Thursday 20 August 2015

आपची सत्तेसाठी साठमारी...!

गेल्या दोन वर्षात अनेकजण आम आदमी पक्ष सोडून गेले आणि अनेकजण नव्याने त्या पक्षात आले. पण इतका तमाशा यापुर्वी कधीच झालेला नव्हता. यापुर्वीही असे अनेक राजकीय पक्षांच्या बाबतीत झाले आहे. मात्र आज त्या पक्षात जे काही घडते आहे, त्याला सत्तेची साठमारी वा गटबाजी असे संबोधणे चुक होईल. हा दोन भूमिकांचा संघर्ष आहे. अण्णा आंदोलनाला जो भरघोस पाठींबा मिळाला, त्यामुळे अनेक निकम्मे राजकीय गट त्यात आपापले भवितव्य शोधू लागले होते. त्यात पुर्वाश्रमीच्या समाजवादी चळवळीचे विखुरलेले लोक होते. त्यांनी घाऊक संख्येने जुन्या समाजवादी चळवळीचा पक्ष बनवण्याचे स्वप्न बघितले असेल तर नवल नाही. युतीची सत्ता असताना अण्णा हजारे यांनी आरंभलेल्या आंदोलनातही असेल काही समाजवादी घुसले होते. पण तेव्हा त्यात कुणी केजरीवाल किंवा अनुभवी चतुर इव्हेन्ट मॅनेजमेन्ट करू शकणारा नव्हता. म्हणून दोन दशकापुर्वीचे ते अण्णा आंदोलन बारगळले. कुठल्याही व्यक्तीमत्वाला महात्मा बनवण्याचे लाभ मिळू शकतात. पण ते उठवण्यासाठी संघटित ताकद आवश्यक असते. अण्णा तेव्हाही एकांडे शिलेदार होते आणि आजही तसेच आहेत. तेव्हा ज्या समाजवाद्यांनी अण्णांची कास धरली, त्यांच्यापाशी लोकसंख्या नव्हती. पण माध्यमांची साथ असल्याने युती विरोधातल्या राजकारणासाठी अण्णांचे महात्म्य माध्यमातून माजवण्यात आले, व्यवहारात काहीच नव्हते. म्हणूनच आंदोलन बारगळले आणि तात्कालीन समाजवाद्यांची राजकीय उभारणीची स्वप्ने धुळीस मिळाली. पुढल्या काळात अण्णांची महत्ताही ओसरली होती. पत्रकबाजीपेक्षा अधिक काही नव्हते. चार वर्षापुर्वी जनलोकपाल आंदोलनाची कल्पना घेऊन जे मुठभर लोक कामाला लागले, त्यापैकी केजरीवाल यांच्यापाशी आपल्या संस्थेचे हुकमी पाठीराखे मोठ्या संख्येने होते.

केजरीवाल यांनी गाजलेला व देशाला ठाऊक असलेला, पण पाठबळाखेरीज दुबळा असा चेहरा म्हणून अण्णांना सोबत घेतले. त्यात पुन्हा शांतीभूषण, किरण बेदी. स्वामी अग्निवेश इत्यादी प्रसिद्ध चेहर्‍यांना सोबत आणले. त्या सर्व काळात साधने व सज्जता हे काम एकटे केजरीवाल करीत होते आणि पुढे अण्णांचा चेहरा होता. जोपर्यंत अण्णा उपयोगाचे होते, तोपर्यंतच त्यांनी अण्णांचे महात्म्य चालू दिले. अण्णांच्या आडोश्याने केजरीवाल हा देशव्यापी चेहरा झाला. तसाच बेदी, अग्निवेश, प्रशांत भूषण इत्यादी देशाला परिचित चेहरे होते. पण त्यांच्यामागे कुठलीच संघटित शक्ती वा लोकसंख्या नव्हती. केजरीवाल यांच्याकडे तशी ‘तैनाती फ़ौज होती. ज्यांना पगारी पाठीराखे म्हणता येईल, अशी टोळी केजरीवाल, शिसोदिया, संजय सिंग व गोपाल राय यांनी उभी केलेली होती. त्यांनी अन्य चमकणार्‍या प्रत्येक चेहर्‍याचा आरंभी धुर्तपणे गर्दीला झुलवण्यासाठी उपयोग करून घेतला आणि आपल्या जमावाचे राजकीय पक्षात रुपांतर करून घेतले. एकदा त्यात यश मिळू लागल्यावर अण्णा व इतरांना बाजूला करून या मुळच्या टोळीने आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पुढे आणल्या. त्यात आडवे येतील व त्रासदायक होतील त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचे डाव खेळले. पण समाजवादी नेहमी बुद्धीमान असतात आणि म्हणूनच इतरांना मुर्ख समजून विचारपुर्वक मुर्खपणा करतात. योगेंद्र यादव त्यापैकी असल्याने आजवर इतरांचे काटे काढण्य़ात त्यांनी केजरीवाल यांना मदत केली. त्यातून केजरीवाल फ़क्त आपल्यावर अवलंबून रहातील आणि पुढे वैचारिक कारणास्तव पक्षालाही आपल्या विचारसरणीने चालावे लागेल, असा त्यांचा आडाखा किंवा डाव असावा. पण तिथेच त्यांची फ़सगत झाली. कारण असे प्रथमच झालेले नाही. यापुर्वी असे अनेक पुरोगामी बुद्धीमंतांनी केलेले प्रयोग त्यांच्यावरच उलटलेले आहेत.

