Saturday 29 June 2024

रेवड्यांची उधळण अन् सत्तेचं चांगभलं...!

"राजकारणाचा चिखल आणि राज्यकारभाराचा बट्याबोळ झाला असतानाही राजकारण्यांना निवडणुकीचे वेध लागलेत. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन महिला, शेतकरी, वारकरी, अल्पसंख्यांक यांच्यासाठी घोषणांचा पाऊस अर्थमंत्री अजित पवारांनी पाडून मतांची पेरणी केलीय. योजनांच्या रेवड्यांची उधळण करून सत्तेसाठीचं चांगभलं केलंय. राज्यावर आज आठ लाख कोटीं रुपयांचा बोजा आहे. या रेवड्या वाटल्यानं आता आणखी बोजा  वाढणार आहे. अजित पवारांनी घोषणा केल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीसाठी ते महायुतीत नकोत अशी मागणी भाजप नेते करताहेत. राजकारण तापत चाललंय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. मविआ, महायुती, मनसे, वंचित यांनी निवडणुकीची तयारी सुरू केलीय. पण मतदारांच्या मनांत काय चाललंय....!"
----------------------------------------------
*म* हाराष्ट्रतल्या शिंदे सरकारचं निवडणूक पूर्वीचं अधिवेशन सुरू झालंय. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होताहेत. पक्षफोडीचा खेळ खेळूनही लोकसभेत अपेक्षित यश महायुतीला मिळालं नाही. महाविकास आघाडीला लोकांचा प्रतिसाद लाभलाय. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे सेना यांना जवळपास १६४ मतदारसंघात आघाडी मिळालीय. त्यामुळं विधानसभा आम्हीच जिंकू अशा आविर्भावात ही मंडळी वावरताहेत. पण पक्षफोडीची सहानुभती आणि तत्सम इतर मुद्दे लोकसभा निवडणुकीत निकाली निघालेत. त्याची पुनरुक्ती कितपत होईल ही शंकाच आहे. त्यांना नव्यानं सारं काही करावं लागेल. महायुतीतल्या भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी यांना जो फटका बसलाय त्यातून ते सावरताना दिसताहेत. त्यासाठी या अधिवेशनाचा आणि अर्थसंकल्पाचा वापर केला गेलाय. आश्वासनांची खैरात केलीय. महिला मतदारांना लक्ष्य केल्याचं दिसतंय. कर्नाटक, मध्यप्रदेश व इतर राज्यात ज्याला रेवडी म्हटलं गेलं ते इथं वाटलं जाणार आहे. पण आजवर ज्या घोषणा केल्या त्याचं काय झालं. जातीनिहाय महामंडळ बस्त्यातच आहेत. राज्यावरच्या कर्जात तर कमालीची वाढ झालीय. महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा २०१९-२० मध्ये ४ लाख ५१ हजार११७ कोटी रुपये इतका होता. २०२०-२०२१ मध्ये तो ५ लाख १९ हजार ०८६ कोटी, रुपये. २०२१-२२ मध्ये ५ लाख ७६ हजार ८६८ कोटी, २०२२-२३ मध्ये ६ लाख २९ हजार २३५ कोटी रुपये, २०२३-२४ मध्ये ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपये, २०२४-२५ मध्ये ७ लाख ८२ हजार ९९१ कोटी रुपये इतका झालाय. आता ज्या घोषणा केल्या आहेत, त्यासाठीच्या तरतुदी कशा केल्या जाणार आहेत. राजकारणा पायी अजून काय आणि किती मोफत देऊन राज्यावर  कर्जाचा डोंगर उभा केला जाणार आहे?
भाजप आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते हे उघडपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात आहेत. कारण गेल्या २०१९ च्या निवडणूकीत यातले बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादीच्या विरोधात लढलेले आहेत. ते सारे आता भाजप, शिंदेसेने सोबत आहेत. मग या जागा कोणाला मिळणार? संघ नेतृत्वानं तर उघडपणे अजित पवारांच्या विरोधात मोहीम उघडलीय. त्यामुळं उमेदवारीवरून या तीनही पक्षांत वाद होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अधिवेशनात हवा असलेला निधी मिळताच अजित पवार गटात फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जातेय. शरद पवारांच्या आवाहनानं त्यांच्यात चलबिचल सुरूय. शिंदेसेनेला जे अनपेक्षित यश लोकसभेत मिळालंय त्यानं ते जोशात आहेत. इकडं आपल्याला स्पष्ट बहुमत मिळावं यासाठी भाजप आग्रही आहे. त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झालीय. लोकसभा अधिवेशनानंतर दिल्लीतले वरिष्ठ नेते राज्यात लक्ष घालतील. पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. शिंदे - पवार हे अवास्तव मागण्या करत असले तरी भाजप त्यांना दाद देणार नाही. भाजप देईल तेवढ्याच जागा त्यांना लढवाव्या लागतील. त्यांनी ऐकलं नाही तर भाजप स्वबळावर निवडणुका लढवील अशी चिन्हं आहेत. मविआत सारं काही आलबेल आहे असं नाही. जागा वाटपात कुरबुरी होतीलच. शिवाय नव्यानं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा उद्धव ठाकरे यांचा असावा अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. अर्थात इतर दोन्ही पक्षांनी योग्य वेळी निर्णय घेऊ असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केलीय. लोकांसमोर जाताना सर्वच पक्षांची दमणूक होणार आहे. दोन आघाड्या, त्यातले सहा पक्ष, मनसे आणि वंचित असे आठ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतील की काय हे लवकरच दिसून येईल. सगळ्याच पक्षांनी सगळेच मतदारसंघ लढवण्याची तयारी चालवलीय. 
गेल्या पाच वर्षात राजकारणाचा नुसता चिखल झालाय आणि लोकांच्या सेवासुविधाचे धिंडवडे निघालेत. अडीच वर्षे कोरोना आणि उद्धव ठाकरेंचं सरकार लोकांनी अनुभवलं. त्यानंतर बाळासाहेबांच्या विचारांसाठी म्हणून एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करत बंड केलं. महाशक्तीच्या सहाय्यानं राज्याची सत्ता बळकावली पण त्यांनी काय काम केलं याचा शोध घेतला तर मात्र हाती काहीच लागत नाही. फक्त शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसह मंत्र्यांना खुर्च्या उबवायला मिळाल्यात एवढंच! आजवर त्यांनी आपल्याच मूळ पक्षातल्या जुन्या साथीदारांचं चारित्र्यहनन करण्यात, उणंदूणं काढण्यातच धन्यता मानलीय. २०१४ मध्ये 'गुड गव्हर्नन्स'  चांगला कारभार देऊ म्हणत भाजप सत्तेत आले होते. त्या पाच वर्षात काय झालं हे सगळ्यांना माहीतीय. त्यावेळी हेच शिंदे खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. २०१९ मध्ये सत्तेसाठी राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर तीन पक्ष एकत्र येत मविआ सत्तेवर आली. कोरोनाचा काळ संपता संपता कुरघोड्या करत दोन वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं. सत्तेच्या झगड्यात असलेल्या दोन्ही गटांमध्ये *महा* शब्द आहे. पण सारंच लघु निघालं अन् *महागाई*चा आगडोंब उसळला. शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांनी काय दिवे लावलेत? हे लोक पाहताहेत. लोकांसाठी सत्ता राबविण्याऐवजी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यातच वेळ घालवलाय. आपण काय करतोय याचा अभ्यास करण्याची, मूल्यमापन करण्याची फुरसत कुणाला आहे का? हाती सत्ता आहे, असलेल्या सत्तेचा लोकांसाठी काही केलंय का? मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत पडलाय. ओबीसी आंदोलन करताहेत. धनगरांच्या तोंडाला पानं पुसलीत. प्रश्नांचे डोंगर वाढताहेत. कुणाकडेच त्यावर सोल्यूशन नाही. मार्ग काढण्याची, उपाय शोधण्याची कुणाचीच इच्छा नाही. प्रश्नांच्या मुळाशी जाऊन ते मार्गी लावण्याचं प्रयत्न होत नसल्यानं ते साचत चाललेत अन् ते चिघळताहेत. निवडणुकीत त्याचा फायदा राजकीय पक्ष उचलताहेत. शिंदे सरकारनं दोन वर्षात मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर विस्तार करण्याचं त्यांना सुचलंय. महाराष्ट्राचा कृषिमंत्री कोण असं जर कुणाला विचारलं तर दहापैकी आठ लोकांना सांगताच येणार नाही. ही परिस्थिती झालीय! कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र...? असं म्हणायची वेळ आलीय. दोन चार मंत्री सोडले तर महाराष्ट्र कुणालाच ओळखत नाही. त्यांची नावंही माहीत नाही. 
'गुड गव्हर्नन्स' म्हणत सत्तेवर आलेल्यांना विचारावं वाटतं की, कुठं आहे 'गुड गव्हर्नन्स'? मंत्रिमंडळाचा विस्तार सोडा, महामंडळावरही नियुक्त्या नाहीत, ती रिकामी पडलीत. नेमणुका होणार नसतील, ती करता येत नसतील तर ती सारी महामंडळ बरखास्त करून टाका ना! त्यात नव्यानं भर कशाला टाकलीय. विधान परिषदेच्या १२ जागा रिकाम्या पडल्यात. ठाकरे सरकार असताना आणि आताही त्या भरल्या नाहीत. प्रत्येकाला आपली माणसं घुसवायचीत. त्यामुळं मामले कोर्टात जाताहेत. ते बारा आमदार लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेमले जातात, त्यापासून लोक वंचित राहत नाहीत का? त्यावर सुसंस्कृत महाराष्ट्रातले लेखक, साहित्यिक नेमले गेले असते जे कायद्यानं नेमावं लागतात. त्यानं सांस्कृतिक वातावरण तरी तयार झालं असतं ना! अलीकडं त्यांच्याऐवजी राजकारणी नेमले जातात मग साहजिकच वाद सुरू होतात, राजकारण रंगू लागतं. महापालिकेच्या निवडणुका तर तब्बल तीन वर्षापासून झालेल्या नाहीत. दोन तीन वर्षे नगरसेवकच नाहीत. महापालिका अधिकाऱ्यांवर सोडल्यात. आपण सतत लोकशाहीचं नावं घेतो पण इथं तर अधिकारशाही बिनदिक्कतपणे सुरू आहे. आरक्षणाचा विषय आहे म्हणून लोक कोर्टात गेलेत. सरकारलाही तेवढंच हवंय. कोर्टात सरकारलाही जाता येतं, अर्जन्सी दाखवून नागरी सेवेसाठी निर्णय घ्यायला विनंती करता येते, पण इथं सरकारचीच राजकीय इच्छाशक्ती नाही. लोकांना सेवा घेण्याचा मूलभूत अधिकार आहे, त्यापासून ते वंचित राहताहेत. याची कुणी दखलच घेत नाहीत. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे म्हणत चालढकल केली जातेय. त्यामुळं अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. काही काळानं लोक नागरी सुविधांसाठी नगरसेवक होते किंवा असतात हेच विसरून जातील. यासाठी सरकारनं पुढाकार घ्यायला हवाय, पण सरकार करतंय काय? सरकार आश्वासन देण्यापलीकडं काहीही करत नाही. करण्यासारखंही आता काही राहिलेलं नाही, वेळ निघून गेलीय. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणूका लागतील. त्यांची आचारसंहिता महिन्याभरात निघेल. मग सारा कारभार ठप्प होईल. अधिकारी, सत्ताधारी, राजकारणी बोलायला मोकळे की, आता आचारसंहिता लागलीय. सारे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. मविआ असो की, महायुती. लहान चोर, मोठा चोर, लोकांना दोघांमधल्या एकाला निवडायचंय. ठाकरे गेले, शिंदे आले कारभार बदललाय का? कारभार ठप्पच आहे. दिलेली आश्वासनं वाचली की, कळतं राज्यात सरकार आहे ते! पुण्यात पोर्शे कार अपघात झाला, दोन जण चिरडले गेले. सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. भ्रष्टाचार वरपर्यंत कसा होतोय, सरकार, पोलीस, आरोग्य खातं, न्याययंत्रणा कशी पोखरली गेलीय, याचं नागडं सत्य लोकांसमोर आलंय. ह्या साऱ्या यंत्रणा आरोपीला वाचविण्यासाठी कशाप्रकारे राबत होती; यानं खरंतर लाज वाटली पाहिजे, पण निर्ढावलेल्या यंत्रणाप्रमाणे सरकारही ढीम्म आहे! हीट अँड रन घटना घडताहेतच, श्रीमंतांची लहान लहान मुलं गाड्या उडवताहेत. दारू पिऊन लोकांना चिरडताहेत. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहील नाही, हे काही सांगायला नकोत. आरोपीला सुटता येईल अशी कलमं लावली गेली. मग लोकांचा प्रक्षोभ पाहिला. तेलंगणातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं इथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवलं की, तेलंगणात असाच प्रकार घडला तेव्हा कशी कलमं लावली याची माहिती दिली. मग सूत्र हलली. नव्यानं एफआयआर नोंदवला गेला. नाहीतर आरोपीला सोडण्याची जय्यत तयारी झाली होती. आरोग्य खात्यातले एकापाठोपाठ घोटाळे समोर येताहेत. चौकशी सुरू आहे, असं सांगितलं जातं. राजकारणासाठी असे आरोप प्रत्यारोप होतात, नंतर सारं काही ठप्प होऊन जातं. 
