घेतात? काही आमदार आपल्या कामाचा हिशोब दरसाल आपल्या मतदारांना देतात ही गोष्ट खरी आहे, पण हा हिशोब द्यायचीसुद्धा एक फॅशन झालीय असा अनुभव अनेकांनी दिलेले हिशोब चाळल्यावर येतो. घडलेल्या कामाचे श्रेय उपटण्याचा आणि न झालेल्या गोष्टींची जबाबदारी झटकण्याचा प्रकार चतुराईनं या हिशोबपत्रकात केलेला असतो आणि ह्या पत्रिका दिमाखदार छापून घेण्यासाठी प्रायोजकदेखील मिळवलेले असतात. योजक आणि प्रायोजक मिळवण्याच्या खुब्या आत्मसात करणं हाही राजकीय हुशारीचाच भाग आहे. अशा खुब्या हेरणारे हुशार महाराष्ट्रात खूप पसरलेत. मराठी भाषा, मराठी अर्थकारण, मराठी उद्योग, मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी राजकारणाप्रमाणेच यशस्वी होण्याच्या खुब्या गवसलेली सुमार कुवतीची माणसं कटीवर स्थानापन्न झालीत. ती गाजताहेत, वाजताहेत, पण महाराष्ट्राची मात्र सर्व क्षेत्रात पिछेहाटच होतेय. शिखरापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग असतातः एक सरपटत सरपटत अडथळे टाळत वरपर्यंत जाण्याचा, दुसरा शिखराकडे झेपावून शिखरावर विराजमान होण्याचा. अशी झेप घेऊन शिखर गाठणाऱ्यांची संख्या जेवढी अधिक तेवढा समाज जिवंत. तेवढे समाजात चैतन्य अधिक. कारंजात उडणारे पाण्याचे फवारे जसे सारखे वरवर जात असल्याचं भासतं, अशी उत्तुंग कर्तृत्वाकडे झेपावणाऱ्या माणसांची कारंजी समाजात असावी लागतात. कारंजातला वर झेपावणारा प्रत्येक थेंब काही क्षणातच खाली येत असतो, पण खालून वर उसळणारे दुसरे थेंब ह्या खाली येणाऱ्या थेंबाचे अस्तित्व जाणवूच देत नाहीत. ते त्याला वरवर झेलत ठेवतात. असा वर जाणाऱ्यांचा जोष खाली कोसळणाऱ्यांनाही सावरतो, निदान त्यांचे कोसळणे आपल्या पोटात सामावून टाकतो. अशी कारंजी आपोआप कुठे उसळतही असतील, पण ती घडवावी लागतात हेच खरे. हे घडवणारे असतात साहित्यिक- पत्रकार-विचारवंत-भाष्यकार-प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घडवणारे कर्मवीर- महर्षी-महात्मे. महाराष्ट्र एककाळ अशा नररत्नांची खाण असल्यासारखा होता आणि तो जेव्हा तसा होता तेव्हाच तो भारताचा आधार होता. महाराष्ट्राचा आत्मा त्याच्या शरीरात झोपी गेलाय की काय, अशी शंका आचार्य अत्रे यांना आली होती. महाराष्ट्राचा आत्मा नक्की झोपलाय, त्याला झोपवण्याचे काम गेल्या साठ सत्तर वर्षांत पुरे झाले आहे, असं म्हणण्यासारखी परिस्थिती आज नक्कीच आहे. थोडं मागे वळून बघितलं तर कितीतरी प्रेरणादायी माणसं आपल्याला दिसतात. सभोवताली असलेल्यात असे प्रेरणेचे जितेजागते स्रोत मात्र दिसत नाहीत. 
हरीश केंची
९४२२३१०६०९






Saturday 7 September 2024

मंगलमूर्ती मोरया आले!

