Monday 28 February 2022

बहुजनांचा मसीहा : कांशीराम

कांशीराम हे नाव घेतलं की डोळ्यासमोर सर्वांत आधी येतो तो उत्तर प्रदेश. पण अनेकांना हे बहुदा माहिती नसेल की ज्या कांशीरामांनी उत्तर प्रदेशात बहुजनांच्या राजकारणाचा पाया रचला ते कांशीराम मूळचे पंजाबचे होते. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांशीराम यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रातून केली होती. तरीही महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ कांशीरामांपासून अंतर राखून का आहे? स्वतःचं मूळ राज्य पंजाब सोडून कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात निवडणुकीचं राजकारण का केलं? पंजाबमध्ये त्यांचं राजकारण का फळलं नाही? पंजाबमध्ये त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या खूपआधी बिंद्रनवालेंना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला होता का? अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांशीराम यांचं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन एकच होतं पण मार्ग मात्र वेगळे होते, असं अभ्यासकांना का वाटतं?

महाराष्ट्रातून सुरुवात
घटना पुण्यातली आहे. १९५७ मध्ये कांशीराम पुण्यातल्या संरक्षण विभागाच्या आयुधं निर्मिती करणाऱ्या कारखान्यात रिसर्च असिंस्टंट म्हणून कामाला लागले. तिथं पाच वर्षं काम केल्यानंतर घडलेल्या घटनेनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. कारखान्यात आधी बुद्ध जयंती आणि आंबेडकर जयंतीला सुट्टी मिळायची. पण प्रशासनाकडून त्यात बदल करण्यात आला. या सुट्ट्या कायम राहाव्यात यासाठी त्यांनी युनियनला हाताशी धरून लढा उभारला. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि या सुट्ट्या पुन्हा लागू केल्या. याच काळात पुण्यात कांशीराम यांचा संबंध महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. आंबेकरांच्या साहित्याशी आला.देशातली सत्ता ही फक्त १५ टक्के असलेल्या तथाकथित उच्चजातीच्या हाती एकवटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे चित्र बदलायचं असेल तर ८५ टक्के लोकांची एकजूट आवश्यक आहे, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आलं. झालं, कांशीराम यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. १९७८ मध्ये त्यांनी बामसेफ म्हणजेच All-India Backward and Minority Communities Employees Federationची स्थापना केली. तर १९८१ मध्ये त्यांनी डीएस-४ (दलित शोषित संघर्ष समिती) ची स्थापना केली. पुण्यात कामाला असलेल्या कांशीराम यांनी महाराष्ट्रातूनच राजकीय संघर्ष सुरू केला. महाराष्ट्रात आधीपासून असलेली आंबेडकरी चळवळ त्यांच्यासाठी पूरक ठरली. त्याकाळी जॉर्ज फर्नांडिसांसारखे युनियन लीडर महाराष्ट्रात येऊन राजकारण करत असताना कांशीराम यांनी मात्र तसं केलं नाही. असं काय घडलं की कांशीराम यांनी महाराष्ट्रात निवडणुकीचं राजकारण केलं नाही. ज्येष्ठ लेखक रावसाहेब कसबे यांचा कांशीराम यांच्याशी सुरुवातीच्या काळात फार जवळून संबंध आला होता. कांशीराम यांनी महाराष्ट्रात राजकारण का केलं नाही याचं कारण ते सांगतात, "याचं कारण असं होतं की ते जातीने चांभार होते. महाराष्ट्रातला आंबेडकरी विचारांचा सर्वांत मोठा वर्ग होता बौद्ध लोकांचा, म्हणजे पूर्वाश्रमीचे महार. हा समाज इतर कुणाचं नेतृत्व स्वीकारत नाही. त्यामुळे कांशीराम याचं नेतृत्व इथं सर्वमान्य होण्याची शक्यता नव्हती." त्यातच १९७६ च्या औरंगाबाद विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांनी घेतलेल्या भूमिकेनं त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय परिघापासून दूर केलं. "मराठवाडा विद्यापीठ नामंतराच्या आंदोलनात कांशीराम यांनी विरोधी भूमिका घेतली. हे आंदोलन म्हणजे ब्राह्मण वर्गाची चाल आहे अशी त्यांनी भूमिका घेतली. जी लोकांना अजिबात पटली नाही.नामांतर आंदोलनावेळी दलित समाजावर झालेले अन्याय आणि अत्याचार पाहाता ती चळवळ अधिक तीव्र करावी असं आम्हाला वाटत होतं. पण कांशीराम यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे हळूहळू कांशीराम महाराष्ट्रातल्या लोकांच्या नजरेतून उतरत गेले," असं कसबे सांगतात.