आता अशा भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना क्लीन चीट दिली जातेय. दोन पक्ष फोडून आल्याची फुशारकी करणाऱ्या चाणक्यानं राज्यात शिंदे सरकार आणलं. पण त्यांनी आजवर काय निर्णय घेतलेत, एक तरी निर्णय तुम्हाला आठवतोय, अनुभवतोय असं वाटतं का? निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, नंतर तेच उपमुख्यमंत्री म्हणून सरकारात बसले. हेच आरोप करत फडणवीस, तावडे, मुनगंट्टीवार गाडीभर पुरावे घेऊन मंत्रालयावर धडकले होते. अजित पवार एकटे नाही तर आपले ८-९ जण घेऊन आले. त्यांची आता गाडी, घोडे देऊन बडदास्त ठेवली जातेय. कर्मचारी सलाम ठोकताहेत. यांना घेऊन मोदी, शहांनी काय मिळवलं? संघानं देखील या साऱ्या प्रकारामुळे 'मोदी ब्रँड' बदनाम झालाय. अशी टीका केलीय. त्यांच्यामुळेच लोकसभेत पराभव झाला असं कार्यकर्ते म्हणू लागले. त्यांची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी झालीय. हे सारं करताना कार्यकर्त्यांना, लोकांना विश्वासात घेतलं का? अजित पवारांना घेतलं, त्यांच्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी दिली, ती पराभूत झाली, मग लगेचच त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं होतं ते न दिल्यानं राजकारणाचा चिखल केला गेला. पदरात काय पडलं? ठाकरे अडीच वर्षे नंतर शिंदे अडीच वर्षे अशी पाचही वर्षे शिवसेनेकडं सत्ता गेली. भाजपच्या हाती काय आलं? धूर्त, निवडणुका जिंकून देणारे म्हणून सांगितले जाणारे चाणक्य यांचं लोकसभा निवडणुकीत काय झालं? विधानसभेत लोकसभेची पुनरावृत्ती झाली तर त्यांचं काय होणार? मोदी शहांच्या नजरेत त्यांची काय किंमत राहील? मोदी शहा हे सतत निवडणुकीच्या मोडमध्ये असतात. गेली दहा वर्षे त्यांनी लोकांना काय दिलं? लोकांनी काय गमावलं? हे असंच होत राहिलं तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडून जाईल. आज ५०-६० टक्के मतदान होतंय, पुढं लोक मतदानासाठी बाहेरच पडणार नाहीत. भाजपनं डंका पिटला होता की, मोदीच प्रधानमंत्री होणारेत, त्यांच्यासाठी मतदान करा, उमेदवार पाहू नका. पण जे काही गणंग उभे होते, ते पाहून लोकांनी मतदानच केलं नाही. म्हणून मग ४०० पारचा नारा दिल्यानंतरही २४० वर थांबावं लागलंय. हे कशाचं द्योतक आहे? लोकांना त्याचा काय फायदा आहे, सोम्या आला काय अन् गोम्या आला काय? मग लोक मतं द्यायला कसे बाहेर पडतील?
घडवून आणलेला 'महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष' भाजपला, मोदींना अपमानास्पद ठरलाय. महाराष्ट्रातल्या सत्तेवर शिवसेनेनं दावा केला तेव्हा भाजपनं तो द्यायला नकार दिला. मग जे रामायण २०१९ ला घडलं ते समोर आहे.  शिवसेनेत फूट पाडली गेली. कोर्टाची कज्जेदलाली झाली. कोर्टानं सारं काही बेकायदेशीर ठरवलं, सत्ता मात्र फुटीरांकडे दिली. भाजप शिवसेना यांच्यातलं अंतर वाढत गेलं. राजकीय वैमनस्य निर्माण झालं. आज त्याचा फटका भाजपला, मोदींना बसलाय. भाजपची उद्धव ठाकरे यांच्या अखंडित शिवसेनेसोबत युती असती आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका एकत्रितरित्या लढवल्या असत्या तर २०१९ ला युतीला ज्या ४१ जागा मिळाल्या होत्या तेवढ्याच जागा २०२४ ला मिळाल्या असत्या. आज मात्र मोदींना सत्तेसाठी नेमक्या तेवढ्याच जागा कमी पडल्यात. २०१९ ला ज्या ४१ जागा मिळाल्या होत्या. तेवढ्याच २०२४ लाही मिळाल्या असत्या. भाजपच्या २४० मध्ये भाजपला मिळालेल्या ९ जागा कमी केल्या तर २३१ मध्ये या संख्येत या ४१ जागा मिळविल्या तर सत्तेसाठीचा २७२ हा जादुई आकडा भाजपला सहज गाठता आला असता. ठाकरे शिवसेनेशी युती तुटल्यानं मोदी आणि भाजपवर ही परिस्थिती ओढवलीय. राज्यातल्या नेत्याचा सत्तालोभ, घाणेरडे राजकारण, आणि अहंकार यामुळं ही वेळ आली. पक्षफोडीनं भाजपची देशभर निंदानालस्ती झाली. राज्यातल्या एका नेत्याच्या हट्टापायी मोदींना नितीशकुमार, चंद्राबाबू यांची मनधरणी करावी लागलीय. साहजिकच याचा राग त्यांना आला असेल. त्यामुळेच या नेत्यानं राजीनाम्याची भूमिका घेतली तरी त्यांना झापल्याचं समजतं. पण ही हिंमत त्या एकट्या नेत्यांची नव्हती तर त्याला महाशक्तीचीही संमती होती. हे शिंदेंनीच सांगितलंय. संघाच्या आणि भाजपच्या जुन्या, ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या ह्या अहंकारी, हेकेखोर नेत्याच्या राजकारणानं त्रासलेल्या, दबलेल्या  कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचं समजतंय. यातून कदाचित भाजपची राज्यस्तरावर साफसफाई होईल. त्याची तयारी प्रभारी नेमून सुरू झालीय.
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 22 June 2024

मोदींची अग्निपरीक्षा....!

"सत्ताकारणात स्पीकर अत्यंत महत्वाचा असतो. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षात आणि लोकसभेत अदानी, कृषि कायदे, राहुल गांधी प्रकरण यात स्पीकरची भूमिका पक्षपाती ठरलीय. लोकसभेत सत्ताकारणासाठी ओम बिर्ला हेच स्पीकर असतील. कारण मोदींनी मंत्रिमंडळाचे स्वरूप जुनंच ठेवलंय. शिवाय डेप्युटी स्पीकरची निवड हाही कळीचा मुद्दा ठरणारंय. जर भाजपला सत्तेपर्यंत नेणाऱ्या तेलुगु देशमनं स्पीकरपद मागितलं, तर मात्र मोदींच्या नेतृत्वाचा कस लागणारंय. ते सत्तासाथीदारांच्या अडवणुकीला बळी पडताहेत की त्यांच्याशी सौदेबाजी करून आपली माणसं स्पीकर, डेप्युटी स्पीकरपदी नेमताहेत. याकडे देशाचं लक्ष आहे. दुसरीकडं पूर्वीसारखा दुबळा नव्हे तर आता सशक्त, सक्षम विरोधीपक्ष उभा आहे. त्यामुळं सहमतीचं राजकारण पाहायला मिळणार की, संघर्षाचं? हे आगामी काळच ठरवील...!"
----------------------------------------------
*लो* कशाही हा आता आकड्यांचा खेळ ठरू लागलाय. सर्वाधिक संख्या ज्या राजकीय पक्षांकडे येईल तोच या लोकशाहीच्या मंदिरात त्याला वाटेल तशी लोकशाहीची व्याख्या करील. संसद आणि विधिमंडळ लोकशाहीतलं मंदिर समजलं जातं. तिथं बहूसंख्यांकांची सत्ता चालते पण जर बहुमत मिळालं नाही अन् अल्पमतातलं सरकार असेल, अन् त्या सरकारवर संकटं आली तर त्यांना स्पीकरच वाचवणार! लोकशाहीच्या मंदिरात लोकशाहीची रक्षा, संरक्षण करण्यासाठी सभापतींची, स्पीकरची नेमणूक असते. म्हणजे स्पीकरनाच ठरवावं लागतं की, संसद कशी चालेल. इतिहासातली पानं उलटून पाहिली तर लक्षात येईल की, सरकार पाडणं असो वा वाचवणं, हे स्पीकरवरच अवलंबून असतं. अशावेळी त्यांचा विवेक, त्यांचं राजकारण याचा कस लागतो. येत्या २६ जून रोजी स्पीकरची निवडणूक होतेय. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं मागणी केलीय की, 'स्पीकर सत्ताधाऱ्यांचा असेल तर डेप्युटी स्पीकर हा आमचा विरोधकांचा असायला हवा. जर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना डेप्युटी स्पीकरपद दिलं नाही तर आम्ही स्पीकरपदासाठीही आमचा उमेदवार उभा करू..!' सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या मधोमध तेलुगु देशम, जेडीयू पक्ष उभे ठाकलेलेत! त्यांनी भाजपला सत्तेसाठी दिलेला पाठींबा काढून घेतला तर सरकार अल्पमतात येईल. मग भाजपला बहुमत सिद्ध करणं अवघड होऊन बसेल. सरकार कोसळू शकतं. तेलुगू देशमनं स्पीकरपदासाठी आग्रह धरलाय. दुसरीकडं भाजपनं नवनिर्वाचित सदस्यांना खासदारकीची शपथ देण्यासाठी आजवरचे संकेत, परंपरा डावलून भाजपच्या भतृहरी मेहताब यांना 'प्रोटेम स्पीकर' म्हणून नेमलंय. ते निवडणुकीपूर्वी बीजू जनता दलातून भाजपत आलेत. खरं तर तिथं सर्वात ज्येष्ठ सदस्य काँग्रेसचे के. सुरेश यांची नियुक्ती करायला हवी होती. ते दलित असल्यानं त्यांना नेमलं नाही, असा आरोप काँग्रेसनं केलाय. इथं भाजपनं विरोधकांशी पंगा घेतलाय. 
