Saturday, 28 December 2024

स्थितप्रज्ञ विश्वगुरु सरदार मनमोहन सिंग

"आपल्याकडं माणूस मेल्यावर तो जास्त मोठा होतो. जिवंतपणी ओळखायला आपण कमी पडतो. गोदी मीडिया अन् कुजबुज मोहिमांनी कितीही चिखलफेक केली, तरी जसजसा देश विकला जातोय, जसजसं द्वेषाचं विष प्रत्येक मेंदू सडवतोय, तसतसं मनमोहन सिंगांची भविष्यवाणी खरी ठरतेय! त्यांनी देशाला दिवाळखोरीतून वाचवलं, मध्यमवर्गाला श्रीमंत केलं, देशाला आण्विक राष्ट्र तसंच जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनविली. त्याकाळी जे घोटाळे चर्चिले गेले, जे नंतर कधीच सिद्ध होऊ शकले नाहीत. मात्र आरोपांची राळ उठवली गेली. त्या वावटळीत मनमोहन सिंगांना काँग्रेसनं एकटं पाडलं. काँग्रेसनं तेव्हाच जर त्यांच्या सरकारचं मजबूत समर्थन अन् समर्थ पाठराखण केली असती तर काँग्रेसवर इतकी नामुष्की ओढवलीच नसती! ते एक स्थितप्रज्ञ, विश्वगुरू होते. आज चहूबाजूंनी स्तुतीसुमनं उधळली जाताहेत. पण अखेरच्या काळात अवहेलनाच झाली! 
...............................................
*पां*ढरा सदरा आणि लेंगा, शीख समाजाची डोक्याला निळी पगडी, डोळ्यावर सामान्य चश्मा, त्यातून मिश्किल स्नेहाळ नजर, खुरटलेली अन् वाढवलेली दाढी. हात न हलविता चालण्याची लकब, हळू, मंद बोलणं, सौम्य, ऋजूता, विनम्र स्वभाव मनमोहन सिंग यांच्यात होता. त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, व्यासंगी, मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांना इतिहास कायम स्मरणात ठेवील! शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारा माणूस आणि देशाच्या उभारणीत असणाऱ्या त्यांच्या मोठ्या योगदानामुळे त्यांचं नाव इतिहासात कायमचं कोरलं जाईल. डॉ. मनमोहन सिंग २०१४ मध्ये आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊन प्रधानमंत्री कार्यालय सोडताना खेदानं म्हटलं होतं, "माध्यमांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक दयाळू असेल...!" असं का म्हणाले असतील, याची प्रचिती आज येतेय. त्यांना 'रिलक्टंट पीएम', 'एक्सिडेंटल पीएम', 'दरबारी पीएम' म्हणणाऱ्यांना त्यांचं योगदान कधी कळेल का? काहींसाठी ते बिगर राजकीय प्रधानमंत्री होते. खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग असे प्रधानमंत्री होते, ज्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशातल्या नागरिकांना माहितीचा अधिकार कायदा, शिक्षणाचा अधिकार कायदा, वनहक्क कायदा सुधारणा, अन्न सुरक्षा कायदा, अशा तरतुदी मिळाल्या. भू-सुधारणा आणि अधिग्रहण कायदा आणि मनरेगा अशा अर्धा डझनहून अधिक घटनात्मक आणि लोकशाहीचे अधिकार मिळाले, ज्याचा कोणत्याही नागरिकाला अभिमान वाटावा. अर्थात, २००९ ते २०१४ पर्यंतचा त्यांचा दुसरा कार्यकाळ वादांनी वेढला गेला होता, परंतु हे सर्वज्ञात आहे की २ जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यांमुळे त्यांच्या सरकारवर "पॉलिसी पॅरालिसिस"चे आरोप झाले होते. जे आजवर सिद्ध झाले नाहीत, पण त्या काळात त्यांची प्रतिमा डागाळणाऱ्या अशा अनेक कथा रचल्या गेल्या. ते स्वार्थी राजकारणी नव्हते आणि त्यांनी ते कधीही काही लपवून ठेवलं नाही. काँग्रेसनं त्याच्या पाठीशी ठामपणे उभं न राहता त्यांना एकाकी पाडलं. त्या एकटं पाडल्याची किंमत आज काँग्रेस मोजतेय !