"लोकांनी लोकांसाठी केलेला लोकोत्सव म्हणजे गणेशोत्सव! गेल्या १३० वर्षातल्या बदलत्या गणेशोत्सवाचा इतिहास. गणेशोत्सव लोकमान्यांनी की, भाऊ रंगारी यांनी सुरू केला. गणपतीच्या बदलत्या मुर्त्या, त्याची बदलती आरास, सुशिक्षितांचं या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, लोकमान्यांनी अशांच्या औदासिन्यावर ओढलेले कोरडे, प्रतिपादन केलेली उत्सवाची गरज, सार्वजनिक मंडळाचे आर्थिक नियोजन, छोट्या मोठ्या व्यापाराचे अर्थकारण, विसर्जन मिरवणुकीतलं प्राथम्यक्रम कसा, काय आणि का? या साऱ्या बाबींचा केलेला उहापोह!"
---------------------------------------
'आमच्या पुण्यात' असं म्हणून पुणेकर काही सांगू-लिहू लागला की, बहिऱ्याचेही कान किटतात आणि वाचणारा यातून कसा वाचू अशा काकुळतीला येतो. त्यातून पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवासारखा विषय म्हटलं की, आधीच मर्कट तशात... असं नाही झालं तरच नवल, पण पुण्यातल्या गणेशोत्सवांची विसर्जन मिरवणूक तब्बल दोन दिवस चालते हे बघितल्यावर पुणेकरांच्या अतिशयोक्तीला तसाच सबळ आधार असतो, असं का म्हणू नये? गेल्या वर्षी पुण्यात पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात निदानपक्षी साडेचार हजाराहून अधिक गणेश मंडळांची नोंद झालीय. सुदैवानं ही सर्व मंडळे विसर्जनाच्या मिरवणुकीत आपल्या मूर्ती आणत नाहीत, कारण २०२३ साली मिरवणुकीनं फक्त ३७९ मूर्ती विसर्जनासाठी गेल्या आणि त्यांना २६ तास १५ मिनिटे त्यासाठी लागली. जर सर्व नोंदविलेल्या गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला असता तर ही मिरवणूक आठवडाभर चालायला हरकत नव्हती. विसर्जनाबद्दल सुरुवातीला लिहिलं ते या उत्सवाचा व्याप आणि तापही केवढा वाढलाय हे लक्षात यावं म्हणून.
----------------------------------------------------
गणेशोत्सवाची १३० वर्षे असं सध्या सगळीकडे म्हटलं जातंय, पण महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ३१ ऑगस्ट १९९३ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. 
पुण्यातल्या गणपती चौकात पूर्वी गुरुजी तालीम होती. ह्या गुरुजी तालमीत हिंदू-मुसलमान पहिलवान घुमायचे. १८८८ सालापासूनच हे पहिलवान तालमीत गणपती बसवायचे. शेख हशम लालाभाई नालबंद, शेख बाबूभाई रुस्तुमभाई नालबंद. भिकू पांडूरंग शिंदे आदिंचा या गणपती उत्सवात पुढाकार होता. ही तालीम आता नाही, पण गणेशोत्सव मात्र दरवर्षी सुरूच आहे. १९८८ सालीच ह्या गणेशोत्सव मंडळानं उत्सव शताब्दी साजरी केली. लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणतात, पण टिळकांचा सार्वजनिक गणेश १८९४ साली पहिल्यांदा पुजला गेला तो त्यावेळी टिळक राहायचे त्या श्रीमंत सरदार बाळासाहेब विंचूरकर यांच्या वाड्यात. सदाशिव पेठ पोस्टाच्या समोर हा वाडा होता. आता तिथं मोठी इमारत उभी राहिलीय. टिळकांनी गायकवाड वाडा १९०५ मध्ये घेतला. मग तिथं सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. म्हणजे गायकवाड वाड्यातल्या गणेशोत्सवाची शताब्दी ही २००५ मध्ये झाली. 
गणेशोत्सव पुण्यात कसा सुरू झाला आणि तो महाराष्ट्रभर कसा विस्तारला ही माहितीही रंजक आहे. १८९३ साली सरदार नानासाहेब खासगीवाले, गणपतराव घोटवडेकर आणि वैद्य भाऊसाहेब रंगारी या तिघांनी सार्वजनिकरित्या गणपती बसवले आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते रस्त्यातून समारंभपूर्वक मिरवत विसर्जनासाठी नेले. सार्वजनिक गणेशोत्सवाची ही ती सुरुवात होती. १८९२ साली सरदार नानासाहेब खासगीवाले हे ग्वाल्हेरला गेले होते. ग्वाल्हेरमध्ये दरबारी थाटात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव बघून ते भारावून गेले. पुण्याला परतल्यानंतर त्यांनी ह्या उत्सवाबाबत लोकमान्य टिळकांना तिथल्या त्या गणेशोत्सवाबद्धल सांगितलं असावं. लोकमान्य हे त्यावेळी पुण्यातल्या राष्ट्रीय वृत्तीचा प्रमुख आधारस्तंभच होते. लोकमान्यांकडून हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मंडळींपर्यंत गेला आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या घरीच एक बैठक भरली. त्याला महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, लखूशेट बळवंत दंताळे, नारायणराव सातव, गणपतराव घोटवडेकर, नाना नारायण भोर, खंडोबा तावडे, सरदार नानासाहेब खासगीवाले, बळवंतराव कोकाटे, नाना हसबनीस, रामभाऊ बोधने, गंगाधर रावजी खेर आणि सध्या गाजणाऱ्या गणपतीचे दगडूशेट हलवाई हे ह्या बैठकीला हजर होते. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा लोकमान्यांनी दिली होती तरी ते त्यासाठी बैठकीला मात्र हजर नव्हते. हे विशेष!
ही बैठक झाली श्रावणात आणि लगेचच गणपतराव घोटवडेकर, भाऊसाहेब रंगारी, नानासाहेब खासगीवाले यांनी भाद्रपदात सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना प्रत्यक्षातही आणली. पुणेकरांना त्यांच्या उत्साहाला साजेल असा उत्सव मिळाला. हा उत्सव फक्त बामणांचा आहे, हा ढेरपोट्या देव सार्वजनिक जागी नको, असा आणि याहूनही विखारी विरोध या उत्सवाला त्यावेळी झाला. केसरीमधून, जाहीर व्याख्यानातून, लोकमान्यांनी त्याला ठणठणीत जबाब दिला. पण पुण्यातल्या सनातनी मंडळींनी या धार्मिक उत्सवात राजकारण येतं म्हणून कुरकुरायला सुरुवात केली. देवघरातला देव माजघरात आणि आता रस्त्यावर आणला असं म्हटलं गेलं. तेव्हा ती कुरकूर लक्षात घेऊनच की काय, टिळकांनी राष्ट्रीय विचाराच्या प्रसाराचीच सोय करण्यासाठी तीन वर्षांनी शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सवही सुरू केला होता. पण लोकांत ठसला, रुचला, फोफावला आणि पुणेच नव्हे, मुंबईसारख्या महानगरीला सर्व महाराष्ट्रासह व्यापून उरला तो मात्र गणेशोत्सवच!
गणेशाशी या उत्सवामुळेच लोकांचं अतूट असं नातं निर्माण झालं. शिवजयंती उत्सवात गणेशोत्सवातलं बाकी सगळं येऊ शकतं, पण गणेशाची मूर्ती हाच गणेश उत्सवाचा एक आगळा आकर्षणाचा विषय झाला. दुर्दैवानं सध्या अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी एकच एक ठोकळा मूर्ती बनवून, विसर्जन न करता ती तशीच ठेवून, तिच्यासाठी कायदे धाब्यावर बसवून, देवळे वा टपऱ्या बांधून आणि त्यापुढे पेट्या ठेवून गणेशाची दुकानं काढली आहेत हा भाग वेगळा; पण दरवर्षी नव्या रूपातली नवी मूर्ती, मग ती पारंपरिक वळणाचीच का असेना, आणण्यात जो अवर्णनीय आनंद होता वा आहे तो गणेशाला आणि त्याच्या उत्सवालाही जिवंतपणा देणारा आहे. उघडा बाळ गणेश, झबलं घातलेला रांगता बाळ गणेश, कृष्णाच्या रूपातला गणेश, पिंपळ पानावर पायाचा अंगठा चोखणारा गणेश, नागाच्या वेटोळ्यावर बसलेला, नागफणीवर नृत्य करणारा, शेषावर शेषशायी विष्णूसारखा लवंडलेला, हत्तीवर बसून वाघावर भाला मारणारा, वाघाचा जबडा फाडणारा, सिंहाला टेकून बसलेला, सिंहावर बसलेला, मोरावर बसलेला, गरुडावर बसलेला, उंदरावर बसलेला, उंदराच्या रथावर बसलेला, हरणाच्या रथात बसलेला, सात घोड्यांच्या रथात बसलेला, अशी किती रूपं, किती प्रकार! सारी सोज्वळता राखून बनवलेल्या या मूर्तीनीच माणसांना घराबाहेर खेचलं आणि एकत्र आणलं. 
याशिवायही काही मूर्ती घडल्या. त्यात लकडी पुलाच्या जवळ म्हणजे संभाजी पुलाजवळ नवी पेठेत विसावा विठोबापाशी बसणाऱ्या गणपतीनं प्रचंड खळबळ माजवली होती. प्रभात फिल्म कंपनीतल्या कलावंतांनी बनवलेली चांगली दहा फुटांची खुर्चीवर बसलेली सुटाबुटातली गणेशाची मूर्ती एक वर्ष इथं बसवण्यात आली आणि जणू हाहा:कार झाला. पितांबरधारी गणेशाऐवजी धोतर, मलमली अंगरखा घातलेला, टिळकांप्रमाणे पगडी, लांब अंगरखा घातलेला किंवा शिवाजी वेषातला तुमान घालणारा जिरेटोपवाला अथवा बजरंगबलीच्या लंगोटधारी वेषातला गणेश लोकांनी निमूट बघितला. एवढंच नव्हे, ज्ञानेश्वरासारखा गणेशही याच संभाजी पुलाजवळ बसवला गेला, पण सुटाबुटातला गणेश मात्र लोकांना चालला नाही. बरसात सिनेमानं लोकांना वेडं केलं त्यावर्षी हातावर नर्गिस घेतलेल्या राज कपूरची ती सुप्रसिद्ध पोज जी पुढं आरके फिल्मची निशाणीच ठरली तसा बरसात गणपतीही पुण्यात बसवला गेला होता. तेव्हाही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. काही काही मंडळांच्या मूर्ती ठरलेल्या असायच्या. वज्रदेही मंडळाची पहिलवानाच्या वेषातली, हत्ती गणपतीची हत्तीवर बसून वाघ मारणारी, दगडूशेठ हलवाई आणि मंडईतल्या मूर्तीही पूर्वापार रूपातल्याच. आता मूर्तीपेक्षा देखावे आणि विजेची करामत यांचं महत्त्व वाढलंय. पूर्वी करमणुकीचे, प्रबोधनाचे कार्यक्रम होत असत. गणेशोत्सवात मेळे हे त्याकाळी खूप गाजले. फडके हौद चौकात वज्रदेही मंडळ संगीताचे, गायनाचे कार्यक्रम आयोजित करत. तिथं दिग्गज कलावंतांनी हजेरी लावलीय. आज असे कार्यक्रम नाममात्रही उरलेले नाहीत. 
