Friday, 6 December 2024

शिवसेना व कॉंग्रेस संबंध

शिवसेना व कॉंग्रेस पक्ष हे जणू काही एकमेकांचे शत्रू होते व आहेत असे नॅरेटिव्ह जाहीरपणे तसेच कुजबुज तंत्रातून सामान्य मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी भाजप व आर एस एस चे कार्यकर्ते जीवाचा आटापिटा करत असताना दिसतात. या कारणाने शिवसेना व कॉंग्रेस संबंध समजून घेणे गरजेचे आहे असे म्हणायला हरकत नाही. शिवसेना स्थापना सन १९६६ मध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे व काही तत्कालीन कॉंग्रेस नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई इत्यादी सामाजिक राजकीय नेत्यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेली आहे. अध्यक्षपद बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिले. हा इतिहास आहे. त्याची पार्श्वभूमी साधारण अशी आहे. त्यावेळी महाराष्ट्रात ब्राह्मणेतर विरुद्ध ब्राह्मण तसेच मुंबईत मराठी रयत विरुद्ध अमराठी व्यापारी उद्योजक व अधिकारी नोकरदार असे दोन प्रवाह होते. दोन्ही एकमेकांना पूरक होते. ब्राह्मणांच्या त्रासाला कंटाळून प्रबोधनकार ठाकरे यांनी पुणे सोडून मुंबईत बस्तान बसवले होते. मुंबईतील ब्राह्मणांनी तरीही प्रबोधनकारांना छळणे थांबवले नव्हते. पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे ब्राह्मणी छावणीचे पुढारी होते. प्रबोधनकार आपल्या माध्यमातून प्रतिकार करत होते. याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळीला जोर आला. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. तर मुंबईत दोन्ही वाद वाढत गेले. अत्रे दैनिक मराठा मधून गरळ ओकत होते. त्याविरोधात साप्ताहिक मार्मिक सुरू केले. ब्राह्मणेतर बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार स्वातंत्र्य मिळवून देणे ही भूमिका घेतली होती. संपादक बाळ ठाकरे यांच्या व्यंगचित्रांच्या प्रभावामुळे साप्ताहिक मार्मिक लवकरच दूर दूर पोचले. हे सर्व यश पडद्याआड कॉंग्रेस पुढाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे शक्य झाले होते. जनजागृती होताच पुढचे पाऊल टाकले गेले. शिवसेना स्थापन केली. मुंबई वर अमराठी राजकारणी, व्यापारी उद्योजक व नोकरदार यांचाच पगडा होता. सरकार कॉंग्रेस पक्षाचे होते . मोरारजी देसाई, सका पाटील, पटेल असे पावरफूल कॉंग्रेस नेते अमराठी लोकांना ताकद देत होते. तर वर सुरुवातीलाच उल्लेख केलेले सर्वच यशवंतराव सह राजकीय कॉंग्रेस नेते कमी पडत होते. त्यांनी एकमताने प्रबोधनकार ठाकरे यांना मदत केली. यातूनच पुढे जन्माला आले ते साप्ताहिक मार्मिक व शिवसेना. म्हणजेच शिवसेनेच्या जन्मापासूनच कॉंग्रेस पडद्याआड का होईना सोबत आहे. हा इतिहास भाजप व आर एस एस च्या नेत्यांना अधिक प्रमाणात माहित आहे.
नंतरच्या काळात शिवसेनेने राजकीय भूमिका घेतली. सामाजिक भूमिकेत तडजोड केली गेली. साहजिकच दोन्ही राजकीय पक्षांची तात्विक मतभिन्नता असणे स्वाभाविकच होते. त्याप्रमाणे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना यांच्यात वैचारिक व राजकीय मतभेद होते व आजही आहेत. राजकारणात अनेक वेळा तडजोडी कराव्या लागतात. १९८९ पासून एकत्रित असलेले शिवसेना व भाजप २०१४ मध्ये वेगळे झाले. २०१९ मध्ये एकमेकांचे राजकीय विरोधक नाही तर शत्रू झाले. २०२२ जून मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली. हे अभिमानाने सांगतात. 
ज्या महाराष्ट्रात शेठजी भटजी यांचा पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याच भाजपाला शिवसेनेने खांद्यावर घेऊन वाडी तांडा पाडा वस्ती गाव खेडे नगर महानगर येथे पोचवले. तीच शिवसेना संपवण्याची भाषा भाजपचे देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी अमित शहा करत असताना दिसतात. राजकारणात आयाराम गयाराम संस्कृती नवीन नाही. हे खरे असले तरी आमच्या गावाकडे म्हणले जाते की, काही हागणाराने लाजावे तर काही पाहणाराने लाजावे. पण भाजपाने आपल्याच विकृतीचे प्रदर्शन सुरू ठेवले आहे असे म्हणायला हरकत नाही.‌ 
