Saturday, 7 December 2024

शतकाच्या उंबरठ्यावर रा. स्व. संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येत्या विजयादशमीला, आपल्या स्थापनेची ९९ वर्षे पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. स्थापनेच्या वेळी कार्यकर्ते, निधी, कार्यालय, कार्यकारिणी, संघटनेचा प्रमुख, कार्यक्रमांची आखणी; एवढेच काय नावदेखील नसलेली ही संघटना आज देशातच नव्हे तर जगभरात विविध कारणांनी चर्चेचा विषय असते. अनेकांना हे आश्चर्य वाटते. म्हणूनच अलीकडे संघाविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही लोकांमध्ये वाढली आहे.
नागपूरचे एक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या प्रतिभेला संघाची कल्पना स्फुरली आणि १९२५ च्या विजयादशमीच्या दिवशी त्यांच्या घरीच संघाची स्थापना झाली. बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांची एक बैठक झाली. त्यात डॉ. हेडगेवार यांनी आपल्या मनातील कल्पना मांडली आणि आपण संघ सुरू करीत आहोत अशी घोषणा केली. त्यांच्या मनात आपल्याला काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना असल्याने; कोणतीही घाई न करता त्यांनी हळूहळू संघटनेला आकार दिला. संघटनेचे नाव स्थापनेनंतर सहा - सात महिन्यांनी निश्चित करण्यात आले. ही नावनिश्चिती ही त्यांच्या काळातील पहिली मोठी घटना. त्यानंतर हळूहळू दैनंदिन शाखा, शाखेचे कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची योजना, वर्षभरातील सहा नैमित्तिक उत्सव, प्रार्थना, प्रचारक पद्धती, भारतभर संघटनेचा विस्तार, समाजात संघाला प्रतिष्ठा मिळवून देणे; या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या. १९३९ मध्ये नागपूर जवळच्या सिंदी गावी झालेली प्रदीर्घ बैठक ही त्यांच्या कार्यकाळातील शेवटली महत्त्वाची घटना. १९४० च्या जून महिन्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला. १९२५ ते १९४० या पंधरा वर्षात त्यांनी केवळ आणि केवळ संघाची वाढ यासाठीच कार्य केले. त्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी स्वतःचा संसारही थाटला नाही किंवा डॉक्टरीचा व्यवसायदेखील केला नाही. व्यक्तिगत आणि संघटनेच्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत, प्रसिद्धी इत्यादीच्या मागे न लागता; त्यांनी संघाचे कार्य केले. त्यांच्या या एकांतिक तपश्चर्येतच संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचे रहस्य दडले आहे.
डॉ. हेडगेवार यांच्यानंतर श्री. गुरुजी म्हणून सर्वपरिचित असलेले श्री. माधव सदाशिव गोळवलकर यांच्याकडे संघाचे सरसंघचालक हे सर्वोच्च पद आले. प्राणीशास्त्रात M.Sc. आणि नंतर LLB केलेल्या गुरुजींचा पिंड आध्यात्मिक होता. रामकृष्ण आश्रमाची दीक्षा त्यांनी घेतली होती आणि तिथेच संन्यस्त जीवन घालवण्याचा त्यांचा विचार होता. परंतु त्यांचे गुरू स्वामी अखंडानंद यांनी 'तुझ्यासाठी दुसरे कार्य नियोजित आहे' असे त्यांना सांगितले व त्यांना नागपूरला पाठवले. १९३२ सालीच त्यांचा डॉ. हेडगेवार व संघाशी संबंध आला होता. तो नंतर वाढत गेला. गुरुजी संघात अधिकाधिक सक्रिय होत गेले आणि डॉ. हेडगेवार यांच्यानंतर संघाचे प्रमुख पद त्यांच्याकडे आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप ठेवून संघावर बंदी घालण्यात आली आणि गुरुजींना कारावासात ठेवण्यात आले. तो दीड दोन वर्षांचा काळ हा संघासाठी आणि गुरुजींसाठी अतिशय खडतर आणि परीक्षेचा काळ होता. मात्र त्या काळानेच त्यांची क्षमता आणि नेतृत्व सिद्ध केले. संघ उजळ माथ्याने त्या संकटातून बाहेर पडला आणि गुरुजींच्या नेतृत्वात त्याने विशाल रूप प्राप्त केले. प्रबळ संघटन, भारतभर विस्तार आणि वैचारिक पाया हे त्यांच्या ३३ वर्षांच्या संघाच्या नेतृत्व काळात घडून आले. १९७३ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि श्री. मधुकर दत्तात्रय उपाख्य बाळासाहेब देवरस हे संघाचे तिसरे सरसंघचालक झाले.
