आचार्य अत्रे या बलदंड व्यक्तीमत्वाचं पंचावन्नावं पुण्यस्मरण. एकाचवेळी हवेहवेसे आणि नकोसे वाटणारे आचार्य अत्रे हे खरोखरच महाराष्ट्राचं भूषण होतं. लेखणीच्या सामर्थ्यानं सिंहासन उलथवू शकणारे अत्रे केवळ स्वत:च अष्टपैलू नव्हते तर, इतरांना पैलू पाडणारे कसबी कारागीर होते, त्यांनी पुलं देशपांडेंच्या प्रतिभेचं मोकळ्या मनानं कौतुक केलं होतं. सासवड सारख्या एका खबदाडातल्या कोडीत नावाच्या गावात जन्म घेऊनही पंतप्रधान नेहरुंना आव्हान दिलं होतं. खतरुड मोरारजींना आव्हान दिलं होतं, नव्हे तर जेरीस आणलं होतं. प्रत्येक बाबतीत अति हा त्यांचा स्वभाव होता. प्रेम व्यक्त करणं असो वा टीका करणं, टोकाला जाणं, हा त्यांचा स्वभाव होता. चुकलं तर जाहीर माफी मागणं हा ही मोठेपणा त्यांच्या ठायी होता. त्यांच्यामध्ये अनेक गुण होते. आचार्यांमध्ये जे ही गुण होते. ते त्यांच्या निष्णातपणाचं द्योतक होतं. एका माणसाला एकेका कौशल्यासाठी आयुष्य वेचावं लागतं. अशी अनेक कौशल्यं त्यांच्याकडं पाणी भरत होती. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी अनेक राजकीय पक्षांची चव चाखली होती आणि चोथा थुंकावा तसं केलं होतं. सुरुवातीला पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीत शिक्षक म्हणून अध्यापनाचं कार्य केलं. नंतर राजा धनराज गिरजी आणि आगरकर ही हायस्कूलं स्थापन केली होती. विदयार्थ्यांसाठी रत्नाकर, मनोरमा मासिकं सुरु केली होती. शिक्षकांसाठी नवे अध्यापन आणि इलाखा शिक्षक अशी शैक्षणिक मासिकं काढली होती, ती उपयुक्त ठरली आणि आजही ती कालबाह्य वाटत नाहीत. यावरुन शैक्षणिक आकृतीबंध कसा असावा याचा वास्तुपाठ बाबुराव अत्रेंनी घालून दिला होता. प्रल्हाद केशव अत्रे हा कल्पक, अवलिया होता. शिक्षकांसाठी ट्रेनिंग कॉलेजही काढलं. कारण विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र जाणल्याशिवाय तुम्ही पूर्ण शिक्षक होऊ शकत नाही. अत्रे हे महाराष्ट्रातील केवळ दुसरे बी.टी.लंडन शिक्षण पदवीधारक होते. म्हणूनच शिक्षण क्षेत्रावर ते एवढे अधिकारवाणीनं बोलू शकत होते. ते पुण्यात आल्यावर त्यांचं आकर्षण लोकमान्य टिळक होतं. त्यांना पाहण्यासाठी ते गायकवाड वाड्यावरुन दहा-बारा वेळा चकरा मारत असत. त्यांना आशा होती की, कधीतरी पगडी दिसेल टिळकांचा सिंहासारखा चेहरा दिसेल. प्रत्यक्ष जेव्हा गर्दीत टिळकांजवळ जायची संधी मिळाली होती, तेव्हा त्यांनी टिळकांच्या धोतराच्या किनारीला स्पर्श करुन देशभक्तांचा करंट कसा असतो. ते तपासलं असावं ते वर्णन वाचताना मला माझ्या पुण्यातल्या म्युनिसिपालटीच्या कोठावदे, बेंडाळे, गायकवाड या सांदीपनींची याद आली होती. आमचे मास्तर धोतरवाले होते. ते वर्गातून चालताना धोतराच्या सोग्याचं एक टोक हातात धरून चालत असत. आम्ही मैदानातून बारीक खडे आणलेले असायचे, ते एक-एक करुन मास्तरांनी तयार केलेल्या सोग्याच्या झोळीत टाकायचो. हाताला जड लागले की, मास्तर ती धोतराची झोळी खाली करायचे आणि वर्गाकडं पाहायचे. आम्ही ठरवलेलं असायचं की, चाहड्या सांगणाऱ्या मुलाकडं एकाचवेळी सगळ्यांनी पाहायचं आणि हसायचं. त्यामुळं मास्तर त्याला बुकलून काढत असे.
