Monday 7 February 2022

निसर्ग सूर हरपला!


स्वरकोकिळा लता मंगेशकर होणे नाही...!
स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचं आज दुःखद निधन झालं. त्या केवळ भारताच्याच नव्हे तर अखिल विश्वातल्या सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अशा गायिका होत्या. त्यांच्या आवाजाची किमया केवळ भारतीयांवरच नव्हें तर विदेशातल्या नागरिकांवर देखील आजतागायत पसरलेली आपल्याला दिसते; हे म्हणणं देखील अतिशयोक्ति होणार नाही की, जोवर चंद्र सुर्याचं अस्तित्व या भुतलावर आहे तोवर लता मंगेशकरांच्या आवाजाचं गारूड प्रत्येक कानसेनावर कायम राहाणार आहे. कारण त्यांच्या आवाजानं उंचीचे जे किर्तीमान गाठलेलं होतं. तिथंपर्यंत पुढच्या काळात बहुतेकच कुणी पोहोचु शकेल असं कुुणी नाही.
---------------------------------------


लता मंगेशकरांच्या आवाजावर संशोधन देखील करण्यात आलं होतं. त्यांच्या सुमधुर आवाजाला उद्देशुन अमेरिकन वैज्ञानिकांनी इथपर्यंत म्हटलंय की लता मंगेशकरांच्या आवाजाइतका सुरेल आवाज यापुर्वी नव्हता आणि येणाऱ्या काळात देखील असण्याची शक्यता कमीच आहे! यावरून लता मंगेशकर या व्यक्तिमत्वाची महत्ता आपल्या लक्षात येते. अनेक शतकं आपल्या आवाजामुळं रसिकमनावर राज्य करणाऱ्या लताजी भारताच्या सर्वात प्रसिध्द आणि उत्तम आणि सन्माननीय पार्श्वगायिका, संगीतकार म्हणुन सुपरिचित होत्या. भारतरत्न लता मंगेशकर अनेक दशकांपासून भारतीय सिनेमाला आपला मधुर आवाज देत होत्या. त्यांच्या प्रतिभेपुढं आज अवघं विश्व नतमस्तक होतं. १९४२ साली वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षांपासून भारतीय सिनेमा जगताला त्या आपला आवाज देत होत्या. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आजतागायत लतादिदींनी एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये आणि जवळजवळ ३६ हून अधिक प्रादेशिक भाषेतली गाणी गायली आहेत. या सोबतच लतादिदींनी अनेक विदेशी भाषांतूनही गायन केलेलं आहे. संगीताच्या या महानायिकेनं सर्वात जास्त गाणी मराठी आणि हिंदी भाषेत गायिली आहेत. लताजी सर्वाधिक गाणी रेकाॅर्ड करणाऱ्या म्युझिक आर्टिस्ट म्हणूनही ओळखल्या जात होत्या. एका कार्यक्रमात ज्यावेळी लताजींनी ‘ए मेरे वतन के लोगों जरा आँख मे भरलो पानी...!' हे गीत गायिलं त्यावेळी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातही अश्रु तरळले होते, असं सांगितलं जातं.

महानगायिका लता मंगेशकर यांच्याव्दारे संगीत क्षेत्रात दिल्या गेलेल्या अभूतपूर्व योगदानाकरिता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. १९८९ साली भारत सरकारनं लतादिदींचा भारतीय सिनेमातला सर्वोच्च असा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' देऊन गौरविण्यात आलं होतं. लता मंगेशकर एम.एस. सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर दुसऱ्या अशा गायिका आहेत ज्यांचा भारताचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देऊन गौरव करण्यात आला! अनेक चढउतारांचा सामना करत लताजी अनेक संघर्षांना आजवर सामोऱ्या गेल्या आहेत परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. निरंतर आपल्या ध्येयाला प्राप्त करण्याकरता पुढं जात राहिल्या जीवनात मिळणाऱ्या सन्मानाचा आदरपुर्वक स्वीकार केला. आज लताजी सगळ्यांकरताच आदर्श आहेत आणि त्यांचं जीवन कित्येक लोकांकरता प्रेरणादायक आहे.

