Friday, 6 December 2024

एका आधारवडाचे स्मरण

*दिवंगत शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या सान्निध्यात असतानाचे काही सुवर्णक्षण ....*
आपल्या आयुष्यातील सुवर्णकाळ कोणता, याचे ठोकताळे प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पध्दतीने ठरवत असतो. शिवसेनेची १९ जून १९६६ रोजी झालेली स्थापना ते देशातील आणिबाणी या दरम्यान शिवसेना प्रमुखांचे लाभलेले सान्निध्य हा मी माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ समजतो. या कालखंडाने तुम्हाला काय दिले असा प्रश्न मला माझ्या मित्र-परिवारातून अनेकदा विचारला जातो. त्यांचा अप्रत्यक्ष रोख हा राजकीय पदे आणि त्यातून निर्माण होणारी संपत्ती एवढ्याच पुरता मर्यादित असतो. त्याहीपेक्षा आणखी काही समाजोपयोगी गोष्टी या जगात अस्तित्त्वात आहेत, त्यांची जाणीव कोणी तरी आपल्याला ऐन तारुण्यात करून द्यावी लागते. ती जाणीव या कालखंडाने मला करून दिली असे मी मानतो. या कालखंडाने चांगले मित्र दिले, सहकारी दिले, त्याचबरोबर माणूसकी म्हणजे काय याचीही तोंडओळख करून दिली.
माझे शाळेचे दिवस संपून कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. पुढारीपण करण्याची मला उपजतच सवय होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना विविध प्रकारे राजकीय घडामोडींमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणे हे ओघाने आलेच. त्या काळात अनेक गोष्टींकडे माझा ओढा होता. त्यात हाती पडेल ते वाचायचं याला प्राधान्य होतं. दर आठवड्याला 'मार्मिक' साप्ताहिक हातात पडे. परळच्या आमच्या चाळीत शेजारी राहणारा माझा समवयस्क जिवलग मित्र कै.अरविंद गावकर 'मार्मिक' नित्यनियमाने विकत घेऊन येई. मग त्यातील विविध लेखांवर चर्चा होई. त्या दरम्यान 'मार्मिक'मध्ये *'वाचा आणि थंड बसा'* असे एक सदर येई. *त्यात मुंबईतील मराठी माणसावर नोकऱ्यांमध्ये होणाऱ्या अन्यायाविषयी माहिती दिली जात असे. ती वाचून डोक्यात सणक जाई. अशाच एका सणकीमध्ये 'मार्मिक'च्या कार्यालयात धडक मारली. इमारतीचं नाव होतं, 'कदम मॅन्शन!' आत गेलो. एका चाळीशीच्या गृहस्थांनी 'ये' म्हटलं. स्वर्गीय बाळासाहेबांचे ते पहिलं दर्शन होतं.*
'काय करतोस?' पहिला प्रश्न विचारला. 'शिकतोय!' माझं उत्तर. 'या कदमांचा, म्हणजे कदम मॅन्शनच्या मालकांचा तू कोण?' मी म्हटलं, 'कोणी नाही.' त्यानंतर आणखी दोन-तीन जुजबी प्रश्न झाले. शेजारी कै.पद्माकर अधिकारी उभा होता. त्याला 'साहेब' म्हणाले, 'पद्माकर, हा परळला राहतो, तुझ्या सोबत घे.' पद्माकर अधिकारी हा माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा होता, पण त्याच्याशी नंतर इतकी जवळीक झाली की त्याला मी अरे म्हणू लागलो पद्माकर म्हणाला, 'दररोज येत जा.' नंतर तो मला त्याच्या खांडके बिल्डींगमधील घरी घेऊन गेला.
शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळचे ते दिवस होते. 'मार्मिक'चे कार्यालय म्हणजे प्रत्यक्षात बाळासाहेबांचे निवासस्थान होतं. सर्व ठाकरे कुटुंब तिथं राहात होतं. 'मार्मिक'मधील त्या सदरामुळे बाळासाहेबांकडे वाचकांची खूप पत्रे येत, अनेकजण संपर्क करीत. त्यातील कितीजण नव्या संघटनेच्या कामासाठी उपयोगी येतील, याचा शोध घेतला जात होता. छाननी होत होती. ते काम पद्माकरकडे होतं. त्याच्या पायाला त्यामुळे भिंगरी लागली होती. तो रोज सकाळ-संध्याकाळ पायीपायी लालबाग-परळमध्ये फिरत असे. कामगार भागातील सर्व व्यायामशाळा, त्यांचे चालक, निरनिराळया गल्लीतील दादामंडळी, इतकेच नव्हे तर गुंड, कामगार पुढारी या साऱ्याची खडान् खडा माहिती पद्माकर जमा करीत होता. त्याला सोबतीला मी मिळालो. त्यावेळी संघटना बांधणीच्या कामात आणखी दोघंजण महत्त्वाची भूमिका बजावत होते, ते म्हणजे शाम देशमुख आणि माधव देशपांडे. शामराव आजही शिवसेनेच्याच सोबत आहेत. देशपांडे यांनी मात्र बाळासाहेबांशी नंतर खूप वैर घेतलं.