आंबेडकरांपेक्षा वेगळा मार्ग
हे सगळं घडत असताना पंजाब आणि उत्तर प्रदेशात मात्र त्यांनी त्याच्या राजकारणाचा जम बसवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आता बहुजनांच्या हाती सत्ता हवी तर डीएस-४ आणि बामसेफ पुरेसं नव्हतं हे कांशीराम यांच्या लक्षात आलं होतं. परिणामी त्यांनी राजकारण करण्यासाठी १४ एप्रिल १९८४ मध्ये स्वत:ची बहुजन समाज पार्टी काढली. 'जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी हिस्सेदारी.' आणि 'जो बहुजन की बात करेगा, वो दिल्ली पर राज करेगा,' असे नारे कांशीराम यांनी दिले. आता पक्ष काढला तर निवडणुका लढवणं आलंच. १९८४ मध्ये पक्षाची स्थापना झाली आणि त्याचवर्षी लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली. बसपाने ९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक लढवली. या निवडणुकीत पक्षाला १० लाख मतं मिळाली. त्यातली ६ लाख मतं एकट्या उत्तर प्रदेशातून मिळाली होती. एप्रिल १९८४ मध्ये कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. राम मंदिर आंदोलनाच्या आधीच्या आणि मंडल आयोगाच्या काळात हे सगळं घडत होतं. हीच खरी संधी आहे हे कांशीराम यांनी हेरलं आणि उत्तर प्रदेशात काम सुरू केलं. उत्तर प्रदेशातल्या प्रोफेसर बद्रीनारायण यांनी कांशीराम यांचं चरित्र लिहिलं आहे. त्यांच्या उत्तर प्रदेशातल्या कामाची माहिती देताना ते सांगतात, "उत्तर प्रदेश का निवडलं याचं उत्तर स्वतः कांशीराम देत असत. ते सांगत हे महाराष्ट्रातलं रोपटं आम्ही उत्तर प्रदेशातल्या मातीत रुजवलं आहे. उत्तर प्रदेशात दलितांचं दमन पंजाबपेक्षा जास्त आहे. एक दलित असून पंजाबमध्ये मी एवढे दलित अत्याचार कधी पाहिले नव्हते जेवढे मला यूपीत दिसतात, असं ते सांगत. शिवाय मंदिर आंदोलनाच्या आधीचा हा काळ होता. तेव्हा त्यांना त्यांचं राजकारण प्रस्थापित करण्यासाठी संधी मिळाली. त्यासाठी त्यांनी रामायण आणि महाभारताच्या कथांचा प्रतिवाद तयार केला. या कथांमध्ये अत्याचार झालेल्या व्यक्तींमध्ये त्यांनी दलितांची प्रतीकं आणि आदर्श शोधले. कारण त्यांना हे माहिती होतं की यूपीत राजकारण करण्यासाठी हे सर्व फार महत्त्वाचं आहे. या भागाला लोक आर्यवर्त म्हणतात. पण मी याभागाला चांभारवर्त करेल असं ते कायम म्हणायचे. आणि त्यांनी ते केलं सुद्धा. मायावतीसारख्या दलित महिलेला त्यांनी 4 वेळा मुख्यमंत्री केलं. तेही त्या राज्यात तिथं कमलापती त्रिपाठींसारख्या मुख्यमंत्र्यांची परंपरा होती."
बसपच्या मायावती ४ वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या.