शिक्षण क्षेत्रानंतर अत्रे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राकडं वळले.१९४० साली नवयुग साप्ताहिक सुरु केलं होतं. त्यातूनच स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते कॉंग्रेसचे प्रचारक होते. पुणे महानगरपालिका स्टॅंडिग कमिटीचे चेअरमनही होते. "लॉर्ड रे"असं पुण्यातल्या भाजी मार्केटचं नाव होतं, ते बदलून महात्मा फुले मंडई असं केलं. त्यांच्या काळातच पुण्यात सोमवार पेठेत पुण्यातील पहिली डांबरी सडक निर्माण केली गेली होती. पुण्यात सोमवार पेठेत राहात असतानाच अनेक नाटकं लिहिली होती. पुण्याच्या सोमवार पेठ वासियांना या गोष्टीचा कितपत अभिमान आहे. कोणास ठाऊक कदाचित माहितही नसेल की, महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व सोमवार पेठेत राहात होतं. आणि महानगरपालिकेत आपलं प्रतिनिधित्व करीत होतं. पुण्यातून आणखी मोठ्या शहरात गेले. मुंबईत गेल्यानंतर चित्रपट निर्मिती केली. मात्र पुण्यात चित्रपट कथा लिहल्या होत्या. पुण्यातील शुक्रवार पेठेतून आमदार म्हणून निवडूनही गेले होते. मुंबईत मराठी माणसाचा पहिला चित्रपट स्टुडिओ त्यांनी खिशात दमडी नसताना खरेदी केला होता. त्यांनी खरी मुंबई गाजवली ती संयुक्त महाराष्ट्राच्या घणाघाती सभांनी. शाहीर अमर शेख, गवाणकर, अण्णाभाऊ साठे या शाहीरांनी त्यांना साथ दिली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आचार्य अत्रेंच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू होता. टीकाकार म्हणून ते जेवढे जालीम होते. तेवढेच माणूस म्हणून हळवे होते. "सूर्यास्त" हे पंडित जवाहरलाल नेहरुंच्या मृत्यूनंतर लिहिलेले पुस्तक मास्टरपीस या सदरात मोडतं. त्याआधी त्यांनी नेहरुंवर खूप जहरी टीका केली होती. तेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी आंबेडकरांवर लिहिलेले "दलितांचे बाबा" हे पुस्तक अवर्णणीय आहे. साम्यवादी, समाजवादी, कॉंग्रेस सगळीकडं फिरुन त्यांनी सर्वांवर टीका केली होती. त्यांचा पिंड राजकारण्याचा नव्हता. त्यामुळं राजकीय माणसांच्या चुकांची झाकापाक त्यांना मंजूर नव्हती. साहित्यिकांमध्ये ना.सी.फडके, श्री.म.माटे यांच्याशी त्यांचे जाहिर वाद गाजले. त्यांचा आणि सकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक डॉ.परुळेकर यांचा वादही चांगलाच गाजला होता. अत्रे आणि वाद हे एकत्र नांदत असत. किंबहुना अत्रे हे चालतं बोलतं संकटच होतं. त्यांचं "कऱ्हेचे पाणी" हे पाच खंडातले आत्मचरित्र त्यांची संपूर्ण कहाणी कथन करते. मी कसा झालो. यातील प्रत्येक भूमीका निभावताना ते अभावितपणे कसे अडकत गेले याचं वर्णन आहे. त्यांनी अनेक नाटकं लिहिली आणि ती गाजलीही. झेंडूची फुले हा विडंबनात्मक काव्य संग्रह गाजला होता. भारत सरकारनं सुरु केलेला पहिला राष्ट्रपती पुरस्कार, त्यांच्या"श्यामची आई" या चित्रपटाला मिळाला. पहिल्याच चित्रपटाला हा सन्मान मिळावा, यावरुन अत्रेंची मेहनत ध्यानी येते. महात्मा फुले हा चित्रपटही गाजला. त्यांनी सत्तर वर्षांपूर्वी सत्यशोधकांवर चित्रपट काढणं धाडसाचं होतं. आजही तो चित्रपट पाहताना त्याला विरोध कसा झाला नाही, याचं आश्चर्य वाटतं. कदाचित अत्रेंचा दराराच कामी आला असावा. एवढ्या कामाच्या धबाडग्यातही त्यांनी प्रचंड लेखन केलं. ते कादंबरीकार नव्हते, तरीही चांगुणा, मोहित्यांचा शाप या दोन कादंबऱ्या, त्यांनी लिहिल्या होत्या. गीतगंगा आणि झेंडूची फुले हे काव्यसंग्रह त्यांच्या खाती जमा आहेत. त्यांचे मृत्यूलेखही गाजले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अनेकांनी मृत्यूलेख लिहले होते. तेही गाजले होते. त्यापैकी गोविंद तळवलकर यांनी "कडा कोसळला" या शिर्षकाचा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहला होता. त्यात त्यांनी अत्र्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं होतं.
