Sunday, 23 April 2017

भाजपची भगवी काँग्रेस झालीय...!

*भाजपची भगवी काँग्रेस झालीय!*


इन्ट्रो......

"महाराष्ट्राच्या राजकारणात आता रंग भरू लागलाय. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सत्तासुंदरीसाठी सुंदोपसुंदी सुरु झालीय. कधी स्वतंत्र्यरित्या तर कधी सत्ताकांक्षी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या साथीनं आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. यात कोण अधिक भ्रष्टाचारी, कोण अधिक दुराचारी यावर एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. या दोघांच्या तुलनेत इतर पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही. पण मतदार शांतपणे सारे काही न्याहाळतो आहे."

काँग्रेस हा लुटारूंचा पक्ष तर आमचा समाज सुधारकांचा. असा टेंभा भाजप नेहमीच मिरवत आलीय. त्याच स्टाईलीत काँग्रेसमध्ये बेशिस्त, बेजबाबदार, बदमाश भरलेत. आमच्या पक्षात मात्र निष्ठावान, शिस्तप्रिय, सेवाभावी कार्यकर्ते असा दावाही केला जातोय. काँग्रेसमधला गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ हा नेहमी रंगणारा खेळ! हे चालायचंच असं लोकांनी मानलं होतं. एकंदरीने काँग्रेसपक्ष, त्यातले वाद,त्यातले गोंधळ, त्यातली गटबाजी, त्यातली घराणेशाही सगळं काही आपल्याला सुपरिचित आहे. पण शिस्तबद्ध, निष्ठावान, सेवाभावी कार्यकर्त्यांचं संघटन असं ज्यांच्याबद्धल गोड गोड स्वप्न रंगवलं जात होतं, त्यांनी आता काँग्रेसला प्रभावी पर्याय देण्याचा चंग बांधला आहे.
राजकीय पक्षाला एक चेहरा असतो, भाजपचा चेहरा हा सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष! भाजपचा आमदार नगरसेवक कधी फुटणार नाही, कार्यकर्ता पदासाठी कधी भांडणार नाही, असा एक नावलौकिक होता. व्यंग्यचित्रकारांनी शेंडीवाला भटजी वा  ढेरपोट्या शेठजी असं भाजपचं प्रतीक ठरवलं होतं. त्यातही पवित्रता आणि सुसंस्कृतता व्यक्त व्हायची. सर्वच क्षेत्रातली भल्यांची मंदी आणि बुऱ्याची तेजी राजकारणात येणारच. एकेकाळी काँग्रेसवाल्यांनी हाताळलेले 'व्यवहारवादी' यशवंत राजकारण आता भाजप मोठ्या ताकदीने हाताळत आहे.

त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडे सध्या इन्कमिंग जोरात सुरु आहे. कसलाही विचार न करता, विधिनिषेध न बाळगता आपलं साधनसुचितेचं धोरण बाजूला सारून इतर पक्षातल्या सत्ताकांक्षी मंडळींना त्यात गुन्हेगारही आले, त्यांचं स्वागत करण्यासाठी भाजपेयी मुख्यमंत्री सरसावले आहेत. हे असं का घडतंय, कोण घडवतयं हे आपण जर पाहिलं तर एक लक्षात येईल की, भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी 'पक्षविस्तार' या गोंडस नावाखाली दुकान मांडलंय. त्यांनी ती 'भगव्या काँग्रेस' च्या दिशेने वाटचाल सुरु केलीय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे पक्के राजकारणी, त्यांनी त्यांचं गल्ल्यावरचं डोकं इथं वापरलंय. अगदी व्यापारी हिशेबाने पक्षाची वाटचाल सुरु ठेवलीय. आजवर राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर भाजप हा इतर सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत तसा अस्पृश्य गणला जात होता. ते संपविण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी नगरपालिका, महापालिका स्तरावर जी 'शेठजी भटजी' यांचा पक्ष अशी जी प्रतिमा निर्माण केली गेलीय ती संपविण्याचा चंग बांधलाय. सर्वच पक्षातील सर्व तऱ्हेची मंडळी गोळा केली जाताहेत. त्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीत 'नगराध्यक्ष' थेट लोकांतून निवडून आणणे तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग या माध्यमातून निवडणूक. हा सारा प्रकार म्हणजे विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपची स्थिर आणि कायमची अशी मतपेढी निर्माण करणे. याशिवाय नव्याने आलेली आणि सत्तेमुळे भारावलेली अशी वय वर्ष ४० ते ५० या मध्यमवयीन मतदारांच्या दुसऱ्या पिढीसाठी सुरक्षित असे वातावरण तयार करणे. त्याचबरोबर तिसऱ्या पिढीतले म्हणजे ३० ते ४५  या वयोगटातील तरुणांसाठी सत्तेबाबत पोषक अशी स्पर्धा निर्माण करणे. याचबरोबर मोदी आणि शहा यांना पक्ष स्वयंपूर्ण करायचा आहे. पूर्वीचा जनसंघ वा आत्ताचा भारतीय जनता पक्ष ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची राजकीय शाखा वा अंग म्हणून ओळखली जातेय. त्यामुळे पक्षाला मतदारांच्या थेट संपर्कासाठी संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहावे लागत आहे. पक्षाचं हे परावलंबित्व झुगारुन यापुढे स्वतः ची अशी स्वतंत्र संपर्क प्रणाली उभी करणे, ज्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क राहील आणि पक्ष संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहणार नाही अशी दक्षता घेतली जाते आहे. यासाठी त्यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागात सत्तेचा वापर, साम,दाम,दंड,भेद अशी सर्व आयुधे वापरून ग्रामीण नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी लक्ष घातलंय, सर्वप्रथम जसे जमेल तसे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधली सत्तास्थान बळकावणे. आजवर भाजपपासून दूर राहिलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांमध्ये भाजपच्या नेतृत्वाबाबत आकर्षण निर्माण व्हावं म्हणून पक्षाला आणि पक्षाची उमेदवारी देताना संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना दूर ठेवून, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून वाटचाल करणे. जिथे अरे का का रे करावे लागणार आहे तिथे 'साधनसुचिता' गुंडाळून ठेवून तिथे तशाच प्रकारच्या गुंडाला उमेदवारी देणे, यापूर्वी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या प्रादेशिक पक्षाशी युती, आघाडी केली आहे, तिथे त्या पक्षाची ताकद ठरविण्याचा अधिकार अबाधित ठेवणे. याचा अर्थ ज्या प्रादेशिक पक्षाची युती करायची त्यांचे गुण अवगुण आपल्यात भिनवायचे प्रसंगी त्या पक्षाप्रमाणेच रूप धारण करून मतदारांसमोर जायचे. आणि पक्षविस्तार करताना सत्तेसाठी म्हणून काँग्रेसच्या वाट्यावर वाटचाल करणे. ही धोरणं ठरलेली दिसतात.

पैशाचा भाजपला आता तोटा नाही, त्यांचे कट्टर घडवलेले कार्यकर्ते अजूनही प्रत्यक्ष पटावर येण्याचा हट्ट न धरता मागे राहूनच कार्य करीत आहेत. खरं तर सत्तानाश घडवण्याचा कटू अनुभव 'जनता प्रयोगा'त एकदा झालाय भाजप तो पुन्हा करणार नाही. स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी प्रसंगी 'भगवी काँग्रेस' होण्यासाठी त्यांची चाललेली ही वाटचाल आपण पाहतोच आहोत.

- हरीश केंची

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...