Sunday, 15 December 2024

आग्र्यातली शिवाजी महाराजाचं कैदस्थळ दुर्लक्षित

आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका हे मराठ्यांच्या इतिहासातील रोमहर्षक पर्व आहे, परंतू या ठिकाणी शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलं आणि जिथून ते औरंगजेबाच्या हाती तुरी देऊन निसटले, ते आग्र्यातलं ठिकाण आज दुर्लक्षित स्थितीत आहे. शिवाजी महाराजांशी संबंधित या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभं करण्याची मागणी शिवप्रेमी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना  ताजनगरमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं, याचे भरपूर पुरावे आहेत. कोठी मीना बाजार इथल्या ढिगाऱ्यावर वसलेलं ते ठिकाण जिथं छत्रपती शिवाजींना नजरकैदेत ठेवलं होतं. त्यावेळी इथं फिदाई हुसेन यांचा वाडा असायचा. इतिहास संकलन समितीच्या संशोधनात याचा उल्लेख आहे. खरं तर बऱ्याचदा आग्रा दौऱ्यावर जाणाऱ्या पर्यटकांना आग्र्याच्या किल्ल्यातच पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं होतं असं सांगितलं जातं आणि ती जागा लष्कराच्या ताब्यात आहे असंही गाईड सांगतात. प्रत्यक्षामध्ये आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं नव्हतं, तर ती जागा मूळ किल्ल्यापासून पाच किलोमीटर दूरवर आहे. आणि बरेच जण तिथं जात नाहीत.
...................................................
मागील आठवड्यात २०२४ नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर आग्रा इथं आम्ही पर्यटनासाठी गेलो होतो. दोन दिवस आधी दिल्ली, मथुरा, वृंदावन जयपुर फिरून झालं होतं. जयपूरहून निघून आग्र्याला येताना रस्त्यात फतेहपूर सिक्री बघितलं. तिथला मुघल बादशाह अकबर यांचा भव्य महाल पाहिला. तिथल्या गाईडच्या तोंडून अकबराच्या हिंदू पत्नी जोधाबाई यांच्यासाठी बांधलेला तो महाल, त्यांच्यासाठीच स्वतंत्र स्वयंपाक घर इत्यादी, इत्यादी बघून झाले. दुसऱ्या दिवशी आग्र्याला आल्यावर प्रथम आग्र्याचा किल्ला बघितला. तो भरपूर भव्यदिव्य आहे. सोबत गाईड घेतलेला असल्यामुळे बरीच माहिती, छोटे छोटे बारकावे तो सांगत होता. हा किल्ला बघत असतानाच एका सुंदर अशा महालात गाईडनं माहिती दिली की इथं औरंगजेबानं आपल्या वडिलांना कैदेत ठेवलं होतं. त्यांच्या आयुष्याची शेवटची आठ वर्षे ते इथं च कैदेत राहिले. तिथून ताजमहालाची भव्य वास्तू स्पष्ट दिसत होती. या ताजमहालाकडं बघत बघतच त्यांच्या कैदेतली वर्षे संपलीत कैदेतच त्यांचा अंत झाला. अर्थात हा सगळा इतिहास आम्ही दुसऱ्यांदा ऐकत होते. या आधी पाच वर्षांपूर्वी आम्ही हा किल्ला बघून आलो होतो. त्याही वेळी गाईडकडून ही सगळी माहिती ऐकलेली होती. त्यामुळं माझं लक्ष तिकडं जेमतेमच होतं. किल्ला बघून होत आला होता. आमच्यासोबत असलेल्यांची काहीतरी खुसुर- फुसुर गाईड बरोबर चालू होती. त्यानंतर कळलं की, ते गाईडला विचारत होते, आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना जिथं कैदेत ठेवलं गेलं होतं ती जागा कोणती? ती आम्हाला बघायचीय. ही गोष्ट खरंतर पाच वर्षांपूर्वीच्या ट्रिपमध्येही आमच्या कुणाच्याही लक्षात आली नव्हती आणि याही वेळी माझ्या लक्षात नव्हतीच. गाईडनं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली होती. किल्ल्यामध्ये तर तशी कुठलीही जागा नव्हती, जिथं त्यांनी शिवाजी महाराज इथं होते असं सांगितले. शेवटी गुगल बाबाची मदत घेऊन या दोघांनी गाईडला गुगलवरचं लोकेशन दाखवलं. ‘शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेली जागा’ असं गुगल वर टाकलं, तेव्हा या किल्ल्यापासून पाच किलोमीटरवरचं एक लोकेशन गुगलनं दाखवलं. गाईडनं अर्थातच खांदे उडवलं. आमच्याबरोबर येण्यासाठी त्यांनी नकार दिला. पण आमच्या मनातली जिज्ञासा संपली नव्हती.