स्व. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आलेल्या या साऱ्या मंडळींच्या सहभागाने शिवसेनेचा पहिला मेळावा प्रचंड यशस्वी झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे प्रतिक असलेल्या वाघाच्या चेहऱ्याचा बोर्ड रंगविण्याचे काम लालबागला जयहिंद सिनेमाजवळच्या एका चाळीत कै.भाई गुजर हे करीत होते. विशेष म्हणजे ते काम पाहण्यासाठी स्वतः बाळासाहेब भाईंच्या घरी दोन-तीन वेळा गेले आणि स्वतः हातात ब्रश घेऊन त्या कामात त्यांनी सुधारणाही केल्या. कार्यक्रमाच्या नियोजनात स्वतः जातीने लक्ष घालण्याच्या त्यांच्या स्वभावाचे दर्शन या मेळाव्याच्या निमित्ताने अनेकदा झाले.
शिवसेनेचा तो पहिला मेळावा दसऱ्यादिवशी होऊ शकला नाही. त्या दसऱ्याला, २३ ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर स्व.यशवंतराव चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित केली गेली होती. मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे अगोदरपासूनच आरक्षण करून ठेवावे लागते याची कल्पना आम्हा नवोदित कार्यकर्त्यांना त्यावेळी नव्हती. मात्र कॉंग्रेसची मंडळी त्यात वाकबगार होती. त्यांनी शिवसेनेचा मेळावा होणार असे कळताच शिवाजी पार्क आरक्षित करून ठेवले. त्यामुळे शिवाजी पार्कचा पहिला मेळावा त्यानंतरच्या रविवारी, ३० ऑक्टोबर १९६६ रोजी संपन्न झाला.
दसऱ्याला मेळावा झाला नाही, त्याचा लाभ मात्र मला झाला. आम्ही म्हणजे, मी आणि स्व.विजय गावकर (स्व.अरविंदचा मोठा भाऊ) याने त्या दसऱ्याच्या दिवशी एलफिन्स्टन रोडवरील टाटा मिल्स कंपाऊंडमध्ये परळ शाखेच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम ठेवला. त्या दिवशी माझ्या घरी माझा पुतण्या नितीन याचे बारसे होते. शाखेच्या उद्‌घाटनाला आलेले बाळासाहेब त्या बारशाच्या ठिकाणीही उपस्थित राहिले. त्या निमित्ताने त्यांचे पाय आमच्या घराला, चाळीतील खोलीला लागले. (सध्या नितीन ओमान येथे परदेशात असतो)
परळला आम्ही शिवसेनेची शाखा काढली त्यावेळी विजय गावकर हा जेमतेम एकोणीस वर्षांचा होता. मी त्याच्याही पेक्षा लहान होतो, त्यामुळे बाळासाहेबांनी विजयलाच शाखाप्रमुख केलं. विजय त्यानंतर १९६८च्या महापालिका निवडणुकीत सर्वात लहान वयाचा नगरसेवकम्हणून निवडून आला आणि अकरा वर्षे नगरसेवक राहिला. परळच्या चाळीत राहणारा, जेमतेम अकरावी पास झालेला, शिवडीच्या ज्युबिली मिलमध्ये सेमीक्लार्क म्हणून दिवंगत वडिलांच्या जागी काम करणारा एका सामान्य कुटुंबातील हा विजय केवळ बाळासाहेबांच्या परिस स्पर्शामुळे कोवळ्या वयात एका भागाचे राजकीय नेतृत्व करू लागला, मुंबई महानगरपालिकेसारख्या मान्यवर संस्थेत नगरसेवक झाला, हे कोणाचे भाग्य म्हणायचे! विजयच नव्हे तर त्याच्यासारख्या असंख्य तरुणांना त्यांच्या जीवनात उत्तुंग शिखर गाठण्याची संधी बाळासाहेबांनीच उपलब्ध करून दिली, याची महाराष्ट्राच्या इतिहासात कायमची नोंद राहील.
तसं पाहिलं तर शिवसेनेची जडणघडण होत असताना स्वतः बाळासाहेब गिरणगावातील अनेक चाळींतून, गल्ली बोळातून फिरले. कोणी बोलविले तर त्यांनी कधीही नाही म्हटले नाही. त्यामुळे गिरणगावातील लहान-थोरांना त्यांच्याविषयी प्रचंड आपुलकी निर्माण झाली. एखाद्यावर काम सोपविले तर त्यात ते कधीच हस्तक्षेप करीत नसत. भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना झाली त्यावेळी त्यांनी तिच्या बांधणीची मुख्य जबाबदारी ही शाम देशमुख यांच्यावर सोपविली होती. शामरावांनी सुरूवातीला सुभाष अकोलकर यांना प्रमुखम्हणून काम करण्याचे सुचविले होते. अकोलकर हे चांगले किर्तनकार होते. मात्र त्यांचे कुठतरी बिनसले आणि ते पुढील काळात विद्यार्थी सेनेतून बाहेर पडले. त्यावेळी शामरावांनी माझी आणि डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटकम्हणून नियुक्ती केली होती. काही काळाने डॉ. आठवले यांनी अन्य कोणती तरी जबाबदारी स्वीकारली. (काही वर्षानंतर त्यांनी *'सनातन'* ही संस्था स्थापन केली, ती सध्या सर्वपरिचित आहे. शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेविका कै. स्नेहलता कोरडे डॉ. आठवले यांना बाळासाहेबांकडे घेऊन आल्या होत्या.)
