Saturday 15 June 2024

चंद्राबाबू : किंग आणि किंगमेकर...!


"राजकारण हे अशाश्वत असतं असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती सध्या येतेय. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू आणि तेलुगु देशम पक्ष संपलाय. अशी टीका होत असतानाच त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेतलीय. लोकसभेच्या १६ जागा जिंकून राष्ट्रीय राजकारणात, दिल्लीत *किंगमेकर* म्हणून तर आंध्र प्रदेशात १३५ जागा जिंकून राज्यात *किंग* म्हणून चंद्राबाबू उदयाला आलेत. ४०० पार चा नारा देणाऱ्या पण २४० वर थांबलेल्या भाजपला सत्तेपर्यंत न्यायला हेच चंद्राबाबू सहाय्यभूत ठरलेत. तर सर्वशक्तिशाली जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशात चारी मुंड्या चीत करून तिथली सत्ता जनसेनेच्या अभिनेते 'पॉवर स्टार' पवन कल्याण यांच्या साथीनं हस्तगत केलीय. कधी नायक कधी खलनायकाच्या चक्रातले चंद्राबाबू आता नायक बनलेत तर जगनमोहन रेड्डी हे खलनायक...!"

-------------------------------------------------------
*दा* क्षिणात्य चित्रपटांच्या कथा वेगळ्या असल्या तरी त्यातला मूळ गाभा हा त्यातला नायक असतो. हा नायक आधी शेळपट असतो मग तो अचानक वाघ होतो आणि खलनायकाचा नायनाट करतो असं दाखवण्यात येतं. दक्षिणेकडची राज्ये नायकांना डोक्यावर उचलून घेतात, मग तो चित्रपटातला असो अथवा राजकारणातला...! कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये अभिनयाकडून राजकारणाकडं वळलेल्या आणि यशस्वी झालेल्यांची संख्या बरीच मोठी आहे. तमिळ अभिनेते एम.जी.रामचंद्रन, अभिनेत्री जयललिता, तेलुगू अभिनेते एन.टी.रामाराव या सारख्या कलाकारांना सिनेसृष्टीत मिळालेल्या अपार यशानंतर राजकारणी म्हणूनही जनतेचं अपार प्रेमही मिळालं. या तिघांनी आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय. या सगळ्यांचा जीवनप्रवास पाहिला तर या सगळ्यांचं खासगी जीवन हे प्रचंड वादग्रस्त होतं आणि त्यांना कधी नायकाचं रुपक देण्यात आलं तर कधी खलनायकाचं...! या तिघांनाही राजकीय कट कारस्थानं करणाऱ्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी या तिघांचे स्वभावही कारणीभूत ठरलंय. एन.टी.रामाराव यांच्याबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्या जावयानंच त्यांच्याविरोधात कट रचला आणि त्यांच्या हातून सत्ता खेचून घेतली. मात्र एनटी रामाराव हे त्यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वतीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. चित्रपटात जसं दाखवतात तसं एनटीआर यांनी जाहीर सभेत मंचावरून लक्ष्मी पार्वती यांना लग्नासाठी साद घातली होती. लक्ष्मी पार्वती या गर्दीतून वाट काढत मंचाकडं झेपावल्या. मंचावरच एनटीआर हे लक्ष्मी पार्वती यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार होते. हा प्रसंग हजारो, लाखों लोकं पाहात होती. एनटीआर यांनी मंगळसूत्र बांधण्यासाठी हात पुढे केले, त्यांच्या समोर लक्ष्मी पार्वती उभ्याही होत्या आणि तेवढ्यात