स्पीकर कोणाचा हवाय. याबाबतचा धांडोळा घेतला तेव्हा अनेक घटना समोर आल्या. बरोबर ४९ वर्षांपूर्वी ज्या दिवशी देशात आणीबाणी लादली गेली त्याच दिवशी स्पीकरची निवड होतेय. म्हणजे २५ आणि २६ जून ही तारीख तुम्ही आठवा. याच दिवशी २५ वर्षांपूर्वी  वाजपेयींचं सरकार केवळ १ मतानं पडलं होतं. ते कसं पडलं हा एक रोचक किस्सा आहे, तोही स्पीकरशी निगडीत अधिकाराचा आणि ताकदीचा असल्याचा आपल्याला प्रत्यय येईल! वाजपेयींचं सरकार मार्च १९८८ मध्ये साकारलं. त्यांना पूर्ण बहुमत नव्हतं, ते एनडीएचं सरकार होतं. अगदी असंच जसं आता मोदींचं सरकार आहे. त्यावेळी पाठींबा देणाऱ्यांमध्ये डीएमके आणि तेलुगु देशम होते. तोच तेलुगु देशम आहे ज्यानं मोदींना पाठींबा दिलाय. अटलजींच्या सरकाराला तेलुगु देशमनं अट टाकली होती की, स्पीकर आमचा असेल. अटलजींना सरकार चालवायचं होतं, त्यामुळं चंद्राबाबू यांची अट मान्य करत तेलुगु देशमच्या जे.एम्.सी बालयोगी यांची स्पीकरपदी निवड केली. मात्र १३ महिन्यात डीएमकेनं अटलजींच्या सरकारचा पाठींबा काढून घेतला. त्यानंतर अविश्वासाच्या प्रस्तावावर बहुमत सिद्ध करण्याचं संकट उभं राहिलं. संख्याबळ पाहता अटलजींचं सरकारं एखाद दुसऱ्या मतानं जिंकेल असं वाटत होतं. पण राजकीय विश्लेषकांना, ज्येष्ठ नेत्यांना मात्र समसमान मतं पडतील आणि स्पीकर बालयोगी यांना कास्टींग व्होट करावं लागेल असं वाटत होतं. स्पीकरची भूमिका ही समसमान मतं होणार नाहीत याची काळजी घेणं देखील आहे. दरम्यान गिरिधर गोमांग हे खासदार ओडिशाचे मुख्यमंत्री बनले. इथं प्रश्न उपस्थित झाला की, मुख्यमंत्री बनलेल्या खासदाराला विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान करता येऊ शकेल की नाही! या समरप्रसंगात स्पीकर बालयोगी यांनी संसदीय मंडळाचे सेक्रेटरी एस.गोपालन यांना कायदेशीर तरतूद जाणून घेण्यासाठी एक चिठ्ठी पाठवली. त्याचं चिठ्ठीवर गोपालन यांनी 'गिरिधर गोमांग हे मतदान करू शकतात, पण त्यांनी आपल्या सद्सद् विवेक बुद्धीनं ज्यांना द्यायचंय त्यांना ते मत देऊ शकतात. त्यांच्यावर कोणतीच बंधनं असणार नाहीत, मग ते कोणत्याही पक्षाचे सदस्य असोत...!' असं रुलींग दिलं. स्पीकर बालयोगी यांनी इथं एक इतिहास नोंदवला की, 'एक मुख्यमंत्री देशातलं सरकार राहणार की, जाणार यासाठी मतदान करायला लोकसभेमध्ये आला..!' गोमांग यांनी मत दिलं आणि त्या एका मतानं अटलजींचं सरकार गडगडलं! २६९ मतं अटलजीना मिळाली आणि २७० मतं ही विरोधात पडली. गिरीधर गोमांगना मताधिकार दिलं नसता तर समसमान मतं झाली असती तर अन् बालयोगी यांना कास्टिंग व्होट करावं लागलं असतं. मग तेलुगु देशमची भूमिकाही स्पष्ट झाली असती. तशीच परिस्थिती चंद्राबाबूना आताही आणायचीय का? कारण चंद्राबाबूनी स्पीकरपदासाठी आग्रह धरलेलाय. मोदी सरकारला याची जाणीव आहे की, अटलजींच्या सरकारला केवळ बहुमत सिद्ध करण्यासाठी स्पीकरची गरज पडली होती. इथं मात्र तशी स्थिती नाहीये. राजकीय कटुता आज एवढी वाढलेलीय की, कधी त्यातून काही वेगळं निष्पन्न होईल आणि सरकार धोक्यात येईल! ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन राजनाथसिंग यांनी आपल्या घरी एनडीएची बैठक बोलावली. जे.पी.नड्डा, किरण रिजुजू, चिराग पासवान, जेडीयूचे लल्लन सिंह पोहोचले पण तेलुगु देशमचं कुणी गेलंच नाही. चंद्राबाबूना मोदी आणि शहांबाबत पूर्वी कटुता आणि राग होता. म्हणून समझौता करण्याचं काम राजनाथसिंग यांच्याकडं सोपवलं गेलं. इथं सर्वसंमत भाजपचा स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर निवडावा यावर चर्चा होती. भाजप दुसऱ्या कोणत्याही पक्षाला ती पदं  द्यायला तयार नाही. डेप्युटी स्पीकरसाठी आंध्रप्रदेश भाजपच्या अध्यक्षा डी.पुरंदरेश्वरी ज्या चंद्राबाबू यांची मेहुणी आणि एनटीआर यांच्या कन्या आहेत. त्यांना निश्चित केल्याचं समजतंय. चंद्राबाबूनी आपले सासरे एन.टी.रामाराव यांची सत्ता उलथवून हस्तगत केली होती तेव्हा त्या चंद्राबाबूसोबत होत्या. म्हणजे डी. पुरंदरेश्वरी यांच्याबाबत चंद्राबाबू यांचा 'सॉफ्ट कॉर्नर' असेल, ते विरोध करणार नाहीत. मात्र यावर चंद्राबाबूनी मौन बाळगलंय. राजकीय पेच इथंही दिसतो. पुरंदरेश्वरी या २००४ मध्ये काँग्रेसच्या खासदार, त्यानंतर २००९ मध्ये ते मनमोहनसिंग सरकारात ह्युमन रिसोर्स खात्याच्या राज्यमंत्री. त्यानंतर कॉमर्स आणि इंडस्ट्रीज खात्याच्या राज्यमंत्री होत्या. २०१४ मध्ये त्या भाजपत गेल्या आता भाजपच्या खासदार आहेत! 
राजकारण कसं असतं बघा, ज्या चंद्राबाबूना भाजपनं सतत विरोध केला. त्याच चंद्राबाबूची मनधरणी करावी लागतेय. इथं तेलुगु देशम आणि जेडीयू यांची भूमिका महत्वाची ठरणारंय. भाजप आणि मोदींना मतदारांनी सत्तेपासून रोखलेलंय. मोदींच्या २२-२३ वर्षाच्या राजकीय जीवनात कधीच आघाडी सरकार चालवण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. त्यांनी सतत बहुमतातल्या सरकारचं नेतृत्व केलेलंय. प्रथमच ते अल्पमतात आलेत. त्यांना सत्तेसाठी छोट्या छोट्या पक्षांची मनधरणी करावी लागतेय. हा त्यांचा राजकीय पराभव समजायला हवा. भाजपनं ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढवलीय, त्याच मुद्द्यांवर चंद्राबाबू निवडणूक लढवताना संघराज्यांचा प्रश्नही मांडत राहिले. सीएनआरसीबाबतही प्रश्न उपस्थित केला. मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत आग्रही आहेत. हे सारे मुद्दे भाजपच्या विरोधातले आहेत. नितीशकुमार बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. याशिवाय भाजप आपल्यासोबत घेणाऱ्या मित्रपक्षांना संपवण्याचा विचार करत असते, हेही त्यांना जाचक ठरतेय. शिवाय बेरोजगारी, महागाई, यासारखे ज्वलंत विषय आहेतच. नितीशकुमार आणि चंद्राबाबू हे जाणून आहेत की, नवं सरकार अस्तित्वात आलंय आणि त्या सरकारात ते सारे मंत्री गेल्या पाच वर्षात अपयशी ठरले असतानाही त्यांना पुन्हा तीच खाती दिली गेलीत. त्यात कोणताही बदल केलेला नाही याचा अर्थच असा होतो की, भाजप आणि मोदी आपली कार्यशैली बदलण्याच्या मानसिकतेत नाहीयेत. भाजप जर आपल्या पूर्वीच्याच पद्धतीनं राज्य चालवणार असेल तर मित्रपक्षांसमोर संदेह उपस्थित होतोय. आंध्रप्रदेशात विधानसभा निवडणुका झालेल्यात, तिथं चंद्राबाबूना सत्ता मिळालीय. तिथं भाजपची गरज उरलेली नाहीये. नितीशकुमार यांच्या बिहारात निवडणुका वर्षभरात आहेत. पण विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेण्यासाठी नितीशकुमार आग्रही आहेत. आज मोदींनी जसं जुन्या सहकारी मंत्र्यांना त्यांच्याकडं असलेली जुनीच खाती दिलीत. त्यावरून स्पीकरपदी देखील ओम बिर्लाच राहतील असा अंदाज व्यक्त होतोय. बिर्ला हे मोदींच्या मागच्या कार्यकाळात स्पीकर होते. त्यापदाची ताकद काय असते हे ते चांगलंच जाणतात. आपल्या कार्यकाळात त्यांनी सरकारला पाठीशी घालण्याचे अनेकवेळा प्रयत्न केले. त्यांना पूरक भूमिका घेतलीय आणि विरोधकांना दाबून टाकलं होतं. प्रसंगी माईक आणि चित्रणही बंद केलं होतं. म्हणून मोदी स्पीकर बदलू इच्छित नाहीत असं दिसतं. कारण त्यांना तोच कारभार पुढं सुरू ठेवायचाय. मागील लोकसभेत राहुल गांधींनी उद्योजक अदानी आणि मोदी यांचे संबंध काय आहेत यावर प्रश्न केले होते. ते सतत सांगत होते की, 'देशातल्या मूलभूत सुविधा विमानतळं, बंदरं अगदी रेल्वे, पॉवर सेक्टर, वेअर हाऊसेस, सगळं काही अदानीना दिलंय म्हणजे त्यांच्यात काहीतरी नातं असलं पाहिजे...!'  स्पीकर लोकसभेतली भाषणं थांबवू शकत नव्हते. मात्र ती भाषणं कुणीच पाहू नये, वाचू नये, अशी व्यवस्था तर ते करू शकतात. बिर्ला यांनी तेच केलं. राहुलच्या भाषणात जिथं जिथं अदानी आणि मोदी यांच्या संबंधाबाबत उल्लेख होता तो सारा मजकूर लोकसभेच्या वृतांतातून मिटवून टाकला. राहुल यांच्या भाषणातला ४०% भाग काढून टाकला. लोकसभेच्या ग्रंथालयात राहुल यांचं ते वक्तव्य कुणालाच सापडणार नाही. ही झाली स्पीकरची पहिली ताकद! दुसरी ताकद, २०२३ डिसेंबर महिन्यात एकाचवेळी ७८ विरोधी खासदारांना निलंबित केलं. जे भाजपला अडचणीत आणत होते. कार्पोरेटसना दिल्या जाणाऱ्या सवलतीसंदर्भात, १६ लाख कोटीचे बँककर्ज  माफ केले, ईडीच्या कारवाया बहुसंख्यांनं विरोधकांवर केल्या जाताहेत, देशाचा कारभार हुकुमशाही पद्धतीनं करत संघराज्याची चौकट मोडून टाकली जातेय. असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. एकाचवेळी एवढ्या मोठ्यासंख्येनं खासदार निलंबित करण्याची ताकद स्पीकरमध्येच असते ते बिर्लांनी दाखवून दिलं. तीन कृषी कायदे आणताना अशी विधेयक कोणत्या प्रकारात लोकसभेत मांडायचं हे स्पीकर ठरवत असतात. कृषी कायदे मंजूर करताना मनी बिल मांडताना मतदान होत नाही. म्हणून तीन कृषी कायदे हे मनी बिलमध्ये सादर केलं गेलं. हेच बिल राज्यसभेत आलं तेव्हा गोंधळ झाला आणि त्या गोंधळातच बिल मंजूर केलं गेलं. म्हणजे स्पीकर ची ताकद काय असते हे त्यांनी दाखवून दिलं.
