Saturday, 7 December 2024

रेवांथ रेड्डी यांचा विजय

तेलंगणाच्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा विजयरथ रोखणाऱ्या रेवंत रेड्डींना आता काँग्रेसकडून तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जातंय. एकेकाळी जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी झगडलेले रेवंत रेड्डी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपर्यंत कसे पोहोचले, याची कहाणी रंजक आहे. कधीकाळी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षानं जिल्हा परिषदेचं तिकीट न दिल्यामुळं अपक्ष निवडणूक लढवलेल्या रेवंत रेड्डींनी काँग्रेसला तेलंगणात लक्षणीय जागा मिळवून दिल्या आहेत. २०१४ नंतर पहिल्यांदाच काँग्रेस दक्षिणेकडील आणखीन एका राज्यात सत्ता हाती घेतलीय. काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकात काँग्रेसनं एकहाती विजय मिळवला. ५४ वर्षांच्या रेवंत रेड्डींचा तेलंगणाच्या राजकारणातला हा करिष्मा येणाऱ्या काळात चर्चेत राहील हे मात्र नक्की. कारण दोन वर्षांपूर्वी तेलंगणात काँग्रेसची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत होतं. २०२१ मध्ये काँग्रेसच्या प्रदेश कमिटीचे अध्यक्ष झालेल्या रेवंत रेड्डींनी केवळ दोनच वर्षात काँग्रेसला मिळवून दिलेला हा विजय काँग्रेससाठी खूप महत्वाचा आहे. तेलंगणाच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या सभांना मिळालेला उदंड प्रतिसाद, रेवंत रेड्डींचा आक्रमक पवित्रा आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या कार्यपद्धतीबाबत मतदारांमध्ये दिसणारी नाराजी या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक्झिट पोलमध्येही तेलंगणात काँग्रेस विजय मिळवेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. आणि प्रत्यक्षातही सत्ता खेचून आणली.
तेलंगणामध्ये काँग्रेसचा चेहरा
निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी रेवंत रेड्डी काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले, तेव्हा त्यांना पाहताच त्यांच्या समर्थकांनी 'सीएम, सीएम' अशा घोषणा दिल्या होत्या. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचं एकहाती नेतृत्व केलेल्या रेवंत रेड्डी यांनी केलं होतं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून तेलंगणात प्रचार केलेल्या रेवंत रेड्डींनी फक्त सहा वर्षांपूर्वीच या पक्षात प्रवेश केला होता. तेलंगणाच्या स्थापनेपासून या राज्यानं केसीआर यांच्याव्यतिरिक्त एकाही व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावर पाहिलेलं नाही. त्यामुळं रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. याबाबत बोलताना स्वतः रेवंत रेड्डींनी सांगितलं होतं की, 'काँग्रेसला या राज्यात एकूण ऐंशी जागा मिळतील आणि जर असं झालं तर निवडून आलेले ऐंशी उमेदवार हे मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतील!'
कोण आहेत रेवंत रेड्डी?
अविभाजित आंध्र प्रदेशातल्या मेहबूबनगर जिल्ह्यात १९६९ मध्ये जन्मलेल्या अनुमुला रेवंत रेड्डी यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेतलेले रेड्डी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. पण २००६ मध्ये तेलगू देसम पक्षानं जिल्हा परिषदेचं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी त्यांची पहिली निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढली होती. मेहबूबनगर जिल्ह्यातल्या मिडजील गटाची ती निवडणूक होती. त्यानंतर २००८ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणूनच त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली आणि पुढे त्यांनी पुन्हा एकदा तेलगू देसम पक्षाचं काम सुरु केलं. तेलगू देसम पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी २००९ साली आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये ते तेलंगणा विधानसभेत तेलुगु देशम पक्षाचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण, २०१८ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ते तेलंगणा राष्ट्र समितीच्या उमेदवाराकडून पराभूत झाल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. केसीआर यांनी निवडणुकीच्या वर्षभर आधीच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, काँग्रेसने त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरी येथून तिकीट दिले ज्यामध्ये ते केवळ १० हजार ९१९ मतांनी विजयी झाले. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून त्यांना मोठी जबाबदारी दिली होती.