वर्गण्या गोळा करण्यावरून गणेशोत्सवावर टीका व्हायची. ह्या वर्गण्यांची सक्ती होते असं लोक म्हणायचे. आता हे वर्गण्यांचे पर्वही संपलंय. घरोघर जाऊन वर्गण्या वसूल करण्याचा व्याप कार्यकर्त्यांना नकोसा झालाय. त्याऐवजी प्रायोजक पकडण्याचं युग सध्या आहे. यातले काही आपल्या मालाची वा आपली जाहिरात करणारे असतात, तर काही गुपचूप पंथातलेही असतात. पुण्याच्या वाडिया महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व. कृ. नुलकर यांनी प्रा. माधव धायगुडे यांच्या सहाय्यानं पुण्यातील गणेशोत्सवावर काही वर्षांपूर्वी एक अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला होता. त्यांनी ७७ मंडळांचे अहवाल हिशोब आणि प्रत्यक्ष कार्य अभ्यासलं. आपल्या अहवालात प्राचार्य नुलकर म्हणतात, 'ही मंडळे, त्यांची कामे, त्यांचा उतू जाणारा उत्साह मी पाहिला आणि खरोखर अशी जाणीव झाली की, आम्ही उगीच ओरडतो की, आपली नवी पिढी बिघडलीय! आपण मोठे लहानांना जसे वळण देऊ तसे ते वागतील. माझी तर खात्री पटली की, गणेशोत्सवाला खरोखर आपण उत्तम वळण देऊ शकू. जे ईप्सित मनात ठेवून महाराष्ट्राच्या या लोकमान्य टिळक महापुरुषानं ह्या उत्सवाचा पुरस्कार केला तेच ईप्सित-समाज जागरण मनात ठेवून आपण वळण लावले तर नक्की फायदाच होईल...! प्राचार्य नुलकर ह्यांनी अहवालात हे म्हटलं खरं, पण 'आपण' म्हणजे नक्की कुणी हे वळण लावायचं? नुलकरांची त्या मंडळींपर्यंत पोहोचण्याची ताकद आहे? लोकमान्य टिळकांनी सातत्यानं या उत्सवावर लिहिताना कुणाला साद घातलीय? प्राचार्य नुलकरांना दगडूशेट हलवाई मंडळानं स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बोलावलं तेव्हा त्यांना या उत्सवाकडे, त्यातल्या कार्यकर्त्यांकडे बघावंस वाटलं आणि ह्या अहवालाबरोबरच ते वाटणेही संपलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! लोकमान्यांनी व्याख्यानातून अग्रलेखांतून सुशिक्षितांना या उत्सवात सामील होण्यासाठी वारंवार हाक दिली. मंडईतल्या गणेशोत्सवात बोलताना १८९६ साली लोकमान्य म्हणाले, 'जर उत्सवात काही कमतरता असेल तर त्याचं पाप ह्या उदासीन शहाण्या मंडळीच्याच कपाळी मारावं लागतं. लोकात मिसळा, त्यांचं कुठं चुकत असल्यास सर्व गोष्टी नीट जुळवून द्या. सुशिक्षितांचा अधिकार असा आहे. त्यांची कर्तव्यं हीच आहेत...!' लोकांत मिसळा, तो तुमचा अधिकार आहे. सर्व गोष्टी नीट जुळवून द्या, ते तुमचे कर्तव्य आहे ही गोष्ट आज तरी कुठे सुशिक्षितांना कळलीय? सुशिक्षित समाजात मिसळत नाहीत, स्वतःला वेगळे समजतात. तसं राहून नाकं मुरडत बसण्यातच फुशारकी मिरवतात. लोकमान्यांनी यावर अक्षरशः कोरडेही ओढलेत. 'समाजाहून सुशिक्षित लोकांचा वर्ग निराळा समजण्याइतकं मौर्य दुसऱ्या कशातही नाही. शिकलेले लोक समाजाचं आणि समाजातलेच आहेत. समाज तरला तरच ते तरणार. समाजाला सोडून त्यांचं काडीचंही चालावयाचं नाही...!' हुशार आणि या बोटाची भुंकी त्या बोटावर करणारे सुशिक्षित गणेशोत्सवावर पोपटपंची करताना नेमक्या या गोष्टी सोडून बाकी सगळं रामायण करतात आणि लोकमान्यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय उत्सवाचं या अज्ञ समाजानं काय हो केलं... असा गळाही काढतात. हा उत्सव मुसलमानांना उत्तर देण्यासाठी सुरू झाला असंही काही उतारे तोंडावर फेकून सांगितलं जातं. 
मुसलमानांनी दाखवलेल्या कृतघ्नपणावर, असहिष्णुतेवर आणि ब्रिटिशांच्या फुशीनं चालवलेल्या अविवेकी आक्रस्ताळेपणावर लोकमान्यांनी कोरडे ओढले आणि गणेशौत्सवासाठी एकत्र येणाऱ्या हिंदूंना संघटनेचे सामर्थ्य समजावून देऊन निर्भय केलं हे खरंच आहे, पण गणेशोत्सव हा समाजातल्या भेदाभेदावर मात करण्याचा, समाज मन सांधण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यानं अशिक्षित अडाणी-उपेक्षित समाज आणि सर्वार्थानं समर्थ असलेला सुशिक्षित पुढारलेला समाज यांचं द्वैत मिटवता येईल अशीच टिळकांची भावना होती. ती त्यांच्या लिखाणातून वारंवार प्रकटलीही आहे. गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू झाला. त्यामध्ये समाजातल्या सर्व थरातल्या लोकांनी भाग घेतला. एकप्रकारे सार्वजनिक स्फुरणच सर्वांना आलं आणि त्याचं कौतुक करताना लोकमान्यांनी लिहिलं, 'दिवसभर कामधंदा करून घरी आल्यावर चकाट्या पिटीत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारात लोळणारे आणि ह्या दारूच्या पायी बायका-पोरांचे हाल करणारे अथवा तमाशामध्ये अचकट विचकट गाणी ऐकत बसणारे या सर्वांना निदान काही काळपर्यंत तरी उपरती होऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्री गजवदनाच्या भजनपूजनात गेला ही गोष्ट काही लहान सामान्य नाही! देवाचे नाव घेऊन वाईटातून चांगल्याकडे जाण्याची ही वाट त्या काळच्या सुशिक्षितांनी आपल्या प्रत्यक्ष सहकार्यानं जर रुळवली असती तर हा समाज समर्थ आणि सुसंस्कृत झाला असता...!' पण साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी टिळकांच्या हाकेला धावले तरी सुशिक्षित मंडळी मात्र धावली नाहीत! लोकमान्य सुशिक्षितांच्या ह्या वृत्तीबद्दल लिहितात, 'पण लोक जमतात त्या ठिकाणी आम्हाला कोठे जावयाला पाहिजे? देव देतो, पण कर्म नेते अशातली आमची स्थिती झालीय. लोक एका ठिकाणी जमण्याचे प्रसंग पूर्वजांनी आयते तयार करून ठेवलेत, पण सुशिक्षित मंडळीला हे प्रसंग असून नसल्यासारखेच आहेत. आम्ही शिकलेले ही त्यांना ऐट आहे ना? लोकात कसे मिसळावे? ह्यांना मोठी पंचाईत पडते ती हीच...!' लोकांत मिसळा... हा लोकमान्यांचा टाहो सुशिक्षितांनी दुर्लक्षलाच. आजही लोकमान्यांचे हे विचार समाजातल्या सुशिक्षितांनी आचरले पाहिजेत. समाज घडवण्याची, समाज बांधण्याची, समाजाला सदैव जागे ठेवण्याची, समाजाला चवताळून उभं करण्याची जबाबदारी सुशिक्षितांचीच आहे. लोकमान्यांनी अनेक अंगांनी या उत्सवावर लिहिलंय. या उत्सवावर होणारा खर्च ही उधळपट्टी आहे असं म्हणणाऱ्यांना त्यांनी खडसावलंय, 'आठ-दहा दिवस उत्साहानं जर काढता येत नाहीत वा त्या उत्सवाप्रित्यर्थ थोडकेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. ह्या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत, पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची आणि शांतीची होण्यास असले खर्च आवश्यक आहेत...!' या उत्सवात राजकारण येते म्हणून नाके मुरडली जातात हे बघून लोकमान्यांनी लिहिले, 'भक्ती ही प्रत्येक मनुष्य आपापल्या घरी करीतच असतो. भक्ती करावयास आमच्या धर्मात ख्रिस्त्यांप्रमाणे फक्त रविवारी एक ठिकाणी जमावयास नकोय. गणपती उत्सव हा एक धार्मिक उत्सव तर खराच, पण त्यात नुसती भक्ती प्रधान नसून राजकीय प्रश्नांचा आणि राजकीय शिक्षणाचा जनसमूहात प्रसार हा हेतू प्रधान होय...!' लोकमान्यांनी सुशिक्षितांचा ह्या सर्व कार्यात जो सहभाग अपेक्षिला होता तो मिळवण्यात मात्र लोकमान्यांना यश आलं नाही आणि त्यांच्यानंतर ह्या उत्सवाकडे लोकमान्यांच्या दृष्टीतून कुणी बघितलेलंही दिसत नाही. हा उत्सव मोकाट सुटलेल्या घोड्यासारखाच उधळलाय आणि अजूनही तो आवरणे कुणाला जमू शकलेलं नाही. या उत्सवाला वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न जुमानता आजही हा उत्सव उधळतोय. त्यामध्ये नको त्या अनिष्ट गोष्टी शिरल्यात. या उत्सवातून निर्माण होणारं चैतन्य, उत्साह ज्वालामुखीतून फेकल्या जाणाऱ्या लाव्हासारखाच विध्वंसक आहे. त्यातून अपप्रवृत्ती जोपासल्या जाताहेत. हे सगळे बदलण्याचा, ही ऊर्जा शक्तीत बदलण्याचा मार्ग एकच आहे. लोकमान्यांनीच तो सांगितलाय. 'आमच्याच औदासिन्यामुळे मलिन झालेले हे उत्सव सतेज करण्याचे काम सुशिक्षितांनी आपल्या शिरावर घेतले पाहिजे. उत्सवाचे वेळी त्या त्या ठिकाणी त्यांनी हजर राहून व्यवस्थेसंबंधीचे हर एक प्रकारचे काम अंग मोडून करण्यास तयार असले पाहिजे. महोत्सवातल्या लोकशिक्षणाचा भाग सुशिक्षित मंडळीला आपल्या ताब्यात पाहिजे असल्यास सामान्य लोकांच्या खरोखर गरजा कोणत्या आहेत, लोकांत धर्मबुद्धी कितपत जागृत आहे, लोकांच्या स्वाभाविक ओघाला कोणते वळण दिले असता राष्ट्रहित सहजगत्या साधणार आहे ह्या सर्व गोष्टी लोकनायक होऊ पाहणाऱ्यांनी लोकात मिसळूनच समजावून घेतल्या पाहिजेत म्हणून लोकात मिसळा...!' लोकांच्या खरोखर गरजा कोणत्या जाणून घ्या, कंबर कसून लोकांबरोबर काम करा हे सुशिक्षितांना लोकमान्यांनी वारंवार सांगितलं. तेवढंच फक्त न ऐकता ह्या उत्सवाकडे सुशिक्षित बघत राहिले. अजूनही त्या बघण्यात फारसा बदल पडलेला नाही. बुद्धिदात्या गजानना, हे तुलाही कळून चुकलं असेल... असो. म्हणा मंडळी, गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
हरीश केंची
९४२२३१०६०९

राष्ट्रऐक्यासाठी लोकजागर.....!

"कालपासून गणेशोत्सव सुरू झालाय. लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकजागर या उद्देशानं लोकमान्यांनी गणेशोत्सवाचा वापर केला. आजही त्याचीच गरज निर्माण झालीय. निवडणुका अथवा सत्ता यांची हाव न धरता राज्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी जनतेला संघटित करण्याचं काम विचारी, विवेकी, पक्षनिरपेक्ष, देशभक्त तरुणांनी पुढं यायला हवंय. राजसत्ता हाती असावी म्हणून सवंग घोषणा करण्यात सत्ताधारी मग्न आहेत. राजकारणातल्या मंडळींच्या कृतीतून संयम, मनोनिग्रह दिसतो का? राज्य रसातळाला गेला तरी चालेल, पण सत्ता ही आपल्यालाच हाती हवी ह्या अट्टाहासानं होणारा अविवेक तेवढा दिसतोय. कुणी पैशासाठी राजकारण नासवतोय, कुणी प्रतिष्ठेसाठी, कुणी जाणता अजाणता तर कुणी हेतूपूर्वक राजकारण नासवतोय. राजकारण सुधारण्यासाठी लोकशक्ती जागी व्हायला हवीय!"