वकिलीची पदवी प्राप्त करणारे श्री. बाळासाहेब देवरस डॉ. हेडगेवार यांच्या काळापासूनच संघाचे स्वयंसेवक होते. संघाची कार्यपद्धती विकसित करण्यात, देशभर प्रचारकांचे जाळे विणण्यात, संघावरील बंदीच्या काळात त्यांचे फार मोठे योगदान होते. सरसंघचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर साधारण वर्षभरातच पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचे भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी संघाचा सामाजिक विचार सुस्पष्ट शब्दात मांडला आणि 'जर अस्पृश्यता हे पाप नसेल तर जगात काहीही पाप नाही' अशा ठाम शब्दात संघ अस्पृश्यतेच्या विरोधात असल्याचे सांगितले. दुर्दैवाने त्यानंतर वर्षभरातच देशात आणीबाणी लावण्यात आली आणि संघावर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली. श्री. देवरस यांच्यासह संघाचे हजारो कार्यकर्ते तुरुंगात डांबण्यात आले. शेकडो प्रचारक व कार्यकर्ते भूमिगत होऊन आणीबाणी विरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व आणि संचालन करीत होते. आणीबाणी विरोधातील लढा ही 'दमाची लढाई आहे' असा संदेश देऊन त्यांनी संघटनेचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले होते. आणीबाणी उठल्यानंतर संघावरील बंदीही मागे घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी संघाच्या कामाचा विस्तार आणि संघाची सामाजिक स्वीकार्यता वाढेल याकडे आवर्जून लक्ष दिले. त्यांच्याच काळात संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली आणि संघाने सेवाकार्य या विषयाला प्राधान्य देत देशभरात हजारो सेवा कार्यांचे जाळे विणले. अयोध्येतील राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी झालेल्या आंदोलनात त्यांच्याच नेतृत्वात संघाने पूर्ण शक्तिनिशी भाग घेतला. १९९२ मध्ये अयोध्येतील वादग्रस्त इमारत धराशयी झाल्यानंतर संघावर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली. संघाच्या आजवरच्या वाटचालीत त्याच्यावर तीनदा घालण्यात आलेल्या बंदींपैकी दोन बंदी श्री. देवरस यांच्याच काळात घालण्यात आल्या. दोन्ही वेळी संघ कोणताही डाग न लागता बाहेर पडला. १९९४ मध्ये वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थ्य यामुळे त्यांनी सरसंघचालक पदाचा कार्यभार उत्तर प्रदेशातील प्रा. राजेंद्र सिंह यांच्याकडे सोपवला. यांनाच रज्जुभैय्या म्हणूनही ओळखले जाते.
प्रा. राजेंद्र सिंह यांनी सरसंघचालक पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा संघाला ६८ वर्षे होऊन गेली होती. संघाची कार्यपद्धती, संघाचा विस्तार, संघाचा विचार, संघाच्या कामाची दिशा हे सगळे स्थिर झाले होते. संपूर्ण समाजाला कवेत घेणे एवढेच त्यापुढील कार्य होते. भौतिकशास्त्रातील तज्ञ असलेले प्रा. राजेंद्र सिंह, त्यांच्यानंतर २००० मध्ये त्या पदावर आलेले telecommunication engineer असलेले श्री. कु. सी. सुदर्शन आणि २००९ मध्ये त्या पदावर आलेले डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात संघाचा प्रवास याच दिशेने झालेला आहे. एक लाखाला स्पर्श करू पाहणारी शाखांची संख्या, लाखाहून अधिक सेवा कार्ये, समाजातील असंख्य संस्था संघटनांशी मेळ साधत सुरू असलेले समाज उत्थानाचे उपक्रम; याद्वारे आज संघ सुपरिचित झालेला आहे.
