Saturday, 7 November 2020

भाजपेयींचा 'महाराष्ट्रद्वेष'...!


"पत्रकारिता हा आता धर्म राहिलेला नाही तर तो धंदा झालाय! असं म्हटलं जातं होतं पण त्याचा प्रत्यय आताशी सतत येतोय. अर्णब गोस्वामी पत्रकार-मालक आहे. त्याचं चॅनेल धंद्यात फायदा व्हावा म्हणून वाटेल ते चाळे करतोय. टीआरपी प्रकरणानं हे उघड झालंय. एका मराठी उद्योजकांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्यानं त्याला अटक झालीय. पण जणू पक्षाच्या नेत्यालाच अटक झालीय अशाप्रकारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपेयींनी प्रतिक्रिया दिल्यात, आंदोलनं केलीत. त्यामुळं त्यांच्या 'महाराष्ट्रद्वेष्टीपणा'ला आणखीच बळकटी आलीय. मराठी माणसांच्या मनातून ते उतरताहेत. फडणवीसजी, आपल्याला उज्ज्वल भवितव्य असताना, दिल्लीत महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी असताना हा 'महाराष्ट्रद्वेष' का करताहात? कंगना-अर्णबसारख्या 'महाराष्ट्रद्रोहीं'ची तळी उचलताना मराठी मन दुखवतंय हे समजत नाही का? अर्णबसारख्या 'भाटा'चं रक्षण करताना महाराष्ट्रतल्या पत्रकारांवर नोकऱ्या गमावण्याची पाळी आलीय, ते आत्महत्याग्रस्त बनताहेत. त्यांचं संरक्षण कधी करणार आहात?"-

---------------------------------------------------------------


*रि* पब्लिक मीडिया नेटवर्कचे मालक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेविषयी सध्या समाज माध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्रात चर्चा सुरू आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणातल्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचं नाव संशयित म्हणून आहे. अर्णबनं लाखो रुपये थकविल्यानं आत्महत्या केल्याचा उल्लेख त्या सुसाईड नोटमध्ये असल्यानं महाराष्ट्र सीआयडीनं अर्णबला ताब्यात घेतलंय. अटक केलीय. अर्णब हा गुन्ह्यात संशयित आहे. पण त्यावर पूर्वीच कार्यवाही होऊन प्रकरण 'अ समरी' बंद झालं होतं. ते प्रकरण २ वर्षांनी पुन्हा उकरून काढलंय. अर्थात याच मुद्द्यांशी संबंधित इतरही बाबी न्यायालयानं लक्षात घेऊन अर्णबला जामिनावर मुक्त केलं होतं. खरंतर यात अर्णब हा पत्रकार नाही. हे आधी ध्यानात घ्यावं लागेल. तो एका चॅनेलचा 'मालक' आहे. एका मालकानं काम करून घेतल्यानंतर सेवा देणाऱ्याचे लाखो रुपये थकवले होते, असं सुसाईड नोटवरून दिसतं. सेवा देणारा आर्थिक अडचणीत होता त्यातून आत्महत्येचा प्रकार झालाय. आत्महत्या करणाऱ्यानं तसं लिहून ठेवलंय म्हणून काम करून रक्कम थकविणाऱ्या मालकाला पोलिसांनी अटक केलीय. अर्णब प्रकरणामुळं माध्यमातील मालकांच्या अधिकृत आणि अनधिकृत मालमत्ता धारणाचा मुद्दाही समोर आलाय. माध्यम जगातील जुने शेटजी आणि आताचे कार्पोरेट कॉलरवाले मालक यांनी ज्या पद्धतीनं नोकरदार पत्रकारांचा छळ मांडलाय, तो लक्षात घेता भांडवलदार अर्णबच्या चेहऱ्यात इतरही माध्यमांचे मालक दिसतात. ही मंडळी मालमत्ता बनवायला पैसा खर्च करतात पण कर्मचाऱ्यांना वेठबिगार समजतात. वृत्तपत्रातील, चॅनलमधील, विविध प्रसिद्धी माध्यमांचे, इतर प्रकाशनांचे पत्रकार. यांच्या व्यथा आज भयावह बनल्या आहेत. माध्यमांतील मालक आणि अर्णब हे एकाच माळेचे आहेत. अर्णबमुळं जशी एकाला आत्महत्या करावी लागलीय. तशीच गेल्या वर्षभरात वृत्तपत्रे, चॅनल आणि इतर माध्यमात नोकऱ्या गमावलेल्यांची अवस्थाही आत्महत्येकडं निघालेल्यागत झालीय. अर्णब गोस्वामी प्रकरणापेक्षा हे अधिक भयंकर आहे. अर्णब प्रकरणी भाजपनं घेतलेली भूमिका राजकीय आहे. गुन्ह्यात संशयित भांडवलदार मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेताना सरकाराला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला त्रास दिला जातोय असं फसवं चित्र निर्माण केल्याचं दिसतंय. अर्णब हा पैसे थकवणारा चॅनेल मालक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. भाजपनं आता पत्रकारावरील अन्यायाबाबत भूमिका घेतलीच आहे. हे बरंच झालं. महाराष्ट्रात वर्षभरात मराठी माध्यमात किती पत्रकारांच्या नोकऱ्या हिरावल्या गेल्या यावर भाजपनं काम करावं. भाजपचे '४० पैसे पोस्टवाले ट्रोलर' विरोधातील पत्रकारांवर काय काय टीका करतात हे सुद्धा पाहावं. करार पद्धतीमुळं माध्यमांमध्ये कायम नोकरी आणि वेतन आयोगानुसार वेतन हे विषय बंद झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र दाखवून पत्रकारांच्या कुठेही बदल्या केल्या जाताहेत.अर्णबची तळी उचलणाऱ्यांनी इतरही पत्रकारांचे प्रश्नही लक्षात घ्यावेत. अर्णब आपला 'भाट' आहे म्हणून रस्त्यावर उतरणं हा दांभिकपणा झालाय!