*आ*ज देशात आणि राज्यात विरोधीपक्ष सत्ताधारी यांच्या समन्वय राहिलेला नाही. कडवी राष्ट्रनिष्ठा आणि परधर्मियांचा आदरपूर्वक स्वीकार करण्याइतपत उदारता केवळ सत्ताधाऱ्यांनीच नव्हे तर प्रत्येक भारतीयांनी दाखवायला हवीय. पक्षीय झेंड्यापेक्षा आणि व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेपेक्षा राष्ट्र मोठं आहे हे ओळखून नेते वागले तर राजकारणाला चांगलं वळण लागेल. हिंदूंचा संघटित कोप आपला सर्वनाश घडवून आणेल, हे सत्यही मुसलमानांना कळून आलंय. देश उद्ध्वस्त झाला तर आपणही उद्ध्वस्त होऊ याची जाणीव झालेले मुसलमान राष्ट्रघातक्यांना साथ देणार नाहीत, आपल्या हातानं विनाश ओढवून घेणार नाहीत, असं म्हणण्याइतपत परिस्थिती बदललीय. सर्वसामान्य हिंदूना राष्ट्रऐक्याचं डोस पाजायचं, तो राजकारणात धर्म आणतो, असं म्हणून त्याला हिणवायचं, हा सारा एकांगीपणा कशासाठी? हीच वेळ राष्ट्रऐक्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ह्यावेळी धर्मांधतेची झापडं दूर करून उदार मनानं समंजस हिंदूंनी आणि हिंदुत्वाच राजकारण करणाऱ्या साऱ्यांनी  सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही यांना समर्थ करण्यासाठी पुढं यायला हवं! राजकारणी आणि गुन्हेगार यांचं साटंलोटं काँग्रेस पक्षापुरतंच आहे असा साजुक आव भाजपनं आणू नये. भाजप ही आता भगवी कॉंग्रेस आहे आणि भ्रष्टाचार भाजपलाही पचतो, रुचतो हे लोकांना कळून चुकलंय. भ्रष्टाचाराचा भाजपला तिटकारा आहे असं काही नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केलाय असा जाहीर आरोप प्रधानमंत्री मोदींनी केला आणि त्याच आठवड्यात राष्ट्रवादीला सोबत घेतलं. एवढंच नाही तर अजित पवारांना आणि इतरांना मंत्रिपदं बहाल केली. आतातर राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचारातून मुक्त करण्यात आलंय. फडणवीसांच्या राजवटीत हेमामालिनीसह संघ स्वयंसेवकांच्या विविध संस्थांना कवडीमोलानं भूखंड देण्याचा प्रकार झालाच ना! 
विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांचा व्यवहार हा दोन चोपड्या ठेवणाऱ्या काळ्याबाजारी बनियाला शोभणारा असाच व्यवहार आहे. लोकांच्या श्रद्धांचा व्यापार करून भांडवल जमवायचं आणि ते सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात वापरायचं, हे तंत्र अवलंबून भाजपनं जो डाव मांडलाय तो काँग्रेसनं मागे उभ्या केलेल्या 'गरिबी हटाव' मायाजालाला साजेसाच आहे. भाजप लोकांच्या भावनांशी खेळतोय, श्रद्धेशी खेळतोय आणि याचा पुरेपूर फायदा गुन्हेगार प्रवृत्तीच्या मंडळी उठवताहेत. पैसा आणि प्रतिष्ठा सुलभतेनं प्राप्त होण्यासाठी राजकारण हातात असणं वा राजकारणात हात असणं आवश्यक आहे हे ओळखून अनेक मंडळींनी विविध मार्गानं आपले संबंध प्रस्थापित केलेत. त्यातले सारेच काही उडवाउडवी करणारे गँगस्टर्स, गुंड नाहीत. तर कुणी पत्रमहर्षी आहेत, कुणी शिक्षणमहर्षी आहेत, कुणी चित्रमहर्षी आहेत. अशा प्रतिष्ठित गुन्हेगारांची एक महत्त्वाकांक्षी टोळीच आज राजकारणात वावरतेय. आपले हेतू साधण्यासाठी वृत्तपत्रं, चित्रपट, दूरदर्शन, रेडिओ, शिक्षणसंस्था, अर्थसंस्था प्रभावीपणे वापरून लोकमत बिघडवण्याचं वा हवं तसं घडवण्याचं कामही हे लोक बिनदिक्कतपणे करताहेत. ग्राम पंचायतीपासून थेट पार्लमेंटपर्यंत ह्यांचं एक जाळं पसरलंय आणि हे जाळं तोडण्याची हिम्मत दाखवील असा एकही राजकीय पक्ष आज तरी भारतात दिसत नाही. उलट राजकारणी लोकांमध्ये हे जाळं तोडण्याची शक्तीच उरलेली नाही. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर काँग्रेसचं विसर्जन करण्याची कल्पना मांडली होती. लोकांनी ती मानली नाही. इंदिरा गांधींच्या उदयापासून काँग्रेस मधल्याच नव्हे, राजकारणातल्या सत्प्रवृत्तींचा अंत झालाय असा एक लाडका सिद्धान्त साधनशुचितेत घोळलेली वा पोळलेली माणसं नेहमी सांगतात. कारण तसं सांगणं त्यांना सोयीचं वाटतं. पण १९४९ साली बंगलोरला काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं, 'स्वातंत्र्यापूर्वी आपण म्हणजे काँग्रेस पक्षाचे लोक ध्येयवादी होतो. त्यागी होतो. पण आता आपली नीती फारच खालावलेलीय. इतरांप्रमाणेच काँग्रेसजनही भ्रष्ट झालेत...! त्याच वर्षी मद्रासला काँग्रेसजनांपुढं बोलताना वल्लभभाईंनी म्हटलं होतं, 'आपल्याला आता बाहेरून संकट येणार नाही. आलं तर ते आतूनच येणार आहे. आपण इतके चारित्र्यभ्रष्ट झालो आहोत की, लवकरच याचे आपल्याला भयंकर परिणाम भोगावे लागतील...!' वल्लभभाई जे म्हणाले होते ते अधिक अक्राळविक्राळ स्वरूपात आज आपल्यापुढं उभं ठाकलंय. आज पक्ष बदललाय पटेलांनी तेव्हा जे सांगितलं ते आता भाजपसाठीही लागू होतंय. चारित्र्यधनाचा अभाव हे राजकारणातलं नव्हे, तर सर्वच क्षेत्रातल्या गुन्हेगारीचं प्रमुख कारण आहे. डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे यांनी, 'आपल्या लोकशाहीवरील नवे संकट' ह्या लेखात साठसत्तर वर्षांपूर्वी इशारा दिला होता, 'चारित्र्यधन जर आपण प्राप्त करून घेतले नाही, तर अमेरिकेप्रमाणे येथे ठग पेंढारशाही सुरू होईल आणि तिने केलेला रक्तशोष सोसण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी मुळीच नाही...! चारित्र्यधन हे स्वायत्त आहे, मदायत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत ते अंतरात्म्याला आवाहन करून प्राप्त करून घेता येतं. मनोनिग्रह संयम हा स्वतःच स्वतःला शिकवता येतो...!' असंही डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी सांगितलंय. आज राजकारणातल्या मंडळींच्या कृतीतून संयम, मनोनिग्रह दिसतो का? देश रसातळाला गेला तरी चालेल, पण सत्ता ही आपल्यालाच मिळायलाच हवी ह्या अट्टाहासानं होणारा अविवेक तेवढा आज दिसतोय. कुणी पैशासाठी राजकारण नासवतोय, कुणी प्रतिष्ठेसाठी राजकारण नासवतोय, कुणी जाणता अजाणता राजकारण नासवतोय, कुणी हेतूपूर्वक राजकारण नासवतोय.
ह्या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काय, असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सरकारला भय वाटेल एवढी लोकांची जागृत ताकद उभी करणं हा मार्गच समोर येतो. जागृत जनताच सरकारला योग्य मार्गानं चालायला भाग पाडेल. जयप्रकाश नारायण यांनी असा प्रयत्न केला होता. त्यांना स्वतःला सत्ता नको होती अथवा कुणाला सत्ता मिळवून देण्याचाही विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. सत्तेवर असणाऱ्या आणि सत्ता काबीज करण्यासाठी कंबरा कसलेल्या पक्षांना लोकांचं सामर्थ्य दाखवावं एवढाच जयप्रकाशांचा हेतू होता. जनतेला जागृत करण्याचा, लोकशाही समृद्ध करण्याचा हा उपाय सर्वच हितसंबंधींना धक्का देणारा होता. लोकशक्ती जागृतीचा जयप्रकाशांचा तो प्रयत्न ह्या हितसंबंधीयांनीच वाया घालवला. त्यांना ह्या मार्गानं सत्ता मिळाली, पण लोकांना हवा होता तो कुठलाच बदल मिळू शकला नाही. आज पुन्हा तशाच नव्हे, त्यापेक्षाही अधिक विकृत वातावरणात भारतीय लोकशाही सापडलीय. भारताला पुरतं बदलून टाकण्याचा निर्धार करून सत्ता हातात घेण्यासाठी नवे नवे डावपेच टाकले जाताहेत. त्यासाठी तत्वशून्य तडजोडी झालेल्या दिसताहेत. लोकांच्या मनात नाना भ्रामक गोष्टी भरवल्या जाताहेत आणि त्यासाठी घातपातांचाही वापर केला जातोय. निवडणुका अथवा सत्ता यांची हाव न धरता देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी जनतेला संघटित करण्याचं काम विचारी, विवेकी, पक्षनिरपेक्ष, देशभक्त तरुणांनी हातात घ्यायला हवंय. राज्य कुणाचं आहे? तुमचं का त्यांचं? असं म्हणणारी भाजप आणि कंपनी संधी मिळताच त्यांची होईल म्हणून हे राज्य आमचं. हा देश आमचा, आम्हीच त्याची देखभाल करणार असं व्रत घेऊन काही वर्षे वागण्याची तयारी तरुणांनी करावी. राजकारणाला नवं वळण द्यावं. सावध राहू या. छपलेल्या, लपलेल्या गुन्हेगारांना उघड्यावर यायला लावू या. राष्ट्रघातक्यांची साथ करणाऱ्यांना राष्ट्रप्रेम शिकवू या. निदान राष्ट्रद्रोहाला किती जबर किंमत मोजावी लागते, हे समजावून देऊ या. अखेर ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याला शिकवणंच राष्ट्रहिताचं असतं ना! राष्ट्रघातकी वृत्ती आवरण्याचं महत्त्व सर्वत्र सर्वांनाच पटलंय. हिंदू समाजाच्या ह्या राष्ट्राच्या भवितव्यावर काय परिणाम होईल, केवढे तांडव उठेल, किती संताप उसळेल, अविचार, अत्याचार यांचा पगडा असलेल्या धर्मांधांना कसं निमित्त मिळेल ह्याचा विचार न करता काही उपद्व्याप केलेल्या मंडळींनाही ह्या भीषणतेनं परिस्थिती हाताबाहेर जातेय हे जाणवू लागलंय. कुणाच्या स्वाभिमानाला धक्का न लावता या देशात एकमेकाचा आदर करीत सहजीवन कसं शक्य आहे, त्यासाठी काय करायला हवं याचा विचार करण्या इतपत शहाणपणा अनेक कडव्या मंडळींनाही सुचलाय. भारतीय मुसलमानांचा विश्वास मिळवला तरच पाकिस्तानी आणि इस्लामच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या कारवाया थोपवता येतील, भारतात शांतता राखता येईल, अतिरेकी शक्तींना आवरता येईल हे सत्य आता अधिकच स्पष्टपणे प्रगटलंय. त्याचबरोबर भारतीय हिंदूंचा संघटित कोप आपला सर्वनाश घडवून आणेल हे सत्यही भारतीय मुसलमानांना कळून आलंय. भारत उद्ध्वस्त झाला तर आपणही उद्ध्वस्त होऊ याची जाणीव झालेले मुसलमान राष्ट्रघातक्यांना साथ देणार नाहीत, आपल्या हातानं आपला विनाश ओढवून घेणार नाहीत, असं म्हणण्याइतपत परिस्थिती बदललीय. हीच वेळ राष्ट्रऐक्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ह्यावेळी धर्मांधतेची झापडं दूर करून उदार मनानं समंजस हिंदूंनी सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही यांना समर्थ करण्यासाठी पुढं यायला हवं. देशावर झालेल्या आघाताचा सडतोड जबाब देण्याइतपत कडवी राष्ट्रनिष्ठा आणि परधर्मियांचा आदरपूर्वक स्वीकार करण्याइतपत उदारता साऱ्याच भारतीयांनी आज दाखवायला हवीय. पक्षीय झेंड्यापेक्षा, व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेपेक्षा राष्ट्र मोठे आहे हे ओळखून आपले नेते वागले तर भारतीय राजकारणाला वेगळं चांगलं वळण लागणं शक्य आहे.
ह्या साऱ्याची दखल घेतली जायला हवी, समाजसेवेच्या ह्या उस्फूर्ततेतून काही करायचं निर्माण व्हायला हवं. पोलीस चकाट्या पिटत बसतात, त्यांना कायदा सुव्यवस्था यांची काहीच तमा नसते, ह्या तक्रारी करून खापर फोडण्यासाठी सदैव काही शोधण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था यासाठी आपण काय करू शकतो, निदानपक्षी साध्या गोष्टी पाळण्यावर कसं लक्ष देतो याचा विचार प्रत्येकजणानं केला तर निष्कारण अडकून पडणाऱ्या बऱ्याच पोलिसांना काही आवश्यक कामासाठी मोकळं करता येईल. अडचणीच्या काळात स्वयंशासन करून लोकांनी वाहतूक चालू ठेवण्यात खूपच सहाय्य केलं. पुण्यात एका नाल्यावर एक छोटा पूल आहे. मुख्य रस्ते बंद पाहून वाहनचालकांना ही आडवाट आठवली. स्वाभाविकच ह्या पुलाला महत्त्व आले. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी झाली. पोलीस नव्हते. मग तिथल्या तरुणांनी वाहतुकीचे नियंत्रण केले. ह्या आडवाटेनं अनेकांना त्यादिवशी खूपच जलद बाहेर पडता आलं. हे असं स्वयंशासन प्रारंभी तरुणांनी खूप ठिकाणी दाखवलं होतं. ह्याच स्वयंशासनानं फेरीवाल्यांना आवरता येईल, पण सध्या फेरीवाले हप्ताशासनानं मुक्त झाले आहेत. हप्ता दिला की, फूटपाथ आपल्या बापाचा. नागरिक बेजार झाले तरी निमूट रस्त्यानं फुटणार! लोखंडी सांगाडे फुटपाथवर उभे करून त्यावर कपडे टांगून पुरता फुटपाथ फुकटात दुकान म्हणून रोजच्या अल्पशा हत्यानं मिळत असेल तर कोणाला नकोय आणि रोज हातातल्या हातात दहा हजार नुसत्या दमबाजीनं गोळा होत असतील तर हवी कशाला समाजसेवा, असा परस्पर पूरक व्यवहार सध्या चाललाय. एकप्रकारे गुन्हेगारीवृत्ती सगळ्यांमध्येच मुरतेय. राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय म्हणून अलीकडं जरा जोरात बोललं, लिहिलं जातं. फुटपाथवरच्या विक्रेत्यांकडून रोजच्या रोज दोन रुपयांपासून खंडणी घेणारे आणि त्या पैशाच्या बळावर त्या भागातले राजकारण दामटणारे उद्याचे नेते मात्र अजून कुणाला खटकलेले नाहीत. कायदा डावलून हवं ते करण्याचं शिक्षण आता सगळ्यांना विना फी मिळू लागलंय, नव्हे, कायद्यानं वागण्यात काही अर्थ नाही हे लोकांना अनुभवानं पटू लागलंय, 'बघता येईल' ही बेपर्वा वृत्ती लोकांत वाढतेय. कुठल्याही चांगल्या गोष्टीत वाईट शोधण्याची विचित्र मानसिकता लोकात मूळ धरतेय. अविश्वासानं लोकांची विचारशक्ती पोखरलीय. आदर वाटावा, अनुकरण करावं असा कुणी उरलेला नाही आणि आज जे काही चाललंय ते कधी सुधारण्याची शक्यता नाही, असं लोक मनोमनी मानू लागलेत. दुनिया हा चोरबाजार आहे, तुम्ही चोर व्हाल तरच या बाजारात टिकू शकाल असा लोकांचा ठाम समज झालाय. माणसं एकंदरीनं सैरभैर झालीत. मनोमनी ह्या राष्ट्राचा, इथल्या समाजाचा, इथल्या संस्कृतीचा द्वेष करीत जगणारे आणि प्रत्येक उपकाराची फेड डंख मारून करणारे साप इथं वावरताहेत. परकी राष्ट्रांकडून पैसा घातपाती सामग्री घेऊन इथं हजारोंचे जीवन बरबाद करताहेत. आमच्या सौजन्याचा लाभ घेऊन कायमचे परदेशी पळून जाताहेत. पुन्हा इथं येऊन कशी नवी कारस्थानं करायची यासाठी इथल्या बाकी हस्तकांशी संपर्क ठेवताहेत. अशा हरामखोरांना सद्भावनेच्या आणि प्रेमाच्या पाकात किती बुडवलेत तरी ते आपल्या जातीवरच जाणार हे का नाकारता? ह्या देशात सदैव अशांतता असावी म्हणून झटणाऱ्यांचे दलाल बनून राहणाऱ्या इथल्या घातक्यांना हुडकून ठेचून काढण्यासाठी जोवर राष्ट्रवादी पुढे येत नाहीत तोवर त्यांच्याबद्धल कुणाच्या मनात संशय दाटला तर तो दोष कुणाचा? हिंदूंचे भय बाळगू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्यामधल्याच वृत्तीच्या, उपद्रवी शक्ती-व्यक्तींचे भय बाळगा, त्यांच्या दडून राहण्याला सहाय्य करू नका. सीमेबाहेरील प्रश्नाशी उगाच स्वतःला जोडून घेऊ नका. इथल्या समाजाला हिणवू, डिवचू नका असं कधी सर्वसामान्याना शांतीदूतांनी समजावून सांगितलंय? सर्वसामान्य हिंदूला राष्ट्रऐक्याचे डोस पाजायचे, तो राजकारणात धर्म आणतो, असं म्हणून त्याला हिणवायचं हा सारा एकांगीपणा कशासाठी? नवजीवन देण्यासाठी आयुष्य फेकून देण्याची तयारी दाखवणाऱ्यांनी राष्ट्रघातकीपणा फैलावणाऱ्या प्रवृत्तींचं आव्हान स्वीकारायला हवं. त्यांना सुधारायला काय करणं शक्य आहे ते करायला हवं!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