अचानक लाईट गेले. मात्र ते गेले नव्हते तर घालवण्यात आले होते. लाईट गेल्यामुळे लक्ष्मीपार्वती यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं गेलं अथवा नाही हे जनतेला कळलंच नाही. ज्या व्यक्तीनं लाईट घालवले, असं म्हणतात त्या व्यक्तीनं मग १२ जून २०२४ रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा शपथ घेतलीय. एनटीआर यांचे जावई, तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी एनटीआर यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हाताखालून अशरक्ष: खेचून घेतला होता. लक्ष्मीपार्वती यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एनटीआर यांना आपली मुलं आणि घरातल्या इतर व्यक्तीही आपल्या विरोधात गेल्याचं कळलंही नाही. एनटीआर यांचं आपल्या कुटुंबाकडं विशेष लक्ष नसायचं. ते अत्यंत हेकेखोर स्वरुपाचे बनले होते. ते कमालीचे संशयीही होते, शिवाय कोणावरही ते पटकन विश्वास ठेवायचे नाहीत. त्यांना लक्ष्मीपार्वती यांच्यावर प्रेम जडल्यानंतर तिच्याशिवाय काही दिसेनासं झालं होतं. ही सगळी परिस्थिती लांबून चंद्राबाबू पाहात होते. एन.टी. रामाराव यांचे निधन झाल्यानंतर चंद्राबाबू यांनी आपलं स्थान आणखी मजबूत, बळकट केलं. आंध्र प्रदेशला हायटेक करणारे, सायबर सिटी निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणून नायडूंचा सर्वत्र नावलौकीक झाला होता. 
आठ महिन्यांपूर्वी, जेव्हा चंद्राबाबू नायडू तुरुंगात गेले, तेव्हा असं दिसलं की ७४ वर्षीय राजकारणी आणि त्यांचा तेलुगू देशम पक्ष - टीडीपी हा कायमचा सत्तेबाहेर गेलाय; जणू त्यांचं अस्तित्वच संपलंय. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे चंद्राबाबू आणि त्यांचा तेलुगु देशम पक्ष राखेतून पुन्हा उसळी घेत सत्तेवर पोहोचलाय. त्यामुळं राजकारण्याला कधीही कमी लेखू नका. आंध्र प्रदेश निवडणुकीतला हा सर्वात मोठा धडा आहे. वृद्ध ज्येष्ठ राजकारण्याला ५२ दिवसांसाठी तुरुंगात पाठवलं गेलं तेव्हा त्याच्यावर अनेक खटले अन् दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागला. त्यावेळी, सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे वरवर कल्याणकारी योजनांच्या पाठीशी असल्याचं आणि आता आपण अजिंक्य असल्याचं दाखवत होते. दुसरीकडं चंद्राबाबू, त्यांचा मुलगा लोकेश आणि पत्नी भुवनेश्वरी यांच्या तुरुंगवासाचं रुपांतर सहानुभूतीच्या मतांमध्ये झाल्याचं यावेळी दिसलं. चंद्राबाबू यांच्यासाठी, २०१९ मधला पराभव हा त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर पडलेला पडदा पडला असेल असं म्हटलं गेलं. तथापि, चतुर राजकारण्यानं, जसं त्याचं अनेकदा वर्णन केलं जातं, त्यांनी अत्यंत शांतपणे संयम बाळगून, जनसेना आणि भाजपशी युती करून राज्यात पुनरागमन केलंय. हा त्यांचा टर्निंग पॉइंट जवळजवळ सिनेमॅटिक आहे. जेव्हा चंद्राबाबूची राजमुंद्री तुरुंगात जाऊन ॲक्शन हिरो 'पॉवर स्टार' पवन कल्याण यांनी भेट घेतली आणि नाटकीयपणे जाहीर केलं की, ते आणि त्याचा राजकीय पक्ष जनसेना चंद्राबाबूसोबत