 सरदार मनमोहन सिंग हे विश्वगुरू होते. किमान अर्थशास्त्राच्या संदर्भात! बराक ओबामा हे त्यांना गुरुजी मानत होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात हे नमूद केलंय की, जेव्हा जेव्हा आर्थिक बाबतीत काही प्रश्न उभे राहिले तर मी त्यांचं मार्गदर्शन घेई...!' सिंग यांची पार्श्वभूमी खूपच विदारक होती. पाकिस्तानात असलेल्या छोट्याशा गावात जिथं वीज पोहोचलेली नव्हती. कंदिलाच्या उजेडात त्यांनी अभ्यास केला. घरची अत्यंत गरिबी त्यामुळं फी भरण्यासाठी पैसे नसायचे पण बुद्धिमत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. उच्च श्रेणी कधी त्यांनी सोडली नाही. ओक्सफॉर्ड, केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतलं. पण त्यांनी आपल्या गरिबीचा, आर्थिक विपन्नतेचा कधी बाऊ केला नाही की, त्याचं रडगाण गायलं नाही. साधं, सरळ, निष्पक्ष अन् त्यांच्यासारखी इमानदार व्यक्ती जगात सापडणार नाही. त्यांना बडेजावपणाचा तिटकारा होता. ते जेव्हा राज्यसभेचे सदस्य होते तेव्हा आपली छोटीशी मारुती ८०० गाडी स्वतः चालवत संसदेत येत. अगदी प्रधानमंत्री बनल्यानंतर देखील ती गाडी त्यांनी आपल्या बंगल्यात ठेवली होती. त्यातूनच ते शॉपिंगला जात, हे अनेकांनी पाहिलंय. इतका साधेपणा त्यांच्यात होता. आज एखादा नगरसेवक कसा वागतो हे पाहिलं तर त्यांचं वागणं हे किती उदात्त होतं हे लक्षांत येईल. १९९१ मध्ये नरसिंह राव यांनी अर्थमंत्री म्हणून जेव्हा त्यांना आणलं. ते आव्हान स्वीकारलं अन् भारताची अर्थव्यवस्था कुठल्या कुठे नेऊन पोहोचवली. विरोधकांनी टीकेचा भडिमार केला. पण ते घाबरले नाहीत. एखाद्या चीफ ऑफिसरच्या पद्धतीनं ते काम करत. ते राजकारणी नव्हते अकॅडमीक आणि ॲडमिनीस्ट्रटर होते. नेमकं, लक्ष्य साधत आणि परिणामकारक काम करण्यात त्यांची हातोटी होती.. त्यांनी पारंपरिक डावी समाजवादी विचारसरणीची अर्थव्यवस्था मोडीत काढली. उदारीकरण, माहितीचा अधिकार, उजवी अर्थव्यवस्था, रोजगार हमी योजना, अमेरिकेशी आण्विक करार ज्या पद्धतीनं केला, सत्तेत सहकारी असलेले डावे अन् खुद्द आपल्या पक्षातल्या नेत्यांचा विरोध असताना त्यांनी सोनिया गांधी, राष्ट्रपती यांना विश्वासात घेऊन अमेरिकेशी करार केला. त्यांनी सोनिया गांधींची समजूत कडून अनेक बाबी केल्या. ते कमजोर, कमकुवत नव्हते तर एक मजबूत प्रधानमंत्री होते हे दाखवून दिलं. जे काही करत ते अत्यंत विचारपूर्वक करत. एकदा त्यांनी ठरवलं तर त्यावर ते ठाम असत. त्यांनी भारतातल्या माणसांची ओळख निर्माण करण्यासाठी 'आधार मॉडेल' आणलं. ज्यांनी आधाराला विरोध केला ती मंडळी आज त्याचाच आधार घेत आहेत. त्यानंतर त्यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला. अन्न सुरक्षा कायदा आणला. ही मनमोहन सिंग यांची देन आहे. ज्यावर आज जे लोकांना मोफत धान्य दिलं जातंय ते याचं कायद्याखाली!