घाशीराम कोतवाल चावडीचा दीड तासात चुराडा झाला


"२२७ वर्षाची ही पेशवेकालीन ऐतिहासिक वास्तू तब्बल २९ वर्षे न्यायालयीन खटल्यात आपल्या जीवन-मरणाचा झोका घेत होती. अखेर न्यायालयाच्या संमतीने महापालिकेनं तिचा पाडाव झाला!"

  *पे*शवाईत घाशीराम कोतवालानं आपल्या उन्मत्त वागण्यानं पुणेकरांना त्राही त्राही करून सोडलं होतं. काही वर्षापूर्वी पुन्हा एकदा 'घाशीराम कोतवाल' या नाटकावरून वादळ उठलं होतं आणि या घाशीराम कोतवालाची चावडी उद्ध्वस्त केल्यानं त्याचा उरलासुरला धुरळा पुणेकरांवर उडाला. २२७ वर्षाची ही जुनी वास्तू. पुण्याचं रूप दिसामाजी बदलतंय. अनेक स्थित्यंतरं होत आहेत. पण 'कोतवाल चावडी' हे नाव मिळवणारी ही इमारत मध्यवस्तीत दिमाखानं उभी होती. पुणे महापालिकेनं वर्षापूर्वी ती इमारत भुईसपाट केली.
    पेशव्यांच्या कारकीर्दीत विषेशतः सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत 'कोतवाल' या शब्दालाच अधिक किंमत होती असं नाही; तर कोतवाल या शब्दातच भीती होती, आदर होता, तशीच जरबही होती. पेशव्यांनी पुण्याची सारी भिस्त या कोतवालावर सोपविली होती.
    सवाई माधवरावांनी पानीपतच्या पराभवानंतर मराठी राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा सावरली आणि पुण्याला मूळचं वैभव प्राप्त करून दिलं. पानीपतच्या लढाईनंतर पुण्याचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला. लोकसंख्येतही तिपटीनं वाढ झाली. लोकसंख्येच्या वाढीबरोबरच व्यापार- उदीमाच्या निमित्तानं वर्दळ वाढली आणि पुणे शहराची गुंतागुंत वाढली. विस्तारलेल्या आणि गुंतागुंत वाढलेल्या शहराची व्यवस्था बघण्यासाठी पेशव्यांनी १७६४ साली 'कोतवाल' हे स्वतंत्रपद निर्माण केलं. त्यासाठी १७६८ साली ही नामशेष केलेल्या चावडीतून कोतवालीचे काम चालण्यासाठी उभारलेली होती.
    'कोतवाल' या हिंदी शब्दाला आज पोलिसांचे काम करणारी व्यक्ती म्हणून जो अर्थ प्राप्त आहे तो त्या काळात अभिप्रेत नव्हता. कोतवालाचं पद पेशव्यांच्या खालोखालच्या रूबाबाचं होतं. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि सत्र न्यायाधीश यांना जे अधिकार आज आहेत ते अधिकार १७६४ मध्ये कोतवालांना होते. साहजिकच या सर्व प्रशासकीय यंत्रणांचे ठिकाण म्हणून 'कोतवाल चावडी' समाजात अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.
    सवाई माधवराव पेशव्यांनी कोतवालपद निर्माण केल्यानंतर त्यांनी बाळाजी नारायण केतकर यांना कोतवाल म्हणून नेमलं. त्यांच्या हाताखाली मोठ्या संख्येनं नोकरचाकर होते. वाढत्या वस्तीबरोबर गुन्हेगारीही वाढली. त्याचे नियंत्रण करण्यासाठी शहरात निरनिराळ्या ठिकाणी चौक्या बसविल्या. कोतवाल चावडीवरून रात्री अकरा वाजता तोफ उडविली जाई. त्यानंतर शहरात कुणालाही फिरता येत नसे. जणू संचारबंदीच. रस्त्यावर कुणी दिसला तर त्याला अटक होत असे. पहाटे चार वाजता दुसरी तोफ उडल्यानंतर शहरातला संचार आणि व्यवहार पूर्ववत सुरू होत असे. गुन्हेगारांवर वचक बसवित असतानाच रस्ते-दुरुस्ती, दिवाबत्ती, देखभाल, पाणीपुरवठा, स्वच्छता अशी प्रशासकीय कामंही कोतवाल करीत असे. राज्यासंबंधी चालणाऱ्या खलबतांचा शोध घेऊन गुप्त बातम्या पुरविण्याचे कामही कोतवाल करीत. या सर्व कामांबरोबरच छोट्या अपराधांबद्दल गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारीदेखील ते पार पाडीत होते.
    कोतवालाच्या श्रेयनामावलीत घाशीराम कोतवालाचे नाव इतिहासात विषेश नोंदवलं गेलं. तो मूळचा औरंगाबादचा ब्राह्मण ! नशीब अजमावण्यासाठी तो पुण्याला आला होता. पुण्यात आल्यावर त्याचा नानासाहेब फडणविसांशी परिचय झाला. पुढे परिचयाचे गाढ मैत्रीत रूपांतर झालं. घाशीरामनं आपल्या कारकीर्दीत गुन्हेगारांवर जरब बसवून महसुलात बऱ्यापैकी वाढ केली होती. तेलंगी ब्राह्मणाच्या मृत्यू प्रकरणात पेशव्यांनी त्याला पाठीशी घातलं नाही. त्यामुळं ३१ ऑगस्ट १७९१ ला घाशीरामला गुलटेकडीवर आमजनतेनं दगडांनी ठेचून मारलं.
    आज महाराष्ट्रात जकात वसुलीचे ठेके देण्याचे पेव फुटलं आहे; परंतु १७९६ मध्ये पुण्याची कोतवाली ठेका पद्धतीनं देण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजीरावांनी केला. दुसरे बाजीराव सतत आर्थिक विवंचनेत असायचे. नक्की आणि भरपूर पैसा मिळविण्याचे माध्यम साधन म्हणून त्यांनी कोतवालीचा लिलाव करण्याला सुरुवात केली. ठेकेदारी पद्धतीच्या कोतवालीनं पेशव्यांच्या कोतवालामधली जरब एकाएकी नाहीशी झाली. केवळ धंदा म्हणून ठेकेदार या पदाकडे पाहू लागले. १८०० ते १८१७ या काळात पुण्यात ठेकेदारी पद्धतीची कोतवाली अस्तित्वात होती. विठोजी नाईक गायकवाड हा पहिला ठेकेदार म्हणून ओळखला जातो. पेशव्याच्या आज्ञेनुसार, 'कोतवाल चावडी' हे मुख्य कार्यालय होतं. या चावडीनं पुण्याच्या इतिहासातल्या प्रशासकीय घटना पाहिल्या होत्या. चावडी हे मुख्य कार्यालय, तर नारायण, शनवार, सोमवार, वेताळ, बुधवार आणि रविवार अशा सहा पेठात सहा चौक्या सुरू करण्यात आल्या होत्या.
    १७६४ ते १८१७ या ५३ वर्षे पेशव्यांच्या काळात कोतवाल चावडी कमी-अधिक प्रमाणात महत्त्वाच्या स्थानावर राहिली. मूळ वास्तूत अनेक बदल झाले. मातीच्या इमारतीवर सिंमेटचे प्लास्टर चढले, अशी ही २२७ वर्षांची जुनी 'कोतवाल चावडी' २९ वर्षाच्या न्यायालयीन झगड्यानंतर सर्वोच न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार जमीनदोस्त करण्यात आली. ९ फेब्रुवारीच्या सकाळी साडेआठ वाजता महानगरपालिकेचे नगर अभियंता माधव हरिहर, सहाय्यक आयुक्त वसंत पोरेड्डीवार आणि विषेश नगर उपअभियंता का. द. मराठे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या ४० सेवकांनी ही कारवाई केली. यासाठी तीन अजस्त्र जे. सी. बी, एक क्रेन, तीन गॅसकटर, २ मोटारव्हॅन, मॅटडोर, दहा डम्पर ट्रक वापरण्यात आले.
    अत्यंत गजबजलेल्या बुधवार पेठ घ. क. २४० इथं ही चावडी होती. मंडईच्याजवळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा गणेशोत्सव या चावडीच्या समोर साजरा केला जात असे. ही दुमजली इमारत रस्ता रुंदी रेषेमध्ये येत असल्यानं महापालिकेनं ३० मार्च ७१ रोजी ३५० चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असलेली ही चावडी नंदलाल हिरालाल नाईक या मूळ मालकाकडून १ लाख ५६ हजार ६५ रुपयाला घेतली. या चावडीच्या इमारतीत २६ भाडेकरू होते. तळमजल्यावर २२ दुकानदार, तर पहिल्या मजल्यावर एक दुकान आणि तीन राहणारे भाडेकरू होते. महापालिकेनं सहानुभूतीपोटी ३० सप्टेंबर ७१ पर्यंत दैनंदिन भाड्यावर त्या भाडेकऱ्यांबरोबर करारनामा केला होता. महापालिकेने १४ जानेवारी ७२ रोजी जागा रिकामी करावी, अशा नोटिशा भाडेकऱ्यांना बजावल्या. त्याला भाडेकरूंनी जिल्हा न्यायालयात अर्ज करून स्थगिती मिळविली. पण पुढे ती फेटाळल्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका फेटाळल्यानंतर भाडेकरूंनी पुन्हा सह दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये २९ ऑगस्ट ७३ रोजी जागेचा ताबा घेण्यासाठी महापालिकेला स्थगन आदेश दिला. 
    या आदेशानंतर महापालिकेनं उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्यात भाडेकरूंच्या विरोधात निकाल गेल्यानं भाडेकरूंनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं. ते अपील २४ जानेवारी ९५ रोजी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानं १४ जानेवारी ७२ रोजी महापालिका आयुक्तांनी जागा खाली करण्याबाबतचा हुकूमनामा कायम केला. त्यानंतरही महापालिका आयुक्तांनी सहानुभूती दाखवून आणखी मुदत दिली होती. पेशवाईतली ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रसिद्ध असलेली ही 'कोतवाल चावडी' हटविण्याचे काम २९ वर्षे रेंगाळले तरी आधुनिक अजस्त्र साधनांनी तिचा अवघ्या दीड तासात चुराडा केला!

