Saturday 22 July 2023

द्रौपदीचं वस्त्रहरण! सरकार धृतराष्ट्र...!!

"मणिपूरच्या घटनेला ७७ दिवस उलटूनही आरोपींना अटक नाही, मूळातच ही घटना समोर येऊ दिली नाही. याचा शोध घेण्याची गरज आहे. इथल्या पोलिस अधीक्षकाला बडतर्फ केलं पाहिजे. कारण आपल्या जिल्ह्यात ही घटना घडली, त्याची खबरबात अधीक्षकाला नसेल, असं नाही. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यामुळं ती झुंड, तो जमाव जितका दोषी आहे, तितकेच दोषी तिथले पोलिस अधीक्षक, कलेक्टर, लोकप्रतिनिधी आणि स्वतः मुख्यमंत्रीही आहेत. जर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नसता, तर कदाचित या महिलांना न्याय मिळालाच नसता, ही घटना दाबली होती, मात्र त्या व्हिडिओमुळं या घटनेला वाचा फुटली. काय दोष असेल त्या महिलांचा, की त्यांना
इतकी गंभीर शिक्षा या जमावानं दिली. सामूहिक बलात्कार करून  विटंबना केली, विवस्त्र देहाची धिंड काढली. किती ही विकृती, अमानवीयपणा. मात्र सगळ्यांनी चुप्पी साधत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळं सगळेच दोषी ठरतात!"
----------------------------------------------
द्रौपदियों के चीर हरण पर
धृतराष्ट्र सहित सबकी आँखें अंधी,
जुबां खामोश अभी तक है
दुशासन-दुर्योधन क्रूर अभी तक हैं...
जागो लोकतंत्र के रखवालों जागो ll

*म* णिपुरातल्या कुकी स्त्रियांची नग्न धिंड काढली जातेय. त्यांच्या गुप्तांगांची, त्यांच्या सन्मानाची विटंबना केली जातेय. हे सगळं दाखवणारा व्हिडिओ, फोटो समाजमाध्यमांवर फिरताहेत. सगळे तथाकथित राष्ट्रप्रेमी गप्प आहेत. महाभारतातल्या सभेतल्या  द्रौपदी वस्त्रहरणाची परंपरा रस्त्यावर आणली जातेय. टिकली, साडी वरुन व्याकूळ होणारे संस्कृतीरक्षकही गप्प आहेत. महाभारताच्या त्या सभेतही रथी महारथी गप्प होते. स्त्री देहाची विटंबना होताना गप्प बसण्याची परंपरा खूप जुनी आहेच. शत्रूपक्षाच्या, आपल्याहून वेगळ्या धर्माच्या स्त्रीला सन्मानानं परत पाठवण्याची छत्रपती शिवरायांची कृती सद्गुणविकृती ज्यांना वाटते आणि शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार करायला हवेत, असे विचार जे मांडतात त्या विचारांच्या वारसदारांकडून कोणत्याही प्रतिक्रियेची, निषेधाची अपेक्षाच नाही. अर्थात आज लोकलाजेस्तव यातली काही मंडळी या घटनेचा निषेध करतीलही. पण तो एक नाईलाज असेल, सोपस्कार असेल, विसंगती असेल. गेली काही वर्ष वैचारिक विरोध करणाऱ्या स्त्रियांबाबत सातत्यानं जी आक्षेपार्ह, चिथावणीखोर भाषा वापरली जातेय, त्यातून हे असेच माथेफिरू तयार होणार आहेत. ही अशी चिथावणीखोर भाषा वापरली जात असताना सोयीस्कर मौन धारण केलं जातंय. त्या मौनाचेच हे परिणाम आहेत. मणिपूरची घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहेच, पण ती घडली याचं आपण आश्चर्य वाटून घेणार असू तर तो भाबडेपणा आहे. मणिपूर मधल्या आदिवासी महिलांवरच्या अत्याचाराचा व्हिडीयो समोर आल्यानंतर अचानक गोदी मिडीयानं मौन सोडलंय. मध्यंतरी राहुल गांधी मणिपूरला जाऊन आले, मात्र नरेंद्र मोदी अद्याप ही मणिपूरला गेलेले नाहीत. देशातल्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राष्ट्रपती मूर्मू या महिला असतानाही त्यांनी दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचारावर मौन बाळगलंय. निषेध सोडा, शांततेचं अपिल ही करायला कोणी तयार नाही. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा ती आपलं परकं काही पाहत नाही. सत्तातुराला भय आणि लज्जा काहीच शिल्लक राहत नाही. मात्र मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी संताप व्यक्त केलाय. असा प्रकार यापूर्वी आपण कधी पाहिलेला नाही असं म्हणत, त्यांनी इथल्या साऱ्या घटना आपण वेळोवेळी वरिष्ठांना कळविल्यात, तसे अहवाल पाठविलेत पण कोणतीच कार्यवाही झालेली नाही. असं त्यांनी उद्वेगानं असहायतेनं म्हटलंय. मणिपूरच्या घटनेवर सगळीकडं दुःख, संताप, शोक आज व्यक्त केला जातोय. खासकरून समाज माध्यमांवर एक दिवस हळहळ व्यक्त केली जाईल. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्या आपण ही जात्यात असू, त्यावेळेला इतरही लोकं अशीच हळहळ व्यक्त करतील. आपापल्या कुवतीप्रमाणे अशा गोष्टींचा निषेध आपण केला पाहिजे. मौन बाळगणं हे मेलेल्या माणसाचं लक्षण आहे. कदाचित उद्या तुम्ही ही एखाद्या व्यवस्थेचे पिडीत व्हाल, तेव्हा तुमची साथ देणारे तुम्हालाच आरोपी बनवतील. सिस्टीम माणूस पाहत नाही, ओळखत नाही. सिस्टीम केवळ सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशाला बांधील आहे. त्यामुळं आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा.

