Saturday, 7 December 2024

हमीद दलवाई : मुस्लिम सत्यशोधक

हमीद दलवाईंचा अकाली मृत्यू अनेकांना चटका लावून गेला होता. त्यांनी पन्नाशीही पुरती गाठली नव्हती. १९७७ साली त्यांच्या मृत्यूनंतर अनिल अवचटांनी त्यांच्या स्वभाव पैंलूवर 'हमीद' हे पुस्तक लिहिलं होतं. त्यालाही शेहेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. दलवाई मे महिन्यात गेले आणि जून महिन्यात निलकंठ प्रकाशनानं अवचटांचं हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. अवचटांचं निधन गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये झालं होतं. विजय तेंडुलकरांची या पुस्तकाला प्रस्तावना होती. त्यांचंही निधन २००८ साली झालं होतं. पुस्तकाचा नायक, लेखक आणि प्रस्तावनाकार तिघंही आज हयात नाहीत. पण पुस्तक हातात घेतलं की, मनाच्या तळाला साठलेला स्मृतीचा लगदा विरघळून सारं मन हमीदमय करुन टाकतं. आजही अविश्वसनीय आणि अनाकलनीय वाटतं की हमीद दलवाई हा सत्यशोधक विसाव्या शतकात होऊन गेला. एक माणूस इतका विद्रोही बंडखोर असू शकतो? त्याच्यामध्ये असं काय होतं की, तो कोणालाच भीत नव्हता? हमीदवर लिहिलेलं पहिलं पुस्तक अनिल अवचटांनी अनौपचारिकतेनं लिहलं होतं. तर मेहरुन्निसांनी लिहिलेलं, 'मी भरुन पावले आहे'  हे पुस्तक एका अस्वस्थ प्रवाशाची शेवटपर्यंतची तगमग, जीवाची आग आणि वेदनादायी अखेर! दोन्ही पुस्तकांनी हमीद यांचं व्यक्तिमत्त्व वेगवेगळ्या अॅंगल मधून रेखाटलेलं होतं. हमीद दलवाईं सारखी माणसं समाजाला सारखी सारखी मिळत नसतात. त्यांना सांभाळणं समाजाची जबाबदारी असते. कोणताही सुधारक अथवा प्रबोधनकार एका उंचीवर पोहचला, की तो जमिनीवर न येण्याची अधिक शक्यता असते. ते चळवळीसाठी नुकसानदायक असतं. पण दलवाईंच्या बाबतीत उलटं झालं होतं. दलवाई कधीही हवेत नव्हते. खालूनच स्वतःचं मूल्यमापन करीत होते. आणि समाज परिवर्तन होत नाही, म्हणून चरफडत होते, त्रागा करीत होते. तर त्यांचे अनुयायी, या आग्या वेताळाच्या जवळ जावं की, नाही? या संभ्रमात असायचे. हमीद यांनी भारतीय मुस्लीमांचं अनेकांगानी मूल्यमापन केलं होतं. त्यावेळी वैदिक कर्मकांडी चेकाळले होते. पण जसा हमीद यांनी वैदिक धर्माचा कुरुप चेहरा समोर आणला. तसं वैदिकांची तोंडं खेटरं मारल्यासारखी झाली होती. हमीदवर अनेकांनी प्रेम केलं होतं. आचार्य अत्रे, नानासाहेब गोरे, एसेम जोशी, ए.बी शहा, प्रधान मास्तर, यदुनाथ थत्ते, गोविंद तळवलकर, पु.ल.देशपांडे, भाई वैद्य, डॉ बाबा आढाव कितीतरी नावं सांगता येतील. हमीद उत्तम साहित्यिक होते. हमीद यांचं 'इंधन ' हे पुस्तक गाजलं होतं. त्यांच्या कथा अनेक नियतकालिकांत प्रसिध्द होत असत. कालाच्या ओघात तसं साहित्य वाचणारे वाचक कमी झाले आहेत. पण त्यांची 'कफनचोर ' ही कथा, एका साहित्यिकांची समाजस्थिती प्रकाशात आणणारी कब्रस्तानातली मशाल वाटते.
हमीद दलवाई मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर उभे राहिले होते. तेही तलाक पिडित महिलांसाठी. खरं तर मुस्लिम समाजाचे त्याशिवाय अनेक प्रश्न होते. नोकऱ्या, शिक्षण, व्यवसाय यातला दुजा भाव, अल्यसंख्य म्हणून कायम भितीच्या छायेत राहावं लागत होतं. हमीदला मुस्लिम समाजानं कधी मुसलमान मानलंच नव्हतं. जवळ जाणं तर फार दूरचं होतं. मुंबईत बांद्र्यात एका मौलवीकडं चर्चा करण्यासाठी उतरला होता. चर्चा तर दूरच राहिली पण दलवाई आलाय, हे समजल्यावर मौलवीच्या घराबाहेर हमीदला मारण्यासाठी जमाव जमला होता. पण मौलवींनी सांगितलं की, हा माझा मेहमान आहे. याचा 'बाल ही बाका करु देणार नाही! ' अशीच तऱ्हा औरंगाबादला झाली होती. पुण्याच्या मोमीनपुऱ्यातही हमीदला मारण्यासाठी माणसं जमा झाली होती.