निवडणूक लढवतील आणि जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचा पराभव करतील. इथून राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. पवन कल्याण यांनी जणू या टीडीपी नेत्याला जीवनदान दिलं. पवन कल्याणलाही राजकीय दृष्ट्या तरंगत राहाणं ही मजबुरी होती. भाजपच्या पाठिंब्यानं टीडीपीला सामावून घेण्याचा आणि राजकीय पोकळी भरून काढण्याचा पर्याय त्यांच्याकडं होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा टीका केल्यामुळे नायडू दिल्लीतल्या भाजप नेत्यांमध्ये अप्रिय होते त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अढी होती. हे पवन कल्याण यांना ठाऊक होतं. २००२ मध्ये जेव्हा गोध्रा दंगलीनंतर चंद्राबाबू यांनी मोदी यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. २०१८ मध्ये, जेव्हा चंद्राबाबू यांनी आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा न दिल्याबद्दल नरेंद्र मोदींना दोष देत एनडीए सोडली होती. दरम्यानच्या काळात चंद्राबाबू यांनी अनेकदा मोदींवर टीकास्त्र चालवलेलं होतं. त्यांच्यावर व्यक्तिगत हल्लेही केले होते. भाजपला दक्षिणेकडे कूच करायची असल्यानं त्यांनी सारं काही गिळून आणि पवन कल्याण यांच्या सततच्या प्रयत्नांमुळेच चंद्राबाबू यांना पुन्हा एकदा एनडीएमध्ये स्थान मिळणं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत उभं राहणं शक्य झालं. पवन कल्याण यांनी कबूल केलंय की, आपल्या पक्षाला त्याग कराव्या लागलेल्या जागांच्या किंमतीवर ही युती झाली, चंद्राबाबू नायडूंना माहित होतं की युतीच्या रसायनशास्त्रासमोर दोन्ही पक्षांमधल्या मतांचं हस्तांतरण करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. आंध्र प्रदेशात कमी मतं असलेल्या भाजपला असं काहीतरी होणं अत्यंत आवश्यक होतं. आपल्याकडं मराठा आणि माळी समाजाचं प्राबल्य आहे अगदी तशाच प्रकारे आंध्र प्रदेशात कापू आणि कम्मा या समाजाचं अस्तित्व आहे. त्यांच्यातल्या राजकीय शत्रुत्वासाठी नेहमी बोललं जातं. टीडीपीकडं कम्मांचा पक्ष म्हणून पाहिलं जातं आणि गेल्या काही वर्षांत ही छाप अधिकच वाढली. विरोधी पक्ष, वायएसआर यांनी आरोप केले आहेत की, टीडीपी सरकार कम्मा समाजाच्या अधिकाऱ्यांना केवळ पक्षाच्या जवळ असल्यानं त्यांना महत्त्वाच्या पदांवर बढती देत ​​होती. अशा परिस्थितीत आरक्षणासाठी संघर्ष करणारे कापू नेते टीडीपीकडे संशयानं पाहू लागले. जनसेना पक्षानं निवडणूक लढवण्याची घोषणा करेपर्यंत कापू समाजासाठी वायएसआर काँग्रेस हा पर्याय होता. पण राज्य आणि सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी संख्यात्मकदृष्ट्या मजबूत समुदाय दलित आणि कापू म्हणजे शेतकरी समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. आंध्र प्रदेशात दलित लोकसंख्येच्या जवळपास १७ टक्के आणि कापू २० टक्के आहेत. पवन कल्याण हे याचं कापू समाजाचे असल्यानं आणि चंद्राबाबू हे कम्मा आहेत या दोघांच्या युतीमुळे मतं एकत्रित झाली आणि आंध्र प्रदेशात त्यांची सत्ता येऊ शकली.
