"आता लोकशाहीच्या या उत्सवात काहींच्या अंगात शिमगा संचारलाय. मुद्दे नसल्यानं गुद्देही उपसले जाताहेत. कुणीही, काहीही बरळत राहतोय, हे सध्या खूप वाढलंय. कुणी कुणावर टीका करावी, याचा घरबंद, संकेत राहिलेले नाहीत. वरिष्ठ त्यांना आवरण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळं अशांना ऊत आलाय. खोके, बोके, खोट्या धर्माभिमानाच्या, निंदानालस्तीच्या उधळणात लोकांचे मुद्देच हरवलेत. सातत्यानं विरोधकांबद्दल अवमानकारक वक्तव्यं केली जाताहेत. विरोधी विचारही असतो याला छेद दिला जात असल्यानं सभा, बैठका उधळल्या जाताहेत. बेताल वक्तव्य करून, मुक्ताफळं उधळून प्रसिध्दी मिळवताहेत. लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विरोधकांवर टीका व्हायला हवी, पण नेत्यांनी अशा बेताल, बेछूट, बेधुंद वाचाळवीर नेत्यांना, बडबोल्यांना आवरायला हवंय..!"
...................................................
*म*हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या उमेदवार निवडीचा घोळ संपून आक्रमक प्रचाराला आरंभ झालाय. उथळ आणि उठवळ नेते एकमेकांवर आरोपांची, निंदानालस्तीची राळ उठवताहेत. नुकतंच भाजपचे सदाशिव खोत यांनी कॅन्सरमुळे शरद पवारांच्या चेहऱ्यावर झालेल्या व्यंगाची खिल्ली उडवली. एक बिनडोक नेता हे हीन दर्जाचं भाष्य करतो तेव्हा व्यासपीठावरचे गृहमंत्र्यांसारखे वरिष्ठ, याशिवाय इतर जबाबदार नेते त्याला हसून मूक प्रतिसाद देतात, तेव्हा सार्वत्रिक प्रचार किती आणि कुठवर घसरलाय याची जाणीव होतेय! ही आपली संस्कृती आहे का? सर्वपक्षीय नेत्यांनी अशा भाषेत बोलणाऱ्यांना प्रमोट करणं बंद करायला हवं. सर्वच पक्षातल्या नेत्यांना आताशी राज्यात संस्कृती, नीतिमत्ता, शिवरायांचा महाराष्ट्रधर्म नकोय, फक्त हवीय ती सत्ता, म्हणून ते सारे सत्तेसाठी कोणतीही गोष्ट करायला तयार होताहेत. याचाच अर्थ सत्ताधारी महाराष्ट्रधर्म, संस्कृती विसरून गायपट्ट्यातली संस्कृती इथं आणतेय, असं चित्र निर्माण झालंय. वेळीच हे रोखायला हवंय. मनसे नेते राज ठाकरे यांनी नागपुरातल्या सभेत "राजकारणातल्या सर्वच पक्षाच्या वाचाळवीरांनी नुसता गोंधळ घातलाय. सुसंस्कृत महाराष्ट्राची ही मंडळी धिंडवडे काढताहेत. अशा वाचाळवीरांना, बडबोल्यांना प्रसिद्धीमाध्यमांनी वेळीच रोखून आवर घातला पाहिजे. टीआरपीसाठी विविध वाहिन्या आणि प्रसिद्धी मिळत असल्यानं अशांचा जोर वाढलाय. लोकांना हे आवडत नाही. साऱ्याच पक्षांच्या नेत्यांनी अशा बेछूट, बेताल, बेधुंद वाचाळवीरांना आवर घातला पाहिजे...!" असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राहुल गांधींनी परदेशात आरक्षणासंदर्भात काहीसं वक्तव्य करताच, ते पुरेसं समजून न घेताच इथल्या काही नरपुंगवांनी त्यांची जीभ छाटण्याची, जीभेवर चटके देण्याची भाषा केलीय. त्यावेळी "अशा या वाचाळवीरांना आता आवरा...!" असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. मात्र त्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी या बोलघेवड्यांना बजावण्याऐवजी त्याचं कौतुक करत पाठीशी घातलं अन् आपली संस्कृती दाखवून दिली. राजकारणात बेताल वक्तव्यांची परंपरा ही काही नवीन नाही. आजवर अनेकांनी बेछूट आणि बेताल वक्तव्यं करण्याचे उच्चांक प्रस्थापित केलेत. किंबहुना कोण जास्तीत जास्त बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करू शकतो, याची सध्या जणू स्पर्धाच लागलीय. विशेष म्हणजे अशा वक्तव्यांची मक्तेदारी कोणत्याही एका विचारधारेची नाही. त्यामुळं सगळेच पक्ष आणि संघटनांशी संबंधित अनेक या स्पर्धेत आहेत. आज जरी वाचाळवीरांना आवरा म्हणत असले तरी पूर्वीचं अजित पवारांचं धरणाबाबतचं विधान असेल, राम कदम यांचं दहीहंडी दरम्यान मुलीं पळवून नेण्याबाबत केलेलं वक्तव्य, प्रशांत परिचारकांचं सैनिकांच्या पत्नींबाबतचं वादग्रस्त वक्तव्य, रावसाहेब दानवेंचं शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणणं, प्रज्ञा सिंह-ठाकूर यांनी माजी एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्या बाबतीत केलेलं विधान किंवा महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याची देशभक्त म्हणून केलेली भलामण, बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांचं संत तुकाराम यांच्याबद्दलच वक्तव्य, ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असं म्हणणारे गोवर्धन मठ पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेलं विधान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाशिव खोत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांबाबत केलेली आक्षेपार्ह विधानं, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त आणि हीन दर्जाचं केलेलं वक्तव्य, भूतपूर्व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्धल केलेली विधानं, चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांची केलेली निर्भत्सना, देवेंद्र फडणवीस यांचं टरबूज, फडतूस अशी केली जात असलेली संभावना... ही अशी लांबलचक यादी संपणारी नाहीये, उलट यात भरच पडेल. आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह नव्यानं भाजपत आलेले चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, अनिल बोंडे, प्रसाद लाड, राणा दाम्पत्य, मोहित कंबोज, नारायण राणे, आणि त्यांची दोन्ही मुलं, शिवसेनेचे संजय राऊत, भास्कर जाधव, मनसेचे संदीप देशपांडे, गजानन काळे, अजित पवार राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, शरद पवार राष्ट्रवादीचे मेहबूब शेख, शिंदेसेनेचे संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, ज्योती वाघमारे, शिवाय काँग्रेसचे नाना पटोले, मणिशंकर अय्यर, सॅम पित्रोडा आणि काही नेत्यांची वक्तव्यं नेहमीच आक्षेपार्ह असतात. मात्र पक्ष नेतृत्वाकडून याची फारशी दखल घेण्याचं सौजन्यही दाखवलं जात नाही. उलट 'त्यांची ती स्टाईल आहे...!' असं म्हणत पाठराखण केली जाते. त्यामुळं अशांचा माज आणखी वाढतो.
