Saturday 24 August 2024

वाटेवरती काचा गं.....!

चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी आणि शुष्क भावनांनी पाहणारा, संवेदना संपलेला समाज पहिल्यांदाच जागा झाला. त्या बिचाऱ्या अजाण मुलींना त्यांचा देह ही भोगाची खाण आहे ह्याचीच काय, पण आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणजे काय आहोत, याचीही कल्पनाही नसते, एवढ्या छोट्या वयात अत्याचार होतो. दुसऱ्याच्या विकृत वासनेपायी आपलं सारं बालपण-जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट नाही. पण दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा मोहोर फुटलाय, बदलापूरसारख्या पाशवी घटना जागोजागी घडताहेत. मुलीबाळींना नासवणारे हे साप ठेचून काढण्यासाठी जागरूकता, ऐक्य दाखवू शकलो तरच सत्ता आणि मत्ता यांचा कैफ चढलेली बेधुंद बेफाम झालेली कारटी ताळ्यावर येतील!"
---------------------------------------------
*ब*लात्काराच्या घटनांनी सारा महाराष्ट्र हादरून गेलाय. जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या कळ्यांना कुस्करून टाकलं जातंय. या कळ्यांचं विकृत वासनेला क्रूरपणे बळी पाडले जाताहेत. या कुकर्माचं धिक्कार करायचं सोडून मुख्यमंत्री आणि भाजपच्या मंत्र्यांसह अनेक नेते त्यांचं राजकारण होतंय असं रडगाणं गाताहेत. पण १३ ऑगस्टला घटना घडलेलीय. पीडित मुलगी साडे तीन वर्षांची असून ती आपल्या आजी-आजोबांच्या घरी बदलापूरला राहते. आजी-आजोबांना संशय आल्यानं त्यांनी आईला अचानक फोन करून कामाच्या ठिकाणाहून घरी बोलावून घेतलं! आईनं मुलीला विचारलं असता तिनं आपल्या प्रायव्हेट पार्टला वेदना होत असल्याचं सांगितलं, तसंच शाळेतला ‘दादा’ नावाचा इसम कसं वर्तन करतो याची माहिती दिली. मग आईनं दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादानं चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं होतं. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झालीय. अशा या घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. या मुलीसोबत जे काही घडलंय ते अंगावर काटा आणणारं आहे. ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरलाय. इथल्या आदर्श शाळेत शिकणारी ही ३-४ वर्षांची मुलगी. तिच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे तिच्या शाळेबाहेर आंदोलन झालं. पुण्यात, अकोल्यात एकापाठोपाठ एक अशा घटना घडल्यात. मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांच्या बातम्या आल्यात. फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावरही आक्रोश उमटतोय. असं पहिल्यांदाच घडतंय. 
डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज घडताहेत. बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशाप्रकारे जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बिळात दडलेल्या बलात्काऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींना बरबाद करणाऱ्यांविरुद्ध संतापानं खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर येऊन त्यांना हुडकून काढून चेचून सरळ करायला हवंय. खरं तर कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय! बदलापुरात असंच घडलं. लोक रस्त्यावर आले. लोकल बंद पाडली. मग पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीमार केला. ४० आंदोलकांना अटक केली ३०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केलेत. जणू अशा घाणेरड्या प्रकारच्या विरोधात प्रक्षोभ कुणी व्यक्त करूच नये. आठ दिवस हे नीच प्रकरण दाबण्याचा प्रकार शाळेचे पदाधिकारी असलेल्या भाजपच्या नेत्यांनी, शाळेनं, मुख्याध्यापक, शिक्षकच नव्हे तर पोलीसांनीही प्रयत्न केला. पोलिस अधिकारी महिला असतानाही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. हे अधिक संतापजनक आहे. त्या साऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालीय. खरंतर त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केली म्हणून गुन्हाच दाखल करायला हवाय. जरब बसेल अशीच कारवाई व्हायला हवीय. ही घटना एवढी भयानक होती की, त्याचे मानसिक परिणाम इतर पालकांवरही झालाय. अनेक आई बापांनी त्यानंतरच्या ३-४ दिवसात आपल्या लहान ४- ५ वर्षांच्या पोरींचे कौमार्य तपासलंय. असं अनेकांनी स्वतः ऑन कॅमेरा सांगितलं. हे ऐकून रडू आलं, संतापून अंग थरथर कापू लागलं. कुठल्या जगात जगतो आहोत आपण? ती प्रक्रिया पार पडताना. आई बाबांचं काळीज पिळवटून निघालं असणार. आपल्या लेकराला या करता तपासावं लागतंय, काय वाटलं असंल त्या बिचाऱ्यांना! त्या मुलींचे पालक म्हणत असतील की, आम्हाला हे असलं रामराज्य नकोय, कारण इथं कायदा आहे तो अशा असुरांना पाठीशी घालण्यासाठीचा! मग रावण राज्य आलं तरी चालेल, कारण रावण लाख वाईट होता पण तिथं सीता सुरक्षित तरी होती!
बदलापूरात आंदोलनकर्ते ही स्थानिक माणसंच होती, तो जनतेचा स्वयंस्फुर्तीने व्यक्त झालेला संताप होता, प्रक्षोभ होता, आक्रोश होता. सत्ताधाऱ्यांना असं वाटत होतं की, मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात ही निंदनीय घटना घडली अन् ती बाहेर समजली तर मुख्यमंत्र्यांची सर्वत्र 'छी थू' होईल! त्यांची प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न इथल्या त्यांच्या पंटरांनी चालवला. त्यांना त्या अजाण, असहाय 'चिमुकल्यांच्या' प्रचंड यातनांपेक्षा मुख्यमंत्र्यांची प्रतिमा महत्वाची वाटली! मग त्यांनी 'इथं असं गलिच्छ वर्तन झालेलंच नाही, दोन चिमुकल्यांबरोबरच कुणी काही केलेलंच नाही...!' अशी चर्चा सुरू केली. पण या निष्पाप दोन चिमुकल्यांबरोबर होत्या दोन लढाऊ रणरागिण्या! एक होती मनसेची महिला कार्यकर्ती संगीता चेंदवणकर जिनं २०१९ मध्ये असाच प्रकार उघडकीला आणला होता. आणि दुसरी होती महिला पत्रकार मोहिनी जाधव! या दोन्ही रणरागिण्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेला तसाच पोलिसांना जाब विचारला, नेते उद्धटपणे बोलत होते. एकीनं चपळाईनं एका डॉक्टराकडून चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करवून घेतली, त्यातून हे घाणेरडे, किळसवाणे, गलिच्छ कृत्य समोर आलं. त्या दुर्दैवी चिमुकलीवर घृणास्पदरित्या अत्याचार झाला होता. या आधीही आठ दहा दिवसांपूर्वी या नराधमानं एका चिमुकलीला बराच त्रास दिला होता. या त्रासानं घाबरून ती चिमुकली शाळेतच गेली नव्हती. 
