Saturday 13 April 2024

'राजा'ज्ञा : भ्रम आणि संभ्रम....!

"अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी भाजप वा महायुतीला पाठिंब्याचा ब्रही न काढता 'कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा...!' जाहीर केला. आणि महायुतीवर टीका करण्याचा अधिकार राखून ठेवला. राज यांची प्रत्येक निवडणुकीत बदलती भूमिका ही अनाकलनीय नाही तर, ज्या बाजूला उद्धव ठाकरे जातील त्याच्या विरोधात उभं राहायचं असं राज यांचं सूत्र दिसून येतं. आधी उद्धव भूमिका घेतात मग त्यानुसार राज यांची प्रायोरिटी प्राथमिकता दिसून येते. आताही असंच घडलंय. कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याची आज्ञा त्यांनी केली. पण आधीच गोंधळलेल्या महायुतीच्या जागावाटपात मनसेला स्थान किती असणार? त्यामुळं राज यांनी मोदींच्या पाठिंब्यानं जो भ्रम निर्माण केलाय त्यामुळं आणि राजकीय भूमिकांच्या धरसोडवृत्तीने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय!"
--------------------------------------------
*म* हाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्धिमाध्यमांनी उत्सुकता ताणलेल्या मनसे म्हणजे राज ठाकरे यांच्या  काय घडलंय आणि काय घडतंय...! या शिवाजी पार्क वरच्या सभेला नेहमीप्रमाणे गर्दी ही होतीच. राजच्या सभांना सामान्यांच्यापेक्षा माध्यमांचच अधिक लक्ष असतं. परंतु राज ठाकरे यांनी गाजावाजा करून भाजपचे चाणक्य अमित शहा यांची जी दिल्लीत जाऊन भेट घेतली, त्यात नेमकं काय घडलं हे ते सांगणार होते पण तसं काही घडलं नाही. त्या भेटीबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही नेहमीच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्यांनी आपल्या ३४ मिनिटांच्या भाषणात अखेरची दोन वाक्ये महत्वाची ठरली. 'मोदींना बिनशर्त पाठिंबा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा...!' त्यामुळं त्यांच्या त्या सभेतून महाराष्ट्र सैनिकांचा भ्रमनिरास झाल्याचं जाणवलं. काय घडलंय आणि काय घडतंय...! अशा जाहिराती करून राज यांनी आपल्या भाषणांला एक वेगळं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळं सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळं राज यांचा तो भ्रम ठरला तर कार्यकर्त्यांत संभ्रम! गेल्या महिन्यात 'अखेर राज लवंडले.....!' या मथळ्याखाली लेख लिहिला होता त्यानुसार राज यांनी 'मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला!' ते अभिप्रेतही होतं, पण मोदींना पाठींबा देताना त्यांनी महायुतीला पाठिंबा वा महायुतीत जाणार हे स्पष्ट केलं नाही. तो त्यांनी आपला शब्द राखून ठेवला. महायुतीतल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपही यांच्यावर वेळप्रसंगी टीका करण्याचा आपला अधिकार राखून ठेवलाय, हे इथं नमूद केलं पाहिजे. प्रारंभी त्यांनी आपला स्वाभिमान जागा करून आपण शिंदेंच्या शिवसेनेचा ताबा घेणार नाही. मी माझं अपत्य मनसे आणि कष्टानं मिळवलेलं इंजिन चिन्ह सोडणार नाही, हे सांगताना त्यांनी शिंदे यांच्याबद्दल जे 'शी..ss !' असं जे म्हटलं त्यातून त्यांना काय अभिप्रेत आहे हे दिसून आलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातले काही घडलं आणि घडतंय यावर त्यांनी जे भाष्य केलं ते महत्वाचं आहे. त्याला त्यांनी  'राजकीय व्यभिचार' असा शब्द वापरला आणि लोकांना आवाहन केलं की, या राजकीय व्याभिचाराच्या विरोधात मतदान करा...! म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे स्पष्ट होत नाही. व्यभिचार जर शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलं असेल तर, ती करायला लावणारी त्यामागची महाशक्ती भाजप ही व्यभिचारी नाही का? मग महशक्तीचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा राज कसे काय देतात? त्यांच्या मते उद्धव आणि शरद पवारांनी राजकीय व्यभिचार केलाय असं म्हणणं असेल तर त्यांना मतं देऊ नका असं सांगणं राजना शक्य होतं, मग त्यांनी राजकीय व्यभिचार संबोधून महायुतीला देखील लक्ष्य केल्याचं दिसतं. राज हे लोकसभा निवडणूक लढवत नाहीत तरी देखील एकदा मोदींवर 'लाव रे तो व्हिडिओ...!' म्हणत कडाडून टीका केली होती. आता मोदींना बिनशर्त पाठींबा देत महाविकास आघाडीला लक्ष्य करणार आहेत. त्यांच्या या सततच्या बदलत्या भूमिकांमध्ये कार्यकर्त्यात संभ्रमावस्था आहे.