मणिपूरमध्ये ४ मे रोजी ही घटना घडली. या तीन महिलांपैकी ज्या एकीला जमावाने मिनतवारी केल्यानंतर त्या वयस्कर असल्यानं पुढं नेऊन सोडलं. तिचा नवरा भारतीय लष्करात जवान होता, त्यानं कारगिल युद्धात भाग घेतलेला होता. त्या महिलेच्या नातेवाईकानं केलेल्या पोलीस तक्रारीनुसार कांगपोकपी जिल्ह्यातल्या एका गावात झालेल्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी आदिवासी कुकी समाजातले दोन पुरुष आणि तीन महिला जंगलात पळून जात असताना ही घटना घडलीय. या तक्रारीत म्हटलंय की पाच जणांना वाचविण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जमावानं त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी आम्हाला घराजवळून उचललं आणि गावापासून थोडं दूर नेलं आणि जमावासोबत रस्त्यावर सोडलं. आम्हाला पोलिसांनीच त्या नराधमाच्या ताब्यात दिलं! जमावानं या महिलांना निर्वस्त्र करुन रस्त्यावर चालण्यास भाग पाडलं. व्हायरल व्हिडीओमध्ये काही पुरुष दोन महिलांना विवस्त्र करून शेताकडं ओढून जबरदस्तीनं खेचताना दिसताहेत. १८ मे रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत, पीडित महिलांनी क्रूरपणे विवस्त्र धिंड काढून सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप केलाय. यापैकी एका २१ वर्षांच्या मुलीवर अत्यंत हिंसक पद्धतीनं दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि इतर दोन महिला तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरल्या असंही या तक्रारीत म्हटलंय. भारतासारख्या देशामध्ये कोणतीही यंत्रणा एवढी कमकुवत नाही की महिलांना अशी वागणूक दिली जात असताना त्यांना काहीही करता येणार नाही. गुन्हेगारांव्यतिरिक्त संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनाही यामध्ये शिक्षा झाली पाहिजे. ट्विटरवर हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर आणि दस्तरखुद्द सुप्रीम कोर्टानंही हा व्हीडिओ 'धक्कादायक' असल्याची टिप्पणी केलीय. त्यांनी सरकारला बजावलं की, 'तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्हाला लक्ष घालावं लागेल...!' नागरिकांनी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सतत मागणी करूनही महिला सशक्तीकरण आणि मुलींच्या शिक्षणाबाबत सतत बोलणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मणिपूरातल्या हिंसाचारावर प्रतिक्रियाही दिलेली नव्हती. पण सुप्रीम कोर्टाच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी पावसाळी अधिवेशनाच्या आधी बोलताना नरेंद्र मोदींनी त्यांचं मौन तोडत सांगितलं की, या घटनेमुळं त्यांचं मन 'प्रचंड दुःख आणि रागानं भरलंय आणि यातल्या दोषींना माफ केलं जाणार नाही!' असं असलं तरी हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यामध्ये सगळ्या हल्लेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत असूनही कारवाईला एवढा वेळ का लागला हा प्रश्न उरतोच.

आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसल्याची शक्यता आहे, ज्यात शेकडो पुरुष महिलांना नग्न करून तिचं शरीर, गुप्तांग दाबताहेत. जमाव निर्वस्त्र केलेल्या महिलांना पकडून घेऊन जातोय. जमावाचे खुनी हात त्या महिलांच्या शरीरासोबत खेळताहेत. असहाय्य आणि लाचार महिला रडताहेत. पुरुषांची गर्दी आनंद घेतेय. सभ्यतेच्या सामाजिक नियमांनुसार सोशल मीडिया साईट्स लवकरच या व्हिडीओचं प्रदर्शन थांबवतील. परंतु घडलेली घटना वास्तव आहे. घटनेचे तपशील तेच आहेत जे लिहिलंय. आपल्याला माहीत नाही की या व्हिडीओनंतर त्या महिलांच्या सोबत काय झालं? जमावाची गर्दी त्यांना कुठून घेऊन येत होती? कुठं घेऊन जात होती? त्या व्हिडीओला सुरवात आणि शेवट नाहीये, फक्त मधला थोडा भाग आहे. कोणीही त्या व्हिडीओकडं दुर्लक्ष करू शकत नाही. आज तुम्ही शांत राहू शकत नाही. पुरुषांच्या जमावानं वेढलेल्या त्या निर्वस्त्र महिलांसाठी आज बोलावं लागेल. जात, धर्म, भाषा, प्रदेशाच्या अस्मितेच्या राजकारणानं माणसालाच माणुसघाणं बनवलंय. मणिपूरच्या महिलांना घेरून नाचणारा जमाव तुमच्या आजूबाजूला सुद्धा तयार झालाय. त्या सर्वांना जाऊन सांगा की अस्मिता आणि द्वेषाच्या राजकारणानं देशाच्या जनतेला कशाप्रकारे या जमावात सामील केलंय. त्या ‘मणिपूर’च्या महिला नाहीयेत. त्या कुकी महिला नाहीयेत. त्या फक्त महिला आहेत. जर ही घटना तुम्हाला अस्वस्थ करत नसेल, यानं तुमचं शरीर कंप पावत नसेल तर तुम्ही स्वतःला मृत घोषित करून टाका. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यात शांततेचं आवाहन केलेलं नाही. तिथं जाऊन द्वेष आणि हिंसा रोखण्याचं आवाहन केलेलं नाही. सरकारनं त्याचं कर्तव्य पार पाडलं नाही. त्यांच्या जाण्यानं किंवा आवाहनानं हिंसा थांबलीच असती याची काही गॅरंटी नाही. पण या चुप्पीचा काय अर्थ आहे? या चुप्पीचं समर्थन केलं जाऊ शकतं? पण प्रधानमंत्री परदेश दौऱ्यात मश्गुल होते, निवडणूक यंत्रणेत गर्क होते. सत्ता आल्यानंतर मित्रपक्षांना धुडकावलेल्यांना गोंजारत होते. जळणाऱ्या मणिपूरपेक्षा हे सारं त्यांना महत्वाचं वाटत होतं.

अत्याचार करणाऱ्यांचे चेहरे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत असतानाही पोलिसांनी आजवर कोणतीच कारवाई केली नाही. आता लोकांनाच विशेषतः महिलांना पुढाकार घ्यावा लागणार. बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशाप्रकारे जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बिळात दडलेल्या नरपशूंना, अत्याचार करणाऱ्या नराधमांना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींची विटंबना करणाऱ्यां विरोधात संतापानं खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर येऊन त्यांना हुडकून काढून चेचून सरळ करायला हवंय. खरं तर कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय! अक्षरशः महिलांना निर्वस्त्र करून तिच्या छातीवर, गुप्तांगावर शेकडो हातांनी मुलीं, महिलेवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी आणि शुष्क भावनांनी संवेदना संपलेला आपला हा समाज व्हिडीओ पाहतो, बातम्या वाचतो आणि विसरून जातो. त्या बिचाऱ्या मुलींना त्यांचा देह ही भोगाची खाण आहे, आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणून अत्याचार होतोय हे भयाण वास्तव अनुभवायला येतं. दुसऱ्याच्या विकृत वासनेपायी आपलं सारं जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसेल. दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा जणू मोहोर फुटलाय, त्यामुळं अशा पाशवी घटना वारंवार घडताहेत. मणिपूरच्या विकृत मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना तर बेशरमपणे अशी शेकडो घटना इथं घडल्यात असं म्हटलंय. असं सांगताना त्यांना थोडीशीही लाज वाटली नाही. हे असले नीच प्रकार लोकांसमोर येऊ नयेत म्हणून इंटरनेट बंद केल्याचं सांगतात, या निर्ढावलेल्यांना काय म्हणावं? आमच्या मुलीबाळींना नासवणाऱ्यांना ठेचून काढण्यासाठी जागरूकता, ऐक्य दाखवू शकलो तरच सत्ता आणि मत्ता यांचा कैफ चढलेली बेधुंद बेफाम झालेली कारटी ताळ्यावर येतील! तब्बल ७७ दिवसांनंतर व्हिडीओमार्फत उघडकीस आलेल्या या मणिपूरच्या घटनांनी सारा देश हादरून गेलाय. जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या इथल्या कळ्यांना कुस्करून टाकलं जातंय. या कळ्यांचं विकृत वासनेच्यापोटी क्रूरपणे बळी घेतले जाताहेत. एकापाठोपाठ एक अशा घटना उघडकीला येताहेत. मुलींवरच्या अत्याचाराच्या बातम्या आल्यानंतर देशभरात फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर आक्रोश उमटतोय. डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज उघडकीस येताहेत.