घाशीराम कोतवाल.
पेशव्यांनी राज्यकारभारात जम बसवल्यावर पुणे शहराला राजधानीसारखं महत्त्व प्राप्त झालं.   कोकणासह वेगवेगळ्या प्रदेशांतून लोक या शहरात राहायला येऊ लागले. गावपण जाऊ त्याला शहराचं  रूप प्राप्त होऊ लागलं, नवे व्यावसायिक इथं स्थायिक झाले, व्यापार उदिम वाढला. १७८० च्या आसपास पुण्याची लोकसंख्या अंदाजे १ लाख ५७ हजार इतकी होती, पुढच्या २० वर्षांत ती ६ लाखांवर गेली असावी अशा नोंदी सापडतात. एकूणच या काळात पुणं गजबजलेलं होतं. घाशीराम कोतवाल प्रकरण १७९१ साली घडलं म्हणजे तो तर या गजबजाटातला अगदी सर्वोच्च बिंदू आहे! रियासतकारांनी दुसऱ्या खंडात पेशवाईत पुण्याचं महत्त्व कसं वाढत गेलं आहे याबद्दल लिहिलंय. ते लिहितात, 'निरोगी हवा, पाचक पाणी, रुचकर अन्न, सुगंधी फुले, स्वादिष्ट फळं यांच्या समवायांत राजकीय ऐश्वर्य, कौटुंबिक स्वास्थ आणि राष्ट्रीय उमेद या पुण्यनगरांत एकवटल्या होत्या...!' या वर्णनावरुन पुण्याचं महत्त्व लोकसंख्या, व्यापार, राजकारण आदी गोष्टींसाठी कशाप्रकारे वाढत गेल्या याचा अंदाज येतो. पुण्यात कसबा पेठ ही सर्वात जुनी पेठ होती. त्याबरोबरच शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, सदाशिव पेठ, गंज, गणेश, मुझफरगंज, नागेश-नारायण या पेठाही त्यावेळेला होत्या. वेगवेगळ्या सरदारांचे वाडे, सामान्य नागरिकांची घरं, व्यापार-उदीम या पेठांमधून चालत असे, त्याचप्रमाणे विविध देवळंही या पेठांमध्ये होती.  
आताच्या लष्कर भागात तत्कालीन भवानी पेठेत घाशीराम कोतवालाचं घर होतं. ती पेठ १७६७ साली महादेव विश्वनाथ लिमये यांनी माधवराव पेशव्यांच्या आदेशानं ती वसवली. तसंच या घटनेशी संबंधित असलेले नाना फडणवीस यांनी हनुमंत पेठ म्हणजे नाना पेठ तर सवाई माधवरावांनी शिवपुरी म्हणजे रास्ता पेठ विकसित केली. सवाई माधवरावांच्या काळात इचलकरंजीकर घोरपड्यांनी घोरपडे पेठ वसवली होती. शहरांच्या रखवालीसाठी शिपाई नेमलेले असत. या शिपायांच्या प्रमुखाला कोतवाल म्हणत. शहरातली कायदा-सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवण्याची जबाबदारी कोतवाल आणि त्याचं कार्यालय म्हणजे कोतवालीकडे असे.
कोतवालाच्या कार्यकक्षेत जे महत्त्वाचे तंटे उपस्थित होतील ते सोडवणं, बाजारभाव निश्चित करणं, सरकारी कामांसाठी मजूर पुरवणं, जमिनीच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारांवर नजर ठेवणं, शहरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची माहिती ठेवणं इत्यादी कामं होती! मोगलांच्या काळात १७१८ साली हसनखान हा पुण्याचा कोतवाल होता. थोरल्या माधवरावांच्या काळात बाळाजी नारायण केतकर नंतर सवाई माधवरावांच्या काळात घाशीराम हा कोतवाली सांभाळत होता. एकूणच कोतवालीला या वेगानं आकार घेत असलेल्या शहरात मोठं महत्त्व आल्याचं दिसतं. शहरांत येऊन राहणारे, त्यांची चौकशी पेठांपेठांमधून कोतवालचे कारकून बारकाईनं करत. शहरात रात्रीची गस्त कोतवालीकडचे फिरत्ये त्याच बरोबर कारकून प्यादे चौकशी करत. चोरांचा तपास लावून चोर धरून आणून सरकारांत देत जाणे इ.!' असा आदेश दिला जाई.
पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे फार काळ जगले नाहीत. सहा महिन्यांतच त्यांचा २३ जून १७६१ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर थोरले माधवराव यांनी पेशव्यांची वस्त्रं स्वीकारली. नाना फडणवीस आता माधवरावांबरोबर काम करू लागले. थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांचे धाकटे पुत्र नारायणराव पेशवेपदावर आले. नारायणरावांची हत्या झाल्यानंतर अल्पकाळ राघोबादादा आणि नंतर सवाई माधवरावांना पेशवाईची वस्त्रं मिळाली. सवाई माधवरावांच्या कारकीर्दीतच घाशीरामाचं प्रकरण घडलं. पेशवे मोहिमेवर जाताना कारभाराची जबाबदारी, नानांच्या भरवशावर टाकून जात. माधवरावांच्या कार्यकाळात नाना फडणवीसांकडे फडणीशीबरोबर अनेक जबाबदाऱ्या आल्या. फडणीशी म्हणजे बजेटची आखणी, हिशेब ठेवणं, ऑडिट आणि पेशव्यांच्या राजधानी जबाबदारी पाहणं हे काम नानांकडे आलं.
घाशीराम कोतवाल याचं पूर्ण नाव घाशीराम सावळादास असं होतं. तो मूळचा औरंगाबादचा होता. घाशीरामची कोतवालपदी नियुक्ती करताना त्याच्याशी वीस कलमी करार केला गेला. या कलमांत घाशीरामच्या कामाचा उल्लेख केला आहे. कोतवालीचा अंमल ठरलेल्या रिवाजाप्रमाणे करावं, इमानेइतबारे वर्तन करून लोकांना सुरक्षित ठेवावं. नारायण आणि शनिवार पेठेत कोतवाल चावडी नसल्यानं तिथले हालचाल समजत नाही. त्यामुळे तिथं चावड्या घालून तिथल्या बातम्या कळवणं. शहरातले रस्ते चांगले करावेत. नवीन पडवी, ओटे परवानगी शिवाय झाले असतील, तर ते अतिक्रमण काढून टाकणं आणि पुढे होऊ न देणं यासाठी खबरदारी घेणं. शहरात रात्री फिरून गस्त घालणं आणि शहराचा बंदोबस्त राखणं, तसंच बारकाईनं चोरांचा शोध घेऊन चोर धरून आणून सरकारात देणं. कोतवालीचा दरमहा हिशोब सरकारात जमा करणं. 
घाशीरामानं कारभार हातात घेण्याआधी पुण्यात चार पोलीस चौक्या होत्या. त्यानं नारायण आणि शनिवार पेठेत दोन नवीन चौक्या बसवल्या. त्याच्या हाताखाली तीन अधिकारी होते आणि त्यांच्याकडे कोतवालीतली तीन खाती सोपविली होती. मुजुमदाराकडे दस्तऐवज, अर्ज वगैरे लिहिण्याचे काम असे. दुसऱ्याकडे कागदपत्रे सांभाळण्याचं काम आणि तिसरा जमाबंदीचा अधिकारी असे. तिघांचा मिळून पगार वर्षाला ६४० रुपये होता. नवीन चौक्या आणि वाढलेला कारभार यामुळे या पोलीस चौक्यांचं सुद्धा उत्पन्न वाढलं. १७९० च्या आसपास या पोलीस ठाण्यांचं उत्पन्न जवळपास सुमारे २७ हजार रुपयांवर गेलं. १७९१ साली पुण्यात दंडाला पात्र असे फक्त २३४ गुन्हे होते. यावरून घाशीरामचा कारभार किती चोख होता, याची कल्पना येते. या गुन्ह्यात सरकारच्या परवानगीशिवाय वेश्या व्यवसाय करणं, परवानगीशिवाय कत्तलखाना, बकरी मारणं, बेवारसी प्रेतांची विल्हेवाट लावणं, स्वतःची जात चोरणं, कुंटणखाना चालवणं, वेश्या व्यवसायासाठी मुली विकत घेणं, एक नवरा जिवंत असताना दुसरा करणं, बायकोला काडी मोड दिल्यानंतरही तिला घेऊन राहणं, कोळ्यांना कामावर ठेवणं अशा गुन्ह्यांचा त्याकाळी प्रामुख्यानं समावेश होता. 
घाशीरामानं हातात कारभार घेतल्यावर शनिवार आणि नारायण पेठेत चौक्या उभ्या केल्या. इ. स. १७८२ मध्ये घाशीरामाच्या ताब्यात मुख्य चावडी आणि सोमवार रविवार, कसबा, वेताळ, गणेश अश्या ५ चावड्या होत्या आणि हाताखाली ९० शिपाई नेमून दिलेले होते. घाशीरामाच्या विनंतीवरून नारायण आणि शनिवार या पेठांतून आणखी दोन चावड्या बसवून जादा २५ लोक नेमून देण्यात आले. मुख्य कोतवाल चावडी आणि या इतर सात चावड्यांवर दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी कोतवालाच्या हाताखाली सरअमिन, अमिन, दिवाण, दप्तरदार असे अधिकारी होते आणि ते  कोतवालाच्याच हुकमतीखाली होते. या सर्वांचा मिळून पगार वर्षाला २ हजार ९५० रु. होता! याशिवाय कारकून, प्यादे, स्वार, जासूद, नजरबाज गुप्तहेर अशा १२४ जणांचा स्वतंत्र ताफा त्याच्या दिमतीला होता. १७९८ मध्ये त्यात १०० गारदी, २ दिवटे, १० नजरबाज, १०० स्वार अशा २१२ जणांची वाढ करण्यात आली! सरकारी प्रशासन यंत्रणेचा एकूण विचार केला तर कोतवाल तसा छोटा अधिकारी होता. पण त्याच्या हाती दिवाणी-फौजदारी अधिकार एकवटले होते. त्याला भरपूर स्वातंत्र्य मिळाल्यानं तो बडा अंमलदार मानला जाऊ लागला. गावातली भांडणं, मारामाऱ्या यांचे निकाल देणं, दंड आकारणं, बाजारभावावर नियंत्रण ठेवणं, वजन मापांची तपासणी करणं, खरेदी विक्रीचे दस्तऐवज तयार करणं, सरकारला गरजेप्रमाणे मजूर पुरवणं, लोकसंख्येची नोंद ठेवणं, अधिकृत अनधिकृत घरे किती, जप्ती किती, सरकार-वाटणीची किती याचा तपशील तयार ठेवणं, शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं. जकात गोळा करणं, रात्रीची गस्त, पहारे ठेवून तोफ झाल्यावर शहरात हिंडणाऱ्या माणसाला चौकीत ठेवणं, सार्वजनिक सण, समारंभात बंदोबस्त, श्रावणमास दक्षणेत सुकरता आणणं, सरकारी पाहुण्यांची बडदास्त, सरकारविरुद्धच्य़ा कटकारस्थानाची आली तर ती लगेचच सरकारला देणं, नवा हुकूम जारी करताना, जुना रद्द करताना दवंडी देणं, चावड्यांवरचा हिशोब दरमहा सरकारला दाखवणं, सरकारी कायदे मोडणाऱ्यांपासून दंड वसुल करणं, बेवारस मालमत्ता सरकारजमा करणं, वाहतुकीसाठी रस्ते दुरुस्ती, अनधिकृत बांधकामं पाडून टाकणं, बाजारातल्या वस्तूंवर सरकारी शिक्के मारणं, पेठा वसवून व्यापार उदीम वाढवणं, शहरातल्या अनैतिक गुन्ह्यांचा छडा लावून दंड वसुली, पांथस्थ, बैरागी, यांच्या राहण्या-जेवणाची सोय, सरकारी कैद्यांची देखभाल, निसर्गात होणारे बदल वेळोवेळी सरकारला कळवणं ही कोतवालाची प्रमुख कामं होती, यावरून कोतवालाचा आणि मुख्य कारभाऱ्याशी किती जवळचा संबंध होता हे स्पष्ट होतं.
घाशीरामच्या कार्यकाळात रात्रीच्या वेळी रस्त्यांवर गस्त, जागता पहारा, शहरात येणार्‍या-जाणार्‍यांची कसून तपासणी, शहराची सुरक्षा, शहरातली फंदफितुरी शोधणं, चोर्‍या-जुगार रोखणं, शहराची स्वच्छता इत्यादी कामं बिनाकसूर केली जात होती. याबाबत पेशव्यांचा बखरकार म्हणतो, 'ऐसी कोतवाली मागे कोणी केली नाही आणि पुढेही करणार नाही...!' नाना फडणवीसांच्या मर्जीतला मानला जाणारा हा कोतवाल एका प्रकरणामुळे मात्र पुण्यातल्या लोकांच्या संतापाचं मुख्य कारण बनला. हे प्रकरण वादळासारखं तयार झालं आणि घाशीरामाचा जीव गेल्यावरच शांत झालं. रविवारी रात्री सुरू झालेलं प्रकरण बुधवारी दुपारी संपलं आणि पुण्याच्या इतिहासात ते कायमचं जाऊन बसलं. पुण्यामध्ये सर्व जातीच्या लोकांची वस्ती वाढत होती तशी ब्राह्मणांची संख्याही होती. यातल्या अनेक ब्राह्मणांचं अर्थाजनाचं साधन म्हणजे दक्षणा होतं. दक्षणा मिळवण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातल्या ब्राह्मणांची पुण्यात गर्दी होत असे. पहिल्या बाजीरावाच्या काळात शनवारवाड्यात दक्षणा वाटप सुरू झालं, त्यानंतर ते शहरात विविध ठिकाणी होत असे. नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याजवळ मोकळ्या जागेत दक्षणा वाटप सुरू केले. थोरल्या माधवरावांनी १७६५ मध्ये दक्षणा वाटपासाठी पर्वतीच्या पायथ्याच्या दक्षिणेस एक वास्तूच बांधली. त्याला पर्वतीचा रमणा असं नाव पडलं. तिथं गणपतीचं मंदिर आहे. सवाई माधवरावांच्या काळात आणि दुसऱ्या बाजीरावांच्या काळात याला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. घाशीराम कोतवालाचं प्रकरण सवाई माधवरावांच्या काळातच घडलेलंय. दक्षणेचा मूळ उद्देश ज्ञानाला उत्तेजन देणं असं होतं. श्रावण महिन्यात दक्षणा स्वीकारण्यासाठी शृंगेरी, कांची, श्रीरंगपट्टण, कुंभकोण, तंजावर, रामेश्वर, काशी, कनौज, ग्वाल्हेर, मथुरा इथून ब्राह्मण येत असत. या सर्व ब्राह्मणांची रमण्यात राहाण्याची एकत्र व्यवस्था होत असे. त्याला ‘ब्राह्मण कोंढणं’ असं म्हणत. 
ज्या घटनेमुळे घाशीरामाचा मृत्यू झाला त्याबद्दल अनेक वर्षे चर्चा सुरू राहिली. नाना फडणवीसांचं चरित्र लिहिणारे वासुदेव वामनशास्त्री खरे यांनी याबद्दल लिहिलंय. ते लिहितात, 'पुण्याहून द्रविड ब्राह्मण आपल्या देशास जाण्याकरिता निघोन असामी पसतीस श्रावण वद्य १४ रविवारी प्रहर दिवसास सायंकाळी घाशीराम कोतवाल यांचे बागात जाऊन उतरले. तेथे ब्राह्मणांनी कणसे मळ्यातील मक्याची दहा कणसे तोडली. त्यावरुन माण्याचा व त्यांचा कजिया जाहला. माळ्याने शिवीगाळ केली. त्यावरुन ब्राह्मणांनी त्यास मारिले. त्याजवरुन माळी फिर्याद घेऊन कोतवाल यांजकडे आला आणि सांगितले की, फितवेकरी चोर कोमटी वगैरे आहेत, मळ्यात दंगा करतात, मला मारिले, त्यांचे पारिपत्य केले पाहिजे...!' 
घाशीरामाकडे तक्रार आल्यानंतर त्यानं २५ लोक पाठवून ब्राह्मणांना मारहाण करुन भवानी पेठेतल्या आपल्या वाड्याच्या तळघरात कोंडलं. रविवारी रात्री ब्राह्मणांना कोंडल्यावर त्यानंतर सोमवारचा अख्खा दिवस गेला. ही गोष्ट मंगळवारी सकाळी मानाजी फाकडे यांना समजली. त्यांनी तिथं जाऊन जबरदस्तीनं कुलुपं उघडायला लावली तेव्हा १८ ब्राह्मण घुसमटून मेल्याचं दिसलं. ९ लोक जिवंत होते. त्यातल्या तिघांचा जीव त्याच दिवशी संध्याकाळी गेला आणि ६ लोक मात्र वाचले. हे सगळं पेशव्यांच्या कानावर घातलं गेलं. नाना फडणवीसांनी घाशीरामाला बोलावून यामागचं कारण विचारलं तेव्हा हे कोमटी वगैरे जातीचे चोर होते आणि ते अफू वगैरे खाऊन मेले असं त्यानं सांगितलं. त्यानंतर घाशीरामानं मृतदेह जाळण्यासाठी निरोप पाठवला मात्र मानाजी फाकड्यांनी याला विरोध केला. पेशव्यांनी सांगितल्याशिवाय मृतदेह नेऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे नाना फडणवीसांनी घाशीरामाला पुन्हा काय झालं हे विचारलं तेव्हा त्यानं जुनंच उत्तर दिलं. त्याला चौकीत आणल्यावर ब्राह्मणांनी आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली. शेवटी रात्र झाल्यावर नाना फडणवीसांनी न्यायाधीश अय्याशास्त्री यांना बोलावणं पाठवलं. त्यांनी या प्रकाराला देहांत प्रायश्चित्त असल्याचं सांगितलं. 
संतप्त लोकांनी घाशीरामाला हत्तीवर उलटा बसवून पेठांमध्ये फिरवलं आणि रात्री रमण्यामध्ये ठेवलं. त्याच्या राखणीसाठी दोनशे ब्राह्मण बसले. बुधवारी घाशीरामाला चावडीवर आणलं. त्याला उंटावर बसवून शहरभर फिरवलं त्यानंतर भवानी पेठेच्या पलिकडे नेऊन टाकलं त्यानंतर त्याच्यावर दगडं मारुन त्याला ठार मारण्यात आलं. घाशीरामानं केलेल्या कामाबद्दल आणि त्याला मिळालेल्या शिक्षेबद्दल बोलताना इतिहास अभ्यासक लिहितात, 'घाशीराम कार्यक्षम अधिकारी होता. कोतवाली आणि पोलीस खाते सुधारण्यासाठी त्यानं परिश्रम घेतलं. नजरबाज गुप्त पोलीस लोक ठेवून त्यानं फितुरांना आळा घातला. तसंच नवापुरा नावाची एक नवी पेठ वसविली, राज्याचा महसूल वाढवला; तथापि कर्तव्यदक्षता आणि क्रौर्य यातला फरक त्याला समजला नाही आणि हीच गोष्ट त्याच्या देहदंडाच्या शिक्षेला कारणीभूत ठरली...!' 
घाशीराम प्रकरणाचं खापर अनेक इतिहासकारांनी नाना फडणवीसांवरही फोडलंय. देशोदेशीच्या, प्रत्येक प्रांतातली खडानखडा माहिती बाळगणाऱ्या नानांना ही घटना कशी कळली नव्हती? नानांच्या संमतीशिवाय ही घटना पुण्यात झालीच कशी असे प्रश्न विचारले गेले. जर अशी घटना घडली तर त्यांचा कारभार सैल होता असं अनुमानही काढण्यात आलं. 'नानांना काही अतींद्रियदृष्टी नव्हती. त्यामुळे हाताखालच्या लोकांची दुष्कृत्ये त्यांना एखादे वेळी ओळखता आली नाहीत तर तो त्यांचा दोष मानता येत नाही. शिवाय अशा एक-दोन उदाहरणांवरुन त्यांचा सर्वच कारभार जुलमी होता असे अनुमान काढणं हा धडधडीत सत्यविपर्यास होय! हल्लीसुद्धा इतका कडेकोट बंदोबस्त असताना सरकारनं नेमलेल्या कारभाऱ्यानं संस्थानात मन मानेल तसा धुमाकूळ घालावा किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं शिस्तीच्या नावाखाली वाटेल तितके खून पाडावेत असेही प्रकार क्वचित होऊ शकतात!
थोडक्यात इतिहासात घडलेल्या घटनांना, इतिहासातल्या व्यक्तिमत्वांना आजच्या काळातल्या फुटपट्ट्या लावणं अन्यायकारक ठरू शकतं. आजही पुण्यातल्या लष्करभागात घाशीराम कोतवालांच्या घराचे काही भाग उभे आहेत. 'काही दशकांपर्यंत पुण्यात १८ व्या आणि १९ व्या शतकातले वाडे शाबूत होते. मात्र आता त्यातले फारच कमी वाडे शिल्लक राहिलेत. त्यांचं संवर्धन करावं अशी इच्छा रास्त वाटत असली तरी वाड्याच्या मालकांच्या दृष्टिनं ते एक आव्हान असतं. एकीकडे जमिनीचे भाव गगनाला भिडलेत आणि दुसरीकडे वाड्यांची देखरेख दुरुस्तीही आवाक्यापलीकडे गेलेलीय. त्यामुळे वाड्याच्या मालकांचा याबाबतीत फार कमी उत्साह असतो. अर्थात या परिस्थितीला एक रुपेरी कडा आहेच ती म्हणजे पुणे महानगरपालिकेनं विश्रामबागवाडा, नानावाडा सारख्या वास्तूंचं संवर्धन केलंय. त्याचप्रमाणे भाऊ रंगारींचा वाडाही ट्रस्टद्वारे संवर्धित केला गेलाय! कॅन्टोन्मेंट परिसरात असलेला घाशीराम याचा वाडा मात्र विपन्नावस्थेत उभा आहे. सध्या तो लष्कराच्या ताब्यात आहे.
हरीश केंची 
९४२२३१०६०९