भाजपेयींच्या काळात सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन आजवर अनेकांना अटक केली गेलीय, द वायर, एनडीटीव्ही, द प्रिंट, मॅक्स महाराष्ट्र यासारख्या माध्यमांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला गेलाय, तेंव्हा मात्र आज गळे काढणाऱ्या भाजपच्या नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही. पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या, तमाशापटातल्या 'अभिनेत्यावर' कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवलंय. याच 'अभिनेत्या'मुळं एका सामान्य व्यक्तीनं आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप असो, 'सोशल मीडिया हब' फेसबुकसारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्रानं केलेला प्रयत्न असो किंवा पत्रकारांचा हक्क हिरावून घेणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा? भाजप किती दिवस अशा दोन डगरींवर हात ठेवून आपलं राजकीय पोट भरणार आहे? विशेष म्हणजे ही काही त्यांच्याप्रमाणे सुडानं केलेली कारवाई नाही, तर कायदेशीर प्रक्रिया आहे. असं असतानाही पोलिसांच्या कारवाईविरोधात एवढे गळे काढण्याचं कारण समजत नाही! दुसरीकडं 'आम्हाला जे विरोध करतात, ते या देशाचे शत्रू', असं वातावरण भाजपेयींनी देशात तयार केलंय. राष्ट्रवादाची, देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटणं मग सुरू झालंय. 'तुमचा या देशालाच विरोध आहे ना. मग तुम्ही जा हा देश सोडून!', असा आक्रमक खोटा प्रचार सुरू झालाय. मोदी विरोधकांची त्यातून मोठी पंचाईत झालीय. अगदी असंच वातावरण महाराष्ट्रात भाजपेयींच्या विरोधात उलटलंय. शिवसेनेसह महाविकास आघाडीला विरोध म्हणजे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या अस्मितेला विरोध, असं चित्रं इथं तयार झालंय. शिवाय, 'भाजप म्हणजे महाराष्ट्रद्वेष्ट्यांची फौज आहे', असं वातावरण तयार झाल्यानं, भाजपची आता मोठी कोंडी झालीय. भाजपनं स्वतःहूनच ही वेळ आणलीय. असं वातावरण तयार करण्यात भाजपविरोधकांचा हा मोठा विजय झालाय असं म्हणायला हवाय. अर्थात, या तात्कालिक वातावरणाच्या पलिकडं जाऊन व्यापक राजकारण घडवण्याचं आव्हान समोर उभं आहे. त्यासाठी राजकारणाची स्वतंत्र शैली विकसित करावी लागणार आहे. राजकारणाच्या आखाड्यातल्या कुस्तीपेक्षाही वेगळं असं विचारनिष्ठ पक्षसंघटन, दमदार केडर महाराष्ट्रभर उभं करण्याचं खरं आव्हान आज आहे. त्यातही शिवसेनेच्या मानानं कॉंग्रेस, राष्ट्रवादीला ही संधी सर्वाधिक आहे.