खरंतर कांशीराम मूळचे पंजाबचे. त्यांचा जन्म मुळचा रोपड जिल्ह्यातल्या पिर्तीपूर बुंगा गावातला. याच पंजाबमध्ये देशात सर्वांत जास्त शेड्यूलकास्ट लोकसंख्या आहे. पण तिथली जमीन मात्र कांशीराम यांच्या राजकारणासाठी सुपीक ठरली नाही. पंजाब मधल्याच जलंधरमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गुरबचन सिंग यांनी कांशीराम यांचं पंजाबमधलं राजकारण अगदी सुरुवातीपासून पाहिलं आहे. ते सांगतात, "शीखांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये जातीपातीचं खंडन करण्यात आलं आहे. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र इथं जातपात आहे. इथं चांभार समाजाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर मोठा आहे. ते स्वतःला वाल्मिकींपेक्षा वरचे समजतात. पण वाल्मिकी समाज मात्र गरिब आहे. कांशीराम यांनी सुरुवातीला पंजाबमधल्या या दोन प्रबळ दलित जाती एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण पैशांनी श्रीमंत असलेल्या चांभार समाजातल्या लोकांनी वाल्मिकी समाजातल्या लोकांना बसपमध्ये टीकूच दिलं नाही."
कांशीराम यांना पंजाबमधल्या शीख अल्पसंख्याक समाजाला देशात राजकीयदृष्ट्या प्रबळ करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्नदेखील केले. असाच एक प्रयत्न म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या खूप आधी त्यांनी बिंद्रनवालेंना लोकशाही मार्गानं त्यांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत माहिती देताना पंजाबी लेखक देस राज काली सांगतात, "मी काही ठिकाणी वाचलं आहे. तसंच काशीराम यांच्याबरोबर कार्य केलेल्या वरिष्ठ नेत्यांनी मला हे सांगितलं आहे की, कांशीराम यांनी बिंद्रनवालेंची अमृतसरमध्ये भेट घेतली होती. लोकशाही पद्धतीने बिंद्रनवालेंनी त्यांच्याबरोबर यावं असं त्यांना वाटत होतं. पण बिंद्रनवालेंचा मार्गच वेगळा होता." खरंतर कांशीराम आणि आंबेडकर यांचं मिशन एकच होतं. पण दोघांचे मार्ग मात्र वेगवेगळे होते. आंबेडकरांनी बहुजनांना राज्यकर्ती जमात व्हा असं सांगितलं होतं. तर कांशीराम यांना मात्र बहुजनांनी सत्ताधारी जमात व्हावं असं वाटत होतं. "कांशीराम कायम सांगत की आंबेडकरांनी पुस्तकं एकत्र केली मी लोकांना एकत्र केलं. आंबेडकर चिंतन करत लेखन करत त्यांनी खूप लिखाण केलं आहे. पण कांशीराम यांनी मात्र फक्त 'द चमचा एज' (The Chamcha Age) हे एकच पुस्तक लिहिलं. पण त्यांनी चळवळ केली, समाजाला एकत्र आणलं. निवडणुकीचं राजकारण केलं. त्यात यश मिळवलं पण आंबेडकरांना मात्र ते फारसं मिळालं नाही," असं प्रोफेसर बद्रीनारायण सांगतात. आपल्याला हे विसरून चालणार नाही की फुले-शाहू-आंबेडकरांना देशभरात पसरवण्यात कांशीराम यांचा मोठा वाटा आहे. आज उत्तर प्रदेश सारख्या राज्यात या तिन्ही समाजसुधारकाच्या नावाने वेगवेगळ्या संस्था, विद्यापिठं आणि जिल्हे दिसतात त्याचं श्रेय कांशीराम यांनाच दिलं जातं. आज कांशीराम नाहीत. त्यांची बहुजन समाज पार्टीही कमजोर झाली आहे, पण वंचितांची राजकीय शक्ती किती मोठी असू शकते, याचं उदाहरण त्यांनी पूर्ण जगाला दाखवलं आहे.

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...