मानवीय अथवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाला आधार देणारा; सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात शिस्त, देशभक्ती आदी गुण जगायला शिकवणारा; या देशाची आणि देशाचा कणा असलेल्या हिंदू समाजाची सांस्कृतिक बैठक मजबूत करणारा; भारताच्या सुरक्षेबाबत आग्रही असणारा; अशा संघाच्या या कार्याची काही वैशिष्ट्ये आहेत. सातत्य, चिकाटी, संयम, अनुशासन, विशिष्ट वातावरणाचा आग्रह, राजकारणापासून दूर, आर्थिक दृष्ट्या केवळ स्वयंसेवकांवर अवलंबून, अनोखी प्रचारक पद्धती, आगळी नेतृत्व शैली, परिवर्तनशीलता, गृहस्थ कार्यकर्त्यांची फौज, कौटुंबिकता; यांच्या जोपासनेतून शून्यातून सुरू झालेला संघाचा हा प्रवास आज विश्वव्यापी झालेला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा विस्तार आणि संघाला मिळणारा समाजाचा पाठिंबा यासोबतच; संघाला विरोध, संघाविषयी आक्षेप आणि गैरसमज हेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. संघाला होणारा विरोध हा मुख्यत: राजकीय कारणांनी आणि असूयेपोटी होतो. संघाची एवढी मोठी शक्ती आपल्या राजकीय फायद्यासाठी उपयोगात आणता येत नाही आणि त्याच्यासारखी संघटित शक्ती आपल्याला उभी करता येत नाही; ही विरोधामागील मुख्य कारणे. अन्य प्रकारचा विरोध आणि आक्षेप हे संघ नीट न समजल्यामुळे असतात.
संघ हिंदू शब्दाचा करीत असलेला उपयोग अनेकांना खटकतो. वास्तविक हिंदूंचे स्थान तो हिंदुस्थान हे कितीतरी काळ प्रचलित होते. भारत या प्राचीन नावाबरोबरच हिंदुस्थान हे नाव वापरण्यावर कोणालाही आक्षेप नव्हता. या देशाचे हिंदू character च त्यातून व्यक्त होत होते. परंतु इंग्रजांच्या कुटील राजकारणाने, विशेषत: पाकिस्तान निर्मिती नंतर राजकीय कारणांनी हिंदू शब्द अनेकांना अडसर वाटू लागला. संघाने असंख्य वेळा स्पष्ट केले आहे की, हिंदू संघटन हे कोणाच्याही विरोधात नाही आणि हिंदू राष्ट्र संकल्पना अन्य समाज गटांना दुय्यम ठरवणारी नाही. संघाच्या प्रत्यक्ष कृतीतून देखील हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. अपघात, वादळे, भूकंप, कोरोना यासारख्या आपत्तींच्या वेळी समाजाची सेवा करताना संघाने हिंदू व अहिंदू असा भेद केलेला नाही. अगदी अहिंदूंचे अंतिम संस्कार देखील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केलेले आहेत. मुस्लिम किंवा ख्रिश्चन संप्रदायाच्या प्रमुख लोकांशी संवादाचे प्रयत्न केलेले आहेत. संघप्रेरणेने स्थापन झालेल्या सुमारे तीन डझन अखिल भारतीय संस्थांमध्ये हिंदुंसोबत अहिंदू लोकही सहभागी असतात. संघाच्या शाखा आणि शिबिरे यातही तुरळक मुस्लिम, ख्रिश्चन सहभागी होतात. तरीही अद्याप त्याबाबत अनेकांचे गैरसमज आहेत. परंतु अलीकडे हे प्रमाण कमी झाले आहे.