विद्यार्थी सेनेचे काम जोरात सुरू होताच, बँकेत खाते उघडण्याची वेळ आली. महाराष्ट्र बँकेच्या नियमानुसार अध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार अशा पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरीसाठी आवश्यकता होती. त्यानुसार त्यांनी बाळासाहेबांच्या अनुमतीने मला अध्यक्ष, कै.शरद कर्डेकर याला सरचिटणीस आणि कै.प्रकाश कौलगुड याला खजिनदार म्हणून महाराष्ट्र बँकेच्या रानडे रोडवरील शाखेत खाते उघडण्याचे अधिकार दिले. त्यामुळे कागदोपत्री मी भारतीय विद्यार्थी सेनेचा पहिला अध्यक्ष झालो. त्यानंतर बाळासाहेबांच्या सूचनेवरून मला भारतीय कामगार सेनेचा प्रतिनिधीम्हणून कामगार सेनेचे तत्कालीन सरचिटणीस कै.अरुण मेहता यांनी मुंबईच्या 'बॉम्बे लेबर इन्स्टिट्यूट (आताची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीज)' या संस्थेत अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास सांगितले. कामगार सेनेच्यावतीने त्या संस्थेत प्रवेश घेणाराही मीच पहिला प्रतिनिधी ठरलो.
विद्यार्थी सेनेचे काम सुरू असतानाच आम्ही पोद्दार महाविद्यालयातील *आर.के.करंजिया* यांची सभा उधळून लावली, त्यांच्या गाडीची मोडतोड केली. विधान परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले कै.वसंत डावखरे हे त्यावेळी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे एनएसयुआयचे काम करीत. त्यांनी मुद्दामच करंजिया यांना भाषणासाठी बोलाविले होते. करंजिया हे कम्युनिस्ट विचाराचे पारशी गृहस्थ त्या काळी *”ब्लीटस्”* या इंग्रजी साप्ताहिकाचे मालक संपादक होते. ते तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे निकटवर्ती आणि शिवसेनेवर कडवट टीका करणारे पत्रकार म्हणून देशभर प्रसिध्द होते. त्यांनी त्यांच्या भूमिकेप्रमाणे आपल्या भाषणात शिवसेनेवर टीका सुरू केली. आम्ही ती सभा उधळण्याचा प्रयत्न केला. सभा उधळल्यानंतर अकोलकर आणि मला पोलिसांनी अटक केली. मला चार दिवस माटुंग्याच्या पोलीस लॉकअपमध्ये राहावे लागले. शामरावांनी माझी सुटका करून मला बाळासाहेबांकडे नेले. बाळासाहेब म्हणाले, 'मर्दासारखे काम केले. घाबरू नका, मी सर्व काही ते पहातो.' यथावकाश माझी आणि अकोलकरची खटल्यातून सुटका झाली. याच दरम्यान माझ्यावर 'मार्मिक'मध्ये मुंबई महापालिकेच्या कामकाजाच्या संदर्भात स्तंभ लिहिण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या स्तंभाला बाळासाहेबांनीच *'महापालिकेत एक नजर'* असे नाव दिले. एका अर्थाने महापालिकेतील शिवसेनेच्या कामकाजावर नजर ठेवण्याची जबाबदारीच बाळासाहेबांनी माझ्यावर सोपविली होती. ऐन आणिबाणीच्या काळात सरकारी तपास अधिकाऱ्यांकडून 'मार्मिक'चे अग्रलेख आणि इतर मजकूर 'सेन्सॉर' करून आणण्याचे कामही माझ्याकडेच सोपविले होते.
महापालिकेप्रमाणेच संघटनेमध्येही काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती बाळासाहेबांना असायची. त्यामुळे शिवसेनेच्या शाखापातळीवरील पदाधिकाऱ्यांपासून सोबतच्या नेत्यांपर्यंत सर्वांवर त्यांचा वचक असे. ही माहिती जमविण्याचे काम त्यांनी काही मंडळींकडे सोपविलेले होते. ही मंडळी त्यांच्या विश्वासातील असली तरी कुठेही पुढे पुढे करायची नाही. एखाद्या स्वतंत्र गुप्तचर यंत्रणेप्रमाणे त्यांचे काम चाले. त्यामुळे ही पुढील काळात, विशेषतः सुरक्षेच्या कारणास्तव बाळासाहेबांच्या हालचालीवर बंधने येऊ लागल्यानंतर या मंडळींना त्यांच्यापर्यंत पोचणे कठीण होत गेले. विशेषम्हणजे या मंडळींनी कोणतीही राजकीय अपेक्षा बाळगली नाही, त्यामुळे त्यांच संघटनेतील वावर कमी कमी होत गेला आणि राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांची चलती सुरू झाली.
