Saturday, 7 December 2024

आठवणींतली मराठी नाटके

'मराठी माणूस म्हणजे नाटकवेडा', असे कधीकाळी म्हणत असत. दोन मराठी माणसे एकत्र आली, तर एक तर ती नाटकतरी करतील, नाहीतर नाटकावर चर्चातरी करतील. कदाचित भारतातील इतर भाषिकही स्वतःबद्दल असे म्हणत असतील. बंगाली, कानडी लोकही नाटकवेडे असतात. पण आपण आपले आपल्याबद्दल बोलू. नाटकांवर अभ्यासपूर्ण लेखन झाले नाही असे नाही, पण खूपदा पडद्यामागच्या कलाकारांचे उल्लेख झाले नाहीत. शिवाय ते कलाकार निष्ठेने, जोवर झेपले तोवर काम करत राहिले आणि मग आपली भूमिका संपल्यागत एक्झिट घेते झाले. या आठवणींत, त्यांच्या नावांचा, निदान त्यांनी केलेल्या कामांचा तरी उल्लेख करायचा प्रयत्न करतो. मी म्हणजे कुणी अभ्यासक नव्हे, मी स्वत:ला रसिकही म्हणवून घेणार नाही. पण हो, मला नाटके बघायला खूप आवडतात.
मला स्वत:ला नाटकवेडा म्हणवून घ्यायला नक्कीच आवडेल. खूप बघितली, पण सध्या थोडी मरगळ आल्यासारखी वाटतेय नाटकांना. परदेशात असल्याने पेपरातल्या जाहिराती बघण्याचे सुख लाभत नाहीच, पण नियतकालिकांमधले नाटकांवरचे लेखही दुर्मिळ झालेत. आता आठवणींत रमण्याशिवाय पर्याय नाही. त्यांतल्याच काही वैयक्तिक आठवणी इथे लिहितोय.
 संगीत :आपल्याकडे तशी शुद्ध शास्त्रीय संगीताची परंपरा नाही. आपल्या लोकसंगीतात, लावणीत, भक्तिसंगीतात रागदारी संगीत नसते असे नाही; पण मांड, पिलू, कलिंगडा, पहाडी या रागांचे मूळ जसे सांगता येते,तसा एखादा राग आपल्या मातीतला, असे म्हणता येत नाही. भेंडीबाजार (बिहाइंड द बझार) असे एखादे घराणे सोडले, तर महाराष्ट्रातले एखादे घराणेही नाही. पण हे संगीत लोकप्रिय करण्यात संगीत नाटकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.
मला स्वत:ला या संगीताची गोडी लागली, ती कीर्ती शिलेदार यांच्यामुळे. मी आठ-दहा वर्षांचा असेन, त्यावेळी संगीत नाटके ऐन भरात नव्हती. एवढा वेळ नाटक बघणे, लोकाना गैरसोयीचे वाटू लागले होते. (जर सर्व पदे गायचे ठरवले, तर संगीत सौभद्रासारखे नाटक सहज ५ तास चालेल, वन्समोअर मिळाले तर आणखी वेळ लागेल.) त्यावेळी दादरच्या बालमोहन शाळेत स्वयंवर संगीत असा एक कार्यक्रम बाळ कुरतडकरांनी केला होता. यात त्यांनी नाटकाचे कथानक निवेदन केले होते, व त्यातली पदे कलाकारांनी वेषभूषा न करता सादर केली होती. त्यावेळी कीर्तीने सादर केलेले 'नरवर कृष्णासमान' आजही कानांत गुंजन करतंय. त्यात एक ओळ आहे, 'बहुत नृपती ते आले गेले'. या एकाच ओळीतून, काय काय नमुने आले होते, त्यांच्या खोड्या काय होत्या, ते सगळे रुक्मिणी सांगते. लक्षात घ्या, त्यावेळी नाटकाचे नेपथ्य नव्हते, रुक्मिणीचा भरजरी शालू नव्हता, तरीही हे सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. छोटागंधर्वांचे 'प्रिये पहा', 'तेचि पुरुष दैवाचे', कुमारांचे 'उठी उठी गोपाळा', बालगंधर्वांचे 'जोहार मायबाप जोहार', आशा खाडिलकरांचे, 'घाई नको बाई अशी', ज्योत्स्ना भोळ्यांचे, 'मी पुन्हा फिरेन वनांतरी' ही सगळी पदे डोळ्यांसमोर बरेच काही उभे करतात.
पं. जितेद्र अभिषेकी यांच्याबरोबरच अन्य थोर कलाकारांनीदेखील नाटकांना संगीत दिले होते. केशवराव भोळे (कुलवधू), वसंत देसाई (देव दीनाघरी धावला, प्रीतिसंगम), सी. रामचंद्र (वरून कीर्तन, आतून तमाशा), पं. भीमसेन जोशी (धन्य ते गायनी कळा) डॉ. वसंतराव देशपांडे (संगीत वरदान) जयमाला शिलेदार (मंदोदरी), पं. नीलकंठबुवा अभ्यंकर (स्वरसम्राज्ञी) यांनी संगीतदिग्दर्शन, तसेच सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, माणिक वर्मा, सुरेश वाडकर, सुलोचना चव्हाण आदी थोर गायक कलाकारांनी नाट्यगीतगायन केले आहे.