आपण आग्र्यामध्ये दोन दिवस राहायचं, अकबर, जहांगीर यांचे राजवाडे बघायचे, शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहालापुढे नतमस्तक व्हायचं आणि ज्या साम्राज्यामध्ये आमचा मराठी राजा शंभर दिवस कैदेत होता त्या जागेवर, त्या वास्तूमध्ये माथा न टेकता आग्रा सोडायचं हे आमच्या मनाला पटेना. गाईडला निरोप देऊन आम्ही किल्ल्याच्या बाहेर पडलो आणि गुगल लोकेशन नुसार शिवाजी महाराजांच्या कैदेचं ठिकाण शोधायला सुरुवात केली. आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर सारखी एक मोठी गाडी केलेली होती. तीच गाडी घेऊन निघालो. आग्रा शहर एका बाजूला टाकून बाहेरच्या रस्त्याला लागलो. शहरापासून लांब नव्हता, पण शहराच्या बाहेरून जाणारा म्हणजे एखाद्या गावकुसासारखा तो रस्ता होता. लोकेशनच्या साधारण एक किलोमीटर अलीकडे आमची गाडी थांबली. पुढचा रस्ता अरुंद आणि काटेरी झाडांनी वेढलेला होता. ड्रायव्हरनं गाडीवर ओरखडे पडायला नकोत म्हणून पुढं येण्यास नकार दिला.
गाडी तिथेच उभी करून आम्ही चौघे चालत चालत त्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या एका बाजूला गावकुसाबाहेरची वस्ती जाणवत होती. रस्ता काटेरी तर होताच वर अस्वच्छही खूप होता. पायाखालच्या रस्त्याचे, रस्त्याकडेच्या घाणीचे फार काही वाटतच नव्हतं, कारण ४०० मीटरच्या अंतरावर आपल्याला हवं ते ठिकाण दिसू लागलं होतं. शेवटी एका खूप मोठ्या इमारतीजवळ आम्ही येऊन थांबलो. भलं मोठं लोखंडी गेट बंद होतं. आजूबाजूला झाडी वाढलेली होती. ‘राजा जय किशनदास भवन’ असं ह्या इमारतीवर नाव होतं. गेटजवळ गेल्यावर एक छोटंस फाटक नजरेत आलं. त्याला कडी होती, पण कुलूप नव्हतं. कडी काढून सरळ आत घुसलो. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हतं. गेटच्या आत मात्र स्वच्छता होती. हवेली पूर्ण बंद होती पण कोणाचा तरी वावर तिथं आजूबाजूला आहे एवढं लक्षात येत होतं. कुणाला काही विचारावं असं आजूबाजूला कोणी नजरेतही येईना. इतक्यात शेजारच्या वस्तीतला एक जण आमच्यासमोर आला. ‘क्या चाहिये आपको?’