निवडून आलेल्या नगरसेवकाने आपल्या विभागात कोणते काम केले आणि कोणते केले नाही, याची माहितीही बाळासाहेबांकडे अचूक असे. त्या काळात शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर शाखाप्रमुख मोठा की नगरसेवक असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बाळासाहेबांनी शाखाप्रमुखाला मान द्या, असा आदेश जारी करून संघटनेच्या कामाला प्राधान्य दिले.
*पत्रकार संघ आणि मी*
मी, १९८२ साली मुंबई मराठी पत्रकार संघाचा पहिल्यांदा अध्यक्ष झालो आणि आशिर्वाद घेण्यासाठी बाळासाहेबांकडे गेलो. तेव्हा त्यांनी मला अनेक सुचना केल्या, अनेक गोष्टी करायला सांगितल्या. ते म्हणाले, “तू शिवसेनेचं तसंच मार्मिकचं प्रॉडक्ट आहेस हे विसरू नकोस आणि डोक्यात हवा जाऊ देऊ नकोस”. त्यांचे ते वाक्य आजही मी विसरलेलो नाही, आणि विसरणारही नाही. पत्रकार संघाचा अध्यक्ष असतानाच ९ ऑगस्ट १९८३ रोजी माझा चंद्रकला प्रभाकर म्हात्रे हिच्याशी, भारतकुमार राऊत (ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेना खासदार) याच्या प्रभादेवी येथील कामना सोसायटीतील घरात, नोंदणी पध्दतीने विवाह झाला. त्याची बातमी चार-पाच दिवसांनी दै.सकाळमध्ये छापून आली. त्याच दिवशी मला मातोश्रीहून बोलावणे आले. आम्हा उभयतांची ओवाळणी केली गेली. माझ्या पत्नीची स्व.मीनावहिनींनी खणा-नारळाने ओटी भरली. इतक्या आपुलकीने आणि मायेने आपल्यासारख्या कार्यकर्त्याची दखल घेणारा तो एक आधारवड आहे याची जाणीव त्यावेळी झाली.  
 *चित्रकार एम.एफ.हुसेन*
स्व. बाळासाहेबांच्या स्वभावातील जी वैशिष्ट्ये होती, ती त्यांच्या सान्निध्यात असताना सतत अनुभवायला मिळत. रोखठोक बोलणं, मिश्किल भाष्य, चिमटे काढणे, बारीक बारीक बाबींची माहिती घेणे, सूचना करणे, समोरच्या व्यक्तीची अडचण ओळखणे, चांगल्या कामाचे मोकळ्या मनाने कौतुक करणे, प्रसंगी रागावणे, योग्य ठिकाणी मदत करणे, त्यासाठी पुढाकार घेणे अशी ती असंख्य स्वभाववैशिष्टये होती. प्रसिध्द चित्रकार एम.एफ.हुसेन यांच्या बाबतीत घडलेला एक मजेदार प्रसंग आहे.
एकदा www.painternet.com (पेन्टर नेट डॉट कॉम) या चित्रकारांच्या व्यावसायिक वेबगॅलरीचे चर्चगेट स्टेशनजवळच्या सम्राट या हॉटेलात बाळासाहेबांच्या हस्ते उद्‌घाटन होते. एम.एफ.हुसेन हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. वेबगॅलरीचे औपचारीक उद्‌घाटन झाल्यावर केलेल्या भाषणात बाळासाहेबांनी, चांगली चित्रकला म्हणजे काय? यावर खूप छान विवेचन केले. भाषणाच्या ओघात ते हुसेन यांच्याकडे पाहून म्हणाले, ''हे हुसेन! ते जी काय चित्रं काढतात, ती त्यांना स्वतःला तरी कळतात की नाही देव जाणे. पण पैसेवाले लोक आपल्याला मॉडर्न आर्टमध्ये खूप कळतं असं दाखविण्यासाठी हुसेन यांची चित्रं लाखो रुपयाला विकत घेतात आणि वृत्तपत्र त्या बातम्या छापत असतात.'' त्यावर हुसेन यांचा चेहरा गोरामोरा झाला. हुसेन यांनी फारशी प्रतिक्रिया दिली नाही. ते हात जोडून इतकेच म्हणाले, ''काय बाळासाहेब?'' हा किस्सा इथेच संपत नाही. कार्यक्रम संपल्यावर चहापान सुरू असताना बाळासाहेबांभोवती जमलेल्या नवोदित चित्रकारांच्या घोळक्यातून पुन्हा कोणीतरी हुसेन यांचा विषय काढला. तोपर्यंत हुसेन दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टेबलावर जाऊन इतरांशी बोलत बसले होते. कोणी तरी म्हणाले, ''हुसेन पायात चप्पला घालत नाहीत, अनवाणी फिरतात.'' त्यावर बाळासाहेब पटकन् म्हणाले, ''चपलांसाठी त्यांचे पाय कामाचे नाहीत, त्यांचे थोबाड ही त्यासाठी योग्य जागा आहे.'' त्यांच्या त्या वाक्यावर खूप हशा पिकला. 