संघाच्या या भूमिकेलाही पुष्कळांचा विरोध असतो. संघाची भूमिका मवाळ असून संघाने कट्टर हिंदुत्व स्वीकारले पाहिजे असे त्यांचे मत असते. अशा लोकांच्या मते कट्टर हिंदुत्व म्हणजे अहिंदूंना प्रत्येक बाबतीत विरोध. हिंदू संघटन करणाऱ्या संघाला त्यामुळेच अनेक हिंदूच विरोध करतात. संस्कृती, परंपरा, धर्म इत्यादी बाबी महत्त्वाच्या मानत असल्याने; आधुनिक म्हणवणारा एक वर्गही संघाला विरोध करतो. त्या वर्गाच्या मते संघ मागास विचारांचा आणि प्रतिगामी आहे. संघाची एवढी मोठी शक्ती असतानाही संघ देशासाठी आणि समाजासाठी फार काही करीत नाही, असाही एक आक्षेप अनेकांचा असतो. देशातले अनेक वाद, अनेक समस्या संघाने पुढाकार घेऊन सोडवाव्या; अशी त्यांची अपेक्षा असते. संघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने होणारी संघ स्वयंसेवकांची शिस्तबद्ध विशाल संमेलने, संघाची सतत चालणारी विविध शिबिरे इत्यादी पाहून त्यांच्या अपेक्षा विकसित झालेल्या असतात. संघाचे स्वयंसेवक आणि हितचिंतक हेदेखील संघावर अनेकदा नाराज असतात. लोक संघाबद्दल वाटेल ते खोटेनाटे, कपोलकल्पित काहीबाही बोलतात. त्यावर संघ प्रतिक्रिया देत नाही. संघाने अशा बोलणाऱ्यांचा परखड समाचार घेतला पाहिजे असे त्यांना वाटते. संघ सगळ्याच समाजगटांना, सगळ्याच महापुरुषांना मानतो; हीसुद्धा अनेकांची अडचण असते. सगळ्या समाजाचा विचार म्हणजे आपल्याशी सहमत असणाऱ्यांचा विचार असा त्यांचा समज असतो. समाजात विविध पद्धतीने विचार आणि प्रयत्न करणारे राहणारच हे त्यांच्या लक्षात येत नाही. संघावर नाराज असणारे आणि टीका करणारे इतक्या प्रकारचे लोक आहेत.
एक आणखीन वर्ग अलीकडे उदयाला आला आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेवर असल्याने आणि देशाच्या ऐतिहासिक विकासक्रमात संघ आणि भाजप यांचे सख्यत्व विकसित झाले असल्याने; भाजप सरकार जे जे काही चांगले वा वाईट करीत असेल; त्या प्रत्येक गोष्टीसाठी संघच जबाबदार असतो असे हा वर्ग मानतो. सरकारच्या निर्णयांवर हा वर्ग संघाला प्रश्न अथवा स्पष्टीकरण विचारतो. एक आणखीन आक्षेप संघावर असतो. तो काही प्रमाणात अन्य सगळ्या आक्षेप आणि टीका यांच्यापेक्षा गंभीर आहे. संघाच्या चारित्र्य आणि शुचितेच्या आग्रहामुळे; संघाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिगत अथवा सामाजिक अथवा संस्थात्मक वर्तन चुकीचे आढळले तर त्यासाठी संघच जबाबदार ठरवला जातो.