लता मंगेशकर यांचा जन्म, परिवार, प्रारंभिक जीवन
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला मध्यप्रदेशातल्या इंदौर इथं एका गोमंतक ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल पंडित दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक आणि थिएटर कलावंत होते त्यामुळं लतादिदींना संगीताचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले होते. लताजींच्या आईचं नाव शेवंती-शुधामती होतं आणि त्या महाराष्ट्रातल्या थालनेर इथल्या होत्या आणि पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत. सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं मूळ आडनाव हर्डीकर असं आहे परंतु त्यांच्या वडिलांनी ते बदलून आपल्या मुळ गावावरून ते मंगेशकर असं केलं त्याचं कारण म्हणजे आपल्या नावानं आपल्या गावाचं, मंगेशीचं, गोव्याचं प्रतिनिधीत्व करावं अशी त्यांची धारणा होती. पुढं लतादिदींच्या जन्मानंतर काही काळातच हा पूर्ण परिवार महाराष्ट्रात स्थानांतरीत झाला. लताजींना लहानपणी ‘हेमा’ या नावानं हाक मारली जात असे परंतु पुढं त्यांच्या वडिलांनी एका ‘भावबंधन’ या नाटकामुळं प्रभावित होऊन त्यांचं नाव बदलून लता असं केलं. आणि त्यानंतर संगीताच्या क्षेत्रात लता नावानं एक किर्तीमान स्थापित केला हे तर आपण सगळे जाणतोच. लता या आपल्या आईवडिलांच्या सर्वात मोठया आणि पहिलं अपत्य होत त्यांची एकूण चार लहान बहिण भावंड आहेत, मीना, आशा भोसले, उषा आणि हृदयनाथ...!

बालपणापासूनच संगीताची आवड असल्यानं सुरांची जादुगार लताजींनी गाण्याचे सुरूवातीचे धडे आपल्या वडिलांसमवेत गिरवले होते. आपल्या वडिलांकडून आपल्या भावंडांसमवेत त्या शास्त्रीय संगीत शिकत असत. आपल्यापैकी कित्येकांना हे माहित नसेल की, वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षांपासून त्या आपल्या वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये अभिनय करत असत. लता ही संगीत क्षेत्रातली एक अद्भुत चमत्कार आहे याची जाणीव त्यांच्या वडिलांना तिच्या लहानपणीच झाली होती. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी या स्वरसम्राज्ञीनं शास्त्रीय संगीताची मैफिल सजविली होती. लहानपणापासून संगीतात आवड असल्यानं लताजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमानत खान, बडे़ गुलाम अली खान, पंडित तुलसीदास शर्मा आणि अमानत खान देवसल्ले यांच्याकडून घेतलं होतं. त्यावेळी लताजी के.एल. सहगल यांच्या संगीतानं फार प्रभावित होत्या. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. संगीतातला चमत्कार मानल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्यावर त्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला ज्यावेळी त्यांच्या वडिलांना हृदयविकारानं ग्रासलं आणि आपला गोकुळासारखा परिवार सोडून ते ईहलोकीच्या यात्रेला निघून गेले.  त्या सुमारास लता केवळ १३ वर्षांच्या होत्या. कुटुंबात त्याच मोठ्या असल्यानं आपल्या बहिण भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली, परिणामी लताजींनी बालवयातच आपल्या परिवाराच्या भरणपोषणाकरता काम करणं सुरू केलं.

लता मंगेशकर यांची कारकिर्द
वयाच्या १३ व्या वर्षी लतादिदींनी आपल्या करियरला सुरूवात केली आणि तेव्हापासून आजतागायत आपला सुमधूर आवाज त्या भारतीय सिनेमाला देत होत्या. लतादिदींनी पहिलं गाणं १९४२ साली मराठी चित्रपट ‘किती हसाल’ करिता ‘नाचु या ना गडे खेळु सारी, मनी हौस भारी...!' गायिले होते या गीताला सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबध्द केलं होतं परंतु या चित्रपटाच्या एडिटींग दरम्यान या गीताला चित्रपटातून काढुन टाकण्यात आलं. पुढं नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि लतादिदींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या मृत्युपश्चात त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आणि लता मंगेशकरांना एक गायिका आणि अभिनेत्री बनवण्यात मदत केली. मास्टर विनायक यांनी लताला १९४२ साली मराठी चित्रपट ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात एक छोटीशी भुमिका देखील दिली होती, ज्यात लताजींनी एक गीत देखील गायिलं होतं. जरी लतानं आपली कारकिर्द मराठी गायिका आणि अभिनेत्री म्हणुन सुरू केली असली तरी त्याकाळी असं कुणालाही वाटलं नाही की ही लहान मुलगी पुढं एक दिवस हिंदी सिनेसृष्टीत एक प्रसिध्द आणि सुमधुर गायिका होणार आहे. तसं त्यांचं पहिलं हिंदी गीत देखील १९४३ ला आलेल्या मराठी चित्रपटातलंच होतं. ते गीत ‘माता एक सपुत की दुनियां बदल दे तू’ असं होतं आणि चित्रपटाचं नाव होतं ‘गजाभाऊ’! पुढं लताजी १९४५ साली मास्टर विनायक कंपनीसोबत मुंबईला गेल्या आणि इथूनच त्यांनी आपली संगीत प्रतिभा आणखीन उज्वल होण्याकरीता उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. या दरम्यान लताला अनेक संगीतकारांनी तिच्या आवाजाची पातळ आणि कर्कशः अशी अवहेलना करत रिजेक्ट केलं कारण तिचा आवाज त्या दरम्यान पसंत केल्या जाणाऱ्या आवाजांपेक्षा अगदी भिन्न होता आणि त्याच सुमारास लताला त्याकाळच्या प्रसिध्द गायिका नुरजहांकरता देखील गाण्यास सांगीतलं जात होतं.