देशाची दिशा ठरवणाऱ्या लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाग न घेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. या त्यांच्या भूमिकेनं मनसैनिक द्विधा अवस्थेत असून लोकसभा निवडणूक लढणार नाही तर मग विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितलं असल्यानं कार्यकर्त्यांत संभ्रमाचं वातावरण आहे. हे संभ्रमाचं कोडं कार्यकर्त्यांना सुटता-सुटत नाहीये. विशेषतः येत्या काळात मनसे लोकसभेनंतर कुठली निवडणूक लढवणार की नाही?, निवडणूक रिंगणात उतरला तर उमेदवार उभे करणार की नाही? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आता कोणता झेंडा हाती घेणार? पक्षाचा की महायुतीचा? प्रत्यक्ष प्रचारात सहभागी व्हायचं की नाही? राज ठाकरे सभा घेणार की नाहीत? अशा मोठ्या निवडणुकीत पक्षातल्या नेतेमंडळींची भूमिका काय असणारंय? अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ कार्यकर्त्याच्या मनात घोंघावतंय. त्यामुळं हा कार्यकर्त्यांच्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. राज ठाकरे यांनी १५ दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीयमंत्री अमित शहा यांची दिल्ली दरबारी भेट घेतल्यानंतर विविध चर्चाना उधाण आलं होतं. ते लोकसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवतील असे अनेकांना वाटत होतं. मात्र, राज यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमितानं पक्षाची भूमिका जाहीर करताना २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवलाय. त्यांची भूमिका अजूनही तळ्यात-मळ्यातच दिसतेय. आजवर राज यांची भूमिका पक्षनिर्मितीपासूनच तळ्यात-मळ्यात अशीच राहिलीय. त्यामुळं त्यांना पक्ष निर्माण करून १८ वर्षे झाली असली तरी त्यांनी कोणासोबत जायचंय? हे ठोस ठरवलं नसल्यानं अडचणी येताहेत. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्यानं त्यांच्या भूमिकेविषयी नेहमीच संभ्रम पाहण्यास मिळतो. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढवल्या होत्या. २००६ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज यांच्या नवख्या मनसेनं पहिल्याच फटक्यात २७ नगरसेवक निवडून आले. नाशिक महापालिका ताब्यात घेतली. पुणे महापालिकेत २८ नगरसेवक निवडून आले होते, तर २००९ मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. राज यांच्या या नेत्रदीपक यशामुळे शिवसेनेसमोर आव्हान उभं झालं होतं. मात्र, यशाची ही घोडदौड राजना पुढे कायम ठेवता आली नाही. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची भूमिका बदलत गेल्यानं यशाचा आलेख खालावत गेला. 
आज महायुतीला राज यांची गरज नाहीये तर राज यांना महायुतीची गरज आहे. कारण महायुतीत आता एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले यांच्या बरोबरच इतर अनेक छोटे पक्ष आले आहेत. भाजपचे १०५, शिंदेंचे ५०, अजित पवारांचे ४० अपक्ष १२ अशी मोट महायुतीकडे असल्यानं त्यात मनसेचा शिरकाव विधानसभा निवडणुकीत कसा होईल? मनसेचा विधानसभा, महापालिका निवडणुकीत फायदा व्हावा म्हणूनच राज यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला असावा. पण लोकसभा निवडणुकीत राज यांची काही भूमिका असावी अशी स्थिती राहिलेली नाही. २०१९ मध्येही त्यांनी स्पष्ट केलं होतं की, लोकसभेच्या निवडणुका लढवणार नाही, पण त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन 'आपल्याला स्वातंत्र्य १९४७ मध्ये मिळालं, त्यानंतर १९७७ मध्ये आणीबाणीच्या विरोधात दुसरं स्वातंत्र्य मिळालं, आता पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशाच्या राजकीय पटलावरून नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दूर करायला हवं....! असं आवाहन करत 'लाव रे तो व्हिडिओ' या इले्ट्रॉनिक्स प्रचारानं धमाल उडवून दिली होती. आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेसला पूरक भूमिका घेतली होती. आता नेमकं त्याच्या विरोधात भूमिका घेताहेत, ही त्यांची, त्यांच्या पक्षाची गरज आहे. तो देखील पुढे येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत तुम्हाला काही मदत करू असं आश्वासन मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज यांना मिळणारा पाठींबा हा फ्लोटिंग असा आहे. त्यात सातत्य राहिलेलं दिसत नाही. याशिवाय त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेलेत. पक्ष स्थापना करताना व्यासपीठावर केवळ शिशिर शिंदे होते, ते बाहेर पडलेत. याशिवाय प्रवीण दरेकर, राम कदम, अवधूत वाघ, शिरीष पारकर, दीपक पायगुडे, संजय धाडी, वसंत मोरे, हाजी अराफत अशी अनेक नावं घेता येतील. २००६ पासून मनसेची जी वाटचाल आहे त्यात एक एक जण बाहेर पडलाय. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश चव्हाण अशी काहीजण सोबत आहेत पण तळागाळातले कार्यकर्ते हे फ्लोटिंग असल्याचं दिसून येईल. कार्यकर्तेही पक्ष सोडून जाताना दिसताहेत. मुंबई महापालिकेतल्या ७ नगरसेवकांपैकी ६ जण शिवसेनेत गेले. पुण्यातही २८ जणातून २ नगरसेवक राहिलेत. नाशिकमध्ये अशीच अवस्था आहे. ही पडझड का होतेय? ही वस्तुस्थिती नाकारता येतं नाही. राज यांच्या सभांना गर्दी होते, त्यांच्यामागे लोकभावना आहे, त्यांना गर्दी जमवावी लागत नाही, त्यांचं वक्तव्य अमोघ आहे. पण लोकांमध्ये मिसळणं, कार्यकर्त्यांना वेळ देणं हे त्यांना फारसं जमत नाही. त्यामुळं कार्यकर्ते, नेते दुरावले जाताहेत हे लक्षांत येऊनही त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. कार्यकर्ते फक्त आंदोलनासाठी वापरले जातात. टोल विरोधी, मशिदीवरचे भोंगे बंद करण्यासाठी, मराठी पाट्यासाठी अशा आणि इतर आंदोलनापुरतेच ते मर्यादित राहिलेत. त्या आंदोलनांचे मतांमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. हे राज यांनाही समजून आलंय, त्यांनी आपल्या अनेक सभातून असं सांगितलंय की, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना देखील ४०-५० वर्षे गर्दी होत असे पण त्याचं मतांमध्ये रुपांतर व्हायला कालावधी जावा लागला. तसा सूर अद्यापि राज यांना सापडलेला नाही. लाखोंची सभा झाली म्हणजे मतं मिळतात असं काही नाहीये पण कालांतराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी यांना जशी मतं मिळाली तशी आम्हाला मिळतील. हा भाबडा आशावाद दिसून येतो. १८ वर्षाचा कालावधी लोटला पण अद्याप तसा योग आलेला नाही. त्यांना २००९ मध्ये जे यश मिळालं ते शिवसेना भाजप यांच्या युतीच्या काळात. कारण ज्या भाजपच्या आणि संघाच्या स्वयंसेवकांना युती नको होती म्हणून त्यांनी मनसेला ती मतं दिली. मात्र २०१४ मध्ये शिवसेना भाजप युती तुटली त्यानंतर भाजप, संघाची मतं ही पुन्हा भाजपकडे गेली. त्यानंतर मनसेची जी घसरण झाली ती झाली. आज मितीला केवळ १.५ टक्के मतं मनसेकडे आहेत. त्यावर भाजपचा डोळा आहे. त्यासाठी राज यांना गोंजरलं जातंय. 
