आचार्य जे.बी.कृपलानी या गांधीवादी नेत्याची आज बेचाळीसावी पुण्यतिथी आहे.महात्मा गांधींनी मातीतून माणसं घडवली होती. त्याच माणसांची आम्ही माती करतो आहोत. आचार्य कृपलानींची अखेरच्या काळातली अवस्था जुनं सामान माळ्यावर टाकल्यासारखी झाली होती. त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी या मात्र कॉंग्रेस पक्षाकडून १९७१ पर्यंत सक्रिय राजकारणात होत्या. १९४६-४८ साली कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले कृपलानी नंतरच्या काळात १९५० मध्ये डॉ.लोहियांच्या समाजवादी पक्षात सामील झाले होते. गमतीचा भाग असा की, त्याआधी डॉ लोहिया हे कृपलानींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये कार्य करीत होते. दोघांमध्ये बावीस वर्षांचे अंतर होते.
१९४८ मध्ये कृपलानींची कॉंग्रेस अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर पट्टाभिसितारामय्या यांच्याकडं कॉंग्रेस अध्यक्षपद आलं होतं. त्यांनी पुरुषोत्तमदास टंडन यांचा पराभव केला होता. नंतर १९५० साली पुरुषोत्तम टंडन यांनी कृपलानी यांचा पराभव करून अध्यक्षपद प्राप्त केलं होतं. पटेलांनी पुरुषोत्तम टंडन यांची पाठराखण केली होती. त्यामुळं कृपलानींना पराभव पत्करावा लागला होता. टंडन हे मुस्लीमद्वेषी गृहस्थ होते. ते वैदिक संस्कृती पाळणारे गृहस्थ होते. कुंभमेळ्यात जाणारे वगैरे होते. गोपालस्वामी अय्यंगार, कन्हैयालाल मुन्शी, राजेंद्रप्रसाद ही मंडळी प्रत्यक्ष नेहरु विरोध दाखवत नव्हती. परंतु सौम्य वैदिकवादी होते. राष्ट्रपती पदावर असताना राजेंद्रप्रसाद हे सोरटी सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. नेहरुंनी त्यांना सांगितलं होतं की, आपण धर्मनिरपेक्ष देशाचे राष्ट्रपती आहात. आपण कोणत्याही एका धार्मिकस्थळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणं यानं नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. यावर राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी ती माझी वैयक्तिक श्रद्धा आहे, इथं पदाचा संबंध नाही. असं समर्थन केलं होतं. अशावेळी राष्ट्रपतींनी दोन दिवस खाजगी कामासाठी रजा घेऊन उपराष्ट्रपतींकडं कार्यभार सोपविणं आवश्यक होतं. यामुळं एक उचित नवीन पायंडा पडला असता. तो अनुकरणीयही ठरला असता. पण सत्तेच्या लवाजम्यासह मिरवून घेण्याचा मोह त्यांनाही सुटला नव्हता. माणसं कसोटीच्या क्षणी आपलं मूळ रुप प्रकट करतात. यावरुन लक्षात येईल की, नेहरु स्वातंत्र्योत्तर काळात एकाकी पडले होते. पण त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या बळावर ते टिकले होते. हिंदू कोड बिलाला विरोध करणारे बाहेरचे नव्हते, कॉंग्रेसमध्येच पेरलेली माणसं होती.