आम्ही थोडसं चाचरतच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत आणि शिवाजी महाराजांना जिथं कैदेत ठेवलं होतं ती जागा बघण्यासाठी बाहेर पडलो आहोत. गुगलनं आम्हाला या जागेवर आणून सोडलं आहे, हे सांगताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ‘आप सही जगह पर आये हो....’ त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आणि अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले. त्या माणसानं जी काही माहिती दिली ती अशी होती – या इमारतीला ‘कोठी मीना बाजार’ किंवा ‘कोठी मीना बाजार हवेली’ असं म्हणतात. शिवाजी महाराजांना अटक करून इथंच नजर कैदेत ठेवलं होतं. ९९ दिवस ते इथं होते आणि शंभराव्या दिवशी ते इथून निसटले. मुघल राजवटीनंतरच्या काळात कोठी मीना बाजार हवेली ब्रिटिशांच्या ताब्यात होती. ब्रिटिशांनी जेव्हा त्यांची राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवली तेव्हा १८५७ मध्ये ही कोठी लिलावात विकली होती. राजा जय किशनदास या व्यक्तीनं ती खरेदी केली होती. सध्या राजा जयकिशनदास यांचेही कुणी वारसदार या कोठीमध्ये राहत नाहीत. फक्त त्या कोठीची देखभाल करण्यासाठी एक-दोन कुटुंब आजूबाजूला आहेत. बाकी बऱ्याचशा जागेवर अतिक्रमण पण झालेले आहे. गुगल सर्चवर नंतर बरीच माहिती वाचायला मिळाली. त्यामध्ये उत्तरप्रदेश सरकारनं या जागेत शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्याचा घाट घातलेला आहे. त्याला अर्थातच स्थानिक जागा बळकावणाऱ्यांनी विरोधही केलेला आहे आणि हा निर्णय कायद्याच्या आधीन आहे. त्यामुळे ही वास्तू जैसे थे अशी उभी आहे.
तिथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावण्यात आलेला नाही. फक्त ब्रिटिशांनी ही वास्तू राजा जयकिशन दासला लिलावात दिल्याचा उल्लेख असलेली एक पाटी तिथं बघायला मिळाली. दरवाजे अर्थातच बंद असल्यामुळे आत जाता आले नाही. तिथंच बाहेर उभे राहून शिवाजी महाराजांच्या धैर्याला, धाडसाला आणि शौर्याला आठवत नतमस्तक झालो. डोळे भरून ती वास्तू मनात साठवली आणि परत फिरलो. चार-पाच दिवसांच्या सहलीमधे जयपूरचा हवामहल, अमेर फोर्ट, फत्तेपूर सिक्रीचा अकबराचा किल्ला, आग्र्याचा किल्ला, ताजमहाल हे सगळं बघत फिरत होतो. पण या ट्रिपमध्ये खरं समाधान वाटलं ते मीना बाजार कोठीची इमारत बघून. इथं लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावं आणि आग्र्यात जाणाऱ्या तमाम मराठी माणसाची पाऊलं इकडेही आधी वळावीत असं मनोमन वाटलं. या मीना बाजार कोठी पर्यंत पोहोचता आलं याबाबत खूप समाधान वाटलं. पाच वर्षांपूर्वी आग्रा फिरताना हा इतिहास आपल्याला आठवलाही नव्हता याची खंत सुद्धा वाटली. असो. 
इथं अशी माहिती मिळाली की, छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथील फिदाई हुसेनच्या हवेलीत नजरकैदेत होते. संशोधन आणि अस्सल नोंदींच्या आधारे, इतिहास संकलन समितीनं कोठी मीना बाजार हा फिदई हुसेनचा वाडा असल्याचा दावा केलाय. अनेक इतिहासाच्या पुस्तकातही याचा उल्लेख आढळतो. इतिहास संकलन समितीच्या संशोधनानुसार ११ मे १६६६ रोजी शिवाजी महाराज आपल्या पथकासह आग्रा इथं पोहोचले. आग्राच्या सीमेवर असलेल्या मुलकचंद की सराय इथं त्यांनी तळ ठोकला. शिवला सराईजवळ ही इमारत होती, जी आता मोडकळीस आलीय. त्यादिवशी शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट होऊ शकली नाही. १२ मे रोजी शिवाजी महाराज मुघल दरबारात गेले, परंतु योग्य सन्मान न मिळाल्यानं ते नाराजी व्यक्त करून परतले. राजा जयसिंग यांचा मुलगा कुंवर रामसिंग याच्या छावणीच्या शेजारीच शिवरायांची छावणी उभारण्यात आली. जयपूर म्युझियममध्ये ठेवलेल्या आग्राच्या नकाशानुसार, रामसिंगची छावणी शहराच्या हद्दीबाहेर, सध्याच्या कोठी मीना बाजाराजवळ होती. हे ठिकाण आजही कटरा सवाई राजा जयसिंह यांच्या नावानं नोंदीमध्ये आहे.