पण याबाबतीत आपण कमनशिबी आहोत. नाटकांत संगीत नसते असे नाही, पण तो पारंपरिक बाज हरवलाय आता. आणि या सर्व थोर मंडळींचे, आपण काहीच जतन करून ठेवले नाही. या थोर कलाकारांना प्रत्यक्ष भेटलेली माझी पिढी सरल्यावर आपल्या हाती काहीच उरणार नाही.
नेपथ्य व प्रकाशयोजना :मराठी नाटकांच्या नेपथ्यांतला 'दिवाणखाना' हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला! सहसा आपली नाटके या दिवाणखान्याबाहेर जात नाहीत. पण तरीही काही नाटकांची नेपथ्ये आजही मला लख्ख आठवताहेत.
जयवंत दळवी यांच्या 'अंधाराच्या पारंब्या'या कादंबरीवर आधारित 'बॅरिस्टर' नाटकाचे नेपथ्य असेच देखणे होते. कोकणातील घराची पडवी, दोन कोरीव खांब, अंगण, कुंपण, भाडेकरूंची खोली, झुलती आरामखुर्ची, पितळी कर्ण्याचा ग्रामोफोन, ही सगळीच त्या नाटकातली पात्रे झाली होती. (मूळ कलाकार विक्रम गोखले, विजया मेहता, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, चंद्रकांत गोखले. नेपथ्य : रघुवीर तळाशीलकर)
त्यांच्याच 'महानंदा' कादबंरीवर आधारित असलेल्या 'गुंतता ह्रदय हे' या नाटकाचे नेपथ्यही असेच देखणे होते. याचा रंगमंच फिरता होता. रंगमंचावर दोन मोठी चक्रे असत आणि त्यावर चार स्थळे आलटून पालटून दाखवली जात असत. या नेपथ्यात गोव्यातील घरे, पडव्या, रवळनाथाचे देऊळ वगैरे हुबेहूब उभे केले होते. (मूळ कलाकार: आशालता. (काही प्रयोगात आशू/पद्मा चव्हाण), आशा काळे, राजा मयेकर, मालती पेंढारकर आणि डॉ. काशिनाथ घाणेकर वगैरे.)
विनय आपटे, सुकन्या कुलकर्णी, लालन सारंग यांच्या 'जन्मगाठ', उषाकिरण (पुढे आशालता) व डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या 'गारंबीचा बापू', लालन सारंगच्या 'रथचक्र'मध्येही असे कोकणातले घर दिसले. उषा कलबाग (नाडकर्णी), बाळ धुरी यांच्या पहिल्या 'गुरू' नाटकात, रेल्वेची वॅगनदाखवत असत. आशा काळे व चित्तरंजन कोल्हटकरांच्या 'विषवृक्षाची छाया' नाटकात पूर आलेला दाखवत असत. महेश एलकुंचलवारांच्या 'वाडा चिरेबंदी'चे नेपथ्यही असेच देखणे होते. (याचे पुढचे दोन भाग एकत्र करून 'त्रिनाट्यधारा' असा एक दीर्घ प्रयोग झाला होता.) मोहन वाघांच्या बहुतेक नाटकांची नेपथ्ये, सुंदर रंगसंगतीची व देखणी होती. (त्यांचीच असायची ती.) राजन भिश्यांसारखा एखादा कलाकार नेपथ्य आणि भूमिका या दोन्ही आघाड्या सांभाळत असतो.
राकेश सारंग याने प्रकाशयोजना केलेल्या 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री' या नाटकाची प्रकाशयोजना फारच देखणी होती. या प्रकाशयोजनेमुळे वेषभूषाही वेगळीच दिसत असे आणि नाटकातल्या स्वप्नील वातावरणाला उठाव येत असे. (याच कथानकावर प्रशांत दामले व सतीश तारे यांचे 'जादू तेरी नजर' आले. ही दोन्ही नाटके शेक्स्पियरच्या नाटकावर आधारित होती.)भक्ती बर्वेच्या 'रंग माझा वेगळा'मध्ये प्रकाशयोजनेत वैशिष्ट्यपूर्ण रंग वापरले जात असत.
'ध्यानीमनी', ' सखाराम बाइंडर', 'नातीगोती' आदी नाटकांची नेपथ्ये अत्यंत वास्तवपूर्ण होती. पण तरीही परदेशांतील नाटकांची नेपथ्ये बघता मलातरी या बाबतीत मराठी नाटक मागे आहे असे वाटते. आपल्या नाट्यगृहांचे मर्यादित अवकाश याला जबाबदार असावे का ? नाट्यगृहाच्या या मर्यादा उल्लंघणारे एखादेच 'जाणता राजा' यावे, हे आपले कमनशीब.
रंगभूषा व वेशभूषा :नाटकातील पात्रांना त्या प्रखर प्रकाशातही चेहर्‍यावरचा अभिनय दिसावा म्हणून थोडासा भडक मेकअप करावा लागतो. पण तरीही लांबून नैसर्गिक वाटणारा मेकअप अगदी जवळून बघितल्यास खूपच वेगळा दिसतो. काही नाटकांतला मेकअप असाच लक्षात राहिलाय.