हे सारं सांगण्याचं कारण असं की, हमीद यांची माणूस म्हणून तळमळ वेगळी होती. आणि कार्यकर्ता म्हणून जे भान असायला हवं होतं. ते हमीद यांच्याजवळ नव्हतं. मुस्लीमांमध्ये सांस्कृतिक क्रांतीची घाई झालेला सच्चा आदमी होता. त्यांचा सडेतोडपणा हा मुस्लिम संवेदनशीलतेला अनुकूल नव्हता. पण त्यांनी उभे केलेले प्रश्न मुस्लीमांच्या आठशे वर्षांतल्या वास्तव्यात कोणालाही पडले नव्हते. त्यामुळं हा आधुनिक प्रेषित इतर समाजाची भौतिक आणि शैक्षणिक प्रगती पाहून मुस्लीमांमध्ये सांस्कृतिक क्रांतीची अपेक्षा धरुन कार्य करीत होता. पण मुस्लीम समाजातले ऐतखाऊ धर्ममार्तंड, मठाधीश याला राजी नव्हते. कारण मुस्लीम समाज डोकेबंद राहण्यावरच त्यांची धर्मसत्ता उभी होती. हमीदनंतर पंचेचाळीस वर्षात काय बदल आणि परिवर्तन घडलं. याचं अवलोकन आणि मूल्यमापन आवश्यक ठरतं. मशिद आणि दर्ग्याच्या तावडीतून तरुणांना सोडविण्यासाठी जे गट काम करताहेत. त्यांना सर्व धर्मनिरपेक्ष संस्थांनी पाठिंबा दिला पाहिजे. हमीद कधीच मुस्लीम नव्हते. जशा इंदिरा गांधी केवळ भारतीय होत्या. जॉर्ज फर्नांडिस केवळ भारतीय होते. तसे दलवाईही केवळ भारतीयच होते. हे सर्व पुरोगामी संघटनांनी जाणीवपूर्वक ठसवलं पाहिजे. हमीद दलवाई अपयशी ठरले नाहीत, तर त्यांनी इस्लामचा बंदीस्त चीरा गदगदा हलवला होता. त्याला भेगा पाडल्या होत्या. त्या फटी मोठ्या करुन पाचर ठोकण्याचं काम उरलेल्यांनी करायला हवं. आज मुस्लीम तरुणांत जी संभ्रमाची अवस्था आहे. त्याला ओवेसी हे उत्तर नाही. हे तरुणांना समजायला लागलं आहे. पण त्यांना पर्याय देण्याचं काम सत्यशोधक मंडळाला करावं लागेल. त्यांच्या पाठीशी सर्व धर्मनिरपेक्ष संस्थांनी उभं राहायला हवं. महात्मा फुले यांच्यानंतर या देशात त्यांच्यासारखा विचार करणारा आदमी म्हणजे हमीद दलवाई होय. कोणतीही वैचारिक चळवळ, परिवर्तनवादी आंदोलन कधीच अपयशी ठरत नसते. हे शाश्वत सत्य आहे. त्याचं कारण असं आहे की, परिवर्तनाची बीजे पेरली जातात. काळच त्यांना अंकुरवतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आणि पंजाबराव देशमुखांनी मराठा आरक्षणाची बीजे पेरुन सत्तर वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. परंतु त्याला अंकुर फुटायला तीसेक वर्षे लागली. आता चाळीस वर्षांनंतर त्याचं वृक्षात रुपांतर झालं आहे.
हमीद दलवाई प्रतिभेचा चमत्कार होता. ब्रिटीश राजवटीच्या कालखंडात अनेक मुस्लीम नेत्यांचा उदय झाला होता. त्या दीड-दोनशे वर्षांच्या काळात एकही हमीद दलवाई निर्माण होऊ शकला नव्हता. भारतातच काय पण आशिया खंडातही इतका क्रांतिकारी विचारांचा विचारवंत झाला नव्हता. हमीद दलवाई अव्यक्तीगत (Impersonal) जीवन जगले होते. त्यांच्या लिखाणातून त्यांची वैचारिक जातकुळी डोकावते. कामाचा झपाटाही असा की जणू काही मलाच काळाच्या नियंत्यानं पत्र लिहून ही कामगिरी उरकायला लावली होती.
हमीद दलवाईंसारखी माणसं काळावर स्वार होतात. काळ त्यांना त्यांच्या कार्यापासून रोखू शकत नाही, म्हणूनच कदाचित वेळ आली नसली तरी काळ येतो आणि घेऊन जातो. येथे महात्मा फुले यांची याद येते, त्यांच्या कामाचा झपाटा जबरदस्त होता. त्यांना यासाठी घाई झाली होती की ब्रिटीश राजवट गेली तर, आपलं कार्य अर्धवट राहिल, त्यांना देखील काळानं, अवेळी मृत्यू देऊनच रोखलं होतं. हमीद दलवाई एक मुक्तीघंटा होती. ती सतत घणघणत राहणार आहे. तुम्ही कानाचे दडे बसल्याचे, सोंग घेतले तरी, हा नाद न थांबणारा आहे.

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...