Saturday, 7 December 2024

राज, राजकारण आणि मतदार...!

राजकीय नेते राजकारणात एकमेकांवर टीका करतात. जनतेला दिसेल अशा चापट्या एकमेकांना मारतात. पण प्रत्यक्षात त्या लागतही नाहीत. कारण ती एक नूरा कुस्ती असते. पुन्हा या लोफर भुरट्यांना भविष्यात दरोडा घालण्यासाठी एकत्रित यावं लागतं. त्यामुळं मैत्रीपूर्ण टीका केली जाते. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी ज्या टोकाची टीका केली होती. त्यानंतर ते एकत्र येण्याची यत्किंचितही शक्यता नव्हती. पण आजच्या लोकसभा निवडणुकीत एकत्रित आले होते. राजकारणी किती निर्लज्ज आणि कोडगे असतात याचा नवीन मासला चाखायला मिळालाय. अर्थात टीका करताना बहुतेक साऱ्या राजकारण्यांनी ताळतंत्र सोडलं होतं. अजित पवार यांनी एका भाषणात टीका करताना कमळाबाई... कमळाबाई... कमळाबाई... असं म्हणत घेतली ना बोकांडी बसवून अशा अर्थाचे हातवारे केले होते. सदाभाऊ खोत, पडळकर यांनीही शरद पवार यांच्यावर टीका करताना खालची पातळी गाठली होती. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना जेलमध्ये जाऊन चक्की पिसिंग... ऑं...पिसिंग... अँड चक्की पिसिंग.... असं दळण जातं फिरवल्यासारखं हातवारे करुन दाखवलं होतं. नारायण राणे यांनी भाजपवर टीका करताना नागपूर मधल्या गुंडाचं नांव घेत भाजपला गुंडांचा पक्ष संबोधलं होतं. त्याला विधानसभेत उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणेंच्या गुन्ह्यांचा पाढा फौजदारी कलमांसह वाचून दाखविला होता. किरिट सोमय्यांनी आरोप केलेले सारे राजकीय नेते भाजपच्या वळचणीला गेलेले आहेत. त्यामुळं जणू सोमय्यांच्या थोबाडीत मारल्यासारखं झालंय. खरं तर विरोधकांना इकडं आणण्यासाठीच सोमय्यांची नेमणूक केली होती, असं दिसतंय. पण खरी कमाल आहे ती राज ठाकरे यांची! पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांना भारताच्या राजकीय क्षितिजावरुन नाहीसं करा. असा आवाहन मतदारांना राज ठाकरे यांनी भाषणात केलं होतं. देशाच्या इतिहासातला सर्वात खोटारडा पंतप्रधान असा उल्लेखही त्यांनी नरेंद्र मोदींचा केला होता. पंतप्रधानांनी देशाबाहेरील काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा केले जातील, असं आश्वासन दिलं होतं. ते पाळलं नाही याचीही आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली होती. तेच राज ठाकरे प्रचार कोणाचा करत होते? तर नरेंद्र मोदी यांच्यासाठी. मग नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास का ठेवावा? तेव्हा आणि आताही निवडणूक लोकांनी हातात घेतलीय. राज यांच्या प्रचारानं लोकसभा निवडणुकीत फरक तर पडला नाहीच, पण विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर राज कोणत्या मुखानं जाणार? त्यांच्या कार्यकर्त्यांची चलबिचल आताच सुरु झालीय. २००९ साली राज यांना मतदारांनी नवीन राजकीय पक्ष म्हणून संधी दिली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढणं गरजेचं होतं. आपण किती धडाकेबाज आहोत हे दाखवत असले तरी, नागरिकांना मितभाषी आणि नम्र नेता हवा असतो. उदारमतवादी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा महाराष्ट्रात जोपासली गेलीय. उर्मट आणि तहसनहस करणारा नेता नको असतो. काम थोडं कमी झालं तरी चालेल पण शांतता नासविणारा पुढारी लोक नापसंत करतात. नाही तरी कामं करणारी नेते मंडळी आहेत कोठे? नासिक महापालिकेत मनसेनं चांगलं काम केलं होतं, यात वाद नाहीच. मनसेकडं राज्य पातळीवरची टीमही दमदार आहे. पण त्यांनी राजकीय परिपक्वता तपासावी. राज ठाकरे यांना मतं देणारा प्रत्येक मतदार हा राज ठाकरे असतो. जर ठाकरेच विसंगत वर्तन करु लागले तर मतदारांना दोष कसा देणार?