 *स्वा. सावरकर तैलचित्र*
भारतीय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यात आले, त्यावेळी घडलेल्या काही घटनांचा या लेखात आवर्जून उल्लेख करावाच लागेल. मुंबईचे माजी महापौर आणि माजी आमदार स्व. डॉ. रमेश प्रभू यांचे हे तैलचित्र लावण्यामागे मोठे योगदान आहे. त्यांच्या पुढाकारामुळे आणि लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष स्व.श्री. मनोहर जोशी यांच्या मुसद्देगिरीमुळे ही कामगिरी साध्य होऊ शकली. अर्थात त्यामागची प्रेरणाही स्व. बाळासाहेबांचीच होती.
डॉ. प्रभू यांनी त्यांच्या संस्थेच्या एका कार्यक्रमात संस्थेची माहिती देतांना, संसदेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी त्यांच्या संस्थेतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि त्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर जोशी हेच होते. जोशीसरांनी आपल्या भाषणात डॉ. प्रभू यांची मागणी मान्य करून संसदेमध्ये नजिकच्या काळात तैलचित्र लावण्यात येईल अशी घोषणा केली. त्यानंतर जोशीसरांनी संसदेतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ह्यासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला. या संदर्भातील माहिती वृत्तपत्रातून तसेच माझ्या आणखी एका लेखातून त्या त्या वेळी प्रसिध्द झालेली आहेच.
स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीदिनी, २६ फेब्रुवारी २००३ रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीरांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय झाल्यावर सदर तैलचित्र तयार करण्याची जबाबदारी माझी चित्रकार पत्नी सौ.चंद्रकला हिच्यावर सोपविण्यात आली. तैलचित्र काढण्यासाठी संदर्भम्हणून स्वातंत्रवीरांचे कोणते मूळ छायाचित्र निवडायचे हे ठरवायचे होते. स्वातंत्रवीरांचे सुपुत्र (स्व.) विश्वासराव सावरकर यांनी त्यांच्याकडील अनेक छायाचित्रे सौ.चंद्रकला हिच्याकडे सुपूर्त केली. याबाबत बाळासाहेबांचा सल्ला घेण्यात आला. ते म्हणाले, ''तात्यारावांचं (स्वातंत्र्यवीरांचे टोपण नाव) चित्र काढणारे त्यांना उगाचच उग्र दाखवितात. काळी टोपी आणि पांढरा कोट घातलेलं बटबटीत डोळ्यांचं, टोपीतून केस बाहेर डोकावणारं त्यांचं ते चित्र बघवत नाही. तात्याराव जरी कडक स्वभावाचे, क्रांतिकारक विचाराचे होते, तरी प्रत्यक्षात ते उग्र चेहऱ्याचे नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरची विद्वता, त्यांचा करारीपणा, त्यांचा निर्धारी स्वभाव हे सारं त्यांच्या तैलचित्रातून प्रकट व्हायला हवं. तसं छायाचित्र घेऊन ये.'' माझ्या पत्नीने तिला पसंत पडलेलं स्वातंत्र्यवीरांचे एक छायाचित्र बाळासाहेबांना दाखविलं. ते म्हणाले, ''छान! कामाला सुरूवात कर!''
त्यानंतर तयार झालेलं तैलचित्र घेऊन त्यांना दाखविण्यासाठी आम्ही ते घेऊन 'मातोश्री'वर गेलो. बाळासाहेबांनी त्या तैलचित्राला वाकून नमस्कार केला. त्यानंतर ते तैलचित्र जवळपास अर्धा तास बारकाईने निरखून पाहिलं. काही सूचना केल्या. छोट्या छोट्या दुरुस्त्या सुचविल्या.