बिहारमधल्या निवडणुकीसाठी भाजपचे तिथले प्रभारी बनलेले राज्याचे विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस हे मराठी आहेत, भाजपधील आजच्या पिढीतील अत्यंत हुशार, आक्रमक, प्रशासनाची उत्तम जाण असलेले नेते आहेत. त्यांचं राजकीय भवितव्य देखील उज्जवल आहे. भविष्यात ते दिल्लीत गेले तर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी तो एक सन्मान असेल, महाराष्ट्राचं नाव दिल्लीत मोठं होणार आहे. प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी दिल्लीतील अभिमान होऊ शकत नाही. त्यांना जनाधार नाही. त्यांचं नेतृत्व हे कार्यालयीन नेतृत्व आहे. नितीन गडकरी यांना मोदी-शहा यांच्याकडून पद्धतशीरपणे संपवण्यात येत आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणी मराठी नेता दिल्लीत पाय रोवून उभा आहे, असं आजतरी दिसत नाही. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राच्या फार अपेक्षा आहेत
दुर्दैवानं, फडणवीस सध्या अशा मुद्द्यांवर राजकारण करताहेत, ज्यातून ते महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी खलनायक ठरताहेत. ही प्रतिमा तयार होण्यात जितकी त्यांची सोशल मीडिया टीम कारणीभूत आहे, तितकंच ते स्वतःही आहेत. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण असो, कंगना राणावतची महाराष्ट्रद्रोही भूमिका असो किंवा अर्णब गोस्वामी अटक प्रकरण असो. या साऱ्या घटनांत फडणवीस यांची भूमिका, त्यांचं ट्विट हे वादग्रस्त ठरले आहेत. चुकीच्या व्यक्तींसाठी फडणवीस यांनी महाराष्ट्र हिताच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसतेय. यातून, त्यांची खलनायक ही प्रतिमा आणखी ठळक होण्यास मदतच झालीय. सोशल मीडियाचं भूत भाजपनं निर्माण केलंय. आज हेच भूत भाजपच्या कसं अंगलट येतंय, हे तपासून बघायचं असेल तर देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश जावडेकर यांच्या ट्विटवर कशा शब्दात प्रतिक्रिया आल्या आहेत, ते या दोन्ही नेत्यांनी एकदा वाचाव्यात. आपल्या ट्विटला शेकडोनं लाईक्स मिळाल्या, अमक्या तमक्या संख्येनं आपले ट्विट हे रिट्विट झाले, या समाधानात भाजपचे नेते आणि त्यांची पेड टोळी खुश असते. या मोहाला फडणवीस यांच्यासारखे नेते बळी पडतात, हे दुर्दैव आहे. वास्तविक, फडणवीस यांचं भलं व्हावं असं वाटणारा त्यांचा कर्मचारी, अधिकारी असेल, जो हे ट्विटर हँडल सांभाळतो त्यानं फडणवीस यांना सल्ला द्यायला हवा की अर्णबबाबतीतलं ट्विट तातडीनं काढून टाका आणि झाली तेवढी स्वतःची बदनामी थांबवा. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना हे कळत नसेल का की, यांच्या ट्विटवर सकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक हे मराठी किंवा महाराष्ट्रीय नाहीत, तर महाराष्ट्र द्वेषानं पछाडलेले उत्तर भारतीय आहेत. फडणवीस यांनी एक बाब विसरू नये की ते दिल्लीत गेले तरी त्यांना महाराष्ट्रातूनच निवडून जायचं आहे. त्यांचे राजकीय लागेबांधे महाराष्ट्रातच आहेत, मग का म्हणून आपल्याच राज्याचा द्वेष करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं याला ते कवटाळून बसले आहेत?

महाराष्ट्राला उज्ज्वल विरोधी पक्ष नेत्यांची परंपरा आहे. राजकारण करावंच लागतं, सत्ताधारी पक्षाला अडचणीच्या मुद्द्यावर धारेवर धरावंच लागतं. पण, फडणवीस यांनी सकारात्मक विचारधारेतून सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणलं असतं, तर महाराष्ट्रानं त्यांना डोक्यावर घेतलं असतं. अर्णब गोस्वामी याचं नाव एका आत्महत्या प्रकरणात घेतलं गेलंय. आत्महत्या करणारी व्यक्ती ही मराठी व्यावसायिक होती. अर्णबला झालेली अटक ही पत्रकारितेवर झालेला हल्ला नाही. त्यामुळं कुठलीही पत्रकार संघटना अर्णबच्या अटकेचा निषेध करणार नाही. भाजपनं आपला विवेक शाबूत ठेवून, ते कोणाची बाजू घेत आहेत याचं भान ठेवायला हवं. बिहारी लोकांना खुश करण्याच्या नादात महाराष्ट्रातील पाया कमकुवत होत नाहीये ना, याचा त्यांनी विचार करायला हवा. आज एका पत्रकारामुळं मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलंय, एका मुलीच्या डोक्यावरील बापाचं छत्र गेलंय याचं काहीच नाही का? मराठी माणूस म्हणून भाजप नेत्यांना यांना फक्त सुपारी घेऊन काम करणारा पत्रकार पाहिजे का नक्की तो कोण आहे भाजपचा? कंगना मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त कश्मीर करते तरीही यांचा पाठिंबा कंगनालाच का? मग कशासाठी अमराठी माणसाबद्धल पुळका आणताय फडणवीसजी? मुंबईला गुजरातला जोडण्याचा कटकारस्थानांमुळं बाकी काही नाही अहो, मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांची तर आठवण ठेवायची का फक्त आठवण निवडणुकीत येते. तुम्हाला छत्रपती शिवरायांनी उभा केलेला महाराष्ट्र त्याचेच तुम्ही तुकडे पाडायला निघालात फडणवीसजी तुम्ही म्हणून तर जास्तच किव येते तुमच्या राजकारणाची बायकोला टिवटिव करायला लावून राजकारण का करताय? चंद्रकांत पाटील सध्या त्यांचा तर उर नुसतं भरून आलंय त्यांना काय बोलू आणि काय नाही असं झालंय. ज्यांना स्वतःच्या तालुक्यात निवडून येण्याचा भरोसा नाही त्यांनी तर बाकीच्या राजकारणावर अन्यायावर बोलूच नये!

हरीश केंची
harishkenchi@gmail. com

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...