संघ आणि मातृशक्ती हा विषय लिहिताना संघानं प्रारंभिक काळापासून स्त्री-पुरुष समान आदरतेच्या जाणिवेतून स्त्रियांच्या उन्नतीसाठी स्त्रियांची शक्ती, स्त्रियांच्या तसेच सर्व समाजाच्या उपयोगात यावी यादृष्टीने फार महत्त्वाची भूमिका बजावलीय. स्त्रियांच्या प्रगतीत संघाचं भरीव योगदान आहे असं शीर्षक अनेकांना दचकायला लावेल हे खरं. तथापि वास्तविकता मात्र अगदी तशीच आहे. संघाच्या वर्तनावर आणि इतिहासावर नजर टाकली असता संघाच्या वैचारिक आणि व्यावहारिक भूमिकेची तपासणी केली असता ‘मागासलेले’, ‘स्त्रियांना घरात डांबून ठेवणारे’, ‘बायकांवर मातृत्वाचं ओझं लादणारे’ यांसारखी विशेषणे किती अर्थहीन, तकलादू, पूर्वग्रहदूषित आहेत याची खात्रीच वाटू लागते.
गोळवलकर गुरुजी म्हणतात, ‘प्रत्येक हिंदू बालकाच्या आणि बालिकेच्या मनावर मातृभक्तीचं, देशभक्तीचं आणि देवभक्तीचं संस्कार करण्याची पवित्र जबाबदारी मातांची आहे. मातांनी आपल्या मुलांवर असे उदात्त आणि पुरुषार्थाचे संस्कार केले, तरच भावी पिढी आपल्या देशासमोर उभ्या असलेल्या विविध आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊ शकेल. समाजातल्या गरजू भगिनींची सेवा करण्याची जबाबदारीही आपल्या मातांवर आहे. आपल्यापैकी बहुसंख्य मातांना दूरदूरच्या ठिकाणी जाऊन तिथल्या आपद्ग्रस्त निराधार भगिनींची सेवा करणं शक्य होणार नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की त्यांनी सदैव घरीच बसून राहावं. भोवतालच्या वस्तीत राहणाऱ्या भगिनींशी संपर्क प्रस्थापित करून त्यांच्यासाठी खूप काही करता येण्यासारखे आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार होतील असे विविध उपक्रम हाती घेता येतील. आपल्या दैनंदिन संपर्कातून परस्पर सहकार्याची आणि सेवेची आवडही त्यांच्या मनात निर्माण करावी लागेल. आपल्या माता-भगिनींच्या मनात कोणत्याही कारणाने अगतिकतेची, न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ देता कामा नये. आपण पराशक्तीची जिवंत प्रतीकं आहोत ही शिकवण त्यांना दिली पाहिजे....!’ ते पुढे म्हणतात, ‘आपल्याभोवती अशा अनेक भगिनी आढळतात की, ज्यांना उदरनिर्वाहासाठी खूप शारीरिक कष्टाची कामं करावी लागतात. यापैकी काही तर अगदी निराधार आणि अगतिक असतात. असं दृश्य पाहून आपलं हृदय अथांग सहानुभूतीनं भरून आलं पाहिजे. त्यांना कामधंदा मिळावा, उपजीविकेचं साधन मिळावं या दृष्टीनं काही योजना हाती घेतल्या पाहिजेत. आपल्या कोणत्याही भगिनीला, मातेला रस्त्यावरचं उपेक्षिताचं जीवन कंठावं लागू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे आपलं पवित्र कर्तव्य आहे...!’’ (विचारधन - श्रीगुरूजी पृ.३३३ ते ३३८)
राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका कै. लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर यांनी १९३६ मध्ये राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. या स्थापनेपूर्वी महिलांवर होणाऱ्या अत्याचारानं त्या अतिशय व्यथित झालेल्या होत्या. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी काही भरीव कार्य करावंच लागेल अशा निश्चयानं त्यांनी विविध पर्यायांचा शोध सुरू केला होता. त्यांची मुलं संघाच्या शाखेत जात असत. इतर कुठल्याही पर्यायांपेक्षा संघाच्या कार्यशैलीनं प्रभावित झालेल्या मावशी संघकार्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या दृष्टीनं संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांना भेटायला गेल्या. इतिहास असं सांगतो की, मावशी आणि डॉक्टर यांच्यात प्रदीर्घ विचारविनिमय झाला होता. मुला-मुलींच्या एकत्रित शाखा चालू नयेत एवढंच डॉक्टरांचं मत होतं. संघाप्रमाणेच महिलांच्याही संघटनेची आवश्यकता त्यांना फार महत्त्वाची वाटत होती. संघ आणि समितीनं एकाच ध्येयानं प्रेरित होऊन आपापली वाटचाल स्वतंत्रपणे करावी, परंतु परस्पर सहयोगातून कार्य उभं राहावं असं डॉ. हेडगेवार आणि मावशी केळकर यांच्या दरम्यान निश्चित झालं होतं. दोन्ही संघटनांची आद्याक्षरे आर.एस.एस. जाणीवपूर्वकच सारखी ठेवण्यात आली होती. ‘स्त्री शक्तीचा साक्षात्कार’ (ले.-दिनकर केळकर) आणि ‘दीपज्योती नमोऽस्तुते’ (ले.- सुशीला महाजन) या मावशी केळकरांवरच्या पुस्तकांमधून वरील प्रकारची सर्व माहिती मिळते. संघानं समितीच्या कार्यवाढीला किती प्रकारानं प्रोत्साहन दिलं याचीही माहिती या पुस्तकांमधून उपलब्ध होते. 'दीपज्योती नमोऽस्तुते' या पुस्तकामध्ये डॉक्टरांच्या २४-६-१९३८ रोजीच्या बौद्धिकाचा अंश देण्यात आलाय. त्यामध्ये डॉ.हेडगेवार म्हणतात, ‘सर्वांगानं राष्ट्राची उन्नती व्हावी म्हणून समिती स्थापन करण्यात आली आहे. हिंदू राष्ट्र घसरत न जाता उत्कर्षाला जाईल अशी योजना समितीला करावयास पाहिजे. कार्य कठीण आहे तरी ते करण्यातच शोभा आणि पराक्रम आहे...!’ (पृ.७६) डॉ. हेडगेवार जिथं जिथं प्रवासाला जात तिथं तिथं सगळीकडच्या महिलांना समितीकार्याची माहिती देत. कार्य वाढावं यास्तव मावशींशी संपर्क व्हावा असा स्वत: प्रयत्न करत. इथं एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे, समितीच्या कार्यवाढीला डॉक्टरांनी प्रोत्साहन तर दिलं, मावशींनीच कार्यारंभ करावा यादृष्टीनं प्रयत्न केले. मात्र मार्गदर्शकाची अथवा नियंत्रकाची भूमिका डॉक्टरांनी कधीच बजावली नाही आणि त्यानंतरच्या संघनेतृत्वानं महिला संघटनेच्या स्वतंत्र अस्तित्वाची, व्यक्तिमत्त्वविषयी आदर ठेवण्याची परम्परा सदैव कायम ठेवलीय.
वास्तविक पाहता संघाचं कार्य हे घरातल्या माता-भगिनींमुळेच यथासांग चालू आहे या माझ्या म्हणण्याचा कोणी विपर्यास करू नये. तुम्ही आम्ही स्वयंसेवक म्हणून निर्धास्तपणे जी कामं करतो त्यात घरच्या स्त्रियांचा सहभाग कोणी नाकारू शकत नाही. घरात कोणी स्वयंसेवक किंवा प्रचारक आला तर त्याची ऊठबस आणि भोजनाची व्यवस्था या घरातल्या माता-भगिनी-वहिनींमुळेच आम्ही करू शकतो. म्हणून जेव्हा कोणी म्हणतो संघात स्त्रियांचं स्थान दुय्यम आहे तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते...!