चंद्राबाबू नायडू यांनी आपली राजकीय कारकीर्द तरुण असतानाच काँग्रेसमधून सुरू केली, अगदी १९७५-७७ च्या आणीबाणीच्या काळात भारतीय युवक काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी संजय गांधींना पाठिंबा दिला होता. ते २८ व्या वर्षी सर्वात तरुण आमदार आणि १९८० मध्ये टी.अंजय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्री बनले. दरम्यान नायडू यांचे एनटी रामाराव यांची मुलगी भुवनेश्वरीशी लग्न झाल्यानं त्यांना एनटीआर यांनी तेलुगू देशम पक्षात आणलं. ऑगस्ट १९८४ मध्ये नादेंडला भास्कर राव यांनी केलेल्या बंडाचा पराभव करण्यात मदत करून त्यांनी सासऱ्यांचा विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर ११ वर्षांनंतर, चंद्राबाबू नायडू यांनी स्वत: त्यांचे सासरे एनटीआर यांच्या विरोधात बंड घडवून आणलं आणि त्यांना पदच्युत करून पक्ष आणि राजकीय सत्ता हाती घेतली. ४५ व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर २००४ पर्यंत दोन टर्म त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्या काळात चंद्राबाबू नायडू यांनी एक 'आर्थिक सुधारक' राजकारणी म्हणून 'ब्रँड नायडू' तयार केलं. त्यांनी ब्रँड हैदराबादला जगाच्या आयटी नकाशावर आणलं आणि प्रशासन सुव्यवस्थित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेतल्याबद्दल आंध्र प्रदेशच्या सीईओचा मानही मिळवला. राष्ट्रीय राजकारणात चंद्राबाबू नायडू यांची भूमिका प्रथम एच.डी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालच्या युनायटेड फ्रंटचे संयोजक आणि नंतर आय.के. गुजराल यांच्या कार्यकाळात होती. १९९९ मध्ये टीडीपी आपल्या २९ खासदारांसह एनडीए मध्ये दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. नायडू १० वर्षांनंतर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परतलेत, आंध्र प्रदेशचे आता विभाजन झालं आणि राजधानी हैदराबाद गमावल्यामुळे लोकांची मनं खूप दुखावली होती. भाजप आणि पवन कल्याण यांच्या पाठिंब्याशिवाय २०१४ मध्ये आपण जिंकू शकत नाही हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्यांनी ते घडवून आणण्यासाठी दोघांशी संपर्क साधला. २०१८ मध्ये, तथापि, पुन्हा एकदा भाजपशी विभक्त झाल्यानंतर, चंद्राबाबू नायडू यांना २०१९ मध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावं लागलं, त्यांनी फक्त २३ विधानसभा आणि तीन लोकसभेच्या जागा जिंकल्या. त्यांच्या पक्षाचं आतापर्यंतचं सर्वात वाईट प्रदर्शन त्यावेळी झालं होतं. परंतु चंद्राबाबू नायडू यांनी सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आपली राजकीय बुद्धिमत्ता आणि लवचिकता वापरून एक उल्लेखनीय पुनरागमन आता केलंय. निवडणूक निकालांनी चंद्राबाबू नायडू यांना पुन्हा एकदा संयुक्त आघाडीचं संयोजक या नात्यानं किंगमेकरची भूमिका बजावण्याची संधी दिलीय. काहींच्या मते, वाटाघाटी करण्याची आणि पंतप्रधान होण्याची ही त्यांची सर्वोत्तम संधीही इंडिया आघाडीकडून असू शकते. पण ते तसं करणार नाहीत, असं त्याच्या जवळचे लोक सांगतात. नायडू यांना अनेकदा राजकीय संधिसाधू असं संबोधण्यात आलंय. त्यांच्याकडून मित्रपक्षांवर विश्वास निर्माण केला जात नाही, कारण ते युती आणि मैत्रीत राजकीय जुगार पाहतात. मात्र नायडू यांना आता विश्वासार्ह सहकारी असल्याचं सिद्ध करण्याची ही संधी आहे.