राजं....आम्हाला माफ करा....!

"साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आरमार उभं केलं. जलदुर्ग बांधले. त्या शिवप्रभुंचा पुतळा महाराष्ट्राची अस्मिता मालवण राजकोटमध्ये कोसळल्यानंतर अवघा महाराष्ट्र पेटला. त्याची धग लागल्यानं प्रधानमंत्री मोदींनी माफी मागितली. पण महाराष्ट्रातले नेते गुर्मीतच वावरत मराठी माणसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताहेत. पुतळ्याची अवहेलना होत असताना ते सुरतची लूट झाली नाही यावर वितंडवाद घालताहेत. गुजराथी मालकांची तळी उचलण्यासाठी शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान करताहेत. मराठी मन, अस्मिता, स्वाभिमान दुखावतोय याचं भान त्यांना नाही. पण मराठी माणसं हे सारं ओळखतात. ते त्यांची जागा दाखवतील हे निश्चित!"
____________________________________
*को*कणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही. त्यांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला...!’ असं  तिरपागडी वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शिवाजी महाराज जणू काही सर्वसामान्य माणसांची लूट करायला सूरतला गेले होते, अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसनं आम्हाला इतके वर्षे शिकवलाय...!' असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू असून त्यामुळं शिवरायांच्या सुरत लुटीच्या इतिहासाची उजळणी होऊ लागलीय. महाराजांनी दोनदा गुजरातमधलं सुरत शहर लुटलं, असे दाखले इतिहासात मिळतात. इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या शिवचरित्रात, कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावानं १९०६ मध्ये लिहिलेल्या शिवचरित्रात, तसंच जदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या१९१८ ते १९५२ या काळात लिहिलेल्या शिवचरित्रांमध्ये सुरत लुटीविषयी सविस्तर माहिती आहे. त्यातला सारांश असा 'जानेवारी १६६४ मध्ये शिवरायांनी सुरत लुटली, त्याला पार्श्वभूमी शाहिस्तेखानानं पुण्यात केलेल्या लूट, अत्याचारांची होती. मोगल सरदार आणि औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्तेखान महाराष्ट्रात तीन वर्षे तळ ठोकून होता. त्याच्यामुळं मराठा साम्राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. शिवरायांनी स्वत: लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं छाटून त्याला पुण्यातून हुसकावून लावलं. त्यानंतर राज्याची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी शिवरायांनी तातडीनं पावलं उचलली. राजगडापासून सव्वातीनशे किलोमीटरवर दक्षिण गुजरातमधलं सुरत हे मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होतं. ते लुटण्याचं महाराजांनी ठरविलं'. जदुनाथ सरकार ‘छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व’ या शिवचरित्रात लिहितात, ‘सुरतेत पोहोचल्यावर महाराजांनी असं जाहीर केलं, की ते तिथं कोणत्याही इंग्रजाला किंवा इतर व्यापाऱ्यांना इजा करायला आले नव्हते. औरंगजेबानं त्यांचा देश लुटून त्यांच्या काही नातेवाईकांना ठार मारल्याबद्दल त्याच्यावर सूड उगविण्यासाठीच ते तिथं आले होते. परंतु पैसा मिळवणं हाही त्यांचा एक हेतू होता. त्यांना त्या चार दिवसांच्या कालावधीत शक्य तितकी लूट गोळा करायची होती. लूट घेऊन त्यांना शक्य तितक्या लवकर तिथून निघून जायचं होतं!' त्याकाळी सुरतेचा व्यापार केवळ भारताशीच नव्हे तर युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतल्या देशांशी होत असे. व्यापार करातून मुघलांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. सुरतेला तटबंदीसह पाच हजार सैनिकांचं संरक्षण होतं.
वीरजी व्होरा, शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचं सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातला सर्वात श्रीमंत माणूस होता तेंव्हाचा बिल गेट्स किंवा आत्ताचा गौतम आदाणी अथवा मुकेश अंबानी म्हणा हवं तर. डच रेकॉर्ड्स प्रमाणे वीरजी व्होरा तत्कालीन काळात जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता.याची तत्कालीन काळातली वैयक्तिक संपत्ती ८० लक्ष रुपये होती. तर तत्कालीन काळात वीरजी व्होराची एकुण व्यापारी उलाढाल कांही कोटींमध्ये होती. तेंव्हाचे एक कोटी म्हणजे आताचे सुमारे साडेसात हजार कोटी. मराठा साम्राज्याचं तत्कालीन उत्पन्न जेमतेम १५ - २० लाखांच्या आसपास होतं. यावरूनच वीरजी व्होराच्या प्रचंड संपत्तीचा अंदाज येतो. भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाण्यार्‍या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी व्होरा एकटा भरत असे. सुमारे ७ देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या. इस्ट इंडिया कंपनीला वीरजी व्होरा जवळपास १० लाख रुपये व्यापारासाठी कर्ज दिलं होतं. तसेच मोगल, पर्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापाऱ्यांना यानं सावकारी कर्ज दिलं होतं. संपूर्ण भारत ४ वर्ष वापरू शकेल इतकी अफाट चांदी वीरजी व्होराच्या गोदामात पडून होती असं वीरजी व्होरा बद्दल बोललं जाई. छत्रपती शिवरायांनी सुरतेतल्या वीरजी व्होरा आणि अन्य ४ व्यापाऱ्यांना खलिता पाठवून सुचित केलं की, तुम्हीं मुघल साम्राज्याला करत असलेला अर्थ पुरवठा बंद करा. मुघलांपासून तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची तसेच आम्ही देखील सुरतेवर हल्ला करणार नाही याची हमी दिली. परंतु वीरजी व्होरानं ही मागणी मग्रुरीनं धुडकावली वीरजी व्होराला वाटलं इतके बलाढ्य मुघल आणि इंग्रज असतेवेळी मराठ्यांच्या संरक्षणाची गरजच काय आणि हया गोड गैरसमजाचे परिणाम वीरजी व्होराला भोगावं लागलं. सुरत लुटीच्यावेळी मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्यादिवशी सोनं, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे तीनशे ते पाचशे हशम हातात प्रत्येकी दोन पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून हजारो किलो सोनं, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणकं, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज, ऐवज कसला साक्षात कुबेराचा खजिनाच जणू प्राप्त झाला होता. सुरतच्या लुटीमध्ये सर्वात मोठं नुकसान वीरजी व्होराचंच झालं यातून सावरायला काही वर्ष गेली तोच शिवरायांनी सुरतेवर दुसरयांदा हल्ला केला यातून मग वीरजी व्होरा सावरलाच नाही आणि अंथरुणाला खिळला. मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यात १६७५ साली मृत्यू पावला. 'छत्रपती शिवराय व सुरतेची लूट' संदर्भ - इस्ट इंडिया कंपनी आणि डच रेकॉर्ड्स.
शिवाजी महाराजांनी आपले हेरप्रमुख बहिर्जी नाईक यांच्यामार्फत पहिल्यांदा सुरतेवर नजर ठेवली. तीन महिने पाळत ठेवून बहिर्जीच्या राघोजी नावाच्या गुप्तहेरानं सुरतेची बित्तंबातमी काढली. सुरतेत मोगलांच्या पाच हजारांपैकी केवळ एकच हजार सैन्य लढाऊ आहे. त्यांना अधिक कुमक मिळण्यापूर्वी आपण मोहीम फत्ते करायला हवी, असं बहिर्जींनी सुचविलं. त्यानुसार अत्यंत वेगवान हालचाली करून मराठ्यांचे ८ हजारांचे घोडदळ २० दिवसांत ५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेजवळच्या गणदेवी गावात पोहोचलं. तिथून त्यांनी मोगलांच्या सुरतेतले सुभेदार इनायतखान याच्याकडे वकील पाठवला. त्याच्यामार्फत 'इनायतखान आणि सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतेची 'बदसुरत' झाल्यास आमची जबाबदारी नाही...!' असा संदेश पाठवला. इनायतखान घाबरून सुरतेच्या किल्ल्यात लपला. त्याच्या सैन्याचा प्रतिकार मराठ्यांनी सहज मो़डून काढला. शहरात घुसून त्यांनी जागोजागी चौक्या बसविल्या. मुघल आरमारानं समुद्रातून येऊन प्रतिकार करू नये म्हणून सुरतेच्या बंदरावर हल्ला चढवून तिथल्या मालधक्क्याला आग लावली. तिथल्या युरोपीय वकिलाती, किल्ले किंवा आरमारांना मात्र मराठ्यांनी धक्का लावला नाही. मुख्य हेतू सुरत लुटीचा असल्यानं अकारण त्यांच्याशी लढाई करण्याचं मराठ्यांना काही कारण नव्हतं. त्याही मंडळींनी मराठ्यांची कुरापत काढली नाही. कडेकोट बंदोबस्तात मराठ्यांनी शहरात वसुली सुरू केली. मोगल ठाणेदार आणि महसूल दप्तरांचे खजिने रिकामे केले. पोर्तुगीजांकडे बचावासाठी पुरेसं सैन्य नाही, हे पाहून त्यांच्याकडूनही खजिना मिळवला. सतत तीन दिवस मराठा सैनिकांनी सुरतेतले व्यापारी, सावकार यांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली. यात वीरजी वोरा, हाजी झहीद बेग, हाजी कासम यांसारख्या मातब्बर व्यापाऱ्यांचा समावेश होता. सुरतेत त्यावैळी मोहनदास पारेख हा इस्ट इंडिया कंपनीचा हस्तक राहात होता. तो दानधर्म करणारा आणि लोकांना मदत करणारा होता. त्यामुळं त्याच्या वाड्याला मराठ्यांनी धक्का लावला नाही. तसंच इतर धर्मीय मिशनऱ्यांच्या मालमत्तेलाही अपाय केला नाही.
'रेव्हरंड फादर अँब्रोझच्या ऑर्डर ऑफ फ्रायर्स मायनोर कॅपुचिनच्या इमारतींचा मराठ्यांनी आदर केला. फ्रँकिश पादरी चांगले लोक आहेत त्यांच्यावर हल्ला करू नये, असे आदेश शिवरायांनीच दिले होते', असं फ्रेंच प्रवासी फ्रांस्वा बर्निये यानं आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय. दरम्यान, इनायतखानानं मराठ्यांकडे वाटाघाटींसाठी वकील पाठवला. भेटीसाठी आलेल्या या वकिलानं थेट शिवाजी महाराजांवरच हल्ला केला. शिवरायांच्या अंगरक्षकांनी त्या वकिलाला ठार मारलं. मग संतप्त मराठ्यांनी चार कैदी मारले आणि २४ कैद्यांचे हात छाटून टाकलं. त्यानंतर सर्व खजिना घेऊन मोगलांची अधिक कुमक येण्यापूर्वी सुरतेतून निघून मराठे राजगडावर पोहोचले. सुरतेच्या या खजिन्याचा वापर महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी केला, असा उल्लेख वा. सी. बेंद्रे यांच्या पुस्तकात आहे. पहिल्या सुरत लुटीच्या सहाच वर्षांनी म्हणजे ३ ऑक्टोबर १६७० रोजी शिवरायांनी सुरतेची दुसरी लूट केली. स्वराज्याची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सुरतेतून मोठी संपत्ती आणली. यावेळची पार्श्वभूमी होती, शिवरायांची आग्र्याहून मुघलांच्या कैदेतून झालेली सुटका. पहिल्या लुटीनंतर औरंगजेब खवळला होता. त्यानं मिर्झाराजे जयसिंह यांना मराठ्यांच्या स्वराज्यावर आक्रमणासाठी पाठवलं. प्रचंड सेनेसह आलेल्या जयसिंहासोबत परिस्थितीनुरूप शिवाजी महाराजांना तह करावा लागला होता. त्या प्रसिद्ध पुरंदरच्या तहात महाराजांना आपले २३ किल्ले आणि खंडणी म्हणून चार लाख रुपये द्यावे लागले होते. तसंच त्यानंतर आग्रा इथं औरंगजेबाच्या भेटीला जावं लागलं होतं. दरबारात अपमान झाल्यावर नजरकैदेतही राहावं लागलं होतं. त्या कैदेतून महाराजांनी करून घेतलेली सुटका इतिहासात प्रसिद्ध आहे. दरम्यान, स्वराज्याचं मोठं नुकसान झालेलं होतं. ते भरून काढण्यासाठी त्यांनी पुन्हा सुरत लुटण्याचं ठरवलं. रयतेवर झालेल्या अन्यायाचा बदला  आणि राज्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी त्यांनी पुरेशी तयारी करून दुसऱ्यांदा सुरत शहरावर हल्ला चढविला. खरे तर या हल्ल्याची खबर आधीच सुरतच्या सुभेदाराला लागली होती. पण कमजोर झालेले मराठे दुसऱ्यांदा हल्ला करतील, असं त्याला वाटलं नाही.
तिथला इंग्रज प्रेसिडेंट जिरॉल्ड अँजियर यानं मात्र आपली वखार नदीपलीकडच्या स्वाली बंदरावर हलवली. मुघल सुभेदार मात्र तीनशे सैनिकांच्या बळावर निर्धास्त बसला होता. २ ऑक्टोबर १६७० रोजी मराठ्यांचे १५ हजार सैन्य सुरतेच्या सीमेवर येऊन धडकलं. महाराजांनी मोगल सुभेदाराला खलिता पाठविला. ‘तुमच्या राज्यकर्त्यांच्या वागण्यानंच मला मोठं सैन्य बाळगायला भाग पाडलंय. या सैन्याला पोसण्यासाठी पैसा लागतो. त्यामुळं मोगलांनी आपल्या साऱ्याचा चौथा हिस्सा मला द्यावा...!’ त्या काळात जो भूप्रदेश स्वराज्यात नाही पण त्या राजापासून आक्रमणाचं संरक्षण मिळावं म्हणून चौथा हिस्सा दिला जात असे. त्याला चौथाई म्हणत. शिवाजी महाराजांनी तीच मागणी केली होती. पण, खलित्याचं उत्तर मिळालं नाही आणि मराठे ३ ऑक्टोबरला सुरतमध्ये घुसले. तीन दिवस मराठा सैन्य सुरतेची लूट करत होते. सामान्य प्रजेला अजिबातही त्रास न देता, मोठे व्यापारी, धनिक, श्रीमंत यांच्याकडून पैसा, सोनं, हिरे, जड-जवाहीर लुटलं. धार्मिक, चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांनाही या लुटीतून वगळलं. पहिल्या लुटीत मराठ्यांना सुरतेतून ८० लाख तर दुसर्‍या लुटीत ६६ लाखाचा खजिना हाती लागला. या हेरगिरीवरच इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी ‘राघोजी आणि लूट सुरतेची’ ही साडेसहाशे पानांची कादंबरी लिहिलीय. त्यातही हा चित्तथरारक घटनाक्रम आलाय. ऐतिहासिक तथ्यांवरच आधारित कादंबरी असल्यानं इतिहासाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतल्याचं सोनवणी सांगतात. 'लूट हा शब्द काँग्रेसनं प्रचलित केला...!’ असं फडणवीस म्हणतात. पण 'लूट हाच शब्द सर्व तत्कालीन पत्रव्यवहारांमध्ये, शिवकालीन दरबारी कागदपत्रांमध्ये आहे. परदेशी इतिहासकारांनीही या घटनेला ‘लूट’च म्हटलंय. 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राच्या दोन्हीही खंडांत सुरतेच्या लुटीचं सविस्तर वर्णन आलंय. त्यात पहिल्या लुटीनंतर शिवाजी महाराज म्हणतात, ‘कोणाशीही आमचे व्यक्तिगत वैर नव्हते आणि नाही. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबानं आमच्या मुलुखाची सतत तीन वर्षे बर्बादी केली, कत्तली केल्या. त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बऱ्याच दिवसांची आमची मसलत आज पार पडली...!’ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यामते, ‘सुरतच्या लुटीनंतर तिथल्या इंग्रजांच्या वखारीतून इंग्लंडला पत्रव्यवहार झाला. त्यात स्पष्टपणे Plunder अर्थात ‘लूट’ हा शब्द वापरण्यात आलाय. एस्कलेट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याननं छत्रपती शिवरायांच्या तंबूत त्यांच्यासमोर लावलेल्या अगणित संपत्तीच्या ढिगाचं वर्णन केलंय. सभासद बखर, इतिहासकार जदुनाथ सरकार, गजानन मेहेंदळे, बाबासाहेब पुरंदरे आदि अभ्यासकांनी या घटनेबद्दल सविस्तर लिहिलंय. अर्थात त्या काळात शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण करून लुटालूट करणं, खंडण्या गोळा करणं ही सर्वसामान्य बाब होती. सर्वच राजे एकमेकांच्या प्रदेशात तसं करत असत. अर्थात शिवाजी महाराजांनी याबाबतही काही नैतिक पथ्ये पाळली होती. उदाहरणार्थ सुरतेच्या लुटीत महिलांना धक्का लागू द्यायचा नाही, गरिबांना लुटायचं नाही, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैन्याला दिल्या होत्या. विशेष म्हणजे या लुटीच्या धामधुमीत त्यांनी एका ब्रिटीश महिलेच्या घराला संरक्षण दिलं होतं. शिवाय लुटीनंतर बरीच संपत्ती त्यांनी तिथल्या गोरगरिबांमध्ये वाटली. स्वराज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच मोगलांचं बलस्थान बनलेल्या सुरत बंदराला धक्का देणं ही शिवरायांची धोरणात्मक चाल होती. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरच्या व्यापाऱ्यांना त्यांनी संरक्षण दिलं. सुरतमध्ये शिवरायांचा जो पुतळा उभारला गेलाय, तो अलिकडच्या काळातला आहे. मधल्या काळात मराठ्यांची सत्ता गुजरातवर होती. सरदार दमाजी गायकवाड, दमाजी थोरात आदींनी गुजरातवर वर्चस्व ठेवलं होतं. त्यांच्या माध्यमातून शिवरायांचा दरारा गुजरातमध्ये कायम राहिला. शिवरायांच्या हालचालींवर ब्रिटीश बारकाईनं लक्ष ठेवून होते. म्हणूनच तर सुरतेच्या दुसऱ्या लुटीची बातमी ‘लंडन गॅझेट’ या ब्रिटिशांच्या सरकारी वृत्तपत्रात छापून आली होती. त्यामध्ये या घटनेनंतर मुघलांसह इंग्रजही घाबरले असल्याचा उल्लेख आहे. ‘क्रांतिकारी छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ देशाचे स्वामी झाले आहेत’, असा ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या पत्रांमधला उल्लेख या बातमीत केलाय. 'सुरतेच्या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिसामर्थ्याचा लौकिक दूरवर पसरला आणि त्यांना दोन मोठ्या शाह्यांस सतत तीन-चार वर्षे तोंड देण्यात जी द्रव्यहानी सोसावी लागली होती, ती भरून निघाली. हिंदवी स्वराज्या'च्या प्रयत्नात नंतर ढिलाई करण्याचं कारण पडलं नाही. उलट, ही घटना स्वराज्याच्या विस्ताराला पोषक अशीच झाली. शिवाय, मोगली लष्कराला दूरवर स्वारीला जाण्यापूर्वी स्वदेश संरक्षणार्थ ठिकठिकाणी बरंच लष्कर राखून ठेवावं लागल्यानं या स्वाऱ्यांचं शक्तिसामर्थ्य बरंच घटलं.' सुरत लुटीचा मोठा फायदा शिवरायांना स्वराज्य उभारणीसाठी आणि मराठ्यांचा दरारा देशभरात निर्माण होण्यासाठी झाला, असं मत बहुतेक इतिहासकारांनी नोंदवलेलंय.
हरीश केंची
९४२२३१०६०९


Sunday 1 September 2024

सत्तेसाठी प्रायश्चित....!

"मराठी माणसांची अस्मिता, उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्रधर्म संप्रेरक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण पेटून उठलंय. शिवप्रेमीच नाही तर उभा महाराष्ट्र पेटून उठलाय त्याची धग थेट प्रधानमंत्री मोदींपर्यंत पोहोचलीय. मग त्यांनी नतमस्तक होत माफी मागितलीय. मात्र राज्यातले त्यांचे भक्त अद्यापि आपल्याच गुर्मीत आहेत. दहा वर्षापूर्वी अरबी समुद्रात जलपूजन केलेल्या शिवस्मारकाचं काम अद्याप सुरूच झालेलं नाही. मात्र पुन्हा मालवणात शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा जीआर काढलाय. राजकारणासाठी, मतांसाठी हे सारं होतंय. शिवरायांच्या अवमानेनं शिवप्रेमींमध्ये संताप आहे, तीव्र वेदना आहेत! पुतळे नकोत तर महाराजांचे गडकोट किल्ले यांचं संवर्धन करा तेच त्याचं स्मारक आहे. पण दिखाव्यासाठी, सत्तेच्या हव्यासापोटी महापुरुषांचा वापर केला जातोय!"