राज परराष्ट्र धोरणावर टीका का करीत नाहीत? चीननं आपल्या हद्दीला लागून उच्च क्षमतेचे मोबाईल टॉवर्स उभे केलेले आहेत. कायम स्वरुपी कंट्रोल रुम्स बांधलेले आहेत. हे सारं सॅटेलाईटमधून दिसत आहे. तरी परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणतात की सारं आलबेल आहे. पाकिस्तानमार्गे चीनला जाण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधून पक्की सडक बांधलेलीय. ती आपल्या हद्दीलगत आहे. त्यालाही आक्षेप घेतला नव्हता. नेपाळचा आसरा घेऊन चीननं नेपाळ-भारत-तिबेट या त्रिकोणात हालचाली सुरु केल्या आहेत. म्यानमार येथे अरुणाचल सीमेवर कायम स्वरुपी बस टर्मिनस भारताच्या सीमेवर उभारलं आहे, असं वाचण्यात आलं होतं. आपले परराष्ट्र मंत्री चीनला केवळ समज देतात. पण चीन घुम्यासारखा ऐकून रगेलपणानं पुढं रेटत आहे. त्याला प्रतिकार केला जात नाही. चीनवर आपण बऱ्याच प्रमाणावर अवलंबून आहे. काही वर्षात चीन पाणी विकणारा देश म्हणून गणला जाईल. चीनमध्ये सध्या ८७ हजार धरणे आहेत. झांगमू हायड्रोपॉवर स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुत्रेवरील धरणावर चीन दीडशे कोटी रुपये खर्च करीत आहे. त्यामुळं भारत आणि बांगलादेश यांच्या चिंतेत भर पडलीय आणि आपले नेते राष्ट्रहित सोडून सगळे धंदे करीत आहेत. चीननं भारत-नेपाळ सीमेवर तिबेट इथं त्रि-भूज प्रदेशात धरण उभारण्याचा उद्योग सुरू केलाय. तर तळाला सिलोनमधली बंदरे नाममात्र भाड्यानं वापरायला घेतली आहेत. आपल्याला एकही सलोख्याचा शेजारी चीननं शिल्लक ठेवला नाही. हे मुद्दे निवडणुकीत येण्याऐवजी धार्मिक मुद्दे आणून राजकीय पक्ष आपल्या अशक्तपणाचे प्रदर्शन करताहेत. चीनबद्दल कोणीही ब्र शब्द काढत नाही. उलट आर्थिक लकवा मारलेल्या पाकिस्तानला निवडणूकीसाठी लक्ष्य केलं जातंय. ही शरमेची बाब आहे. भोंगे असोत की टोलनाके वीज बील असो, कांदाभाव हे सारं अंतर्गत आहेच, पण आपल्या सीमांवर सगळ्या ठिकाणी चीननं डोळे वटारलेत. चीननं साऱ्यांना मिंधे करुन ठेवलंय. आपल्याकडं औषधी गोळ्या तयार करण्यासाठी वापरली जाणारी पांढरी भुकटी चीनवरुन आयात होते. पूर्वी हिंदुस्थान ऍंटिबायोटिक्स कडून औषध कंपन्या ती खरेदी करीत होती. पण आता चीन अत्यंत माफक दरात ते देतोय. त्यामुळं एच.ए. फॅक्टरीला गेली वीस वर्षे घरघर लागलेलीय. ती खुरडत चाललीय. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहिताचा बळी देऊ नये, हे भान विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही ठेवावं विरोधकांनी पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांशी भेटून चीन बाबत चर्चा करायला काय हरकत होती. त्यांनी नकार दिला तर लोकांमध्ये जाऊन सत्यस्थिती कथन करायची केवळ परिस्थितीचा फायदा घेऊन एकमेकांना खिंडित गाठून हल्ला करणं हा रडीचा डाव झाला. देशहीत महत्वाचं आहे, निवडणूका येतात आणि जातात, देश आणि नागरिक यांच्यावर बालंट आणू नका म्हणजे मिळवलं. शेवटी लोकशाहीत मतदारच शहाणे असावे लागतात. त्यांचं राजकीय शिक्षण अशा आरोपप्रत्यारोपातूनच होत असतं.
'एकनिष्ठ' असणं हे मतदाराचं काम नव्हे...