राजकीय पक्षांचा एकूण विचार केल्यास भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या इतरांच्या तुलनेनं अधिक आहे. अनेक दिवसांपासून या पक्षाचे नेते पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करताहेत. नेत्यांची अशी वादग्रस्त विधानं ‘चुकून’ बोलली जातात, प्रसारमाध्यमं त्यांचा ‘विपर्यास’ करतात, का ती प्रसिद्धीसाठी ‘जाणीवपूर्वक’ केली जातात, हा संशोधनाचा विषय आहे. काही वक्तव्यं ही अनावधानानं बोलण्याच्या ओघात झालेली असावीत, हे मान्य केलं तरी किमान वक्तव्य केल्यानंतर आपण काहीतरी चुकीचं बोललोय, हे मान्य करून दिलगिरी व्यक्त करण्याचं धाडस तरी दाखवणं गरजेचं आहे, परंतु काही अपवाद वगळता हा समजूतदारपणा फार अभावानंच आढळतो. काही वेळा माध्यमांचा खोडसाळपणा जरी ध्यानात घेतला तरी बहुतेक विधानं ही जाणीवपूर्वक अथवा वाद निर्माण करण्यासाठी केलेली आपल्याला आढळून येतात. आपली स्वामीनिष्ठा दाखविण्यासाठी ही धडपड दिसते. महापुरुषांचा विषय सामाजिक अस्मितेचा असून शिक्षण, आरोग्य, महागाई, रोजगार या विषयांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी अशी बेताल वक्तव्य केली जात असल्याचं दिसतं. संविधानानं आपल्याला दिलेलं भाषण-स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अधिकार आहेतच. परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! घटनेनं जसे अधिकार दिलेत, तशी काही कर्तव्यंही सांगितलीत. याचा त्या वाचाळवीरांना सोयीस्कर विसर पडलाय. मालवणमध्ये नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची 'घरात घुसून मारून टाकीन...!' ही धमकी गृहमंत्री फडणवीसांना ती राणेंची स्टाईल वाटते. नारायण राणेंवर कारवाई करण्याऐवजी फडणवीस त्याची भलामण करताना पाहून आश्चर्य वाटतं. तेच का हे फडणवीस ज्यांनी विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांना भाषेवरून वेठीला धरलं होतं!
पूर्वी राजकीय नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप होत होते. चिखलफेकही होत होती. एका मर्यादेत एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक व्हायची किंवा एखाद्याच्या चारित्र्याबद्दल खुबीनं संशय निर्माण केला जायचा. वैयक्तिक विधानं फारशी होत नव्हती. जी काही टीका होत होती, आरोपाचा धुराळा उडवला जायचा तो सार्वजनिक आयुष्यातल्या भूमिकांवरून होत होता. सध्या हेतुपुरस्सर ‘सेन्सेशन’ निर्माण करण्यासाठी चिथावणीखोर, एखाद्याचा अवमान करणारं, अश्लील वक्तव्य करण्याचा प्रकार सर्रास वाढीला लागलाय. विरोधी नेत्यांचं चारित्र्यहनन करण्याचा उद्योग साऱ्यांनीच आरंभलाय. खुद्द प्रधानमंत्री मोदींसारख्या ज्येष्ठ नेत्याची संसदेतली टीका टिपण्णी, जाहीर सभेत शरद पवार यांना 'भटकती आत्मा' म्हणणं, उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांचा 'नकली वारस' म्हणणं. त्यांना पवार, ठाकरे यांनी त्याच पातळीवर उतरून प्रतिक्रिया देणं, हे सारं विचित्र आहे. ज्येष्ठांनीच असं वागायला सुरुवात केली तर मग त्यांच्या चेल्याचपट्यानी तर अगदी खालचा स्तर गाठला तर कोण कुणाला जाब विचारणार? विधिमंडळाच्या सभागृहातही राजकीय अभिनिवेष व्यक्त करताना धमकीवजा इशारे दिले जातात. हा प्रकार अस्वस्थ करणारा आहे. भारतात बहुपक्षीय घटनात्मक लोकशाही आहे आणि प्रत्येकाला स्वत:ची काही राजकीय मतं, भूमिका आहेत, हे मान्यच आहे आणि तेच भारतीय लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे. परंतु स्वत:ला विशिष्ट धर्माचं, पंथाचं किंवा राजकीय पक्षाचं म्हणवून घेणाऱ्यांची विधानं ही अत्यंत संतापजनकच आहेत. परंतु अशा नेत्यांच्या वक्तव्याचं समर्थन जेव्हा केलं जातं, हे त्याच्यापेक्षाही अधिक क्लेशदायक आहे. प्रत्येकाची काही एक राजकीय आणि वैचारिक भूमिका असू शकते, किंबहुना असायलाच हवी. असं का मानलं जात नाही? परंतु देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद, महापुरूष, संत, नेत्यांचं ज्येष्ठत्व, सांस्कृतिक परंपरा या बाबतीत तरी आपण आपला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून थोडी संवेदनशील भूमिका घेतली जाणार की नाही, हा खरा प्रश्न निर्माण होतो.