त्यावेळी त्यांच्या आणखी एका स्वभावगुणाचे प्रत्यंतर सर्वांना आलं. ते म्हणाले, ''तैलचित्र तयार केलंत, ते दिल्लीला कसं नेणार?'' मी म्हणालो, ''राजधानी एक्सप्रेसची तिकिटं काढली आहेत, गाडीच्या लगेज व्हॅनमधून न्यायचा विचार आहे.'' त्यावर ते उसळून म्हणाले, ''गाढव आहेस का? अरे, आपलं सरकार आहे, ते कशासाठी? सत्ता कशी राबवायची ते कळावं लागतं. दिल्लीत तुझ्या संपर्कात कोण आहे?'' मी म्हटलं, ''सतीश प्रधान, ते कोऑर्डिनेट करायताहेत.'' त्यावर बाळासाहेब म्हणाले, ''सतीशला माझा निरोप दे, हे तैलचित्र महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, ते विमानाने घेऊन जा. आणि तुम्ही दोघे काय ठरवता, ते मला ताबडतोब कळवं.'' त्यांचा तो जणू आदेशच होता. मी 'मातोश्री'च्या बाहेर पडून ताबडतोब एसटीडी बूथवरून दिल्लीला खासदार सतीश प्रधान यांना त्यांच्या घरी फोन लावला. त्यांना बाळासाहेबांचा निरोप देताच ते म्हणाले, ''मी आत्ताच, निघालोच शहानवाजकडे.'' राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये शहानवाज हुसेन हे हवाई वाहतुक खात्याचे मंत्री होते. त्यानंतर आम्ही ते तैलचित्र 'सावरकर सदना'त नेऊन विश्वासराव आणि त्यांच्या पत्नीला दाखवलं. त्यांनाही ते पसंत पडलं.
आम्ही सावरकर सदनातून मुलुंडला घरी पोचायच्या आधीच दिल्लीहून शहानवाज हुसेन यांच्या खाजगी सचिवाचा फोन येऊन गेला होता. घरी पोचतो ना पोचतो तोच इंडियन एअर लाईन्सच्या महाव्यवस्थापकांचा फोन आला. ते म्हणाले, ''आम्ही तुमच्या घरी ताबडतोब येऊ इच्छितो, पत्ता सांगा. सायंकाळच्या सुमारास इंडियन एअर लाईन्सच्या अधिकाऱ्यांची एक टीम आमच्या घरी दाखल झाली. त्यांनी ते तैलचित्र पाहिलं, त्याची मापं घेतली आणि उद्या माणसं तैलचित्र न्यायला येतील, असं सांगून निघून गेली.'' दुसऱ्या दिवशी आणखी काही लोक आले, त्यांनी सोबत पॅकींगचे साहित्य आणलं होतं. तैलचित्र व्यवस्थित पॅक करून ते दिल्लीला सतीश प्रधानांच्या बंगल्यावर घेऊन गेले.
''तैलचित्र दिल्लीला कसं न्यायचं?'' याचा विषय यापूर्वी कोणाच्याच डोक्यात आला नव्हता. पण बाळासाहेबांच्या विचारशक्तीतून तो सुटला नाही. एका *जाणत्या राज्याचं* प्रत्यंतर त्यांच्या रूपाने त्यावेळी आम्हाला आलं.
स्वा. सावरकरांच्या तैलचित्राची कहाणी इथंच संपत नाही. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ते तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते लावण्यात आल्यानंतरही काही लोकांनी त्याविरुध्द काहूर उठविण्याचं थांबवलं नाही. पुढच्याच आठवड्यात 'मिड डे' या इंग्रजी सायंदैनिकामध्ये पहिल्याच पानावर एक हेडलाईनची बातमी आली. ''संसदेत लावलेलं सावरकरांचे तैलचित्र सावरकरांसारखे वाटत नाही'' असा दावा त्या बातमीत करण्यात आला होता. विशेषम्हणजे हा दावा सुहास बहुळकर, जहांगिर साबावाला आणि सुभाष अवचट या तीन प्रसिध्द चित्रकारांनी केला होता. 'मिड डे'चा तो अंक घेऊन आम्ही बाळासाहेबांकडे गेलो. तेव्हा ते चिडलेले दिसते. ते म्हणाले, ''मी एकदा तैलचित्र ओ.के. केल्यावर त्यांना तुम्ही का दाखवलं?'' मी म्हणालो, '' तुम्ही एकदा तैलचित्र पाहिल्यावर त्या तिघांना ते दाखविण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. आम्ही त्यांना ते कधीही दाखवलेले नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी ते आजतागायत पाहिलेलं देखील नाही. तैलचित्र फक्त आपण आणि दुसरे विश्वासराव सावरकर तसेच त्यांची पत्नी यांनीच सुरूवातीला पाहिले आहे. नंतर बाळासाहेबांनी 'मिड डे'ची ती संपूर्ण बातमी वाचून काढली. सदर बातमीवरूनच त्या तिघांनी स्वातंत्र्यवीरांचे ते तैलचित्र पाहिलेले देखील नाही हे स्पष्ट होत होतं. बातमी वाचून होताच बाळासाहेब म्हणाले, हे “###” कलेच्या प्रातांत असते का धंदे करतात, ते मला कळत नाही.'' त्यानंतर ''तू या भूक्कड लोकांकडे लक्ष देऊ नकोस'' अशी त्यांनी माझ्या पत्नीची समजूतही काढली. त्यावेळी त्यांच्यातील कुटुंबवत्सल आणि पालकाच्या भूमिकेतील एका कठोर आणि मृदू स्वभावाचं दर्शन आम्हाला घडलं.
