जागतिक तत्वज्ञ आणि आधुनिक साम्यवादाचे निर्माते कार्ल मार्क्स यांचं निधन झाल्याच्या घटनेला एकशे एक्केचाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. योगायोगाची गोष्ट म्हणजे कार्ल मार्क्सचा जन्म १८१८ साली झाला, त्याचवेळी भारतातून बदफैली पेशव्यांची सत्ता खालसा झाली होती. शनिवार वाड्यावर ब्रिटीशांचा युनियन जॅक फडकला होता. दुसरा योगायोग असा की, मार्क्सची जन्मशताब्दी आणि रशियन कामगार क्रांतीला एकच गाठ पडली होती.
एंगल्स आणि मार्क्स यांचा "दास कॅपिटल " ग्रंथ समाजवादाचं बायबल म्हणून ओळखला जातो. कार्ल मार्क्स क्रियावान पत्रकार आणि अर्थतज्ञ होते. विशेष म्हणजे ज्या एंगल्सचं नाव सहसा दुय्यम मानलं जातं. त्याच्या प्रभावामुळंच कार्ल मार्क्स श्रमिकांच्या प्रश्नांकडं आकर्षित झाला होता. विसाव्या शतकात प्रत्यक्ष साम्यवाद आचरणात आणला गेला, तो रशियामध्ये व्लादिमीर लेनिनद्वारा तेव्हा जगभरच्या कामगार चळवळींचं आकर्षण केंद्र रशिया आणि लेनिन हेच होतं. भारतात मार्क्सवादाची मुहुर्तमेढ मानवेंद्र रॉय यांनी रोवली तरी डांगे आणि सहकाऱ्यांनी त्याला चळवळीचं स्वरुप दिलं. तोपर्यंत विसावं शतकाचं पाव अंतर ओलांडून गेलं होतं. रशियातील राज्यक्रांती आणि भारतात गांधींजींचं आगमन या एकाच सुमारास घडलेल्या घटना आहेत. त्याच सुमारास भारतात वैदिक संघटना कार्यान्वित झाल्या होत्या. कारण भारतात येऊ घातलेल्या.समाजवादाची आच निपचित पडलेल्या वैदिक अळ्यांना लागली होती, ते सारं गदळ उसळून वर आलं होतं. आणि ऐतखाऊ भटजी विरुद्ध श्रमीक हा लढा भारत पारतंत्र्यात असतानाच सुरु झाला होता. मार्क्सच्या कालखंडात युरोपात घुसळण आणि मंथन एकाचवेळी सुरु झालं होतं. भारतात फुल्यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी श्रमिकांची मोट बांधली होती. विशेष म्हणजे भारतात महिला श्रमीक जागृती हा महत्त्वाचा टप्पा ठरला. सरकारी तात्विक पातळीवर न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या सीमेत राहूनही वैचारिक पेरणी केली. ती कालसुसंगत होती. फ्रेंच राज्यक्रांती आणि इंग्लंडची औद्योगिक क्रांती या दोन्ही क्रांती गुलाम भारतासाठी पर्वणीच होत्या. मार्क्सवादी तत्वानं जरी जग ढवळलं तरी कोणत्याही सूत्र किंवा तत्वाला राबविणारे अविवेकी असतील, तर त्यांचा विचका होतो. संपूर्ण तत्व राबविणं कधीच शक्य होत नाही. परंतु त्याची ओळख होणंही काही कमी नव्हतं. श्रमिकांची जागृती ही मार्क्सवादाची मोठी कामगिरी ठरली. मार्क्स ही व्यक्ती नव्हती. एका नैसर्गिक जीवनशैलीचं उगमस्थान होतं.