प्रभाकर पणशीकरांच्या 'तो मी नव्हेच'मधला त्यांचा मेकअप खास असे. अनेक रूपे अगदी बेमालूम वठत असत. विक्रम गोखले व सुप्रिया यांच्या 'आयविटनेस' या मूळ कलाकृतीवर आधारित नाटकातील एका प्रसंगातला सुप्रियाचा मेकअप प्रेक्षकांनादेखील चकवत असे. (तिच्या अभिनयाचादेखील यात मोठा वाटा होताच.) विजय कदम आणि रसिका जोशी यांच्या 'हलकं फुलकं' या जातीपातींवर आधारित नाटकात दोघे अनेक भूमिका करत असत. त्यात प्रत्येक पात्राचा, खास करून रसिकाचा मेकअप छानच होता. दिलीप प्रभावळकरांच्या 'हसवाहसवी'मधला मेकअपदेखील असाच नावीन्यपूर्ण होता. (त्यांच्या एका बालनाट्यातला चेटकिणीचा मेकअपदेखील असाच मस्त होता. त्या मेकअपमध्येच त्यांनी पुण्यात स्कूटरवरून प्रवास केला होता.) अमिता खोपकरच्या 'दीपस्तंभ'मधला तिचा जळलेल्या चेहर्‍याचा मेकअप अंगावर येत असे. (याच कथानकावर रेखाचा '
 खून भरी मांग' हा हिंदी चित्रपट आधारित होता.) 'रथचक्र'मध्ये रोहिणी हत्तंगडी दोन भूमिका करत असे. एक थोरली जाऊ आणि दुसरी कृष्णाबाई. दोन्ही पात्रांचा मेकअप इतका बेमालूम असे, की या दोन भूमिकांत एकच कलाकार आहे हे पटू नये. 'जेव्हा यमाला डुलकी लागते' या सुधा करमरकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नाटकात सुधा करमरकर दोन भूमिका करत असत, त्यांचा मेकअपही असाच मस्त असे. 'चार दिवस प्रेमाचे'मधला सविता प्रभुणेचा अनेक भूमिकांमधला मेकअपही खास आहे. पण यामागचे कलाकार फारसे प्रकाशात आले नाहीत.
परदेशांतील सोडाच, पण आपल्या देशातील इतर भाषांतल्या नाटकांतील कपडेपट वा शास्त्रीय नृत्यातील कपडेपट बघता, मराठी रंगभूमीवर खास प्रयोग झालेले दिसत नाहीत. गुजरात भागातील रुक्मिणी व सुभद्रेलादेखील आपण आपली नऊवारी साडीच देत होतो. पारंपरिक संगीत नाटकांपैकी 'मंदोदरी' नाटकातील दीप्ती भोगले व कीर्ती शिलेदार यांचा कपडेपट देखणा होता. 'जाणता राजा'तला कपडेपट तर श्रीमंत आहे. या नाटकात एका प्रसंगात पन्नासांहून अधिक स्त्री कलाकार रंगमंचावर आहेत आणि त्यातल्या प्रत्येकीचे लुगडे, वेगळ्या रंगाचे आहे.
नृत्ये :मराठीत नृत्यनाट्य हा प्रकार फारसा चालला नाही. 'दुर्गा झाली गौरी' हे गाजलेले नृत्यनाट्य. सुकन्या कुलकर्णी, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे, मुळगुंद भगिनी या सगळ्या बालकलाकार म्हणून या नाटकातून पुढे आल्या. (नृत्यदिग्दर्शक पार्वतीकुमार). तरी मराठी नाटकांत प्रसंगानुरूप नृत्य होतेच. 'घाशीराम कोतवाल'मधल्या नृत्यरचना सुंदरच होत्या. 'लोकमहाभारत अर्थात जांभूळआख्यान'मधले शाहीर विठ्ठल उमप यांचे नृत्य तर वेगळ्याच जगात नेत असे. तसे प्रसंगानुसार उत्स्फूर्त नृत्य 'गमभन' व 'मोरूची मावशी' नाटकांतही होते. (तसे अलीकडच्या अनेक नाटकांत प्रसंगानुसार नृत्य असतेच.)