१९४८ ला मास्टर विनायक यांच्या मृत्युमुळं लताजींचा आणखी एक आधारवड कोसळला आणि मुंबईसारख्या ठिकाणी त्या एकाकी पडल्या. यामुळंच त्यांची सुरूवातीची वर्ष अत्यंत संघर्षपूर्ण राहीली. मास्टर विनायक यांच्या मृत्युपश्चात गुलाम हैदर यांनी लताला तिच्या कारकिर्दीत बरीच मदत केली. १९४८ साली मजदूर चित्रपटातलं ‘दिल मेरा तोडा मुझे कहीं का ना छोडा’ गीतानं लता मंगेशकरांना ओळख मिळाली यानंतर लगेच १९४९ ला आलेल्या ‘महल’साठी लतानं आपलं पहिलं सुपरहिट गीत ‘आयेगा…आयेगा…आयेगा आनेवाला...!' हे गायिलं. या गीतानंतर लताला मोठमोठ्या संगीतकारांच्या नजरेत ओळख मिळाली त्यामुळं तिला एकामागे एक अनेक गीतांच्या आॅफर्स मिळत गेल्या. १९५० साली लता मंगेशकरांना अनेक मोठे संगीतकार जसं अनिल विश्वास, शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, खय्याम, सलिल चौधरी, मदनमोहन, कल्याणजी आनंदजी, यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. लताजींच्या जीवनाचा टर्निंग पाॅइंट म्हणता येईल असा काळ तेव्हां आला ज्यावेळी संगीतकार सलिल चौधरी यांच्या ‘मधुमती’ चित्रपटातलं गीत ‘आजा रे परदेसी’ करीता सर्वोत्कृष्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा पहिला फिल्म फेयर अवाॅर्ड त्यांना मिळाला. या दरम्यान गानकोकीळा लता मंगेशकरांनी काही रागांवर आधारीत गीत जसं बैजु बावराकरिता भैरव रागातलं ‘मोहे भूल गए सावरियां...!’ काही भजनं जसं हम दोनो चित्रपटातलं ‘अल्लाह तेरो नाम...!’ सोबतच काही पश्चिमी चालींवरची जसं ‘अजिब दास्तां' गायिली होती. याच सुमारास आपल्या जादुई आवाजानं सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लतादिदींनी मराठी आणि तामिळसोबतच प्रादेशिक भाषामध्ये गीत गायनाला सुरूवात केली होती, तामिळ भाषेत त्यांनी ‘वानराधम’ करता ‘एंथन कन्नालन’ गायिलं होतं. यानंतर लतादिदींनी आपल्या भावासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्याकरता गीत गायन केलं, तो मराठी भाषेतला ‘जैत रे जैत' हा चित्रपट होता. याशिवाय लतानं बंगाली भाषेतल्या संगीताला आपल्या मधुर आवाजानं एक वेगळी ओळख मिळवून दिली. १९६७ साली लताजींनी ‘क्रांतिवीरा सांगोली’ चित्रपटात लक्ष्मण वेर्लेकर यांच्याव्दारे संगीतबध्द केलेलं गीत ‘बेल्लाने बेलागयिथू’ गात कन्नड भाषेत गीत गायनाला सुरूवात केली.