स्वतः बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांनी १९७५ मध्ये जाहीरपणे आणिबाणी समर्थनार्थ भूमिका घेतली होती. एवढेच नाही तर प्रधानमंत्री इंदिरा गांधी व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या सोबत मुंबईत जाहीर सभेत उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. राष्ट्रपती निवडणूक प्रसंगी कॉंग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा देण्याशिवाय मतदान केले होते. म्हणजेच बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख असतांनाही कॉंग्रेस सोबत सार्वजनिक हिताची काळजी घेत सहकार्याची भूमिका घेत होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत त्यांनी सामंजस्याची राजकीय भूमिका घेतली होती.
राजकारणात कोणीही सदासर्वकाळ एकमेकांचे शत्रू नसतात. आजच्या महाआघाडी व महायुती मधील ३+३=६ राजकीय पक्ष एकमेकांचे राजकीय विरोधक आहेतच. काही महिन्यांपूर्वी मोदी शहा फडणवीस यांनी अजित पवार लवकरच चक्की पिसिंग करताना दिसतील असे जाहीर केले होते. आज काय चित्र दिसते आहे? या पार्श्वभूमीवर भाजपची उद्धव ठाकरे बाबतीत घेतलेली कृतघ्नतेची भूमिका अत्यंत वेदनादायक आहे. एवढेच नाही तर शरद पवारांनी वसंतदादा पाटील विरोधात काँग्रेस फोडली तेंव्हा त्यांनी पुलोदची स्थापना केली होती. त्यामुळे जनसंघ नेते उत्तमराव पाटील मंत्री झाले. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात जनसंघाला पहिला मंत्री शरदराव पवार यांनी दिला होता. थोडक्यात आजच्या भाजपला बालपणापासूनच वेळोवेळी अगदी कॉंग्रेस, शिवसेना , भाकप, माकप, तृणमूल, डीएमके, बसपा, एम आय एम, मुस्लिम लिग, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्वच राजकीय पक्षांनी तत्कालीन परिस्थितीत बळ देऊन मोठे केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या नेत्यांनी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कॉंग्रेस मधील सोबतच्या काही सहकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करुन जनसंघ हा एक विरोधी पक्ष स्थापण्यासाठी पूर्ण सहकार्य केले होते. कारण सशक्त लोकशाही साठी विरोधी पक्ष अत्यंत आवश्यक आहे. देशात पूर्ण बहुमताचे कॉंग्रेस सरकार असताना देखील संयुक्त राष्ट्र संघाच्या एका सभेत भारत सरकारने प्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवले होते. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय धोरण आहे .  कुरबुरी कुटुंबातील नवरा बायको मध्येही होतात. पण तोही संसार यशस्वी होतोच. भाजपने एक है तो सेफ है व बटेंगे तो कटेंगे असे समाज व राष्ट्र विरोधी नारे देणे चुकीचे आहे. ज्या भाजपने ओबीसी प्रधानमंत्री, एससी व एसटी राष्ट्रपती, जैन अल्पसंख्याक गृहमंत्री दिले. त्या आर एस एस व भाजपच्या तोंडी विभाजनाची भाषा शोभत नाही.‌ भारतीय मतदारांनी आर एस एस व भाजपच्या ब्राह्मणवादी विचार तसेच आहाराकडे दुर्लक्ष करून २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला मोठ्या आशेने मतदान केले होते. तुम्हाला ते टिकवता आले नाही. याबाबत अधिक आत्मचिंतन करण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षांत तुम्ही हजारो अद्ययावत सुविधा युक्त रेशीम बाग केंद्रे देशभरात निर्माण केले आहेत. येथे बसून जमलेच तर भारत देश व सरसकट सर्वच भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतिशील कार्यक्रम आखावेत व राबवावेत असा एक सल्ला आहे. 
सध्याच्या राजकीय वातावरणात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांनी महाविकास आघाडीच्या सोबत घेतलेली भूमिका शंभर टक्के शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमीकेशी सुसंगत आहे असे स्मृती शेष बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी स्पष्टपणे म्हणायला पाहिजे.
दिनांक -१७-११-२०२४ .

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...