८ जुलै २००८ मध्ये सोमनाथ चटर्जी हे स्पीकर होते. त्यावेळी डाव्यांनी अण्वस्त्र कराराच्या मुद्द्यांवरून सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. तेव्हा डाव्यांनी चॅटर्जी यांना राजीनामा द्यायला सांगितलं. पण चटर्जी यांनी पक्षाचा आदेश धुडकावून लावला. तेव्हा ते म्हणाले होते. 'मी स्पीकर आहे. मी आता कोणत्याच पक्षाचा सदस्य नाही. सारे माझ्यासाठी समान आहेत...!'  तुम्हाला आठवत असेल की, तेव्हा संसदेत नोटांची बंडलं फडकवली गेली. त्यावर अविश्वासाच्या प्रस्ताव दाखल झाला. त्यावर मतदान घेण्याचा आग्रह संसदेत धरला गेला. मतदान झालं. अन् तो प्रस्ताव फेटाळला गेला. मनमोहन सरकारं बचावलं. स्पीकरचा अधिकार, ताकद काय असते याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळं अल्पमतात असलेलं सरकार हे भाजपचं न म्हणता ते आता एनडीएचं सरकार असं संबोधताहेत. असं असलं तरी एनडीएतल्या पक्षांना भीती आहे की, आपला पक्ष फोडून भाजप २७२ चा आकडा कधीही गाठू शकते. त्यासाठी स्पीकरची गरज असते. पक्षांची होणारी तोडफोड कशाप्रकारे अंमलात आणायची हे स्पीकर ठरवित असतो. स्पीकरची इच्छा असेल तर ह्या पक्षांची तोडफोड रोखू शकतो, वा त्याला संमती देऊ शकतो. संसदेत स्पीकरच सर्वेसर्वा असतात. ओम बिर्ला स्पीकर म्हणून कसे वागले हे आपल्या समोर आहेच. मग आता तुमच्या लक्षात येईल की स्पीकरपद कुणासाठी महत्वाचं आहे. ज्यावेळी भाजप २४० संख्येवर अडकलीय. हे चंद्राबाबू जाणतात. अटलजींच्या सरकारचा अनुभव त्यांच्याकडे आहेच. संसदेत आणि बाहेर राजकारण साधायचं असेल तर स्पीकर आपलाच असायला हवा. २६ जून ही तारीख यासाठी निश्चित केलीय. ४ जून नंतर संसदेच कामकाज सुरू होईपर्यंत कार्पोरेटवर्ल्डसाठी कोणताच निर्णय सरकारनं घेतलेला नाही. ईडीनं कुठंच छापा मारलेला नाहीये. कोणत्याही राजकारण्यांना पकडलेलं नाहीये. इंडिया आघाडीनं जी आश्वासनं दिली आहेत, ३० लाख तरुणांना नोकऱ्या, गरीब महिलांना वार्षिक १ लाख रुपये, उत्पादन मूल्य आधारित शेतीमालालाचा कायदा. बेरोजगारांना नोकऱ्या. या साऱ्या बाबी गैरलागू झाल्यात. कारण सरकार त्यांचंच बनलंय ज्यांना पराभूत करण्यासाठी जनता पहिल्यांदा ईव्हीएमपर्यंत पोहोचली होती. सरकारला आता बहुमत गाठायचंय आणि स्पीकरची निवड करायचीय. स्पीकरची निवड करण्याच्या मार्गात चंद्राबाबू, नितीशकुमार आहेत तर दुसरीकडं इंडिया आघाडी उभीय. त्यातून दिसून येईल की, लोकांसोबत कोण आहेत. स्पीकर जर भाजपचा होत असेल तर चंद्राबाबू आणि नितीशकुमार भाजपच्या पाठीशी आहेत. डेप्युटी स्पीकरही भाजपचाच होणार असेल तर हे दोघे भाजपसमोर झुकलेत. किंवा मोठी सौदेबाजी झालीय, असा त्याचा अर्थ असेल. इंडिया आघाडी संसदेत आणि संसदेबाहेर कशाप्रकारे हा मुद्दा हाती घेईल. ४ जून नंतर इंडिया आघाडीनं शेअर बाजारातला ३० लाख रुपयांचा घोटाळा, त्यात पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री यांची भूमिका, एक्झिट पोलचां गोंधळ, काश्मीरमधली परिस्थिती ज्यानं सरकारला बैठक घ्यावी लागली. संघराज्याची चौकट मोडीत काढणं, ईडी, सीबीआय, आयटीच्या माध्यमातून धमकावून इतर पक्षातल्या खासदारांना आपल्याकडं वळवणं. अजित पवार, एकनाथ शिंदे काहीही मतप्रदर्शन करत असले तरी त्यावर मौन धारण करणं. योगी आदित्य यांच्याबाबत ही मौन धारण केलंय. हरियाणात जे पराभूत झालेत त्यांच्या भावना ही तीव्र बनल्या आहेत. या आणि अशा घटनांबाबत दिल्लीतली भाजप मात्र खामोश आहे. २०१४ ला डेप्युटी स्पीकर एआयडीएमकेचे थंबी दुराई यांना बनवलं होतं कारण ते सहकारी पक्षाचे सदस्य होते. २०१९ मध्ये डेप्युटी स्पीकर नेमलाच नाही. पण २०२४ आताची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. भाजप आपल्या संख्याबळावर सत्तेत नाहीये. संसद जसजसं आकाराला येईल तसतसं स्थिती स्पष्ट होईल. आज प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची देहबोली पाहिली तर आपल्याला लक्षांत येईल की, २०१९ ची सत्ता आणि २०२४ ची सत्ता यात किती मोठं अंतर पडलंय...!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 15 June 2024

चंद्राबाबू : किंग आणि किंगमेकर...!


"राजकारण हे अशाश्वत असतं असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती सध्या येतेय. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू आणि तेलुगु देशम पक्ष संपलाय. अशी टीका होत असतानाच त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेतलीय. लोकसभेच्या १६ जागा जिंकून राष्ट्रीय राजकारणात, दिल्लीत *किंगमेकर* म्हणून तर आंध्र प्रदेशात १३५ जागा जिंकून राज्यात *किंग* म्हणून चंद्राबाबू उदयाला आलेत. ४०० पार चा नारा देणाऱ्या पण २४० वर थांबलेल्या भाजपला सत्तेपर्यंत न्यायला हेच चंद्राबाबू सहाय्यभूत ठरलेत. तर सर्वशक्तिशाली जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशात चारी मुंड्या चीत करून तिथली सत्ता जनसेनेच्या अभिनेते 'पॉवर स्टार' पवन कल्याण यांच्या साथीनं हस्तगत केलीय. कधी नायक कधी खलनायकाच्या चक्रातले चंद्राबाबू आता नायक बनलेत तर जगनमोहन रेड्डी हे खलनायक...!"

-------------------------------------------------------
*दा* क्षिणात्य चित्रपटांच्या कथा वेगळ्या असल्या तरी त्यातला मूळ गाभा हा त्यातला नायक असतो. हा नायक आधी शेळपट असतो मग तो अचानक वाघ होतो आणि खलनायकाचा नायनाट करतो असं दाखवण्यात येतं. दक्षिणेकडची राज्ये नायकांना डोक्यावर उचलून घेतात, मग तो चित्रपटातला असो अथवा राजकारणातला...! कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये अभिनयाकडून राजकारणाकडं वळलेल्या आणि यशस्वी झालेल्यांची संख्या बरीच मोठी आहे. तमिळ अभिनेते एम.जी.रामचंद्रन, अभिनेत्री जयललिता, तेलुगू अभिनेते एन.टी.रामाराव या सारख्या कलाकारांना सिनेसृष्टीत मिळालेल्या अपार यशानंतर राजकारणी म्हणूनही जनतेचं अपार प्रेमही मिळालं. या तिघांनी आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय. या सगळ्यांचा जीवनप्रवास पाहिला तर या सगळ्यांचं खासगी जीवन हे प्रचंड वादग्रस्त होतं आणि त्यांना कधी नायकाचं रुपक देण्यात आलं तर कधी खलनायकाचं...! या तिघांनाही राजकीय कट कारस्थानं करणाऱ्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी या तिघांचे स्वभावही कारणीभूत ठरलंय. एन.टी.रामाराव यांच्याबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्या जावयानंच त्यांच्याविरोधात कट रचला आणि त्यांच्या हातून सत्ता खेचून घेतली. मात्र एनटी रामाराव हे त्यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वतीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. चित्रपटात जसं दाखवतात तसं एनटीआर यांनी जाहीर सभेत मंचावरून लक्ष्मी पार्वती यांना लग्नासाठी साद घातली होती. लक्ष्मी पार्वती या गर्दीतून वाट काढत मंचाकडं झेपावल्या. मंचावरच एनटीआर हे लक्ष्मी पार्वती यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार होते. हा प्रसंग हजारो, लाखों लोकं पाहात होती. एनटीआर यांनी मंगळसूत्र बांधण्यासाठी हात पुढे केले, त्यांच्या समोर लक्ष्मी पार्वती उभ्याही होत्या आणि तेवढ्यात अचानक लाईट गेले. मात्र ते गेले नव्हते तर घालवण्यात आले होते. लाईट गेल्यामुळे लक्ष्मीपार्वती यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं गेलं अथवा नाही हे जनतेला कळलंच नाही. ज्या व्यक्तीनं लाईट घालवले, असं म्हणतात त्या व्यक्तीनं मग १२ जून २०२४ रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा शपथ घेतलीय. एनटीआर यांचे जावई, तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी एनटीआर यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हाताखालून अशरक्ष: खेचून घेतला होता. लक्ष्मीपार्वती यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एनटीआर यांना आपली मुलं आणि घरातल्या इतर व्यक्तीही आपल्या विरोधात गेल्याचं कळलंही नाही. एनटीआर यांचं आपल्या कुटुंबाकडं विशेष लक्ष नसायचं. ते अत्यंत हेकेखोर स्वरुपाचे बनले होते. ते कमालीचे संशयीही होते, शिवाय कोणावरही ते पटकन विश्वास ठेवायचे नाहीत. त्यांना लक्ष्मीपार्वती यांच्यावर प्रेम जडल्यानंतर तिच्याशिवाय काही दिसेनासं झालं होतं. ही सगळी परिस्थिती लांबून चंद्राबाबू पाहात होते. एन.टी. रामाराव यांचे निधन झाल्यानंतर चंद्राबाबू यांनी आपलं स्थान आणखी मजबूत, बळकट केलं. आंध्र प्रदेशला हायटेक करणारे, सायबर सिटी निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणून नायडूंचा सर्वत्र नावलौकीक झाला होता. 
आठ महिन्यांपूर्वी, जेव्हा चंद्राबाबू नायडू तुरुंगात गेले, तेव्हा असं दिसलं की ७४ वर्षीय राजकारणी आणि त्यांचा तेलुगू देशम पक्ष - टीडीपी हा कायमचा सत्तेबाहेर गेलाय; जणू त्यांचं अस्तित्वच संपलंय. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे चंद्राबाबू आणि त्यांचा तेलुगु देशम पक्ष राखेतून पुन्हा उसळी घेत सत्तेवर पोहोचलाय. त्यामुळं राजकारण्याला कधीही कमी लेखू नका. आंध्र प्रदेश निवडणुकीतला हा सर्वात मोठा धडा आहे. वृद्ध ज्येष्ठ राजकारण्याला ५२ दिवसांसाठी तुरुंगात पाठवलं गेलं तेव्हा त्याच्यावर अनेक खटले अन् दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागला. त्यावेळी, सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे वरवर कल्याणकारी योजनांच्या पाठीशी असल्याचं आणि आता आपण अजिंक्य असल्याचं दाखवत होते. दुसरीकडं चंद्राबाबू, त्यांचा मुलगा लोकेश आणि पत्नी भुवनेश्वरी यांच्या तुरुंगवासाचं रुपांतर सहानुभूतीच्या मतांमध्ये झाल्याचं यावेळी दिसलं. चंद्राबाबू यांच्यासाठी, २०१९ मधला पराभव हा त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर पडलेला पडदा पडला असेल असं म्हटलं गेलं. तथापि, चतुर राजकारण्यानं, जसं त्याचं अनेकदा वर्णन केलं जातं, त्यांनी अत्यंत शांतपणे संयम बाळगून, जनसेना आणि भाजपशी युती करून राज्यात पुनरागमन केलंय. हा त्यांचा टर्निंग पॉइंट जवळजवळ सिनेमॅटिक आहे. जेव्हा चंद्राबाबूची राजमुंद्री तुरुंगात जाऊन ॲक्शन हिरो 'पॉवर स्टार' पवन कल्याण यांनी भेट घेतली आणि नाटकीयपणे जाहीर केलं की, ते आणि त्याचा राजकीय पक्ष जनसेना चंद्राबाबूसोबत निवडणूक लढवतील आणि जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचा पराभव करतील. इथून राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. पवन कल्याण यांनी जणू या टीडीपी नेत्याला जीवनदान दिलं. पवन कल्याणलाही राजकीय दृष्ट्या तरंगत राहाणं ही मजबुरी होती. भाजपच्या पाठिंब्यानं टीडीपीला सामावून घेण्याचा आणि राजकीय पोकळी भरून काढण्याचा पर्याय त्यांच्याकडं होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा टीका केल्यामुळे नायडू दिल्लीतल्या भाजप नेत्यांमध्ये अप्रिय होते त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अढी होती. हे पवन कल्याण यांना ठाऊक होतं. २००२ मध्ये जेव्हा गोध्रा दंगलीनंतर चंद्राबाबू यांनी मोदी यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. २०१८ मध्ये, जेव्हा चंद्राबाबू यांनी आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा न दिल्याबद्दल नरेंद्र मोदींना दोष देत एनडीए सोडली होती. दरम्यानच्या काळात चंद्राबाबू यांनी अनेकदा मोदींवर टीकास्त्र चालवलेलं होतं. त्यांच्यावर व्यक्तिगत हल्लेही केले होते. भाजपला दक्षिणेकडे कूच करायची असल्यानं त्यांनी सारं काही गिळून आणि पवन कल्याण यांच्या सततच्या प्रयत्नांमुळेच चंद्राबाबू यांना पुन्हा एकदा एनडीएमध्ये स्थान मिळणं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत उभं राहणं शक्य झालं. पवन कल्याण यांनी कबूल केलंय की, आपल्या पक्षाला त्याग कराव्या लागलेल्या जागांच्या किंमतीवर ही युती झाली, चंद्राबाबू नायडूंना माहित होतं की युतीच्या रसायनशास्त्रासमोर दोन्ही पक्षांमधल्या मतांचं हस्तांतरण करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. आंध्र प्रदेशात कमी मतं असलेल्या भाजपला असं काहीतरी होणं अत्यंत आवश्यक होतं. आपल्याकडं मराठा आणि माळी समाजाचं प्राबल्य आहे अगदी तशाच प्रकारे आंध्र प्रदेशात कापू आणि कम्मा या समाजाचं अस्तित्व आहे. त्यांच्यातल्या राजकीय शत्रुत्वासाठी नेहमी बोललं जातं. टीडीपीकडं कम्मांचा पक्ष म्हणून पाहिलं जातं आणि गेल्या काही वर्षांत ही छाप अधिकच वाढली. विरोधी पक्ष, वायएसआर यांनी आरोप केले आहेत की, टीडीपी सरकार कम्मा समाजाच्या अधिकाऱ्यांना केवळ पक्षाच्या जवळ असल्यानं त्यांना महत्त्वाच्या पदांवर बढती देत ​​होती. अशा परिस्थितीत आरक्षणासाठी संघर्ष करणारे कापू नेते टीडीपीकडे संशयानं पाहू लागले. जनसेना पक्षानं निवडणूक लढवण्याची घोषणा करेपर्यंत कापू समाजासाठी वायएसआर काँग्रेस हा पर्याय होता. पण राज्य आणि सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी संख्यात्मकदृष्ट्या मजबूत समुदाय दलित आणि कापू म्हणजे शेतकरी समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. आंध्र प्रदेशात दलित लोकसंख्येच्या जवळपास १७ टक्के आणि कापू २० टक्के आहेत. पवन कल्याण हे याचं कापू समाजाचे असल्यानं आणि चंद्राबाबू हे कम्मा आहेत या दोघांच्या युतीमुळे मतं एकत्रित झाली आणि आंध्र प्रदेशात त्यांची सत्ता येऊ शकली.