सिंग यांनी एक वेगळी प्रतिमा जगात निर्माण केली होती. ते जेव्हा परदेश दौऱ्यावर जात, तो दौरा कधी इव्हेंट नसायचा, तो इश्यू बेस असायचा. त्या त्या देशाशी अत्यंत बारकाईन ते संवाद साधत, साधं, सरळ कोणताही दिखावा न करता काम करत. देशात ३ जानेवारीला २०१४ रोजी शेवटची पत्रकार परिषद प्रधानमंत्र्यांनी घेतली होती ती मनमोहन सिंग यांनी त्यानंतर आजपर्यंत पत्रकार परिषद झालेली नाही. जवळपास शंभरहून अधिक पत्रकारांनी ६२ प्रश्न त्यांना विचारले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उठविली होती. तेच आज त्यांचे गोडवे गाण्यात सारा मीडिया मश्गूल आहे. कदाचित ते पापक्षालन करत असतील. २००४ मध्ये अटलजींनी फिल गुड, इंडिया शायनिंग करत निवडणुका लढवल्या होत्या. पण सोनियांनी मनमोहन सिंग यांना प्रधानमंत्री पदासाठी पुढं केलं. २०१४ त्यांच्या कार्यकाळात भाजपनं ज्या पद्धतीनं मनमोहन सिंग, एका प्रधानमंत्र्याला वागणूक दिली ती स्थिती आजचे प्रधानमंत्री स्वप्नातही पाहू शकणार नाहीत. सिंग १० जून २००४ रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानायचे होते, सोमनाथ चॅटर्जी स्पीकर होते त्यांनी सिंग यांना बोलण्यासाठी पाचारण केलं. तेव्हा विरोधकांनी त्यांना प्रधानमंत्री म्हणूनही बोलू दिलं नाही. त्यांचं ते प्रधानमंत्री म्हणून पहिलंच भाषण होतं. ते खूप नाराज झाले, रागही आला त्यांना. गोंधळानंतर त्यांना बोलू दिलं तेव्हा ते एवढंच म्हणाले की, 'सभागृह माझं भाषण ऐकू इच्छित नाही म्हणून हा राष्ट्रपतींचे आभार मानणारा प्रस्ताव माझ्या भाषणाशिवाय संमत करावा, अशी सभागृहाला विनंती करतो..!' ते व्यथित झाले होते. घरी परतताना रस्त्यात त्याच्या लक्षात आलं की, असं कसं चालेल? मग त्यांनी सेक्रेटरीला बोलावून आपलं मत साऱ्या देशासमोर मांडायचे आहे. दूरदर्शनवर भाषणाची सोय करा. १० ते २३ जूनच्या रात्रीपर्यंत दररोज एक तास टेलीप्रिंटरवर त्यांनी सराव केला. ते तसे पट्टीचे वक्ते नव्हते. कॉलेज मध्ये शिकवणं वेगळं अन् भाषण करणं वेगळं असतं. त्यांचं पंजाबी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. हिंदी कमकुवत होतं. २४ जूनला त्यांनी दूरदर्शनवर पहिलं भाषण केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलले. त्यांची सत्ता नुकतीच आली होती. त्यामुळं त्यांच्या विरोधात बोलण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांनी त्यात आपल्या कारभाराचा रोड मॅप लोकांसमोर मांडला.
देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करून देशात सुस्थिती निर्माण केल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. त्यांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या कॅगचे प्रमुख विनोद रॉय यांनी २जी, कोळसा घोटाळा यातून एक षडयंत्र रचलं. काँग्रसी नेत्यांमध्ये अहंकार निर्माण झाला होता. त्यांनी कधी विनोद रॉय यांना बोल लावला नाही. त्यांनी आयुष्यभर ज्या निष्ठेनं  काम करून जी प्रतिष्ठा मिळविली होती ती रॉय यांनी उध्वस्त करून टाकली. त्याला गोदी मीडियानं