राम गणेश गडकरी यांचं बोट धरुन जरी ते साहित्य क्षेत्रात आले होते तरी अत्रेंजवळ मूळ प्रतिभा होतीच. तिला फक्त तासायचं होतं. १९५५ साली त्यांनी लिहिलेल्या "पस्तीस वर्षांपूर्वीचे पुणे" या लेखात पुण्यातील गल्ली बोळांचे वर्णन करताना पुणेरी स्वभावाचं दर्शन घडवलं होतं. सावकारांची तोंडं चुकविण्यासाठी गल्ली बोळं कशी उपयुक होती त्याचं वर्णन केलं होतं. पेशवे काळात बुधवार आणि शुक्रवार पेठेत वाढलेल्या वेश्या वस्तीचंही वर्णन केलं होतं. आंबट शौकीन मंडळी अंधारात तोंड लपविण्यासाठी गल्ली बोळांचा कसा वापर करीत होती. त्याचं वर्णन केलं होतं. "मंडई विद्यापीठ" हा शब्द त्यांनीच निर्माण केला असावा. राजमाता जिजाऊ यांनी पुणं शहर वसवलं होतं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील बहुमूल्य काळ पुण्यात व्यतीत झाला होता. कसबा पेठ आणि आसपासच्या परिसराला भांबुर्डा म्हणत असत. आचार्यांनी ते बदलून शिवाजीनगर असं नामकरण केलं होतं. महाराजांची कायमस्वरूपी आठवण राहावी, यासाठी अत्रेंनी महापालिकेत नगरपिते असताना हा ठराव मंजूर करून घेतला होता.
आचार्य अत्रे जीवनावर प्रेम करीत होते. आपण अमरपट्टा लेऊन आलेलो नाही. मग अहंकार कशापायी? वैर कशासाठी? पैसा जमा कशासाठी? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी कृतीतून जीवन जगून दिली होती. मुक्तहस्ते सगळ्या गुण-दोषा़ची उधळण त्यांनी केली होती.
मात्र आज आचार्य अत्रे असते तर त्यांनी या अविवेकी राजकारण्यांपुढं हार मानली असती. कारण आज,स्वतःच्या टीकेला दाद देणारे नेहरु नाहीत. सहिष्णू यशवंतराव चव्हाण नाहीत. लोकनेते एसेम जोशीही नाहीत. त्यामुळं आजचे रक्तपिपासू राजकारणी या राज्यात कोणी आणले याचा मात्र धांडोळा अत्रेंनी नक्की घेतला असता. अत्रेंना टीका सहन होत नसावी. टीका सोसायची असेल तर आधी आत्मटीकेची सवय लाऊन घ्यावी लागते. अत्रेंनी महात्मा गांधींवरही टीका केली होती. आंबेडकरांवरही केली होती आणि नेहरुंवरही केली होती. पण नंतर त्यांच्या गुणांचे तोंड भरुन कौतुकही केलं होतं. आजच्या कोणत्याही राजकारण्याला टीका अजिबात सहन होत नाही. हे लोकशाहीचं लक्षण नव्हे. राजकारण्यांना विरोधात असताना लोकशाहीचा पुळका येतो. सत्तेत गेल्यावर विरोधकांवर सूड घेतात. त्यांना सोयीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहीजे असतं. अत्रे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं फिरतं विचारपिठ होतं. आजच्या पिढीला या नकली गर्दीत गुदमरल्यासारखं होत असेल की नाही ठाऊक नाही. कदाचित या धकाधकीचंच नाव जीवन आहे. असा त्यांचा समज झाला असावा.
आपण धावून किती धावणार? जरा विसावा एखाद्या वळणावर घेतला तर काय बिघडेल? अत्रेंनी "उद्याचा संसार", "घराबाहेर", "लग्नाची बेडी" ही सामाजिक-कौटुंबिक नाटकं लिहिली होती. त्यातील अनेक वाक्यं अजरामर झाली होती. "स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे...!" हे एकच वाक्य त्यांच्या प्रतिभेची साक्ष देण्यास पुरेसं ठरेल. अत्रेंनी महाराष्ट्राचा प्रपंच केला होता. आपण निदान कटकटी न घालता, स्वतःचा संसार नीट सांभाळावा, त्याचबरोबर विवेकानं व्यक्त होऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य जीवंत ठेवावं, हीच आचार्यांना आदरांजली ठरेल.
No comments:
Post a Comment