सत्ता म्हणजे अधिकार आणि मत्ता म्हणजे पैसे हे पचवायलाही माणूस समर्थ असायला लागतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडं समाजाचं लक्ष आहे, याची जाणीव त्याला असावीच लागते. लोकांची पर्वा नसेल असं त्यातल्या एखाद्याला वाटतं, पण तो सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, निर्मिक परमेश्वर, जगतचालक माझ्यावर लक्ष ठेवतोय त्याची पर्वा करायला हवी, असं त्या एखाद्याला वाटायलाच हवं. हे जेव्हा वाटेनासं होतं तेव्हा घसरण सुरू होतं. मुलं बेफाम बनतात. हे सगळं नक्की कशामुळं घडलं याचा खोल अभ्यास करून मगच निष्कर्ष काढले गेले पाहिजेत. जेव्हा समाजाचंच नैतिक अधःपतन होतं तेव्हा असं घडणारच! याबाबत समाजानंच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. जी वासनाकांडं गेल्या काही दिवसात मणिपुरात धगधगली वा आज जी धगधगताहेत ती बघितल्यावर चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. जे काही हरामखोर अशा वासनकांडात गुंतलेत. त्यांना जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाजानं पुढाकार घ्यायला हवाय. स्त्रियांच्या, मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणंच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजानं का घेऊ नये, जे कुणी पोलिसांच्या हाती न सापडता सोज्वळता मिरवत बसलेत त्यांना महिलांनी, समाजानं गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, भेकडपणे या अशा प्रकरणी आपलं सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांना आनंद होईल. प्रसिद्धी माध्यमं अशा बाबी रवंथ करत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली, महिलांनी दाखवायला हवी. असले नीच प्रकार करणाऱ्यांच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, सत्तेचं आणि मत्तेचं पाठबळ आहेच. आमचं कोण काय वाकडं करणार? आम्ही सगळं दडपू शकतो, अशी खात्री असल्यानंच हे सारे बेफाम बनलेत. आमच्या हाती सत्ता आहे. कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो. लोकांना धमकावू शकतो आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरूण घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारे वापरायचं असतं असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासवणाऱ्या प्रकाराबद्धल राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. राजकीय व्यासपीठावरून राणा भीमदेवी थाटाची भाषणं करणारे लोक लैंगिक शोषणाबाबत काहीच बोलत नाहीत. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी भांडणारेही शांतच आहेत. मोठा गाजावाजा करत 'बेटी बचाव बेटी पढाव!' म्हणत महिलांच्या विकासाचं धोरण जाहीर करणाऱ्या पक्षालाही याचं तर जणू सोयरसुतकच नाही अशी परिस्थिती आहे.

मणिपुरातला सामूहिक बलात्कार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतात. एका तरुणीवर कित्येकजण अत्याचार करतात, तिच्या देहाचा चोळामोळा करतात, तिची तडफड त्यांना दिसत नाही, त्यांचं मन द्रवत नाही. एकाकी असहाय स्त्रीवर ते झडप घालतात. सत्ता, पैसा आणि ताकद या तिन्हींचा या दुष्कार्मासाठी वापर केला जातो. सारं करून साळसूदपणे मिरवायला पुरुषपशु मोकळे सुटतात याविरुद्ध संघटित आक्रदन व्हायला हवं! महिलेला नग्न करून तिची धिंड काढून बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटत नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. जोवर आपल्या अब्रूच्या अंगारानं ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशा नराधमांना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर वर्तमानकथाही आहे. स्त्री जोवर हिंमत दाखवणार नाही तोवर असंच होणार. अत्याचारी पुरुषाचं पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याच्या बातम्या अधूनमधून वृत्तपत्रातून येतात. जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात हे केव्हाच सांगितलंय!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...