Saturday 14 January 2023

तमसो मा ज्योतिर्गमय...!

"पृथ्वीच्या पोटातून कधीतरी लाव्हाच्या रूपानं बाहेर पडणारी थोडीशी उष्णता आणि चंद्राची भरती ओहोटी घडवून आणणारी ऊर्जा याचा परिणाम सोडला, तर पृथ्वीवरच्या सगळ्या सजीव -निर्जीवातली ऊर्जा ही यांना त्या रूपानं सूर्यापासून मिळालेली असते. सूर्याचं असं नियंत्रण असल्यामुळंच सूर्याला प्रमुख देवतेचं स्थान मिळालं खरं; परंतु सूर्याची उपासना करणाऱ्या अनेक जमातींमध्ये माणसाचं प्रभुत्व दाखविण्यासाठी अनेक चालीरीतीही प्रचारात आणल्या गेल्या. काही जमातींमध्ये सूर्याचा घड घेणाऱ्या राक्षसाला पळवून लावण्यासाठी सूर्याच्या दिशेनं बाण मारण्याची प्रथा आहे. सूर्य मानवी शरीरावर अधिकार गाजवत असतो तो दिवस आणि रात्र यांच्या ताल-लयबध्दतेनं! सूर्योदय झाला की, माणूस ताजातवाना होऊन कामाला सुरुवात करतो जसजसा मावळतो तशी मानवातली ऊर्जा कमी होत जाते. सुर्याच्याच तालावर माणूस काम आणि विश्रांती घेत असतो. सूर्याच्या या लयबद्धतेतच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची पुनःपुन्हा होणारी आवर्तनं माणसाला जन्म आणि पूर्वजन्म यासारखं तत्वज्ञान सहजपणे समजावून देत असतात. ही मकरसंक्रांतीच्या निमित्तानं उत्तरायणाचा प्रारंभ आणि सूर्य याची वैज्ञानिक माहिती!"
---------------------------------------------------

*आ*ज संक्रांत ही संक्रांत प्रत्येक वर्षी १४ जानेवारीला येते. पण ती यंदा १५ जानेवारीला आलीय. संक्रांत म्हणजे विज्ञान आणि धार्मिकता यांचा अजोड संयोग! मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याची शपथच जणू आपण घालीत असतो. पुराणांचा आधार घ्यायचा, तर पौष महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी देवांचा दिवस आणि दानव-राक्षसांची रात्र सुरू होते, असं म्हणता येईल. देवलोकात रात्र असतानाच दानवांना या अंधारात आपली काही कृत्ये करायला अधिक सोपे जात असावं; परंतु विज्ञानाला देव आणि दानव या गोष्टी कबूल नाहीत. मंजूर नाहीत; पण मात्र त्यांना एक गोष्ट मंजूर आहे. सूर्य नावाच्या एका अति तापलेल्या ग्रहामुळं पृथ्वीवरचं जीवन शक्य आहे ही ती गोष्ट ! जोतिबाच्या दृष्टीनं बघायचं तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत संक्रमण करतो. बारा राशींमधून भ्रमण करणारा सूर्य जानेवारी महिन्यात आपलं आवर्तन पूर्ण करून पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे मकर राशीत प्रवेश करतो, असं ज्योतिषशास्त्राचं म्हणणं आहे. खगोलशास्त्रज्ञांनी याच्याही पुढे झेप घेतली. त्यांनी पृथ्वीचा गोल आकार आणि तिची सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याची कक्षाही शोधून काढली. ही कक्षा लंबवर्तुळाकार आहे म्हणून पृथ्वी भ्रमणकक्षेत कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब जात असते. पृथ्वी सूर्याच्या जवळ असते तेव्हा दिवस मोठा असतो. ती सूर्यापासून दूर असते तेव्हा रात्री मोठ्या असतात. सूर्य तसा स्थिर आहे. दिवसभरात तो आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. हे घडतं पृथ्वीच्या पूर्वेकडं फिरण्याच्या गतीमुळं. अशाप्रकारे सूर्याचा