 *मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर*
स्व.बाळासाहेब हे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या कट्टर विरोधात होते असा एक समज काही जणांकडून पध्दतशीरपणे पसरविला गेला आहे. त्यांच्या स्वभावधर्मानुसार ते कोणा तरी पत्रकाराकडे, “घरात नाही पीठ, कशाला हवे विद्यापीठ” असे सहजपणे बोलून गेले. त्यानंतर वृत्तपत्रांतून तशी बातमी प्रसिध्द झाली. त्यामुळे स्व.बाळासाहेब हे नामांतराचे विरोधक आहेत असे चित्र रंगविले गेले. स्व.बाळासाहेब हे नामांतराचे विरोधक होते असा समज आजही अनेकजण मनात बाळगून आहेत. मात्र त्या संदर्भात घडलेल्या एका घटनेचा मी एकमेव साक्षीदार आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेबांची मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत काय भूमिका होती यावर प्रकाश पडतो. त्यासाठी विद्यापीठाच्या नामांतराच्या दरम्यान घडलेली एक घटना इथे मुद्दाम नमूद करायला हवी असं मला वाटतं. त्यावेळी मी 'हिंदुस्थान समाचार' या वृत्तसंस्थेमध्ये वार्ताहर म्हणून काम करीत होतो. नामांतराच्या मागणीसाठी दलित पॅन्थर आणि डाव्या पक्षांनी संपूर्ण महाराष्ट्रातून औरंगाबादपर्यंत 'लॉन्ग मार्च' काढला होता. शांतारामबापू जोशी हे त्यावेळी औरंगाबाद येथे 'हिंदुस्थान समाचार'चे मराठवाडा विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम पहात होते. त्यांच्या सुचनेवरून मला आमच्या ऑफिसने रिपोर्टिंगसाठी औरंगाबादला पाठविलं होतं. तिथे नामांतराच्या प्रश्नावरून स्व. गोविंदभाई श्रॉफ, स्व.अनंतराव भालेराव यांच्याशी बऱ्याच मनमोकळ्या चर्चा करता आल्या. मुंबईला परत आल्यावर मा.बाळासाहेबांची भेट घेतली. बोलता बोलता स्व.गोविंदभाई आणि स्व.अनंत भालेराव यांच्याशी झालेल्या खाजगी चर्चांची माहिती मी बाळासाहेबांना दिली. योगायोगाने, या संदर्भात काही महिन्यांनी आणखी एक घटना घडली. विधानभवनातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बैठकीच्या निमित्ताने दिवंगत रा.सू.गवई यांची भेट झाली. गवईसाहेब त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. बोलता बोलता ते म्हणाले की, “मला बाळासाहेबांना भेटायचं आहे. पण ते भेटीसाठी वेळ देत नाहीत. तुझे त्यांचे चांगले आहे. तू आमच्या भेटीची वेळ ठरवतोस का?” मी ती जबाबदारी घेतली व दुसऱ्याच दिवशी थेट बाळासाहेबांशी संपर्क केला. त्यांनी गवईसाहेबांना मातोश्रीवर घेऊन यायला सांगितलं. गवईसाहेब आणि मी, गवईसाहेबांच्या लालदिव्याच्या गाडीतून ठरल्याप्रमाणे मातोश्री बंगल्यावर गेलो.
तेथे दोघांचे अनेक विषयांवर बोलणे झाले. नामांतराचा विषय जेव्हा उपस्थित झाला तेव्हा बाळासाहेब त्यांच्या विशिष्ट शैलीत तिखटपणे बोलले, गवईसाहेब मात्र खूप शांतपणे सारं काही ऐकून घेत होते. तरीही एकूण चर्चा ही खूप खेळीमेळीत सुरू होती. त्यावेळी बाळासाहेबांनी जे काही म्हटलं ते महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे.
बाळासाहेब म्हणाले, “मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास माझा बिलकुल विरोध नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतराबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. मराठवाडा या नावाला एक इतिहास आहे. निजामाविरुध्द जो लढा तेथील जनतेने दिला, तो मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणूनच इतिहासात ओळखला जातो. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबरीने गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, शंकरराव चव्हाण ही मंडळीसुध्दा सहभागी होती. मराठवाड्याला एक लढाऊ इतिहास आहे. हा लढाऊ इतिहास पुसला जाऊ नये असा माझा आग्रह आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावास मी विरोध करण्याचे कारणच नाही, पण मराठवाडा हे नाव कायम ठेवून विद्यापीठाचे नामांतर करणार असाल तर माझा त्या नामांतराला पूर्ण पाठींबा राहिल. त्यासाठी विद्यापीठाला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ असे नाव द्या आणि मराठवाड्याची अस्मिता कायम ठेवून नामांतर करा अशी माझी भूमिका आहे.” यावर “तुमचे काय म्हणणे आहे?” असा प्रश्नही त्यांनी गवईसाहेबांना केला. बाळासाहेबांची ही भूमिका गवईसाहेबांना आवडली व ते जबरदस्त खूष झाले.