हे सगळेच आक्षेप, गैरसमज आणि टीका यांचे मूळ संघाचे कार्य आणि त्या कार्याचे स्वरूप याबद्दलच्या अज्ञानात आहे. एखादे विशिष्ट ध्येय अथवा हेतू समोर ठेवून एखादे संघटन तयार करायचे. त्या संघटनेच्या शक्तीच्या बळावर हव्या त्या पद्धतीने; साम दाम दंड भेद वापरून; आपल्याला हवे ते करून घ्यायचे अथवा करायला भाग पाडायचे ही संघाची दृष्टी नाही. सगळा समाज आपण चालवू अशी संघाची भूमिका नाही. एवढेच काय अनंत काळपर्यंत संघ चालत राहावा असेदेखील संघाचे म्हणणे नाही. संघ लोकांमध्ये शिस्त, देशप्रेम इत्यादी गुण निर्माण करतो परंतु तेही संघाचे कार्य नाही. मग संघाला नेमके करायचे काय आहे? कशासाठी गेली शंभर वर्षे संघाचा हा खटाटोप सुरू आहे? या प्रश्नाचे उत्तर सरळ सोपे असले तरी समजायला कठीण आहे. संघ देशभक्ती निर्माण करतो, शिस्त निर्माण करतो, समाजाची सेवा करतो, समाज कसा असावा याचे एक आदर्श चित्र सगळ्यांपुढे ठेवतो; हे खरे आहे. परंतु हे सगळे करण्यामागे संघाचा विचार वेगळा आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी संघासारख्या वेगळ्या संघटनेची गरज नसावी. या साऱ्या बाबी समाजाचा स्वभाव व्हाव्या. या चांगल्या गुणांची निर्मिती समाजात स्वाभाविक रीतीने होत राहावी, असा संघाचा प्रयत्न आहे. सगळी सूत्रे हाती घेऊन विशिष्ट आदर्श स्थिती निर्माण करायची आणि ती स्थिती टिकवून ठेवण्यासाठी अनंत काळपर्यंत संघ चालवायचा हे संघाला अभिप्रेत नाही. यासाठी व्यक्तीव्यक्तीची मानसिकता, त्याचे विचार, त्याच्या सवयी या सगळ्याला विशिष्ट आकार देत देत समाजाचा सामान्य स्वभाव आणि शक्ती उत्पन्न करायची असा संघाचा प्रयत्न आहे. ही सोपी गोष्ट नाही. एकेका व्यक्तीत असे परिवर्तन वैचारिक, भावनिक आणि व्यावहारिक स्तरावर आणणे ही अतिशय कठीण आणि धिमी प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारचे प्रलोभन आणि भय याद्वारे हे होत नाही. व्यक्तीव्यक्तीच्या हृदयाला हात घालावा लागतो. त्यासाठी समाजावर उत्कट प्रेम करणारी माणसे तयार करावी लागतात. या कामात येणारे स्वाभाविक अडथळे, अडचणी, मर्यादा; माणसांचे स्वभाव विभाव; परिस्थिती या सगळ्याचा साधकबाधक आढावा घेत; विश्लेषण करत कार्य करावे लागते. ज्या समाजासाठी हे करायचे त्या समाजाला संघ आपला वाटावा हेही आवश्यक असते. समाजाला संघ आपला वाटावा याचा प्रयत्न करतानाच, अवाजवी अपेक्षा आणि कल्पना यांच्यातून मार्ग काढावा लागतो. अशा असंख्य बाबी लक्षात घेऊन संघाचे मूल्यांकन करावे लागते. राजकीय पक्ष, समाजसेवा करणारी एखादी संस्था, समाज प्रबोधन करणारा एखादा मंच इत्यादी कल्पना मनात बाळगून संघाचा विचार करता येत नाही.
हिंदू समाजाचा हा आतला विकास करण्याची एक विशिष्ट दिशा हेदेखील संघाचे एक वैशिष्ट्य आहे. अन्य समाजांवर, अन्य देशांवर प्रभुत्व सिद्ध करणे ही ती दिशा नाही. सर्वेपि सुखिन: संतु, वसुधैव कुटुंबकम, एकं सत विप्रा: बहुधा वदंती, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ; या प्रकारची जी शिकवण आणि संस्कार या देशाने प्राचीन काळापासून दिले; तीच संघाच्या कामाची दिशा आहे. हे मान्य नसलेले जे जे समूह किंवा ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनाही या वैचारिक भूमिकेवर आणायला हवे. त्याशिवाय जगात सुख शांती नांदणार नाही असा संघाचा विश्वास आहे. त्यासाठी प्रथम हे प्राचीन संस्कारधन ज्या समाजाचा वारसा आहे तो समाज; त्या विचारांना आणि संस्कारांना धरून उभा रहावा असा प्रयत्न करणाऱ्या एका विशाल प्रवाहाचे नाव आहे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...