चंद्राबाबू नायडू यांनी आपली राजकीय कारकीर्द तरुण असतानाच काँग्रेसमधून सुरू केली, अगदी १९७५-७७ च्या आणीबाणीच्या काळात भारतीय युवक काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी संजय गांधींना पाठिंबा दिला होता. ते २८ व्या वर्षी सर्वात तरुण आमदार आणि १९८० मध्ये टी.अंजय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्री बनले. दरम्यान नायडू यांचे एनटी रामाराव यांची मुलगी भुवनेश्वरीशी लग्न झाल्यानं त्यांना एनटीआर यांनी तेलुगू देशम पक्षात आणलं. ऑगस्ट १९८४ मध्ये नादेंडला भास्कर राव यांनी केलेल्या बंडाचा पराभव करण्यात मदत करून त्यांनी सासऱ्यांचा विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर ११ वर्षांनंतर, चंद्राबाबू नायडू यांनी स्वत: त्यांचे सासरे एनटीआर यांच्या विरोधात बंड घडवून आणलं आणि त्यांना पदच्युत करून पक्ष आणि राजकीय सत्ता हाती घेतली. ४५ व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर २००४ पर्यंत दोन टर्म त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्या काळात चंद्राबाबू नायडू यांनी एक 'आर्थिक सुधारक' राजकारणी म्हणून 'ब्रँड नायडू' तयार केलं. त्यांनी ब्रँड हैदराबादला जगाच्या आयटी नकाशावर आणलं आणि प्रशासन सुव्यवस्थित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेतल्याबद्दल आंध्र प्रदेशच्या सीईओचा मानही मिळवला. राष्ट्रीय राजकारणात चंद्राबाबू नायडू यांची भूमिका प्रथम एच.डी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालच्या युनायटेड फ्रंटचे संयोजक आणि नंतर आय.के. गुजराल यांच्या कार्यकाळात होती. १९९९ मध्ये टीडीपी आपल्या २९ खासदारांसह एनडीए मध्ये दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. नायडू १० वर्षांनंतर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परतलेत, आंध्र प्रदेशचे आता विभाजन झालं आणि राजधानी हैदराबाद गमावल्यामुळे लोकांची मनं खूप दुखावली होती. भाजप आणि पवन कल्याण यांच्या पाठिंब्याशिवाय २०१४ मध्ये आपण जिंकू शकत नाही हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्यांनी ते घडवून आणण्यासाठी दोघांशी संपर्क साधला. २०१८ मध्ये, तथापि, पुन्हा एकदा भाजपशी विभक्त झाल्यानंतर, चंद्राबाबू नायडू यांना २०१९ मध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावं लागलं, त्यांनी फक्त २३ विधानसभा आणि तीन लोकसभेच्या जागा जिंकल्या. त्यांच्या पक्षाचं आतापर्यंतचं सर्वात वाईट प्रदर्शन त्यावेळी झालं होतं. परंतु चंद्राबाबू नायडू यांनी सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आपली राजकीय बुद्धिमत्ता आणि लवचिकता वापरून एक उल्लेखनीय पुनरागमन आता केलंय. निवडणूक निकालांनी चंद्राबाबू नायडू यांना पुन्हा एकदा संयुक्त आघाडीचं संयोजक या नात्यानं किंगमेकरची भूमिका बजावण्याची संधी दिलीय. काहींच्या मते, वाटाघाटी करण्याची आणि पंतप्रधान होण्याची ही त्यांची सर्वोत्तम संधीही इंडिया आघाडीकडून असू शकते. पण ते तसं करणार नाहीत, असं त्याच्या जवळचे लोक सांगतात. नायडू यांना अनेकदा राजकीय संधिसाधू असं संबोधण्यात आलंय. त्यांच्याकडून मित्रपक्षांवर विश्वास निर्माण केला जात नाही, कारण ते युती आणि मैत्रीत राजकीय जुगार पाहतात. मात्र नायडू यांना आता विश्वासार्ह सहकारी असल्याचं सिद्ध करण्याची ही संधी आहे.
वाय.एस.राजशेखर रेड्डी यांचा मुलगा आणि वायएसआर काँग्रेसचा प्रमुख, तरुण नेता जगनमोहन रेड्डी याला बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात डांबण्यात आलं. आपला राजकीय प्रतिस्पर्धी संपवण्यासाठी नायडूंनी ही खेळी रचल्याचा आरोप तेव्हा केला गेला होता. १६ महिन्यानंतर जगनमोहन जामिनावर तुरुंगाबाहेर आले. त्यानंतर त्यांनी पदयात्रा काढत संपूर्ण आंध्र प्रदेश पिंजून काढला आणि नायडूंच्याविरोधात रान उठवलं. परिणामी टीडीपीचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होताच त्यांनी त्याचा वचपा काढला. नायडूंच्यामागे हात धुवून लागले. प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर टीकाटिपण्णी, निंदानालस्ती ते करत होते. ज्या पद्धतीनं नायडूंनी जगन यांना तुरुंगात पाठवलं त्याच पद्धतीनं जगन यांनी नायडूंना तुरुंगात डांबलं. ५२ दिवस नायडू तुरुंगात होते. कौशल्य विकास योजनेत घोटाळा केल्याचा नायडूंवर आरोप करण्यात आला. तुरुंगात जाण्यापूर्वी आणि नंतर नायडू यांच्यावर वायएसआर पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी बेफाम आरोप केले. नायडूंच्या कुटुंबियांवरही आरोप करण्यात आले. हे सगळं पाहिल्यानंतर संतापलेल्या आणि अपमानित झालेल्या नायडूंना आंध्र प्रदेशच्या विधानसभेत अश्रू अनावर झाले. त्यांनी अश्रूंना आवर घालत जाहीर शपथ घेतली होती की 'जोपर्यंत मी पुन्हा सत्ता मिळवत नाही तोपर्यंत या सदनात पाय ठेवणार नाही...!'  अशी काहीशी परिस्थिती नायडूंच्या पक्षानं जगन यांच्यावरही आणली होती. टीडीपी सत्तेत असताना त्यांच्या नेत्यांनी विधानसभेत जगन यांच्यावर इतके जबरदस्त हल्ले आणि आरोप केले की जगन सदनातून निघून गेले. ते परतले ते थेट मुख्यमंत्री बनूनच. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्राबाबू विरोधात १० गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा नारा लोकेश विरोधात १६ गुन्हे दाखल करण्यात आले. नायडूंचं कार्यालय बुलडोझर लावून भुईसपाट करण्यात आलं. २०१९ मध्ये सत्तेवर आल्यानंतर जगन यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे नायडूंनी बांधलेलं कॉन्फरन्स हॉल, प्रजा वेदिका पाडणे. त्यात मुख्यमंत्र्यांना नायडूंचं कार्य आणि वारसा पुसून टाकण्याचं वेड लागलेलं दाखवलं. नायडू सत्तेवर असताना ज्या कंपन्यांनी आंध्र प्रदेश सरकारच्या विविध विभागांसाठी काम केलं होतं, त्यांचं काम नवीन शासनाशी एकनिष्ठ असलेल्या नोकरशहांद्वारे खराब होत असल्याचं आढळलं आणि बिलं मंजूर झाली नाहीत. जगन विसरले की सरकार म्हणजे सत्ता कोणाचीही असली तरी एक अखंड अस्तित्व असतं. टीडीपी मुख्यालयावर कारवाई करण्यात आली. यामुळं नायडू हादरले, मात्र त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही. दाक्षिणात्य चित्रपटात कधी शेळी असणारा नायक अचानक वाघ होतो, तशीच परिस्थिती आंध्रच्या राजकारणात पाहायला मिळाली. तुरुंगात गेलेले नायडू हे शेळी म्हणून आत गेले, मात्र बाहेर येताना ते वाघ बनले. आता पवन कल्याण यांच्या जनसेनासोबत हातमिळवणी करत नायडूंनी आंध्र प्रदेशात चमत्कार घडवलाय. टीडीपीनं मित्रपक्षांसोबत मिळून १७५ पैकी १६४ जागांवर विजय मिळवलाय. कधी नायक तर कधी खलनायकाच्या चक्रातले चंद्राबाबू आता नायक बनलेत तर जगनमोहन रेड्डी हे खलनायक!. 
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Sunday 9 June 2024

सत्तारोहणाचा 'अग्निपथ....!'

"भारतीय मतदारांनी लोकशाहीतल्या 'आघाडी सरकार'च पुनरागमन घडवून आणलंय. नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड रालोआनं केलीय. गेली दहावर्षे एखाद्या 'रिंगमास्टर'सारखी हंटरच्या तालावर सत्ता राबविणाऱ्या मोदींना प्रथमच दोन जुन्या, अनुभवी, सत्ताग्रही 'किंगमेकर'ना सोबत घेऊन सत्ता राबवावी लागणारंय. सत्ताकारणात जनतेला गृहित धरणं आणि मनमानी पद्धतीनं कारभार करणं याला जनतेनं नाकारल्याच दिसून आलंय. आगामी काळ हा सत्तासंघर्षातल्या कुरघोड्यांचा असू शकतो. या दोन्ही 'किंगमेकर' नेत्यांचा अनुभव अटलजींच्या सरकारनं घेतलेलाय. ते मोदींसोबत सत्तेत राहतील की, बाहेरून पाठिंबा देतील? त्यामुळं नव्या सत्ताकारणाच्या सारीपटावरची त्यांची तिरकी चाल मोदींना कितपत आपल्या तालावर कारभार करू देतील हा प्रश्नच आहे!"