पृथ्वीवरील मानवी इतिहासात क्रांतीचे जे मोजके टप्पे आहेत, त्यातील एक मार्क्सचं तत्वज्ञान होय. तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात "मॅग्ना कार्टा सनद" जशी गुलाम मुक्तीची सनद होती, त्याप्रमाणे "फ्रेंच राज्यक्रांती" अठराव्या शतकातील मानवी मूल्यांची मुहूर्तमेढ रोवणारी ठरली; तर इंग्लंडची औद्योगिक क्रांती ही मानवी श्रमाला वाचविणारी बौद्धिक क्रांती ठरली. त्याचप्रमाणे जीवनाच्या विकासातील महत्वाचा टप्पा हा मार्क्सवादी तत्वज्ञान आहे. मार्क्सवादी तत्वज्ञान जेव्हा प्रत्यक्ष जुलूम आणि शोषणाविरुद्ध उभं ठाकलं तेव्हा त्याच्या सामर्थ्याचं दर्शन झालं होतं. त्या तत्वज्ञानानं जगभर जी जागृती केली होती तीने जगाची वर्गीय फाळणी स्पष्ट केली आहे. मानवी सभ्य संस्कृती स्थापनेपासून ज्या ऐतखाऊ वर्गानं गुलामीची घृणास्पद प्रथा आणली. त्या शोषकांना मार्क्सनं चाप लावला. आदिम साम्यवादाचं आधुनिक सैंध्दातिक रुप, हे मार्क्सचं तत्वज्ञान आहे. ते "प्रॅक्टिकल सोशॅलिझम" म्हणून किती यशस्वी झालं, याची चिवडाचिवड करण्यापेक्षा, भांडवलदारांच्या पोटातच, श्रमिकांचं जग तयार झालं आहे. जेव्हा जुलूम पिळवणूक असह्य होते, तेव्हा श्रमिक पोट फाडून बाहेर येतो. मार्क्स ही व्यक्ती नव्हती तर; शोषितांच्या रागाला उफाळणाऱ्या बंडाला शास्त्रशुध्द लढ्याचं रुप देणारी जीवनशैली आहे. त्यामुळं मार्क्सवादाच्या यशस्वीतेला नपुंसकांनी मोजपट्टया लावण्याचा विफल यत्न करु नये. मार्क्सवाद (दास कॅपिटल) हा श्रमिकांच्या,पोटातील देव्हाऱ्यात ठेवलेला बायबल आहे. तो नष्ट होऊच शकत नाही. कारण मार्क्सवादाचं एक सुप्त जग याच भांडवली जगात खदखदतंय. वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध करेल. भारतीय समाजाच्या दृष्टीनं. गांधीवाद हे तत्वज्ञान रक्तरंजित क्रांती घडवून आणणारं तत्वज्ञान नव्हे. परंतु महात्मा गांधी हे केवळ भारतीय तत्ववेत्ते नव्हते तर, वैश्विक मानवतावादाचे प्रणेते होते. भारतीय समाजपुरुषाची जडणघडण महात्मा गांधीनीच जास्त जाणली होती. त्यामुळं पहिल्यांदा भारतीय इतिहासात.सर्वसामान्य माणूस एखाद्या देवाकडं खेचावा, असा गांधीकडं खेचला गेला होता. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा एका संतांनी आपलं साधुत्व एका महासत्तेसमोर उभं केलं होतं. अहिंसा, असहकार, सत्याग्रह ही चळवळीची शस्त्रे बनू शकतात. हे जगानं प्रथमच पाहिलं होतं. विशेष म्हणजे ही शूरांची अहिंसा होती. आणि तिच्यासमोर राक्षसी महासत्तेला झुकावं लागलं होतं. सामान्य भारतीय माणूस आणि स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीत उतरविण्याचं श्रेय महात्मा गांधींना द्यावं लागेल.
कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी यांच्या जडणघडणीत संस्कारात बरंच अंतर होतं. कार्ल मार्क्सच्या आधी फ्रेंच राज्यक्रांती झाली होती. तर औद्योगिक क्रांती उच्च टप्प्यावर होती. त्याचं प्रतिबिंब मार्क्सच्या शोषणविरोधी विचारांवर पडलं होतं. तर महात्मा गांधींना भारतातील मनुस्मृती प्रणीत अस्पृश्यता माहिती होती. पण प्रत्यक्ष झळ बसली ती रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्यांना सामानासहित फेकण्यात आल्यावर. कार्ल मार्क्सच्या संस्कारावर अंधश्रद्धा आणि अस्पृश्यतेचं सावट नव्हतं. महात्मा गांधी त्या संस्कारात वाढले होते. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बॅरिस्टर झालेल्या मोहनदासला पाश्चिमात्य उदारमतवादी संस्कारामुळं इथल्या अस्पृश्यतेचा प्रश्न समजला होता. परंतु भारतीय धार्मिक संस्कार आणि.पाश्चिमात्य राज्यक्रांतीची तत्वे यांचं बेमालूम मिश्रण बापूंमध्ये झालं होतं. म्हणूनच बापू सामान्य भारतीय नागरिकाला काय हवं आहे. आणि ते मिळवण्यासाठी त्याचा कसा वापर करून घ्यायचा हे जाणू शकले होते.