नृत्यसमशेर माया जाधव यांनी खास नृत्यासाठी काही नाटके पुन्हा आणली होती. 'होनाजी बाळा', 'मंदारमाला', 'बाजीराव मस्तानी' ही त्यांपैकी काही. यातली नृत्ये त्यांनी स्वत:च दिग्दर्शित केली होती. (मला नीट आठवत असेल, तर 'रविराज तू, मी रोहिणी' असे नाटक बाजीराव-मस्तानीच्या कथेवर आले होते. त्यात मस्तानीची नृत्यमय भूमिका सुहास जोशी करत असत.)लोकनाट्यात लावणी नृत्यांगना असतील, तर प्रश्नच नाही, पण 'वर्‍हाडी माणसं' नावाच्या नाटकात, मी स्वत: लीला गांधी यांचे नृत्य बघितले आहे. त्यांच्या चापल्याने डोळ्यांचे पारणे फिटले होते. मधू कांबीकरला 'पुत्रकामेष्टी', 'चंद्र जिथे उगवत नाही' अशा नाटकांत नृत्यविरहित भूमिका मिळाल्या होत्या. (पुढे तिने पेशवेकालीन लावण्या सादर करणारा कार्यक्रम केला होता.)'ती फुलराणी'मधले 'शिकवीन चांगलाच धडा' हे स्वगतही भक्ती बर्वे नृत्यमय हालचालींत सादर करत असत. दत्ता भटांच्या 'पती गेले गं काठेवाडी'मध्येही गुजराती पद्धतीचे नाच होते.ज्योती सुभाष यांच्या 'मुलगी झाली हो' या पथनाट्यातही पारंपरिक नाच होते. (याच नावाचा पुढे सिनेमा आला होता, त्यात डॉ. श्रीराम लागू व सुहास जोशी होते)
विश्वनाथ बागुल, ज्योत्स्ना मोहिले आणि उदयराज गोडबोले यांचे 'प्रीतिसंगम' ज्या संत सखूच्या जीवनावर आधारित होते, त्याच कथानकावर वैजयंतीमाला, 'संत सखू' असे नृत्यनाट्य सादरकरत असे. (पण मूळ नाटकात माझ्या आठवणीप्रमाणे नृत्य नव्हते. हेच नाटक पुढे प्रशांत दामले, क्षमा वैद्य व मोहन जोशी यांनीही केले होते.)'महाराष्ट्राची लोकधारा' आणि सध्याचे 'मराठी बाणा' हे कार्यक्रम नृत्यमय असले, तरी ती नाटके नाहीत.
चारुशीला साबळे, मधू कांबीकर, अर्चना जोगळेकर, सुकन्या कुलकर्णी, प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले (कधीकाळी), सुप्रिया पिळगांवकर असे अनेक नृत्यनिपुण कलाकार असले, तरी मराठी रंगभूमीवर जितके 
 संगीत फुलले, तितके नृत्य नाही.
रूपांतरित / भाषांतरित नाटके :पाश्चात्य रंगभूमीवरील नाटके, मराठीत अनेक आली. 'ऑथेल्लो'चे त्याच नावाने भाषांतर झाले होते. पण 'झुंजारराव' या नावाने रूपांतरही झाले होते. इतकेच काय, गडकर्‍यांच्या 'एकच प्याला' नाटकावरही त्याचा प्रभाव आहे. 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री', 'जादू तेरी नजर', 'गगनभेदी' हीसुद्धा शेक्सपियरच्या नाटकांवर आधारित नाटके.'लव्ह बर्डस्' हे गिरीश ओक आणि संजय मोने यांचे नाटकही अशाच एका परकीय कल्पनेवर. (याच कथानकावर, प्रियांका चोप्रा आणि अर्जुन रामपाल यांचा एक चित्रपट आला होता.)
सर्व महाराष्ट्राचे लाडके पुलं यांनी अनेक रूपातंरे व भाषांतरे केली. 'ती फुलराणी' (पिग्मॅलियन), 'एक झुंज वार्‍याशी' (द लास्ट अपॉइंटमेंट), 'तीन पैशाचा तमाशा' (थ्री पेनी ऑपेरा) ही त्यांची काही रूपांतरितनाटके. पण त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र कथानकांवर नाटके लिहायला हवी होती. अशीच तक्रार मला शिरवाडकरांबद्दलसुद्धा आहे. त्यानी 'ययाति', 'वीज म्हणाली धरतीला' अशी नाटके लिहिली, पण ती परिचित कथानकांवर होती. 'नटसम्राट'वरही ग्रीक शोकांतिकेची दाट छाया आहे.
'अजब न्याय वर्तुळाचा', 'वेटिंग फॉर गोदो' ही आणखी काही उल्लेखनीय रूपांतरे. मराठीतून अनेक नाटके इतर भारतीय भाषांत गेली, पण बाहेरून फारशी नाटके आली नाहीत. 'लफडासदन', 'हयवदन', '
 नागमंडल' ही काही तुरळक उदाहरणे.
मराठी वा हिंदी चित्रपट आणि मराठी नाटके अशीही देवाणघेवाण झाली. 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' (जयश्री गडकर) हा चित्रपट आणि 'कुंकू जपून ठेव' हे नाटक. 'अश्रूंची झाली फुले' हे नाटक ( प्रभाकर पणशीकर, सुधा करमरकर आणि डॉ. काशिनाथ घाणेकर) आणि 'आँसू बन गये फूल' हा चित्रपट (अशोककुमार, माला सिन्हा, प्राण, हेलन), 'लेक चालली सासरला' (अलका कुबल) हा चित्रपट आणि 'पर्याय' हे नाटक, 'पुरुष' या नावाचे नाटक (रिमा, नाना पाटेकर) व चित्रपट (अश्विनी भावे, ओम पुरी), 'गुंतता ह्रदय हे' हे नाटक व 'महानंदा' हा चित्रपट. (मराठीत विक्रम गोखले, फैयाज, हिंदीत फारूख शेख व मौशुमी चटर्जी), 'बॅरिस्टर' हे नाटक व 'रावसाहेब' हा चित्रपट (अनुपम खेर, तन्वी आझमी, विजया मेहता), 'वेट अंटिल डार्क' या अप्रतिम चित्रपटावरून मराठीत 'अंधार माझा सोबती' (फैयाज आणि डॉ. काशिनाथ घाणेकर) असे नाटक आले होते, 'श्यामची आई'वर आधारित नाटकही (सुमति गुप्ते) आले होते.