-------------------------------------------------------
*आ*ज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अस्तित्वात येईल. रालोआच्या नेतेपदी भाजपच्या नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आलीय. शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रपतींना सतास्थापनेचं पत्र आघाडीनं दिल्यानंतर राष्ट्रपतींनी मोदींना आज शपथविधीसाठी पाचारण केलंय. रालोआच्या सर्व नेत्यांची बैठक शुक्रवारी झाली. त्यांनी एकमताने मोदींना नेतेपदी निवडलं. मात्र भाजपनं नवनिर्वाचित सदस्यांची कोणतीही बैठक घेऊन मोदींची निवड केलेली नाही. तरीही त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांना नेहमीप्रमाणे गृहीत धरूनच रालोआच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजपला गेल्या दोन वेळेप्रमाणे स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यांना २४० जागा मिळाल्यात. त्यामुळं भाजपला रालोआतल्या पक्षांची मदत घ्यावी लागलीय. त्यात तेलुगु देशमचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे नितीशकुमार या कसलेल्या जुन्या जाणत्या आणि आपली किंमत वसूल करण्यात माहीर असलेल्यांचा पाठींबा घ्यावा लागलेलाय. लोकसभा निवडणुकीत लोकांनी एक आगळा निकाल दिलाय; सर्वाधिक २४० + ५१ जागा मिळूनही ‘एनडीए’पेक्षा अधिक उत्साह काँग्रेसच्या ९९ सह २३४ जागा मिळालेल्या ‘इंडिया’ आघाडीत विशेष उत्साह दिसत होता. सत्ता ‘एनडीए’ची येतेय, मोदीं तिसऱ्यांदा पंतप्रधान होताहेत; मात्र त्यांच्या नेतृत्वाची चमक फिकी पाडणारा हा निकाल आहे. 'मोदी ब्रॅंड'ला बसलेला धक्का मोठा आहे. इंडिया आघाडी आणि काॅंग्रेसला मिळालेली उभारी हा सातत्यानं राष्ट्रीय राजकारणात अवहेलनेचे धनी झालेल्या राहुल गांधी यांना दिलासा आहे. मोदींना पहिल्यांदाच बहुमत नसताना राज्य करायची वेळ आलीय. ती मोठी कसरत असेल. आपल्याला 'परमेश्वरानंच पाठवल्याच्या भ्रमा'तून बाहेर पडून घटक पक्षांना सांभाळून घेण्याचे कौशल्य त्यांना दाखवावं लागणारंय. मतदारांनी असा निकाल दिलाय की, भाजप समर्थकांच्या मनातले मोठे निर्णय घेताना आता दहावेळा विचार करावा लागेल. देशात आघाडीपर्व दशकानंतर येतेय, हा या निवडणुकीचा आणखी एक संकेत! तो पंचायत ते संसद आपलीच सत्ता पाहिजे, असे वाटणाऱ्यांसाठी मोठं आव्हान देणारा ठरलाय. पंतप्रधानांची लोकप्रियता, प्रतिमानिर्मिती आणि प्रतिमाभंजनाचं राजकारण यातही भाजप कायमच पुढे असतो. त्याचाही अतिरेकी वापर या निवडणुकीत झाला. तरीही भाजपला साजरा करावा, असा विजय मिळालेला नाही. २०१४ ला मोदींनी तीन दशकांचं आघाडीपर्व संपवलं होतं. त्यामुळं देशातले प्रादेशिक पक्ष आणि नेत्यांच्या केंद्रीय सत्तेच्या राजकारणातले महत्त्व कमी झालं होतं. काही राज्यात पराभव झाला तरी केंद्रात कल कुणीकडे असा प्रश्न असेल तेव्हा सर्वाधिक पाठिंबा कायमच मोदी यांना राहिलाय. यशासारखं दुसरं काहीच नसतं आणि ते सतत मिळायला लागलं की यश कायम आपल्याकडे वस्तीला आलं, असा भ्रम होण्याची शक्यता असते. याच भ्रमाचा वाटा काॅंग्रेस अव्वल स्थानावरून अशक्त होण्यात दिसला होता. हेच भाजपबाबत घडायला सुरुवात झालीय., असं म्हणावं लागेल. मात्र भाजप चाणक्य नीतीच्या नावाखाली आम्ही सांगू ते धोरण, बांधू ते तोरण अशा थाटात वावरत होता. त्यातूनच ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाखाली विरोधकांची बहुमताची सरकारं उलथवणं, इतरांचे पक्ष फोडण आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीसाठी सडकून टीका केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत बसणं, यासारख्या बाबी सत्तेच्या झगमगाटात खपून गेल्या, असं वाटलं तरी लोक ते सारं पाहात होते. त्यावर प्रतिक्रिया लोकांनी मतदानातून दिल्या. दहा वर्षांपूर्वी सुरू झालेलं एकचालुकानुवर्तीत सत्तेच आवर्तन थांबण्याची निर्माण झालेली शक्यता हा सर्वात मोठा परिणाम दिसून आला. आघाडीपर्व संपले आणि ही निवडणूक सोडाच पण २०४७ पर्यंत आम्हीच सत्तेत आहोत, असा जो अविर्भाव आणला जात होता त्यालाही निकालानं धक्का दिलाय.
तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची किमया तेलुगू देशमच्या नारा चंद्राबाबू नायडू यांनी साधलीय. १९९६ ते २००४ या काळात संयुक्त आघाडी आणि नंतर भाजपप्रणीत रालोआचे समन्वयक म्हणून ते ‘किंगमेकर’ होते. २००४ ते २०१४ मधल्या पराभवांमुळे विजनवासातल्या नायडू यांना २०१४ मध्ये सत्तेमुळे बळ मिळालं. पण २०१९ मधला पराभव, त्यानंतर गैरव्यवहारांवरून तुरुंगवारी झाली. पण आता विधानसभेच्या १३५ तर लोकसभेच्या १६ जागा जिंकल्यानं चंद्राबाबूंचे राजकीय वजन राज्यात वाढलंय. केंद्रात बहुमतासाठी कमी खासदार निवडून आल्यानं भाजपची सारी मदार ही मित्रपक्षांवर आहे. तेलुगू देशम रालोआत भाजपनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष. वाजपेयी सरकारात चंद्राबाबूंनी त्याची किंमत पुरेपूर वसूल केली होती. विविध सवलती मिळविल्या होत्या. आंध्रमधला तांदूळ त्यांनी अन्न महामंडळाला खरेदी करण्यास भाग पाडलं होतं. ऊर्जा क्षेत्रात सुधारणा राबविल्या होत्या. हैदराबाद ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. यासाठी  केंद्राकडून भरीव मदत मिळवली होती. त्यामुळं आता चंद्राबाबूंच्या मागण्या वाढणार हे नक्की. पोलावरम प्रकल्प हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याला मोठा निधी लागणार असल्यानं अर्थखात्याबरोबरच जलशक्ती खातं मागितल्याचे समजतंय. तेव्हा सर्वाना बरोबर घेऊन जाणारे वाजपेयी होते आणि आता मोदी पंतप्रधान आहेत! आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी चंद्राबाबू यांनी २०१४ ते १८ या काळात दबावाचे राजकारण करून बघितलं. पण मोदी काही बधले नाहीत. त्यानंतर चंद्राबाबू यांनी मोदींवर अविश्वासाच्या ठराव संसदेत आणला होता. २०१८ मध्ये चंद्राबाबूंनी भाजपची संगत सोडली. तेव्हा भाजपला चंद्राबाबूंची गरज नव्हती. भाजपच्यासाथीनं जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्या नाकीनऊ आणले होते. एका पत्रकार परिषदेत ते ढसाढसा रडलेही होते. पण आता परिस्थिती बदललीय. आंध्रप्रदेशात १७५ सदस्यीय विधानसभेत १३५ आमदार असल्यानं चंद्राबाबूंना कुणाची गरज उरलेली नाही. ना भाजपची ना जनसेनेची. राज्याची सत्ता हाती आहेच, केंद्रात पुन्हा ‘किंगमेकर’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे चंद्राबाबू मोदींना नमवितात की मोदी आपला खाक्या कायम ठेवतात हे आता येणारा काळच सांगेल. चंद्राबाबू हे मोदींच्याजवळ जाण्यास फारसे उत्सुक नव्हते, पण जनसेनेच्या अभिनेते पवन कल्याण यांनी हे सारं जुळवून आणलंय! ते आता सत्तेत सहभागी होताहेत की, बाहेरून पाठिंबा देताहेत हे पाहावं लागेल. कारण त्यांचे चिरंजीव नारा लोकेश यांनी तसं सूतोवाच केलेलंय. ती चंद्रबाबूंची राजकीय रणनीती असू शकते किंवा दबावतंत्र!
२००५ च्या विधानसभा निवडणुकीपासून जेडियुच्या नितीशकुमार यांच्या प्रतिमेभोवती फिरतेय. भाजपच्या अरुण जेटली यांनीच २००५ च्या निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याची कल्पना मांडली आणि ती यशस्वी झाली. त्यानंतर, २००५ ते २०१० दरम्यान बिहारमध्ये बदल घडवून आणत नितीशकुमार यांनी ताकदीनं बळ दिलं. २००५ मध्ये भाजपसोबत आघाडी करून पहिलं सरकार त्यांनी स्थापन केलं. २०१३ मध्ये त्यांनी भाजपशी संबंध तोडण्यास सुरुवात केली आणि जनता दल युनायटेड जेडीयू आणि भाजपची १७ वर्षांची युती तुटली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केल्यानं नाराजी व्यक्त केली होती. अटलजींच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री असताना राजीनामा दिलं होतं. कारण, त्या पदासाठी तेदेखील इच्छुक होते. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक एकट्यानं लढवली. त्यात त्यांना मोठं यश प्राप्त झालं नाही. २०१४ च्या निवडणुकीत पडझडीची जबाबदारी घेत नितीशकुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद सोडलं आणि जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवलं. एकेकाळी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या पाठिंब्यानं ते फ्लोअर टेस्टमध्ये टिकून राहिले. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू, राजद आणि काँग्रेस ‘महागठबंधन’नं विजय मिळवला आणि नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदावर पुन्हा दावा केला. तेव्हा राजदला बहुमत प्राप्त होतं. सीबीआयनं लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर नितीशकुमार यांना प्रतिमेची चिंता होती. त्यांनी २०१७ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुन्हा एनडीएमध्ये जात मुख्यमंत्रिपद पटकावलं. २०२० च्या विधानसभा निवडणुकीतही तेच झालं. बिहारमध्ये भाजप मोठा पक्ष होत असल्याची चिंता नितीशकुमार यांना वाटू लागली. २०२२ मध्ये भाजप आणि जेडीयूची युती पुन्हा तुटली. राजदच्या पाठिंब्यानं त्यांच्या पक्षाला विधानसभेत पुन्हा एकदा बहुमत मिळालं. मुख्यमंत्री बनले पण १८ महिन्यातच त्यांनी राजदची साथसंगत सोडून भाजपची साथ घेत रालोआत प्रवेश केला. लोकसभेच्या निवडणुका भाजपच्या युतीत लढवल्या. त्यांना १२ जागा मिळाल्या आहेत. राज्यसभा उपाध्यक्षपद भाजपनं जेडीयूला दिलं होतं. पण मंत्रिपदाची मागणी करूनही त्यांना मोदींनी वाटाण्याच्या अक्षता दिल्या होत्या. पण आता त्यांच्या परिवर्तन झाल्याचं दिसतं, कारण रालोआच्या बैठकीत वरिष्ठ असतानाही नितीशकुमार मोदींच्या पाया पडताना दिसले. चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांनी काही मागण्या पुढे रेटल्या आहेत. त्याला मोदी कितपत साथ देतात हे महत्वाचं आहे. आंध्रप्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांना विशेष राज्याचा दर्जा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तो ते लावून धरतील. तो मान्यही होईल पण इतर अवास्तव मागण्या पुढे आल्या तर रालोआ सरकारचं भवितव्य त्यावर अवलंबून राहील.