यानंतर लताजींनी मल्याळम भाषेत नेल्लू चित्रपटाकरता सलिल चौधरी यांनी संगीतबध्द केलेलं ‘कदली चेंकाडाली’ गीत गायिलं. नंतर कित्येक वेगवेगळया भाषेमध्ये गीत गायन करून त्यांनी आपल्या आवाजानं संगीताला एक नवी ओळख मिळवून दिली. यादरम्यान लता मंगेशकरांनी अनेक दिग्गज संगीतकारांसमवेत ज की, हेमंतकुमार, महेन्द्र कपुर, मोहम्मद रफी, मन्ना डे, सोबत मोठमोठे प्रोजेक्ट्स केलेत. या दरम्यान लताजींची कारकिर्द अत्युच्च शिखरावर होती, त्यांच्या सुमधुर आणि सुरेल आवाजामुळं त्या सिंगींग स्टार झाल्या होत्या, हा तो काळ होता जेव्हां मोठयातला मोठा निर्माता, संगीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक लता मंगेशकरांसमवेत काम करू इच्छित होता. १९६० चा काळ लताजींकरता यशानं भारलेला होता, या सुमारास त्यांनी ‘प्यार किया तो डरना क्या...!’ ‘अजिब दास्तां है ये...!’ या सारखी अनेक सुपरहिट गाणी गायिली. १९६० या वर्षाला सिंगर आणि म्युझीक डायरेक्टर लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि लताजींच्या संबंधांकरता देखील ओळखलं जातं, ज्यानंतर लतादिदींनी जवळजवळ ३५ वर्षांच्या आपल्या प्रदिर्घ कारकिर्दीत ७०० हून अधिक गाणी गायिली. लतादिदींच्या आवाजाची जादू १९७० आणि १९८० च्या दशकांवर देखील कायम राहिली. या काळातली त्यांचे किशोरकुमार यांच्या समवेत गायिलेली द्वंद्वगीतं फार लोकप्रीय ठरलीत. काही गीतं जसं ‘कोरा कागज...’ (१९६९), ‘आंधी’ चित्रपटातलं 'तेरे बिना जिंदगी से...' (१९७१), अभिमान चित्रपटातलं ‘तेरे मेरे मिलन की...’ (१९७३), घर चित्रपटाकरता ‘आप की आंखों मे कुछ...’ (१९७८) ही ती गीतं आहेत ज्यांना आजही ऐकल्यानंतर मनाला प्रसन्नता मिळते.

ही गीतं लतादिदींची सदाबहार गाणी आहेत या व्यतिरिक्त लतादिदींनी काही धार्मिक गीतंही गायिली आहेत. या काळात लताजींनी आपली ओळख संपुर्ण विश्वाला करून दिली होती. १९८० साली महानगायिका लताजींनी सचिन देव बर्मन यांचे चिरंजीव राहुल देव बर्मन अर्थात आर.डी. बर्मन यांच्यासोबत काम केलं. आर.डी.बर्मन लता मंगेशकर यांची लहान बहिण आणि हिंदी मराठी चित्रपटातील प्रसिध्द पाश्र्वगायिका आशा भोसलें यांचे पती आहेत. त्यांनी लताजींसमवेत अगर तुम ना होते चित्रपटातलं ‘हमें और जीने की...!’ राॅकी मधलं ‘क्यां यही प्यार है...’, मासुममधलं ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी...’ अशी सुप्रसिध्द गीतं बनवलीत. यानंतरच्या काही वर्षांपश्चात हळूहळू लताजींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांनी काही निवडक गीतांनाच आवाज देण्यास सुरूवात केली. लतादिदींनी आपल्या करीयरमध्ये केवळ चित्रपटांकरिताच गीतं गायिली असं नाही तर अनेक म्युझीक अल्बमही बनविलेत. १९९०च्या दशकात अनेक नव्या गायिका उदयाला आल्या परंतु जिच्या गळ्यात साक्षात सरस्वती विराजमान होती, मग तिच्याशी स्पर्धा कोण करू शकणार होतं. याकाळातही लता दिदींच्या आवाजाची जादू कायम राहिली आणि आजही लोक तितकेच प्रेम लताजींवर करताहेत जितके ७०, ८०, आणि ९० च्या दशकात करत होते. लता मंगेशकरांनी गायिलेल्या अविस्मरणीय गीतांमधील काही चित्रपट प्रसिध्द आणि विशेष उल्लेखनीय आहेत… अनारकली, मुगले आजम, अमरप्रेम, गाईड, आशा, प्रेमरोग, सत्यम शिवम् सुंदरम्… नव्या चित्रपटांमध्ये लताजींचा आवाज पहिल्यासारखाच नव्हें तर त्या आवाजाला आणखीनं चारचांद लागले. जसे हिना, रामलखन इत्यादी…एक काळ होता जेव्हां ‘बरसात’, ‘नागिन’, आणि पाकिजा चित्रपटातील गितं अजरामर झालीत… लतादिदींनी ३० हजाराहुन अधिक गाणी गायिली आहेत शिवाय सर्वभाषेत गीतं गाण्याचा किर्तीमान देखील त्यांच्या नावावर आहे.

