जरूर तेव्हा अवतार घेऊन सारे काही ठाकठीक करण्याची ग्वाही प्रत्यक्ष भगवंतानीच दिल्यावर भक्तमंडळींना आणखी काय लागणार? आमच्या कर्मानं आम्ही धर्माचं कितीही आणि कसंही वाटोळे केले तरी भगवंत आहेत. योग्यवेळी योग्य ते करण्यासाठी ते अवतार घेतील आणि सारे काही निभावून नेतील हा आपला विश्वास... नव्हे श्रद्धा आहे. ह्या विश्वासाने... श्रद्धेनेच आपण नेमकी नको ती वाट धरली. समाजाला दिशा देण्याचे आणि समाज समर्थपणे त्या दिशेने वाटचाल करतोय हे बघण्याचे कर्तव्य ज्यांनी करायचे, ते ब्राह्मण- क्षत्रिय भलत्या गोष्टींनाच धर्म मानून त्यानुसार नको ते कर्म बिनधास्त करू लागले.
'ऐसे धर्म झाले कळी । पुण्य रंक पाप बळी.'
पुण्य कर्म करायची इच्छा बुद्धीच समाजातल्या वरच्या वर्गाला होईना. उलट धर्माच्या नावाखाली पाप आणि पापी बलिष्ठ झाले. त्यांनी ताळ सोडला. धर्माच्या नावानेच लोकांना लुबाडण्याचा अधर्म ही फोफावला.
'सांडिले आचार। द्विज लोकांत चहाड झाले चोरll'
ज्यांनी तारायचे तेच मारायला लागले. ज्यांनी समाजापुढे आदर्श ठेवायचा अशी माणसेच मोकाट सुटलीत. कुणाचे कशाचेच भय लोकांना वाटेना. धर्म आणि कर्म यात संबंध उरला नाही. स्वधर्मापेक्षा परधर्म बरा, अशी काहीच लोकांची वृत्ती झालीय. धर्मालाच नव्हे, देवालाही लोकांनी आपल्यापासून दूर लोटलंय, स्वधर्माला दूर लोटणारे, सदाचारानं वागण्याची शक्यताच नव्हती. स्वाभिमानशून्य, लाचार, देवद्रोही, धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही करायलाही मागेपुढे बघणार नाहीत, हे तुकारामांनी जाणले आणि असेही हे सगळे बदलण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, अशी प्रेरणा तुकारामांना मिळाली.
'आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी'
अशी ग्वाही देत तुकारामांनी आपले समाजकार्य मग सुरू केले. हे देवाचे काम आहे, धर्माचे काम आहे असा विश्वास लोकांमध्ये निर्माण व्हावा म्हणून कलीकाळालाही दरारा वाटावा, एवढा भक्तीचा डांगोरा पिटण्याचा तुकारामांचा निर्धार होता भक्तीतून शक्ती उभी करण्यासाठी तुकाराम उभे ठाकले. धर्म रक्षणार्थ म्हणजेच समाजाचं सत्व राखण्यासाठी संत सेनापती झाला होता. खरं तर आपण संत असल्याचा तोराही तुकाराम मिरवत नव्हते. मात्र संतांनी जे कार्य केलं, तेच आपण करतोय, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. धर्म रक्षावयासाठी l करणे आटी आम्हासी
वाचा बोलो वेद नीति । करू संती केले ते l
न बाणता स्थिती अंगी। कर्म त्यागी लंड तो
तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥ बोकाळलेल्या अनाचारा-अत्याचाराविरोधात तुकारामांनी जणू लोकलढा सुरू केला. त्यांचा हा लढाऊ भक्तिमार्ग आपल्या मुळावर येणार, हे भय वेदाभोवती वेटोळे घालून बसलेल्यांना वाटणे स्वाभाविक होते. त्यांनी वेदाला पुढे कर भेदाचे स्वार्थकरण राबवायला सुरुवात केली. तुकारामांना वेद म्हणण्याचा, वेद जाणण्याचाही अधिकार नाही, अशी तर्कटे त्यांनी मांडली. पण
'आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी'
असा आत्मविश्वास प्राप्त झालेल्या तुकारामांनी-
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्द ज्ञाने।
विषय लोभी मने । साधने बुडविली ॥
वस्तुस्थिती रोखठोक सांगत तुकाराम शिरले. भक्तीतून शक्ती जागवू. धर्माचे नाव घेत अधर्म करणाऱ्यांशी तुकारामांनी लोकबळाचे पाठबळ मिळवत संघर्ष मांडला. स्वतःकडे मोठेपण न घेता, ऋषीमुनींचा आधार त्यांनी घेतला. ऋषीमुनींनी हे सारे कधीच सांगितले आहे. आम्ही नवीन सांगत नाही, फक्त त्यानुसार आचरण करणार आहोत आणि लोकांना करायला लावणार आहोत, अशी नम्र, पण निर्धारी भूमिका तुकारामांनी घेतली आणि वेद पुढे भेद करू बघणाऱ्यांना
'वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा l
येरांनी वाहावा भार माथाl'
असेही ठणकावून बजावले. सरळ मार्गाने भक्तिरसात रंगलेल्या एका साध्याभोळ्या भक्ताला आपल्या भक्तिमार्गावर आपल्या इच्छेनुसार चालण्याचे स्वातंत्र्य नाकारले गेले, मग रात्रंदिस युद्धासाठी तुकाराम सिद्ध झाले. आणि त्यांनी हे युद्ध नामाचिया बळे अवघ्या आघातांचे तोंड काळे करून जिंकलेही! जेव्हा जेव्हा धर्माचा प्रभाव कमी होतो, तेव्हा कुणी धर्मात्मा 'तुटो हे मस्तक फुटो हे शरीर' निर्धाराने धर्मसंस्थापनेसाठी उभा होता. भगवंत यायची वाट बघत नाही. तोच भगवंत होतो.
No comments:
Post a Comment