आघाडी सरकारच पुनरागमन झालं असलं तरी त्याला मोकळं रान मिळणार नाही. सरकारला तीक्ष्ण धारेच्या कडेनं चालावं लागणार आहे. हा केवळ भारतीय लोकशाहीचा विजय नसून विविधतेतल्या एकतेचा विजय आहे. भारतीय मतदारांचे,आभार मानायला हवेत. त्यांनी जात-धर्म न पाहता भारतीय संविधान रक्षक नेमले आहेत. भाजपतही संविधानप्रेमी आहेत. त्यातले काही निवडून आलेत. मतांसाठी राममंदिरात रामलल्लांची प्रतिष्ठापना करण्यात घाई निवडणूकीच्या तोंडावर करण्यात आली. तिथल्या मतदारसंघातल्या मतदारांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी जो कौल दिलाय तो भारतीयत्वाचं सजीव उदाहरण आहे. मानवता आणि भारतीय राज्यघटना वेगळी नव्हती. सिंहाची पिछेहाट थोडीबहुत होत असते, पण लकडबग्गे कधी नेतृत्व करु शकत नाही. कारण त्यांची संस्कृती सतत लचके तोडायची आहे. बुभुक्षित जितराब कधी सुसंस्कृत होईल का? सरकार म्हणजे कमिशन एजंट लोकांकडून पैसे घ्यायचे त्यातून कल्याणकारी योजना राबवायच्या आणि आपलं कमिशन वसूल करायचं. तरीही मतदार सहन करतात कारण सरकार पालक असतं. तरीही प्रत्येक सरकार हे वाईटच असतं,काही अतिवाईट असतात. डॉ राममनोहर लोहिया लोकसभेत पंतप्रधान नेहरुंना म्हणाले होते की, 'नागरिक हे देशाचे मालक आहेत, पंतप्रधान हे नेमलेले नोकर आहेत. नोकराने मालकाशी,अदबीनं वागावं...!' लोकशाहीत सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षाला फार महत्त्व असतं. कारण विरोधी पक्ष नाही रे वर्गाचं प्रतिनिधित्व करीत असतो. एक प्रकारची समांतर विरोधी सत्ताच असते. प्रतिनिधीला हे सतत ध्यानी घ्यावं लागतं की, आपण नागरिकांचा आवाज उठविला पाहिजे. कारण आपण सत्तेवर येणार नाही, हे ठाऊक असूनही मतदारांनी आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे. ही सतत दक्षता घ्यावी लागते. सत्ताधाऱ्यांची आरती ओवाळण्याची आवश्यकता विरोधी नेत्यांना नसते, कारण सत्ताधाऱ्यांची हांजीहांजी करण्यासाठी शेकडो माध्यमं उपलब्ध असतात. विरोधी नेत्यांचा आवाज हा पिडलेल्या जनतेचा आक्रोश असतो. त्यामुळं विरोधी पक्षांनी पर्यायी पक्ष बनावं, पूरक पक्ष बनू नये. ब्रिटीश पार्लमेंटच्या चर्चेच्यावेळी मागे एकदा जेष्ठ पत्रकार दिवंगत माधव गडकरी उपस्थित होते. त्यांनी चर्चेचं वर्णन करताना म्हटलं  होतं की, 'जरी सत्ताधाऱ्यांचं बहुमत असलं तरी लोकहिताची बाब असेल तर विरोधी पक्षाच्या योग्य कृतीला संपूर्ण पार्लमेंट समर्थन देते. टीव्हीमध्ये दिसण्यासाठी राजदंड पळविणं, बाकड्यांवरुन उड्या मारत पळणं, असले आचरट चाळे करण्याचं मनातही येत नाही. आपली लोकशाही परिपक्व व्हायला वेळ लागेल पण दिशा चुकलेली नाही. ही समाधानाची बाब आहे!'
१९७५ साली कॉंग्रेस अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी एक नारा दिला होता. 'इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा...!' हा भारतीय राजकारणातला चाटुगिरीचा परमोच्च बिंदू होता. त्याचाच नमुना आज पाहायला मिळतोय. भाजप अध्यक्ष नड्डा यांनी गेल्यावर्षी म्हटलं होतं की, 'मोदी इन्सान नही, भगवान हैं....!' त्यानंतर नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली होती. त्यानंतर देशभर घोषणा दिली गेली होती. 'मोदी की गॅरंटी...!' १९७७ साली मार्च महिन्यात जी अवस्था कॉंग्रेसची झाली होती तीच अवस्था आज भाजपची झालीय. कॉंग्रेसमध्ये फूट पडून ब्रम्हानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी रेड्डी-चव्हाण कॉंग्रेस तयार केली होती. इंदिराजींनी इंदिरा काँग्रेस पक्ष तयार केला होता. भाजपमध्ये फूट पडेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. परंतु भाजपमधील पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसवासी राहुल गांधींना साकडं घालतीलही. त्यांना राहुल गांधींनी प्रवेश देऊ नये. मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन छोटे पक्ष खरेदी करतील. एनडीएचा मोठा गट विकत घेतील आणि आपली मोदी-बीजेपी तयार करतील. सध्यातरी 'परमात्मा मोदी' कोणाचंही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. इतकंच काय, पण स्वतःचंही ऐकत नाहीत. संघाचं नियंत्रण मोदींवर नाही. मोदींची बॉडी लँग्वेज, साक्षात्कारी भाषा आणि गॅरंटी शब्द हे विवेक गमावल्याचं लक्षण दिसून आलंय. मोदींना कोणीही वडीलधारी धाक देणारे नाहीत. त्यामुळं व्यक्तीपूजेचा वेग अनियंत्रित झालाय. मूळ संघ संस्कारी भाजपचे खासदार शे-दिडशे आहेतच त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यांच्या मनात मोदी नाहीत तर नितीन गडकरी, राजनाथसिंह, शिवराज चौहान आहेत. अशस्थितीत जर काही कमी जास्त झालं तर, पुन्हा मध्यावधी लोकसभा निवडणूका होतील. सत्ताधारी हे शेअर मार्केटमध्ये जन्माला आलेले आहेत. त्यामुळं बाजार, खरेदी-विक्री, चढ-उतार आणि सौदेबाजी हेच शब्द त्यांच्या कानावर गर्भात असतानाच पडलेले होते. त्यामुळं लोककल्याणकारी योजना वगैरे बेफिजूल शब्द त्यांना नकोत. भारतीय नागरिकांच्या कसोटीचा काळ सुरु झालाय. उदारमतवादी विवेक हेच याचं उत्तर असेल.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Sunday 2 June 2024

सत्तेचं खुळ आणि लोकशाहीचा खुळखुळा...!

"लोकशाहीची जननी, जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून ख्यातकीर्त असलेल्या भारतातल्या निवडणुकांकडे जगाचं लक्ष लागलेलंय. मोदी सरकारची हॅटट्रिक एकीकडे तर दुसरीकडे संविधान रक्षणासाठी इंडिया आघाडी-काँग्रेस असा संघर्ष सुरूय. निवडणुका संपल्यात. अंदाज व्यक्त होताहेत. एक्झिट पोलमध्ये कुणी भाजप तर कुणी इंडिया आघाडीकडं मतदार झुकल्याच सांगताहेत. तर काही विश्लेषक त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल असं मत व्यक्त करताहेत. अशावेळी नवीन पटनाईक, जगन मोहन रेड्डी, केसीआर यांची भूमिका महत्वाची ठरेल. शिवाय राष्ट्रपतींची भूमिका देखील कळीचा मुद्दा ठरणारी आहे. त्यामुळं देशातल्या लोकशाहीचं भवितव्य घडवणाऱ्या या निवडणूक निकालाची उत्सुकता साऱ्यांनाच आहे! आगामी लोकसभा ही ठोकसभा वा शोकसभा तर ठरणार नाही ना अशी भीती वाटतेय...!"
------------------------------------------------------
देशभरातल्या लोकसभेच्या निवडणुका उरकल्यात. मतदान संपल्यानंतर लगेचच काल संध्याकाळपासूनच दूरचित्रवाणीवरच्या वाहिन्यांवरून 'एक्झिट पोल'चा रतीब टाकला गेलाय. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या, युट्यूबवरच्या विविध वाहिन्यानींही आपला 'एक्झिट पोल दाखवलाय. राजकीय विश्लेषकांनी देशात कोणाचं सरकार येणार यावर आपला अंदाज व्यक्त केलाय. मुख्य इलेक्ट्रोनिक मीडियानं एनडीएची भलामण केलीय तर इंटरनेटवरच्या युट्यूबसारख्या सोशल मीडियानं इंडिया आघाडीची पाठराखण केलीय. देशातल्या मतदार राजानं कुणाला आपलं दान कुणाला टाकलंय हे ४ जूनलाच समजणार आहे. पण मतदारांच्या मनांत अस्वस्थता दिसून येतेय. पुराणात एका सुंदरीसाठी सुंद आणि उपसुंद या दोघा शक्तिमान राक्षसी मित्रांमध्ये युद्ध झालं आणि ते दोघेही घायाळ झाले. त्याप्रमाणं आता देशात सत्तासुंदरीसाठी भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी यांच्यात जुंपलीय. या निवडणुक प्रचारातून जे काही वातावरण तयार झालं त्यात राजकारण सडल्याचं दिसून आलं. देशातल्या धुरीणांनी पक्षीय मतभेद किती ताणायाचं आणि श्रेयासाठी किती लढायचं याचा विचार केला पाहिजे. अलीकडं राजकारणी देशहितासाठी एकत्र येत नाहीत. तर सत्तेच्या आधारे विरोध वा अडवणूक केली जातेय. हे सारं जनतेसाठी म्हणत जनतेलाच वेठीला धरून केलं जातंय. हा सडलेल्या राजकारणातला सत्तासंघर्ष आहे. एवढंच म्हणावं लागेल! निवडणूक प्रचाराच्यावेळी राजकीय नेते किती नीच पातळीवर जाऊ शकतात. याचं दर्शन या निवडणूक प्रचारात घडलं. ज्या माणसांपासून लोकशाहीला धोका निर्माण झालाय, तीच माणसं लोकशाहीच्या बाजूनं उत्तम बोलू शकतात. धर्मनिरपेक्षतेला नख लावणारी माणसंच अल्पसंख्यांकांचा कैवार घेऊ शकतात. ज्यांना धर्मनिरपेक्ष लोकशाही हवीय. त्यांना ढोंग करण्याची आवश्यकता नाही. कोणताही हुकूमशहा लढाईच्या आधी तालीम करतो. एकदा शत्रूकडून लढतो तर एकदा स्वतःकडून लढतो. शत्रूचं सामर्थ्य आणि आपल्या उणीवा याचा शोध घेतो. बुध्दीबळाच्या पटासमोर दोन्ही बाजूला खुर्च्या ठेवलेल्या असतात. पण खेळणारा हा एकटाच असतो. आधी तो स्पर्धकाच्या खुर्चीवरुन शत्रूचा डाव खेळतो. नंतर आपल्या खुर्चीवर बसून आपला डाव खेळतो. दोन्ही डाव खेळताना अगदी विचारपूर्वक खेळतो. पण एकमेकांवर मात करत दोन्ही डाव तो हिकमतीनं खेळतो. शकुनीचा कपटी डावही खेळतो. आणि जिथं शत्रूला बचाव उरतच नाही. असा डाव आणि मोहरे तयार करुन ठेवतो. त्याची तालीम आधीच झालेली होती. प्रचारात त्याचाच अनुभव आलाय. हुकूमशहा आधीच बोलून बसतो की लोकशाही किती कष्टानं मिळवलीय, तीच्या रक्षणासाठी मला पुन्हा सत्ता द्या. अन्यथा शेजारची शत्रू राष्ट्र लाभ घेतील कारण ती विरोधकांची तारीफ करताहेत. जात आणि धर्म यांच्यावर उघडपणे मतं मागितली गेली. उलट लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता जपणाऱ्यांना हिंदुत्व विरोधी म्हटलं गेलं. विशेष म्हणजे निवडणूक आयोग, लोकशाही विरोधकांची बाजू घेतेय. वैदिकवादी हुकूमशहा सध्या लोकशाही वाचवा असा टाहो फोडतोय. वास्तविक निवडणूका होऊच नयेत अशी त्यांची इच्छा आहे. नाईलाजानं होतच आहेत तर, मतं मिळवता कशी येतील याच्या क्लृप्त्या लढवल्या गेल्या. त्याबद्दल निवडणूक आयोगाकडं तक्रार करायला वाव नाही. कारण निवडणूक आयोगानं आपण एनडीएचा घटक असल्यासारखं स्वतः साऱ्या शंका, तक्रारी उडवून लावल्यात. त्या पदावर बसताना आयुक्त लाज, शरम घरी माळ्यावर टाकून आलेले दिसले. कधीतरी शरमेचं बोचकं उघडून बघा म्हणावं, लाज मेली तर नाही ना? विशेष म्हणजे सर्वच पक्षांत फिरुन आलेले सौदागर राजकारणी या बाबींना किरकोळ समजतात.कारण लोकशाही म्हणजे सरंजामशाहीच्या मांडीवर बसून बाटलीनं दूध पिणारं बाळ समजतात. यंदाची लोकसभा निवडणूक विशेष यासाठी ठरलीय की, भकास हुकूमशहा विरुद्ध सामान्य मतदार अशीच लढत पाहायला मिळली. सत्तेवर कोण येईल यापेक्षा लोकांनी पहिल्यांदाच संपूर्ण राज्यघटनेवर हल्ला होताना पाहीलंय. लोकसभेची ठोकसभा वा शोकसभा ठरतेय की काय म्हणून राज्यघटना वाचविण्यासाठी मतदार पुढं सरसावला. मतदार कॉंग्रेसच्या बाजूनं असण्यापेक्षा राज्यघटनेच्या बाजूनं असल्याचं जाणवलं, हेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी प्रमुख वैशिष्ट्य ठरलंय. मतदार राज्यघटना जागरूक होत आहेत ही ऐतिहासिक घटना म्हणायला हवीय. नागरिकांना राज्यघटना साक्षर करण्याची जबाबदारी सर्वच संघटनांनी घेणं किती आवश्यक आहे. याची जाणीव जरी झाली तरी त्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल. असो.