'सामना' या गाजलेल्या चित्रपटाचा उत्तरार्ध म्हणून, 'दुसरा सामना' हे नाटक आले होते. पण असे दुसरे उदाहरण मला आठवत नाही. 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचा पुढचा भाग म्हणून 'घरात फुलला पारिजात' असे एक नाटक आल्याचे आठवतेय. तसेच 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचे पुढचे दोन भाग 'विच्छा तुझी पुरी करतो' आणि 'विच्छा माझी पुरी झाली' या नावांनी आल्याचे आठवतात.
चरित्र नाटके व ऐतिहासिक नाटके :अगदी ताज्या इतिहासातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित नाटके मराठीत येऊन गेली. 'हिमालयाची सावली' (डॉ. श्रीराम लागू, शांता जोग, लालन सारंग) हे महर्षी कर्व्यांच्या जीवनावर आधारित होते. 'घर तिघांचं हवं' (रिमा, दिलीप प्रभावळकर) हे शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडकांच्या जीवनावर आधारित होते. 'टिळक आणि आगरकर' हे त्या दोघांमधील वादावर होते, तर 'गांधी विरुद्ध गांधी' हे महात्मा गांधी व त्यांचा पुत्र हरिदास यांच्यामधील संघर्षावर होते. आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधींच्या जीवनावर काही नाटके आली. 'माताजी', 'हुकुमाची राणी आणि वटहुकुमाचे गुलाम' अशी काही नावे होती. 'महात्मा' हे महात्मा फुल्यांच्या जीवनावर होते. 'रायगडाला जेव्हा जाग येते' (शिवाजी महाराज), 'छावा' (संभाजी महाराज), 'वीज म्हणाली धरतीला' (झाशीची राणी लक्ष्मीबाई), 'स्वामी', 'ही श्रीची इच्छा' अशी आणखी काही नावे. मराठीतील बहुतेक संतांच्या जीवनावर नाटके आलीच आहेत. तसेच 'तो राजहंस एक' हे बालगंधर्वांच्या आयुष्यावर, तर 'तू तर चाफेकळी' हे बालकवींच्या जीवनावर होते. 'मी नथुराम गोडसे बोलतोय', ' डॉक्टर लागू' ( यातील लागू हा शब्द पुढे काढून टाकण्यात आला), 'तो मी नव्हेच' ही काही गाजलेल्या खटल्यांवर आधारित नाटके.

पण याबाबतीत कायम हातचे राखून ठेवण्यात आले. मराठीत वादग्रस्त चरित्रे अनेक आहेत, त्यांवर नाटके होणे शक्य आहे.
कादंबर्‍यांवर आधारित नाटके :जयवंत दळव्यांच्या अनेक कादंबर्‍यांवर नाटके आली. त्यांचे उल्लेख वर आलेच आहेत. पण माझ्या इतर काही आवडत्या पुस्तकांवरही नाटके आली. विश्वास पाटील यांचे 'पानिपत' हे पुस्तक तर माझे खूपच आवडते. या पुस्तकाची व्याप्ती खूपच मोठी आहे. पाटलांनी यासाठी खूप संशोधन केले आहे. यातल्या व्यक्तिरेखा, स्थळे, कालपट यांचा विचार करता यावर नाटक करता येईल असे कुणालाही वाटले नसते. पण ते आले 'रणांगण' या नावाने. हे सगळे घटक नाटकात उतरणे शक्यच नव्हते, पण त्या मर्यादेत जे काही सादर झाले, त्याला तोड नव्हती. याबाबतीत दिग्दर्शक वामन केंद्रे आणि विश्वास पाटील या दोघांनी उत्तम कामगिरी केली होती. पाटलांनी पुन्हा नाटकासाठी म्हणून नवे संशोधन केले व संहितेत काही बदल केले. उदाहरणार्थ कांदबरीत नसलेले एक पात्र - अब्दालीची बेगम - नाटकात होते. (पण या नाटकाला प्रेक्षक लाभले नाहीत.)
मिलिंद बोकील यांचे 'शाळा' हे असेच एक खिळवून ठेवणारे पुस्तक. यावरही 'गमभन' नावाचे छान नाटक आले होते. यातही पुस्तकातले बरेच घटक रंगमंचावर आणले होते (खरे तर या पुस्तकावर छान मालिका होऊ शकेल).
आधीच वाचकप्रिय झालेल्या पुस्तकांवर नाटक काढणे, हे जरा अवघडच काम आहे. पण तरीही नाटके काढावीत, अशी अनेक पुस्तके मराठीत आहेत.