केसीआर यांच्यावर आरोपांच्या फैरी
दोन तीन वर्षांपूर्वी भाजप तेलंगणामध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत होतं. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी बीआरएस आणि केसीआर यांच्या घराणेशाही आणि राजकारणावर सडकून टीका करून भाजपकडे मतदारांना आकर्षित केलेलं होतं. तेलंगणात भाजप काँग्रेसच्या पुढे दिसत असतानाच भाजपने त्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले आणि रेड्डी समुदायाच्या जी. किशन रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष केलं. त्यामुळे केसीआर यांच्या विरोधातला मतदार भाजपवर नाराज झाला. केसीआर यांनी एकीकडे राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची तयारी सुरु केली आणि दुसरीकडे रेवंत रेड्डी यांना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. बंडी संजय यांच्या जाण्यानं बोथट झालेल्या केसीआर विरोधाची धुरा रेवंत रेड्डींनी त्यांच्या खांद्यावर घेतली आणि भाजपकडे वळलेला मतदार पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळू लागला.
 इतक्या कमी कालावधीत ते काँग्रेसचे 'पोस्टर बॉय' कसे बनले? तर ते महाविद्यालयीन जीवनापासून गेली २० हून अधिक वर्षांपासून राजकारण करत आहेत आणि गेल्या १५ वर्षांपासून ते विरोधी पक्षात आहेत आणि यामुळे ते जनतेशी जोडले गेले आहेत आणि त्यांना एक ओळख मिळाली आहे. तेलंगणात काँग्रेसचे फक्त ८ आमदार होते आणि बहुमताचा आकडा ६० आहे. दरम्यान, तेलंगणात भाजपही चांगलाच मजबूत झाला असून एआयएमआयएमनेही काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तेलंगणातील लोकांना असं वाटतं होतं की केसीआर आणि भाजपची मिलीभगत आहे तर एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हे दोघांमध्ये समन्वयक म्हणून काम करतात. बीआरएस भाजपला प्रोटेक्शन मनी देत आहे आणि जेव्हा जेव्हा समन्वयाची गरज असते तेव्हा ओवेसीजी येतात आणि दोन पक्षांमध्ये ही भूमिका बजावतात.
आमदारांना लाच दिल्याप्रकरणी अटक
२०१५ च्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रेवंत रेड्डी यांना अटक करण्यात आली होती. त्यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विधानपरिषद निवडणुकीत आमदार एल्विस स्टीफन्सन यांना लाच दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली होती. तेलगू देसम पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी ही लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता. तेलंगणा उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर रेवंत रेड्डी यांची १ जुलै २०१५ रोजी सुटका करण्यात आली.
काँग्रेसने हा विजय कसा मिळवला?
तेलंगणात सरकार आल्यास प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा ४ हजार रुपये, महिलांना अडीच हजार रुपये, वृद्धांना ४ हजार रुपये दरमहा पेन्शन आणि शेतकऱ्यांना १५ हजार रुपये देऊ, असं आश्वासन काँग्रेसनं दिलेलं आहे. रेवंत रेड्डी यांच्या मते, ' लोककल्याण मॉडेल आणि राज्यविकास मॉडेल या दोन गोष्टी काँग्रेससाठी महत्वाच्या आहेत. सक्षम आणि  गरजू लोकांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल, जे लोक इतरांवर अवलंबून आहेत त्यांना आधार देणं ही सरकारची जबाबदारी आहे!
तेलंगणात केसीआर सरकारनं अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आणि त्याच योजनांमध्ये पैसा वाढवण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिल्याचा आरोप निवडणुक प्रचारात काँग्रेसवर केला गेला.
या प्रश्नावर रेड्डी म्हणाले, “आम्ही २००४ ते २०१४ पर्यंत दिलेली पेन्शन ही आमची योजना होती. कर्जमाफी, इंदिरा आवास योजना, बेरोजगारांना पैसे देण्याची योजना आमची होती. आम्ही एका वर्षात दोन लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलंय. रेवंत रेड्डी यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या या आश्वासनांचा प्रचार केला. यासोबतच तेलंगणाची स्थापना काँग्रेसनंच केली, हेही मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रेवंत रेड्डी कोडंगल आणि कामारेड्डी या दोन जागांवर निवडणूक लढवत होते. कोडंगल ही त्यांची पारंपारिक जागा आहे तर कामारेड्डीमध्ये त्यांची थेट मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी लढत होती. कामारेड्डीमध्ये उमेदवारी देऊन काँग्रेसनं त्यांना अडकवलं होतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "इंदिराजींचा पराभव झाला, एनटीआर हरले, आणि आता केसीआर यांचा नंबर आहे."





No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...