मार्क्सवाद विरोधकांना जसा मार्क्स समजला नाही. तसा तो मार्क्सवाद्यांनाही समजला नाही. कोणतत्याही विचारांचं रुपांतर पोथीत झालं की, हिंसाचार अपरिहार्य ठरतो. मार्क्सला अपेक्षित असलेली सामाजिक क्रांती आणि सांस्कृतिक क्रांतीचा मार्ग अहिंसक होता. पण अपेक्षित क्रांती झालीच नव्हती. रशियाच्या झारशाहीची जुलमी राजवटीत विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या व्लादिमीर लेनिन याला मार्क्सवादातील आर्थिक पिळवणूकी विरोधी उपाय गवसला होता. पण ती मार्क्सवादाची किल्ली नव्हतीच. लेनिनच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचारानं तो पिसाळला होता. वैयक्तिक सूडाला सार्वजनिक रुप देऊन बदला घेण्याच्या इराद्यानं त्यानं लोकांना इकठ्ठा केलं होतं. सूडाला भडाग्नी देऊन झारशाही उलथवून पाडली होती. पण पुढं काय? याचा आराखडा कोणत्याही हिंसक आंदोलनाच्या नेत्याकडं फक्त हुकूमशाही हाच असतो. आपण शेतकरी-कामगारांच्या नावाखाली राबविलेली हुकूमशाही म्हणजेच मार्क्सवादी क्रांती असं जाहीर करुन टाकलं. त्याचा परीणाम असा झाला की, नुकताच दास-कॅपिटल वाचलेला कच्चा कामगार हिंसक क्रांतीकडं आकर्षित झाला होता. जगभर वेगवेगळ्या साम्राज्यशाही भांडवलशाहींची पिळवणूक सुरु होती. तशातच पहिलं महायुद्ध सुरु झालं होतं. त्यामुळं क्रांतीस उत्सुक असणाऱ्या कामगारांना भिंग घेऊन मार्क्सवाद तपासण्याचा अवसर मिळाला नव्हता. त्यातील उणीवा प्रथम भारतात जाणवल्या होत्या. कमालीची सामाजिक विषमता असलेल्या समाजातील कामगार हा गेट मिटिंगनंतर आपापल्या जातीच्या खुराड्यातच जात होता याचा अर्थ काय? तीव्र जातीय भावनेनं लेनिन वादावर मात केली होती. मार्क्सवादावर नव्हे. मार्क्सवाद खऱ्या अर्थानं नैसर्गिक जीवनशैलीचा स्त्रोत आहे. त्याला विकृत रुप देण्याचं काम मार्क्सवादी आणि विरोधक दोघांनीही इमानेइतबारे केलं आहे. रशियन क्रांतीचा मार्क्सवादाशी जेव्हा संबंध जोडला जातो. तेव्हा हे ध्यानात घेतलं जात नाही की एखादी व्यक्ती मार्क्सनं मांडणी केलेल्या विचारानं भारावून गेली असेल तर, ती लगेच मार्क्सवादी कशी होऊ शकते? रशियातील पिडित जनतेच्या इंधनावर फक्त काडी पेटवून टाकायची होती. जनता मेटाकुटीला आली होती. ते निमित्त लेनिनला मिळालं होतं. १९७७ साली भारतीय नागरिकांना कोणीतरी कॉंग्रेसवर मात करणारं हवं होतं. जयप्रकाश नारायण हे निमित्त झालं होतं. त्यांची घोषणा संपूर्ण क्रांतीची होती. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला नव्हता, तो प्रतिसाद राजकीय पर्यायाला होता. त्यामुळं कागदावरील.आदर्श राज्यपद्धती ही कधीही राबविणं शक्य नसतं. सामाजिक रचना संस्कृती प्रथा परंपरा या लोकांचं जीवनवळण बनलेल्या असतात. त्या मोडून वाकवून जबरदस्तीनं कोणाचं भलं जरी करायचं म्हटलं तरी शक्य नसतं. त्यामुळं भारतातील दारिद्रयातही एक मिजास आणि रुबाब नांदत आहे. ती रग त्यांची श्रीमंती आणि वैभव आहे. त्याला कुरवाळणारे निवडून येतात. व्यवस्था बदलाची भाषा करणारे सत्तेवर येत नाहीत. हे डाव्यांचं अपयश नसून दारिद्रयावर नगरिकांची निष्ठा असल्याचं लक्षण आहे.
आज मार्क्सवादाची पिछेहाट झाली अशी आरोळी ठोकली जात आहे. पण ते खरं नाही. कारण मार्क्सवाद ही,वस्तू नाही की, पीक नाही. जेव्हा-जेव्हा कष्टकऱ्यांची पिळवणूक होईल, भांडवलशाही मुजोर होईल. तेव्हा-तेव्हा श्रमिक एकजूट होऊन भांडवलशाही कलथून पडेल. पाच वर्षांपूर्वी मार्क्सची द्विजन्मशताब्दी होती. त्याचबरोबर रशियन बोल्शेविक क्रांतीचीही शताब्दी होती. परंतु भारतीय मार्क्सवादी काय किंवा जगभरचे कम्युनिस्ट काय हे सारे ज्या कामगारांच्या एल्गाराची वाट पाहात होते. तो एल्गार झालाच नाही. कारण १९९१ साली भांडवलदारांनी पध्दतशीरपणाणं केलेलं जागतिकीकरण. चीनच्या साम्यवादी पक्षाचीही शताब्दी होती परंतु नेहमीप्रमाणेच पोलादी पडद्याआड चीननं काय हालचाली केल्या ते समजलंच नाही.
आज जग कोरोना संसर्गाच्या लाटेतून बाहेर पडलं आहे. त्यामुळं साम्यवादी शक्तींबाबत घाईनं विधान करणं चुकीचं ठरेल. कारण साम्यवादी आंदोलनानं जगाला शोषणमुक्त वर्गविहीन समाजाचं गणिती सूत्र दिलं आहे. ते सूत्र भांडवलशाहीच्या गुणाकाराच्या वेळी कोणाला कसं वजा करायचं, ते नक्की ठरवेल.
No comments:
Post a Comment