सक्रिय राजकारणी एकनिष्ठ नसेल तर ते त्याच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते. परंतु मतदारानं एकनिष्ठ असणं हे समाजासाठी निश्चितपणे घातक असतं. 'जागरूक मतदार' हा शब्द आपण सर्रास वापरतो. पण जागरूक मतदार म्हणजे फक्त मतदान करणारा नागरिक नव्हे. तर कान, डोळे, डोकं सतत उघडं ठेवून मतदान करणारा नागरिक म्हणजे खऱ्या अर्थानं जागरूक मतदार...
एकनिष्ठ मतदाराला राजकारणी गृहीत धरू लागतो. मग त्याच्या त्या मतदाराच्या बाबतीत तो उदासीन होऊ लागतो. किंबहुना एकनिष्ठ मतदाराला काय दाखवत राहिलं की तो सत्य पाहणार नाही याचा ठोकताळा राजकारणी बांधू शकतो आणि त्यात सातत्यानं यशस्वी होत राहतो. परिणामी नागरिक स्वतःचं आणि मुख्य म्हणजे येणाऱ्या पिढ्यांचं अतोनात नुकसान करत राहतो. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे सगळं कुठल्याही पक्षाच्या, विचारधारेच्या, जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, भाषेच्या मतदाराला लागू होतं. मतदाराची 'एकनिष्ठता' ही सार्वकालिक आणि सार्वस्थलिक असू शकते. खरंतर 'स्वतंत्रपणे विचार करू शकणारा प्राणी' ही मानवाची मुख्य ओळख. जेव्हा विचारधारेच्या, जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, भाषेच्या जोरावर 'एकगठ्ठा' वर्गात आपण गणले जातो तेव्हा मतदाराला तो आपला अपमान वाटायला हवा. आपण काहीही केलं तरी आपला मतदार त्याची विवेकबुद्धी वापरणार नाही याची पूर्ण खात्री राजकारण्यांना असणं हे मतदाराला अपमानास्पद नाही काय? आणि जर असं होत असेल तर त्याला कारणीभूत कोण? तशी समजूत करून देणारे आपण मतदारच ना? राजकारण्यानं आपल्याला पडू शकणाऱ्या मतदानाबद्दल निश्चित होणं हे नागरिक म्हणून आपल्यासाठी चिंतेचं आहे; हे ज्याला समजतं तो खरा 'जागरूक' मतदार... आणि मतदान केल्याक्षणी जो मतदार परत 'नागरिक' होतो, आपण दिलेल्या मताला पाच वर्षं चिकटून राहात नाही; तो खरा 'जागरूक' नागरिक. याबाबतीत आणखी एक महत्त्वाचा आधुनिक मुद्दा असा की, आता नव्यानं समाजमाध्यमांवर आपल्या मतांची जाहीर वाच्यता करायची सोय झालीय. एखाद्या राजकीय, सामाजिक मताला एकदा 'कमिट' केल्यावर आपलं मत परत घ्यायला, 'माझं चुकलं होतं' हे जाहीरपणे कबूल करायला फार मोठं धैर्य लागतं. 'ट्रोलिंग'ला सामोरं जायची ताकद लागते. आणि त्यामुळं मनाशी पटलं असूनही मतदार 'नागरिक' होऊ धजत नाही. म्हणून वर म्हणाल्याप्रमाणे मतदाराचं नागरिक होऊन आपल्या मताला चिकटून न राहणं अजूनच अवघड झालंय. 'डोन्ट टेक मी फॉर ग्रॅण्टेड' मला गृहीत धरू नका...! आधुनिक काळातलं सर्रास ऐकू येणारं आणि ऐकवलं जाणारं वाक्य. रोजच्या जीवनात कुणी आपल्याला गृहीत धरून वागलं की आपल्याला राग येतो. तर मग सार्वजनिकपणे जर कुणी आपल्याला सातत्यानं गृहीत धरत असेल तर ते अधिकच बोचणारं नाही का? 'सरकार तर सतत बदलत असतं. म्हणजे आपण जागरूक आहोतच की" अशी समजूत करून घेणाऱ्यानं, त्या 'आपण' मध्ये आपण खरोखरच येतो का हे आपल्या मनाशी प्रामाणिकपणे आणि पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवं. मतदार ढोबळपणे फक्त ३० ते ३३ टक्के असतात... अभ्यासक असं सांगतात की कुणाला मतदान करायचं हे ऐनवेळी ठरवणारे मतदान हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहेच. पण प्रवाही असणं, वर्तमानाचं सातत्यानं भान ठेवत प्रवाही असणं; हे मतदाराचं आद्य कर्तव्य आहे. 

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...