आचार्य कृपलानींनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केल्यानंतर कायम कॉंग्रेस विरोधी भूमिका घेतली होती. तरीही पंडित नेहरु त्यांचा आदर करीत होते. एकदा ब्लिट्झ या साप्ताहिकात कृपालानींची "पागल पंडित" अशी संभावना करण्यात आली होती. नेहरुंनी करंजियांना संसदीय समितीसमोर बोलावून माफी मागण्यास भाग पाडलं होतं. पंडित नेहरु लोकशाही मूल्यांची कदर करुन विरोधकांचा सन्मान करीत असत. अर्थात नेहरु कृपलानींची योग्यता जाणून होते. त्यांनी कृपलानींच्या लग्नात मध्यस्थाची भूमिका वठवली होती. आचार्य कृपलानी हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एम ए. झाले होते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात वर्षभरच अध्यापन केलं, पण तेवढ्याही काळात त्यांची ख्याती तेथे रेंगाळत राहिली होती. त्याच विद्यापीठात शिकविणाऱ्या सुचेता मुजूमदार यांच्या कानावर कृपालानींचं नाव गेलं होतं. त्यांनी नंतर कृपलानींचं मार्गदर्शनही घेतलं होतं. त्यांच्यात मैत्रीचा धागा जुळला, त्याचं रुपांतर विवाहात करण्यासाठी महात्मा गांधीजींची अनुमती घ्यायला गेले होते. गांधीजींनी त्यांना साफ नकार दिला होता. चळवळीचं नुकसान होईल, असं कारण सांगितलं होतं. परंतु सुचेतांनी गांधीजींना उलट सवाल केला, की विवाहामुळं एकाऐवजी दोन कार्यकर्ते चळवळीला मिळत असतील तर ? गांधीजी निरुत्तर झाले होते. त्यांचा विरोध कदाचित वयामुळं असावा. कारण जे.बी. यांचं वय ४८ तर, सुचेता यांचं वय २८ होतं. नेहरुंचा मात्र त्यांना पाठिंबा होता. कृपलानींचं वैशिष्ट्य हे की, ते अनेकदा तुरुंगात गेले होते. पण त्यागाचं भांडवल करुन पदं मिळविली नाहीत. त्यांच्या आधी नेहरु दोन वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले होते. सरदार पटेल आणि आचार्य कृपलानींना पंतप्रधान पदासाठी नेहरुंपेक्षा जास्त पाठिंबा कॉंग्रेसमध्ये होता. नेहरुंचं धर्मनिरपेक्ष असणं कॉंग्रेसमधील वैदिक पंथियांना मानवणारं नव्हतं. पण गांधीजींचं माप नेहरुंच्या पारड्यात पडलं होतं. ते रास्तही होतं. हे नंतर सिध्द झालं. नेहरु भारतीय जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होते.
कृपलांनीसारख्या योध्याला एवढं उपेक्षित राहावं लागलं याचं वैषम्य वाटतं. अर्थात त्याला वैयक्तिक हटवादीपणाही कारणीभूत ठरतो. १९४५ सालच्या अखेरीस भारताला स्वातंत्र्य देण्याची तयारी ऍटलीनं दर्शवली होती. त्यावेळी पटेल, नेहरु, राजेंद्रप्रसाद, कृपलानी हे नेते पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत होते. सत्तेची चाहूल लागल्यानं कॉंग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मौलाना आझाद कॉंग्रेस अध्यक्ष होते. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार होतं. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडीसाठी बापूंना नाव सुचविण्यास सांगितलं होतं. बापूंनी आचार्य नरेंद्र देव यांचं नाव कागदावर लिहून दिलं होतं, बापूंचं त्यादिवशी मौन होतं.
परंतु पटेलांना आणि डॉ राजेंद्रप्रसादांना समाजवादी नेते महत्वाच्या पदावर नकोत म्हणून सरदार पटेलांनी आचार्य कृपलानींना अध्यक्ष होण्याची गळ घातली होती. कृपलानींच्या ध्यानात आलं होतं की, माझी बोळवण केली जात आहे. पण पटेलांनी आश्वासन दिलं की, मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेळी तुझा समावेश मंत्रिमंडळात होईल आणि अध्यक्षपदी दुसरी व्यक्ती नेमली जाईल. प्रत्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान निवडले गेले होते. सरदार पटेल उपपंतप्रधान आणि गृहमंत्री बनले होते. तर राजेंद्रप्रसाद घटना समितीचे अध्यक्ष बनले होते. कृपलानींची अध्यक्षपदाची मुदत १९४८ साली संपल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं. त्यांना १९५० साली नेहरुंनी पुन्हा अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. पण पुरुषोत्तम दास टंडन यांना पटेलांनी लॉबिंग करुन निवडून आणलं होतं. कदर न झाल्यामुळं कृपलानींनी कॉंग्रेस सोडली आणि कृषक मजदूर पक्ष काढला पण त्याला फारसं यश मिळत नाही असं पाहून ते प्रजा समाजवादी पक्षाच्या वळचणीला गेले होते. तो पक्ष असा होता की, प्रत्येक नेत्याभोवती झळाळीचं एक वलय होतं. परंतु ती भांडकुदळ गॅंग होती.