'अबकी बार ४०० पार..!' असा नारा लगावणाऱ्या, मांस, मच्छी, नळाची तोटी, मंगळसूत्र, जास्ती मुलं पैदा करणारी जमात, हिंदू मुस्लिम, भटकती आत्मा, नकली संतान यापासून महात्मा गांधी यांच्यापर्यंत साऱ्यांना प्रचारात ओढणाऱ्या भाजपला एक्झिट पोलमधून ज्या  जागा दाखवल्या जाताहेत होताहेत त्यावरून भाजप २७२ हा जादुई आकड्यापर्यंत पोहचत नाहीये असं दिसतंय. पण राजकीय विश्लेषक, सेफोलॉजीस्ट वेगळी मतं मांडताहेत. कुणी भाजपला २००-२२०, कुणी २२५ तर कुणी २३०-४० देताहेत. पण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मात्र ३०० ते ३५० जागा मिळतील असं ठासून सांगतेय. भाजपचे नेते मात्र आपण ३७० ते ४०० जागा जिंकू असं सांगताहेत तर काँग्रेसचे नेते आम्ही ३०० पार करू असं बोलताहेत. सत्तेसाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसलीय. भाजपनं आपली व्यूहरचना आधीच केलीय. काँग्रेसनं मित्रपक्षांची बैठक बोलावलीय. जर भाजप-एनडीएला बहुमत मिळालं नाही तर मग सत्ता कोण स्थापन करणार. याबाबत तीन शक्यता दिसताहेत. त्यापैकी एक, इंडिया आघाडीची मोट सत्तेचं सोपान गाठणार आहे का? जर त्यांनी ती गाठली तर इंडिया आघाडीचे मल्लिकार्जुन खरगे हे प्रधानमंत्री असतील. देशाचे ते पहिले दलित प्रधानमंत्री ठरतील. दुसरी शक्यता, बहुमतासाठी जर संख्या कमी पडली तर गैरकाँग्रेसी नेत्यांचं नावं पुढं करून एनडीए कोणत्याही गटात नसलेल्या नवीन पटनाईक, जगनमोहन रेड्डी यांना किंवा त्यांच्याच मित्रपक्षाच्या चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील. तिसरी शक्यता ही आहे की, इंडिया आघाडीला रोखण्यासाठी भाजप, इंडिया आघाडीतल्या एखाद्या महत्वाकांक्षी नेत्याला पर्यायी प्रधानमंत्रीपदी बसवून सत्ता आपल्याच हाती ठेवण्याचा प्रयत्न देखील भाजप करू शकते. ह्या साऱ्या शक्यता आहेत. पण जर कदाचित भाजपला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काही जागा कमी पडल्याच तर पाठींबा द्यायला कोण येणार आहेत? काय तेच राजकीय पक्ष पाठींबा देतील जे दहा वर्षे ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांनी पीडित आहेत. ज्यांच्या राज्यातले ३७० कलम रद्द केलंय. ज्यांच्या पक्षांची शकलं केली, कुटुंब तोडली, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षांची नावं आणि चिन्हं हिसकावून घेऊन आपल्या तालावर नाचणाऱ्यांच्या हाती दिलं गेलंय, की, कायम पाठीशी राहिलेल्या नवीन पटनाईक यांच्या थरथरणाऱ्या हाताची टिंगल केली असे पक्ष पाठींबा देतील? ते शक्यच नाही! मात्र भाजपसमोर असा प्रश्न उभा राहिला तर, भाजप आणि संघ यांनी नरेंद्र मोदी, मोदीवाद, मोदी मित्रवाद दूर सारून कुण्या उदारमतवादी नवा नेता निवड केली तर काही राजकीय पक्ष देशाबरोबरच भाजपलाही मोदीमुक्त करण्यासाठी पुढं येऊ शकतात. ज्यांच्या तोंडाला सत्तेच चाटण लागलेलं आहे त्या संघ आणि भाजपची मोदी ही काही पहिली पसंती नाही. त्यांच्यासाठी सत्ता महत्वाची आहे. मोदींनी संघाचा अजेंडा राबवला गेला असला तरी संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्तेच सुख काही मिळालेलं नाही. त्यांना प्रधानमंत्र्यांशी, गृहमंत्र्यांशी संपर्क साधणं हे एक दिव्य होतं. देवतांचे देव असलेल्याशी कोण मंत्री, खासदार, आमदार, कार्यकर्ता कसा संपर्क साधू शकणार? संघाची गरज नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या मोदी, शहा आणि नड्डा यांना धडा शिकविण्यासाठी संघ सरसावलाय. मतदान प्रक्रियेत फारसा न दिसलेला स्वयंसेवक हा नितीन गडकरी, राजनाथसिंह, शिवराज चौहान अशा काही नेत्यांसाठी सक्रिय दिसला; इतरत्र मात्र तो अभावानेच दिसला. जर मोदींना पर्याय शोधायचा असेल तर भाजप आणि संघ कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंत, स्वयंसेवकांपासून विरोधी पक्षातल्या नेत्यांशी, उद्योजक, विचारवंत यांच्याशी ज्यांचे मित्रत्वाचे, सलोख्याचे संबंध आहेत अशा उदारमतवादी नितीन गडकरी यांचं नाव अग्रस्थानी असेल. तसं घडलं तर महाराष्ट्रातले सारे पक्ष म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इतर मराठी अस्मितेसाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. इतर राज्यातले इंडिया आघाडीतले काही पक्ष देखील गडकरींना साथ देऊ शकतात. पण मोदी, अमित शहा किंवा आदित्यनाथ यांना कुणी पाठींबा देण्याची शक्यताच नाही! गडकरी यांच्याशिवाय राजनाथसिंह हे ठाकूर आहेत तर शिवराज चौहान हे ओबीसी आहेत. त्यांचाही विचार नेतेपदासाठी भाजपकडून होऊ शकतो. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरची झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीनं बाजी मारणं! असं राजकारणाचं स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीप्रमाणे पालटत राहतं. 
भाजपला बहुमत मिळालं तर सत्तास्थापनेचा कोणताच प्रश्न उपस्थित होणार नाही. पण भाजपला जर कमी जागा मिळाल्या आणि इंडिया आघाडीनं मिळालेल्या जागांच्या आधारावर सत्ता स्थापनेचा दावा केला तर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांची भूमिका महत्वाची ठरू शकते. कारण निवडून आलेल्यांमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष असेल. राष्ट्रपती भवनात बसलेल्या राष्ट्रपती दौपदी मुर्मु या काही निष्पक्ष नाहीत. त्या पूर्वाश्रमीच्या भाजपच्या कार्यकर्त्याच आहेत. आताही राष्ट्रपती बनल्यानंतरही त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाराणशीला गेल्या होत्या. त्यामुळं त्या जो काही निर्णय घेतील ते भाजपला पूरक अशीच असेल. इथं त्यांना दोन प्रकारे निर्णय घेता येऊ शकेल. ४ जून नंतर त्याचा प्रत्यय येईल. सत्तेच आमंत्रण त्या कुणाला देणार? सर्वांत मोठा पक्ष की, निवडणूकपूर्व आघाडी? त्यावर विवाद होण्याची शक्यता दिसतेय. यावेळी १९८९ च्या घटनेची आठवण येतेय. त्यावेळी निवडून आलेला सर्वात मोठा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी ही काँग्रेस होती तर बहुमतात विरोधकांची डावी आघाडी होती ज्यामध्ये भाजपही होता. तेव्हाही राष्ट्रपती आर. व्यंकटरामन यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच्या राजीव गांधी यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र त्यावेळी काही संविधानतज्ञ वकिलांनी प्रसिद्धी माध्यमांतून लेख लिहून राष्ट्रपतींच्या त्या निर्णयाला विरोध केला होता. वस्तुस्थितीची जाणीव झाल्यानंतर काँग्रेसच्या राजीव गांधींनी राष्ट्रपतींच्या सत्ता स्थापनेच्या त्या आमंत्रणाला नम्रपणे नकार दिला होता. त्यानंतर विरोधकांचे नेतृत्व करणाऱ्या विश्वनाथ प्रताप सिंह यांना राष्ट्रपतींनी आमंत्रित केलं होतं. अद्यापि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती यायचे आहेत. पण जर का सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून आला आणि इंडिया आघाडीला जास्त जागा मिळाल्या तरी त्यात अनेक पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीला आमंत्रित न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणती पद्धत अंमलात आणतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल. त्या भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून आमंत्रित करू शकतात. राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी १९९८ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाल्यावर सर्वच पक्षांना असं सुचवलं होतं की, जे आपलं बहुमत दाखवतील त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावलं जाईल. त्यावेळी कुणाकडेच सत्तेसाठीच्या बहुमताचा २७२ हा जादुई आकडा नव्हता पण अटलबिहारी वाजपेयी यांनी २५२ सदस्य आपल्यासोबत आहेत असा दावा करत राष्ट्रपती के. आर. नारायणन यांची भेट घेतली. तेव्हा राष्ट्रपतींनी हे पाहिलं नाही की, कोणत्या पक्षाचे किती सदस्य अटलजीसोबत आहेत. भाजपचे त्यावेळी १८० सदस्य त्यात होते. दुसऱ्या कोणत्याच पक्ष २७२ वा २५२ चा आकडा दाखवू शकले नाहीत. म्हणून मग त्यावेळी राष्ट्रपतींनी अटलबिहारी वाजपेयी यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं आणि एक वेगळी परंपरा निर्माण केली. ही परंपरा विद्यमान राष्ट्रपती अवलंब करतील का? पण एक विचित्र स्थिती होऊ घातलीय. राहिली इंडिया आघाडीची बाब. यात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असेल. इंडिया आघाडीत जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांचे जवळपास १५० सदस्य असतील असा अंदाज व्यक्त केला गेलाय. त्यात राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, टीडीपी, आम आदमी पार्टी, महाराष्ट्रातली महाराष्ट्र विकास आघाडी, तामिळनाडूतला द्रमुक, डावे पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस, या साऱ्यांची सदस्य संख्या दीडशेच्या आसपास असेल असं एक्झिट पोलमध्ये सांगितलं जातंय. याच्या तुलनेत एनडीए प्रामुख्यानं भाजप २१० ते २३० सदस्य निवडून येतील असा अंदाज विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेतून आणि एक्झिट पोलमधून व्यक्त केला गेलाय. इतर भाजपचे सहयोगी पक्षांची ताकद ही २०-२५ सदस्यांची असेल. यातील चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देशम आणि नितीशकुमार यांचा जेडीयु काय निर्णय घेतात यावरही परिस्थिती अवलंबून राहील. इथं नवीन पटनाईक, जगन रेड्डी यांची भूमिकाही कळीचा मुद्दा ठरेल. राजकीय वर्तुळात अशाप्रकारची चर्चा सुरू आहे की, 'आपल्या स्वतःसाठी आजवर आपण पलटी खाल्ली आता देशासाठी पलटी खायला काय हरकत आहे!' या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनातून काय निर्णय येतो. कुणाला सत्ता स्थापनेसाठी त्या आमंत्रित करतात. या निर्णयानंतर तात्पुरत्या अध्यक्षांची, प्रोटेम स्पीकरची निवड केली जाईल. त्यानंतर बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यात बहुमत सिद्ध झालं नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल हे पाहावं लागेल. मगच दुसऱ्या आघाडीला आमंत्रित करता येईल. राष्ट्रपतीपदाची मर्यादा सांभाळत असं म्हणावं लागेल की, के. आर. नारायणन यांच्यासारखे संसदीय नियम, कायदे, परंपरा यांचं ज्ञान असलेलं लोक आज नाहीत. मात्र कायदेपंडित आणि संविधानाचे विशेषज्ञ यांचा सल्ला इथं घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली असेल. नाहीतर जी काही परिस्थिती त्यानंतर निर्माण होईल त्याबाबत लोकशाहीच्या आणि संविधानाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असेल! 
हरीश केंची,
९४२२३१०६०९



मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...