आरोपी हा हिस्ट्री शिटर आहे, तरीही त्याला संस्थेत कामावर का ठेवलं? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्यानं अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेतले साधे सीसी टिव्ही काम करत नाहीत? शाळेनं तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी घटनेबाबत पोलिसांनीही लपवाछपवी करायला नको होती. नर्सरीमधल्या मुलींना प्रसाधनगृहात नेताना सोबत महिला असावी असा नियम आहे. मग तशी महिला त्या दिवशी नव्हती की अशा महिलेची नेमणूकच केलेली नाहीये? महिला नसताना हाच नराधम मुलींना प्रसाधनगृहात नेत होता का? अशी परवानगी त्याला दिली कशी? याचीही चौकशी व्हायला हवी. या प्रकारानंतर संतप्त झालेल्यांनी जो उस्फुर्त रेल रोको केला त्याबाबत शंका कुशंका उपस्थित केल्या गेल्या. याच दळभद्री विचारातून 'आंदोलन करणारे बाहेरचे होते...!' असं मुख्यमंत्र्यांनी आणि इतर नेत्यांनी म्हटलयं. पण जे आंदोलक पोलिसांनी दोरखंडाने बांधून जेरबंद केलेत ते तर सारे स्थानिकच आहेत. त्यांच्या आरोपपत्रात त्यांचे पत्ते बघितले तर लक्षांत येईल. स्वातंत्र्यदिनापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून शिंदे सेनेचे वामन म्हात्रे यांनी 'तू जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय अशा बातम्या देत आहेस...!' अशी अभद्र टिपणी केल्यानंतर मूळ प्रकरण अधिकच गंभीर झालं. तिची समजूत काढून प्रकरण वाढवू नये यासाठी अनेकांनी तिच्यावर दबाव आणला. सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं त्यानंतर मोहिनी जाधव यांची तक्रार दाखल करून घेतली. आता जाधव विरोधातही वामनरावांच्या पंटरनं तक्रार केलीय. पीडित मुलीच्या गरोदर आईला, पालकांना पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी बारा तासाहून अधिक काळ पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवलं होतं. जेव्हा लोक रस्त्यावर आले, आंदोलन उभारले, लोकल रोखून ठेवली त्यानंतर मग पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. ही पोलिसांची भूमिकाही देखील संतापजनक आहे. त्यानंतरही त्या मुलींच्या पालकांचा छळवाद पोलिसांनी आरंभलाय. चौकशीसाठी त्यांनाच वेठीला धरलं जातंय. याची चीड जनतेत आहे.
रेल रोको आंदोलन ही काही केवळ त्या एका घटनेची प्रतिक्रिया होती असं नाही. तर अलीकडच्या अनेक घटनांबद्दलची जनतेच्या मनातल्या संतापाची एकत्रित आणि प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती आणि सामूहिकपणे दिलेला तो इशारा होता. राज्यातल्या कोणत्याही शहरात जा, कायद्याचा आणि खाकी वर्दीचा मुळीच धाक उरलेला नाही हे सर्वसामान्यांचे मत बनलंय. शिवाय काल हा जमाव असा मनातून पेटला नसता तर सरकार तरी निलंबन, फास्ट ट्रॅक... एवढं वेगानं हललं असतं का? पण म्हणून कोणत्याही हिंसाचाराच समर्थन मुळीच करता येणार नाही. ज्या दिवशी आंदोलन झालं, त्याचं दिवशी एका बलात्कार प्रकरणाचा निकाल ३२ वर्षांनंतर लागल्याची बातमी होती. म्हणजे न्यायालय, कायदे यावरचा विश्वास कमी होत चाललाय. न्यायालयात होणारा विलंब म्हणजे न्याय न मिळण्यासारखंच आहे. याचा अनुभव लोकांना येतोय, म्हणून आंदोलनकर्त्यांनी आरोपीला आमच्या हाती द्या अशी मागणी केली होती. ती गैर असली तरी ती त्यांना करावीशी वाटणं हे गंभीर आहे. याचाही विचार व्हायला हवाय! असंच होत राहिलं आणि सहनशक्तीचा अंत झाला, तर लोक कायदा हाती घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. अशा नराधमांना कायद्याचा धाक बसावा यासाठी राज्य सरकारनं २०२२ मध्ये निर्माण केलेला 'शक्ती कायदा' केंद्रात पडून आहे. तो अंमलात आणायला हवा. राज्यात एक ना दोन अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यांचा निकाल प्रलंबित आहे.