साथ दिली. मनमोहन सिंग यांना बदनाम केलं गेलं. आजपर्यंत जे घोटाळे झाल्याचा कांगावा केला गेला त्यात कुणालाही सजा झालेली नाही. जी साधी, सरळ, मितभाषी, आपल्या कामाशी, जबाबदारीही एकनिष्ठ होती, देशाचं भलं करण्यासाठी सरसावली होती. तिच्याशी कसं वागलं गेलं. एका प्रपोगंडाचे ते लक्ष्य बनले. त्यांनी ज्या काही सुधारणा केल्या. त्या आता उलट्या फिरवल्या जाताहेत. मनमोहन सिंग यांना दूर सारून काय गमावलं अन् नवं सरकार आणून देशाला काय गवसलं! त्यावर मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं की, 'अत्यंत इमानदारीनं असं वाटतंय, नवं सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली बनणार असेल तर ते देशासाठी विनाशकारी असेल...!' हे त्यांनी २०१४ मध्ये शेवटच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. 'मला जर संधी मिळाली तर देशाचा जीडीपी दुहेरी आकड्यात नेला असता...!' त्यांची पीडा पहा. नव्या सरकारनं विकासाची दिशा उलटी फिरवलीय. त्यांनी असंही म्हटलं होतं की, 'जीएसटी आणि नोटबंदी हे देशाला त्रासदायक ठरणार आहे...!' त्यांचा एक एक शब्द आज खरा होताना दिसतोय. हे त्यांनी प्रधानमंत्री म्हणून गुजरातमधला कारभार प्रत्यक्ष पाहिला होता. मोदींशी त्यांचं व्यक्तिगत काही वैर नव्हतं. पण मोदींनी संसदेत आणि बाहेर त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केलीय. त्यांना 'मौनी प्रधानमंत्री,' 'बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करणारा प्रधानमंत्री!' म्हटलं पण त्यांनी कधी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आज मात्र त्यांचं कौतुक करताना त्यांना शब्द कमी पडताहेत. ही उपरती म्हणावं लागेल. त्यांना देशाचा आर्थिक विकासाचा ध्यास होता, बेकारी बाबत ते खूप गंभीर होते. देशातल्या लोकाशाहीतल्या प्रशासकीय, संवैधानिक संस्था यांच्याशी त्यांचं वेगळं नातं होतं. आज त्या उध्वस्त होताना ते खूप व्यथित होते. ही संघराज्याची, कॅबिनेटची राज्यव्यवस्था राहिलेली नाहीये. वन मॅन आर्मी झालीय! असं त्यांनी म्हटलयं. अर्थमंत्रीबाबत ते अधिक चिंतित होते. सरकारचे लोकांप्रती दायित्व असलं पाहिजे, पण ते तसं न राहता ते आत्ममग्न बनलेलंय. त्यांचं सर्वपक्षीय नेत्यांशी मधुर संबंध होते. त्यांच्याकडे ज्ञानाचे अथांग भांडार होतं, आपल्या विषयाचे तर ते तज्ञ होतेच. त्यांच्यात आत्मविश्वास, सरलता, साधेपणा, सजगता, इमानदारी, निष्पक्षता होती. सर्वांना ते समान राखत. विरोधकांनी कितीही आरोप केले, त्यांच्याशी अभद्रतेनं वागले तरी कधी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचं कौतुक झालं तरी ते वाहून जात नसत. ते एक स्थितप्रज्ञ असल्यासारखे वावरत. काँग्रेसच्या एका मेळाव्यात सिद्धू यांनी त्यांच्यावर स्तुती सुमनं उधळली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होत असतानाही त्यांनी आपल्या चेहऱ्यावर हसू येऊ दिलं नव्हतं. अशा बुद्धिमान व्यक्तीला सत्तेपासून रोखणं देशाला महागात पडू शकतं याची जाणीव आताशी होऊ लागलीय. 