वाय.एस.राजशेखर रेड्डी यांचा मुलगा आणि वायएसआर काँग्रेसचा प्रमुख, तरुण नेता जगनमोहन रेड्डी याला बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात डांबण्यात आलं. आपला राजकीय प्रतिस्पर्धी संपवण्यासाठी नायडूंनी ही खेळी रचल्याचा आरोप तेव्हा केला गेला होता. १६ महिन्यानंतर जगनमोहन जामिनावर तुरुंगाबाहेर आले. त्यानंतर त्यांनी पदयात्रा काढत संपूर्ण आंध्र प्रदेश पिंजून काढला आणि नायडूंच्याविरोधात रान उठवलं. परिणामी टीडीपीचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होताच त्यांनी त्याचा वचपा काढला. नायडूंच्यामागे हात धुवून लागले. प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर टीकाटिपण्णी, निंदानालस्ती ते करत होते. ज्या पद्धतीनं नायडूंनी जगन यांना तुरुंगात पाठवलं त्याच पद्धतीनं जगन यांनी नायडूंना तुरुंगात डांबलं. ५२ दिवस नायडू तुरुंगात होते. कौशल्य विकास योजनेत घोटाळा केल्याचा नायडूंवर आरोप करण्यात आला. तुरुंगात जाण्यापूर्वी आणि नंतर नायडू यांच्यावर वायएसआर पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी बेफाम आरोप केले. नायडूंच्या कुटुंबियांवरही आरोप करण्यात आले. हे सगळं पाहिल्यानंतर संतापलेल्या आणि अपमानित झालेल्या नायडूंना आंध्र प्रदेशच्या विधानसभेत अश्रू अनावर झाले. त्यांनी अश्रूंना आवर घालत जाहीर शपथ घेतली होती की 'जोपर्यंत मी पुन्हा सत्ता मिळवत नाही तोपर्यंत या सदनात पाय ठेवणार नाही...!'  अशी काहीशी परिस्थिती नायडूंच्या पक्षानं जगन यांच्यावरही आणली होती. टीडीपी सत्तेत असताना त्यांच्या नेत्यांनी विधानसभेत जगन यांच्यावर इतके जबरदस्त हल्ले आणि आरोप केले की जगन सदनातून निघून गेले. ते परतले ते थेट मुख्यमंत्री बनूनच. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्राबाबू विरोधात १० गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा नारा लोकेश विरोधात १६ गुन्हे दाखल करण्यात आले. नायडूंचं कार्यालय बुलडोझर लावून भुईसपाट करण्यात आलं. २०१९ मध्ये सत्तेवर आल्यानंतर जगन यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे नायडूंनी बांधलेलं कॉन्फरन्स हॉल, प्रजा वेदिका पाडणे. त्यात मुख्यमंत्र्यांना नायडूंचं कार्य आणि वारसा पुसून टाकण्याचं वेड लागलेलं दाखवलं. नायडू सत्तेवर असताना ज्या कंपन्यांनी आंध्र प्रदेश सरकारच्या विविध विभागांसाठी काम केलं होतं, त्यांचं काम नवीन शासनाशी एकनिष्ठ असलेल्या नोकरशहांद्वारे खराब होत असल्याचं आढळलं आणि बिलं मंजूर झाली नाहीत. जगन विसरले की सरकार म्हणजे सत्ता कोणाचीही असली तरी एक अखंड अस्तित्व असतं. टीडीपी मुख्यालयावर कारवाई करण्यात आली. यामुळं नायडू हादरले, मात्र त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही. दाक्षिणात्य चित्रपटात कधी शेळी असणारा नायक अचानक वाघ होतो, तशीच परिस्थिती आंध्रच्या राजकारणात पाहायला मिळाली. तुरुंगात गेलेले नायडू हे शेळी म्हणून आत गेले, मात्र बाहेर येताना ते वाघ बनले. आता पवन कल्याण यांच्या जनसेनासोबत हातमिळवणी करत नायडूंनी आंध्र प्रदेशात चमत्कार घडवलाय. टीडीपीनं मित्रपक्षांसोबत मिळून १७५ पैकी १६४ जागांवर विजय मिळवलाय. कधी नायक तर कधी खलनायकाच्या चक्रातले चंद्राबाबू आता नायक बनलेत तर जगनमोहन रेड्डी हे खलनायक!. 
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...