अहंकार हा रोग व्यक्तीगत न राहता ती संघटनात्मक बिमारी बनली की, चांगुलपणाचं ओझंही नाईलाजानं उचलावं लागतं. त्यावेळी आपलेच सद्गुण आपल्यावर उलटतात. निती हे मूल्यं मोठं असलं आणि वारश्यानं आलेलं असलं तरी त्यांचाही एक गर्व असतो. त्यामुळं नणंदा, जावा जशा भांडून-तंडून वायल्या होतात. तसं समाजवादी मंडळींचं झालं होतं. त्यांच्यात फाटाफूट झाली होती. जयप्रकाश नारायण विनोबांसोबत नापिक जमिनींचं वाटप करीत भटकत होते. तर अशोक मेहता कॉंग्रेसवासी झाले होते. अच्युतराव, रावसाहेब हे पटवर्धन बंधू जे.कृष्णमूर्तींकडं जाऊन न सुटणारा गुंता विंचरत बसले होते. नरेंद्र देव १९५२ पराभवानं घायाळ झाले होते. नामधारी विचारवंत बनले होते. डॉ.लोहिया खवचटपणामुळं पक्ष संघटक बनण्याऐवजी पक्ष विभाजक बनले होते.
या साऱ्या परिस्थितीत आचार्य जीवतराम भगवानदास कृपलानी यांची अवस्था न घर का न घाट का. अशी झाली होती. सुरुवातीला नेहरु विरोध मग इंदिरा विरोध. वय झाल्यावर विरोधासाठी माणसं शोधू लागले होते. १९७५ सालचा तुरुंगवास १९७७ सालच्या जनता पक्षाची स्थापना ही त्यांची अखेरची कामगिरी होती. त्यांची अवस्था जख्मी जर्जर अश्वत्थाम्यासारखी झाली होती. आचार्य जे.बी.कृपलानींविषयी लिहिताना जरी व्यक्ती म्हणून त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकायचं ठरवलं तरी त्यांच्या कामगिरी सोबत इतिहास फरफटत येतोच. ते अपरिहार्य आहे. कारण ते इतिहासाचा एक भाग होते. या लेखाचा शेवट करताना त्यांच्यासंबंधीची एक कहाणी वाचली होती. ती सांगून लेख संपवतो.
एकदा कृपलानी आगगाडीच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत होते. डब्यातील सहप्रवासी एकमेकांशी गप्पा मारत होते. ते चांगल्या घरातील सुशिक्षित होते. त्यांच्या गप्पा रंगात येत येत वळणं घेऊन एकदम जातीवर आल्या होत्या. प्रत्येकजण आपापल्या जातीचं उगमस्थान सांगून ती श्रेष्ठ कशी आणि तीमध्ये किती थोर माणसं होऊन गेली होती. हे सांगत होता. त्यांच्या गप्पांचा धबधबा संपत आला होता, त्यामुळं सांगता येण्याजोगं शिल्लक राहिलं नव्हतं. त्याचं लक्ष पुस्तक वाचणाऱ्या कृपलानींकडं गेलं होतं. त्यांनी कृपलानींना विचारलं की, महाशय आपली जात कोणती? कृपलानींनी एकदा विचारणाऱ्याकडं पाहीलं आणि पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं. पण विचारणाऱ्यानं पुन्हा आग्रहपूर्वक विचारलं. महोदय आपली जात कोणती? पुस्तक बाजूला ठेऊन कृपलानी उतरले, "माझी कोणती जात सांगू तुम्हाला? मला एक जात असती, तर सांगितली असती."
"मी सकाळी उठल्यावर, नित्यकर्म करायला जातो, तेव्हा मी शूद्र असतो."
"जीवनातील अडचणींशी, झुंजावं लागतं तेव्हा मी, क्षत्रिय असतो."
"कॉलेजमध्ये शिकविण्यासाठी जातो, तेव्हा मी ब्राम्हण असतो."
"संसारासाठी व्यवहार करताना, मी वैश्य असतो."
हे ऐकून सहप्रवासी शरमिंदे झाले होते, त्यांना आपल्या मिथ्या, जातिअभिनिवेशाची लाज वाटत होती
No comments:
Post a Comment