सायंकाळी चार वाजता सुरू झालेली चर्चा सुमारे तीन-साडेतीन तास चालली. सायंकाळचे सात वाजून गेले होते. बाळासाहेबांनी चर्चा एकदम थांबविली. गवईसाहेबांना ते म्हणाले, “गवई माझी आता बिअर पिण्याची वेळ झाली आहे. थांबणार असाल तर, तुम्ही सांगाल तो ब्रँड देतो, नाही तर रजा घेऊ”. गवईसाहेब एवढेच म्हणाले, “मी थांबतो”. त्या सायंकाळी बाळासाहेबांबरोबर रंगलेल्या गप्पा आजही माझ्या स्मरणात आहेत!
*माधवराव भोसले*
माणूस शब्दाला किती पक्का असतो याचा बाळासाहेबांबद्दलचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. मुंबईतील काही पत्रकारांना त्याची अजूनही आठवण आहे. स्व.माधवराव भोसले ही व्यक्ती कामगार चळवळीतील अनेकांना माहित आहे. माधवराव हा आम्हा काही पत्रकारांचा चांगला मित्र होता. त्याने मुंबईतील खाजगी सुरक्षा रक्षकांना एकत्र आणून त्यांची युनियन बांधण्याचे काम सर्वप्रथम केलं. तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता. सहाजिकच त्याची युनियन त्याने इंटकला संलग्न केली होती. स्व.बॅ.अ.र.अंतुले मुख्यमंत्री असताना, त्यांनी माधवरावच्या मागणीनुसार खाजगी सुरक्षा रक्षकांसाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर स्वतंत्र मंडळ (बोर्ड) स्थापन केलं होतं. ते होण्यामागे आम्हा काही पत्रकारांचा महत्त्वाचा वाटा होता. समाजातील एका उपेक्षित घटकाला त्यामुळे दिलासा मिळणार होता. सुरक्षा रक्षकांसाठी स्वतंत्र बोर्ड निर्मितीची प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेनेचे भांडूप येथील नगरसेवक स्व.के.टी.थापा यांनी खाजगी सुरक्षा रक्षकांसाठी शिवसेनाप्रणीत युनियन काढण्याची घोषणा केली आणि बाळासाहेबांच्या हस्ते तिच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रमही जाहीर केला. के.टी.थापा यांच्या या निर्णयामुळे माधवराव भोसले याची पंचाईत झाली. युनियन फुटण्याचा धोका निर्माण झाला. तो टाळता यावा यासाठी त्यांनी आम्हा पत्रकारांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. हो, नाही करता स्व.राधाकृष्ण नार्वेकर, स्व.दिनकर रायकर, स्व.वसंत शिंदे या ज्येष्ठ पत्रकारांसमवेत आम्ही काहीजण बाळासाहेबांकडे गेलो आणि त्यांना माधवरावाने कशा परिस्थितीत युनियन काढली. ती फुटली तर कामगारांचे नुकसान कसे होईल आदी बाबी समजावून सांगितल्या. ते म्हणाले, ''युनियनचे उद्‌घाटन आजच आहे आणि मी थापाला, नक्की येईन असे कबूल केले आहे. त्यामुळे मी कार्यक्रमाला जाणार. तरीही तिथे गेल्यावर काय करायचे ते बघतो''. सायंकाळी बाळासाहेब ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाला गेले. आश्चर्य म्हणजे थापांच्या युनियनच्या जाहीर कार्यक्रमातच त्यांनी आणखी एका युनियनची सध्या तरी आवश्यकता नसल्याचे सांगून थापा यांना थोडी सबूरी दाखविण्याचा जाहीर आदेशच दिला. एका विरोधीपक्षाच्या छोट्या नेत्याची अडचण दूर करण्यासाठी स्वतःच्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्याला गप्प आणि त्याचबरोबर नाराज करण्याची हिंमत, किमया आणि मनाचा मोठेपणा बाळासाहेबांशिवाय कोणाकडेच नव्हता, हे आजही पत्रकार मित्र जाहीरपणे मान्य करतात. कालांतराने माधवरावचे निकटचे सहकारीच त्याच्या युनियनमधून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनाप्रणीत नवी युनियन स्थापन केली, ही बाब अलाहिदा!
स्व.बाळासाहेबांच्या स्वभाव वैशिष्ठ्यांवर अनेक अंगाने भाष्य करता येईल. मात्र आपल्या असामान्य वागण्याने सर्वसामान्य माणसाच्या हृदयसिंहासनावर आपले नाव कायमचं कोरणारा असा नेता पुन्हा होणे नाही, ही वेदना मनाला कायमची साथ देत राहिल.
https://www.blogger.com/u/1/blog/post/edit/5825210106006881686/5850060995947415183

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...