औरंगजेबानं नाराजी व्यक्त केल्यावर त्यांना १२ मे १६६६ रोजी कुंवर रामसिंगच्या छावणीजवळच्या छावणीत नजरकैदेत ठेवण्यात आले आणि सिद्धी फौलाद खानच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. १६ मे १६६६ रोजी त्याला रादंदाज खानच्या घरी नेण्याचा आदेश देण्यात आला. त्याच्या अटकेसाठी एक हजार सैनिक आणि तोफगोळे तैनात करण्यात आले होते. यावर कुंवर रामसिंग यांनी शिवाजी महाराजांची जबाबदारी स्वीकारली आणि जामीनपत्रावर स्वाक्षरी केली. २० मेच्या राजस्थानी पत्रानुसार औरंगजेबानं रामसिंगला शिवाजी महाराजांना घरापासून दूर ठेवण्यास सांगितलं. यानंतर शिवाजीला शहराबाहेरील एका ढिगाऱ्यावर वसलेल्या रामसिंगच्या छावणीजवळ असलेल्या फिदई हुसेनच्या हवेलीत ठेवण्यात आलं. जयपूरच्या नकाशात नोंदवलेल्या हवेल्यांमध्ये फिदई हुसेनच्या हवेलीचा उल्लेख नाही, ज्यावरून शिवाजी महाराजांना बंदिवान ठेवणाऱ्या फिदई हुसेनची हवेली रामसिंगच्या हवेलीजवळच्या ढिगाऱ्यावर होती याची पुष्टी होते. त्यांना इथून जामा मशिदीजवळील विठ्ठलनाथाच्या हवेलीत नेण्याचा आदेश देण्यात आला, परंतु त्याआधीच महाराज औरंगजेबाच्या तुरुंगातून आपल्या मुलासह फळे आणि मिठाईची टोपली घेऊन पळून गेले होते.
ब्रिटिशांनी गव्हर्नरचं घर बांधलेल्या संशोधनानुसार, फिदई हुसेनचा वाडा म्हणजेच कोठी मीना बाजारच्या ढिगाऱ्यावर बांधलेले घर १८०३ साली ब्रिटिशांच्या ताब्यात आले. जुनं मोडकळीला आलेलं घर पाडून १८३७ मध्ये नवीन घर बांधण्यात आलं, ज्याला गव्हर्नर हाऊस असं म्हणतात. इथं तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरचं निवासस्थान बांधण्यात आलं होतं, जी १८५७ पर्यंत ब्रिटिशांची मालमत्ता राहिली. सन १८५७ मध्ये, स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धादरम्यान, राज्यपालांचे निवासस्थान लष्करी छावणीतल्या सध्याच्या आयुक्तांच्या निवासस्थानी हलवण्यात आलं. कोठी मीना बाजाराचा लिलाव झाला आणि राजा जयकिशनदास यांनी ही मालमत्ता लिलावात विकत घेतली ती आजही त्यांच्या नावावर नोंदवली आहे. आज आग्रा येथे जाणाऱ्या पर्यटकांना हे ठिकाण दाखवलंही जात नाही. तिथल्या गाईडनाही याची माहिती नाही. आग्र्याच्या किल्ल्याजवळच शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलं होतं असा चुकीची इतिहास सांगितला जातो. आग्रा शहराजवळील हे ठिकाण आज अत्यंत दुर्लक्षित स्थितीत आहे. आग्रा येथील पत्रकार विठ्ठल होळकर यांनी शासनाची विशेष परवानगी घेऊन या जागेला भेट दिली. तिथले फोटो काढले तसेच व्हिडिओदेखील तयार केले. यातून या जागेसंदर्भात लोकांना माहिती व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजाचं उचित असं राष्ट्रीय स्मारक उभं करावं. आग्रा इथं येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं प्रयत्न करावेत अशी मागणी शिवप्रेमी करीत आहेत.

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...