राज यांची भूमिका सातत्यपूर्ण राहिलेली नाही. मोदींचा स्वीकार, त्यांना प्रधानमंत्री करण्याची मागणी, नंतर त्यांना राजकीय पटलावरून दूर करण्याची भूमिका, आता पुन्हा कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठींबा या बदलत्या भूमिकांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर जसा प्रश्नचिन्ह उभं राहतो तसाच तो कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करतं. २०१९ मध्ये मोदींचे वाभाडे काढले ते खरं होतं की, आजची भूमिका खरी आहे? असं वाटणं स्वाभाविक आहे. वाढती महागाई, तरुणांच्या बेकारीचा प्रश्न, शेतकऱ्यांची आंदोलनं, महिला खेळाडू आणि मणिपूरमधल्या महिलांची विटंबना, इलेक्टोरल बॉण्ड्स मधला भ्रष्टाचार, पीएम केअर फंडाचा गैरवापर अशा अनेक बाबींचा देशभरात उहापोह होत असताना त्याबाबत मौन बाळगत मोदींना पाठिंबा देणं कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही म्हणूनच कार्यकर्ते मग वसंत मोरे असोत वा किर्तिकुमार शिंदे असोत असे अनेक बाहेर पडताहेत. इथं कार्यकर्त्यांची गोची होतेय, कारण त्यांना लोकांमध्ये जाऊन मतं मागावी लागतात तेव्हा मतदारांच्या 'तुमचे नेते सतत भूमिका बदलत असतात..!' अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. राज यांना शिवाजी पार्कच्या सभेत मोठा प्रतिसाद मिळतो, टाळ्या मिळतात, मात्र कार्यकर्त्यांना जनमाणसांत जावं लागतं त्यामुळं ते भांबावले आहेत. पाच वर्षांपूर्वी आपण 'मोदी शहा हटाव...!' म्हणत होतो मग आता त्यांनाच मतं द्या असं कोणत्या तोंडानं म्हणणार? यावर राज यांचं म्हणणं आहे की, 'केवळ मीच नाही तर सगळ्याच पक्षांनी आपली भूमिका बदललीय. देवेंद्र फडणवीस यांनी आपद् धर्म, शाश्वत धर्म अश्या कोणत्याच स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती नाही म्हणजे नाही.... अजित पवार चक्की पिसिंग अँड पीसिंग...! म्हटलं होतं. आता ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. शरद पवारांनी शिवसेनेवर गेली ३०-४० वर्षे जातीयवादी म्हणून टीका केलीय. काँग्रेसनं देखील शिवसेनेवर टीका केलीय. तसंच शिवसेनेनेही काँग्रेस, राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. आज मात्र ते एकत्र आलेत. मग मलाच का लक्ष्य केलं जातंय....?'
 २००९ च्या निवडणुकांपासून आजवर पहा राज हे उद्धव यांच्या विरोधात भूमिका घेत आलेत. मध्यंतरी त्यांनी शरद पवारांची मुलाखत राज यांनी घेतली होती,  त्यावेळी त्यांनी पवारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता, पण उद्धव ठाकरे हे पवारांबरोबर गेल्यानं त्यांचा हिरमोड झाला, त्यामुळं ते आता मोदींसोबत निघालेत. त्याचं एकमेव कारण हे आहे की, उद्धव हे आज मोदींच्या विरोधात उभे ठाकलेत. २०१९ पासून उद्धव विरोधात जाताच राज यांची भाजपशी जवळीक वाढली. मग हिंदुत्व स्वीकारणं, मशिदींवरील भोंगे, भगवी शाल गुंडाळून महाआरती करणं, हनुमान चालीसाचं पठण अशा हिंदुत्वाच्या भूमिका घ्यायला सुरुवात केली. याचा अर्थ असा की, राज यांची प्रायोरिटी ही काय असावी हे जणू उद्धव ठाकरे ठरवताहेत. असा त्याचा अप्रत्यक्ष अर्थ होतो. त्यामुळं राज यांना मोदींचं प्रेम उफाळुन आलंय वा त्यांची भूमिका, धोरणं, देशाचा विकास, त्यांचा अजेंडा पसंत पडलाय असं काही नाही, तर केवळ आणि केवळ उद्धव यांना विरोध म्हणूनच राज असे मोदींच्याकडे लवंडलेत! असा त्यांचा फॉर्म्युला आहे. विधानसभेच्या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा मात्र राज यांचा कस लागणार आहे. तेव्हा भाजप म्हणेल तसे मनसे, त्यांच्या बाजूला झुकलेले एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष वागतीलच असं काही नाही. कारण भाजप आता महाशक्ती म्हणून समोर आलीय. एकदा का लोकसभेच्या निवडणुका झाल्या की, मग भाजपची खरी भूमिका स्पष्ट होईल. आज लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे आणि पवार यांची जशी गोची करून टाकलीय त्याहून अधिक विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आपल्या मित्रपक्षांची करेल. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स अशा तपास यंत्रणांचा आसूड त्यांच्याकडे आहे. त्याचा धाक दाखवून ते आपल्यालाही हवं ते साध्य करून घेतील. पण भाजपच्या सोबत गेलेल्या मनसेच नाही तर शिंदे, पवार यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न असणार आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत तुमचं ऐकलं, जागा कमी घेतल्या, उमेदवार बदलले, आता आमच्या बरोबर आलेल्यांना न्याय द्यायला हवाय असं शिंदे, पवार, आठवले, बच्चू कडू व इतर साथीदार म्हणतील. मग भाजपच्या १०५ जणांनी करायचं काय. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही गप्प बसलो आता नाही. या सगळ्यांची मोट बांधता बांधता नाकी नऊ येणार आहे. अशात मग मनसेला काय आणि किती जागा मिळणार? अशा वातावरणात ' तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा...!' असं म्हणणं कितपत योग्य ठरणार आहे. तिथं किती जणांना सामावून घेतलं जाणार आहे?
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...