लता मंगेशकर पुरस्कार –
लता दिदींनी केवळ कित्येक गीतकारांना आणि संगीतकारांनाच यशस्वी केलं असं नाही तर त्यांच्या सुरेल गाण्यांनी कित्येक चित्रपट सजले आणि खुप गाजले देखील! आपल्या कारकीर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय मानसन्मान प्राप्त झाले आहेत ज्यात भारताचा सर्वोच्च पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न चा सन्मान देखील समावेश आहे. या व्यतिरिक्त लताजींना गायनासाठी १९५८, १९६०, १९६५, आणि १९६९ ला फिल्म फेयर अवाॅर्ड प्राप्त झाले आहेत. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डस्’ तर्फे देखील त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे त्यांच्या नावे दरवर्षी१ लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. १९८९ ला लतादिदींना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला होता. लता मंगेशकर यांना आजवर मिळालेले इतर पुरस्कार.
फिल्म फेयर अवाॅर्ड पुरस्कार (१९५८, १९६२, १९६५, १९६९, १९९३, आणि १९९४ )
नॅशनल फिल्म अवाॅर्ड ( १९७२, १९७४ आणि १९९० )
महाराष्ट्र सरकार पुरस्कार (१९६६ आणि १९६७ )
पद्मभूषण १९६९
जगात सर्वाधिक गीतं गाण्याचा गिनीज बुक रेकाॅर्ड १९७४
दादासाहेब फाळके पुरस्कार १९८९
फिल्मफेयर जीवनगौरव पुरस्कार १९९३
स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार १९९६
राजीव गांधी पुरस्कार १९९७
एन.टी.आर.पुरस्कार १९९९
पद्मविभूषण १९९९
झी सिने जीवनगौरव पुरस्कार १९९९
आई.आई.ए.एफ. जीवनगौरव पुरस्कार २०००
स्टारडस्ट जीवनगौरव पुरस्कार २००१
भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘‘भारतरत्न’’
नुरजहा पुरस्कार २००१
महाराष्ट्र भूषण २००१

लता मंगेशकर यांना भारताच्या ६० व्या स्वातंत्र्यदिनाच्या प्रसंगी २००८ साली ‘'वन टाईम अवाॅर्ड फाॅर लाईफटाईम अचीव्हमेंट’नं गौरवान्वित करण्यात आलं होतं. भारतरत्न लता मंगेशकर भारताच्या सर्वात लोकप्रिय आणि सन्माननीय महागायिका होत्या त्यांची कित्येक दशकांची कारकिर्द विविध उपलब्धींनी भरलेली आहे. आपल्या आवाजानं लताजींनी ७ दशकांहून जास्त काळापर्यंत संगीतजगताला आपल्या सुरांनी सजविलं होतं. भारताच्या या गानकोकिळेनं अनेक भाषेतून हजारो गाणी गायिली आहेत. त्यांचा आवाज ऐकुन कधी कुणाच्या डोळयात अश्रु आलेत तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानाला हिम्मत मिळाली. लतादिदींनी अखेरपर्यंत स्वतःला पुर्णपणे संगीताला समर्पित ठेवलं होतं. लतादिदी एक लिजंड होत्या त्यांच्याबद्धल प्रत्येक भारतीयाला अभिमान, गर्व आहे. लतादिदींच्या आवाजातील नवी गाणी ऐकण्याकरीता आपण सर्वजण आजही आतुर होतो पण ते आता होणे नाही. लता मंगेशकर या विश्वातील एक अशा कलाकार आहेत….   त्यांच्यासारखा यापूर्वी झाला नाही, पुढे होणे देखील नाही….!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...