या माणसानं देशाला श्रीमंती दाखवली. नरसिंह राव प्रधानमंत्री होण्यापूर्वी देशात समाजवादी आर्थिक विचारसरणीचा पगडा होता, भांडवलशाहीला, श्रीमंतीलाच विरोध होता. त्याचे व्हायचे तेच परिणाम झाले आणि देशाला सोनं गहाण ठेवून अर्थकारण चालवण्याची पाळी आली. त्या अवघड टप्प्यावर नरसिंहराव नावाच्या दूरदृष्टीच्या नेत्यानं हा हिरा शोधून काढला. अर्थकारणाच्या संदर्भात धाडसी निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली. मग त्यांनी जो चमत्कार घडवला तो आपल्या समोर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताला आपल्या खराब कामगिरीमुळे कोणतंही कर्ज द्यायला नकार दिला होता. पण मनमोहन सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत  अशी काही आर्थिक ताकद निर्माण केली की, जेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आर्थिक अडचणीत सापडली त्यावेळी त्या संस्थेला आर्थिक मदत भारतानं देऊ केली होती. ही किमया मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात घडली होती. त्यांनीच १९९१ यावर्षी भारताचे बँक ऑफ इंग्लंड मध्ये गहाण पडलेले तीनशे टन सोनं केवळ सहा महिन्यात सोडवून आणलं. उद्योग क्षेत्राला त्यांनी पूर्ण मोकळीक दिली.  अर्थकारणाची धोरणं बदलली. २०११ मध्ये भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. तेव्हा मनमोहन सिंग हेच पंतप्रधान होते. त्यांची कीर्ती जगभर  गाजत असताना काँग्रेसमधल्या काही जणांनी त्यांना अडथळा आणण्याचेच काम केलं. कदाचित गांधी घराण्यापेक्षा हा माणूस मोठा होत असल्याची धास्ती काही बगलबच्चाना वाटली असावी. मनमोहन सिंग यांना चाप लावला गेला. सिंग सरकारच्या शेवटच्या काळात सरकारवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले मात्र काँग्रेस पक्षानं त्यांची पाठराखण केली नाही. त्यांच्या काही आर्थिक धोरणाबाबतही आरोप झाले, काँग्रेसमधूनही त्याही धोरणाला समर्थन दिलं गेलं नाही. घोटाळ्यांच्या वावटळीत मनमोहन सिंग यांना एकटं पाडलं गेलं. शेवटी सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग यांनी 'आपण आता पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नाही...!' अशी घोषणा केल्यानंतर काँग्रेसची अडचण झाली आणि अपेक्षेनुसार 'निर्नायकी काँग्रेस' २०१४ ला जी पराभूत झाली. ती काँग्रेस अजून उभारी धरू शकली नाही. या महान प्रधानमंत्र्याच्या कामाबद्दल त्यांना श्रेय देणं टाळल्याचे दुष्परिणाम काँग्रेस आज भोगत आहे एवढे मात्र खरं! मनमोहन सिंग हे राजकीय प्रधानमंत्री नव्हते, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. ते चांगले वक्ते नसतील, पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांचे शब्द आदराने ऐकले गेले. एक प्रसंग आठवतो. २०१० मध्ये टोरंटो इथं झालेल्या जी २० शिखर परिषदेपूर्वी, द्विपक्षीय चर्चेपूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा त्यांच्याबद्दल आदरयुक्त उद्गार काढले होते. अर्थात, त्यांच्याकडूनही चुका झाल्या, जसे की यूपीए सरकारच्या काळात त्यांनी मित्रपक्षांच्या दबावाखाली असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे सरकारच्या कामगिरीवर परिणाम झाला. अन्यथा यूपीएचा पहिला कार्यकाळ हा आर्थिक-सामाजिक विषमता दूर करण्याच्या दिशेनं मैलाचा दगड ठरलाय. मनमोहन सिंग हे बिगर-राजकीय पंतप्रधान असतानाही त्यांची तुलना चीनच्या डेंग झियाओपिंग यांच्याशी केली जाते, ज्यांनी १९७८ मध्ये चीनमध्ये आर्थिक सुधारणा करून चीनचा नकाशा बदलला. तथापि, कम्युनिस्ट झियाओपिंग यांच्याशी तुलना करणं काँग्रेसच्या लोकांना अप्रिय देखील असू शकतं. पण ही तुलना केवळ आर्थिक सुधारणांपुरती मर्यादित आहे हे लक्षात ठेवा. एकूण काय तर व्यक्तिगत मान-अपमानाच्या पलीकडं पाहणारा, श्रेय लाटण्यासाठी चढाओढ न करणारा, आपल्याला ‘मास बेस’ नाही याचं भान ठेवणारा, आपली बलस्थानं आणि मर्यादा यांची उत्तम जाण असणारा, प्राप्त परिस्थितीत शक्य तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न करणारा आणि जुन्या भूतकाळातल्या तत्त्वज्ञ-विचारवंत यांच्याशी मनानं खेळणारा पण वर्तमानातल्या वास्तवात रमणारा हा माणूस होता. एकंदरीत विचार करता, देशाला नवं वळण देणारा हा जुन्या वळणाचा माणूस होता. आता तो असणार नाही. मात्र अनेक मर्यादांसह कर्तव्यपूर्ती केल्याचे समाधान त्याच्याकडं असेल. पण आपल्याकडे त्याच्यासाठी कृतज्ञतेचा सलाम आहे काय? असा प्रश्न पडतो!
हरीश केंची 
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...