जो भासमार्ग तयार होतो त्याला भारतीय प्राचीन वैज्ञानिकांनी उत्तरायण आणि दक्षिणायन असं नाव दिलं. उत्तरायणाची सुरुवात झाली की, सूर्य मकर वृत्तापासून उत्तरेकडे सरकायला लागतो. मग भीतिदायक वाटणाऱ्या लांबच लांब रात्री लहान होऊ लागतात आणि दिवस मोठे होऊ लागतात. असे दिवस मोठे होण्याची प्रक्रिया खरंतर २२-२३ डिसेंबरला सुरू झालेली असते; परंतु सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रमणाचा...! देवाचा दिवस उजाडण्याचा क्षण म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा असायलाच हवा. त्यातच पृथ्वीवरच्या जीवनाचा प्रमुख आधार आणि प्रकाशाची देवताही सूर्यच! त्यामुळं भारतीय नव्हे, तर इतर अनेक परंपरांनी सूर्याला आपली आद्यदेवता मानलंय. भारतीयांनी तर नवग्रहस्तोत्रात सूर्याची प्रार्थना करताना
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युती.
तदापि सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्।।'
अशी सूर्याची प्रार्थना केलीय. इतकंच नव्हे तर ग्रहपीडांपासून मुक्त होण्यासाठी याच परंपरेत आद्य लोकांचं रक्षण करणारा ग्रह म्हणून त्यांनी सूर्याची 'पीडाहरतु मे रविः' अशी विनवणीही केली. मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, तेव्हा आपल्याकडं हिवाळ्याची गुलाबी थंडी असते. या थंडीमुळं त्वचा सुकते आणि ओलाव्याचा अंश कमी झाल्यामुळं त्वचा तडतडते. कधी हातांच्या तळव्याची साल निघू लागतात, तर पायांना भेगा पडण्याचं प्रमाणही वाढतं. वातावरणाचं तपमान कमी झाल्यानं माणसाचं शरीर संतुलित राहण्यासाठी शरीरातली उष्णता अधिक प्रमाणात उत्सर्जित करीत असते. अशावेळी त्वचेमधल्या तेलाचं प्रमाण कायम राखण्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थाची गरज वाढते. त्याचबरोबर शरीरातून उत्सर्जित होणारी अधिक प्रमाणातली उष्णता भरून काढण्यासाठी आहारात थोडे-अधिक उष्ण पदार्थही लागतात. लोकमानसामध्ये आपल्या परंपरेनं या दिवसामधला मकरसंक्रांतीचा दिवस उत्सवाचा म्हणून रुजवला असावा. तिळगूळ इतरांना देताना आपल्यालाही तिळाची स्निग्धता इतरांकडून मिळणारच म्हणून ही रूढी कायम केली गेली असावी. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाप्रमाणेच बाजरीची भाकरी आवश्यकच. कारण ज्वारी किंवा गव्हापेक्षा ती अधिक उष्ण, गूळ तर उष्णतेचं प्रतीकच, कारण उन्हाळ्यात गूळ अधिक प्रमाणात आहारात घेतला तर निश्चितच घोळणा फुटणार, परंतु मकर राशीत या दिवशी प्रवेश करणाऱ्या सूर्याचं महत्त्व इथंच संपत नाही. पृथ्वीच्या पोटातून कधीतरी लाव्हाच्या रूपानं बाहेर पडणारी थोडीशी उष्णता आणि चंद्राची भरती-ओहोटी घडवून आणणारी ऊर्जा परिणाम सोडला, तर पृथ्वीवरच्या सगळ्या सजीव-निर्जीवातली ऊर्जा ही यांना त्या रूपानं सूर्यापासून मिळालेली असते. सूर्याचं असं नियंत्रण असल्यामुळंच सूर्याला प्रमुख देवतेचं स्थान मिळालं खरं; परंतु सूर्याची उपासना करणाऱ्या अनेक जमातींमध्ये माणसाचं प्रभुत्व दाखविण्यासाठी अनेक चालीरीतीही प्रचारात आणल्या गेल्या. काही जमातींमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा घास घेणाऱ्या राक्षसाला पळवून लावण्यासाठी