१९७० च्या दशकात कॉग्रेसमध्ये इंदिरा गांधी यांना पक्षातील म्हातार्‍या नेत्यांची अडचण झाली होती. त्यांना संपवायला त्यांनी रातोरात समाजवादी वस्त्रे अंगावर चढवली आणि तेव्हाच्या एकाहून एक बुद्धीमान समाजवादी साम्यवाद्यांनी कॉग्रेसलाच पुरोगामी पक्ष बनवण्याची स्वप्ने रंगवायला सुरूवात केली. कम्युनिस्टांपासून सोशलिस्टांपर्यंत अनेक जाणते दिग्गज नेते, मग इंदिराजींच्या कॉग्रेस पक्षात सहभागी होऊन गेले. न्या. एच. आर. गोखले, बॅ. रजनी पटेल, कुमारमंगलम अशा कम्युनिस्टांनी इंदिरा गांधींची पालखी उचलून विचारांपेक्षा व्यक्तीमहात्म्य सांगायचे काम हाती घेतले. त्यासाठी मोरारजी देसाई, अतुल्य घोष, कामराज, निजलिंगप्पा इत्यादींची निंदानालस्ती करण्यात हेच पुरोगामी आघाडीवर होते. त्यांच्या जोडीला मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत, शशीभूषण असे समाजवादी तरूण तुर्कही उभे ठाकले होते. या सर्वांची अशी समजूत होती, की जुन्याजाणत्या नेत्यांपासून इंदिराजींना तोडले; मग त्या डाव्या विचारांच्या अनुयायांवर अवलंबून रहातील आणि कॉग्रेसच समाजवादी-साम्यवादी पक्ष होऊन जाईल. त्यांच्या कष्टाने व बुद्धीने इंदिराजी देशाच्या व गरीबांच्या तारणहार होऊन गेल्या आणि त्यांची प्रतिमा इतकी उंचावली, की तुलनेत हे सर्व समाजवादी साम्यवादी विचारवंत खुजे बुटके होऊन गेले. मग क्रमाक्रमाने त्यांना फ़ुंकर घालून इंदिराजींनी उडवून लावले. अवघ्या चार वर्षात त्याच तरूण तुर्क पुरोगाम्यांना त्याच इंदिरा गांधी व त्यांच्या उद्धट पुत्र संजय गांधींच्या विरोधात आवाज उठवायची पाळी आली. तेव्हा त्या बोलघेवड्यांना इंदिराजींनी तुरूंगात डांबलेले होते. आज आम आदमी पक्षाला नवा समाजवादी वा डाव्या विचारांचा पक्ष वा संघटना बनवण्याचा यादव व त्यांच्या जुन्या समाजवादी सहकार्‍यांचा प्रयास, त्याचीच इवलीशी आवृत्ती होती. त्याचे परिणाम वेगळे होतील अशी अपेक्षा बाळगता येईल का?

कारण इतिहासापासून न शिकणे आणि त्याच त्याच चुका अतिशय आत्मविश्वासाने करत रहाणे, हा समाजवादी व पुरोगाम्यांचा गुणधर्म असतो. सामान्य माणसे सहज ज्या चुका करतात. पण पुरोगामी शहाणे अतिशय सुक्ष्म विचार करून चुका व मुर्खपणा करीत असतात. त्याचा हा परिणाम असतो. योगेंद्र याद्व किंवा त्यांच्याच समाजवादी गोतावळ्यातील विखुरलेल्या लोकांना या देशात कुठल्या कायद्याने वा सत्तेने आपला राजकीय पक्ष संघटना उभारण्यास प्रतिबंध केलेला नाही. जनतेमध्ये जाऊन लोकहिताच्या आपल्या भूमिकांना पाठींबा मिळवत समाजवादी साम्यवादी विचारधारेचा पक्ष उभारण्यात मग कसली अडचण आहे? अकारण दुसर्‍यांच्या आंदोलन चळवळीत घुसून आपला उल्लू सीधा करण्याची चलाखी कशाला? त्यापेक्षा आपल्यातला उल्लू झटकून व्यवहारी शहाणपण जोपासले, तरी खुप होईल. देशातल्या समस्या व लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न पन्नास वर्षापुर्वी जितके गहन होते, तितकेच आजही आहेत. तेव्हा त्यावर नुसती प्रवचने देण्यापेक्षा केजरीवाल जसा एखाद्या कोपर्‍यात गल्लीत वा शहरात इवली सुरूवात करतो, तशी या समाजवाद्यांनी लोकांच्या जगण्याशी थेट संबंध असलेली समस्या सोडवण्याचे काम हाती घेतले, तर पक्षाची उभारणी व्हायला काय अडचण आहे? त्यापेक्षा प्रसिद्धीच्या मागे लागून, माध्यमातून चळवळीचा आभास करून काहीही निष्पन्न होत नाही. म्हणून केजरीवाल दिल्ली जिंकतो. पण मेधा पाटकरांना एका मतदारसंघात डिपॉझिटही वाचवता येऊ शकत नाही. मेधासारख्या अनेक विखुरलेल्या समाजवाद्यांनी थेट प्रश्नाला भिडणारी वा लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सुटतात, अशी आंदोलने लढवली, तर यादव हाकलले जाऊ शकणार नाहीत किंवा केजरीवाल शिरजोर होऊ शकणार नाहीत. पण पुरोगामी वाचाळ असतात आणि कृतीशून्य असतात, हा इतिहास कोणी बदलायचा?

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...