संघाचं काम वाढवण्याचं काम प्रचारक करतात. आपल्या प्रांतातून दुसर्या प्रांतात किंवा भागात जाऊन संघाचं काम हे प्रचारक करत असतात. आपल्या उदरात नऊ महिने आणि आता २०-२१ वर्षांपर्यंत वाढविलेल्या मुलाला प्रचारक म्हणून पाठविताना तिच्या मनाची घालमेल तर होत असणारच, पण राष्ट्र कार्यासाठी आपला मुलगा जातो आहे म्हणून ती हसत हसत त्याला निरोप देते. दुसऱ्या कोणत्या तरी शहरातून आलेल्या प्रचारकाच्या जेवणाची सोय आपला मुलगा असल्यासारखीच करणारी ती मायमाऊलीच असते.
संघात काही स्वयंसेवकांना प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी असते. त्यांना आठवड्या-पंधरा दिवसांनी प्रवास करावा लागतो. त्या घरची ती माऊली, भार्या किंवा त्यांची मुलगी असेल तर त्या आपली हौसमौज बाजूला ठेवून त्यांच्या प्रवासाची तयारी करतात. संघाचे ज्येष्ठ प्रचारक नानाराव ढोबळे यांनी लिहिलेल्या 'समाजतळातील मोती' या पुस्तकात 'एक देशव्याप्त शक्ती : वहिनी' या प्रकरणात संघ स्वयंसेवकांच्या पत्नीचं संघासाठीच्या योगदानाबद्दल सुंदर लिहिलं किंबहुना त्यांना मानाचा मुजराच केलाय. त्यांनी एक किस्सा सांगितलाय. नानाजी आणीबाणीच्या काळात केतकर वकिलांच्या घरी गेले असताना बाहेर काही लोक उभे होते. नानाजी आत गेले तेव्हा वहिनींनी त्यांना खुणेनंच जा म्हणून सांगितले. नानाजी बाहेर आले तेव्हा कळलं की ते पोलीस होते. केतकर वकिलांना पोलीस त्या दिवशी येरवडा कारागृहात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी नानाजी वहिनींना भेटायला गेले असता वहिनी म्हणाल्या, "नाना, बरं झालं तुम्ही लवकर निघून गेलात. मला सारखी धास्ती वाटत होती की तुम्ही सापडता की काय? तुम्ही सापडू नका. काही पाहिजे असेल तर सांगा...!" अशा वहिनी असतात म्हणूनच संघाचं काम अविरत चालू आहे. हा एक किस्सा आहे. असं वहिनींबद्दलचे अनेक किस्से आहेत. संघाचे संघचालक किंवा स्वयंसेवक दसऱ्याच्या संचलनासाठी अहोरात्र फिरत असतात तेव्हा या वहिनीच त्यांच्या संचलनाचा संपूर्ण गणवेश तयार ठेवीत असतात. या सर्व वहिनीच एकप्रकारे संघाचं चलनवलन करीत असतात असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरू नये.
"समाज परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार आहेत...!" अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये सहसरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य यांनी दिली. डॉ. वैद्य पुढे म्हणाले की, भारतीय जीवनदृष्टीमध्ये कुटुंब हे सर्वात लहान एकक आहे. कुटुंबात स्त्रियांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळं समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे राहण्याची भूमिका बजावली पाहिजे. समाज परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. समाजात महिलांची सक्रियता वाढत असून हे निश्चितच प्रशंसनीय आहे. या संदर्भात संघाच्या शताब्दी योजनेअंतर्गत विविध क्षेत्रांत सक्रिय असलेल्या महिलांचा सहभाग वाढवण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. म्हणून मी वारंवार म्हणत असतो की, महिला आहेत म्हणून संघाचं काम यथासांग आणि निस्पृहपणे चालू आहे. यात काही वादच नाही. संघ आणि महिला यांचे कार्य जर समजून घ्यायचं असेल तर संघाच्या शाखेत येऊन घरोघरी संपर्क करून याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि संघ आज जी शंभरी गाठत आला आहे ते या सगळ्या माऊलींमुळेच यात तीळमात्र कुणाला शंका येऊ नये.
No comments:
Post a Comment