अलीकडे देशभरात लोकांना ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’ ठरविण्याची चढाओढ लागलेली असताना स्वत:ला ‘देशभक्त’ म्हणवून घेणारे लोक वादग्रस्त वक्तव्याचं निर्लज्जपणे समर्थन करतात. चुकीचं वक्तव्य करणारी व्यक्ती ही फक्त आपल्या धर्माची, ठराविक राजकीय विचारधारेशी संबंधित आहे, म्हणून तिचं समर्थन होणार असेल तर त्यांची कीव करावीशी वाटते. कारण अजून तरी या समाजाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे. आपल्या वक्तव्याचा राजकीय पक्षाला फायदा होईल किंवा नुकसान होईल एवढा संकुचित विचार करणारा हा समाज नक्कीच नाही. काही गोष्टी राजकारणापलीकडे असतात आणि त्याबद्दल प्रत्येकानं एक ठाम भूमिका घेणं नितांत आवश्यक आहे. स्वत:ला सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवून घेणारा समाजाकडून अशी ठोस भूमिका घेतली जात नाही, हीच खरी शोकांतिका आहे. परंतु हा देश अनेक वैचारिक आक्रमणे पचवूनही आज ठामपणे उभा आहे. या देशातले सर्वसामान्य नागरिक अशा बेताल, असंवेदनशील वक्तव्यांना आणि व्यक्तींना पाठीशी घालणार नाहीत, हा आशावाद अजून तरी नक्कीच जिवंत आहे. स्वातंत्र्य मिळविताना महापुरुषांनी धर्मनिरपेक्षतेला सर्वधर्मसमभावाचं तत्त्व जोडलं होतं. त्यात सर्व धर्म, जाती आणि जागतिक मानवतावादी मूल्यांची कदर करण्याचं तत्त्व देशात उभं केलं होतं. पण त्यामुळंच आपल्या लोकशाहीप्रधान समाजात राक्षसी हव्यास बाळगणारी धर्मांधता निर्माण होऊन देशात भीती आणि असंतोषाची लाट निर्माण होतेय, तेव्हा स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर आपण कोणत्या मार्गानं पुढं जात आहोत, असा विचार करावाच लागतो. आपला राष्ट्रवाद हा वंशवादाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी नव्हता आणि जातीय भावनांना खतपाणी घालून लोकांमध्ये राग, द्वेष आणि तिरस्कार उत्पन्न करण्यासाठी तर त्या मार्गानं आपल्याला जायचं नव्हतं. दुर्दैवानं राजसत्तेच्या आकांक्षेनं विविध समाजांमध्ये दरी निर्माण केली जातेय. एका बाजूला मणिपूर जळतेय, तर दुसऱ्या बाजूला धार्मिक, सामाजिक भेदभाव निर्माण करून तिरस्काराची मोहीमच सुरू करण्यात आलीय. पोलिस स्वस्थ बसून आहेत, सरकारी अनास्थेवर प्रश्न उपस्थित केले जाताहेत. किंबहुना सरकारलाच असं विभाजन आणि धार्मिक ध्रुवीकरण तर नकोय ना? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. यासाठी 'व्होट जिहाद'सारखे शब्द वापरले जाताहेत.