सूर्याच्या दिशेनं बाण मारण्याची प्रथा आहे. सूर्य मानवी शरीरावर अधिकार गाजवीत असतो तो दिवस आणि रात्र यांच्या ताल-लयबद्धतेनं सूर्योदय झाला की, माणूस ताजातवाना होऊन कामाला सुरुवात करतो. सूर्य माथ्यावर आला असताना त्याच्या कामाची गती सर्वाधिक असते. परंतु सूर्य मावळतीला आला की, माणूसही मंद होतो आणि सुस्तावतो. एक तऱ्हेनं त्याची ऊर्जा उतरणीला लागलेली असते. संध्याकाळनंतर रात्र होते तसा हा माणूस झोपेच्या अधीन होतो. पुन्हा सकाळी ताजेपणानं एका नव्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी.... दिवस मोठा आणि रात्र लहान असते. तेव्हाही तो या सूर्याच्याच तालावर काम आणि विश्रांती घेत असतो. सूर्याच्या या लयबद्धतेतच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची पुनः पुन्हा होणारी आवर्तनं माणसाला मृत्यू आणि पुनर्जन्म यासारखं तत्त्वज्ञान सहजपणे समजावून देत असतात. ही मकर संक्रांतीच्या निमित्तानं उत्तरायणाचा प्रारंभ आणि सूर्य याची वैज्ञानिक माहिती! देवाचा दिवस उगवण्याचा पर्वकाळ म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी स्निग्ध तीळ आणि उष्ण गूळ वाटून आरोग्यरक्षण करीत असतानाच या दिवसाची उत्सवमूर्ती असलेल्या सूर्याला म्हणू या... तमसो म ज्योतिर्गमय !

संक्रांतीचं वर्णन प्रत्येक जण आपआपल्या सोयीनं करतो. ती कशी आहे, कशावर स्वार होऊन येतेय; याची वर्णन ज्योतिषशास्त्री नेहमीप्रमाणे करताहेत. त्यानुसार उद्याची दुनिया कशी असेल, याच भाकीत केलं जातंय. उद्याची दुनिया कशी असेल, याची कल्पना आजकालच्या दुनियेवरून करता येईल. आजची दुनिया ओरडणाऱ्यांच्या भूलथापांना फसलेल्या रडणाऱ्यांची आहे. कालची दुनिया यापेक्षा भित्र नव्हती. भविष्याची वाट भूतकाळातूनच निर्माण होते. हा निसर्गनियम मानायचा, तर उद्याच्या दुनियेचं चित्र रंगविण्यासाठी कल्पनाशक्ती शिणवायची आवश्यकता नाही. माणसाला नव्याची आस असावी, पण त्यासाठी सत्याचा पास घेण्याची बदमाषी नसावी. काळ हा नेहमीच दुटप्पी असतो. त्यावर स्वार झालात, तर तो तुम्हाला आपल्याही पुढे नेणार. त्याच्याकडं पाहत राहाल तर मात्र तो तुमचा काळ होणार, गेल्या वर्षाच्या कालखंडावर कुणी, कसा आपला ठसा उमटविला, याची भारंभार चर्चा वाचायला, ऐकायला मिळेल. आगामी काळ हा ज्ञानाधिष्ठित विज्ञानाचा असणारंय. माणसाची जात, धर्म त्याचं ज्ञान ठरविणार, पण प्रत्यक्षात वेगळं काही घडतंय, याचा अनुभव येतोय. भावनेचं विज्ञान असतं, त्यानुसार त्या फुलविता, विझविता आणि वांझोटाही ठेवता येतात. त्याबाबतचे धडे सध्या प्रसिद्धिमाध्यमं घराघरांतून देत असतात. दूरचित्रवाणीवरच्या वेगवेगळ्या वाहिन्या याबाबतीत आघाडीवर आहेत. भावनेचं विज्ञान असतं. मात्र, विज्ञानाला भावना नसते. विज्ञान ज्याला कळतं ते त्याचं होतं. त्यासाठी ज्ञान हवं, बुद्धीची चमक हवी. ती भावनेच्या वरचढ हवी. अशा दृष्टीनं पाहिलं की लक्षात येतं, सध्या खूप अंधार आहे. धर्म, जात, संस्कृतीच्या अहंकारी अस्मितांना देवभक्तीच्या भाबड्या भावनांना आपण नव्या सहस्रकात घेऊन गेल्यानं ते अधिक गडद होताहेत. हे सोयीस्कररीत्या विसरलं जातंय की, भारताच्या उभारणीत अनेकांचा, असंख्यांचा ध्येयध्यास कारणी लागलाय. कित्येकांनी त्यासाठी आपल्या आयुष्याचा होम केलाय. रक्त सांडलंय. परंतु अशा असंख्यांच्या त्यागामागच्या, कार्यामागच्या ध्येयाला मर्यादा होत्या. काहींसाठी त्या काळाच्या होत्या, तर काहींसाठी त्या विचारदृष्टीच्या होत्या. अशा मर्यादा छत्रपतींच्या, महात्माजींच्या आणि आंबेडकरांच्या ध्येयकार्याला नव्हत्या. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता हे या त्रिमूर्तीचं ध्येय होतं. ते दृष्टिपथात नसताना त्यांनी जाहीर केलं होतं आणि हयातीत आपली ध्येयपूर्ती केली. भारताच्या लोकशाहीचं सार या तिच्या ध्येयवादात होतं म्हणूनच ती राष्ट्रउभारणी घडविणारी राष्ट्रसूत्रं झाली. ही सूत्रं आणि त्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेली झुंज केवळ गतकालातच नाही, तर यापुढच्या काळातही जेव्हा जेव्हा मानव्यरक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी ढाल-तलवार बनणारी आहे. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता या तीन तत्वांची गुंफण झाल्याशिवाय लोकशाहीची पूर्तता होत नाही. स्वराज्यात स्वातंत्र्य हवं. स्वातंत्र्यात समता हवी अन् समतेच स्वराज्य हवं. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांची थोरवी जशी परस्परांवर अवलंबून आहे, तसंच शिवाजीमहाराज, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचं अमीट ऐतिहासिक कार्यही परस्परांच्या जीवनकार्यावर आधारलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात हेच विसरून या राष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून भजलं, पूजलं जातं, या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या-मयंत्यांच्या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. ही सर्वच भारतीयांसाठी शरमेची गोष्ट आहे. जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या फाजील या शरमिंद्या करणाऱ्या गोष्टी अजूनही अस्मिता जागविणाऱ्या वाटतात. मुंजीपासून मयतापर्यंतची कर्मकांडंही संस्कृतीची प्रसादचिन्ह ठरतात. दिवसभर अशुभ व्यवहार करून सांजवातीला शुभंकरोती म्हटलं, सोयीनं सत्यनारायण घातला किंवा दिवसभर गिन्हाईकांना मापात पाप करून लुबाडून संध्याकाळी गोरक्षण समितीला रुपया देऊन धर्मरक्षकाच्या तोऱ्यात मिरविणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सध्या अशांचा सुकाळ आहे. धंद्याचा धर्म करण्याऐवजी धर्माचा धंदा केला जातोय. त्यासाठी कोणत्याही पातळीवर येण्याची तयारी चालविलीय. यातून निष्पन्न काय होऊ शकतं, हे सारं तुम्ही-आम्ही सहजपणे समजण्याइतपत शहाणे नक्कीच आहोत. कळतं पण वळत नाही, हेच खरं. आपण इतके हतबल झालो आहोत, आपल्यात लढण्याचं, प्रतिकार करण्याचं त्राणच राहिलेलं नाही. अशा गलितगात्र झालेल्या, गर्भगळीत झालेल्याला संक्रांत कशावर बसून आली आहे अन् ती आपलं काय भलं वाईट करणार, याची चिंताच नको. जसं निवडणुकीत आपण सगळ्यांचंच, सगळ्या पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत करतो, अगदी तसंच सगळ्या सणवारांचं स्वागत करतो. इतके की, आपल्याला 'स्थितप्रज्ञ' म्हणणंच योग्य ठरेल.

वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीनं मकरसंक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश आणि उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळंच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो. आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते तेव्हा त्यांना हे संक्रमण अधिकच आनंददायक वाटत असलं पाहिजे. पूर्वी उत्तरायणाचा प्रारंभ हाच वर्षारंभ असावा इ. प्रकारची मतं आढळतात. सूर्याच्या मकर संक्रमणाचं संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आलंय. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड आणि नऊ बाहू असलेल्या एका देवीनं संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचं वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार,भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते आणि त्यावेळी तिसऱ्या दिशेकडं पहात असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते आणि पाहते तिकडे संकट कोसळते, त्यामुळंच संक्रात येणं म्हणजे संकट येणं असा वाक्प्रचार रूढ झालाय. तिनं ज्या वस्तू घेतलेल्या असतात, त्या नष्ट वा महाग होतात अशीही समजूत आहे. पंचांगात तिचं चित्र दिलेले असतं. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्ये करीत नाहीत. भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. उत्तरभारतात त्या दिवशी डाळ आणि भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळंच तिथं संक्रातीला ’खिचडी संक्रांती’ असं म्हणतात. बंगालमध्ये त्या दिवशी काकवीत तीळ घालून बनलेला ’तिळुआ’ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूपसाखर घालून केलेला ’पिष्टक’ नावाचा पदार्थ खातात आणि वाटतात म्हणून तिथं संक्रांतीला ‘तिळुआ संक्रांती’ आणि ‘पिष्टक संक्रांती’ असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगल वा इंद्रपोंगल, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगल आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगल साजरा केला जातो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन म्हणतात. किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती या देवीनं किंकर नावाचा दैत्य मारला, अशी कथा असून तो दिवस अशुभ मानला जातो. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानलंय. त्या दिवशी प्रयाग, गंगासागर इ. ठिकाणी प्रचंड मेळे भरतात. या दिवशी पितृश्राद्ध करावं असं सांगितलंय. गंगा सागरात स्नान करून पिंड अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात स्त्रिया मृत्तिका घटाचं दान देतात आणि देवाला तीळ-तांदूळ अर्पण करतात आणि संक्रांतीनिमित्त सौभाग्यवाण लुटतात. सुनाग नामक ऋषींनी जाबाली ऋषींना संक्रांतीचं माहात्म्य सांगितल्याची कथाआढळते. या दिवशी तिळगूळ मोठ्यांनी लहानांस द्यावा अशी वहिवाट आहे. हा सण माणसांच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तिळगूळ देताना ’तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत, विविध वस्तूंचे दान देण्याचा आग्रह, दूरच्या संबंधितांना शुभेच्छापत्रे आणि तिळगूळ वगैरे पाठविण्याची पद्धत, सुवासिनींनी आपल्या घरचे तांदुळ दुसऱ्यांच्या घरच्या आंधणात शिजविण्याची आणि दुसऱ्यांच्या घरात असोला नारळ सोडण्याची कोकणातली प्रथा इ. गोष्टी सामाजिक अभिसरणाच्या द्योतक आहेत. असो मकरसंक्रांतीचं स्वागत करू या अन् सारे मिळून म्हणू या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...