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट इथं ४ डिसेंबर २०२३ ला 'नौदल दिनी' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३५ फूट उंचीच्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईनं केलं. पण अचानक हा पुतळा कोसळला. आता पुन्हा निवडणुका आहेत, तेव्हा आजवर कधीच कोणत्याच प्रकरणात माफी न मागणाऱ्या प्रधानमंत्री मोदींनी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत जाहीर माफी मागून प्रायश्चित घेतलंय. पुतळा बनवणारा जयदीप आपटे, स्ट्रक्चरल सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवलाय. पण त्या कामाला संमती देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कामात हलगर्जी केल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. कारण यात सरकारचे प्यादेच अडकलेलेत. सरकार म्हणतंय समुद्रावर जोरात वारा होता. किल्ल्यावर वारा असणारच हे आधी माहीत नव्हतं का? मुख्यमंत्र्यांनी त्याचा वेग ताशी ४५ किलोमिटर असल्याचं म्हटलं पण हवामान खात्याच्या वेबसाईटवर २४ ते ३० किलोमिटर असल्याचं दिसतंय. या वायुवेगात इथं फक्त पुतळाच उन्मळून पडला. बाकी एक नारळही झाडावरून खाली पडलेला नाही. घरावरची कौलं देखील हललेली नाहीत. इथं महत्वाचं म्हणजे १९३३ मध्ये गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा समुद्र किनाऱ्यावर बसवण्यात आलाय. तिथंही वारा त्याच वेगानं वाहतो. आजवर तो पुतळा भक्कमपणे उभा आहे. १९५७ मध्ये नेहरुंच्या हस्ते प्रतापगडावर शिवरायाचा पुतळा बसवला. तिथंही हवा आहे. तोही आज सुस्थितीत आहे. पण फक्त ८ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा महाराजांचा पुतळा उन्मळून पडलाय. सिंधुदुर्ग हे नाव ज्यांच्या सामर्थ्यानं छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या किल्ल्यावरून जिल्ह्याला पडलंय, त्याच शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या परशुरामाच्या भूमीत आज शिवरायांच्या नावानं केवळ राजकारण सुरू आहे, त्यामुळं जे छत्रपतींना आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करून केवळ त्यांच्या स्मरणानं नतमस्तक होतात त्या शिवप्रेमींना मिळताहेत केवळ वेदना...!
होय, वेदनाच! कारण, जिथं शिवछत्रपतींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ला बांधला तो सिंधुदुर्ग आजही अजस्त्र लाटांचा मारा झेलत, छत्रपती कसे होते हे सांगत ताठ मानेनं समुद्रात उभा आहे. तिथंच समुद्राच्या काठावरच्या राजकोट किल्ल्यावर राजकीय अभिलाषेपोटी म्हणा किंवा राजकीय हेतूनं प्रेरित होऊन, आपण काहीतरी आगळं वेगळं करतोय असं दाखविण्यासाठी किंवा कुणाला तरी खुश करून आपली पाठ थोपटून घेण्यासाठी म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात कुठेही नाही असा वेगळ्याच ढंगातला पुतळा उभारला. त्याला शिवप्रेमी जनतेनं, छत्रपतींच्या कोल्हापूर गादीचे वारसदार संभाजीराजे यांनीही त्याच्या त्या स्वरूपाला आक्षेप नोंदवला होता. तो शिवरायांचा पुतळा वाटतच नाही. त्यात शिवप्रेमींना महाराज शोधावं लागतात. रयतेला ज्या शिवरायांनी ताठ मानेनं जगायला, लढायला, समाजात उभं राहायला शिकविलं तिथं आज भ्रष्टाचारानं पोखरलेल्या व्यवस्थेनं कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून उभा केलेला महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात पडतो हे केवळ दुर्दैवच नव्हे तर छत्रपतींच्या नावावर राजकारण करणाऱ्या राजकीय धुरंधरांसाठी शरमेची, लांच्छनास्पद बाब आहे. कदाचित 'शरमेची' हा शब्द देखील इथं त्यांच्यासाठी तोकडा पडेल, कारण त्यावर सरकार मधल्या धुरांधरांनी दिलेली स्पष्टीकरणं चीड आणणारी आहेत. अश्लाघ्य अगदी 'चोरावर मोर' अशाच प्रकारातली आहेत. 
राजकारणानं किती खालची पातळी गाठावी यालाही मर्यादा असतील ना? परंतु सर्व मर्यादांचं उल्लंघन करून देश रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या नौसेनेवर सर्व जबाबदारी ढकलून आज सरकार मोकळे झालेय. परंतु ज्या अजस्त्र लाटांचा मारा झेलत असणाऱ्या जहाजांवर नौसेनेचे जवान देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावतात त्याच नौसेनेवर घडलेली घटना शेकून राजकारणी कसे काय मोकळे झाले? पुतळ्यासाठी खर्ची घातलेला निधी नौसेनेला कोणी दिला? राज्य शासनानं की केंद्र सरकारनं? जिल्हा नियोजन मंडळ मधून पुतळ्यासाठी निधीची तजवीज करण्यात आली होती का? तशी ती केली असेल तर ती कोणी केली? तसा निर्णय कोणी घेतला? जर जिल्हा नियोजन मंडळ मधून निधी खर्ची घातला असेल तर मग जबाबदारी पूर्णतः नौसेनेची कशी? असे अनेक प्रश्न आज आ वासून उभे आहेत. ज्यांनी पुतळा उभारणीचं काम पाहिलं ते सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन या दुर्घटनेवर काहीच का बोलत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्रीही गप्प आहेत, असं का? शिवप्रेमींची मागणी छत्रपतींचे पुतळे उभारण्याची नाही आहे तर छत्रपतींचे गडकोट किल्ले जोपासण्याची, डागडुजी, संवर्धन करून कायम ठेवण्याची आहे. परंतु केवळ राजकीय लालसेपोटी आम्हीच छत्रपतींचे कैवारी, आम्हीच शिवप्रेमी असं दाखविण्याच्या फंदात गडकोट किल्ले दुर्लक्षिले जाताहेत अन् पुतळे उभारून 'शायनिंग इंडिया'सारखं केवळ दिखाऊ शिवभक्ती दाखवली जातेय. सतत महाराजांचं नावं घेत राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद!' म्हणत मतं मागितली. मग त्यांची विटंबना ते का करताहात? अरबी समुद्रात जगातलं सर्वात उंच शिवरायांचं स्मारक उभं करण्याची घोषणा केली. कोट्यवधींचा खर्च करत दशकापूर्वी भूमिपूजन की जलपूजन केलं. त्याचं काय झालं? सिंधुदुर्गातला पुतळा उभारताना आणि नंतर जे काही घडलं याबाबत मराठी माणसांची माफी, दिलगिरी मागण्याऐवजी पुन्हा निलाजारेपणानं आणखी मोठा पुतळा उभारू अशी वल्गना करताहेत. बस्स झालं...! शिवप्रभुंचं नावं घेण्याची लायकी नसलेल्यांकडून त्यांची अवहेलना, अपमान, हेळसांड, करण्याची काही गरज नाही. मराठी माणसाच्या हृदयातल्या दैवताला धक्का लावून आणखी अवमान करू नका. तुम्ही नव्यानं मो ss ठ्ठा पुतळा उभारून तुम्ही केलेल्या त्या पापाचं परिमार्जन होणार नाही.
भारतात राम सुतार यांच्यासारखे अनेक नावाजलेले ज्येष्ठ शिल्पकार आहेत मग कल्याणचा हा नवखा शिल्पकार जयदीप आपटे शोधला कोणी? त्याला छत्रपतींचा पुतळा बनविण्याची जबाबदारी नक्की कोणी दिली? नौसेनेकडे तो कसा पोचला? की नौसेना केवळ पुतळा उभारणी एवढीच जबाबदारी पेलत होती आणि पुतळा बनविणारं कोणी दुसरंच होतं? या प्रश्नांकडे खोलात जाऊन गंभीरपणे पाहणं गरजेचं आहे. त्या पुतळ्याच्या उभारणीची जबाबदारी असणारे आर्किटेक्ट समुद्राच्या पाण्याचा, खाऱ्या हवेचा पुतळ्याच्या आतल्या लोखंडावर, पुतळा जोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या नट बोल्टवर काही परिणाम होतो याची त्यांना काहीच ज्ञान अवगतच नव्हतं का? बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांनाही पुतळ्याच्या आतल्या बाजूला वापरण्यात येणारे लोखंड, नट बोल्ट आदी खाऱ्या हवेत टिकतील की नाही, याची माहिती नव्हती? बरं, पुतळ्याच्या आतून लोखंड गंजून लाल गंजीचा रंग बाहेर येतोय असं समजल्यावरही पुतळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष का झालं? २३ ऑगस्टला बांधकाम विभाग नौसेनेला पत्र देतो आणि २६ ऑगस्टला पुतळा कोसळतो, मग एवढे दिवस बांधकाम विभाग झोपला होता का? या घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर अनेक प्रश्न उभे राहताहेत कारण यात अक्षम्य चूक झाली असून केवळ चूकच नव्हे तर उभारणीत काहीतरी गौडबंगाल अन् भ्रष्टाचार झाल्याचा वास येतोय.
जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी नसून नौसेनेची आहे आणि घडलेल्या प्रकाराला जबाबदार शिल्पकार, अभियंता, कंत्राटदार आदींवर गुन्हे दाखल केल्याचं सांगितलं. म्हणजे सरकार या प्रकरणातून नामानिराळे असल्याचाच निर्वाळा देते. केवढा हा कोडगेपणा? जिल्ह्यातले दुसरे मंत्री दीपक केसरकर यांनी 'वाईटातून काहीतरी चांगले घडायचं असेल..!' अशी प्रतिक्रिया नोंदवून घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. म्हणजे जे पूर्वी घडविलं होतं ते वाईट होतं का? असाही प्रश्न उभा राहतो. केसरकर यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभर फुटी भव्यदिव्य असा पुतळा सरकारच्या माध्यमातून उभा केला जाईल असं म्हटलंय. म्हणजे संवेदनशील मराठी मनाला साद घालत आणखी मोठा भ्रष्टाचार करायला ही मंडळी मोकळी! 
घडलेली दुर्दैवी घटना पाहण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं राजकोट किल्ला गाठला. आपणच शिवप्रेमी, स्वराज्याचे खरे शिलेदार अशा अविर्भावात घोषणाबाजी करत आंदोलन केलं, सरकारचा निषेध व्यक्त केला. तर दुसरीकडे विरोधकांच्या आंदोलनाला प्रतिकार करणार नाहीत, ते नवे भाजपेयी कसले? जुनी भाजप यात कुठेही दिसली नाही. आपण कोण आहोत, कुठल्या घटनेसाठी एकत्र आलो आहोत. ते स्थळ कुठलं आहे? घडलेली घटना राजकीय आहे की महाराजांच्या अस्मितेचा आहे? या सर्व गोष्टी विसरून विरोधी शिवसेना आणि सत्ताधारी भाजप दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, हुल्लडबाजी, दगडफेक, मारामारी, शिवीगाळही केली. इतकं कमी होतं म्हणून की काय ऐतिहासिक राजकोट किल्ल्याचे अवशेष देखील पाडले. सत्ताधारी आणि विरोधक यांची झालेली धुमश्चक्री साऱ्या देशानं पाहिली. पंतप्रधानांनीही आपण अनावरण केलेल्या पुतळ्याची अवस्था आणि आपलेच वारसदार त्यावर सामोपचारानं तोडगा न काढता करत असलेली दादागिरी, मारामारी, शिवीगाळ, घोषणाबाजी पाहिली, ऐकली असेल. कदाचित त्यांचीही मान शरमेनं झुकली असेल. म्हणूनच मोदींनी प्रायश्चित्त घेण्यासाठी माफी मागितलीय! ज्या छत्रपतींचं शौर्य आपल्या भाषणातून सांगत त्यांच्या नावावर राजकारण करतात त्याच छत्रपतींच्या किल्ल्यावर मारामारी करतात, किल्ल्याचं अवशेष तोडून टाकतात अशा राजकारण्यांना खरोखर छत्रपतींबद्दल प्रेम, आदर, मानसन्मान, अस्मिता आहे का? तो असता तर त्या पवित्र स्थळी छत्रपतींना दुःख होईल, त्यांचा अनादर होईल असं हे राजकारणी वागलेच नसते. एकमेकांवर कुरघोडी न करता परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ते शहाणे झाले असते. विरोधक इथं आलेच कसे? असं विचारत पोलिसांशी हुज्जत घातली. मालवण काय यांच्या मालकीची आहे का? तिथं विरोधकांनी येऊ नये हा काय प्रकार आहे? 'विरोधकांना घरात घुसून मारून टाकेन...!' अशी धमकी माजी मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री राहिलेल्या नारायण राणेसारख्या ज्येष्ठ नेत्यानं द्यावी हे घसरलेल्या राजकीय नैतिकतेचं लक्षण आहे. गृहमंत्रीच म्हणतात, 'विरोधकांना ठोकून काढा...!' मग त्यांच्या चमच्यांना आणखी काय हवंय? राणेंच्या मारून टाकीन या वक्तव्यावर गृहमंत्री म्हणतात ती राणेंची स्टाईल आहे. त्यांनी धमकी दिली नाही. हे गृहमंत्र्यांचे म्हणणं तर अधिकच भयानक आहे. चीड आणणारं आहे. राज्यातलं वातावरण बिघडण्याच्या कृतीला गृहमंत्र्यांनीच प्रोत्साहन दिल्यासारखं आहे.
'आमचा कार्यक्रम अमुक तारखेला आहे, प्रधानमंत्री येणार आहेत. त्याआधी पुतळा करा...!' अशी ऑर्डर सोडणे हाच मुळात सत्ताधाऱ्यांनी केलेला कलावंताचा अवमान आहे. पुतळे भक्कम, मनासारखे घडवायचे असतील तर शिल्पकाराला वेळ द्यायलाच हवा. अशा प्रतिक्रिया पुतळा पडून उध्वस्त झाल्यानंतर अनेक शिल्पकारांकडून उमटल्यात. ‘पुतळा थ्रीडी प्रिंटिंग तंत्रानं केलाय...!’ असं शिल्पकार आपटे यानं सांगितल्याचं बातम्यातून स्पष्ट होतं, परंतु वस्तुस्थिती तशी असू शकत नाही. जयदीप यानं ज्या ‘सीएनसी’ तंत्राचा उल्लेख केलाय, त्यानं मूळच्या लहान आकाराच्या पुतळ्यावरून कितीही मोठ्या आकाराचं मॉडेल म्हणजे प्रतिरूप पुतळ्यासारखंच प्रतिरूप तयार होऊ शकतं, पण खुद्द पुतळा नाही बनवता येतं. हे प्रतिरूप थर्मोकोलचंही असू शकतं. त्यावर फायबरचा साचा घालून, त्या साच्यात धातूचं ओतकाम करून मग पुतळ्याचं अंतिम रूप तयार होत असतं. पुतळा मिश्रधातूचा आणि पाच टन वजनाचा होता. इतका वजनी पुतळा तोलून धरण्यासाठी आधार म्हणून पुतळ्याच्या आत आणि त्याखाली असे एकंदर १० ते १२ टन पेलणाऱ्या धातूचा वापर होणं आवश्यक असतं, तसा इथं झाला होता का? पुतळ्याला आधार म्हणून साधं माइल्ड स्टील वापरलं तर ते गंजण्याचा संभव अधिक असतो, तोही खाऱ्या वाऱ्यांच्या परिसरात अधिकच; म्हणून सहसा ३१६ ग्रेडचं स्टेनलेस स्टील वापरलं जातं. पण या पुतळ्यासाठी काय वापरलं गेलं? ३५ फुटी पुतळा आतून पोकळ होता आणि त्याच्या धातूची जाडी सुमारे दीड इंच होती. त्याला त्यामुळेच आतला आधार अधिक भक्कम हवा, तो तसा होता का? १५ दिवसांत पुतळ्याचं धातूकाम पूर्ण होऊन उभारणीही झाली. इतका कमी वेळ मिळणं तांत्रिकदृष्ट्या उचित मानलं जात नाही, याची कल्पना आयोजकांना होती का? पुतळ्याची प्रतिकृती कला संचालनालयाकडून संमत करून घेण्याचा नियम आहे. पण त्यांच्याकडे जी प्रतिकृती सादर केली तेव्हा तो पुतळा ६ फुटाचा असेल असं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात मात्र ३५ फुटी पुतळा केला. याबाबत कला संचालनालयाला अजिबात काही माहिती दिली नाही. असं संचालक मिश्रा यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं कोणताही निकष न पाळता पुतळा केल्याचा आणि तो उभारल्याचं दिसतंय. पुतळ्याच्या आणि तो उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञांकडून जी तपासणी व्हायला हवी तशी ती झालीय का? ती पाहणी करणाऱ्या संबंधितांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असं नाही का? मग मराठी माणसांच्या दैवताची भावना दुखावल्याप्रकरणी संबंधितांना जबाबदार का धरू नये?
चौकट
शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी कोणतीही सरकारी निविदा पद्धत वापरली गेली नाही. छत्रपतींचा  पुतळा तयार करण्यासाठी २.४० कोटींचा निधी वापरला गेला. तर पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च झालाय २.०२ कोटी एवढा झालाय! पहिल्या हेलिपॅडला ७८ लाख, दुसऱ्याला ४४ लाख अणि तिसऱ्याला ७९ लाख असा तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारनं खर्च केलाय. यासाठीचं टेंडर डिसेंबर २०२३ मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेंबर २०२३ मध्ये देण्यात आल्या. अशाप्रकारचे तात्पुरतं हेलिपॅडसाठी सर्वसाधारणपणे १२ लाखाचा खर्च येतो अशी माहिती आहे. पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी तब्बल २ कोटींचा खर्च झालाय. अशा आशयाची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालीय. आणखी एक गंभीर बाब म्हणजे ज्या दिवशी अनावरण झालं त्यानंतरच्या पाचव्यादिवशी पुतळ्याच्या एक हात निखळला होता. इतकी बेफिकिरी यात पुतळा निर्मितीत झालीय. याचा संताप येतोय!
हरीश केंची
९४२२३१०६०९

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...