हे सगळं नक्की कशामुळे घडलं याचा खोल अभ्यास करून मगच निष्कर्ष काढायला हवेत. जेव्हा समाजाचेच नैतिक अधःपतन होतं तेव्हा असं घडणारच! याबाबत समाजानंच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. नट्याचं अंग हलवणं, असासे, उसासे टाकणं हे केवळ तरुणांचीच नव्हे, तर म्हाताऱ्यांचीही विकृत वासना चाळवण्यासाठीच असते. कायद्याचे रक्षक पोलीस, वकील, न्यायाधीश आणि ज्यांच्याबद्धल परंपरेनं आदरभाव जोपासला जातो, अशा शिक्षक, प्राध्यापक, मार्गदर्शक व्यक्ती यांचं अत्यंत गैरचित्रण पद्धतशीरपणे हिंदी चित्रपटातून, साहित्यातून होत असतं आणि त्याबद्धल कुणीही, कधीही संताप व्यक्त केलेला नाही. जी वासनाकांडे धगधगली वा धगधगताहेत ती बघितल्यावर चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. घरातल्या दुरदर्शनपुढे आई-बाप-मुलं या सगळ्यांत रंगू लागली, तर आपल्या घराच्या सिनेमा का होणार नाही? जे हरामखोर यात गुंतलेत. त्यांना जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाज का पुढाकार घेत नाही? मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणंच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजानं का घेऊ नये, जे कुणी पोलिसांच्या हाती न सापडता सोज्वळता मिरवत बसलेत त्यांना महिलांनी, समाजानं गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गाला आनंद होईल.
प्रसिद्धीमाध्यमं अशा बाबी रवंथ करत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली, महिलांनी दाखवायला हवी. ही गोष्ट काळजात दुःखाचा वणवा उठवणारी आहे. मस्तकात आग पेटवणारी आहे. असले नीच प्रकार करणाऱ्यांच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, सत्तेचं आणि मत्तेचं पाठबळ आहेच. आमचं कोण काय वाकडं करणार? आम्ही सगळं दडपू शकतो, अशी खात्री असल्यानंच हे सारे बेफाम बनलेत. आमच्या हाती सत्ता आहे. कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो. लोकांना धमकावू शकतो आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरूण घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय. राजकीय व्यासपीठावरून राणा भीमदेवी थाटाची भाषणं करणारे लोक लैंगिक शोषणाबाबत काहीच बोलत नाहीत. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी भांडणारे डावेही शांतच आहेत. मोठा गाजावाजा करत महिलांच्या विकासाचे धोरण जाहीर करणाऱ्या पक्षालाही याचं तर जणू सोयरसुतकच नाही अशी परिस्थिती आहे. सामाजिक संवेदना तर केव्हाच मेल्यात. अशा प्रकारानंतर प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या पण तसं झालंच नाही. घराचं थिएटर आणि टीव्हीवरचा नंगानाच सहकुटुंब सहपरिवार पाहणाऱ्या समाजाला त्यातली बीभत्सता कशी जाणवणार? त्या निरागस मुलीवर झालेला अत्याचार हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. चिमुरडीवर झालेला अत्याचार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतो. 
चौकट....   *पौरुष्यच कापायला हवंय!*
बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटत नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. हे दाखवून द्यायला हवं. जोवर आपल्या अब्रूच्या अंगारानं ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशांना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर ती आता वर्तमानकथाही आहे. 'माझी अब्रू तू लुटलीस तुझी अब्रू मी चव्हाट्यावर लुटणार...!' म्हणून स्त्री बेडरपणे उभी राहिली, तर भल्याभल्याची पाचावर धारण बसेल. आज ना उद्या हे होणारच! अत्याचारी पुरुषाचे पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याचं अधूनमधून वृत्तपत्रातून वाचनात येतं. डिंपल कपाडिया-नाना पाटेकर असलेल्या कुठल्यातरी हिंदी सिनेमात हे प्रकर्षानं दाखवलं होतं. जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात तर हे केव्हाच सांगितलं आहे!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...