‘Democracy is Government by Discussion’ असं जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतानं म्हटलंय, पण आपल्या लोकशाहीतला ‘संवाद’ हरवलाय, माजलाय तो नुसता कर्णकर्कश्श कलकलाट! बहुसंख्य राजकारण्यांची बेताल, बेछूट, असंस्कृत ‘मुक्ताफळं’ जी ऐकताना उबग आलाय. राजकारणाचा ढळलेला तोल, वाढलेली मग्रुरी, चंगळवाद आणि हरवलेला ‘सुसंस्कृतपणा’ कुणाही संवेदनशील लोकशाहीवाद्याला फार अस्वस्थ करणारा आहे. राजकारण म्हणजे केवळ यथेच्छ शिवीगाळ असा समज वेगानं पसरतोय. हा समज देशव्यापी झाला, तर उद्या लोक मतदानालाच न फिरकण्याची भीती आहे. असं जर खरंच घडलं, तर लोकशाहीत लोकच नसतील. लोकशाहीतला सुसंवाद हरवत चाललाय, सुसंस्कृपणा लोप पावतोय, हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. राजकारण्यांची भाषा, वागणं, राहणी आणि मग्रुरी ही चिंताजनक आहे. पूर्वी त्यात कळकळ होती, तळमळ होती आणि चिंताही. सध्या राजकारणाचा स्तर खूपच खालावलाय. राजकारण म्हटलं की, आरोप–प्रत्यारोप होणारच, सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगणारच, पण मनुष्य आणि प्राण्यांचे अवयव तसंच अ-संसदीय भाषा तेव्हाच्या राजकारणात खरंच नव्हती. शब्दांच्या धडाडत्या तोफांतून मारा करून सभागृह आणि मैदानी सभा गाजवणारे आचार्य अत्रे, जांबुवंतराव धोटे, केशवराव धोंडगे, प्रमोद नवलकर, रामभाऊ म्हाळगी, एन.डी. पाटील, छगन भुजबळ, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते सभागृहात पाहता आले. त्यांचा सुसंस्कृतपणा अनुभवता आला आणि जनतेप्रती त्यांच्या हृदयांच्या गाभाऱ्यातून आलेल्या कळकळीची आणि क्वचित क्रोधाचीही प्रचिती घेता आली. वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, मनोहर जोशी अशा अनेक सत्ताधारी नेत्यांचा आणि त्यांच्या मंत्रीमंडळातल्या सहकाऱ्यांचा सुसंस्कृतपणाही डोह खोल होता. मंत्रीपद भूषवलेल्या शेषराव वानखेडे, रफीक झकेरिया, शिवराज पाटील चाकुरकर, सुधीर जोशी, शंकरराव गेडाम, सुंदरराव साळुंके, शंकरराव गेडाम, नितीन गडकरी, दिग्विजय खानविलकर, आर. आर. पाटील, भारत बोंद्रे... अशी किती तरी नावं या संदर्भात घेता येतील. निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदानापासून जर दूर राहिला, तर त्यांना दोष देणार तरी कसा? ‘सुसंस्कृत राजकारण’ का लोप पावलं. ‘एक मारेन’, ‘थोबाड फोडेन’, ‘कानफटात लगावेन’, ‘कुणाचे तरी गाल’, ‘अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू’ आणि ‘म्हसोबाला सोडलेले बोकड’, अशी भाषा आली.
राजकीय अध:पतनाचं केवळ राज्यस्तरीयच नव्हे, तर राष्ट्रीय स्वरूपही ‘कुरूप’ झालेलंय. आपल्या बहुसंख्य मतदारांच्या मनात राजकारण्यांविषयी तिरस्कार आहे, काहीच्या मनात घृणाही, पण आपण या दिव्य लोकांना मतदान का करतो, चांगल्या उमेदवारांना निवडून का देत नाही, यासंदर्भात आपण कधीच किमानही गंभीर नसतो. अनेकजण तर मतदानालाही जात नाही अन् राजकारणी कसे वाईट आहेत, याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर टाकण्यात धन्यता मानतो. एकापेक्षा एक ‘हुच्च’ राजकारणात दिसताहेत. देशातल्या अशा सुमारे १०७ लोकप्रतिनिधीविरुद्ध ‘हेट स्पीच’ प्रकरणी गुन्हे दाखल झालेत आणि त्यापैकी ४२ ‘संस्कृतीरक्षक’ भाजपचे आहेत! अशा बहुसंख्य राजकारण्यांमुळे, राजकारण म्हणजे केवळ यथेच्छ शिवीगाळ असा समज वेगानं पसरतोय. हा समज देशव्यापी झाला, तर उद्या लोक मतदानालाच न फिरकण्याची भीती आहे. असं जर खरंच घडलं, तर मग लोकशाहीत लोकच नसतील! हे चित्र अस्वस्थ करणारं आहे!
हरीश केंची
९४२२३१०६०९