वादग्रस्त नाटके :प्रसिद्धीसाठी मुद्दाम वाद निर्माण करण्याची चैन मराठी नाटकांना परवडणारी नाही. पण अनेक नाटके समाजाच्या रोषाला कारण ठरली. '
 सखाराम बाईंडर'चा वाद तर आपल्याला माहीत आहेच. पण असाच वाद 'घाशीराम कोतवाल'वरूनही झाला होता. पुण्यातील ब्राह्मण आणि नाना फडणवीस यांचे विकृत चित्रण केल्याचे आरोप झाले होते. 'मी नथुराम गोडसे' या नाटकावरून वाद झाला होता. 'माकडाच्या हाती शॅंपेन' या नाटकाला आपले मूळ नाव बदलावे लागले होते. 'यदाकदाचित'ला देवदेवतांचे वादग्रस्त चित्रण झाल्याचे आरोप झेलावे लागले होते. आता नवल वाटेल, पण 'कुलवधू' नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी पाचवारी साडी नेसण्यावरून वाद झाले होते!
यांमध्ये समाजाच्या मानसिकतेपेक्षा राजकीय कारणे जास्त प्रभावी होती. आता 
 कदाचित आपण जास्त उदार झालो असू. असे अनेक विषय मराठी कथाकादंबर्‍यांमध्ये आले असले, तरी रंगमंचावरही यायला हवेत.
सामाजिक प्रश्न :नाटक हे काही सामाजिक समस्या सोडवणारे माध्यम नव्हे. पण त्याचे चित्रण अनेक नाटकांतून आले. त्यांनी समाजावर काही परिणाम झाला का, हा भाग वेगळा. दारूच्या दुष्परिणामांवर 'एकच प्याला' हे नाटक अनेक वर्षांपूर्वी आले. हे नाटक बघून किती जणांनी दारू सोडली, हा प्रश्न अनेकवेळा कुत्सितपणे विचारला गेला. या नाटकातले संगीत जास्त परिणामकारक ठरले. (पुढे डॉ. श्रीराम लागूंनी या नाटकातले संगीत वगळून काही प्रयोग केले. त्यात ते, सुहास जोशी, रोहिणी हत्तंगडी, आणि सुहास भालेकर भूमिका करत असत, पण ते नाटक अजिबात चालले नाही.) आतातर ही समस्या समस्याच नसल्याप्रमाणे अनेक नाटकांत मद्यपानाचा प्रसंग असतो.
दळव्यांनी हुंडाबळीवर 'पर्याय' व बलात्कारित स्त्रीच्या समस्येवर 'पुरुष' हे नाटक लिहिले. अनेकांना त्यांनी दिलेले तोडगे पटले नाहीत. प्रेक्षकांनीदेखील ही नाटके गंभीरपणे घेतली नाहीत. ('पुरुष' नाटकाचे प्रयोगतर 'प्रेक्षक चुकीच्या जागी दाद देतात' या कारणावरून नाना पाटेकरनेच थांबवले.)
'मुलगी झाली हो' हे नाटक मुलींना दिल्या जाणार्‍या वागणुकीवर होते, तर 'पुत्रकामेष्टी' (प्रभाकर पणशीकर, सुधा करमरकर, मधू कांबीकर) हे नाटक 'सरोगेट मदर'च्या समस्येवर होते. 'हे बंध रेशमाचे' धार्मिक तेढीवर होते. 'झुलवा' जोगतिणींच्या समस्येवर होते. 'अधांतर' गिरणी कामगारांच्या समस्येवर होते. 'कमला' पण स्त्रियांच्या शोषणावर होते. 'श्री' हे नाटक पैशाच्या हव्यासावर होते. 'संगीत शारदा' जरठ-कुमारी विवाहाच्या समस्येवर होते. मीना नाईकचे 'वाटेवरती काचा गं' हे लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांवर होते. पण पूर्ण समाजावर परिणाम करणारे असे नाटक नाहीच आठवत.
लोकनाट्ये :लोकनाट्यं म्हणजे रसरसता नाट्यानुभव. त्यातली उत्स्फूर्तता काय वर्णावी ? पूर्वी मेळ्यांमधून अशी नाटके होत असत. शाहीर साबळे यांनी अशी अनेक नाटके गाजवली. 'म्युनिसिपालटी', 'आंधळं दळतंय' ही त्यांची गाजलेली नाटके. शाहीर दादा कोंडके आणि वसंत सबनीस यांनी 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य तुफान गाजवले. 'कथा अकलेच्या कांद्याची' हे निळू फुल्यांनी गाजवलेले नाटक. तमाशा म्हणजेच वगनाट्यंही खूप गाजत असत, पण त्यांचा प्रेक्षकवर्ग बहुधा कामगारवर्गच असे. या नाटकांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम, आय.एन.टी. करत असते. 'जांभूळ आख्यान'चा उल्लेख वर आलाच आहे. या संस्थेनेच 'खंडोबाचे लगीन' नावाचे नाटक आणले होते. त्यात शिवाजी साटम, रोहिणी हत्तंगडी व जुईली देऊस्कर भूमिका करत असत. पण याबाबतीत अजूनही काम व्हायला हवे. अजून असे बरेच नाट्यप्रकार व कलाकार उजेडात यायला हवेत.
महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. त्यांची झलक पुलंनी 'ती फुलराणी', 'वार्‍यावरची वरात' अशा काही नाट्याविष्कारांत दाखवली होतीच. इतर नाटकांतही पात्रानुसार या भाषा आल्याच, पण मच्छिंद्र कांबळी यांच्या 'वस्त्रहरण'ने इतिहास घडवला. (हे नाटक संक्षिप्त स्वरूपात आधी दूरदर्शनवर सादर झाले होते.) मालवणी भाषेला (त्यातला शिव्यांसकट) त्यांनी सगळ्यांना स्वीकारायला लावले. पण तसे यश त्यांच्या पुढील नाटकांना मिळाले नाही. तसेच काही इतर बोलीभाषाही (आगरी वगैरे) काही नाटकांतून आल्या. पुढे हाही प्रवाह आटलाच.
प्रायोगिक नाटके :खरेतर नाटकाचे प्रत्येक सादरीकरण हा 'प्रयोगच' असतो. पण तरीही एकेकाळी प्रायोगिक चळवळ फार जोरात होती. तेच तेच बेगडी विषय न हाताळता नवनवे विषय या नाटकांत आले. प्रायोगिक आणि व्यावसायिक, अशा दोन फळ्याच झाल्या होत्या. दादरच्या छबिलदास शाळेत या नाटकांचे प्रयोग होत. अमोल पालेकर, चित्रा पालेकर, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे इत्यादी मंडळी या चळवळीत होती. पुढे व्यावसायिक रंगभूमीवर आलेले अनेक कलाकार इथे घडले होते. या नाटकांना नेपथ्य, पडदे यांची गरजच वाटत नसे. अभिनय मात्र खणखणीत असे. पण पुढे अचानकपणे या शाळेने हा रंगमंच उपलब्ध करून द्यायला नकार दिला. मग काही दिवस माटुंग्याचा कर्नाटक हॉल, तिथलेच दादर माटुंगा कल्चरल सेंटर, तसेच नरिमन पॉईंटवरचे नॅशनल थिएटर या ठिकाणी असे प्रयोग होत राहिले. 'जुलूस' ते 'झुलवा' असा प्रवास मी बघितला. या नाटकांनी अनेक नव्या शक्यता दाखवून दिल्या. एकेकाळी या दोन नाट्यप्रवाहांत बराच दुरावा होता. आता तो तितकासा नाही. अजूनही ही चळवळ 'सुदर्शन'सारख्या रूपात जिवंत आहे हे आपले भाग्य.
बालनाट्ये :बालकांसाठी नाट्यचळवळ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुधा करमरकर, वंदना विटणकर, रत्नाकर मतकरी यांनी चालवली. 'परिकथेतील राजकुमार', 'हिमगौरी आणि सात बुटके', 'हं हं आणि हं हं हं ', 'अप्पू अस्वल्या करू गुदगुल्या ' अशी काही नाटके बघून मी लहानपणी प्रभावित झालो होतो. अजूनही शाळांना सुट्ट्या लागल्या, की अशा नाटकांच्या जाहिराती दिसतात. पण त्यांतले विषय मात्र तेच तेच वाटतात. लहान मुलांना आताशा परिकथेत रस असेल असे वाटत नाही. त्यांना जवळचे वाटतील, असे काही विषय आता येताहेत. पण ही रंगभूमी आपण कधीच गांभीर्याने घेतली नाही असे वाटते.
विनोदी नाटके :आत्माराम भेंडे, बबन प्रभू, मनोरमा वागळे यांनी काही फार्स खूपच गाजवले होते. 'झोपी गेलेला जागा झाला', ' दिनूच्या सासूबाई राधाबाई' ही नाटके खूप गाजली. दिलीप प्रभावळकर, भक्ती बर्वे यांनीदेखील काही छान विनोदी नाटके केली ('पळा पळा कोण पुढे पळे तो'). भावना व सुधा करमरकर ('हा तेरावा') विजय कदम, लक्ष्मीकांत बेर्डे ('टूरटूर'), किशोर प्रधान, शोभा प्रधान ('काका किशाचा') अशी अनेक विनोदी नाटके आठवताहेत.
प्रशांत दामले तर अशा नाटकांचा बादशहाच आहे. ( उदा. 'बे दुणे चार', 'गेला माधव कुणीकडे', आणि अशी अनेक). त्याने रंगभूमीशी निष्ठावान राहून अनेक विक्रम केले, तसेच स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला. अत्र्यांची अनेक नाटके ('मोरूची मावशी', 'ब्रह्मचारी') 'सुयोग'ने परत रंगमंचावर आणली. या सगळ्या नाटकांतील विनोद निखळ होता, दर्जेदार होता.
पुढे विनोदी नाटकांची लाटच आली. यातला विनोद तर सुमार होताच, शिवाय या नाटकांचे निर्मातेदेखील व्यावसायिक नव्हते. या नाटकांमुळे प्रेक्षक खरंतर दुरावलाच. मात्र या लाटेनंतरही 'लग्नकल्लोळ', 'मुक्काम पोष्ट बोंबिलवाडी', 'यदाकदाचित' अशी दर्जेदार विनोदी नाटके आली.
लाटा :जशी विनोदी नाटकांची लाट आली होती, तशीच एकेकाळी, हिट आणि हॉट नाटकांची लाट आली होती. आशू, मंदा देसाई अशी काही ठराविक नावे या नाटकांशी निगडीत होती. वर्तमानपत्रांतील या नाटकांच्या जाहिरातीदेखील इतक्या घाणेरड्या असायच्या, की मराठमोळ्या घरांत पेपर वाचायची चोरी झाली होती. ('घटकंचुकी', 'आज धंदा बंद आहे' अशी नावे असायची). ही नाटके मराठी रंगभूमी गिळंकृत करणार की काय, अशी भीती त्यावेळी वाटत असे. पुढे बर्‍याच वर्षांनी मी आशूच्या एका मुलाखतीत वाचले होते, की तिच्या सोज्ज्वळ नाटकांना प्रेक्षक न लाभल्याने, ती या नाटकांकडे वळली होती.
पुढे समीक्षकांनी या नाटकांवर बहिष्कार घातला, तशी हळूहळू ही लाट ओसरली. पुढे बोल्ड विषय नाटकांत आले नाहीत असे नाही, पण त्यामागे असा उथळ हेतू नव्हता.
नाटकांच्या जाहिराती :नाटके बघायला मिळाली नाहीत, तरी नाटकांच्या जाहिराती मात्र आवर्जून वाचल्या जातात. आता-आतापर्यंत वृत्तपत्रे ही जाहिरातींची मुख्य साधने होती. या नाटकांच्या जाहिरातींत सुलेखनाला खूपच वाव असे. नाटकाचा आशय दाखवणारी ही अक्षरे खूपच देखणी असत. त्यांबरोबर येणारे फोटो, हेही एक आकर्षण असे.
अभिनेत्यांचे त्या-त्या नाटकाच्या वेषभूषेमधले फोटो एका वेगळ्याच मूडमधे नेत असत. 'काचेचा चंद्र' हे नाटक आधी नीट चालले नव्हते. पण जाहिरातीत एकदम खांद्यावर भावनाला घेतलेल्या डॉ. श्रीराम लागूंचा फोटो यायला लागला आणि ते नाटक तुफान चालू लागले. पूर्वी चित्रपटातले कलाकार नाटकात दिसले की प्रेक्षक आकृष्ट होत असत. अशा कलाकारांच्या नावांमागे 'सिनेस्टार' असे बिरूद लावलेले असे (उदा. रमेश देव आणि सीमा देव). वंदना गुप्ते मात्र अशा बिरुदाच्या विरोधात असे. 'बालगंधर्व' या नारायणराव राजहंस यांच्या पदवीसारखीच अनेक जणांना पदवी असे. '
 संगीत कोहिनूर' पंडितराव नगरकर, 'नृत्यसमशेर' माया जाधव, 'गानकोकिळा' कान्होपात्रा किणीकर, 'छोटा गडकरी' बाळ कोल्हटकर, 'विनोदाचा बादशहा' बबन प्रभू अशा काही पदव्या होत्या.
आजकाल नाटकांच्या तिकिटांचे दर सहसा जाहिरातींत दिसत नाहीत, पण पूर्वी (म्हणजे षण्मुखानंद हॉलला आग लागण्यापूर्वी) नाटकांचे खास 'जनता शो' होत. त्यांचे दर अक्षरश: ३, २ व १ रुपया असे असत. (त्या हॉलला दोन बाल्कन्या होत्या) आणि त्याची जाहिरात झाल्याझाल्या ती नाटके हाऊसफुल होत असत.
'राहिले दूर घर माझे' आणि 'महानंदा' या फारशा न गाजलेल्या दोन नाटकांच्या जाहिरातींत अप्रतिम रेखाटने होती. (या रेखाटनांवरून मी रांगोळ्या काढल्या होत्या)
नाटकांच्या दौर्‍यांच्या तारखा व ठिकाणे अनेकवेळा जाहिरातींत असत. 'सूर्याची पिल्ले' नाटकाच्या जाहिरातीत कलाकारांची फक्त आडनावे असत. (वाटवे, प्रभावळकर, गोखले अशी). 'संशयकल्लोळ' नाटकात एक जलशाचा प्रवेश आहे. त्या प्रवेशासाठी शोभा गुर्टू, प्रभाकर कारेकर असे खास कलाकार येत असत आणि जाहिरातीत त्याचा उल्लेख असेच. (अशाच 'पाहुणी कलाकार' म्हणून जयमाला शिलेदार 'स्वरसम्राज्ञी'मध्ये दिसत असत.)
काढेन तितक्या आठवणी थोड्याच. आता परत दर्जेदार नाटके यायला लागली आहेत. रटाळ मालिकांना जसे प्रेक्षक विटले आहेत, तसेच कलाकारही विटोत, आणि परत एकदा मराठी रंगभूमी झळाळून उठो.

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...